मराठी उद्योजकः सभासदत्व कसे मिळवावे

Submitted by अजय on 19 January, 2010 - 00:00

मराठी उद्योजक या ग्रूपबद्दल माहिती प्रकाशित झाल्यापासून अनेक जणांनी यात सामिल होण्याबद्दल विचारणा केली आहे. या ग्रूपमधे सामील होण्याचे निकष आणि पुढील पायर्‍या. सभासदत्वासाठी कुठल्याही स्वयंसेवकाशी संपर्क साधण्याअगोदर कृपया खालील गोष्टींची पूर्तता करुनच संपर्क करावा

१. फक्त मायबोलीच्या कार्यरत सभासदांना या ग्रूपचे सभासद होता येईल. जे सध्या सभासद नाहीत ते आधी मायबोलीचे सभासदत्व घेऊन मग ग्रूपच्या सभासदत्वसाठी अर्ज करू शकतील.

२. सभासदत्चासाठी तुमचे नाव, आडनाव, गाव, देश आणि व्यवसायाबद्दल माहिती जाहिरपणे व्यक्तिरेखेत लिहणे आणि तशी कायम लिहलेली ठेवणे आवश्यक आहे. फक्त हीच माहिती सगळ्यांना उपलब्ध असेल. ही माहिती खोटी आहे असे कधीही आढळल्यास या ग्रूपचे आणि मायबोलीचेही सभासदत्व रद्द केले जाईल.

३. सभासदत्वासाठी अर्ज करताना तुमच्या जवळच्या विभागातल्या (किंवा तुम्हाला सोयिस्कर असलेल्या) ग्रूपच्या प्रतिनिधिशी संपर्क करून तुमच्या फोन नंबर कळवावा. ते प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची माहिती विचारतील आणि ती व्यक्तीरेखेशी जुळली असेल तर तुम्हाला सभासदत्व देण्याची प्रक्रिया सुरु करतील.

४. या व्यतिरिक्त तुमचा ईमेल किंवा फोन किंवा इतर संपर्काची माहिती ग्रूपमधे कधी जाहिर करण्याची गरज नाही किंवा या ग्रूपच्या प्रशासकीय टीमलाही सांगायची गरज नाही. तुम्हाला एकाद्या व्यक्तिबद्दल विश्वास निर्माण झाला तर त्याला कुठ्ली माहिती केंव्हा द्यायची हे तुमचे तुम्हीच ठरवायचे आहे. अयोग्य व्यक्तिच्या हातात सगळ्या सभासदांच्या ईमेल किंवा फोनचा एकत्रित डाटा जाऊन त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये यासाठी धोरण आहे.

५. सध्या मायबोलीवरच्या संपर्क सुविधेचा, विचारपूशिचा वापर करून सभासदांना एकमेकांत संपर्क करता येईल. इतरही सुविधांवर काम चालू आहे ज्या वापरून वेगवेगळे Filters ठेवता येईल.

६. या ग्रूपमधे उद्योजक, उद्योजक होऊ इच्छिणारे, नोकरी करणारे, नोकरी शोधणारे, विद्यार्थी सगळ्यांसाठी प्रवेश असेल. वर #२ मधे लिहल्याप्रमाणे खरी माहिती द्यावी लागेल. सभासदत्व देताना कुठल्या क्षेत्रातले असावेत यावर बंधन नसले तरी व्यवसायानुसार प्रतिक्षा यादी असू शकेल. उदा. एका क्षणी Software मधले खूप सभासद झाले तर नविन software व्यावसायिकाला थोडे थांबावे लागेल पण Manufacturing मधल्या एखाद्याला लगेच प्रवेश मिळू शकेल.

७. प्रत्येक सभासदाला त्याच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी एक धागा(एक पान) तयार करता येईल. ते त्यांना कितीही वेळा बदलता येईल. इतर सभासद त्या पानावर प्रतिक्रिया लिहू शकतील.

