नटरंग

Submitted by आशूडी on 6 January, 2010 - 23:17

काल नटरंग पाहिला. प्रचंड ताकदीचा अप्रतिम, देखणा चित्रपट. शीर्षक जेव्हा पडद्यावर दिसते तेव्हापासून जी मनाची पकड घेतो ती शेवटच्या श्रेयनामावलीतले शेवटचे नाव पडद्यावरुन नाहीसे होईपर्यंत!
तमाशाच्या कलेसाठी स्वतःचं जीवन वाहून घेतलेल्या तमाम कलाकारांना हा मानाचा मुजरा, या निर्मितीबाबत आपल्यालाही मुजरा करायला लावतो यात शंका नाही.
डोळ्यांच्या कडा ओलावण्याचे अनेक प्रसंग.. पण अत्यंत संयतपणे हाताळल्याने "पुढे काय?" ते पाहायला प्रेक्षक तयार असतो. एक कलंदर, जिगरबाज व्यक्तिमत्व.. कलेचा ध्यास घेतलेलं.. परिस्थितीपुढे झुकायची वेळ येताच स्वतःच्या हिमतीनं उभं राहणारं.. स्वतःच्या कलेचा उपयोग फक्त स्वतःसाठी न करता लोकांचं भलं व्हावं असा निरागस उद्देश असणारं.. वेळच तशी आली म्हणून कलेच्या या होमात स्वतःची आहुती द्यायला मागेपुढे पाहत नाही.. पण या भावनेच्या भरात, वेडात घेतलेल्या उडीची जबर किंमत त्याला द्यावी लागते.. आयुष्यभर्..एकट्याला.

अतुल कुलकर्णीच्या कामाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. पैलवान गुण्या ते 'मावशी' हा दोन टोकांचा प्रवास त्यानं इतक्या जबरदस्त ताकदीनं पेललाय की तो बदल पाहता पाहता भान हरपतं. एका वाघाची शेळी झालेली पाहवत नाही , मन हेलावतं. सहानुभूती , कणव वाटतेच पण त्यापेक्षाही त्याचं कौतुक, त्याच्या जिगरला द्यावीशी वाटणारी दाद जिंकून जाते. आणि हेच दिग्दर्शकाला अभिप्रेत असावं. अतुलने त्याच्या भूमिकेचं अक्षरशः सोनं केलं आहे. कल्पनेपलीकडचा अभिनेता डोळ्यांसमोर साक्षात उभा केला आहे. या ग्लॅमरस जगात येण्यासाठी, प्रसिध्दीसाठी हपापलेल्या, स्वतःला 'अभिनय' येतो असं समजणार्‍या हौशी कलाकारांनी आवर्जून पाहावा असा चित्रपट यातल्या दोन कलाकारांसाठी - गुणा आणि स्वतः अतुल!

