कितीसा..!

Submitted by मी अभिजीत on 11 March, 2008 - 08:29

सोडून सावलीला पळणार मी कितीसा ?
केले तुला वजा तर उरणार मी कितीसा..!

स्वप्नातले उखाणे होते अजून बाकी,
जागेपणी खुलासा करणार मी कितीसा..

कोमेजतो कधी का निवडुंग कुंपणाचा,
फुललो जराजरासा, गळणार मी कितीसा..

घालून मी मुखवटे फ़िरतो जगात वेड्या,
पाहून चेहरा हा कळणार मी कितीसा..

साथीस कृष्ण नाही गीता कथावयाला,
वारस धनंजयाचा लढणार मी कितीसा..

सारे तुझ्या जगाचे पाळीन कायदे पण,
"अभिजित" वेगळा मग ठरणार मी कितीसा..!

- अभिजीत दाते

(नेहमीप्रमाणेच मार्गदर्शन अपेक्षित..!)

गुलमोहर: 

स्वप्नातले उखाणे होते अजून बाकी,
जागेपणी खुलासा करणार मी कितीसा..

कोमेजतो कधी का निवडुंग कुंपणाचा,
फुललो जराजरासा, गळणार मी कितीसा..

हे शेर खुप आवड्ले...........मस्त गझल

Pages