मी पाहीलेला अवतार!
माझ्या बर्याच मित्रांनी शिफारस केल्यावर व मिडियामधल्या या चित्रपटाच्या "महानतेच्या" वावड्या उठलेल्या ऐकुन मीही जगातल्या कोट्यावधी प्रेक्षकांसारखा "अवतार-३-डी" चित्रपट बघण्याच्या मोहात पडलो व प्रचंड करमणुक झाली!
हॉलिवुडच्या अश्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे नाव चक्क... अवतार.. असे अस्सल मराठमोळी असल्यामुळे खर म्हणजे या चित्रपटाबद्दल न बघताच आधीपासुनच आपुलकी निर्माण झाली होती व त्यात या चित्रपटाचा दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन हा असल्यामुळे हाही चित्रपट त्याच्या या आधिच्या.. मला प्रचंड आवडलेल्या.. टर्मिनेटर २ व टायटॅनिक... या २ चित्रपटांइतकाच चांगला असावा असा माझा होका होता.त्यात भर म्हणजे जाणकार समिक्षकांनी असे भाकीत वर्तवले होते की यापुढे हॉलिवुड फक्त ३-डी चित्रपटच काढतील व हा चित्रपट म्हणजे ३ डी- तंत्रज्ञानातला एक हिरा आहे हिरा!
पण कसचे काय आणी कसचे काय! चित्रपट पाहुन झाल्यावर १० डॉलर वाया गेल्याच्या दु:खापेक्षा जेम्स कॅमेरुन या माझ्या आवडत्या दिग्दर्शकाने या चित्रपटाची पटकथा नक्कीच काहीतरी स्मोक करत असताना लिहीली असावी या विचाराचे शल्य मनाला जास्त जाचत होते. खर म्हणजे मायबोलीवर फारेंड किंवा श्रद्धा के.. यांचे या चित्रपटाबद्दलचे विवेचन.. अचाट व अतर्क्य चित्रपट.. विभागात.. अजुन आले नाही याचे मला आश्चर्यच वाटते.
तर मंडळी.. तर आता या चित्रपटाबद्दल...
चित्रपटाची कथा इसविसन २१५० च्या आसपासची . कुठल्यातरी पँडोरा नावाच्या परग्रहावर न्हावि(का नाव्ही) नावाची जमात राहात असते. कसा कुणास ठाउक पण त्या ग्रहावर एक अतिशय मौल्यवान खनीज असल्याचा सुगावा अमेरिकेच्या एका लालची कॉर्पोरेशनला लागतो व त्या खनिज प्राप्तीसाठी ती कंपनी एका खाजगी मिलिटरी ब्रिगेडला त्या परग्रहावर अद्ययावत शस्त्र व विमाने घेउन पाठवते. पण हिंसेचा मार्ग अवलंबुन ते खनिज मिळवायच्या आधी सिगोर्नी विव्हरच्या हुशार (?) नेत्रुत्वाखाली एक शास्त्रज्ञांची तुकडी असा प्रयत्न करत असते की पृथ्विवरच्या काही मानवांना त्या पँडोरा ग्रहावरच्या न्हाव्यांसारख्या अवतारात रुपांतरीत करायचे व त्या अवतारात मग ते न्हावी-रुपी मानव त्या पँडोरा ग्रहावरच्या खर्या न्हाव्यांमधे मिसळुन त्यांच्याशी मैत्री करतील व त्यांचा संहार न करता त्यांच्या ग्रहावरचे ते मौल्यवान खनीज हासील करतील! म्हणजे प्लान अ- मैत्री प्लान! व तो असफल झाला तर प्लान ब.. मिलिटरी प्लान.! आल का लक्षात?
तर आता त्या पँडोरा ग्रहावरचे हे न्हावी कसे दिसतात? तर ते पार्ट चित्ता- पार्ट मांजर.. पार्ट मानव.. तर पार्ट स्टार ट्रेक मधल्या मि. स्पॉक सारखे लांब कान असलेले.. नऊ फुटी.. निळ्या रंगाचे व भली मोठी शेपटी असलेले व टारझन सारखे कपडे(?) घालत असलेले. बर ती त्यांची शेपटी काही साधीसुधी नसते.. त्या शेपटीच्या टोकाला असे वळवळणारे अतिशय संवेदनाक्षम केस असतात. त्या शेपटीच्या टोकावरच्या त्या वळवळणार्या केसांचे प्रयोजन आताच सांगत नाही.