अजय अतुलच्या संगीताची तर आधीच इतकी प्रसिध्दी झालेली आहे त्यामुळे त्याविषयी वेगळे सांगणे न लगे! सोनाली कुलकर्णी सारखी देखणी , लावण्यमयी अभिनेत्री मराठीला लाभली हे आपले भाग्यच! अमृता खानविलकर पाहुणी कलाकार म्हणून 'आता वाजले की बारा' गाण्यात आहे. ही गाणी ऐकायला जबरदस्त आहेत. पण शीर्षकगीत 'नटरंग' सिनेमात जितकं 'जाणवत' नाही तितकं ऑडिओ सीडी ऐकताना वेड लावतं. यातला ढोलकीचा ठेका इतका दिलखेचक आहे की त्याच्या 'तटकारा' बरोबर अंगावर काटा फुलतो. हे गाणं एकदा तरी ऐकाच. गुरु ठाकूरची गाणी नेहमीप्रमाणेच अचूक शब्दांची उधळण करणारी. गुरु ठाकूर सिनेमातही आहे. गुणा ज्याच्या मळ्यात काम करत असतो तो पाटील म्हणजे गुरु. इतर कलाकारांनीही उत्कृष्ट साथ दिल्याने चित्रपट कुठेच 'कमी पडलाय' असं वाटत नाही. तरीही तमाशावर चित्रपट आणि त्यात 'गुणा' हा शाहीर ..तर एक "सवाल जवाबाची बारी" असती तर अजूनच चार चांद लागले असते असं वाटलं. शेवटचं पण अत्यंत महत्त्वाचं, जो चित्रपट इतका जबरदस्त आहे त्याची मूळ कथा डॉ. आनंद यादवांची 'नटरंग' ही कादंबरी काय चीज असेल हे पाहण्यासाठी तरी मी ती वाचायला उद्युक्त झाले आहे!
झी टॉकीजने असेच एकाहून एक दर्जेदार चित्रपट काढावेत, त्यांची याहून जास्त जाहिरात करुन प्रेक्षक वर्ग चित्रपटगृहात खेचून घ्यावा अशा शुभेच्छा! असे जर 'अतुल गुणवंत नटरंग' मराठीमध्ये असतील तर मराठी चित्रपटाला, नाट्यभूमी, लोककलेचा सुवर्णकाळ येतोय असं म्हणायला हरकत नाही!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सर्व वाचून टीवीवर काही वर्षापुर्वी भारतात पाहिलेली गणपत पाटीलांची मुलाखत आठवली. आता नाक्की आठ्वत नाही पण त्यांनी पण असेच काहीसे त्रास(नाच्याला मिळालेली त्यावेळी हिन वागणूक) झाल्याचे सांगितले होते ते आठवले. त्यावेळी (मुलाखतीतच)ते खूप म्हातारे होते.

मला तरी "नटरंग" कुठेतरी कमी पडल्यासारखा वाटला. समी़क्षक वगैरे आजिबात नसल्यामुळे review नाही लिहित, पण..

हे आवडले -
- आजच्या काळात एक पूर्ण तमाशापट काढण्याचे धाडस केले.
- अतुल कुलकर्णीचा गुणा, किशोर कदमचा पांडबा, सोनाली कुलकर्णी, प्रिया बेर्डे, विभावरी देशपांडे, उदय सबनीस यांचा अभिनय. सोनालीच्या नाचात एक grace आहे. Trained dancer वाटली.
- अजय-अतुल यांचे अप्रतिम संगीत व गायन. गण, गवळण, कटाव, लावणी असे बरेच प्रकार हाताळ्ले आहेत. "नटरंग उभा", "अप्सरा आली" ही गाणी एकदम फर्मास जमली आहेत.
- चित्रपटाची end credits आणि मागे वाजणारी ढोलकी. ही आणि इतर गाण्यातील ढोलकी सुप्रसिद्ध गायिका सुलोचना चव्हाण यांचे सुपुत्र विजय चव्हाण यांनी वाजविली आहे. केवळ उच्च! सवयीप्रमाणे जायला उठलेला एकही प्रेक्षक end credits संपेपर्यन्त जागेवरून हलला नाही यातच सारे काही आले!

हे आवडले नाही -
- अतुल कुलकर्णी गुणा म्हणून जेवढा पटला त्याच्या निम्म्यानेही नाच्या नाही वाटला. (सारखी गणपत पाटलांनी केलेल्या उत्तम भुमिकांची द्रुष्ये डोळ्यासमोर येत होती, आणि अतुल अजूनच कमी वाटत होता! अशी तुलना करणे बरोबर नव्हे, तरी पण!) Interval ला तयार केलेली उत्कंठा नंतर पार ढासळली..
- अतुलचा रांगडा गुणा आणि बारिक नाच्या हे एक दोन प्रसंगात उलटे झाले आहेत. बहुतेक ते प्रसंग नंतर shoot केले असावेत.
- बेला शेंडेच्या गाण्यात आजिबात ठसका वा जोर नाही. विशेषतः "वाजले की बारा" च्या आधी ढोलकी आणि इतर वाद्यांच्या सुरेख intro piece नंतर तिची सुरुवात एकदमच फुसकी वाटली. उषा मंगेशकरांना का नाही बोलावले? त्यांचा आवाज अजूनही उत्तम आहे. वैशाली सामंतनेही दिला असता न्याय असे वाटते.
- Overall, पूर्ण सिनेमाभर मला ना कधी हसु आले वा कधी डोळ्यात पाणी आले. काही ठिकाणी कथेची वळ्णे काहीच्या काही वाटली. उतारा म्हणून नंतर "पिंजरा" ची VCD पुन्हा एकदा पाहिली. Happy

