प्रेरणा: नानबा यांचा "समज गैरसमज " हा दुरावलेल्या आणि पुन्हा भेटलेल्या मैत्रिणीविषयीचा लेख -
http://www.maayboli.com/node/13719
(मैत्रिणींची नावे बदलून लिहिली आहेत)
माझीही अशीच एक अत्यंत प्रिय मैत्रीण...बागेश्री. जिच्यापासून मी दुरावले... पण फरक इतकाच, की आमचा दुरावा गैरसमजातून नाही तर तीच शाळा सोडून गेल्यामुळे निर्माण झालेला. एकाच शाळेत बरीच वर्ष असूनसुद्धा जी मैत्री होऊ शकली नव्हती ती शिक्षकांनी उंचीप्रमाणे बेंचेसवर जागा अॅलॉट केल्यामुळे जुळली.
आमच्या शाळेत दर वर्षी कधी दर दोन वर्षांनी आमच्या तुकड्या बदलायच्या. सगळ्याच शाळेत असं घडतं की नाही ते माहीती नाही, पण हा एक फारच वाईट असा पायंडा आमच्या शाळेत तरी पडलेला होता. त्यामुळे व्हायचं काय, की आपलं नशिब बलवत्तर असेल तरच आपली मैत्रिण आपल्या वर्गात, नाहीतर ताटातूट...ह्या मागची काय भूमिका आहे ते अजून समजलेलं नाही.
पण असो, त्यामुळेच बागेश्री आणि मी एकाच वर्गात येऊ शकलो. ८वी आणि ९वी अशी दोन वर्ष आम्ही सोबत होतो. एकाच बेंचवर आम्ही तिघीजणी बसत होतो. मी, बागेश्री आणि चारू. चारू बागेश्रीची आधीपासूनची मैत्रिण होती. पण मी आल्यानंतर बागेश्री माझ्याशी जास्त आणि चारूशी कमी बोलायला लागली. तसं ती जाणीवपूर्वक काही करत नसावी. आता जुळतं एखाद्याशी जास्त, म्हणून असेल, तिला माझ्याशी बोलायला जास्त आवडत असावं. आम्ही काही खास मैत्रिणी वगैरे अजून तरी झालेलो नव्हतो. पण एक दिवस एक गंमत झाली आणि बागेश्रीची आणि माझी मैत्री जास्त घट्ट झाली.... त्याला चारूच जबाबदार होती.
एकदा एक कसला तरी तास चालू असतांना माझं लक्ष आहे की नाही याची शहानिशा न करता चारुने बागेश्रीला वहीच्या शेवटच्या पानावर एक संदेश लिहून दिला. जो नेमका मी वाचला. त्यावर लिहिलं होतं, "तू जर तिच्याशी (म्हणजे माझ्याशी) बोललीस, तर ह्यापुढे माझ्याशी बोलू नकोस." मला हे वाचून मोठ्ठा धक्का बसला. मी बागेश्री यावर काय उत्तर लिहिते, याची उत्सुकतेने वाट पाहायला लागले. बागेश्रीने लिहिलं, " तू माझ्याशी बोलायचं की नाही, हा तुझा प्रश्न आहे, पण मी तिच्याशी बोलणं सोडणार नाही!"
बागेश्रीचं हे उत्तर मला सुखावून गेलं. तेव्हापासून बागेश्री मला जास्तच आवडायला लागली. ह्या संदेश-देवाणघेवाणीनंतर चारूने लिहिलेल्या अटीप्रमाणे बागेश्रीशी मैत्री काही तोडली नाही. फक्त माझ्याशी मात्र ती कामापुरतीच बोलायला लागली. चारूशी मैत्रीचा हात पुढे करायला माझी खरंतर काहीच हरकत नव्हती, नव्हे ती माझी मैत्रिण आहे असंच मी गृहित धरलं होतं. पण चारूला तिची मैत्रिण फक्त तिच्यापुरती हवी होती आणि मी तिला चक्क तिच्यापासून तोडलं होतं. त्यामुळे तिच्या मनात माझ्याविषयी कटूता निर्माण झाली होती. मी हे त्यांचं वहीवरचं संदेशलेखन वाचल्याचं त्यांना कळू दिलं नाही. चारू त्यामुळे अजूनच दुखावली असती ना! पण त्यानंतर मी ही जाणीवपूर्वक बागेश्रीशी जास्त बोलायला लागले.
