संवाद : शुभदा जोशी (महिला दिन २०१०)

Submitted by क्षिप्रा on 8 March, 2010 - 20:49

shubha.JPG

शिक्षण वंचितांपर्यंत पोचावं, ते आनंदाचं व्हावं या उद्देशानं ’पालकनीती परिवार’ या संस्थेनं सुरु केलेला 'खेळघर' हा एक प्रकल्प. पुण्यातील कोथरुडच्या लक्ष्मीनगर या वस्तीतील सुमारे शंभर मुलं या उपक्रमात सहभागी आहेत. शुभदा जोशी ह्यांच्या प्रयत्नाने सुरु झालेल्या खेळघराला आता तेरा वर्षे झाली आहेत. खेळघराशी मी गेली पाच वर्षे जोडली गेलेली आहे. ह्या पाच वर्षात शुभाशी छान मैत्री झालेली आहे. सातत्याने स्वत:मध्ये बदल घडवणे, शिकण्याची अनावार उर्मी, वाढत्या वयाच्या मुलांशी साधता येणारा चांगला संवाद हे तिचे प्लस पॉईंट्स आहेत. एक स्त्री कार्यकर्ती म्हणून तिची वाटचाल समजून घ्यावी ह्या हेतूने तिची मुलाखत घेतली आहे.

क्षिप्रा: आर्किटेक्टची प्रॅक्टीस, संसार ही तारेवरची कसरत करत असताना सामाजिक काम करायचा विचार कसा मनात आला? घरातून कसा रिस्पॉन्स होता?

शुभा: एकदम अश्या गोष्टी होत नाहीत. कुठेतरी आतनं अश्या गोष्टी मूळ धरत असतात. हलके हलके वाटत राहतं आणि मग एक वेळ अशी येते की आपण त्या निर्णयापाशी येतो. आपण काहीतरी करायला लागतो. सामाजिक कामाची म्हणशील तर मला काही तशी पार्श्वभूमी नाही. म्हणजे आमच्या घरामधून. मी फारश्या काही संस्था, सामाजिक कामं असं पूर्वी बघितलेलं सुद्धा नव्हतं .

कॊलेज मध्ये असताना लोकविज्ञान नावाच्या एका गटाशी ओळख झाली. आमचं कॉलेज संपल्यावर मी एकदा त्यांच्याबरोबर ट्रेकला गेले होते. तेव्हा खूप छान वाटलं. किती वेगळं करणारी लोकं आहेत ही . बोलतात किती संवेदनशीलतेने. बोलण्यात कविता, साहित्य यांचे रेफरन्सेस ! चाकोरीबाहेर काही करु बघणारी ! आम्ही करीअरवाली लोकं. सारखं आपलं परीक्षा, मार्क, करीअर आणि नंतर व्यवसाय ह्याच प्रवाहात. तर ही जी काही जीवनाची अंगं आहेत, त्यांचा फारसा स्पर्शच झाला नव्हता. तर मग असं वाटलं की हे छान आहे बरं का. आपण एक्सप्लोअर करायला पाहिजे. त्यामुळे त्या वेळेपासून त्या गटातले मित्रमैत्रिणी राहिले बरोबर. त्यानंतर लगेच काही सामाजिक कामात वगैरे पडले नाही पण तो विचार कुठे तरी मनात राहिला.

मग माझे व्यवसाय सुरु करणे, लग्न होणे, मुले होणे ह्यात दहा वर्षाचा काळ गेला. मात्र ह्या गटातील मित्र मैत्रिणींशी माझा संपर्क होता. विद्या कुलकर्णी, वंदना कुलकर्णी ह्या मैत्रिणी, त्यांच्याकडून पुस्तकं वाचायला आणणं, मोकळ्या वेळात विचार करणं, वाचणं हे सारखं चालू होतं आणि त्यातनंच कुठेतरी असं वाटायला लागलं असायची शक्यता आहे कि आपण जे काम करतोय इन्टीरिअर डिझायनिंगच तर ते समाजाच्या एका उच्चभ्रू वर्गासाठीच आहे. ते सुद्धा सर्व्हिस देणे. म्हणजे त्यांचं आयुष्य आहे त्यापेक्षा अधिक सुखाचे जावे यासाठी काहीतरी सर्व्हिस देणारे आहोत आपण. हे काम आहे त्यात क्रिएटीव्हिटी होतीच पण क्रिएटीव्हिटी बरोबरच अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचा पण खूप मोठा भाग होता आणि त्याचा कंटाळा पण होता मला. जे आपल्याला आतून करावसं वाटतंय ते करायला मिळावे असे मला वाटत होते. मग आर्थिक स्थैर्य आलं. त्याकाळात मी विचार करायला लागले कि आपल्याला वेगळं काय करता येईल. मुलं लहान होती त्यावेळी.

मुलांच्या निमित्तानेच माझी 'अक्षरनंदन' शाळेशी ओळख झाली आणि नंतर पालकनीती मासिकाशी. माझी मैत्रिण, विद्या कुलकर्णी हिचा मुलगा त्या शाळेत होता. जेव्हा माझ्या मुलाला प्रवेशासाठी वेगवेगळ्या शाळा बघायला लागले तेव्हा वाटले की अरे, ही शाळा खूप वेगळी आहे. इथलं शिक्षण जीवनाशी जोडलेलं आहे. आनंददायी आहे. पण तोपर्यंत दृष्टीकोन असा होता की हे जे मोकळ्या वेळात वाटणारे विचार आहेत ते मोकळ्या वेळआतच करायचे बरं का. ते काही प्रत्यक्षात वगैरे आणायचे नसतात. प्रत्यक्षात मुलाला इंग्लिश मीडीयमच्या, स्पर्धेत टिकणा-या अशाच शाळेत घातलं पाहिजे. त्याला स्पर्धात्मक वातावरण मिळाले पाहिजे, विविध प्रकारचे एक्स्पोझर्स मिळाले पाहिजेत वगैरे. त्यामुळे मुलाला अक्षररनंदन मध्ये घालण्याचा निर्णय घ्यायला सुद्धा आम्ही वर्ष दोन वर्ष लावली. खूप विचार करून, वेगवेगळ्या लोकांना भेटून बोलून मग हरकत नाही घालायला अश्या निर्णयापर्यंत आम्ही आलो. त्याला अक्शरनंदनमध्ये घातलं आणि दुस-या बाळाचा चान्स घ्यायचा असं आम्ही ठरवलं .

त्या सगळ्या दरम्यान अक्षरनंदनमधल्या शिक्षणाच्या विविध सृजनशील पद्धती, तिथलं कुटुंबासारखं खेळीमेळीचं वातावरण, सगळ्यांना असलेली शिकायची उर्मी, उत्सुकता यामुळे मी खूप भारावून गेले होते. तिथेच संजीवनी कुलकर्णींची आणि माझी ओळख झाली. शाळेत त्या गणिताचं काम बघायच्या त्या काळात आणि शाळासमितीमध्ये पण त्या होत्या. तिथे ओळख झाल्यावर संजीवनीशी मैत्री झाली व विविध विषयांवर बोलणे चालू झाले. मग तिने पालकनीती दाखवलं. मी तिच्याशी खरंतर असंच बोलायला गेले होते कि "मला आता वेगळं काहीतरी करावंसं वाटतंय. मी काय करु गं?" त्या वेळी तिने विविध पर्याय माझ्यासमोर ठेवले. उदा. आम्ही एच आय व्ही एड्सच्या संदर्भातलंही काम करतो. हे अक्षरनंदन शाळेचं पण काम आहे. तू तिथे येऊ शकतेस किंवा हे पालकनीती मासिकाचं काम आहे. हे वाच. तुला काय वाटतं आहे बघ. लिही.