मी इथेली काल चर्चा वाचून यूटुबवर नंटरंगची गाणी पाहिली आणि बेला शेंडेंची मुलाखत ऐकली. मलाही अभिजित म्हणतो तसा बेला शेंडेंच्या आवाजात लावणाला लागतो तसा जोर .. आवाजातला ठसकेपणा नाही वाटता.

माझी मते...

अतुल कुलकर्णीने चांगलं काम केलं आहे. त्याहुन जास्ती मेहनत घेतली आहे बॉडीवर! वाढवायला/उतरवायला..
हिरॉईन देखणी आहे, सुंदर नाचते. पण गावाकडची भाषा तिनं फार न बोललेलीच बरी.
पण एकुणच चित्रपटभर कोल्हापुरकडची भाषा ऐकुन छान वाटलं.. एकदम मस्त जमला आहे हा पार्ट!
गावाकडचं वातावरण पण!

पुढारी लोकांनी सरसकट 'गुणा'कडे आकर्षित होणं खरंच पटलं नाही....
बलात्कार वगैरे उगाचच घुसवलाय असं वाटलं होतं पण अशक्य नाही म्हणता येणार कदाचित..

सगळ्यात मोठा प्लस पॉईंट म्हणजे गाणी! अप्रतीम अजय-अतुल!!!

एकुणात चांगला आहे. पण सगळे म्हणाले तितका भारी नाही वाटला..

>उतारा म्हणुन पिंजरा बघितला...
परफेक्ट! मी पण बघीन आता... Happy

पटलं नसेल मत तर नळावर भेटा.. :p

काल पाहिला आपली मराठीवर. चांगलं काम केलंय अतुल कुलकर्णीने. कठीण आहे असं नाच्याचं काम करणं. नंतर नंतर तो खराखुरा नाच्याच वाटायला लागला. त्याची जिद्द आवडली.

नटरंग पाहायची खूप उत्सुकता होती. चित्रपट सुरेखच बनवला आहे ह्यात शंकाच नाही. उत्तम कथा,संवाद, दर्जेदार अभिनय आणि संगीत ह्या साठी एकदा तरी आवर्जून पाहिलाच पाहिजे. पटकथा अत्यंत वेगवान आहे. कुठेही चित्रपट रेंगाळला आहे असं वाटत नाही. एकाही दॄष्यात ह्या प्रसंगाचे काय प्रयोजन असा प्रश्न पडत नाही ( असा प्रश्न न पडणारे चित्रपट फार मोजके असतात. ) पण कदाचित त्यामुळेच आत खोलवर पीळ पडेल इतका तो भिडतही नाही असं वाटलं. चित्रपट बघताना त्यात गुंगून जायला झालं तरी त्यानंतर खूप काळ तो मनात रेंगाळत राहिला नाही.
बेला शेंडेचा आवाज 'अप्सरा आली' चे नाजूक शब्द आणि सोनालीचं नाजूक दिसणं ह्यांना चपखल बसला असं वाटलं पण 'वाजले की बारा' आणि गवळणीसाठी दमदार आवाजाची दुसरी कुणी गायिका घ्यायला हवी होती.

अतुल कुलकर्णीची "नाच्या" म्हणून एंट्री झाल्यावर माझ्या बाजूला बसलेल्या साताठ वर्षाच्या मुलीने आईला विचारलं "हा कोण नविन आला आता पिक्चरमधे?"