८. हा नेटवर्किंगचा ग्रूप आहे, मार्केटिंगचा ग्रूप नाही. त्यामुळे एकमेकात देवाणघेवाण अपेक्षित आहे. फक्त जाहिरातीची जागा नाही. #७ मधे लिहल्याप्रमाणे सुरूवातीला दिलेल्या व्यवसायाच्या माहिती व्यतिरिक्त पोस्टस,मेसेज,फोन,मेल स्वरुपात सततची जाहिरातबाजी करून इतर सभासदांना त्रास देऊ नये.. सभासदांकडुन तशी तक्रार प्रशासनाकडे आल्यास सभासदत्व रद्द होऊ शकते.
ज्यांना जास्त जाहिरातीची गरज आहे त्यांना मायबोलीवरच्या इतर जाहिराती सुविधां उपलब्ध आहेत.

९. NO means NO. ग्रूपमधे एखाद्या व्यक्तिने तुम्हाला मदत करण्यास नकार दिला किंवा असमर्थता दर्शवली तर त्या व्यक्तीला परत मायबोलीद्वारे किंवा बाहेरून संपर्क करू नये. या नियमाचे ३ पेक्षा जास्त वेळेस उल्लंघन केल्यास सभासदत्व रद्द केले जाईल.

तुमच्या सोयीनुसार , ग्रूपचे सभासद होण्यासाठी खालील स्वयंसेवकांशी मायबोलीची संपर्क सुविधा वापरून संपर्क करावा.
अ)संपर्कात तुमचा दूरध्वनी आणि तुमच्यासाठी सोयीची वेळ कळवावी. ब) वर #२ मधे लिहल्याप्रमाणे जाहीरपणे स्वतःच्या व्यक्तिरेखेत नाव, आडनाव, गाव, देश, आणि व्यवसायाबद्दल माहिती प्रकाशित करावी.

मुंबई
मिलिंद माईणकर (भ्रमर)
दीपक कुलकर्णी (डुआय)

पुणे
दीपक ठाकरे (साजिरा)
मयूरेश कंटक (मयूरेश)

उत्तर भारत
अल्पना खंदारे (अल्पना)

दक्षिण भारत
अश्विनि खाडिलकर (अश्विनीमामी)
नवीन केळकर (शुभंकरोति)

अमेरिका पूर्वकिनारा
अनिलभाई सांगोडकर(अनिलभाई)
रूपाली महाजन(रूनी पॉटर)
अजय गल्लेवाले (अजय)

अमेरिका पश्चिमकिनारा
भाग्यश्री कुलकर्णी-करकमकर (बस्के)
समीर सरवटे (समीर)

कॅनडा
वैशाली कालेकर (आशि)

युके
अदिती हिरणवार (punawa)

ऑस्ट्रेलिया
निलेश डोंगरे (चंबू)
निनाद कट्यारे (निनाद)

दुबई
कामिनी फडणिस केंभावी (श्यामली)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विवेक व नितीन,
तुम्ही वरील सुरवातीच्या पोस्ट्मधे लिहील्याप्रमाणे, जरुरी असलेली सर्व माहीती प्रोफाईल मधे भरा व वरी पैकी कोणाही एका व्यक्तीशी संपर्क साधा. तुम्हाला सभासदत्व मिळेल.

नमस्कार,
अतिशय स्तुत्य उपक्रम,
मला सभासदत्व मिळावे ही विनंती,

श्रीपाद खेडकर, पुणे.

मनिष,
तुम्ही एकच प्रश्न परत परत विचारत आहात. तुम्ही "मराठी उद्योजक" या ग्रूपचे सभासद झाल्यावरच तुम्हाला नवीन धागा सुरु करता येईल. तुम्ही सध्या मायबोलीचे सभासद आहात. पण मायबोलीवरच्याच मराठी उद्योजक ग्रूपचे सभासदत्व वेगळे घ्यावे लागते. ते कसे हे वर या पानावर लिहले आहे.

मी सध्या दक्षिण कोरियात आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय करण्याची इच्छा आहे. संपर्क कोणाला करावा ?

अवांतर :- वर नमुद केलेल्या देशापैकी कोणत्याही देशात राहत नसेल, तर त्यासाठी एका नविन संपर्काची व्यवस्था करता येईल का? हा आगाऊपणा वाटत असेल तर क्षमस्व. !

