पुस्तक परिचयः आपले मराठी अलंकार..

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

'भारद्वाज प्रकाशन' माझ्या वडिलांचं असूनही आणि पुस्तकांबद्दल प्रचंड ओढ असूनही - प्रत्यक्ष 'प्रकाशनाच्या' कामात माझा आजवर फारसा हातभार नव्हता. पण 'काहीतरी वेगळं करावसं वाटतंय' ह्या विचारानी जेव्हा मी अस्वस्थ व्हायला लागले, तेव्हा 'आता प्रकाशनाच्या कामाची जबाबदारी आपण स्वीकारायची' असं ठरवलं.
हे क्षेत्र माझ्यासाठी खूपच नवीन आहे...पण लहानपणापासून परीक्षेला, कोणत्या स्पर्धेला जायला निघालं की बाबा सांगायचे "लढ बाप्पू...जा आणि बिनधास्त batting करून ये...आगे जो होगा देखा जायेगा".
हे प्रकाशनाचं काम हातात घेतलंय ते ही 'लढ बाप्पू..." या शब्दांच्या आधारावरच Happy

Alankar_ad_3.jpg

For larger image please click http://farm3.static.flickr.com/2772/4425479388_9b5f0d6d77_o.jpg

हे पुस्तक खरेदी करायचे असल्यास कृपया aarati@bharadwaj-prakashan.com येथे मेल पाठवा.

प्रकार: 

आरती नमस्कार, पुस्तक पण हवे आहे व अलंकार ही. वामन हरी पेठ्यांकडे लै मस्त नथी अन हार तोडे चेना हैती.
ते पण म्हणत होते आपले अलंकार बनविणारे कारागीर आता मिळत नाहीत. तुला शुभेच्छा. पुस्तक घेण्यासाठी मेल करते.

तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनाबद्दल मनापासून धन्यवाद.
पुस्तकांशी प्रचंड जवळीक असली तर आजपर्यंत मी देखिल तुमच्यासारखीच केवळ एक वाचक होते. प्रकाशन हा माझ्या वडिलांचा देखील 'प्रथम व्यवसाय' नाहीच.
माझ्या आजोबांचं सांगलीला 'भारद्वाज प्रकाशन' होतं म्हणे. वि. स. खांडेकर, राम गणेश गडकरी ही त्यांची खास दोस्त मंडळी. त्याकाळची सांपत्तिक स्थिती फारशी चांगली नसल्याने, एक दिवस ते प्रकाशन बंद झालं असावं.
कुठेतरी माझ्या वडिलांच्या मनात ही खंत असावी... त्यामुळे 'काहीतरी वेगळं करायचंय' असं जेव्हा त्यांना वाटायला लागलं, त्यांनी प्रकाशन क्षेत्रात पाऊल ठेवलं...त्यांच्यासाठी हा व्यवसाय नाहीच, हौसच जास्त Happy
आता त्याच वाटेवरून मी जातीये.. माझ्यासाठी हे सगळंच नवीन आहे. त्यामुळे तुमचं हे प्रोत्साहन माझ्यासाठी अमूल्य आहे खरोखरच ! खूप धन्यवाद !

आता थोडं पुस्तकाविषयी... पुस्तकाचे लेखक म.वि.सोवनी सर यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी गावोगावी फिरून गोळा केलेली ही अलंकारांविषयी माहिती आहे. त्यांना हा उद्योग (त्यांच वय पाहता उपद्व्यापच!) का करावासा वाटला असेल? ह्याच उत्तर त्यांच्याच शब्दात सांगायचं तर -

