ओन्ली फॉर यू!

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

एखादं अनपेक्षित आंदण मिळताना होतो तितकाच आनंद असंच एखादं देताना पण होतो.
कुणाला तरी ते मिळाल्यावर होणार्‍या आनंदामुळं कदाचित त्यापेक्षा जास्तच खरंतर.
जसजसं वय वाढतं तसं मग या आनंदसोहळ्यात व्यवहारीपणा येत जातो. त्यांनी इतक्याचं दिलं होतं मग आपण पण..
वगैरे गोष्टी चूक असतील असं म्हणायचं नाही मला पण मग त्यातून गम्मत निघून जाऊन उरतं केवळ करून टाकण्याचं
कर्म. मग घेणार्‍याचा किंवा आपला कुणाचाच चॉईस महत्वाचा नसतो. मागचा रेफरन्स घेऊन आपली फूटपट्टी लाऊन जे
उत्तर येतं ते बॉक्समधे ठेऊन छानशा कागदात गुंडाळून वर शुभेच्छा पत्र चिकटवून ते कुणाच्या तरी हातातून
माळ्यावर किंवा परस्पर दुसर्‍या कुठल्या तरी हातात पोचतं.
बरं या भेटी घ्यायला पैसा फार लागतो असं नाही. ज्याला द्यायची त्याची आवड महत्वाची.
परवा ऑफिसातून येताना सोसायटीच्या आवारातल्या बेंचवर थोडा वेळ टेकून मैत्रिणींशी गप्पा मारत होते. अशा वेळच्या
ड्रेस, दागिने, फुटवेयर, रेसिप्या या अति रसाळ गप्पांमधे सहज मैत्रिणीच्या हाताकडं लक्ष गेलं. किती सुंदर बांगडी
आहे गं? कुठून आणलीस? म्हटल्यावर त्याकडं दुर्लक्ष करून अगं मी माहेरी जाऊन आले ते विचार की म्हणून तिनं विषय
बदलला. मी पण विसरले गप्पांच्या नादात. निघायला उठले तर सहज हात हातात घेत सखीनं बांगडी माझ्या हातात
सारली. मी बोलायच्या आत म्हणाली आपण दोन कुठं घालतो गं? असू दे एक तुझ्याकडं एक माझ्याकडं.
आता या बांगडीला किती जपू?
माणूस वयानं कितीही मोठा झाला तरी एखादं आंदण त्याला हवंसं वाटतंच. फक्त भौतिक भेटींची ओढ कमी झाली की
माणसांच्या आणि 'त्या' च्या भेटींची गोडी लागते. एखादं दूर रहाणारं नातवंड अचानक आलं, जुन्या वाड्यात रहाणारे
शेजारी भेटले(तेंव्हा नळावरच्या पाण्यावरून लढाया आणि तह होत असले तरी) की काय उल्हास येतो. इतकं छान सरप्राईझ
काय असणार पल्याड दृष्टी लागलेल्याला?
हेच लहानपणी वस्तूची किम्मत वगैरे समजत नसते. तेंव्हा फक्त आपल्यासाठी काहीतरी आणलंय हेच खूप असतं.
ते लहान जीव घरातलं, मोठ्यांच्या आयुष्यातलं आपलं अस्तित्व किती महत्वाचं ते त्यावरून जोखत असतील बहुधा.
तुझ्यासाठी गम्मत आणलीय म्हटलं की गम्मत काय हे कळण्यापूर्वीच डोळे कसे चमकतात पाहिलंत?
अर्थात ती आणली एवढंच महत्वाचं. पाच मिनीटात त्यातलं स्वारस्य संपलं तर आश्चर्य काय? त्यांची दुनियाच
क्षणाक्षणाला बदलणारी. बदलत नाहीत ते बंध, वस्तू क्षणभंगूर.
वाढदिवस तर अशा भेटी गोळा करायचा हक्काचा दिवस.
लहानपणी मत्रिणींचे वाढदिवस म्हणजे ठरलेलं बजेट असायचं. ते सगळ्यांना माहितही असायचं.
मग ज्या दिवशी पार्टी असेल त्या दिवशीच खरेदी व्हायची. शक्यतो त्या बजेटमधे कानातली बसायची. त्यावेळी
'खड्याचे कानातले' ही फार मानाची गिफ्ट असायची. खास मैत्रिणींचं बजेट थोडं जास्त असल्यामुळं खड्यांचा सेट
हे अजून भारी. मग कुठल्याही समारंभात तो सेट म्याच होतोय की नाही हे न पहाताच घालायची हौस असायची.
(आता विचार केला की वाटतं तो तसला जास्तच चमकणारा खड्यांचा सेट फ्रॉक, स्कर्ट, शरारा,मॅक्सी(कुठल्याही रंगाचे)
यापैकी कशावरही घातल्यावर चांगलंच ध्यान दिसत असणार. )
एका मैत्रिणीच्या वाढदिवसाला तर तिच्या आईनं तिच्या सगळ्या गिफ्ट्स टेबलवर रुखवत मांडावा तशा
मांडलेल्या. ते पाहून तेंव्हा आम्हाला हसू आवरलं नव्हतं.
पण आई आणि पपा आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींकडून मात्र कधी कंपास बॉक्स, रंगपेट्या आणि बहुतेकदा पुस्तकं मिळणं
ठरलेलं. आणि ते आवडायचंही. जादूचा घोडा, हिमगौरी वगैरे नावं उच्चारली तरी अजून ते राक्षसाचे महाल,
राजकन्येची गच्ची(की ग्यालरी?) किंवा जंगलातली टेबलावर भरगच्च फळफळावळ असलेली झोपडी अशी
काळीपांढरी चित्रं लक्ख आठवतात. मग पुढं कुतुहल वगैरेंसारखी शास्त्रीय गमतीजमतीवरची,
रशियन प्रदर्शनातली सुरेख गुळगुळीत बांधणीची रशियन लोककथा, परिकथांची पुस्तकं पण मिळालेली
आठवतात.
आज आमच्या बबूकडं अट्ठावीस कुत्री आणि त्रेचाळीस टेडी बियर्स आहेत असली वाक्यं ऐकली आणि त्यातल्या एकाकडंही
ढुंकून न पहाणारं पोर पाहिलं की आपल्यावेळी एकूणच भेटींचं किती अप्रूप होतं हे आठवतं.
आणि अशा गोष्टी पानं गळली, खडे पडले, हात तुटले,टक्कल पडलं(शेवटचे दोन बाहुल्यांबद्दलचे आहेत मालकांबद्दलचे नाहीत)
तरी जास्त जास्तच मौल्यवान होत जायच्या.
वय वाढायला लागलं तसं ज्याला द्यायचं त्याला बरेच दिवसांपासून एखादी गोष्ट घ्यायची मनात आहे का याचे विचार
करून वस्तू ठरायला लागल्या. त्याबरोबर ग्रीटींग्स आली. फुलं आली. सर्प्राईज पार्ट्या आल्या. पसारा आणि खर्च वाढत गेला
तसा मग काही वर्षांनी ओसरत पण गेला.
नाती आवडीतून कर्तव्यात आली आणि भेटवस्तूही.
ब्लाऊज पीस आणि आहेराच्या साड्या हे तर एक स्वतंत्र प्रकरण आहे आणि एका मोठ्या मार्केटींग रॅकेटचा भाग आहे.
त्या साड्या आणि त्या पीसेसचे ब्लाऊज शिवून कुणी वापरलेले मला माहित नाहीत. ते तसेच कुठेतरी ठेऊन मग लागेल तेंव्हा
इतरांचा गळ्यात मारले जातात गरजेप्रमणं.
आजही मी दूरच्या का होईना समारभाला साडी, लेमन सेट, वॉलक्लॉक किंवा कुठलंही सौंदर्य नसलेले शोपीस असल्या
वस्तू देणं टाळते. माणसं या वस्तू का देतात हे जसं मला आजवर कळलं नाही तसंच लेमन सेट नक्की कोण वापरतं
हेही.
तरीही कुणीतरी आपल्याला डोक्यात ठेवून स्वतःचा मूल्यवान पैसा आणि अमूल्य वेळ खर्च करून काहीतरी आणतंय यात सगळं
भरून निघतं. गिफ्ट रॅप उघडणार्‍या प्रत्येक माणसाचं वय सारखंच असतं.
आणि पावती मिळते ती त्या वस्तूच्या किमतीची नव्हे तर आपण हवेसे आहोत या जाणिवेची.