त्यातलं पालकनीतीचं काम मला करण्याजोगं होतं. कारण माझं बाळ लहान होतं, मोठा मुलगाही लहान होता. नवरा पूर्णवेळ व्यवसायामध्ये गुंतलेला होता. त्यामुळे घरच्या घरी वाचणं, लिहीणं, फोनवर काही बोलणं हे माझ्या दृष्टीने शक्य असलेलं काम होतं. त्यामुळे मग मी पालकनीती मासिकाच्या संपादक गटात सामिल झाले. अर्थात संपादन म्हणजे काय, जर्नालिझम म्हणजे काय हे काहीच माहीत नव्हतं. पत्र आणि डायरी ह्याव्यतिरिक्त मी कधीच काही लिहिलं नव्हतं, पण संजीवनीचं म्हणणं होतं "आपल्या आतनं जे वाटतं तेच लिहायचं असतं. त्याच्यासाठी प्रशिक्षणाची काही गरज नाही. उलट प्रशिक्षणानं ते आतून वाटण्याची दारं बंद होत असतात. म्हणजे फॉर्मल प्रशिक्षण आहे त्यानं. त्यामुळे तू कशाला काळजी करतेस प्रशिक्षणाची. तुला जे वाटतंय ना ते लिही छापायचं की नाही ते आम्ही बघू." असं करता करता, त्या संपादक गटात सामील होणं, त्यातील लोकांबरोबर मैत्र्या, नाती जमणं, काही काही प्रयोग करून बघणं तिथल्या जबाबदा-य़ा स्वीकारणं हे सुरु झालं.

मी काही वेळ अक्षरनंदनमध्ये शिकवायला पण जात होते. माझा मुलगा तिथे असल्यामुळे खूप उत्सुकता होती आणि खरं सांगायचं तर अविश्वास पण होता. ”प्रायोगिक, प्रायोगिक म्हणतात म्हणजे नेमकं काय करतात? अभ्यासक्रम तरी शिकवतात ना?” त्यामुळे आपण जाऊन बघितलेले बरे असा पण भाग होता. मग काय हळू हळू गेल्यावर लक्षात आलं की आपण म्हणतो त्यापेक्षा खूप काहीतरी वेगळं आणि छान नि दर्जेदार ते शिकवत आहेत. हे जे काय आहे त्यातनं चांगलंच होणार आहे आपल्या मुलाचं. मुलाचं सोडा, त्यातनं मला वाटतं माझीच लर्निंग प्रोसेस सुरू झाली होती.

शिकणं म्हणजे खरं काय? मी एकोणीस वर्षांचं शिक्षण घेतलं. आर्किटेक्चर - त्यापुढे जाउन एम. ई. टाऊन प्लॅनिंग झाले होते मी, तरी खरं शिकणं म्हणजे काय हे मला नीटसं समजलेलं नव्हतं. कशासाठी तरी शिकायचं, पेपर देण्यासाठी शिकायचं, काम मिळवण्यासाठी शिकायचं, पैसे मिळवण्यासाठी शिकायचं पण त्यामुळे आपल्यात काय बदल घडतात हे काही कळलेलं नव्हतं त्यामुळे या दोन्ही कामांमुळे माझी स्वत:ची एक शिकण्याची प्रोसेस सुरु झाली. स्वत: कडे वळून बघणं, स्वत:शी संवाद साधणं, आणि मग स्वत: मधल्या खूप त्रुटी लक्षात आल्या. आपल्याला आजुबाजूच्या समाजातील एका घटकाचेच ज्ञान आहे. बाकीचं आपल्याला माहीतचं नाहीये. आपल्या घरी कामाला येणा-या मोलकरणी, त्या कुठे राहतात, त्यांचे काय भावविश्व असतं, काय परिस्थिती आहे त्यांची, काय प्रश्न आहेत, आपल्याला काहीच माहिती नाही. हे तर झालं अगदी जवळचं, पण ग्रामीण भागातल्या लोकांचं किंवा नर्मदेच्या धरणग्रस्तांचॆ काय प्रश्न आहेत, वेगवेगळ्या रोगांनी जर्जर झालेल्या लोकांची काय दु:खं आहेत आणि काय वंचितता आहे याची ओळख मला या कामामुळे होत गेली. जसजशी मी वाचत गेले, लिहायला लागले, बोलायला लागले लोकांशी, ते झाल्यावर, अवेकनिंग म्हणतो ना, आतून कुठेतरी दारे उघडण्याची जी प्रोसेस असते ना ती सुरु झाली. मी मघाशी म्हणाले ना तसे हे सर्व एकाएकी झाले नाही. चार पाच वर्षांची ही प्रोसेस आहे. हलके हलके यातील एकेका कामाकडे मी ओढली गेले.

पालकनीतीमध्ये दर महिन्याला दोनदा, तीनदा अश्या आमच्या बैठका व्हायच्या. खूप चर्चा व्हायच्या वेगवेगळ्या विषयांच्या निमित्ताने. त्यात ’सोशल पेरेंटींग’ असा नेहमी विषय असायचा. त्यामानाने आम्ही कोणी प्रत्यक्ष मुलांबरोबर असं काम करत नव्हतो. अक्षरनंदन मध्ये संजीवनी होती पण वंचित मुले तिथे कमी होती. तिथे जास्त करुन मध्यमवर्गीय मुले होती. त्यामुळे मला असं वाटलं कि आपण नुसतं हे लिहितोय आणि म्हणतोय याला काही अर्थ नाही. वंचित मुलांमध्ये प्रत्यक्ष काम करायला पाहिजे. काय काम करायचे हे थोडसं अक्षरनंदनमुळे समजत होतं. सॄजनशिक्षणाचा अनुभव जो वंचित मुलांना अजिबात मिळतच नाहीये, ते काम आपण या मुलांबरोबर करायचं आहे. १९९६ साली आम्ही पालकनीतीचा ट्र्स्ट रजिस्टर केला. त्यानंतर असं पुढे आलं कि आपण आणखी कामं सुरू करुयात मासिकाच्या व्यतिरिक्त. त्यात मी खेळघराची कल्पना मांडली. त्यापूर्वीच आजुबाजूच्या वस्त्यांमधली मुलं माझ्या मुलाबरोबर खेळायला घरी यायला सुरुवात झाली होती. चारपाचजणांचा आमचा गट जमला होता पण ते फार अनौपचारिक स्वरुपाचे होते. मला वेळ असला की ते यायचे, बसायचे, आम्ही गप्पा मारायचो. काहीतरी वाचून बघायचो. पण त्यातनंच आपण खेळघर नावाचं काम चालू करु या असा विचार मनात आला.

आता घरच्यांची संमती, म्हणजे काय होतं की आमचं काही एकत्र कुटुंब नव्हतं. म्हणजे नव-याचीच संमती. तो माझा खूप जवळचा मित्र आहे. त्याचा व्यवसाय त्याच्यासाठी प्रायॉरिटीवर होता कारण कुटुंबाला त्याची गरज होती. त्याची स्वत:ची पण ती गरज होती. त्यामुळे ही सगळी प्रोसेस मी त्याच्या साथीनंच केली. मला जे वाटतं होतं ते त्यालाही वाटतं होतं. माझ्या आईवडिलांचा थोडा विरोध होता. त्यांना वाटत होतं की आपण मुलीला एवढं शिकवलं आणि तिने आता ते फिल्ड सोडून वेगळंच काहीतरी करायचं, ते पण अर्थार्जनासाठी नाही आणि असं काही फार वय झालेलं नाहीये, तेहत्तीसच वर्षांचीच होते मी त्यावेळेला. तर तिनं करीअर करावं, नावलौकिक मिळवावा, असं कुठल्याही आईवडिलांना वाटतं तसं त्यांनाही वाटत होतं. पण त्यांनी ते स्वीकारलं होतं कि आता हे तिचं आयुष्य आहे व आपण त्यात ढवळाढवळ करू शकत नाही. मला वाटतं यात तुझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत.