बर ते दिसतात कसे ते तुम्हाला कळले. पण ते त्या ग्रहावर दिवसभर करतात तरी काय? त्याचे उत्तर थोडक्यात म्हणजे काहीही नाही! त्या ग्रहावर एक प्रचंड मोठे झाड असते( साधारणपणे मैल दोन मैल उंच व मैल दोन मैल रुंद) ज्याला असंख्य फांद्या असतात. हे सर्व न्हावी लोक त्या झाडावर व त्या झाडाच्या पायथ्याशी वस्ती करुन असतात. दिवसभर या झाडांच्या फांद्यांवरुन वर खाली व इकडुन तिकडे उगाचच विहार करत राहायचे हा यांचा उद्योग! बर मग झाडांच्या फांद्यांवर बागडायचा कंटाळा आला तर त्या ग्रहावर एकशिंगी व विचित्र दिसणारे अवाढव्य घोडे(?) असतात. त्या ग्रहावरच्या प्रत्येक न्हाव्याला एक एक घोडा असतो. बर घोड्यावर बसुन रपेट मारायची इच्छा झाली तर मग आपला आपला घोडा कसा ओळखायचा? तर मंड़ळी.. तिथे मग या न्हाव्यांच्या शेपटीच्या टोकाला असलेले वळवळणारे केस उपयोगी पडतात! कारण या घोडारुपी प्राण्याच्या शेपटीच्या टोकालाही तसेच वळवळणारे संवेदनाशील केस असतात. व मग प्रत्येक न्हाव्याने मग आपली शेपटी व घोडारुपी प्राण्याची शेपटी जवळ आणायची. जर तो घोडारुपी प्राणी त्या न्हाव्यासाठी राखुन ठेवला असेल तर त्याच्या शेपटीच्या टोकाला असलेले वळवळणारे केस व त्या न्हाव्याच्या शेपटीच्या टोकाला असलेले वळवळणारे केस....एकमेकात मिसळुन त्याची एक घट्ट गाठ तयार होते व तसे त्या घोडारुपी प्राण्याबरोबर बाँडींग झाले की मग तो घोडारुपी प्राणी खिदळत तुम्हाला त्या ग्रहावरची एक वाइल्ड राइड देतो.
बर कोणाला जर घोड्याची राइड आवडत नसेल तर तश्या न्हाव्यांसाठी मग त्या ग्रहावर डायनोसोअर्/गरूडरुपी पक्षीही विहार करत असतात. आता तुम्ही चतुर असाल तर ओळखल असेलच की त्या डायनोसोअर्/गरुडरुपी पक्ष्यावर राइड हवी असेल तर त्याच्याही शेपटीच्या टोकावर तेच वळव़ळवळणारे केस असतात व त्या ग्रहावरच्या प्रत्येक न्हाव्यासाठी एक गरुडरुपी डायनोसोअर राखुन ठेवला असतो की ज्याच्या शेपटीच्या टोकावरचे वळवळणारे केस त्या त्या न्हाव्याच्या शेपटीच्या टोकाला असलेल्या वळवळणार्या केसांशी घट्ट गाठ बांधतात. मग अशी घट्ट गाठ तयार झाल्यावर मग ते न्हावी सर्व ग्रहभर वाइल्ड राइड घेत विहार करतात. म्हणजे ती गाठ बहुतेक प्रुथ्वीवरच्या कारमधे असलेल्या सिट बेल्टचे काम करत असावी बहुतेक.. पडु बिडू नये म्हणुन! आणी एक... जर चुकुन एखादा न्हावी भलत्याच गरुडरुपी डायनोसोअरवर आरुढ व्हायला गेला तर तो गरुडरुपी डायनोसोअर.. त्या न्हाव्याचा जिव घ्यायलाच अंगावर येतो बर का... ते बघुन मला अशी कल्पना आली की प्रुथ्विवर सुद्धा आपल्या कार असे करु लागल्या तर? मालकाव्यतिरिक्त जर कोणी कारमधे बसायला गेले तर गाडी चवताळुन चालु होउन त्या चोराच्या अंगावर वेगात चालुन गेली तर कार थेफ्टचा प्रश्नच मिटेल!असो.
तर आता मुख्य प्रश्न असा की पृथ्वीवरच्या मानवाला त्या पँडोरा ग्रहावरच्या न्हाव्याचा अवतार कसा द्यायचा? इथे सिगोर्नी विव्हररुपी शास्त्रज्ञाची हुशारी दिसुन येते. तिने एक अद्ययावत शवपेटिका बनवली असते. त्या शवपेटीकेच्या आत असंख्य बटने,लाइट व वायर्स असतात. बाहेरही काही बटने असतात. पँडोरा ग्रहावर एका वातानुकुलीत व ऑक्सिजनयुक्त अश्या बंदिस्त लॅबमधे असलेल्या शवपेटीकेत मानवाने जाउन मग झोपायचे. मग बाहेरुन ती शवपेटीका बंद केली जाते व काही बटने दाबली व वरखाली केली की आतला मानव न्हावीरुपी अवतारात पँडोरा ग्रहावर.. त्या लॅबच्या बाहेर.. अवतिर्ण होतो! वाला! बर गंमत अशी की तिथल्या प्राणवायु नसलेल्या वातावरणात न्हाविरुपी मानवाच्या अवताराला प्राणवायुची जरुरी लागत नाही! पण जर का त्या शवपेटिकेच्या बाहेर असलेल्या बटनांची उघडझाप जर केलीत तर तात्काळ तो न्हावीरुपी मानव बाहेर त्या ग्रहावरच्या ऑक्सिजन विरहीत वातावरणात बेशुद्ध(का मरुन?
) होउन पडतो!
