मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने

Submitted by Admin-team on 11 March, 2010 - 00:27

काही आठवड्यांपूर्वी मायबोलीवर मराठी दिन साजरा करावा असा बूट निघाला. काहीतरी करायचं आणि मुलांसाठी करायचं इतकंच मनात होतं. पण नेमकं काय, कुठे हे काही ठरलं नव्हतं. वेळ कमी होता त्यामुळे शक्य असेल तर आधीच संघटीत असलेल्या ग्रूपला विचारलं तर वेळ वाचणार होता. मुलांशी संबंध होता त्यामुळे या उपक्रमावर काम करणार्‍या व्यक्तींची खात्री असण्याची आवश्यकता होती. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका शब्दात मिळण्याची शक्यता दिसली, "संयुक्ता" !

आम्ही संयुक्ता प्रशासनाला विचारल्यावर त्यांनी ग्रूपमधे साधकबाधक चर्चा करून या साठी मदत करायचा निर्णय घेतला.

आम्ही सुचवलेली मूळ कल्पना फक्त ०.२५% इतकीच होती. उरलेलं ९९.७५% काम हे संयोजक (अमृता, बस्के, चिन्नु, रैना, सायलीमी, सायो, सिंडरेला, सीमा) , परीक्षक (स्वाती_आंबोळे) आणि संयुक्ता प्रशासन यांनी केलं. इतकंच नाही संयुक्ता प्रशासनातल्या मंडळीनी स्पर्धेच्या पारितोषिकांसाठी प्रायोजक मिळवून दिले आणि फक्त विजेत्यांसाठी नाही तर सगळ्याच स्पर्धकांचे कौतूक व्हावे म्हणून पैसेही उभे केले. मायबोली या सगळ्यांची ऋणी आहे.

मायबोलीचे उपक्रम कसे सुरु होतात, कुणाला नेतृत्वाची संधी मिळते, हे निर्णय कसे घेतले जातात या बद्दल नेहमीच प्रश्न विचारले जातात. या निमित्ताने थोडं त्याबद्दल लिहतो.

कल्पना निघते तेंव्हा सगळंच हवेत असतं. ती कल्पना यशस्वी होईल याची खात्री नसते. अमुक अमुक रंगाचा ढग इतपत माहीती असते म्हणा. या वेळेला हो मी हे काम अंगावर घेतो/घेते म्हणणारं (आणि तसं प्रत्यक्षात आणून दाखवणारं) कुणीतरी लागतं. कधी कधी अशा एकापेक्षा जास्त व्यक्ती असून शकतात. आणि मग सर्वसाधारणपणे त्या व्यक्तींकडे/ग्रूपकडे नेतृत्व जातं. यशाची कुठलीही खात्री नसताना स्वतःचं नाव त्या उपक्रमाशी निगडीत होण्याचा धोका ते पत्करतात. (काही वर्षांपूर्वी "संयुक्ता" ग्रूप अशीच एक हवेतली कल्पना होती हे काही मायबोलीकरांना माहिती आहे)

पुढचा टप्पा म्हणजे उपक्रमासाठी संयोजक मंडळ तयार होण्याचा. यात हौसे, गवसे, नवसे सगळ्या प्रकारचे लोक काम करण्यासाठी उत्सुक असतात. कधी कधी हे मंडळ आपोआप (किंवा ज्याना भाग घ्यायचा त्यांना घेऊन) तयार होतं. तर कधी ग्रूपचे नेतृत्व करणार्‍या व्यक्ती त्यांना योग्य वाटेल किंवा विश्वासू वाटेल अशा व्यक्तीना घेऊन संयोजक मंडळ स्थापन करतात. इथे टीमवर्क सगळ्यात महत्वाचे असते. प्रत्येक कामासाठी सगळ्यात योग्य (तांत्रिक दृष्ट्या) व्यक्ती घेतल्या तरी ते सगळे एकत्र काम करतील याची खात्री नसते. All star players don't make a good team. त्यामुळे ज्यांनी कामाची जबाबदारी घेतली आहे, त्याला/तीला योग्य वाटेल अशा व्यक्ती निवडणेच योग्य ठरते. या निवडीत फक्त ओळखीच्या लोकांना घेतलं जातं असं बर्‍याचदा म्हटलं जातं. आणि ते खरं आणि योग्य आहे. यात नेतृत्व करणार्‍या व्यक्तीचा दोष नसून ही मुद्दाम जाणीवपूर्वक योजलेली प्रक्रीया आहे.