क्षिप्रा: स्त्री पुरुष समानता या संकल्पनेवर तुझा विश्वास आहे असं मला तुझ्याबरोअर चार- पाच वर्षे काम करताना जाणवलं. या संकल्पना घरात आणि बाहेर, तसंच स्वत:मध्ये रुजवताना काय काय अडचणी आल्या? शेवटी कसं हा प्रश्न सगळ्यांनाच येतो. आपण ऐकतो तेव्हा ते खूप छान वाटतं पण जेव्हा ते प्रत्यक्ष राबवायची वेळ येते, त्यावेळेला तो खरा कस लागतो. तिथे कश्या स्वरूपाच्या अडचणी आल्या? त्यातून कसे मार्ग निघाले?

शुभा: खरं तर आपण काय प्रकारचं काम चालू करायचं असा मी विचार करत होते तेव्हा पहिला प्रश्न हा स्त्री-पुरूष समानतेसाठी काम करू असाच होता. तो धागा जो आहे तो अगदी वाढीच्या वयापासून आहे. बाराव्या, तेराव्या वर्षापासून मनामध्ये खूप प्रबळपणे मूळ धरत असलेला विचार आहे. अगदी लहानपणीसुद्धा घरामध्ये भावाची आणि माझी बरोबरी असावी यासाठी आग्रह करणं, भांडणं हे अजून मला आठवतं. चौदाव्या-पंधराव्या वर्षी आपलं वाचन सुरु होतं, आपण इकडे तिकडे बघायला लागतो, स्वत:चा विचार करायला लागतो, त्या वयात आईशी भांडणं सुरू झाली. माझं स्वातंत्र्य, मुलगी म्हणून मला लागू असलेले नियम, - सातच्या आत घरी आलं पाहिजे वगैरे हे सगळं. सुदैवाने माझे आई- वडील दोघेही नोकरी करणारे. आईतर काळाच्या मानाने पुरोगामी विचारांचीच होती असं म्हणायला हरकत नाही. आर्किटेक्चरसारखा महागडा कोर्स त्यांनी मला करु दिला. मुलगी म्हणून असं काही म्हणले नाहीत की एवढा महागडा कोर्स नाही करायचा. सगळा खर्च त्यांनी केला. लग्नासाठी सुद्धा एकवीस-बावीस वर्षापर्यंत थांबणं हे पंचवीस वर्षांपूर्वी तरी पुरोगामीपणाचंच लक्षण म्हणायला हवं. तसं वातावरण होतं. घरामध्ये पण मला तत्त्वत:च असं वाटत होतं कि भयंकर विषमता आहे आणि मुलगी म्हणून आपण दडपले जातोय.

लग्न तर करूच नये असं वाटत होतं. लग्नाने आपल्यावरती आणखी खूप बंधनं येणार, आपलं सगळं स्वातंत्र्य जाणार, ह्याच्यात्याच्यासाठीच आपलं सगळं पुढचं आयुष्य घालवायचं की काय असं वाटत होतं. पण लग्न करणं भाग पण आहे असंही वाटत होतं. सगळीकडनं प्रेशर होतं त्यावेळी... घरातनं... बाहेरुन.... लग्न केल्यावर मात्र वेगळा अनुभव आला असं म्हणायला हरकत नाही. एकतर आम्ही वेगळे राहात होतो. त्यामुळे फारशी संघर्षाची वेळ आली नाही. पण अवेकनिंग जे मगाशी म्हणाले; ते ह्या बाबतीतलं अवेकनिंग मात्र खूप आधीपासून झालं होतं. त्यासाठीचे कन्फ़्रंटेशन्स घेणं - लहान वयात भांडणाच्या स्वरूपात, मोठी झाल्यावर ते वादाच्या स्वरूपात म्हणा किंवा समजावून घेवून म्युच्युअल अंडरस्टॆंडिगच्या स्वरूपात ते व्यक्त होत गेले.

आमचं अरेंज्ड मॆरेज होतं. सुरुवातीच्या काळात खूप वाद घातले नव-याबरोबर. तोही पुरोगामी विचार पटणारा आहे. मुळात सौम्य आणि रॅशनल स्वभावाचा माणूस आहे..पण स्त्री-पुरूष समानतेच्या बाबतीत त्याने फारसा विचार केलेला नव्हता. आपली बायको शिकलेली असावी, कमावती असावी असं त्याला वाटायचं. पण याच्यापुढे जावून त्यासाठी आपल्यालाही काही करायला लागेल, बदलायचा लागेल असा विचार झाला नव्हता. मी त्याकाळात अमृता प्रीतम, गौरी देशपांडे यांची पुस्तके वाचत होते. ती पुस्तकं कायम माझ्या घरात असायची. ती त्यानं हळू हळू वाचायला सुरुवात केली. ’बघू या ही काय वाचते बुवा' म्हणत. आता तो म्हणतो ’त्या पुस्तकांचा खूप उपयोग झाला तुला समजावून घेण्यात’ कारण शिकलेली, स्वतंत्र स्त्री कसा विचार करते हे कदाचित मला त्याकाळात त्याला समजावून सांगता आलं नसतं; त्याला ते ती पुस्तकं वाचून त्याला समजतं गेलं. समजणं, कळणं आणि वळणं यातही फरक असतो. वेळोवेळी बोलावं लागलं. आग्रह करावे लागले. ही जी कन्फ़्रंटेशन्स असतात ना त्याबद्दल मला तुला एक छान सांगावंसं वाटतं. माझ्या सासूबाई खरेतर माझ्या आईपेक्षाही मागच्या पिढीतल्या. प्रसन्ना त्यांचा धाकटा मुलगा. दोन मोठ्या मुली. सासूबाईंनी नोकरी केली नव्हती. शेवटच्या आजारपणाच्या काळात त्या आमच्याकडे होत्या. आमच्या खूप गप्पा होत असत. त्या मला एकदा म्हणाल्या, "शुभा, बाईनं खमकंच असायला पाहिजे. त्याशिवाय तिचं भागणार नाही. तिला खूप गृहीत धरलं जातं. " हे मला खूप महत्त्वाचं वाटलं. सुरुवातीला त्यांना मी खूप फटकळ वाटत असेन. वाद घालणारी वाटत असेन, ते त्यांनी मला बोलूनही दाखवलं. पण त्यानेच बदल घडतात, हे त्यांच्या लक्षात आलं. मलाही ते जाणवलंच होतं. मुलांना वाढवताना म्हणा किंवा प्रसन्नाबरोबरचं जे सहजीवन, जे काही आमचं बोलणं झालं, एकमेकांशी न घाबरता भांडलो, स्वत:च्या भावना न दडपता एकमेकांशी बोललो, संवाद केला, त्याचा आमच्या वाढीवर खूप परिणाम झाला. एक माणूस म्हणून दुस-याला समजावून घ्यायला, अन स्त्रीपुरूष समानतेच्या दृष्टीकोनातूनसुद्धा.

