वो कहते है फुरसतसे...

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

एकटेपणा आणि सोबत. दोन परस्पर विरोधी शब्द आहेत. आहेत? नाहीत? नसावेत? असतील. काय माहीत.
यातला पहिला प्रश्न मी विचारलेला. उरलेली माझ्या मनाच्या जास्त ऑप्टीमिस्टिक कोपर्‍यानं गोंधळून दिलेली उत्तरं.
मी शोधायचा प्रयत्न करतेय. म्हणजे नेहमीच करते. वेळ मिळाला की. नितळ एकटेपणा मिळाला की. थोड्या वेळापुरता
का होईना.
आता थोडा वेळ कुणीही नको संवाद साधायला. माझी मी सुद्धा. हे असं पूर्वी फार व्हायचं. खूप वेळ हवा असायचा
स्वतःला आणि सगळी जिवाभावाची आजूबाजूला सज्ज असायची केवळ आपल्या आयुष्याला चांगलं वळण द्यायला तेंव्हा.
एखादी गोष्ट सरत जाते तेंव्हा किम्मत कळत जाते त्याची.
बर गं आई कितीवेळा सांगतेस? हे तेंव्हा नेहमी वैतागून, चिडचिडून येणारं वाक्य. आता कोण म्हणतंय सकाळी सकाळी
अगं घोडे आधी दूध पी आणि मग बस ना पुस्तकात डोकं घालून (किंवा फोनला कान चिकटवून किंवा टिव्हीला नाक लाऊन)
काळजी या वाक्प्रचाराचा त्या त्या परिस्थितीप्रमाणे समर्पक वाक्यांत उपयोग व्हायचा.
तीच गत मैत्रिणींची. come on. now its high time for you to get out of this.
राग यायचा ना नकोशा वाटणार्‍या सल्ल्यांचा. पण मग हीच माणसं क्वचित होतात मग दुर्मिळ होतात मग कधीतरी
लक्षात येतं किती महिने वर्षं झाली त्या गोष्टीला जेंव्हा हे जिवलग नसतील उद्या तर कसं जगणार या विचारानं
गळा दाटून आला होता.
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नाहीच पटत की जगता येईल या सगळ्यांशिवायही.
एकटेपणानं माणूस मरत नाही. नक्कीच. म्हणजे अक्खा तरी. पण कुठंतरी काहीतरी संपत जातं. मनातल्या
पालवीचं एखाददुसरं पान पिकून गळतंच.
या एकटेपणाचे दोन महत्वाचे प्रकार असतात(सततच्या संशोधनातून हाती आलेली मौलिक माहिती).
पहिला निव्वळ(ऍब्सोल्युट) एकटेपणा आणि दुसरा तथाकथित(वर्च्युअल) एकटेपणा.
वर्च्युअल एकटेपणा म्हणजे विरह असं म्हणता येईल. हवी ती माणसं जवळ नसतील तर येणारा. फोन, चॅट, मेल्स सगळं
असूनही.
अगं मला माहीतच नव्हतं ते छोट्या पानांचं झाड दिलंयस ना तू त्याला ना सुंदर गडद गुलाबी फुलं येतात
किंवा समोरच्या काकूंनी काल सही उंधियू केलं होतं असे अगदी सग्गळे सग्गळे अपडेट्स देऊनही एकमेकांबरोबर असण्याची
भूक तशीच रहाते.लग्न ठरल्यावर जर ते माणूस जवळपास रहात नसेल, रोज भेटणं शक्य नसेल तर या प्रकारचा एकटेपणा एकदम गंभीर स्वरूप धारण करतो.
पण हा बरा असा दुसरा प्रकार आहे.
ऍब्सोल्युट एकटेपणाचा. सगळं इन प्लेस आहे पण तरीही येणारा अथांग एकटेपणा. संवादशून्यता. अगदी जवळच्या
माणसाशीही काय बोलू असे प्रश्न पडणं यासारखं दुर्भाग्य नाही. त्यांचं नाही, प्रश्न पडणार्‍याचं.
अशी शांत, मूक नाती पाहिली की आवंढा येतो. इथपर्यंत कुणी स्वतः होऊन येत असेल असं वाटत नाही.
परिस्थितीच आणत असेल बहुधा.
का होतं असं? माणूस कसंही असलं तरी कुठल्याही नात्याचं असं कोम्यात जाणं नेहमी दुःखच देतं. परिस्थितीनं दूर व्हावं
लागणं हे दुःख फारच वरवरचं. पण वेगवेगळ्या दिशांना मैलोन्मैल लांब बघत शेजारी बसणं यातून येणार्‍या
एकटेपणाला फक्त रात्रीच्या गूढ आकाशाचीच उपमा देता येईल.
पूर्वी चंप्र देशपांडेंचं एक नाटक पाहिलं होतं रस्ते नावाचं (तपशिलात चूक आढळल्यास दुरुस्त करावी. शिवाय यात एक अतिशय सुंदर गझल होती. ती पण कुणाला आठवत असल्यास..) त्यात एका चळवळीत पडलेली
मुलगी खूप वर्षांनी घरी येते. इतकी आनंदाची गोष्ट पण आता या लोकांशी बोलावं असे विषयच तिच्याकडं
राहिलेले नसतात.
केवळ दया येऊ शकते अशा लोकांची. इथपर्यंत नातं येऊ नये याची काळजी आधीपासून घेणं एवढंच करता येऊ शकतं. एकदा आलं की मग औषध नाही.
यावर सुचलेली कविता हिंदीत असली तरी टाकतेय. मराठीत अनुवाद करता आला तर पुन्हा टाकेन.