यातच सर्व काही आले!! Happy

लावण्या छान आहेत. पण त्यातले कोरस फार फास्ट आहेत, शब्दही कळत नाहीत.. एखादी स्लो लावणी/बैठक टाईप असायला हवी होती... लावण्या एकाच स्टाईलमध्ये वाटतात.

मी पण पाहिला काल. काम जबरीच झालय अतुलच.. पण अगो आणि सायो म्हणतायत तसा अगदी खूप भिडला नाही. बायकोवर खूप अन्याय झाल्यासारखा वाटला. आणि शेवट नाही आवडला फारसा.

मनात आलं डोक्यात घुसलं - खूळ तमाशाचं,
कला ह्याची बावनकशी - भय कसलं मग समाजाचं.
पैसा सोडंल घरदार सोडंल - सोडंल की हो कुणी लाज,
मर्दानगीच्या गोष्टी करणारं - होईल का पर कुणी नाचं?
नावच ज्याचं गुणा - अंगी गुणांची खाण,
पुरषाच्या शरीरामधी - वागवतो बाईचा प्राण.
बाईचं घेतलं रुप स्वतः - देवानं भक्तांसाठी,
पैलवानाचा होई नाच्या - इथंच रसिकांसाठी.
ऐशी ज्याची किर्ती - देह झिजवी कलेसाठी,
मानाचा मुजरा रसिकांचा - 'अतुल' नटरंगासाठी...

ऐसी अक्षरे रसिके मेळवीन

वरील चर्चा अजिबात न वाचता (फक्त आशु चे परिक्षण वाचुन) पाहिला. धन्यवाद आशु..
अतुल कुलकर्णी व पांडबा अप्रतीम. 'अप्सरा' गाणे व नाच फार आवडले. विशेषतः गाण्याच्या हळुवार सुरुवातीनंतर 'अप्सरा आली' चा एकदम कोरस व ढोलकीथाप सुरु होते तेव्हा अंगावर काटा येतो. त्या वेळेस तो पांढरा झब्बा-पायजमा घालुन उभा आहे त्याने मस्त केलेय काम/नाच (?). खुप वेळा पाहिले ते गाणे. पहिले गाणे आता पुन्हा पहावे लागेल. सोनाली बद्दल सहमत.
वरील चर्चा आधीच वाचली असती तर कदाचीत इतके समरस होता नसते आले पाहताना. बरे झाले नव्हती वाचली. अजुन एकदा नक्की पाहणार.
( जाताजाता - ३ idiots पण अजुन पाहिला नाही त्यामुळे चर्चा पण वाचली नाहिये).

नटरंग पाहिला - पण सलग पाहता नाही आला.. त्यामुळे माझी इन्व्होलमेंट तितकी झाली नाही मुव्हीत.
हिरोईनचे उच्चार गावाकडचे नाही वाटत ओव्हरऑल..
अतुलसारख्या ताकदीच्या कलाकाराला आणखीन चांगल्या प्रकारे वापरता आलं असतं असं वाटलं.. म्हणजे त्याची तगमग तेवढी नाही दाखवलेली असं वाटलं.. भावनांपेक्षा प्रसंग ओरिएन्टेड वाटली मुव्ही.. पण वेगळा प्रयत्न म्हणून आवडला.. पुन्हा पूर्ण - सलग बघण्याचा प्रयत्न करणारे!

बेला शेंडेच्या गाण्यात आजिबात ठसका वा जोर नाही. विशेषतः "वाजले की बारा" च्या आधी ढोलकी आणि इतर वाद्यांच्या सुरेख intro piece नंतर तिची सुरुवात एकदमच फुसकी वाटली. >> अनूमोदन रे भाऊ!

वाजले की बारा अन अप्सरा आली ह्या दोन्ही गाण्यांना तिचा आवाज व पडद्यावरचा नाच हे विचित्र कॉम्बो वाटले. आवाज अजून थोडा दमदार हवा होता. तिच्या पेक्षा अप्सरा आली असे कोरस मध्ये. म्हणताना अजयचा आवाज जास्त चांगला वाटत होता.

