समज गैरसमज

Submitted by नानबा on 30 January, 2010 - 11:55

कधी कधी स्वतःच्याही नकळत आपण मानापमानाच्या कल्पनेत कधी अडकतो ते कळत नाही. आपला अहंकार कधी कारणीभूत होतो, कधी 'अतिपरिचयात अवज्ञा' अशी अवस्था झाल्यानं, कधी आपण समोरच्याला गृहित धरल्यानं, तर कधी आपलं एखाद्या व्यक्तीवरचं अतिव प्रेम ह्याला कारण ठरतं! मग ह्या सगळ्यातून झालेले समज-गैरसमज आणि नात्याचं कोमेजणं!
'दोन गरीब' हा लेख लिहिल्यानं माझ्या फायद्याच्या अनेक गोष्टी झाल्या! एकतर 'बबई' लोकांपर्यंत पोहोचवता आल्या. अनेक ओळखीच्या लोकांनी, जुन्या मित्र मैत्रिणींनी "तुझ्यामुळे बबईची आठवण आली" असं म्हणून बबईंच्या आठवणी सांगितल्या. ह्या व्यतिरिक्त एक एकदम मोठ्ठा फायदा झालाय माझा. काय? माझी हरवलेली एक मैत्रिण ह्या लेखाचा परिणाम म्हणून मला परत मिळालीये!