तर अश्या रितीने चित्रपटाचा नायक.. पॅंडोरा ग्रहावर.. न्हावीरुपी अवतार घेउन त्यांच्याशी मैत्री करायला जातो. पण तिथल्या एका न्हावी मुलीशी त्याची जरा जास्तच जवळची मैत्री होते व त्याचे ह्रुदयपालट होते. ज्या भाडोत्री मिलिटरीने त्याला त्या ग्रहावरच्या न्हाव्यांचे सिक्रेट काढायला पाठवले असते.. की बाबा ती लोक राहतात ते झाड कोती मोठे आहे त्याची पाळमुळ किती खोलवर आहेत.. ते खनीज त्या झाडाच्या किती खाली दडलेले आहे.. इत्यादी आवश्यक माहीती काढायच्या ऐवजी हा हिरो त्या न्हावी लोकांमधे एवढा मिसळुन जातो व त्या लोकांच्या घोडारुपी प्राण्याच्या राइडला व गरुडरुपी डायनोसोअरच्या वाइल्ड राइडवर व अर्थात सर्वात मुख्य म्हणजे त्या न्ह्वावीलोकातल्या एका सुंदरीवर तो इतका भाळतो की तो स्वतःला न्हावीच समजायला लागतो!
आणी मग सर्वात शेवटी कॅमेरुनच्या वाइल्ड इमॅजिनेशनचा कहर म्हणजे ह्रुदयपालट झालेला हा नायक.. त्या ग्रहावरच्या न्हावी लोकांना पृथ्वीवरुन आलेल्या भाडोत्री मिलिटरीशी लढाई करायला सज्ज करतो! त्या लढाइत मग २१५० मधल्या पृथ्विवरच्या मॉडर्न बॉन्बर्स व इतर अद्ययावत मिलिटरी शस्त्रास्त्रांचा मुकाबला मग तो नायक व न्हावी लोक त्या ग्रहावरच्या गरुडरुपी डायनोसोअरांची मदत घेउन करतात. त्या घनघोर युद्धात मग चक्क ते गरुडरुपी डायनोसोअर त्या मॉडर्न बॉन्बर्सना आपल्या पायात पकडुन.. हलवुन हलवुन.. त्यांचा बॅलंस बिघडवुन खाली पाडतात. अशी विजयश्री खेचुन आणल्यावर हा हिरो मग त्याचे स्पिरिट्(आत्मा?) त्याच्या अवताररुपी न्हाव्यामधे धारण करुन त्यांच्यातलाच एक न्हावी म्हणुन तिथे त्या ग्रहावरच त्यांच्यात विलीन होतो व त्याचा अवतार अवतार न राहता तो खराच न्हावीरुपी अवतार बनतो!
कसले जबरी व ग्रेट इमॅजिनेशन आहे जेम्स कॅमेरुनचे! मानल पाहीजे!( मला वाटते त्याने त्याच्या ४-५ वर्षाच्या नातवाला वगैरे हाताखाली घेउन ही कथा लिहीली असावी किंवा काहीतरी स्मोक करत असताना तरी ही महान कथा त्याने लिहीली असावी किंवा साठाव्याच वर्षात त्याचा बुद्धीभ्रंश झाला असावा अशी मला दाट शंका येते! )
( आता या वाइल्ड इमॅजिनरी कथेमधे अहिंसा, एकोपा,पिसफुल स्पिरिट,मानवाची ग्रिड्,हिंसा,प्रेम वगैरे वगैरे प्रतिकाम्त्मक रित्या दाखवण्याचा दिग्दर्शकाने प्रयत्न केलेला आहे पण मला तर या चित्रपटात फक्त (तर्कशुन्य! माइंड यु!) वाइल्ड इमॅजिनेशनच दिसले )
हे वाचल्यावरही जर का कोंणाला हा चित्रपट बघायचा असेल तर एक व्हिडिओ गेम बघायला जात आहोत असे समजुन फक्त ३-डि मुव्हीच बघा. तेवढेच स्पेशल इफेक्ट्स बघीतल्याचे समाधान तरी लाभेल. साध्या पडद्यावर बघण्याच्या लायकीचा हा चित्रपट नाही असे माझे मत आहे. या उप्पर तुमची मर्जी!
न्हावीरुपी अवतार.. मी पण
न्हावीरुपी अवतार..
मी पण काही ठिकाणी कपाळाला हात लावला होता. पण लोक खूप कौतूक करताना बघून 'नसेल आपल्याला त्यातलं काही कळत..' असं म्हणून घेतलं.
लहान मुलांना असलं काही दाखवू नका- अशीही भिती बर्याच जणांनी घातली होती, पण तेच जास्त एन्जॉय करतात.
मुकुंद, चला माझ्याशी कुणीतरी
मुकुंद, चला माझ्याशी कुणीतरी सहमत आहे. भयानक आहे हा सिनेमा.
इतकी झाडे, तर ऑक्सिजन का नाही ? पृथ्वीवरच्या माणसाना मास्क का लागतो ? ती सिगोर्नी, दोन्हीकडे एकाचवेळी कशी वावरु शकते ? गुरुत्वाकर्षण आहे तर मग ते मोठे मोठे पहाड अधांतरी कसे ? त्यावरच्या धबधब्यांचे पाणी कुठे गायब होते ?
आणि ज्यानी प्रत्यक्षातला निसर्ग बघितला आहे त्याना , या सिनेमातल्या मश्रूमचे, जेली फिशचे अजिबात कवतिक वाटणार नाही.
आणि मी साध्या पडद्यावर बघितला !!!
अरे मी ही आहे यासगळ्यांशी
अरे मी ही आहे यासगळ्यांशी सहमत. मलाही अजिबातच आवडला नाही हा पिक्चर. मुकुंद न्हावी च्या ऐवजी ते नावी असावं असं मला वाटतं.