आपण काही तत्त्व, काही कल्पना मनात धरून असतो. पण ते प्रत्यक्षात उतरवणे अवघड असते. कारण आपल्यावर पण तसेच संस्कार झालेले असतात. बराच काळ मला वाटत होतं की घर सांभाळणॆ व मुले वाढविणे हे माझेच काम आहे. बाय डिफॉल्ट ते माझंच काम आहे त्यामुळे त्याच्यासाठी दुस-याला गृहित धरणे, दुस-यांना ते कर म्हणणं, दुस-य़ावर ते टाकणं, हे मलाच जमायचं नाही. बाकिच्यांनी आपणहून मदत करणं गोष्ट वेगळी. ती मदत असायची. पण मला मदत नको होती. त्या कामाची जबाबदारी वाटून घायला हवी होती. हे मला समजायला लागलं. पालकनीतीत आल्यावर या सगळ्या प्रोसेसला वेग आला. पहिला अंक मी केलेला मला आठवतो आहे तो ’कुटुंबांतर्गत लोकशाही’ असाच होता. त्यातूनच संध्याकाळचा स्वयंपाक प्रसन्नाने बघायचा आणि सकाळचा मी अशी व्यवस्था आकाराला येऊ लागली. अजूनही घराची मुख्य व्यवस्था जी असते ती मी बघते. त्यामध्ये एक असे आहे की अर्थार्जन मी करत नाही आत्ता. ती संपूर्ण जबाबदारी प्रसन्नावर आहे. त्यामुळे ही थोडी त्याला सवलत आहे. पण आजमितीला समानता आहे असं मी म्हणू शकते. दोघांमध्ये समजूत आहे. समानता म्हणजे हक्क, भांडण या स्वरूपात ते आता राहिलेले नाही. आता ती समजूत व संवाद या पातळीवरची समानता आहे त्यामुळे ती खूप लोभस आहे. छान आहे.

मी जिथे काम करते ’लक्ष्मीनगर वस्ती’ मध्ये कामामध्ये समानता आणणे कठीण आहे. गंमत काय झाली माहित आहे का क्षिप्रा, वस्ती मधलं जे वातावरण होतं ते मध्यमवर्गीय घरामधील वातावरणापेक्षा अगदी शंभर नाही पण जवळ जवळ साठ-सत्तर वर्षे मागे होतं रादर आहे. संताप व्हायचा सुरुवातीला. तिथल्या सर्व मुलांचा, सर्व पुरूषांचा राग मला यायचा. मग लक्षात येत गेलं की त्यांच्यावर रागावून काहीच होणार नाहीये. ते तसे वागतात कारण त्यांचं तसं कंडिशनिंग आहे. हे बदल त्यांच्यामध्ये रुजवायला, त्यांनी ते स्वीकारायला वेळ लागणार आहॆ. फक्त एवढेच आहे की माझ्या आईच्या पिढीला, तिच्या मागच्या पिढीला जेवढा वेळ लागला तेवढा वेळ त्यांना लागणार नाहीये. कारण माध्यमं आहेत. त्यांच्याबरोबरील समाज, त्यात होणारे बदल ते बघताहेत. त्यातनं त्यांना या गोष्टी जाणता अजाणता मिळणारच आहेत. तरी सुद्धा परंपरा ह्या माणसामध्ये इतक्या चिवटपणे रुजलेल्या असतात की त्या सोडणे सहजासहजी शक्य होत नाही. वस्तीतले मुलगे तर खूप लाडावलेले असतात. बापाचं बघून ते माज करायला सरावलेले असतात, त्यातनं खरंतर त्यांचं एवढं नुकसान होतयं कि त्यांना काहीच येत नाही. त्यांना घरामधलं एकही काम येत नाही. साधं सुईत दोरा ओवून एक टाका घालणंसुद्धा त्यांना येत नाही. शिक्षणात त्यांना रस नाही. खेड्यातल्या सारखी घरचीच शेतीसारखी कामं ही शहरात नाहीत. त्यामुळे उनाडक्या करणे, इकडे तिकडे भटकणे, टाइम पास करणे, छेड काढणे याच्या व्यतिरिक्त त्यांना काही येतच नाही. म्हणजे आज यांना आया पोसणार आणि उद्या होणारी बायको पोसणार. म्हणजे, बायकोमुलांची सोडा, ती तर पुढची गोष्ट झाली, पण स्वत:च्या आयुष्याची तरी जबाबदारी घेता आली पाहिजे. ह्याच्यासाठी सुद्धा आम्हाला खूप काम करायला लागतं, खूप मुलांशी बोलायला लागतं, चर्चा घ्यायला लागल्या, रोल प्लेच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधावा लागला. त्यांच्या पालकांशी बोललो. पालक म्हणजे पुन्हा आयाच. पुरुष पालक कधी आलेच नाहीत, काही अपवाद सोडता. त्यांना ह्यात रसच नसतो. आणि घेतलातरी त्यांचं मत होतं, ह्याने काय होणार आहे? दोन दिवस नाचाल नाचाल मग गप्प बसाल. अश्या प्रकारे त्यांचा एक सूर असतो. हे एकूण चळवळीलाच नाउमेद करणारे असते. पण मग आम्ही त्यांना सांगितले, तुमचा नाही ना विश्वास, मग तुम्ही नका येऊ. पण जे करताहेत त्यांना कशाला नाउमेद करता?

पण खेळघरातील स्त्रिया, मुलीसुद्धा अतिशय रस घेतात. अतिशय सकारात्मक दृष्टीने या सगळ्याचा विचार करतात. आम्ही तर यातून हेच शोधले की मुलींना आम्ही हेच सांगत आहोत की आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे. पण त्याच्यासाठी भांडणं, किंवा स्वत: रक्तबंबाळ न होता, मॆच्युरली, लोकशाही पद्धतीने आपल्याला ती डील करत, सोडवत न्यायची आहे. त्याच्यासाठी आपण अधिक शहाणं व्हायचं आहे. हलके हलके या गोष्टी बदलायच्या आहेत आणि आग्रह धरायचा आहे. तिथे रागावून, झिंजा उपटून, भांडणं करून काही उपयोग होणारच नाहीये. लाथा खायला लागतील, दुसरं तर काही होणार नाही यातनं. नातं तुटण्यापेक्षा समजून घेत, आज आहे त्यापेक्षा दोन पावले पुढे टाकत टाकत आपल्याला हा गड सर करायचा आहे. तो तुम्ही निश्चित कराल कारण करणा-या तुम्हीच आहात. आजघडीला जगामध्ये कर्ती म्हणाल तर ती बाईच आहे. त्यामुळे बायकांनी घाबरायचे काही कारणच नाहीये. हा आत्मविश्वास जर त्यांच्यामध्ये रुजला तर त्या मागे पडणार नाहीत.

क्षिप्रा: एक जसे तू म्हणलीस, कि अवेकनिंग झालं आणि मग एक प्रवास सुरू झाला. जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा असे लक्षात येते की आपल्यात ह्या ह्या माणसाकडून हे हे आलं आहे. काही व्यक्तिमत्त्वांचा आपल्यावर प्रभाव पडला आहे. असं कोणी आहे का? कोणाच्या विचारांचा प्रभाव पडला असं वाटतं?

शुभा: भारावून जाणं हा तर माझा स्वभावच म्हणायला पाहिजे क्षिप्रा. अगदी तरूणपणाच्या काळात तर मी काही वाईट गोष्टींनी पण भारावून गेले होते. स्वातंत्र्य, मित्र, मैत्रिणी यांच्या मागे जाणं हे तेव्हा होतं. पण वेगळं काहीतरी बघितलं, आपल्याला माहित नसलेलं बघितलं की सुरुवातीच्या काळात मी प्रचंड भारावून जाते. तसंच लोकविज्ञानच्या बाबतीत, तिथल्या मित्रमैत्रीणींच्या बाबतीत, पालकनीतीच्या बाबतीत झालं. संजीवनी, अक्षरनंदनमधल्या वर्षा सहस्रबुद्धे यांच्यामुळे मी खूप भारावून गेले. पण माझ्या आतून स्वतंत्र असण्याच्या जाणीवेचा एक भाग हा आहे की मी कुणाच्या तरी अधीन होते आहे असे मला जेव्हा लक्षात येते तेव्हा त्यातनं कधी एकदा बाहेर येते आहे असं मला वाटायला लागतं. त्यामुळे या प्रभावातच त्यातून बाहेर कसं यायचं हीही एक प्रोसेस चालू असे. कदाचित त्या शिकण्याच्या, बदलण्याच्या काळात त्याप्रभावाखाली राहणं होतं पण नंतर हळू हळू त्यातलं काय पटत नाहीये, काय पटतयं ते पाहणं, साधक बाधक विचार करणं, त्या व्यक्तीशी पुन्हा ते बोलणं हे मी करत असतेच. त्यामानाने मी अक्षरनंदनमध्ये फार काळ राहिले नाही. खेळघर सुरू झाल्यानंतर तर मी अक्षरनंदन मध्ये जाऊच शकले नाही, त्यामुळे त्यांच्याशी काही तसं बोलण्याची फारशी वेळ आली नाही.