बागेश्री....हसल्यावर गालावर मस्त खळ्या पडणारी, अतिशय गोड दिसणारी अशी ती माझी मैत्रिण...बहुगुणी होती. अभ्यासात तर हुशार होतीच, पण तिची चित्रकलाही अप्रतिम! अक्षरही सुंदर आणि केवढी बोलकी! तिने बोलत रहावं आणि बाकीच्यांनी ऐकत रहावं. आम्ही दोघी एकमेकींना एकदम पूरक होतो. मला तिचं बोलणं ऐकायला आवडायचं आणि तिला माझ्या रुपाने उत्तम श्रोती मिळालेली. त्या माझ्या मैत्रीणीला शाहरुख खानचं आणि भुताच्या गोष्टींचं प्रचंड वेड...ह्या दोघांच्या गोष्टी सांगून ती माझं मन रमवायची. शाहरुखच्या 'सर्कस' मालिकेपासूनच तो माझा पण आवडता होता. भुताच्या गोष्टींची आवड मात्र तिच्यामुळे मला लागली. तिचं बोलणं ऐकणं हा एक सुंदर अनुभव असायचा...
शाहरुख खानचे बाजीगर, डर ह्या त्यावेळी गाजलेल्या सिनेमांवर केवढी चर्चा करायचो आम्ही...भुताच्या गोष्टी हा मात्र सर्वस्वी तिचा प्रांत. तिच्या घरी तेव्हा केबल कनेक्शन आलेलं होतं. आमच्या घरी मात्र बाबांनी अभ्यासाची वर्षे आहेत, एवढ्यात नको, म्हणून मुद्दाम घेतलेलं नव्हतं. मग ऑफ तासाला आणि मधल्या सुट्टीत बाईसाहेब झी टिव्हीवर आदल्यादिवशी पाहिलेल्या भुताच्या मालिकेची स्टोरी सांगायला सुरुवात करायच्या. त्यातल्या भुताचे नखशिखान्त वर्णन करण्यात तिचा हातखंडा होता. त्या भुताने काय काय करामती केल्या हे ती अगदी रंगवून रंगवून सांगायची. अशीच दोन वर्ष भूर्र्कन उडून गेली.
बागेश्रीची इतकी सवय लागलेली असतांना ९ वी च्या वार्षिक परिक्षेनंतरच्या सुट्टीत तिने मला एक मोठ्ठा धक्का दिला- तिच्या वडिलांच्या बदलीचा. आधीच १० वी ला आम्ही एकाच वर्गात असू की नाही ही धाकधूक मनात असतांना ती आता माझ्या शाळेतूनच काय, माझ्या शहरातूनसुद्धा निघून जाणार ही मोठी दु:खदायक बातमी तिने मला दिली. माझ्या डोळ्यासमोर एकदम ते १०वी चं रखरखीत चित्र दिसायला लागलं. दहावीला गेल्यावर कराव्या लागणार्या जास्तीच्या अभ्यासाने एक तर हे वर्ष कंटाळवाणं होणार होतं, त्यातून मी माझ्या लाडक्या मैत्रिणीला गमावून बसणार होते. मी रड-रड रडले. कायम संपर्कात रहायचं असं एकमेकींना बजावून आम्ही निरोप दिला...