-----------------------------------
सोनू आणि मी पाचवी पासून एका वर्गात. दिसायला आम्ही दोघी साधारण सारख्या - घारे डोळे, छोटे केस, त्वचेचा रंग - सगळं एकदम मॅचिंग. हळूहळू कन्याशाळेतल्या मधल्या चौकात बसून टवाळक्या करण्यात आमचा दोघिंचाही वेळ छान जायला लागला - ह्या टवाळक्यांबरोबरच उलगडत गेली ती आमची मैत्री. मग, सोनूचं घर शाळेच्या वाटेवर नसल्यानं मी उलटा रस्ता पकडून शाळेत जायला लागले. शाळेबाहेरही आम्ही एकमेकींच्या घरी 'पडिक' रहायला लागलो. वर्गामध्ये टवाळक्या करणे-अखंड बडबड करणे- विमानं करून उडवणे- तास चालू असताना डबा खाणे - ह्या आणि अशा विविध कारणाकरता शिक्षा खाणे (माझ्या आजूबाजूला न बघण्यानं- शिक्षा खाण्यात माझा वाटा सिंहाचा असायचा!)- हे सगळं सगळं नियमित व्हायला लागलं. पण ही मैत्री फक्त 'टवाळक्या' करण्यापूरती राहिली नाही - जास्त खोल झाली. आमच्या सतत एकत्र असण्यानं का सारखं दिसण्यानं माहित नाही, पण शाळेतल्या बर्‍याच मुली आम्हाला बहिणी समजायला लागल्या. मग आम्हीही 'आम्ही मावसबहिणी आहोत' अशा थापा मारायला लागलो.
बघता बघता दहावी झाली आणि मग मात्र आम्ही वेगवेगळ्या ब्रॅचेस ना गेल्यानं आमचे रस्ते जरासे वेगळे झाले. एकदा जवळजवळ दोन आठवडे वगैरे आम्हाला भेटायलाच जमलं नाही - आणि अचानक सोनू कॉलेजमध्येच भेटली! कित्ती आनंद झालेला मला! मग कळलं की कॉलेज सुटल्यानंतर पडिक रहाण्यासारखं एकमेव ठिकाण आहे - ते म्हणजे सोनूची गल्ली. ह्यावेळेस पर्यंत आमच्या 'दोघिंच्याच असणार्‍या' गृपमध्ये वर्षा नावाच्या एका सेम प्रोफाईल (अमर्याद टवाळक्या करण्याची ताकद) मैत्रिणीची पण भर पडली. मग दररोज संध्याकाळी वर्षीच्या कट्ट्यावर बसून गप्पा - वडापाव/रस्त्यावरच्या कुल्फ्या हाणणे - रुद्र शिकायला जाणे - असल्या सगळ्या गोष्टी सुरु झाल्या.
बारावीही संपली तशी मी गावाबाहेर पडले. मग फक्त सुट्यात भेटणं! अशाच एका सुट्टीत मला माझ्या आणखीन एका मैत्रीणीबरोबर जात असताना सोनू भेटली. तोपर्यंत (माझ्या माहितीप्रमाणे) त्या दोघींची एकमेकिंशी फक्त तोंडओळख. आत्ता मात्र त्यांच्या आपापसात गप्पा सुरू झाल्या - थोड्याच वेळात मला कळलं की त्यांच्यात जे काही कॉमन होतं - मी त्याचा पार्ट नाहिये. त्यांना जे खूप मॅटर करत ते मला माहितही नाहिये. आत तुटल्यासारखं झालं. खूप वेळ खूप वाईट वाटल्यानंतर मी धिरोदत्तपणे (:D आता हसायला येतंय!) त्याला सामोरं जायचं ठरवलं. मग मी स्वतःला डिटॅच केलं सोनू बद्दलच्या विचारातून. हळूहळू जमलंच ते. मनात कुठेतरी 'व्हॉट इट कुड हॅव बीन'- आणि 'व्हॉट इट इज' ची तुलना व्हायचीच (होतेच). वाईट वाटायचच. पण ,मग कळेकळेपर्यंत मी आणि सोनू ज्या 'हाय्-बाय' गटात गेलो ते परवा बबईच्या लेखानंतरच बाहेर पडलो.
बबईचा लेख वाचल्यानंतर सोनू जीटॉकवर भेटली.. तिला बबईंबद्दलचा लेख वाचून भरून आलेलं - आम्ही दोघीही खूप दिवसांनी 'बबई' ह्या कॉमन प्रतलावर आलो. बबईंच्या आठवणीतून गाडी इतर आठवणींकडे कधी वळली हे आम्हाला कळलंच नाही - आणि मग एकएक करत एकत्र घालवलेले ८ *३६५ दिवस आठवले. (तिलाही ते सगळं आठवतय!) मी वर लिहिलेल्या गोष्टींबद्दल सोनूला कधीच काही बोलले नसते (अहंकार?) - पण somehow सोनूनच विषय काढला. मी वरती एका तिसर्‍या मैत्रिणीचा इन्सिडन्स सांगितला ना, तसाच एक इन्सिडन्स तिनंपण सांगितला. फक्त भूमिका बदलून. मी आश्चर्यचकित! म्हणजे मला जे हिच्याबद्दल वाटायचं तेच तिलाही माझ्या बद्दल वाटायचं! आम्ही विनाकारणच आता 'दुसरीला आपली तेवढी गरज नाही कारण तिला नवीन मैत्रिणी मिळाल्यात' असे समज करून घेतलेले! आणि हिंदी पिक्चरमधल्या गैरसमजामागे जसा मूर्खपणा असतो त्या तोडीचा मूर्ख पणा केलेला!
----------------------------------------------
त्यादिवशी बरेच तास बोलून आम्ही आमचे समज-गैरसमज पडताळून पाहिले. पूर्वी न बोललेल्या खूप गोष्टी कळल्या. जेव्हा एकत्र होतो - तेव्हा आम्हाला एकमेकिंबद्दल काय वाटायचं हे बोलायची गरजच नव्हती पडली कधी. आम्ही एकमेकिंच असणं गृहित धरलेलं. ह्या गृहितकाला तडा गेला तेव्हा 'तडा' खरच गेलाय का - ह्याची आम्ही शहानिशा करून घेतली नाही - कदाचित आमचा अंहकार आडवा आला - किंवा जुन्या हिंदी चित्रपटात नसायचं का की 'सगळे एकमेकांकरता त्याग करताहेत' - मग तो त्याग समोरच्या माणसाला हवाय की नकोय हे फक्त चित्रपट संपताना कळायचं- मग सगळ्ळं सगळ्ळं ठीक व्ह्यायचं.
तशा थाटात आम्ही दोघी 'त्याग (!?)' करून बसलेलो.
असो, आता गैरसमज दूर झाल्यानं आम्ही दोघिही 'फिंगर्स क्रॉस' करून बसलोय की चित्रपटाचा भाग दोन सुरू होईल. अर्थात गेलेल्या काळाची किम्मत देऊनच आम्हाला पुढे जायला लागणारे! 'जस्सच्या तस्सं' कदाचित नाही होणार - पण एक नविन नातं तयार झालेलंही आवडेल आम्हाला!
-------------------------
तुमची अशी कुठली हरवलेली मैत्री, हरवलेलं प्रेम, गैरसमजामुळे दूर गेलेले नातेवाईक नाहियेत ना?
असतील तर माझे अनुभवाचे बोल ऐका - एकदा "आपले गैरसमज खरे आहेत का" हे पडताळून पहा. गैरसमज खरे असतील तरी ते आजच्या कॉन्टेक्स्ट मधे तेवढेच व्हॅल्युएबल आहेत का ह्याची खात्री करून घ्या. विश्वास ठेवा - IT IS WORTH IT!