संजीवनीच्या बरोबरचं नातं हे विविध टप्प्यांमधनं गेलेलं आहे. माझ्याआधी ८/१० वर्षांपासून या क्षेत्रात होती. जाणिवेनं काम करत होती. त्यामुळे प्रभाव पडणं तर सहाजिकच आहे नि म्हणूनच एकत्र कामही सुरु केलं पण भारावून जाणं आहे, प्रभाव असणं आहे, राग येणं आहे. अगदी लव्ह- हेट रिलेशनशिप ज्याला म्हणू आपण ती आहे. अनेक अनेक काळ अस्वस्थ राहणं आणि खूप भांडणं हे आहे. पण आता म्हणशील तर आम्ही मैत्रीणी आहोत. आम्हाला एकमेकींच्या strengths माहीत आहेत. ती सांगेल तेच बरोबर असं नाही होतं. माझा स्वत:चा विचार त्यातनं उभा राहिला आहे. खरेतर ही संजीवनीचीच कल्पना आहे की पालकत्व हे काही फक्त मुलांचं किंवा समाजाचं नसतं तर आपणही आपलं पालकत्व घ्यायचं असतं. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याचं खूप महत्त्व असतं असं मला वाटतं. नेमकं काय आहे,तो प्रभाव आपल्याला कोणत्या दिशेने नेत आहे, योग्य कि अयोग्य दिशेने नेत आहे हा संवाद आपला जर स्वत:शी होत राहिला तर आपण एका सुयोग्य दिशेने जात राहू असं मला वाटतं. संजीवनीने मला सातत्यानं विचार क्रायला भाग पाडलं. माझ्या लर्निंग प्रोसेससाठी हे फार महत्वाचं होतं.

दुसरं मला सांगावसं वाटतं ते म्हणजे देवदत्त दाभोळकर. ते पुणे युनिर्व्हसिटीचे व्हीसी होते. शिक्षणाच्या संदर्भात त्यांचं खूप काम, लिखाण आहे. अगदी सुरूवातीपासून म्हणजे खेळघर स्थापन केलं तेव्हापासून त्यांचं ह्या उपक्रमाकडे लक्ष आहे. खूपदा त्यांनी मला अतिशय चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत. जसे ’खेळघरात तू एकटी बोलते आहेस त्याने तुझ्यावर तर ताण पडतोच आहे पण तीही कंटाळत आहेत. त्यांना व्हरायटीची गरज आहे. वेगवेगळी माणसे, वेगवेगळे विषय पाहिजेत.’ ही गोष्ट माझ्या लक्षात येत नव्हती. उलट वाटायचं मी आणि माझी मुलं किती छान आहे. अश्या काही गोष्टी त्यांनी वेळोवेळी आणि वेळेवर सांगितल्या. त्याचा मला खूप उपयोग झाला. सध्या दादा खूप आजारी आहेत. ते साता-याला त्यांच्या मुलाकडेच असतात. पण अजूनही माझ्या मनात त्यांची आठवण नेहमी असते. कधीतरी जाऊन यावं असं वाटतं.

क्षिप्रा: त्यांच्या विषयी माझीही एक आठवण आहे. ती जी इंग्रजी प्रार्थना आहे ना God, grant me the serenity... ’ त्याचं पद्यरुपांतर खूप चांगलं केलं आहे त्यांनी. ’जे टाळणे अशक्य दे शक्ति ते सहाया...’

शुभा: अनेक इंग्रजी पद्यांची त्यांनी सुरेख मराठी भाषांतर केलेली आहेत. तसेच लीलाताई पाटील - शिक्षणाच्या संदर्भातील महाराष्ट्रातील एक मोठं नाव आहे. मी दोन तीन वर्षे त्यांच्या बरोबरीने काम केले आहे. त्यांची विचारसरणी समजावून घेणे, त्यांची पुस्तके वाचणे, कार्यपद्धती समजावून घेणे हे केले. त्यांच्याबरोबर दोन-तीन शिबिरे केली. पण लीलाताईंच्या आणि माझ्यामध्ये जवळ जवळ एका पिढीचं अंतर आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये मला अगदी अडचणीचं व्ह्यायला लागलं. पुन्हा मी अमुक अमुक असंच करावं असा त्यांचा आग्रह असेल तर मग मी नाही करणार हा माझा आग्रह व्हायला लागला. भलेही त्या सांगतात ते कितीही बरोबर असलं तरी ते तुम्ही म्हणताय म्हणून मी नाही करणार जोपर्यंत मला आतून तसं वाटत नाही. मला वाटलं, पटलं तर मी ते करीन असे मला वाटत असे. पण त्यांच्यांकडून मी खूप काही शिकले हे नक्की !

क्षिप्रा: आता हे जे खेळघरातील काम, पालकनीतीचे काम, घर चालविणॆ, घरच्या लोकांसाठी मोकळा वेळ देता येणं, यासाठी साधारण रोजचा दिनक्रम कसा असतो? वेगवेगळे छंद कोणते आहेत ? थोडक्यात वेळाचे व्यवस्थापन कश्या स्वरूपाचे आहे?

शुभा: आता बघ, माझा स्वभाव असा आहे की, जर आजचा दिवस गेला तसाच जर उद्याचा दिवस जाणार असेल तर तो उद्याचा दिवस यावाच कशाला? असं मला वाटतं. रोज तेच अश्या प्रकारचं रूटीन मला कधीच आवडलॆलं नाही. व्यवसाय करत असतानाही नाही आणि आत्ताही नाही. सुदैवाने आमचं खॆळघराचे स्वरूपच असे आहे कि तिथे लवचिकता आहे. शाळेसारखं नाही की रोज अमूक एक गोष्टी झाल्याच पाहिजेत. तिथे वेगवेगळी माणसे, गट आहेत. एखादी गोष्ट मी खूप उत्साहाने करते, मग त्यातनं बाहेर पण पडते. तशी तिथे, त्या कामामध्ये मला स्पेस आहे असं मला वाटतं.

आम्ही एक शेत घेतलेलं आहे. ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये मला खूप रस आहे. आम्ही महिन्यातून दोन-तीन दिवस तरी तिथे जातो. तो एक बदल म्हणून बरा वाटतो. सकाळी नऊ ते सात असे कामाचे तास म्हणले तरी त्यामध्ये व्यायाम असू शकतो. मैत्रीणींबरोबरच काम करत असल्याने, कामाबरोबरच गप्पा होत असतात. खूपच ताणाखाली असलो तर नाही मारत गप्पा. कामातच रिलीफ व ताण दोन्ही असतो, ते एकमेकांत मिसळलेच आहे. घर व खेळघर शेजारी शेजारीच आहे त्यामुळे वाटलंच तर मी पटकन घरी जाऊ शकते. मुलगी शाळेतून घरी आली की तिची चौकशी करू शकते. गरज असली तर रात्री दहा दहा वाजेपर्यंत खेळघरात कामही करू शकते. लवचिक आणि प्रवाही असंच आपलं आयुष्य असावं असं मला वाटत असे व ते प्रत्यक्षात आले आहे. एकेकदा ताण येतो. सगळ्याच ठिकाणचं जे व्यवस्थापन असतं ना ते करता करता कंटाळा येतो. सुदैवाने मुले मोठी झाल्यामुळे त्यांच फारसं बघायला लागत नाही. धाकटी मुलगी दहावीत आहे. तीपण कॊलेज मध्ये जायला लागली की ती जबाबदारी कमी होइल.