पण पत्र, फोन अशा सगळ्या सोयी असल्या तरी नानबाने लिहिल्याप्रमाणे कॉमन धागे तुटले की मैत्री टिकू शकत नाही, तसं झालं...काळाच्या ओघात मी तिचा पत्ता, फोन नंबरसुद्धा गमावून बसले. मला तिची आठवण यायची मधूनच. नंतर सोशल नेटवर्किंग साईट्स सुरु झाल्या आणि त्यावर तिला शोधायचा प्रयत्न केला... पण ती कुठेच सापडेना... मग लक्षात आलं, तिचं आता लग्न झालेलं असू शकतं आणि मुलींची तर लग्नानंतर नावंही बदलतात...आता कशी सापडणार ही??? शेवटी नाद सोडून दिला. पण मनातल्या तिच्या आठवणी मात्र कधीच मिटल्या नाहीत.
एकदा अचानक आई-बाबांनी फोनवर बोलता-बोलता सांगितलं. "अगं तुझी ती शाळेतली मैत्रीण बागेश्री, परवा हॉटेलमध्ये भेटली आम्हाला. नवर्यासोबत होती. एक छोटीशी मुलगी पण आहे तिला आता.... आधी समजेच ना कोण ते..फक्त चेहरा ओळखीचा वाटत होता. मग तिनेच आम्हाला पाहिलं. हसतच जवळ आली. ओळख पटवून दिली. जरा सुद्धा बदलली नाहीये. जशी होती अगदी तशीच. एकदम गोड...आम्ही तिचा फोन नंबर घेतला आहे. जमेल तसा फोन कर."
अचानक ही आनंदाची बातमी मिळाली आणि मी हरखूनच गेले. ताबडतोब बागेश्रीला फोन केला. तिला "मी कोण, ओळख बरं?" म्हणाले. तिने लग्गेच ओळखलं. माझा फोन एक्सपेक्टच करत होती ती. भरभरुन बोललो आम्ही. गंमत म्हणजे २ वर्षांपूर्वी ती नवर्यासोबत जर्मनीला येऊन, दीड वर्ष राहून गेली होती. जेव्हा मी तिला सोशल नेटवर्किंग साईटवर शोधायचा प्रयत्न करत होते, तेव्हा ती मी राहतेय त्याच देशात, माझ्यापासून फक्त १०० कि.मी. दूर असलेल्या गावी राहत होती. पृथ्वी गोल आहे, जग लहान आहे वगैरे आपण जे म्हणतो ना..त्या गोष्टींचा मला काहीच उपयोग झालेला नव्हता...
...हो, पण आत्ताची तिची फोनभेट, हा कसला प्रत्यय होता मग? तिने नेमकं आमच्या गावी कामानिमित्त जावं काय, नेमकं माझे आई-बाबा गेले त्याच हॉटेलमध्ये जेवायला जावं काय, तिने त्यांना ओळखावं काय...
त्यामुळे बागेश्री मला पुन्हा भेटली...
...पण आता पुन्हा तेव्हासारखा आमचा शाहरुख लाडका नाही, आम्ही एका शाळेत नाही, तिच्या भुताच्या गोष्टी नाहीत आणि टेक्नॉलॉजीमुळे आम्ही कायम संपर्कात राहू शकत असलो तरीही त्यात दोघींनाही तेवढा इंट्रेस्ट उरलेला नाही. थोडक्यात माझी ती हरवलेली मैत्रिण आता मला परत मिळाली, असं काही मी मनापासून म्हणू शकत नाही. पण आमच्या मैत्रीच्या जुन्या गोष्टी आठवून तिच्याशी त्या शेअर करण्याचा आनंद मात्र मी नक्कीच घेऊ शकते, हेही नसे थोडके 
---- सखी, जर्मनी
ह्म्म.. सही!
ह्म्म.. सही!
छान लिहिलयस सानी आवडलं....
छान लिहिलयस सानी
आवडलं....
मस्त लिहिलयं !
मस्त लिहिलयं !
छान लिहिलयं
छान लिहिलयं
छान लिहिलंस.. प्रत्येकाच्या
छान लिहिलंस.. प्रत्येकाच्या मनातलं म्हणून अजूनच जवळचं वाटलं..