गुलमोहर: 

माझी एक चित्तरकथा.....

माझा एक जुन्या काळातील मित्र होता. त्याचे प्रेमलग्न झाले. त्याची बायको खुपच हुशार होती. आमच्या गृप मध्ये मिसळुन गेली. लग्नाला घरुन पाठिंबा नव्हता त्यामुळे आर्थिक बाजि मित्रांनीच साथ दिली. कधी हिशेब ठेवले नाही. मग लग्नानंतर त्या दोधांना चांगली संधी मिळाली... पैस अही खुप कमावला... पण मग ती बदलली..तो तर तिच्याच आहारी गेलेला... मग ७००, ९००, ५००० रुपये अश्या किरकोळ रकमांवरुन ती आमच्या गृप्मधील मित्रांना फोन करु लागली...मित्रांच्या बायकांना पैसे परत करा म्हणुन फोन करु लागली... अश्याने मित्र दुखावले... ज्याला कधी न मोजता पाकिटातुन पैसे दिले, त्याच्या बायकोने आपल्या बायकोला हजार पाचशे साठी फोन करावे हे पटले नाही.... मित्र दुखावले! अन दुरावले!

मला एकदा ती घाईत होती म्हणुन बॅन्केत ११, ५००/- डिपॉसिट कर म्हणाली. अन बॅन्क अकाउंट नंबर देण्यासाठी अगोदर च्या एटीएम ची स्लिप हाती देउ लागली. पण लगेच स्लिप मधुन बॅलन्स ची रक्कम असणारा भाग कापला अन नंबर माझ्या हाती दिला.... मल ऊगाच वाईट वाटले..... मी काही तिला पैसे मागणार नव्हतो! (माझ्या घरी कामावरचे लोक पण आमच्या पेटीत किती रक्कम आहे हे जाणुन असत- वडिल बॅन्केत कधी गेले, किती पैसे ठेवले हे ही काहींना माहिती असे पण- कधीच चोरी झाली नाही, त्यांना हवे असले अन वडिल घरी नसले, कि आईला सांगत कि पेटीत पैसे आहेत, मला द्या त्यातले, नंतर मालकाला सांगु... वडिल नोकरीला असताना, बॅन्केतुन पैसे आणायला बरेचदा शाळेचा शिपायी जाई, (बर्‍याच शिक्षकांचे पैसे एकदाच एकच शिपायी घेउन येत असे).... कुणाकडे किती पैसे शिल्लकीत आहेत हे पण त्याला माहिती होत असे..... )
मग मी तिचे पैसे बॅन्केत भ्रायला उशीरच केला..... तिने माझ्या बायकोला फोन केले.....दोन तीन फोन झाले..... मग मी पैसे बॅन्केत भरले..अन शेवटची मेल केली.......पैसे भरलेत, पुन्हा उत्तर नको आहे! मित्राने पण कधी संपर्क केला नाही........ ते खुप पैसेवाले झालेत. २० लाखाचा बंगला बांधलाय म्हणे..... बातम्या कळतात पण संपर्क नाही......

ह्याला आता दीड दोन वर्षे झाली! नो संपर्क! एखादा माणुस माझ्या डोक्यात गेला कि संपले, मी पुन्हा संपर्क करीत नाही! तो पंतप्रधान झाला तरी मला काही सुख दुख नाही!

माझ्या एका जवळच्या मित्राला मी बरोब्बर २६ वर्षांनी प्रथम भेटलो! २६ वर्षात, पत्र सुद्धा नाही. (त्या २६ वर्षात, इन्टरनेट नव्हते, फोन करणे म्हणजे अजिबात माहितच नव्हते. ) पण ओळखले त्याला मी व मी त्याला. नंतर देवदयेने भारतवार्‍या झाल्या, इतर मित्र भेटले, असेच २५ वर्षांनी. आता आमच्या आयुष्यात अगदी जमीन अस्मानाचे फरक. माझे भारतातले मित्र, एक जण रिलायन्स चा व्हाईस प्रेसीडेंट, एक कुणा कं चा मॅनेजिंग डायरेक्टर, तर मी नुसती अमेरिकेत धमाल केली, साधा मॅनेजर होतो, पण जगप्रवास केला होता एव्हढेच.