क्षिप्रा: खेळघराची एक चांगली टीम तयार झाली आहे त्या बद्दल सांगा.

शुभा: हो. माझ्याबरोबर सात-आठ वर्षे काम केलेली लोकं आहेत. एकेका भागाची त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे. अजूनही सेंट्रल कोऑर्डिनेशन मी करत असले तरी असा आग्रह माझा असतो की मी आता सेंट्र्ल कोऑर्डीनेशन करणार नाही. तेही सगळ्या टीमनेच बघावं, मी एकटीने ते किती वर्षं बघायचं असा आग्रह मी सुरू केला आहे. कधी कधी यातून पूर्ण बाहेर पडावं असं वाटतं, मग मी सरळ सुट्टी घेते. एक चार-पाच दिवस सुट्टी घेतली की मला बरं वाटतं.

शिवाय बाहेर जाणं, वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाणं आणि शिकणं हेही चालू असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या कामांमध्ये सहभागी होणं हे मी करते. उदाहरणार्थ दक्षिण भारत व महाराष्ट्र यांच्यातील सृजनशील काम करणा-या संस्थांचा नेटवर्क नावाचा गट आहे. आम्ही सगळे वर्षातून तीन दिवस निवासी स्वरूपात भेटतो. चर्चा- गप्पा असा कार्यक्रम असतो. त्याने खूप ताजंतवानं व्ह्यायला होतं अश्या प्रकारचे उपक्रम चालूच असतात. असेच काही नवे उपक्रम असतात त्याला मी जाते. जिथे नवीन शिकायला मिळतं छान वाटतं. गेल्यावर्षी घोटूल अभ्यास गटात मी गेले होते. मोहन हिरालाल (मेंढालेखा, गडचिरोली) आदिवासी गटात काम करतात. त्यांनी आदिवाश्यांमधली घोटूल ही संकल्पना शिक्षणात कशी आणता येईल याचा प्रयत्न केला होता. अशी स्पेस ही प्रत्येकाला मिळाली पाहिजे असं मला वाटतं. ती माझ्या गटातील सगळ्यांना मिळाली पाहिजे असं मला वाटतं. आम्ही गटाची बांधणीच अशी केली आहे कि तायांना पण ती शिकण्यासाठी, स्वत: समृध्द होण्यासाठी स्पेस मिळाली पाहिजे. ताया कधी कधी पंधरा पंधरा दिवस सुट्टी मागूनही घेतात वेगळं शिकण्यासाठी. कुठेतरी कंटाळा, साचलेपण येतंय असं जाणणं, ती स्पेस मिळणं खूप महत्त्वाचं आहे. ही आमच्या संस्थेची स्ट्रॆन्ग्थ आहे असं मला वाटतं.

क्षिप्रा: तुझ्या आवडीची पुस्तकं कुठली? आवडते लेखक लेखिका कोणते? वाचनाव्यतिरिक्त कोणते छंद आहेत?

शुभा: कामानिमित्ताने त्या विषयातलं वाचन होतच राहतं पण तो अभ्यास झाला. त्यातनं आनंद मिळाला तरी एक प्रकारचा ताणही असतो. मला उत्तम कथा, कादंब-या वाचायला खूप आवडतं. आत्ताच जी ए कुलकर्ण्यांनी भाषांतरित केलेले ’रान, शिवार आणि गाव’ वाचलं अतिशय छान आहे. अगदी आपल्याला बरोबर घेऊन जातं. हा खरा रिलीफ असतो आपल्याला. आपलं जग आपल्याला विसरायला लावणारं, आपल्याला काहीतरी देणारं, आपल्यात काहीतरी घडवणारं असतं ते खरं साहित्य. स्त्रीवादी साहित्य मला खूप आवडतं. नवीन काही समोर आलं की ताबडतोबीने वाचते. पुन्हापुन्हा देखील वाचते. परवा रीटा वेलिणकर परत वाचलं. साताठ वर्षांपूर्वी वाचलेलं, खूप आवडलेलं पुस्तक. आता चित्रपट आला म्हणून परत काढून वाचलं. इतकं सुंदर आहे की दोन दिवस कसे पाखरासारखे गेले पुस्तक वाचण्यात. पुस्तकं म्हणजे संपत्तीच आहे माझी.

संगीत ऐकायला आवडतं. फारसं समजत नाही, पण ऐकायला आवडतं. चित्र काढायला आवडतं. निसर्ग, निसर्गाच्या सान्निध्यात राहाणं मला खूप आवडतं.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकटं राहाणं. कारण एकटं असताना जसा स्वत: शी संवाद होतो ना तो माणसांच्यात नाही होत. आता तर माझी परिस्थिती अशी आहे कि माणसे सततच आजू बाजूला असतात. त्यामुळे तो अवकाशच मिळत नाही की काय असंच वाटायला लागतं. मला सगळे म्हणतात खूप काळ एकटं राहायला लागलं तर कळेल. पण मला नाही वाटत मला कंटाळा येईल. मला आवडतं एकटं राहायला. माझ्याबरोबर राहायला.

क्षिप्रा: खॆळघराची जी बारा- तेरा वर्षांची वाटचाल आहे त्यात लोकांचे काय अनुभव आले? त्यातले काही सांगण्यासारखे आहेत का? चांगले वाईट दोन्ही प्रकारचे? त्यावेळेला एकदम भावलेले असे...

शुभा: अगदी सुरुवातीच्या काळातील अनुभव जास्त लक्षात राहिले आहेत. कारण आपले पहिलेच अनुभव असतात ते. झोपडवस्तीतलं जग जेव्हा मला पहिल्यांदा दिसलं - तिथलं दैन्य, आजारपणं ती घरं, त्या बायकांची दुरवस्था, त्यांच्या आरोग्याचे झालेले हाल, लांबून पाणी वाहून आणणं, मुलींची कोन्डी हे सगळं बघितल्यावर खूप विषण्ण, अस्वस्थ व्हायला होत असे. आपल्याला सगळी सुखं उपभोगायचा अधिकारच नाहीये, प्रत्येक सुविधेचं अपराधीपण वाटयला लागलं होतं.

हलके हलके जशी मी त्यांच्यात मिसळायला लागले, त्यांच्याशी मैत्री व्हायला लागली तसं ती बोच सवयीची झाली. नंतर जाणवलेल्या काही गोष्टी अश्या होत्या - वस्तीतल्या लोकांचं इतकं स्वागत करणारं किंवा नातं जोडायला उत्सुक असं वागणं होतं. कोणी म्हणेल की याच्यात त्यांचा स्वार्थ होता, असेलही पण ते आतिथ्य, तसा गोडवा हा आपल्या समाजातून हरवून जातो आहे असं मला वाटतं. त्यातल्या त्यात बसा बसा म्हणणं चहा घ्या म्हणणं, त्यातली अनौपचारिकता, समोरच्याला आपलं मानून आपल्या विश्वात समावून घेणं हे मला भावलं. आपली दारं बरेच वेळा बंद असतात. तिथे खूप एक मोकळेपणा असतो. तिथे कम्तुनिटी लाइफ जास्त असतं. दार बंद संस्क्रुती आपल्याकडे !