अवतार न आवडलेल्या "रेअर
अवतार न आवडलेल्या "रेअर स्पिशीज" बघायला आले मी इकडे
मला तर बुवा खूप आवडला. खर तर ते शेपूट प्लग इन ची आयडिया आणि एकूणच निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याची कन्सेप्ट मला खूप आवडली उलट!! असो, पसंद अपनी अपनी.
मला हा सिनेमा ३ डी व्हिडीओ
मला हा सिनेमा ३ डी व्हिडीओ गेम सारखा वाटला होता......बस्स इतकच... अजून काही नाही.
या ऑस्कर सोहळ्याच्या वेळी मला सारखी भिती वाटत होते की अवतारलाच सगळ्या ठिकाणी उचलून धरणार की काय, पण तसे झाले नाही. हुश्श्य.
मैत्रेयी, अगदी अगदी! फक्त जरा
मैत्रेयी, अगदी अगदी!
फक्त जरा लांबला आहे चित्रपट.
मैत्रेयी मला पण ती शेपूट प्लग
मैत्रेयी मला पण ती शेपूट प्लग इन ची आयडीया आवडली होती. माझ्या नवर्याला फार म्हणजे फार आवडला हा सिनेमा त्याने २ वेळा जाऊन बघीतला हॉल मध्ये.
मला तर कळलाच नव्हता चित्रपट.
मला तर कळलाच नव्हता चित्रपट. इन्टरनेट वर गोष्त वाचून कळला. आता मुकुन्दने लिहिल्यावर स्टोरी लिहिल्यावर कळला. पाहू का पुन्हा?
(No subject)
>>मुळात मुकुंदलाच तो पिक्चर
>>मुळात मुकुंदलाच तो पिक्चर कळलेला नसेल तर त्याच्या लिखाणावरुन तुला काय समजणार? <<
हम्म्म... संशयाला जागा आहे.
बाकी या लेखाचं टायमींग आणि अॅवटारचं हुकलेलं बेस्ट पिक्चरचं अॅवॉर्ड हा योगायोग तर नव्हे?
Take it easy, dude...
हा सिनेमा फँटसी या कॅटगरित
हा सिनेमा फँटसी या कॅटगरित मोडतो हे विसरलात की काय? अजुन एक गोष्ट, अचाट गोष्टी फँटसाइज करणं एक गोष्ट आणि त्या पडद्यावर उतरवणं एक वेगळी गोष्ट. जबरदस्त सिनेमा आहे. कुठेही एक सुद्धा दृश्य त्या सिनेमात निर्माण केलेल्या वातावरणाशी विसंगत वाटत नाही.
मुकुंद, चला माझ्याशी कुणीतरी
मुकुंद, चला माझ्याशी कुणीतरी सहमत आहे. >>>> मुकूंद, तुझा हा लेख वाचून मलाही अगदी अस्सेच वाटले.. !! आमचे दोघांचे मिळून ३२ डॉलर गेल्याचं दु:ख झालं अवतार पाहिल्यावर..
एकूणात ठिक ठिक आहे.. वापरलेल्या तंत्रज्ञानाबद्दल कोणी हात धरू शकणार नाही.. पण लोकं ज्या इतकं जास्त डोक्यावर का घेतायत ते मात्र कळलं नाही...
या ऑस्कर सोहळ्याच्या वेळी मला सारखी भिती वाटत होते की अवतारलाच सगळ्या ठिकाणी उचलून धरणार की काय, पण तसे झाले नाही. हुश्श्य. >>>> रूनी १०० मोदक.. ऑस्कर मधे अवतारला भारंभार बक्षिसे मिळाली नाहित ह्याचा मला फार फार आनंद झाला आणि ऑस्कर बद्दलचा आदर वाढला.. !!!
लॉस्ट सिंबॉल वाचल्यावर जसं "डॅन ब्राऊन ५ वर्ष हेच लिहित होता का???" असा प्रश्न पडला होता अगदी तसाच कॅमेरून मधली इतकी वर्ष मधे हेच करत होता का??? हा प्रश्न पडला..
निवांत पाटील | 19 December,
निवांत पाटील | 19 December, 2009 - 03:26
अवतार..... कस्ला अवतार काढलाय म्हनुन स्सांगु...... अs गा sss गा sss गा.... फक्त ३ D होता म्हणुन शेवटपर्यंत बसलो... पण मध्येच काही प्रॉब्लेम झाल्यामुळे पाऊस पत्र मिळाल. अजुन एक सिनेमा पहायचं. स्मित २D च बघणार असेल तर पैसे वाचवा... परत कधिच हिंदी पिक्चरला नावं ठेवणार नाही... अवतार शप्पथ.... इय्वा...
मलाही हा सिनेमा साधारणच वाटला
मलाही हा सिनेमा साधारणच वाटला होता. अगदी ते थ्री-डी इफेक्टस् वगैरे पण ग्रेट असे काही वाटले नाहीत. म्हणजे तंत्रज्ञान वगैरे भारी असेल पण लक्षात राहण्यासारखे काही वाटले नाही. याऊलट फॅन्टसी या सदरातील लॉर्ड ऑफ द रिंग्स वगैरेंसारखे सिनेमे जास्त आवडले.