"१९६२ साली भारतभर 'सुवर्ण नियंत्रण कायदयाचा' अंमल चालू झाला. सोने या धातूच्या व्यवहारावर कडक निर्बंध बसले. परिणामी महाराष्ट्रातील गावोगावच्या सराफ-सोनार मंडळींनी निर्बंधाचा भयापोटी आपल्याजवळच्या दागिन्यांचे मोडून-वितळवून सोन्याच्या लगडीत रूपांतर केले. त्यामुळे प्राचीन काळापासून जे पारंपारिक दागिने महाराष्ट्रात माहीत होते ते 'अबोध' होऊन गेले.
हे जुने दागिने होते तरी कसे? त्यांचे रुपाकार, त्यांची नावे, याबद्दल काहीही कळणार नाहीच का? अशी खेदपूर्ण जिज्ञासा माझ्या मनात जागृत झाली आणि ती दिवसेंदिवस वाढतच राहिली. 'कोणीतरी या दागिने परंपरेचा शोध घेतलाच पाहिजे' असे वाटत राहिले आणि कोणीतरी हे काम केले पाहिजे असे असेल तर 'आपणच ते काम का करू नये?' हा विचार अखेर ठामपणे मनात रूजला. १९८० मध्ये मी वयोमर्यादेमुळे नोकरीतून निवृत्त झालो आणि मग या दिशेकडे माझी पावले वळली.
तथापि मला पहिल्या पावलापासूनच असे अनुभव येऊ लागले की, दागिने ही मूल्यवान वस्तू माझ्यासारख्या ति-हाईत व्यक्तीला कोणीही सहजतेने दाखवण्यास तयार नसते. पर्यायी ही वाट अधिकच बिकट वाटू लागली.
पहिली २ वर्षे पुण्यातील विविध संस्थांमधून अभ्यासाने दागिनेविषयक वाड.मयीन संदर्भ व तपशील नोंदवले आणि पुढची ३ वर्ष सतत महाराष्ट्राच्या संपूर्ण मुलखात भ्रमंती करून नोंदलेल्या प्रत्येक दागिन्याचा शोध घेण्याचा उद्योग केला. प्रत्येक दागिना प्रत्यक्ष पाहावयाचा, हाताळावयाचा आणि लगेच त्याचे रेखाचित्र काढावयाचे असा हा उद्योग होता... "
-------------
मी जेव्हा हे पुस्तक हातात घेतलं, ते एक वाचक म्हणून. या पुस्तकाचं सगळं 'बाळंतपण' माझ्या आई-वडिलांनी केलं . पण जेव्हा वाचलं पुस्तक तेव्हा मला सोवनीसरांचं प्रचंड कौतुक वाटलं आणि अभिमानही.
अनेक दागिने, त्यांचे उगम मला स्वतःलाही माहित नव्हते त्याची माहिती मिळाली.
ग्रेसच्या लिखाणात अनेकदा उल्लेख झालेली 'बेसरबिंदी', चिं.त्र्यं किंवा श्री.ना. पेडसेंच्या कादंबरीत वाचलेली 'नागताळी' किंवा ऐतिहासिक कादंबरीतले 'गाठा' 'पोवची' हे आजवर अर्थ न कळल्याने दुर्लक्षित केलेले किंवा क्वचित 'imagine' केलेले शब्द ह्या अलंकारांच्या रूपात, रेखाचित्रांच्या रूपात जेव्हा डोळ्यासमोर आले, तेव्हा मला जो काही आनंद झाला ना, मला नाही शब्दात मांडता येणार.
आता आपोआपच सिनेमात म्हणा, वाचताना म्हणा कोणता वेगळा दागिन्याचा उल्लेख दिसला, त्याकडे डोळसपणे पाहिलं जातं.
ही माहिती जास्त लोकांपर्यंत पोचवली पाहिजे असं मनापासून वाटायला लागलं.

केवळ दागिनेच नाही, तर आपल्या मातीत अश्या अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण कौतुकानं, अभिमानानं जपून ठेवल्या पाहिजेत. त्याची माहिती लिखित स्वरूपात जतन करून ठेवली पाहिजे. Documentation केलं गेलं पाहिजे. नाहीतर एक दिवस बाहेरचे संशोधक येणार, अभ्यासू वृत्तीनी आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचं निरिक्षण करणार आणि त्यावर research paper, किंवा पुस्तक लिहिणार.. आणि 'हे तर माझी आजी मला नेहेमी सांगायची... ही इतकी मूल्यवान माहिती आहे, ह्यावर शोधनिबंध लिहिला जाईल असं वाटलंच नव्हतं' असं हळहळत आपण त्या शोधाचं श्रेय त्या बाहेरच्या देशातल्या संशोधकाला देणार.

Las Vegas किंवा Santa Fe, New Mexico परिसरातल्या 'आर्ट galleries ' किंवा 'Antique shops' कधी पाहिलीत तर जाणवेल की जुन्या वाड्यांचे दरवाजे, तुळया, बंब, जुन्या गंज चढलेल्या ट्रंका, हंडे ह्या आपण 'भंगारात' काढलेल्या गोष्टी 'कल्पनाही करता येणार नाही' इतक्या किमतीला विकले जातात...थोडक्यात आपलं भारतातलं पूर्वापार चालत आलेलं घरं 'भंगारात' काढून आपण इथली आपली आणि अमेरिकतल्या अनेकांची घर 'शोभिवंत' करत असतो !
(मी अमेरिकेत हे पाहिलंय.. तुम्हालाही कदाचित अनेक ठिकाणी थोड्याफार प्रमाणात हेच दृष्य दिसत असणार)
हे एक लहानसं उदाहरण झालं.. अश्या वरवर लहानसहान वाटणा-या गोष्टींविषयी थोडा विचार करायला लागल्यावर जाणवलं की आपण आपल्या परिनं 'आपला भूतकाळ, आपल्या देशाचा इतिहास' सांभाळायला आणि पुढच्या पीढीपर्यंत पोचवायला मदत केली पाहिजे. मग ही मदत छोट्या प्रमाणात असली तरीही...