सानी, मस्त लिहिलय ! मलापण
सानी, मस्त लिहिलय ! मलापण माझं हायस्कुल जीवन डोळ्यापुढं आलं...
माझी हरवलेली आणि पुन्हा सापडलेली मैत्रीण...
आता पुन्हा हरवु नये हिच अपेक्षा ....!
:स्मितः
लहानपणी पाटी एकदम कोरी असते
लहानपणी पाटी एकदम कोरी असते ना. त्यामुळे त्यावेळचे मैत्रीचे बंध मनावर पक्के कोरले जातात. मिटवू म्हटलं तरी मिटत नाहीत. माझ्या लहानपणीची मी अशाच possessive मैत्रीचा अनुभव घेतलेला आहे. पण त्या वयात ते साहजिकच आहे. जुनी डायरीची पानं चाळली की पानोपानी असंच काहीबाही खरडून ठेवलेलं आहे. आता वाचून हसू येतं. पण तेव्हा ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. आपली best friend फक्त आपल्यासाठीच राखीव आहे या जगात अशी एक भाबडी समजूत असते.
आपलं मनोविश्व पण तसं छोटंच असतं ना!
छान लिहिलयस, सानी .....
छान लिहिलयस, सानी
.....
माझा पण अनुभव काहीसा असाच आहे ..... खरंच, काही वेळेला आपण कितीही प्रयत्न केला तरीही आपली हरवलेली, जवळची माणसं आपल्याला सापडत नाहीत, भेटत नाहीत ..... आपण मनतल्या मनात, स्वप्नात, विचारांमध्ये त्यांच्याबरोबर घालवलेले क्षण आठवत बसतो ..... त्यांच्या आठवणीत कधी हसतो तर कधी रडतो ...... कधी कधी ते तुमच्याबरोबरच आहेत अस समजून एका वेगळ्या कल्पनाविश्वात रमतो ....... आणि कधीतरी एकदम, ध्यानीमनी नसताना अचानक 'आपलं हरवलेलं' आपल्याला गवसतं ...... ती हरवलेली माणसं अशी अचानकपणे समोर दिसताच, एका क्षणात आपण फ्लॅशबॅक मध्ये जातो ........ आणि तो 'वरचा' गंमत बघत असतो ....
असो, कोणाच्याही आयुष्यातून असं कोणी हरवू नये आणि जरी दुर्दैवानी किंवा काही परिस्थितीमुळे हरवलं तरी परत सापडल्यावर, पुन्हा हरवू नये, एवढीच त्या 'वरच्या' कडून अपेक्षा, त्या 'वरच्या' कडे प्रार्थना !
(No subject)
नानबा, मंजिरी, श्री, चिमुरी,
नानबा, मंजिरी, श्री, चिमुरी, वर्षू, अनिल, निंबुडा, अमोल, कविता...तुमचे प्रतिसाद वाचून फार आनंद झाला...खुप खुप धन्यवाद तुम्हा सर्वांना
वर्षू, खरंय आपल्याला वाटत असतं आपली कथा युनिक आहे, पण शेअर केली की समजतं सगळ्यांच्याच थोड्याफार फरकाने अशाच कथा आहेत.
अनिल, तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद!
निंबुडा, मलाही फार हसू येतं गं लहानपणीचं विश्व आठवलं की...पण त्यावेळेला मैत्रीसारखी गोष्ट म्हणजे अगदी जीवन-मरणाच्या प्रश्नासारखी वाटत असते ना! आणि possessive पणाबद्दल तर काही बोलायलाच नको! लहान मुलं कशाच्या बाबतीत possessive होतील, याचा काही नेम नाही
अमोल, तुमचं मनोगत वाचून फार छान वाटलं...त्यामागे जी कथा दडलीये, ती वाचायला आवडेल. मस्त लिहिता तुम्ही...जमल्यास शेअर करा...वाचण्यास उत्सुक आहे
सानी, हरवलेले गवसले तरी मन
सानी,
हरवलेले गवसले तरी मन जेव्हा फ्लॅशबॅक मधे रमतं तेव्हा न सुधारता येणार्या चुका आठवून पश्चातापदग्ध होतं. आपल्या हाती त्यावेळी काय होतं, आपण काय करु शकलो असतो आणि आता वेळ निघून गेल्यावर जर-तर च्या गोष्टी करताना त्रास होतो. कधी कधी वाटतं, त्यापेक्षा नकोच गवसायला काही...... आठवणींमधे जपलेलंच बरं!