संयोजक मंडळ ठरलं की कामाची यादी, मिळालेल्या साधनांमधून योग्य त्या गोष्टी पार पाडणं सुरु होतं. मुळातली कल्पना, आणि त्यामागचं Planning कितीही उच्च असलं तरी अंमलबजावणी अवघड असते. संयोजक काही पूर्णवेळ यासाठी व्यस्त नसतात. घरातली, नोकरी व्यवसायातली कामं, मुलंबाळं, आजारपण सगळं संभाळून उपक्रम कसा पुढे जाईल ते पहावं लागतं. कुणीतरी घड्याळाकडे (किंवा कॅलेंडरकडे) लक्ष ठेवणारं लागतं. एखादे जुने मायबोलीकर (ज्यांनी कधी उपक्रमात भाग घेतला आहे) मधून मधून सल्ले देत असतात. काही सल्ले घ्यायचे असतात. म्हणजे पूर्वी केलेल्या चुका परत होत नाहीत. तर काही सोडून द्यायचे असतात. नाहीतर नवीन कल्पना पूर्वी जमल्या नाहीत या कारणास्तव कधीच परत प्रयत्नात आणल्या जाणार नाहीत.

काही उपक्रम असे असतात की जे संपल्यावर काही कामं राहिली असतात. ती सगळ्यांचा उत्साह टिकवून पार पाडावी लागतात. उदा. या उपक्रमात सगळ्या प्रायोजकांना संपर्क करून, त्यांच्या कडून पैसे उभे करून मुलांपर्यंत बक्षीस पोहचवण्याचं काम तातडीने करण्यात आलं. कधी कधी पुढच्या वर्षीच्या उपक्रमाला मदत म्हणून नोंदी करून ठेवायच्या असतात.

ज्याना कधी व्यवस्थापन या क्षेत्रात काम करायचे आहे किंवा नेतृत्वाची आवड आहे त्यांनी कुठल्याही अशा मायबोली किंवा मायबोलीबाहेरच्या स्वयंसेवकांवर आधारित उपक्रमावर जरूर काम करून पहावं. त्यातून जे शिकायला मिळतं ते तुम्हाला कधीच Paid Job मधून किंवा शाळेत जाऊन शिकता येणार नाही. (स्वानुभवाने सांगतोय). Paid job मधे पगार हवा असेल तर काम कर असे म्हणून काम करून घेणे नेहमीच सोपे असते. पण स्वयंसेवकांबरोबर ते त्यांचा वेळ/कष्ट देत असताना, प्रत्येकाच्या दहा वेगवेगळ्या कल्पना , तर्‍हा, Timezones, रुसवे फुगवे संभाळून सगळ्यांनी मिळून उपक्रम यशस्वी करणे म्हणजे काय, हे त्यातून गेल्याशिवाय समजणार नाही.

या लष्कराच्या भाकर्‍या भाजूनही का आनंद मिळतो , हे एकदा करून पहा म्हणजे समजेल Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅडमिन, थोडक्या शब्दांत खूप छान कल्पना दिलीत नवीन उपक्रमांची. मला यातील खरं सांगायचं तर काहीच माहिती नाही, म्हणजे हे उपक्रम कसे सुचतात, व ते कसे अंमलात आणले जातात. कारण असं काम करण्याची कधीच वेळ आली नाही. पण आपण म्हणताय त्याप्रमाणे या लष्कराच्या भाकर्‍या भाजायला आवडेल मला. त्यामुळे भविष्यातील उपक्रमांसाठी माझाही विचार व्हावा ही विनंती.