पण खालील मुद्द्यांना आक्षेपः
हे न्हावी कसे दिसतात? तर ते पार्ट चित्ता- पार्ट मांजर.. पार्ट मानव..
>> अहो परग्रहावरील लोक दाखवायचे म्हणजे असंच होणार. उगीच सात पायांचे, टाळूवर डोळे असणारे वगैरे प्राणी दाखवले तर भयंकर बोर होईल (मलातरी)
दिवसभर या झाडांच्या फांद्यांवरुन वर खाली व इकडुन तिकडे उगाचच विहार करत राहायचे हा यांचा उद्योग!
>> ती अप्रगत जमात दाखवली आहे. खाणे पिणे आणि टाईमपास करणे ह्याशिवाय काय करणार ते?
<<शवपेटिका>>
त्या शवपेटिकेतून हा मानव त्या न्हावीवाल्या देहाला कंट्रोल करत असतो मनाने. हे दोन देह वेगळे आहेत. त्यामुळे न्हावीरूपी देहाला तसेही ऑक्सिजनची गरज नाहीये. तसेच बटनं उघडझाप केली की कनेक्शन तुटते. ही सगळी फॅन्टसी जरी असली तरी सुसंगत दाखवले आहे.
<<तिथे झाडे असून ऑक्सिजन कसा नाही>> <<गुरुत्वाकर्षण आहे आणि तरंगते पर्वत>>
अहो तिथली उत्क्रांती वेगळ्या पध्दतीने झाली असणार. हा मुद्दा नक्कीच दुर्लक्षित करण्याजोगा आहे.
ते गरूड, डायनॉसॉर विरूध्द बॉम्बर्स हे मात्र अचाट आणि अतर्क्य आहे.
मी अॅवटार पाहिलाच नाहीये आणि
मी अॅवटार पाहिलाच नाहीये आणि कथाही माहीत नव्हती पण वरचा लेख वाचून एक अत्यंत भाप्र. प्रत्येक न्हाव्याला एकेक घोडा आणि गरुड असाईन केलेला आहे ना ? मग बाहेरचा कुणी रुपांतरीत होऊन येतो तेव्हा त्याच्याबरोबर त्यांच्याशी गाठी बांधलेले घोडे आणि गरुड पण बनवून पाठवले का ? नाहीतर खजिना शोधायच्या आधी ते घोडे आणि गरुडच ओळखून काढतील ना परग्रहावरच्या दुष्ट पाहुण्यांना आणि त्यांचा परस्परच खातमा करुन टाकतील
मुकुंद, मानवी देहाचे नावीत
मुकुंद,
मानवी देहाचे नावीत रुपांतर होत नाही. हिरो जेव्हा लॅबमध्ये पहिल्यांदा जातो तेव्हा त्याला पेटीत बंद असलेला एक नावी दाखवतात आणि सांगतात की हाच तू आणि कोणीतरी म्हणतंसुद्धा की हा नावी तुझ्यासारखाच दिसतो (म्हणजे खरेतर हिरोच्या जुळ्या भावासारखा, कारण मूळ प्लॅननुसार जुळा भाऊ त्या मिशनवर जाणार असतो). लॅबमध्ये शास्त्रज्ञ मानवाचा persona त्या नाव्याच्या शरीरात transplant करतात. व्यक्तिमत्वाचे पूर्ण digitization करता येणे असे त्यामागचे assumption आहे, जे मुळीच बुद्धीभ्रंशाचे उदाहरण नाही. देह जर नाव्याचा असेल तर त्याला तिथे ऑक्सिजनची गरज का भासेल ?
पण हे transplantation पूर्ण होत नसते (तेवढे शास्त्रज्ञांना जमलेले नसते), त्यामुळे पेटीतल्या मानवाच्या देहाला काही केले तर नाव्यावर परिणाम होतो. आठवा - मॅट्रीक्स..... त्यातही हे मनाचे व देहाचे कनेक्शन तुटत नाही आणि मॅट्रीक्समध्ये माणसाला जर काही झाले तर नेब्युचॅडनेझरमध्ये देहावर परिणाम दिसून येतो आणि उलटसुद्धा. तसेच काहीसे. (फक्त मॅट्रीक्समध्ये physical connection असते, इथे नाही.) पण हे transplantation पूर्णत्वाला नेणे शक्य असते. त्यासाठी पॅन्डोरावरच्या त्या खास 'झाडा'खाली मोठा विधी करावा लागतो. तो विधी जर यशस्वी झाला तर मानवी देहाशी असलेला संबंध पूर्णपणे तुटतो (complete data transfer and disconnection of link) आणि मानवी देहाला काही केले तरी नाव्यावर काही फरक प्डतत नाही. म्हणून सिगर्नीचा मानवी देह जखमी झाल्यावर तिला पूर्ण नावी करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून ती जगेल. तसेच शेवटी हिरोला पूर्ण नावी करतात.
कॅमेरोनने वापरलेल्या संकल्पना पूर्ण वाइल्ड इमॅजिनेशन नाहीतच. त्या सगळ्यांना आपल्या प्रगतीचा बेस आहेच. उदा -
१) गाइया (Gaia) ही संकल्पना.
२) एका कम्प्युटरमधून दुसर्या कम्पुटरमध्ये डाटा टाकताना युएसबी पोर्ट वापरतात. हेच ऑर्गॅनिक पातळीला होणे अशक्य आहे का? शेवटी ती data-transferच आहे ना. मग आख्खे व्यक्तिमत्व ट्रान्स्फर करता येईल.