पण आता आमचे अगदी मस्त जमते, कुठलेहि गैरसमज नाहीत. गप्पा तर लग्गेच चालू होतात, विषय लागतच नाही! माझ्या अमेरिकेतल्या गप्पा त्यांना फार आवडतात, त्यांना अतिशय आश्चर्य वाटते की माझ्यासारख्या येडपटाने अमेरिकेत कसे बस्तान बसवले. त्यांना काय माहित, येडपट आहे, म्हणूनच अमेरिकेत आलो, नि म्हणूनच इथे बस्तान बसले. भारतात वाट लागली असती!! त्यांच्याच ऑफिसात प्यून बनून रहायची वेळ आली असती!

<ज्यांना मैत्रीत स्टेटसचा विचार येतो>

हे अत्यंत खरे आहे. देश न सोडता, वारंवार भेटूनहि, ते नेहेमी जाणवून देतात की त्यांचे स्टेटस माझ्या हून वेगळे, वरचे आहे. त्यांच्या गप्पा अश्या की मी त्यात सहभागीच होऊ शकत नाही, झालो तरी कुणि लक्ष देत नाही.
तसे हे भारतातले मित्र नाहीत. जुनी ओळख ठेवतात. मायबोलीकर वेगळेच. माझ्या पेक्षा कितीतरी हुषार नि कर्तबगार,गुणी माणसे असूनहि त्यांच्या मेळाव्यात मला त्यांच्यात सामावून घेतात. नेहेमीच अगदी छान वाटते. तसे मी ऑस्ट्रेलिया, पुणे, मुंबई, कॅलिफोर्निया, नि अर्थात या किनार्‍यावरील बर्‍याच मायबोलीकरांना प्रत्यक्ष भेटलो आहे. नेहेमीच आनंद होतो!

काय लेख आहे नानबा! ग्रेट गं बाई तू आणि तुझी मैत्रीण... आणि अर्थातच सगळे प्रतिसादक...छान लिहिता मंडळी, तुम्ही सगळेच...अनेक वर्ष मी मराठीतल्या एका उत्तम साहित्यिक खजिन्याला मुकले होते, ह्याचे वाईट वाटतेय आता...पण म्हणतात ना, better late than never! happy to be a part of it now atleast !

माझीही अशीच एक अत्यंत प्रिय मैत्रीण. हरवलेली आणि पुन्हा सापडलेली. मोठी गम्मत आहे. तुझ्याकडून प्रेरणा घेऊन आता मी तिची किस्सा लिहिणार आहे. Happy लिहून झाला की इकडे त्याची रिक्षा फिरवेन...चालेल ना तुला? Happy

खरतर आपण मुली मैत्रिणींबद्दल फार हळव्या असतो..... आणि आपणच आपली काहीबाही गृहितके मांडत बसतो....
माझ्या लहानपणापासुनच्या एका मैत्रिणीचे आम्ही कॉलेजात आल्याबरोबर एका मुलासमवेत जमले... आणि मला ज्या दिवशी ते कळले त्यानंतरचे खुप दिवस मी उगीचच अस्वस्थ होते.... आता ही आपल्याला दुरावणार या विचाराने.... जेंन्व्हा जेंव्हा मी तिच्याबरोबर असायचे तेंव्हा तेंव्हा असेच वाटत रहायचे की आता तिला त्याला भेटायला जायचे असेल का? त्यांचा काही प्लॅन असेल का? मी कबाबमे हड्डी तर नाहीये ना?
आणि हे सगळे माझ्या माझ्या मनाचेच खेळ चाललेले असायचे!

मी तर माझ्या मैत्रिणींबद्दल फारच पझेसिव्ह असायचे....

या सगळ्या प्रकाराला माझा नवरा "बायॉलॉजी" म्हणतो Wink

ए नानबा,
तेरे को क्या भी नही, तो मेरे को क्या?
आ गयी मेरी रिक्षा, बोल बैठती क्या? Lol
http://www.maayboli.com/node/16193

मंजिरी, बघ मी हा धागा परत वर आणते आहे. कित्ती चांगली आहे ना, मी? Wink

नानबा, इगो नावाचं भूत चांगलचं उतरवलंस या निमित्ताने...

उतारा चांगलाच होता Wink ... प्रत्येकाच्या आयुष्यात असे गैरसमज आहेत ...

नानबा, इगो नावाचं भूत चांगलचं उतरवलंस या निमित्ताने...
दिवसेंदिवस गैरसमज वाढत आहेत,तसे लोकही वाढत आहेत,याचा खरच गंभीरपणे विचार झाला पाहिजे ...

Pages