आणि अशा हव्याशा वाटणार्‍या भेटीत ही भेट कशी विसरता येईल?

गालांवर जी लाली चढली,
ओठांवरही उडे जराशी.
काय दिले अन त्याने आंदण,
सखी कुजबुजे कानापाशी.

विषय: 
प्रकार: 

मस्तच लिहिलेस, शेवट तर एकदम सुरेखच... Happy
तुझ्या लिखाणाची एकदम पंखा झालेय बघ मी!! Happy

सन्मि, सुरेख.. ! काय जबरदस्त लिहिलंयस!!

टक्ल्या बाहुल्या आणि खड्यांच्या सेटला अहुमोदन Happy अगदी अगदी काही काही वेळा काही काही गोष्टी अगदी सारख्याच असतात नाई का?

सध्या माझी भेटवस्तूंची खरेदी चालुये आणि मी अगदी नावं आठवून आठवून वस्तू घेतीये, त्यात परत ही वस्तू वापरली गेलीच पाहिजे अशी अट आहेच

आपण विचार करतोच भेट देताना Happy आपल्याला भेट देणा-यांनाही देव अशी बुद्धी देवो :D

छान आहे संवाद. Only For You. काव्यमय शेवटही सुरेख. भेटवस्तू उघडून बघण्याचा आनंद काही निराळाच असतो.

सहज आणि तंतोतंत पटेल असं लिहिलं आहेस,आवडलं..

सन्मे! छान लिहतेस्.. आतल मनातल लिहतेस असच वाटत... बाकी ते साड्या वाटपच्या बाबतित अगदी सहमत..