बेला शेंडे, श्रेष्ठ शास्त्रीय गायिका आहे, तिच्या आवाजातच तो लावणीचा ठसका नाही. वैशाली सामंत चांगले गायली असती.
आशा गायली असती तर !!!

गण्यापेक्षा पांडबा, कृष्णा ह्यांचा अभिनय आवडला. गण्याचे आडनाव कुलकर्णी हे कळतं. नाच्या काही जमला नाही. ऍक्सेंट ट्रेनिंग घ्यायला हवं होतं अतुल कुलकर्णीसारख्या कसलेल्या अभिनेत्यानं. शरीरावर एवढी मेहनत घेतली. ह्या गोष्टीवर का घेतली नाही.

शेवट गुंडाळला आहे.

संगीत भव्य आहे. राम कदम ते रहमान.
माझे रेटिंग २+.

मलाही अभिजित म्हणतो तसा <<अतुल कुलकर्णी गुणा म्हणून जेवढा पटला त्याच्या निम्म्यानेही नाच्या नाही वाटला. (सारखी गणपत पाटलांनी केलेल्या उत्तम भुमिकांची द्रुष्ये डोळ्यासमोर येत होती, आणि अतुल अजूनच कमी वाटत होता!>>
अगदि बरोबर

नटरंग पाहिला. आवडला नाही. झी ने मिडिया मसल्चा पुरेपूर वापर करुन चांगलीच हवा निर्माण केली आहे. पण प्रत्यक्ष कलाकृती तितकी उजवी नाही. कथा, दिग्दर्षन आणि संकलन अगदी सामान्य. अतुल कुलकर्णीचा नाच्या मात्र देहबोलीतून सुंदर उभा राहतो. त्यामानाने त्याचा वगामधला अभिनय अत्यंत प्राथमिक आहे, पण मला वाटते तेच अपेक्षीत आहे. गुणा तब्येतीच्या बाबतीत उत्तम पण गावरान भाषेत मार खातो. काही काही संवादांमध्ये तर दहावी फ मधील अतुल कुलकर्णी बोलतोय की काय असा भास झाला. संगीत उत्तम. काव्य उत्तम.
पण एकही पात्र पुरेसे उभे रहात नाही आणि त्यामुळे कोणत्याही पात्रास सहानुभुती लाभत नाही.

मलाही नटरंगमधलं कुठलंच पात्र नीट विकसीत केलेलं नाही असं वाटलं Sad उदाहरणार्थ, गुणाला कलेबद्दल आस्था, आपुलकी आहे, कलाकार बनायची खुमखुमी आहे असं सुरूवातीला आजिबात नीट establish होत नाही. त्याला मजुरीचे पैसे मिळतात त्या सीनमध्ये तर खरंच तो बाईसाठीच तमाशा बघायला जातोय असंच वाटतं. दुसर्‍या दिवशी तो गोठ्यात झोपेतून उठताना कलेबद्दल/कलाकाराबद्दल काहीतरी बरळत उठतो तेही खास 'क्लिक' होत नाही. ते तमाशा सुरू करतात तेही नाईलाज म्हणून असंच वाटतं. त्याचं 'राजा' होण्याचं स्वप्न वगैरे तर आजिबात ठसत नाही. त्यामुळे 'खेळ मांडला', 'नटरंग' उभा' ही गाणी उत्कृष्ट असूनही त्यातल्या भावना नीट पोचत नाही, तितकी effective वाटत नाहीत सिनेमात. शेवट गुंडाळला तर आहेच. ती नैना त्याच्याबरोबर जायचं ठरवते तेही आता सिनेमा आटोपता घ्यायचा म्हणून पटकन दाखवून टाकलंय. दिग्दर्शन आणि संकलन खूपच कमी पडलंय याच्याशी १००% सहमत Sad