सुरुवातीच्या काळात मला त्यांच्या जगण्याच्या संदर्भात त्यांच्याकडूनच शिकायचं होतं. त्या बायका वाक्प्रचार सुद्धा इतके वेगवेगळे वापरतात. आम्ही पालक गटाचं नाव झुळूक असं ठेवलं होतं. आम्ही त्यांना एकत्र आणणार, त्यांना उपदेश करणार असं काही न ठेवता त्यांची जी एकत्र येण्याची जागा आहे तिथे जमायचं, दमून काम करून आल्यावर ओट्यावर बसलो की झुळूक आल्यावर कसं बरं वाटतं अशी त्या गटाच्या नावामागची कल्पना होती. तो खूप आनंदाचा काळ होता. आम्ही एकमेकींकडून शिकत होतो. जसं जसं काम वाढलं तसं मला त्यांच्याबरोबर एवढा वेळ देणं शक्य होईनासं झालं. मला असं ही जाणवलं कि, त्यांच्याकडनं आम्हाला गृहित धरणं व्हायला लागलं. तिथे त्यांना ठामपणे सांगायला पण लागलं कि असं गृहित धरून चालणार नाही. शेवटी मी पण एक माणूस आहे. मला जे शक्य आहे तेवढंच मी करीन. असेही अनुभव आले.

खेळघरामध्ये एक महत्त्वाचे म्हणजे, काही घटना घडणं आणि त्यातनं निभावून बाहेर पडणं हे कायम होत रहातं. मुलांनी चो-या करणं, त्यांना आम्ही पोलिसांकडून सोडवून आणणं, मारामा-या, पालकांमधील प्रश्न, दारूमुळे उद्भवणारे प्रश्न, असं सतत काहीतरी चालूच असतं. आता सध्याच असं झालं आहे कि, माझ्याबरोबरीने ताया व इतर लोकही ह्या गोष्टी डील करतात. सगळंच माझ्यापर्यंत येत नाही. आपलं मध्यमवर्गीय आयुष्य कसं एका संथ प्रवाहात चालू असतं. काही खळबळाटाची आपल्याला भीतीच असते. रात्री अकरा वाजता बेल दाबली की मला पोटात गोळा यायचा कि आता काय उभं राहिलं असेल. फोन वाजला अपरात्री तरी भीती वाटायची. हे मध्यमवर्गीय आयुष्य आणि कार्यकर्त्याचं आयुष्य यांचा मेळ घालताना खूप ताणतणाव व्हायचे. घरातल्यांना खूप त्रास व्हायला नको असं वाटायचं. मला जरी सवय झाली असली तरी घरातल्यांना काळजी वाटायची. मग मी ते सारं निपटेपर्यंत त्यांना काही सांगायचीच नाही. आपलं ते जीवनच आहे ह्या गोष्टी होणारच. पण त्यांना त्याचा त्रास नको. सगळं निस्तरल्यावर, त्या त्रासातनं बाहेर पडल्यावर मी त्यांना ते सगळं सांगायची. आता टीम असल्याने व सवय झाल्याने तेवढा ताण पडत नाही. पहिल्यांदा खूपच त्रास होत असे.

मला आठवतं वस्तीतलं एक मोठं भांडण ! २५/३० माणसं जमली होती. खेळघरातील एका मुलावर ते चिडलेले होते. त्याचा भाऊ आला तर त्यालाच धरलं, मारायला लागले. काही कारण नसताना आजूबाजूचे लोकंही त्या मारामारीत सहभागी व्हायला लागले. दोनतीन मुलं तिथे गेली आवाज चढविला, त्याला बाहेर काढलं आणि ते भांडण टाळलं. मी तिथे उभी होते पण मला काहीच करता आलं नाही. माझे पाय कापायला लागले, तोंडातून आवाजच फुटेना. मला कळेना की अश्या गर्दीला कसं समजावणार? दोनतीन मुलांची मारामारी सोडवणे वेगळे पण शंभर लोकांच्या गर्दीला कसे थोपविणार? त्यात ते सगळे पुरुष. मी पडले बाई. मला सगळे तुम्ही आत जा आत जा असंच म्हणायला लागले. ज्या गोष्टी आपण चित्रपटातच बघतो. त्या प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडणं अतिशय धक्कादायक असतं.

क्षिप्रा: आता खेळघर इथपर्यंत आलं आता ते पुढे काय स्वरूप घेईल?

शुभा: खेळघर आणि पालकनीती हे आता गटाचे उपक्रम आहेत. पहिल्यांदा जसे मी निर्णय घेत असे ते आता होणार नाही. खेळघराचे भविष्यातील प्लान्स मात्र आता गटाने ठरवायचे आहेत. ते मी एकटीने करणार नाही. मी एखाद्या उपक्रमात असेन किंवा नाही हे ही मला त्या त्या वेळेस ठरवावे लागेल. मी तरूण लोकां इतके काम करू शकणार नाही. किंवा मला काही वेगळं करायचे असू शकते. तो पूर्ण पणे गटाचा निर्णय असेल. वेळोवेळी जो योग्य निर्णय घ्यावा लागेल तो आम्ही घेऊच. मुख्य म्हणजे त्याच्या मध्यवर्ती जागी राहून उपक्रमाला दिशा देणं अशी माझी महत्त्वाकांक्षाच नाहीये. मला इतकंच करायचं होतं. या उपक्रमाची उत्क्रांती होईल व तो काळानुरूप योग्य ते रूप घेईलच.

क्षिप्रा: मग त्यात काही अडचणी जाणवतात का? गट जमला असला तरी काही प्रश्न आहेत का?
कारण सारेच प्रश्न गट म्हणून सुटू शकत नाहीत.

शुभा: जसं या कामात शिरण्याची एक प्रोसेस होती ना तशीच बाहेर जाण्याचीही एक प्रोसेस आहे. ते ही लगेच होणार नाही. पाच दहा वर्षात हलके हलके मी बाहेर पडेन व नवीन लोकांना त्यात संधी मिळत जाईल. त्यांनी ते काम पुढे न्यायला हवं. मी आहेच की बरोबर, त्रास झाला, काही अडचण आली तर मार्गदर्शन करायला, मदत करायला. मूल्यात्मक काही गोष्टींमध्ये मला असं जाणवलं की काही गोष्टी व्हायला नकोत तर मी सांगेनच. संस्थेची व कामाची फाउंडर मेंबर असल्याने मी ते काम करीनच. पण नेतृत्व करणं हे आता थांबवायलाच हवं. मार्गदर्शनापुरताच आपला रोल मर्यादित ठेवावा.

क्षिप्रा: खेळघराच्या स्ट्र्क्चर बद्दल सांग . बाकीच्या एनजीओज व खेळघर यात खूप फरक आहे. तो स्पष्ट कर.

शुभा: यामागचा मूलभुत विचार हा होता कि इथे आल्यावर मला जशी माझं काम ठरवायची, त्याची दिशा ठरवायची संधी मिळाली तशीच इतरांना मिळाली पाहिजे. नोकरी करणा-या माणसालाही ते स्वातंत्र्य इथे आहे. सगळं कामाचं स्वरूप ठरवून त्याच्यासमोर ठेवलेलं नाही तर त्याने आपले काम इव्हाल्व करायला हवे असे इथे आहे. हे अवघड आहे कारण त्या त्या माणसाच्या कुवतीचा पण ह्यात विचार करायला लागतो. त्यामुळे काही वेळा चौकटी बसवून द्यायला लागतात. पण कामाचे स्वरूपच इतके सृजनशील आहे व आयत्या वेळी सुचेल तसे निर्णय घेण्याचे आहे कि काम करणारी ताई जर तशी नसेल तर तिलाच फार काळ ते जमणार नाही. ते शाळॆसारखे औपचारिक नाही. आम्ही इथे लोकशाही पद्धतीने निर्णय घेण्यावर भर देतो. त्या निर्णय प्रक्रियेतूनही सगळे खूप शिकतात. आम्ही खूप वॆळ चर्चांमध्ये घालवतो, तो ते माणूस तयार होण्यातलाच वेळ आहे असे आम्ही समजतो.

क्षिप्रा: या सगळ्या प्रवासात असं वाटतं का कि काही गोष्टी करायच्या होत्या पण ती वेळ निघून गेली, परत मागे जाउन आपण सुरुवात करू शकणार नाही. असं काही वाटतं का? मनात कुठेतरी एक खंत आहे का कि मनात आलं ते सगळं केलं असं वाटतं?