३) ऑरकूट, फेसबुक वगैरे सोशल नेटवर्किंग साइट्स आहेत. हेच पुढे नेऊन एक ऑर्गॅनिक नेटवर्किंग असू शकते. तसंही लोक ऑर्गॅनिक कम्प्युटरवर विचार करत आहेतच. एखादे कॉम्प्लेक्स नेटवर्क किती कॉम्प्लेक्सिटीला 'कॉन्शस' होते हे आपल्याला माहिती नाही.
४) खुद्द पृथ्वीवर methane-breathing microbes आहेत. मग पृथ्वीबाहेरच्या झाडांनी ऑक्सिजन निर्माण करावाच असा आग्रह का बुवा ? दुसर्या ग्रहावरचे जीव कार्बन-बेस्ड असतीलच असे कशावरून ? फचिनला अनुमोदन.
५) शेपटीचा उपयोग पाहिल्याक्षणी मला तरी फॅक्स पाठवण्याच्या आधी मशीन्स 'हॅन्डशेक' करतात त्याचीच आठवण झाली. हॅन्डशेक नीट झाला नाही तर नो फॅक्स, नो कम्युनिकेशन शिवाय तिथे एक मशीन sender असते आणि एक receiver. इथेही data flow एकाच दिशेने आहे (एक आज्ञा देतो, दुसरा ती ऐकतो).
६) गुरुत्वाकर्षणाचा मुद्दा मलासुद्धा महत्त्वाचा वाटला नाही, पण त्यावर अडूनच बसायचे असेल तर - सुपरकंडक्टिव्हिटी वापरून gravity defy करता येते. आपण आताच हाय्-टेम्परेचर सुपरकंडक्टिव्हिटीवर खूप काम करत आहोत. पॅन्डोरावरच्या तरंगणार्या पर्वतांमध्ये रूम-टेम्परेचर सुपरकंडक्टिविटी आढळते असे समजा
यात चुका आहेत, पण अगदीच तर्कशून्य, वाइल्ड इमॅजिनेशन, बुद्धीभ्रंश वगैरे नाही. इमॅजिनेशनला व्यवस्थित बेस आहे हो. आपल्या इथल्या निसर्गाचे, तांत्रिक, शास्त्रीय प्रगतीचे त्याने extrapolation केले आहे, खास करून organic level वर त्याने बरेच extension केले आहे. असे अनेक पातळ्यांवर extension करणे ही एक गोष्ट आणि ते खूप परिणामकारकरित्या व ताकदीने दाखवणे ही दुसरी गोष्ट. पटकथा अगदीच predictable आहे हे मान्यच आहे. पण त्यातल्या निसर्गाशी आणि detailingशी रिलेट करता आले. लॉर्ड ऑफ द रिंग्जमध्ये व्यक्तिरेखांशी रिलेट करता आले (कारण त्या मानवी होत्या), तसे इथे निसर्गाशी करता आले. वरवर पाहता निसर्ग खूपच वेगळा वाटतो, पण थोडे निरखून बघितले तर नक्की कशाचे एक्स्टेन्शन आहे त्याचा अंदाज येतो. मग "आयला, हे असल्याच प्रकारचे आहे पण वाटतंय कसलं वेगळं" असे वाटते प्रत्यक्ष ज्याने खरेच निसर्ग बघितला आहे त्याला याचे कौतुक नक्कीच वाटते.
सगळ्यांनाच हा चित्रपट महान वाटावा असा आग्रह मुळीच नाही. पण वरील लेख वाचून (तर्कशून्य, बुद्धीभ्रंश, स्मोक करून लिहिणे इ. इ.) चित्रपट समजण्यात काहीतरी गफलत झाली असावी असा संशय आला. म्हणून हे लिहिले. चु.भू.द्या.घ्या.
क्या बात है अरभाट; मान गये
क्या बात है अरभाट; मान गये उस्ताद!
मी यावर दुपारी लिहिणारच होतो, पण त्याची आता आवश्यकता नाही असं वाटतंय. अन्लेस अजुन कोणाला हा सिनेमा समजला/उमजला नसेल तर...
खर तर ते शेपूट प्लग इन ची
खर तर ते शेपूट प्लग इन ची आयडिया आणि एकूणच निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याची कन्सेप्ट मला खूप आवडली उलट
>> अगदी अगदी मैत्रेयी!
(प्रयोग, तुलाही अनुमोदन!)
मला परग्रहावरचे प्राणी, मशिन्स असले टिपिकल हॉलिवूड पट अजिबात आवडत नाहीत. अवतारही त्यातलाच एक असं समजून मी गेलेले (कंपनीकडून फुकट तिकिट मिळाली म्हणून!)
पण मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला! माझ्या मते तो फक्त ३डी फॅन्टसीपट नव्हताच.. मला तरी तो महाकाव्यासारखा वाटला! हा परग्रहावरच्या विचित्र प्राण्यांबद्दलचा चित्रपट वाटला असेल कुणाला तर त्यांना पिक्चर कळलाच नाही असं मला वाटतं. हा त्या तसल्या प्राण्यांबद्दलचा पिक्चर नव्हता.. हा माणूसकी बद्दलचा पिक्चर होता - माणूसकी जी त्या पेंडोरावरच्या माणसांच्यात दिसते!