उद्योजक गृप स्वयंसेवक,
मला उद्योजक गृप सभासद होण्याची खूप ईच्छा आहे, वरील नियमही मी वाचले,
परंतू नियम क्रमांक २ पटला नाही.
उद्योजक गृप आणि मायबोली हे दोन्ही हेतू आणि कार्य ह्या दोन्ही पातळीवर दोन वेगळे गृप आहेत तर उद्योजक गृप सभासदत्व मिळवण्यासाठी त्या गृपशी संबंध नसलेल्या मायबोलीच्या इतर सभासदांसमोर नाव, आडनाव ई. माहिती उघड करण्याची खरंच जरूरी आहे का?
हीच माहिती स्वयंसेवकांकडे किंवा मायबोलीच्या डेटाबेसमध्येच सुरक्षितपणे साठवली जाऊ शकते.
ती साठवण्यापूर्वी स्वयंसेवक सभासदाशी बोलून माहितीची विश्वासर्हताही पडताळून पाहू शकतातच.

मान्य आहे आजवरच्या सगळ्या सभासदांनी आपापल्या व्यक्तीरेखेत ही माहिती नमुद केली आहे पण तरी ह्यावर काही तोडगा निघण्याची शक्यता आहे का?

उद्योजक ग्रूपच्या सभासदांमधे पारदर्शकपणा असावा (फक्त ग्रूपमधेच नाहीच तर सगळीकडे) म्हणून हा नियम केला आहे. आणि ज्या गोष्टी नमूद करायच्या आहेत त्या अगदी मोजक्या आहेत आणि ज्याला उद्योग करायचा आहे त्या व्यक्तीला ही माहिती इतरत्र का सांगावी वाटू नये हे कळले नाही. उलट सहसा उद्योजक व्यक्तींना जितक्या जास्त लोकाना आपले नाव माहिती असेल तितके चांगलेच असे वाटते.

हि माहिती मायबोलीवर इतरत्र कळाली तर नेमका काय धोका संभावेल असे तुम्हाला वाटते आहे? आणि ती १०० सभासदांना कळाली तरी त्यांनी ती गोपनीयच ठेवावी अशी तुमची इच्छा असेल ते शक्य नाही. ते केंव्हातरी कुठेतरी बोलले जाणार.

अजयजी... मला सुद्धा सभासद होण्याची इच्छा आहे.. पण तो नियम क्रमांक दोन पटला नाही... माफ करा पण आजकाल मायबोलीवर टवाळ लोकांची संख्या वाढली आहे, ग्रुपीझम तर प्रचंड प्रमाणात झाले आहे... मायबोलीवर वाद सुरुवातीपासुन होत होते पण सध्या या वादाला वैयक्तीक आणी शाब्दीक टोळीयुद्धाचे स्वरुप आले आहे... तुमचा हेतु निसंशय चांगला आहे पण एकंदरीत माबोकडे बघता वैयक्तीक माहीती द्यायला नको वाटते हे नक्की... मि उद्योजक गृप मधील दोघा स्वयंसेवकाना तरी गेल्या ५ वर्षापासुन ओळखतो... त्यांच्याकडे माझी सर्व माहिती आहे... तर मला सभासदत्व मिळु शकेल का???

अजय तुमचं बरोबर आहे, पण ज्या कारणासाठी उद्योजक गृप हा सर्वांसाठी खुला नसून केवळ निमंत्रितांसाठी आहे त्याच कारणासाठी त्यातील सभासदांची माहितीही सर्वांसाठी उपलब्ध न होता केवळ गृपपुरतीच मर्यादित असावी असे वाटते.
माझी वैयक्तिक माहिती गृप सभासद आणि स्वयंसेवक यांपुरती पारदर्शक असल्यास बाकी कवी, लेखक, साहित्यिक, टीकाकार, रसिक ह्यांनाही ती कळण्याने काय साध्य होणार हे कळले नाही. ह्यातील ज्यांना उद्योजक गृपमध्ये रस आहे ते सभासद होतील.

सध्या केवळ माहितीच्या देवाणघेवाणीसाठी सभासदत्व घेऊन काही नियोजनानंतर उद्योगासंबंधीची पाऊले उचलतांना पुढेमागे एखाद्या उद्योजकाला ज्यावेळी अशी सार्वजनिक ओळख निर्माण करण्याची गरज वाटेल त्यावेळी तो स्वखुषीने हा पर्याय निवडू शकतोच, पण सुरुवातीलाच तरी त्याची जरूरी नाही असे वाटते.