शुभा: हे बघ, मी आता फक्त ४६ वर्षांची आहे. मला मल्टिपल इंट्रेस्ट्स आहेत. जसं शिक्षण, पालकत्व यात रस आहे तसंच मानसशास्त्रात, समाजशास्त्रात रस आहे. चांगलं साहित्य लिहायचं आहे. पण खंत वगैरे म्हणशील तर तशी काही नाहीये. इतिहास, भूगोल, सोशौलौजी शिकण्यात खूप रस आहे. शास्त्र शाखेची विद्यार्थीनी असल्याने हे विषय फारसे कधी शिकता आले नाहीत. ते शिकून मग मुलांबरोबर काम करायचं आहे अशा अनेक इच्छा आहेत. ते होईल असा विश्वासही आहे. पुढची कितीतरी वर्षे हातात आहेत. मी आमच्या टीमला म्हणतेच आहे की माझ्या वरील व्यवस्थापनाच्या जबाबदा-या कमी करा. नवीन करायला स्पेस हवी आहे.

ऑरगॆनिक शेतीत काम करायचं आहे. त्या त्या वेळी जे आतून वाटेल ते होऊन जाईल. मला नातेसंबंधांबद्दल प्रचंड आकर्षण आहे. त्यातल्या गमती, मजा अनुभवायला मला आवडते.
माणसांना बघून त्यांच्याबद्दल लिहिणं मला खूप आवडतं. ललित लिहायला मी खूप आदर्श माणूस आहे. पण त्यासाठीचा वेळ व स्पेस मिळायलाल पाहिजे. इतर ताण नसले पाहिजेत. होईल पण खंत नाहीये. करेंगे..

क्षिप्रा: हे ’करेंगें’ म्हणजेच तुझा आशावादी दृष्टीकोन आवडला. खेळघराला आणि तुला खूप सा-या शुभेच्छा! धन्यवाद.

थोडी माहीती खेळघराविषयी: खेळघर असे प्रकल्पाचे नाव असते तरी इथे औपचारिक आणि अनौपचारिक असे दोन अभ्यासक्रम आहेत. औपचारिक मध्ये भाषा, गणित, विध्नान या विषयांच्या मूळ संकल्पना मुलांना शिकवल्या जातात. अनौपचारिक मध्ये जाणिवांचा विकास विविध कृति, उपक्रम ह्यातून साधला जातो. इयत्ता १०वी पास होणे आणि खेळघरातील मुलामुलींनी चांगला नागरिक होणे ह्या दोन्ही गोष्टी ह्या अभ्यासक्रमातून साधल्या जातात.
अधिक माहीतीसाठी : http://www.palakneeti.org/khel-home.htm

ही मुलाखत टंकलिखीत करण्यासाठी अश्विनीमामींनी मदत केली त्याबद्द्ल मी त्यांचे आभार मानते.

-क्षिप्रा

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्षिप्रा अतिषय उत्तम मुलाखत. धन्यवाद इथे उपलब्ध करुन दिल्या बद्दल. सुरुवातीचे काही प्रश्न नी त्याची उत्तर हे तर माझ्याच मनाचे हिंदोळे वाटले मला.

क्षिप्रा मुलाखत आवडली.
शुभदा जोशी आणि त्यांच्या कामाची व्यवस्थित कल्पना आली. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

एकदम अश्या गोष्टी होत नाहीत. कुठेतरी आतनं अश्या गोष्टी मूळ धरत असतात. हलके हलके वाटत राहतं आणि मग एक वेळ अशी येते की आपण त्या निर्णयापाशी येतो. आपण काहीतरी करायला लागतो.>>>>> खूप पटलं.

काही दिवसांपूर्वीच शुभदा जोशींसोबत बोलने झाले. एकदम व्यवस्थित माहीती दिली त्यांनी खेळघर संबंधात. पुढील प्लान्स पण मस्त आहेत. त्यांचाशी बोलल्यावर जाणवले की खेळघर सारख्या संस्था सामाजिक सेवा पण 'फ्रँचाइझ" तत्वावर सुरु करता येते हे दाखवून देत आहेत.
पुढील कार्यास शुभेच्छा.

खरोखर अप्रतिम मुलाखत. श्रीमंत करुन गेली. भाषा आणि विचार दोन्ही लख्ख आणि प्रामाणिक. क्षिप्रा, मामी आणि शुभदा ताई - धन्यवाद.
अक्षरशः असं वाटलं की यापुढे काही वाचायला नको, इतकी सुंदर. पुन्हा पुन्हा वाचणार.

ही काही वाक्य सदासर्वदा घर करुन राहतील माझ्या मनात.
हलके हलके वाटत राहतं आणि मग एक वेळ अशी येते की आपण त्या निर्णयापाशी येतो>>
आपल्याला सगळी सुखं उपभोगायचा अधिकारच नाहीये, प्रत्येक सुविधेचं अपराधीपण वाटयला लागलं होतं. >>>
भलेही त्या सांगतात ते कितीही बरोबर असलं तरी ते तुम्ही म्हणताय म्हणून मी नाही करणार जोपर्यंत मला आतून तसं वाटत नाही>>>
लवचिक आणि प्रवाही असंच आपलं आयुष्य असावं असं मला वाटत असे व ते प्रत्यक्षात आले आहे. >>>

आत्ता थोड्यावेळापूर्वी ही मुलाखत वाचली आणि २ वर्षांपूर्वीच्या दिवाळी अंकातला याच संदर्भातला श्री.अरविंद वैद्य यांचा एक लेख 'संवाद - विद्यार्थ्यांशी:शिक्षक-पालकांचा' नजरेस पडला. खूप छान लिहीलाय.

क्षिप्रा अगदी योग्य वेळेस प्रकाशित झाला लेख. तुझे व शुभदाताईंचे अभिनंदन. उपक्रमास शुभेच्छा.

खूप छान मुलाखत. खेळघरबद्दल बरंच ऐकलं होतं. छान माहिती मिळाली. शुभाताईंचं व्यक्तिमत्वही आवडलं.

सुंदर मुलाखत.. Happy

वर मुलाखतीत उल्लेख झालेल्या लीलाताई पाटील म्हणजे ना. सी. फडक्यांच्या कन्या (बहुतेक). त्यांनी एकंदर शिक्षणपद्धतीबद्दल लिहिलेला एक थोर दीर्घलेख दोन वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात वाचला होता...

फार छान मुलाखत. त्यांच्या कामाचं , वाटचालीचं तर कौतुक आहेच , पण स्वतःविषयी अगदी प्रामाणिकपण बोलल्या आहेत ते जास्त भावलं. अनेकदा समाजोपयोगी काम करणार्‍यांच्या बोलण्यात 'मी' पणा भरलेला असतो. ते अजिबात नाहीये, इतरांच्या योगदानाची नुसती जाणीवच नाहीये, तर आपल्याबरोबर इतरांनाही समृद्ध करण्याचा कटाक्षाने प्रयत्न आहे. ही वृत्ती अभावाने आढळते, म्हणून फारच हृद्य!

क्षिप्रा अन अश्विनीमामी - वेळात वेळ काढून एवढी सुरेख मुलाखत घेतल्याबद्दल आभार!

क्षिप्रा मुलाखत खूप आवडली. रैना म्हणते तसं पुन्हा एकदा वाचावी लागणार. मला सगळ्यात आवडलं ते शुभदा जोशींचं स्वत:च्या projects बद्दल इतक्या जिव्हाळ्याने आणि त्या सगळ्या गोष्टीं पासून दूर जातांना तितक्याच शांतपणे आणि समाधानाने त्या बद्दलचं बोलणं.

छान झालीये मुलाखत. ह्यांच्याविषयी आरतीकडून ऐकले होते. पण इतके डिटेल्स माहिती नव्हते. धन्यवाद क्षिप्रा.