अतुल कुलकर्णीचा अभिनय मात्र अतिशय उत्तम. केवळ त्याच्यासाठी एकदा तरी बघावा. 'अप्सरा आली' गाण्यामध्ये मागे तो जो नाच्याचा अभिनय करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. सोनाली कुलकर्णीचा अभिनय काही खास नाही.. नुसतीच गोरी-घारी आहे, पण नृत्य मात्र छान केली आहेत सगळीच. ग्रामीण भाषेच्या बाबतीत सगळीच कास्ट जरा कमी पडली आहे. महत्त्वाचा high-point म्हणजे संगीत. सगळी गाणी छान आहेत. एकूण चांगलं दिग्दर्शन आणि technical staff मिळाला असता तर खूप potential होतं या कथानकात. अत्युच्च दर्जाची कलाकृती होऊ शकली असती.

कोणता पिक्चर बघावा अशा विचारात असताना ४-५ दिवसांपुर्वी नटरंग दृष्टीस पडला होता, अर्थात त्याबद्दल थोडं ऐकायलाही आलं होतं. पण तमाशाचं पोस्टर बघितल्यावर पुढे बघावसं वाटलं नाही. काल परत त्याची इथे चर्चा वाचल्यावर रात्री नटरंग बघायचं ठरवलं.

ही माझी मतं.
मी अभिजीतच्या पोस्टशी सहमत.

रुयाम : अतुल कुलकर्णीने चांगलं काम केलं आहे. त्याहुन जास्ती मेहनत घेतली आहे बॉडीवर! वाढवायला/उतरवायला.. हिरॉईन देखणी आहे, सुंदर नाचते. पण गावाकडची भाषा तिनं फार न बोललेलीच बरी. >>>> अगदी पूर्ण सहमत. अरे रुयाम, सोनाली कुलकर्णीला धड मराठीही बोलता येत नाही बाबा. मग ग्रामीण भाषेबद्दल न बोललेलंच बरं. मागे एका चॅनेलवर तिची मुलाखत बघितली होती. तिच्या पालकांपैकी कोणीतरी पंजाबी आहे.

पुढारी लोकांनी सरसकट 'गुणा'कडे आकर्षित होणं खरंच पटलं नाही....
बलात्कार वगैरे उगाचच घुसवलाय असं वाटलं होतं पण अशक्य नाही म्हणता येणार कदाचित..
>>>मलाही अजिबात न पटलेली गोष्ट. फक्त एक पुरूष नाच्याचं काम करतो म्हणून त्याला बाईसारखं वागवणं नाही पटलं.

एकुणात चांगला आहे. पण सगळे म्हणाले तितका भारी नाही वाटला.. >>>> मलाही.

मलाही त्यातला बलात्काराचा प्रसंग पटला नाही, पण इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, की हा सिनेमा आनंद यादवांच्या 'नटरंग' पुस्तकावर आधारित आहे.. कुणी वाचलेय का ते पुस्तक ? त्यात काय आहे याची उत्सुकता आहे.

हो, मी वाचलंय पुस्तक आणि सिनेमाही पाहिलाय.
बलात्काराचा प्रसंग अतिरंजित वाटला तरी तो पुस्तकात तसाच्या तसा आहे. सिनेमा ९०% पुस्तकाशी प्रामाणिक आहे. सिनेमा एका ठिकाणी कमी पडलाय ते म्हणजे गुणाची गरिबी किंवा तमाशा काढावाच ही अपरिहार्यता त्याच्यासमोर का उभी ठाकते?- हे दाखवण्यात. आपण कल्पना करू शकत नाही असं दारिद्र्य पुस्तकात आहे. शिवाय गुणाचं तन्द्रिष्ट असणं, वगासाठी वेडं होणं, शेतात कितीही राबलं, तरी चार टिकल्यांसाठी मालकाचे पाय चाटणं, सतत घरातल्यांच्या अपेक्षांवर कमी ठरणं- हे सिनेमात ते खूपच प्रभावीपणे दाखवता आलं असतं. तिथे सिनेमा खचितच कमी पडलाय.