'Stem cell' काय किंवा Cancer वर मी लिहिलेला पेपर, किंवा book chapter publish झाला, मला कोण आनंद झाला.. की मी जिवंत असले, नसले तरी कधीतरी कोणीतरी कदाचित एक 'संदर्भ' म्हणून माझं हे काम, हा पेपर त्यांच्या कामासाठी वापरेल. Documentation झाल्यामूळे आता ते कायमस्वरूपी झालं...
म.वि.सोवनी सरांचं क्षेत्र वेगळं.. पण त्यांचं कामही खूप मोलाचं आहे, त्या कामाला लोकांपर्यंत पोचवून एका संशोधकाबद्दलचा माझा आदर व्यक्त करण्याची संधी मला मिळावी म्हणून 'आपले मराठी अलंकार' हे पुस्तक मी तुम्हा वाचकांपर्यंत पोचवायचं ठरवलं.

हे पुस्तक वाचल्यापासून मनात अनेक विचार चालू झाले.
आपल्या आरत्यांमधे, धार्मिक ग्रथांमधे, गाथा, ज्ञानेश्वरी. भागवत अशी कुठे दागिन्यांबद्दल उल्ले़ख असेल तर अशी माहिती जमवून, त्याच्याबरोबर त्या दागिन्याचं चित्र, माहिती हा लेखाचा नव्हे एका पुस्तकाचा विषय होऊ शकतो.
शिवाय या पुस्तकात सोवनी सरांनी स्वत: हाताने काढलेली दागिन्यांची 'रेखाचित्र' आहेत. आजच्या काळात photography मुळे या दागिन्यांचे फोटो संग्रहीत करणे सहज शक्य आहे.
तुमच्यापैकी कोणालाही वर लिहिलेल्या कोणत्याही Project मधे interest असेल, त्यासंदर्भात कोणती माहिती मिळाली, तुमच्या ओळखीत कोणी या दागिन्यांच्या व्यवसायात असेल तर त्यांच्याकडे किंवा इतर कुठे हे दुर्मिळ दागिने पाहायला मिळाले आणि त्याचे फोटो काढणं शक्य असेल, तर कृपया मला संपर्क साधा...
थोडक्यात, हे पुस्तक प्रकाशित होणं हा कामाचा शेवट नाही, ती सुरुवात आहे...:)

मला कल्पना आहे की माझ्या लिखाणाचे फारसे वाचक नाहीत, त्यामुळे ही कळकळ कदाचित तुमच्यासारख्या काही लोकांपुरतीच मर्यादित राहिल. पण तुमचं लिखाण जर वाचलं जात असेल तर तुम्ही यासारख्या विषयांवर लेखन करून, ही माहिती अजून जास्त लोकांपर्यंत पोचवली तर मला 'माझं हे निवेदन योग्य वाचकांपर्यंत पोचलं' याचं समाधान नक्की मिळेल. Happy

सुंदर! सोवनीसरांचे कष्ट आणि कळकळ दोन्ही ग्रेट आहेत. रार तुझेही अभिनंदन इतक्या छान पद्धतीने ते आमच्यापर्यंत पोचवलेस म्हणून. तुझ्या उपक्रमासाठी शुभेच्छा! पुस्तक संग्रही ठेवावे असेच आहे.

सही, वेगळ्या क्षेत्रात पाउल ठेवल्या बद्दल अभिनन्दन आरती !
नीरजा कडून म. वि सोहनींच्या या विषया बद्दल ऐकलं होतं, वाचायला नक्की आवडेल, तुला मेल केलीये.
मुखपृष्ठावर मृणाल देव पण एकदम फिट्ट आहे या पुस्तकाच्या, पारम्पारीक मराठी दागिने आणि गेट अप च् पेटंट तिच्याकडेच आहे !!( गाडगीळांच्या कृपेने) :).

अरे हे मी वाचलंच नव्हतं. पुस्तक व्हायच्या आधी त्यांचा जो थिसीस होतात त्याच्या कॉप्या आहेत माझ्याकडे एका प्रोजेक्टच्या निमित्ताने केलेल्या. जपून ठेवलंय.

रार, आताच्या भारतभेटीत नक्कीच हे पुस्त्क घेणार.
आशा भोसलेनी गायलेली एक जूनी लावणी आहे. त्यात प्रत्येक ओळीत एका दागिन्याचे वर्णन आहे.
दावी धमक === पाहुनी मति खुटली, असे शब्द आहेत. चित्रपटातीलच असेल. आणि कदाचित त्या चित्रपटात हे दागिने, दाखवले असतीलही.

हे मी ही पाहिलच नव्हत. मस्त लिहिलयस रार. हे पुस्तक नक्की संग्रही ठेवायला हव. पुढच्या महिन्यात भारतात जात्ये त्या लिस्ट मधे टाकतेच. Happy (शिवाय आमचा फॉन्ट वापरलेला दिसतोय त्यामुळे अजुनच जास्त इंटरेस्ट. :))

प्रकाशनाच्या कामासाठी शुभेच्छा!

कदाचित त्या चित्रपटात हे दागिने, दाखवले असतीलही.<<
शक्य नाही.
प्रत्येक ठिकाणचे एवढे अलंकार दिलेले आहेत पुस्तकात ते सगळे सिनेमात दाखवायचे तर किमान ५ तासाची डॉक्यु होईल.