आज आपण सगळेच पृथ्वीला ओरबाडतोय.. डाऊन द लाईन काही वर्षानं नैसर्गिक साधनं संपली की त्यातला हिरो म्हणतो तशीच अवस्था होईल (They killed their mother, now they are here to kill you... there is no green on their planet वगैरे)...
आणि on the other hand, तिथल्या माणसांचं दिसणं आपल्या पेक्षा वेगळं असलं तरी - चित्रपटात दाखवलय ते आपल्याच इतिहासात डोकावणारं आहे (उदा. अमेरिकन इन्डियन्स.. त्यांच्याही प्रांतात युरोपियन्स असेच घुसले.. असच त्यांना मारून सगळं बळकावलं हे उदाहरण घ्या ... इन फॅक्ट हे सगळ्याच जगात सगळीकडे दिसतं.. आजही जगभर 'थर्ड वर्ल्ड कंट्रिज' कडे जी नैसर्गिक साधन सामुग्री आहे, जीचा विकसित देशांकरता प्रचंड मोठ्या प्रमाणात ह्रास/गैरवापर होतोय.. अमॅझॉनच रेन फॉरेस्ट, मादागास्करच्या फॉरेस्ट मधल्या आपल्याला माहितही नसलेल्या असंख्य प्रजातींचं माणसाच्या हव्यासामुळे मृत्यूमुखी पडणं.. अशी हजारो उदाहरण देता येतील!)
आणि येवढ्या भव्य दिव्य गोष्टी उभारण्याचा विचार करणं ह्यासाठीही केवढी प्रचंड ताकद पाहिजे बुद्धीची!
रात्रिच्या वेळी जेव्हा सगळी झाडं स्वयंप्रकाशित होतात, किती छान दिसतो तेव्हा पेंडोरा!
त्यातलं वेणी/शेपूट एकमेकांना जोडणं, न्युरोन्सचं नेटवर्क म्हणजे एक सुंदर उदाहरण आहे सहजीवनाचं..
जेव्हा तुम्ही दुसर्या जीवाला पोटाकरता म्हणून मारता, त्यातली अपरिहार्यता स्विकारूनही त्या जीवाची किंमत कळण महत्त्वाचं (म्हणूनच नेतिरी मारलेल्या जीवांशीही संवाद साधते).. हे माणसाला कळत नाही म्हणून आपल्या आनंदाकरता शिकार करणं, लेदरच्या गोष्टी वापरणं हे घडतं माणसाकडून... त्या अर्थानं आपण सहजीवी नसून परजीवी आहोत (परजीवी: ज्यावर वाढतो, त्याला मारून जगणारे).
आपण पोटासाठी दुसर्यांना खाणं ही प्रकृती, पण गरज नसतानाही हव्यासापोटी जीव घेणं, साधनांचा दुरुपयोग करणं, ही विकृती! हीच गोष्ट दाखवली आहे चित्रपटात पेंडोरावासीयांच्या आणि पृथ्वीवासियांच्या स्वभावाच्या फरकातून!
माणसासारखा बुद्धिमान प्राणी जन्माला येतो तेव्हा आपल्या आजुबाजुचा सगळा परिसर तो त्याला हवा तसा वळवणार हे स्वाभाविकच आहे. पण ह्या प्रिव्हिलेज बरोबरच एक मोठी जवाबदारीही येते. फक्त 'उपभोगण्याच्या' पुढची जबाबदारी! ह्या चित्रपटातून मला ही जाणीव झाली!
I just loved this movie! It was not a movie, it was a great saga regarding humanity!
I would love to have pendora as future of our mother earth!
अरभाट तुझी पोस्ट उशिरा वाचली!
अरभाट तुझी पोस्ट उशिरा वाचली! फार सुंदर पोस्ट!
अगदी अगदी छान सांगितलयस! माबोच्या भाषेत तुला १००० नाही लक्ष, कोटी मोदक!!
नानबा आणि अरभाट माझे पण मोदक.
नानबा आणि अरभाट माझे पण मोदक. मला सुध्दा आवडला बाबा.
>.येवढ्या भव्य दिव्य गोष्टी उभारण्याचा विचार करणं ह्यासाठीही केवढी प्रचंड ताकद पाहिजे बुद्धीची!>> हे अगदी खरय. पण कथा आणि ईतर गोष्टींपेक्षाही त्याचे ३D सेट मला प्रचंड आवडले. पॅडोरा ग्रहाचे एकेक डिटेलिंग अफाट आहे. अर्थात तिथे अॅनिमेशन कौशल्याचा किती कस लागलाय ते जाणत्याला कळतच.
मला एकदा पहाण्यापुरताच वाटला.
मला एकदा पहाण्यापुरताच वाटला. 'आवडला' कॅटेगरी अजिबातच नाही. पुन्हा बघायला जाईन असं वाटत नाही.ट्ञ्।़ङ़।
अरभाट अन नानबा , एकदम सहमत!