तमाशा हा मुळातच अतिशय हीन व्यवसाय समजला जायचा. त्यातून नाच्या म्हणजे कोणीही वापरावा अशी जात- माफ करा या शब्दांसाठी, पण पुस्तकात अतिशय जहाल आणि सुन्न करणारं वर्णन आहे. त्यामुळे त्याच्यावर अत्याचार होणं/ करणं कोणालाच वावगं वाटत नाही, किंबहुना त्याला त्याची जागा दाखवण्याचं हेच एक साधन असतं. नाच्या म्हणजे कलाकारी नव्हे, एक न्यून- हे अजूनही आपण मानतो, त्या काळी अजून काय वेगळी अपेक्षा करणार?

माझ्या मते "वाजले की बारा" हे गाणे सा रे ग म मध्ये अभिलषा चेल्लम नी हे गाण चित्रपता पेक्षा खुप छान गायल आहे.

पूनम, पुस्तकाच्या संदर्भासाठी आभार. खुपदा पुस्तकातले महत्वाचे संदर्भच निसटतात.
या ग्रामीण भाषेची आता शहरी कलाकाराना सवयच नसते. पुर्वी लिला गांधी, हंसा वाडकर, अगदी जयश्री गडकर पण हि भाषा छान बोलायच्या. मधे गौतमने सातारी बोलीबद्दल छान पोस्ट केले होते.(शेल्फोन) एक मायबोलीकर जाता जाता जर इतके अचूक वर्णन करु शकतो, मग पुर्ण टीम हाताशी असताना, हे चित्रपटवाले का नाही अस्सल बाज आणू शकत संवादात ?

सगळ्या कलाकारांचा अभिनय सोड्ला तर या चित्रपटात पहाण्यासारखं काहिही नाही .. कथानक तर पटलच नाही..
अतुल कुलकर्णी चा अभिनय अप्रतिम . संगित श्रवणिय...
पण बाकीच सगळं उपकथानक "गुणाचा" सन्घर्ष भारी वाटावा , कला महत्वाची ,म्हणुन घुसडलेलं वाटलं..
नाच्याचा आग्रहापासुन ते त्याच्या बायकोच्या बलात्कारापर्यन्त सगळं जबरदस्ती ऊभं केलय असं वाटलं...
काही टोट्लच लागली नाही...
अतुल कुलकर्णीचा अभिनय सोड्ला तर चित्रपटात बघण्यासारखं काही आहे असं १ कण ही वाटलं नाही...

काल पाहिला, प्रचंड नाहि तरी आवर्जुन बघावा इतपत आवडला.
अभिनय आणि व्यक्तीरेखा उत्तम असल्या तरी एखादा तरी सवाल जवाबाचा प्रसंग का नाही उभा केला असं कित्तेकदा वाटुन गेलं. कोडी, कुट्प्रश्न, विनोद यांची अजून लयलुट हवी होती.
वर म्हटल्याप्रमाणे अतुलनी नाच्याची देहयश्टि तर जमवलिये पण संवाद लाडिक, पांचट आणि डोळ्यांचे विशिष्ट हावभाव दाखवत (जसे एखादा नाच्याच करू शकतो) तसे जमवुन आणायला हवे होते. तो नुसताच हळु बोलताना दाखवलाय, मधाळ नाहि...
सोनालि गोड दिसते, आणि गोडच दिसते, तिने बोलु नये बुवा काहि Happy
एकंदर छानच!!!

नटरंग पाहिला. चित्रपट आवडला. अतुल कुलकर्णीने दोन्ही भूमिका सुंदरच केल्यात. गाणीही छान आहेत. एकूणात सिनेमा एकदा तरी नक्की बघावा असा आहे.

तरी बर्‍याच लोकांशी सहमत. कलेविषयी असणारं त्याचं प्रेम जरा नीट दाखवायला हवं होतं. वर पूनमने लिहिलंय तसं गुणाचं दारिद्र्य आणि तमाशाचा निर्णय हे नीट दाखवायला हवं होतं.

मराठीत आता चांगले सिनेमे येत आहेत ह्याचा मात्र खरंच आनंद वाटला.

Pages