एकदम सहमत!!
बायदवे, याला लष्कराच्या भाकर्‍या भाजणे म्हणत असतील तर मला भाकर्‍या फारच आवडल्या!! Happy

या लष्कराच्या भाकरी भाजूनही का आनंद मिळतो हे एकदा करून पहा म्हणजे समजेल >> लाखमोलाचं वाक्य!

मी सदस्य झाल्यनंतर पहिल्याच वर्षी वरचे सगळे प्रश्न पडले होते. पहिल्याच वर्षी संपादक मंडळात आणि दुसर्‍या वर्षी वर्षाविहार संयोजनात भाग घेतला तेव्हा सारी उत्तरे मिळाली. स्वतःबद्दलच्या अवास्तव कल्पना झुगारून देण्यासाठी, स्वतःतलेच आतापर्यंत माहिती नसलेले गुणदोष माहिती करून घेण्यासाठी, इतरांबद्दलचे अनावश्यक गैरसमज दूर करण्यासाठी, कुणी नया पैसा न मोजताही एखादा प्रकल्प पुढे जातो- तर पैशाची आणि इतर मदत असूनही वैयक्तिक / व्यावसायिक जीवनात एखादे काम आपण पुढे का रेटू शकत नाही- हा प्रश्न स्वतःलाच विचारण्यासाठी, प्रचंड योग्यतेचे हुशार लोक इतक्या विनयाने कसे वागू शकतात- असे आश्चर्याने म्हणण्यासाठी, एखादे काम केल्यावरचे समाधान, आनंद पैशापेक्षाही कित्येक पटीने जास्त मोबदला कसा देऊन जातो- हे समजून घेण्यासाठी... कितीतरी गोष्टींसाठी या भाकर्‍या एकदा भाजून पाहिल्याच पाहिजेत! Happy

>>>> बायदवे, याला लष्कराच्या भाकर्‍या भाजणे म्हणत असतील तर मला भाकर्‍या फारच आवडल्या!!
आम्हाला खायला आवडल्या! चान्गल्या गरमागरम खुसखुशित होत्या! Lol

सगळ्याच संयोजकांचे मनःपूर्वक आभार!!

तसेच 'मराठी भाषा दिवस' च्या सर्व स्पर्धांची बक्षिसे पुरस्कृत करणा-या मायबोलीकरांनाही अनेक अनेक धन्यवाद.

असेच धडाडीचे संयोजक मायबोलीला मिळत राहोत आणि त्यांच्या प्रयत्नातून अनेक उत्तम उपक्रम मायबोलीवर यशस्वी होवोत अश्या सदिच्छा!!

लष्कराच्या भाकरी Happy

साजिर्‍याला अनुमोदन. आपण केलेल्या कामाचे मायबोलीकरांकडून कौतूक होते हे खूपच समाधानाचे असते. संयोजन समिती/संपादक मंडळाच्या सदस्यांबरोबरच अ‍ॅडमिन टीमची खूप महत्वाची मदत ह्या सगळ्या उपक्रमांत असते.

एक छोटीशी सूचना, ह्या उपक्रमांसाठी अतिशय कल्पक जाहिराती केल्या जातात. त्या जाहिरातींचे एक कायमस्वरुपी दालन मायबोलीवर करता येइल का ? कमीत कमी त्यातल्या लक्षणीय जाहिराती प्रदर्शनास ठेवता येतील.

>> या लष्कराच्या भाकरी भाजूनही का आनंद मिळतो हे एकदा करून पहा म्हणजे समजेल
अगदी अगदी! Happy
सगळी प्रोसेस अगदी नेमकी शब्दबद्ध केली आहेत.

सगळे चटके आणि माकाचु यांच्यासकट या भाकर्‍यांची चव न्यारीच! Happy

(विशेषतः ओटा पुसताना 'आता पुन्हा म्हणून भाकर्‍यांच्या फंदात पडायचं नाही!' असं किती निक्षून ठरवलं जातं आणि तरी पुढच्या वेळी कुठून आणि कसा उत्साह येतो याचं गणित मांडणं केवळ अशक्य आहे.) Happy

Happy

सिंडरेलाला अनुमोदन.!