अरभाट अन नानबा , एकदम सहमत! मला तर या प्रचंड कल्पनाशक्तीचे फार कौतुक वाटले! ते नेट्वर्किंग, प्लग इन वगैरे कल्पना, ते एकूण जग, सगळं मला खूप सही, अद्भुत वाटलं !! कसलं 'बिलिव्हेबल' वाटतं ते सगळं! आणि शेवटची लढाई अ.अ असली तरी इतक्या समरसून सिनेमा पाहिल्यावर शेवट असाच असायला हवा अशीच मनोमन इच्छा करेल ना कोणीही फॅन
(No subject)
मुकुंद बराच हैराण झालेला
मुकुंद बराच हैराण झालेला दिसतोयस चित्रपट पाहून. मी पाहिला नाही अजून. पाहून मग मत लिहीतो.
अॅवटार विषयीची अजुन एक गोष्ट
अॅवटार विषयीची अजुन एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते...
अर्ध्यापेक्षा जास्त चित्रण अॅनिमेटेड (डिजिटायज्ड) असल्यामुळे यातील कलाकारांना त्यांच्या कामाचं योग्यते श्रेय देण्यात आलं नाही. वास्तवात नावींच्या रुपातील पात्रांचे हावभाव, अगदी चेहेर्याच्या हालचाली सकट या कलाकारांनी त्याच्या अभिनयाद्वारे साकारल्या आहेत. हिच बाब जेम्स कॅमरुनने सगळ्या फ्रॅटर्नीटीला समजावुन सांगायचा प्रयत्न केला; पण त्यांना हे काही झेपलं नाही.
कदाचीत अॅवटार १० वर्षांनंतर रीलीज झाला असता तर हा वादच उद्भवला नसता...
(चित्रपट न आवडलेल्यांसाठी एक अनाहुत सल्ला. अॅवटारची डीव्हीडी/ब्लु रे जेंव्हा बाजारात येइल तेंव्हा जरुर विकत घ्या, किंवा रेंट करा. तुमच्या शंकाकुशंकाचं निरसन "मेकिंग ऑफ अॅवटार", "डायरेक्टर्स कमेंटरी" या स्पेशल फिचर्समध्ये जरुर असेल... )
"काय एव्हढे मोठे तीर मारले
"काय एव्हढे मोठे तीर मारले आहे ते बघतोच" अशा भूमिकेतून बघून हे लिहिल्यासारखे वाटले. मुकुंद तुम्ही लिहिले आहे म्हणून अधिक आश्चर्य.
खर तर प्रचंड symbolism असलेला movies आहे त्यामूळे तुमचे perceptions कसे आहे त्यावर बरेच अवलंबून आहे.
एकूणात ठिक ठिक आहे.. वापरलेल्या तंत्रज्ञानाबद्दल कोणी हात धरू शकणार नाही.. पण लोकं ज्या इतकं जास्त डोक्यावर का घेतायत ते मात्र कळलं नाही...>>हे कळते तर हा BB नसता
मुकुन्दने आपले "व्यक्तिकरण
मुकुन्दने आपले "व्यक्तिकरण स्वातंत्र्य " वापरले आहे.
त्यावर आक्षेप का?
सही पोस्ट अरभाट !
सही पोस्ट अरभाट !
नाहीच कळला मला अवतार. आमची
नाहीच कळला मला अवतार. आमची बुद्धी असेल बुवा छोटी, कोती. आम्ही असू गावंढळ अडाणी. आहोतच बहुधा. कारण वरच्या पोस्ट्स पाहून आम्हाला आमच्या बुद्धीबद्दल कॉम्प्लेक्स यायला लागलाय . तिच्या नसलेल्या आस्तित्वाबद्दल आम्हाला कधीच शंका नव्हती. मात्र ती नसताना ती आहे हे भासवायची आयडिया नव्हती. ती आता मिळाली. आता एक डु आय डी घेऊन अवतारची स्तुती करणारे पोस्ट टाकतो.
रच्याकने, प्यान्डोरा वरचे लोक अॅनिमेटेड आहेत असे म्हटल्याबरोबर आमचे युवराज अंगावर धावून आले आणि इथे माझयाशी बोल्लात ते ठीक बाहेर बोलू नका(विशेषतः माबो वर). लाज आणाल. अहो, (असे युवराज म्हणाले ते उघड उघड आदरार्थी बोलतात अजून) गेली ७५ वर्षे अवतारची टीम या अभिनयाचा सराव करते आहे ते उगाच काय? तुमचा (म्हणजे माझा हो) जन्म तरी झाला होता काय. तेव्हापासून त्याची तयारी चालू आहे.
आता या युवराजाच्या ४ आठवडे आधी मी चांगली २५० ची तिकीटे काढून अवतार पाहिला. मला पिक्चर कलला नाही हे पाहून तो कुत्सितपणे म्हणाला 'ह्या: तुम्ही अम्रेरिकेत जन्मायला किमान सेटल व्ह्यायला पाहिजे होते. किमान तिकडे जन्मलो नाही याबद्दल खंत तरी बाळगायला पाहिजे होती'
मग मीही नाद सोडला. म्हटलं पिक्चर कळायला पिक्चर पाहणं सोडून आणखी बर्याच गोष्टी लागतात वाटतं. मला तर शंका यायला लागलीय युवराज डु आय डी घेऊन इथं व्हायरस सारखे शिरून अवतारच्या बाजूने पोस्टी तर टाकीत नाहीत ? पोरांचे काही सांगता येत नाही.... हरी हरी !!
(No subject)
Pages