नाव वगैरे वैयक्तिक माहिती गोपनीय आहे आणि इतरांना कळण्यात काही धोका आहे असे नाही पण अशी माहिती देणं खरंच जरूरी आहे का?
उद्योजक गृपसाठीची जर तशी अट आहे तर त्या गृपपुरती ही माहिती देण्यास आजिबातच ना नाही.
गृपमधील सभासद ही माहिती गृपबाहेर उघड करतील हेही शक्य असले तरी त्याला सध्यातरी काही पर्याय दिसत नाही.

ज्या समाजात राहुन आपण व्यवसाय करु इच्छितो त्याच समाजातुन आलेले लोक मायबोलीवर असतात. मग जर मायबोली वर माहिती द्यायची नाही तर मग समाजातही कुणालाच माहिती देउ नये असे होइल. अन मग असे केल्याने व्यवसाय कसा करणार? अश्या सर्व प्रकारच्या लोकांशी कसे वागावे ह्याची ही एक प्रयोगशाळा माना हवे तर!

याअगोदर देखील काही लोकांनी हा प्रश्न मांडला होता. त्याला व्यवस्थापकांनी उत्तर दिलेले आहेच, ते वाचावे. सभासदत्व ऐच्छिक आहे, निर्णय आपण स्वतः च घ्यायचा आहे.

अजय,चंपक,
पुन्हा माझा मुद्दा जरा वेगळ्या पद्धतीने मांडून बघतो.

गृपमध्ये सभासदत्व घेऊ इच्छिणारे उद्योजक असावेतच अशी काही अट नाहीये आणि सभासदत्व मिळाल्यावर अगदी पहिल्या दिवसापासून कोणी उद्योगाचा शुभारंभही करणार नाहीयेत.

याऊपर, सभासदाने सभासदत्व घेतल्यानंतर काही ठराविक काळात उद्योग चालू करून उद्योजक झालेच पाहिजे अशीही काही अट नाहीये, मग त्याआधीच ह्या माहितीची सक्ती का असावी?

मी वर म्हंटल्याप्रमाणे जर मला एखाद्या आवडलेल्या व्यवसायाबद्दलच्या ज्ञानवृद्धीसाठी माहिती मिळवण्याची इच्छा आहे आणि केवळ प्रश्नोत्तरापुरता माझा सहभाग मर्यादित असेल तर माझी माहिती सार्वजनिक करण्याची मला खरंच गरज वाटत नाही. (पुन्हा, माझी वैयक्तिक माहिती मी ज्यांच्याशी संवाद साधतोय त्या गृपमधील सर्वांसाठी पारदर्शक आहेच)

पुढे जाऊन मी एखादा उद्योग चालू करण्याच्या दिशेने काम करण्याचे ठरवल्यास आणि गरज वाटल्यास ही माहिती सार्वजनिक करण्याचा पर्याय मी निवडेन की.

एक उदाहरण देऊन बघतो, समजा माझा एक व्यावसायिक मित्र एखाद्या उत्पादनाची डीलरशिप घेत आहे, आणि मला माझ्या मित्राच्या व्यवसाय कुशलतेवर विश्वास आहे म्हणून ह्या उद्योगात मी त्याचा निष्क्रिय भागीदार (म्हणजे फक्त पैशाची भागिदारी, श्रमाची नाही) होण्याच्या प्रस्तावावर विचार करतोय.
आता मला फक्त एवढेच बघायचे आहे की मी गुंतवणूक करीत असलेल्या ह्या उत्पादनासाठी वर्तमान आणि भावी बाजार कसा आहे/असेल? इथे मला फक्त बाजाराच्या अभ्यासाची गरज आहे आणि ह्या व्यवहारात माझं नाव कुठेही येण्यात मला स्वारस्य नाही.
भागिदारी करार केल्यानंतरही मी माझा अभ्यास करीत राहीन आणि माझा मित्र जो उद्योजक आहे त्याच्या व्यावसायिक हितसंबंधातील लोकांशी माझा कुठलाही थेट संबंध असणार नाही.