गिफ्ट रॅप उघडणार्‍या प्रत्येक माणसाचं वय सारखंच असतं.
>Perfect!! मस्त गं, सही लिहिलेय! खड्याचे सेट वगैरे तर अगदी अगदी Happy

सन्मे,
कित्ती सुरेख लिहिलस ग !!! मला नेहमीच आवडतं तुझे लिखाण. कुठल्याही लिखाणाचा शेवट करण्याच्या स्टाईल पे तो अपुन फिदा है बॉस. अशीच लिहित राहा.
आई ग, आहेराच्या साड्या प्रकाराबद्दल मला पण फार राग आहे. माझ्या लग्नात मम्मीला मी तो प्रकार अगदी आवर्जुन टाळायला सांगितला.
बाकी लहानपणच्या गिफ्ट्स बद्दल एकदम झकास लिहिलय.
कोणासाठी गिफ्ट घेताना यापुढे तू नक्कीच आठवशील.

-प्रिन्सेस...

खड्याचा सेट, टकली बाहुली, गिफ्ट रॅप उघडणार्‍याचं वय... वा वा क्या बात है!!
सन्मे मस्त मस्त लिहितेयस..

फारच छान लिहिलं आहेस सन्मी Happy
लहान मुलांना गम्मत 'काय' आहे पेक्षा ती 'कोणी' आणली हे खूप महत्त्वाचं असतं गं.. त्यावरून ते माणसं ओळखतात Happy

खरंच, कोणत्याही वयात, पण 'गम्मत' मिळणं म्हणजे गम्मतच असते! मस्त लिहिलंस Happy

सुरेखच लिहिले आहे.
कोणीतरी आपल्यासाठी खास काही आणले आहे, ही भावनाच कशी शिरशिरी आणुन जाते ना? तीच शिरशिरी उठली अंगावर हे वाचताना.

मस्तच लिहिलयस गं. नेहमीच छान लिहितेस. रोजच्या जीवनातले विषय असतात तुझ्या लिखाणाचे पण त्याना तरलपणे फुलवायचं सामर्थ्य नक्कीच आहे तुझ्या लेखणीत.
गिफ्ट रॅप उघडणार्‍या प्रत्येक माणसाचं वय सारखंच असतं - हे खूप आवडलं.
लिहीत रहा.

संघमित्रा,
गिफ्ट रॅप उघडताना जसा आनंद होतो तसाच आनंद तुझे नवीन लिखाण वाचायला उघडले तेव्हा झाला.
माझ्याप्रमाणे इतर मायबोलीकरांना पण ही "खास आमच्यासाठी" असलेली अक्षर भेट आवडली असणार.
-अनिता

सन्मे, एकदम सुरेख लिहिलंय. खूप आवडल.

खड्याचे कानातले, टकल्या बाहुल्या, गिफ्ट रॅप उघडणार्‍याचं वय सगळं अगदी सेम टू सेम आमचंच बालपण. :))

माझ्या मुलीच्या बारशाला आईला तिच्या लांबच्या भाचीने एक साडी दिली आणि वर तिला सांगते, "मामी, ही साडी मला झब्बू म्हणून मिळालीये, तू पण कोणाला तरी झब्बू देऊन टाक". आमची आई अवाक्!
त्यामुळेच की काय माहीत नाही पण जवळच्या नातेवाईकांना, मित्र मैत्रीणींना प्रसंगी विचारायची सवयच लागलीये तुला काय हवंय ते सां नाहीतर आम्ही कॅशच देणार.

मस्तच लिहिलंयस सन्मे!!

सगळे observations एकदम बरोबर आहेत.
आवडत्या माणसाकडुन हवी ती भेट मिळणे या सारखी आनंदाची गोष्ट नाही.

वाटत की अरे हीला आपल्या मनातल कस काय कळत? Happy

छानच सुरु आहे.

गिफ्ट रॅप उघडणार्‍या प्रत्येक माणसाचं वय सारखंच असतं>>>
खरंय Happy
मी हळूहळू पंखा झालीय बरं तुझी..एकामागोमाग सगळे लेख वाचतेय Happy

अरे हे जुने लेख कुणी वाचतंय अजून. एक फूल आणि सांजसंध्या, माझ्यासाठि सर्प्राईझ गिफ्टस आहेत तुमच्या कमेंटस Happy

गिफ्ट रॅप उघडणार्‍या प्रत्येक माणसाचं वय सारखंच असतं.
आणि पावती मिळते ती त्या वस्तूच्या किमतीची नव्हे तर आपण हवेसे आहोत या जाणिवेची

अगदी खरं..... सुंदर लेख. Happy

मस्त सन्मि .. छान लिहिल आहेस. Happy टक्कल पडलेल्या बाहूलीच अगदी खरं..
आमच पण बजेट असायच लहानपणी.. सगळ्यांचे मिळून १०० रुपये. आता मात्र गिफ्ट कार्डस बरी वाटतात.. लोकांकडे सगळच खूप असत आजकाल..

Pages