लस्कराच्या भाकर्‍यासोबत चटणी पण मस्त असतेच असते!!! Happy

या लष्कराच्या भाकरी भाजूनही का आनंद मिळतो हे एकदा करून पहा म्हणजे समजेल >>
दिवाळी अंकासारख्या ठरलेल्या ( एस्टॅब्लिश्ड) उपक्रमात भाग घेताना सुद्धा जी उत्सुकता, चैतन्य, हुरहुर , असते ती शब्दात पकडणं कठीण. अंक प्रसिद्ध झाल्यावर कित्येक दिवस तो 'हाय' असल्याचा इफेक्ट टिकतो ! वेगळ्या वेगळ्या देशातल्या, कधी न पाहिलेल्या लोकांबरोबर रात्री अपरात्री फोन, चॅट वरुन कामे करणे, वेगवेगळ्या विचारांच्या लोकांना एकत्र आणणे, दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणे सगळंच एकदा तरी करून पाहण्यासारखं आहे!

छान लिहिलं आहात अ‍ॅडमिन. 'लष्कराच्या भाकर्‍या' हा शब्द एकदम चपखल.
भरपूर शिकायला मिळतं ही काम करता करता. नवीन ओळखी होतात, टिमवर्कची, दुसर्‍यांच्या कल्पनांचा आदर करण्याची वृत्ती ही अंगी येते. एक काम/उपक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याचा आनंद, समाधान मिळतं ते वेगळंच.त्याला काही मोल नाही. Happy

ग्रेट काम हॅट्स ऑफ टू यू ऑल Happy

आपण म्हणताय त्याप्रमाणे या लष्कराच्या भाकर्‍या भाजायला आवडेल मला. त्यामुळे भविष्यातील उपक्रमांसाठी माझाही विचार व्हावा. व्यवस्थापन क्षेत्रातल शिकलो खरा पण अनुभव असा नाही अन् मला वाटतं इथं - आपल्या माणसात काम करणं खूप मोलाच ठरेल.

Happy
गेल्या दोन्ही वर्षीच्या गणेशोत्सव संयोजक मंडळातला अनुभव खूपच मस्त होता.. अगदी मनापासून एंजॉय केलं..

त्यातून जे शिकायला मिळतं ते तुम्हाला कधीच Paid Job मधून किंवा शाळेत जाऊन शिकता येणार नाही. >>>> पूर्ण सहमत.. !

शब्द न् शब्द पटला. असे काम करायला खरच खूप मजा येते आणि शिकायला तर खूपच मिळते, इसका मजाही कुछ और है| प्रोजेक्ट मॅनेजमेंट, त्यातील काम करणार्‍या आणि काम न करणार्‍या लोकांना सांभाळणे, कार्यक्रम यशस्वी/कल्पक करण्यासाठीचे ब्रेन स्टॉर्मिंग, वेगवेगळ्या नवीन लोकांच्या ओळखी, नवीन छान मित्र मैत्रीणी मिळतात, कधीही न भेटलेल्या लोकांशी चक्क खूप छान मैत्री होते असे खूप काय काय अनुभवायला मिळते. त्यामुळे ह्या लष्कराच्या भाकरी भाजणे एकदम worth आहे.

माझा मायबोली उपक्रमात किंवा मायबोलीवर काम करण्याचा हा पहिलाच अनुभव. अशी संधी दिल्याबद्दल संयुक्ता आणी अ‍ॅडमीन चे आभार.
'लष्कराच्या भाकर्‍या' चा हा अनुभवाने नक्कीच खूपच आनंद मिळाला, नवीन ओळखी झाल्या आणी भरपूर शिकायलाही मिळालं

छान लिहिलं आहे हो अ‍ॅड्मिन. ह्या कार्यकर्त्यांमुळेच चांगले चांगले उपक्रम मायबोलीवर होतात आणि आमच्यासारख्यांना त्याचा आनंद लुटता येतो. Happy

सयुक्ता म्मयबोली टिम यान्च कौतुक आणि अभिनंदन!तसेच 'मराठी भाषा दिवस' च्या सर्व स्पर्धांची बक्षिसे पुरस्कृत करणा-या मायबोलीकरांनाही अनेक अनेक धन्यवाद.

Pages