उदा. बिग बझारच्या बाहेर उभं राहून मी लोकांना माझं नाव न सांगता (आणि त्यांचही न विचारता) सर्व्हे म्हणून विचारेन तुम्ही कुठलं सॉफ्ट ड्रिंक पिता आणि ७०% लोकांनी कोका-कोला सांगितल्यास मी माझ्या मित्राच्या कोका-कोलाच्या डीलरशिप मध्ये गुंतवणूक करेन.

आता तुम्ही माझ्यावर 'तुम्ही फक्त गुंतवणूकदार उद्योजक नाहीत' असा शिक्का मारून सभासदत्व नाकारणार असाल तर हरकत नाही :-).

प्रतिसाद खूपच मोठा झाला पण अजूनही माझा मुद्दा पटला नसल्यास ह्यावर पुढे चर्चा करण्यासाठी मी उत्सुक आहे.

पहिल्या प्रथम फक्त ग्रूपसाठी वेगळी प्रोफाईल हे सध्या तांत्रिक दृष्ट्या शक्य नाही. एक वेगळी फाईल ठेवून त्यात हि माहिती ठेवणे शक्य आहे. पण मग ती फाईल ग्रूपबाहेर गोपनीय राहीलच याची खात्री देता येत नाही. आणि मग ग्रूपचे सभासद न होताही ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न होत राहिल. आणि हा ग्रूप उद्योगाशी निगडित असल्याने नक्कीच होत राहील. म्हणजे एकदा ग्रूप मधे माहिती भरलीत ( समजा भविष्यात फक्त ग्रूपपुरती प्रोफाईल झाली तरी) की ती फक्त ग्रूपपुरती मर्यादित रहावी अशी तुमची इच्छा प्रत्यक्षात येणे शक्य नाही.

उदा. तुम्ही मायबोलीच्या बाहेर इतर मार्गाने (तुमच्या उदाहरणात बीग बझारच्या बाहेर) माहीती गोळा केली तर त्यावर मायबोलीचा (बिग बझारचा) काहीच control नाही हे मान्य. आणि त्यामुळे कदाचित तुम्हाला योग्य त्या गांभिर्याने मतेही मिळणार नाही. पण तुम्हाला मायबोलीवर (बिग बझारच्या आत) जर माहीती गोळा करायची असेल तर बिग बझारच्या व्यवस्थापनाने काही नियम ठेवले तर त्यात काय चुकले? आता बिग बझार असे नियम का ठेवेल?
१. एकदा कुणालाही असा खुला वावर दिला तर कोण योग्य कारणांसाठी माहिती गोळा करते आहे आणि कोण अयोग्य यात फरक करणे अवघड जात जाईल. कदाचित बिग बझारचा स्पर्धक ही माहिती गोळा करु शकेल.
२. मुळात मी जेंव्हा एक ग्राहक म्हणून जेंव्हा बिग बझार मधल्या दुसर्‍या ग्राहका बरोबर संवाद साधतो तेंव्हा तो वेगळ्या पातळीवर असतो. पण जर मला उद्या समोरचा माणूस ग्राहक वाटत असेल पण प्रत्यक्षात तो विक्रेता असेल (आणि मला ते माहिती नसेल किंवा माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न झाला असेल) तर माझी त्या व्यक्तीबद्दलच नाही तर बिग बझार मधे असे लोक येऊ देतात म्हणून बिग बझार बद्दलचीही विश्वासार्हता कमी होऊ शकेल. मी जेंव्हा ग्राहक असतो आणि समोरचा माणूस विक्रेता असेल तर मी माझी माहिती देणार नाहि पण त्याने मात्र सगळी माहिती मला दिली पाहिजे असा असमतोल (योग्य असो वा अयोग्य) नेहमीच माझ्या मनात असणार

आता तुम्ही म्हणाल मी विक्रेता नाही. कबूल तुमच्या बाबतीत हे सगळे लागू होणार नाही. पण कोण खुला विक्रेता आहे आणि कोण छुपा हे कसे ठरवणार. कमीतकमी जो छुपा विक्रेता आहे त्याला तरी उद्योजक ग्रूपच्या सुविधा उपलब्ध होणार नाहि हे आपण करू शकतो. ज्या ग्राहकावर हे सगळे अवलंबून आहे त्याचा विश्वास जपणे यासाठीच हे सगळे नियम आहेत.

