गाण्यातला तात्या - ३ - माझे मन तुझे झाले..

Submitted by तात्या अभ्यंकर on 19 March, 2010 - 14:29

या आधी,
गाण्यातला तात्या - १ - वृक्षवल्ली आम्हा..
गाण्यातला तात्या - २ - व्हायलीन ब्रदर्सची बंदिश सिंफनी..

माझे मन तुझे झाले..(येथे ऐका)

अनेक वर्षांपूर्वी आलेल्या स्वामी मालिकेतलं हे सुरेख गाणं. शब्द व संगीत सुधीर मोघेंचं. सुचित्रा बर्वेने खूप सुंदर गायलं आहे हे गाणं..

थोरले माधवराव पेशवे आणि रमाबाई. कधी नव्हे ते निवांतपणाचे दोन क्षण माधवरावांना व त्यांच्या पत्नीला मिळाले आहेत.. हे गाणं म्हणजे एक मूक संवाद, एक अनामिक ओढ, एक हुरहूर..! गूज एका प्रियकर-प्रेयसीतलं, एका पतिपत्नीतलं. विश्वास एका पतिपत्नीतला.. जगातल्या सर्वात सुंदर नात्यातला..!

खरं तर पुरीयाधनश्री रागातली एक विराणीच ही. राग पुरीयाधनश्री. पुरीयाधनाश्री म्हणजे प्रार्थना, पुरीयाधनाश्री म्हणजे आर्तता! केवळ अन् केवळ समर्पणाची भावना असलेला, असा हा एक विलक्षण स्वरसामर्थ्य असलेला राग!

पुरीयाधनाश्रीतलं हे गाणं म्हणजे केवळ एका प्रियकराचं आणि प्रेयसीचं बागेतलं गाणं नव्हे! माधवरावांच्या ऐन तारुण्यात जाण्याने रमामाधवाचं सहजीवन, त्यांच्यातला प्रेमसंवाद अपुराच राहिला. अतृप्तीच राहिली. अतृप्तीची भावना वाईट नसते! आयुष्याच्या सार्थकतेची, भरभरून जगलेल्या सहजीवनाची किनार जर त्या भावनेला असेल तर त्या अतृप्तीतही कुठेतरी एक आनंद असतो, एक समाधान असतं! परंतु अकाली, ऐन तारुण्यात आलेल्या मृत्यूची एक भकास किनार जर तिथे असेल तर त्यातून आलेली अतृप्ती ही जीवघेणी ठरते, सैरभैर, बेचैन करणारी ठरते!

वेदना जेवढी सुंदर बोलते तेवढं कुणीच बोलत नाही! आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की चांगलं गाणं हे बर्‍याचदा वेदनेपोटीच जन्माला येतं! आणि त्यातूनच पुरीयाधनाश्रीतली ही विराणीही जन्म घेते व जीवाला चटका लावून जाते!

-- तात्या अभ्यंकर.

गुलमोहर: 

सर्व रसिक (!) वाचकांचे मनापासून आभार.. Happy

एक रसिक संकेतस्थळावर ही लेखमाला मला लिहायला मिळते आहे याचा आनंद वाटतो..

तात्या.

मस्त. :-)गाणं आवडतं पण चित्रीकरण जरा टिपीकल वाटतं.
ओरिजीनल गाण्यात ते तितकं भिडत नाही. विभावरीच्या आवाजातलं जास्त छान वाटलं होतं.
ओरिजीनल जरा मिळमिळीत वाटतं. कलेजा चीरके जे निघायला पाहीजे ते अगदी barely plausible निघतं.

मस्त गाणे.... धन्यवाद !!
वेदना जेवढी सुंदर बोलते तेवढं कुणीच बोलत नाही! >> खरय.. Happy

एकदा का सकाळी हे गाणे ऐकलं की सगळा दिवस व्यापून टाकतं.
जितकं जास्त गुणगुणावं तितकं ते आत आत भिनत जातं.
शब्द सुन्दर, चाल आर्त आणि पूरियाधनाश्री तर विलक्षण प्रभावी.