मंजिरी...थँक्स गं किती बरोबर
मंजिरी...थँक्स गं
किती बरोबर बोललीस...
ह्या हरवण्याला आणि गवसण्याला किती वेगवेगळे पैलू आहेत...ते आनंदाचे आणि अभिमानाचे असतील तर ठिक आहे...पण दु:खाचे आणि पश्चातापाचे असतील आणि त्याने आयुष्य ढवळून निघणार असेल, तर खरंच... नकोच गवसायला काही...... आठवणींमधे जपलेलंच बरं!
सानी, अतिशय बोलका आहे हा लेख.
सानी, अतिशय बोलका आहे हा लेख. खुप छान.
सानी, हे वाचताना मलाही माझ्या बालपणीचा मित्र अतूलची आठवण झाली. मला लागलं की तो रडायचा इतकी घट्ट मैत्री होती आमची. १ ते ४ नंतर आमची ५ भेट होईल असं वाटलं होतं, पण अतूल आणि त्याची फॅमिली अचानक कुठे रहायला गेला हे कळलचं नाही ते आजतागायत. हा लेख वाचल्यावर आज अतूलची जाणीव प्रकर्षाने झाली. पण प्रश्न्न तोच कुठे असेल तो ? आणि कसा असेल तो ?
असो.
शुभेच्छा
देवनिनाद
सानी, अतिशय बोलका आहे हा लेख
सानी, अतिशय बोलका आहे हा लेख ...(तुझ्यासारखाच)
देवनिनाद, तुमच्या
देवनिनाद, तुमच्या प्रतिसादाबद्द्ल मनापासून आभारी आहे. तुमचा मित्र तुम्हाला एक दिवस नक्की भेटेल असं कुठेतरी आतून वाटतंय... फार तीव्रतेने एखाद्याची आठवण येत असेल तर ती व्यक्ती अचानक भेटते असा मला बरेचदा अनुभव आला आहे. तुम्हालाही येवो ही सदिच्छा!
सानी, अतिशय बोलका आहे हा लेख
सानी, अतिशय बोलका आहे हा लेख ...(तुझ्यासारखाच)
ह्म्म्म्म्म अनिल, आहे खरी मी बोलकी
माझ्याशी आपुलकीने बोलणार्याला भरभरुन प्रतिसाद देण्याचा स्वभाव आहे माझा...
मंजे, तु म्हणतेस ते अगदी
मंजे, तु म्हणतेस ते अगदी बरोबर आहे .... पण ते एक मनं बोलतंय ..... कधी कधी वाटतं, त्यापेक्षा नकोच गवसायला काही...... आठवणींमधे जपलेलंच बरं! ...... ह्या विचारात रमलीस की दुसर मनं पण लगेच जागं होतं ..... आणि आत्ता जे हरवलेलं गवसलं आहे, त्याच्याबरोबर जे सुखाचे क्षण अनुभवता येत आहेत त्याच्यात रमतं आणि हे जर परत गवसलं नसतं तर ...... परत हरवलेल्या दिवसांच्या आठ्वणीत ..... परत तेच ....... मनाच हे द्वंद्व दोन्ही ठिकाणी चालूच ...... जर - तर चे आणि आठवणींचे खेळ चालूच .......
पण मला विचारशील तर, त्या आठवणींच्या जगात जगण्यापेक्षा, आत्ता जे हरवलेलं गवसलं आहे, त्याबद्दल मी त्या ' वरच्या ' चे आभार मानून, माझ्या गवसलेल्या बरोबर सुखाचे क्षण अनुभवीन !