तुम्हाला कदाचित असेही वाटेल की काही ग्राहकांनी (मायबोलीकरांनी) अज्ञात राहून कसे ही वागायचे पण जे व्यावसायिक आहेत त्यांनी मात्र स्वतःची ओळख देऊन बंधने पाळायची हा त्यांच्यावर अन्याय आहे. एका ठराविक पातळीपर्यंत हा आक्षेप खरा आहे. पण त्याची दुसरीही बाजू आहे. जसा जसा मराठी संकेतस्थळावर वावरणारा वाचकवर्ग प्रौढ होतोय तसा तसा त्या वाचकवर्गाचा अज्ञात राहून लिहणार्‍या व्यक्तींबद्दलचा विश्वास (किंवा त्याच्याकडे गांभिर्याने पाहण्याचा दृष्टीकोनही) कमी होतोय. ज्या व्यक्ती सगळ्या ठिकाणी पारदर्शकपणा ठेवत आहेत त्या जास्त यशस्वी (विश्वासार्ह या दृष्टीने) होत आहेत.

जाता जाता: आम्ही विचारलेली माहिती अगदी कमी आहे. नाव, ठिकाण, व्यवसायाचे क्षेत्र इतकी त्रोटक माहीती विचारली आहे.

अजय राव तुम्ही किती कमी माहिती विचारता आहे. एकदा उद्योग उभारला कि पार तुमचे १७६० नंबर पासून बँक डीटेल्स, घरचा पत्ता सर्व माहिती पब्लिक असते. ग्राहक रात्री १० ला फोन करून माहिती विचारतात. माहिती देतात.
तुम्हाला सर्वांना २४ गुणिले ७ गुणिले ३६५ उपलब्ध राहावे लागते. जीवन एका चांगल्या अर्थाने सार्वजनिक पातळीवर जगावे लागते. मी एका ब्यांके बरोबर १० वर्शे काम करत आहे. एकही डिफॉल्ट नाही पण मी एकच सिग्नेटोरी आहे म्हणून त्यांनी सर्व नो युअर कस्ट्मर माहिती मला दोनदा विचारली. ती द्यावी लागते. अग्दी
अ‍ॅन्युअल रिटरनस पासून. शिवाय प्रोफेशनल व बिझनेस फोरम मध्ये तुमचे डीटेल्स असतातच. त्यामानाने माबो हे एक घरच आहे. माझं तर स्वप्न आहे आपली माहिती वाचून चीन जपान मधून मोठी एक्स्पोर्ट ऑर्डर मिळावी, आंतरजाल ही अशी जागा आहे जिचा उत्तम उपयोग स्वत:च्या प्रमोशन साठी करता येतो.

मी युके मध्ये लंडन जवळ Reading शहरात राहते. मी इथे व्यवसाय सुरु करतेय लवकरच. मला त्यासाठी काही मार्गदर्शन हवं आहे.मला या ग्रुप च सभासदत्व घ्यायचं आहे. मी कुणाला संपर्क करू शकते?

अदिती

नमस्कार वेमा, मी व्यवसायासंबंधित माहिती भरलेली आहे. कृपया मला सभासदत्व मिळेल का?

मी ज्ञाती याना भेटलो आहे. त्यांचाशी फोनवर बोलण झाल आहे. त्यानी प्रोफाईल मधे सर्व माहीती दिलेली आहे तरी त्याना ह्या ग्रुपचे सदस्यत्व देण्यात यावे.

अहो डाएट कंसल्टंट मैडम वरती वेब मास्टर नी लिहिलेच आहे.
याच पानावर सुरवातीला माहिती दिली आहे.
ती वाचालित तर पुढील मार्गदर्शन मिळेलच.

राजेश्वर कुळकर्णी ह्यांना उद्योजक ग्रूपचं सभासदत्व देण्यात यावं अशी मी विनंती करतो. माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे.
http://www.maayboli.com/user/28989

Pages