वो कहते है फुरसतसे करते है बातें,
वो फुरसत की घडीयां लौटी नही है.
मैं आबाद अपनी हूं तनहाईयोमें,
ये खामोशी है जो गिला कर रही है.

विषय: 
प्रकार: 

>>मैं आबाद अपनी हूं तनहाईयोमें,
ये खामोशी है जो गिला कर रही है....

सुरेखच!! मी काही सुचवणं म्हणजे पण धारिष्ट्यच, पण विचारते, ते 'मैं आबाद हूं अपनी तनहाईयोंमें' अस हवय का ग?? पण बाकी लेख अन ही कविताही केवळ सुंदर आहे.

एकटेपणानं माणूस मरत नाही. नक्कीच. म्हणजे अक्खा तरी. पण कुठंतरी काहीतरी संपत जातं. मनातल्या
पालवीचं एखाददुसरं पान पिकून गळतंच.

सहजपणे एकटेपणाची वेदना मांडली आहेस. नात्यांची, मैत्रीची गुंफण पण जपावी लागते, खास करुन emotional लोकांच्या बाबतीत तरी नाहीतर ते आतल्याआत संपत जात.

संघमित्रा, खूप छान झालय हे अवांतर. ऐकटेपणा आणि सोबत नंतर थेट नाती ह्या विषयावर इतका छान शेवट केलास. भानावर आल्यासारखे वाटते. कारण प्रत्येकाला कुठलीनाकुठली तरी नाती असतातच. आपल्याशी असे घडू नये, म्हणून विचारप्रवृत्त करणारेही वाटले.

चंद्र देशपांडे, हे नाव मला नविनच. बहुतेक, अज्जुकाला किंवा दिनेशदांना 'रस्ते' ह्या नाटकाबद्दल माहिती असू शकेल.

ये खामोशी है जो गिला कर रही है.

बिलकुल दुरुस्त फर्माया आपने.

अगदी काही मिनीटांसाठी का होईना. कधी कधी होत अस पण. नंतर गाडी वळनावर येते.

सन्मे... खास लिहिलं आहेस. खूप आवडलं

खूपच सुंदर लिहीलं आहेस. अगदी पटलं.

परिस्थितीनं दूर व्हावं लागणं हे दुःख फारच वरवरचं. पण वेगवेगळ्या दिशांना मैलोन्मैल लांब बघत शेजारी बसणं यातून येणार्‍या
एकटेपणाला फक्त रात्रीच्या गूढ आकाशाचीच उपमा देता येईल.
>>>>>>>>>>
खरंच या सारखी दुसरी यातनामय गोष्ट नाही! नाहीतर तासनतास जिथे बोलण्यात सरायचे तिथे काही मिनिटंही बोलणं अशक्य व्हावं असं झालं नसतं :((
असं कोणाही बरोबर होऊ नये!

संघमित्रा, सुंदर!!! अगदी भावलं मनाला.

सन्मे, अगदी आतलं आहे हे..... बस्स, इतकच.

सन्मे, खुप खुप भावलं. जवळुन अशा एका एकट्या पडलेल्या व्यक्तिला बघितलय.... वाचताना आठवणीने घळाघळा रडायला येत होते आणि कविता तर जबरदस्त..."खामोशी का गिला" सुभान अल्लाह!!!
शिवाय... माझही नुकतच त्या नाटकातल्या मुलीसारखच झालं... खुप वर्षानी मी माझ्या जिवलग लोकांना भेटली. खुप बोलायचे होतं पण नाहीच बोलता आल ग Sad का ते अजुनही कळत नाही...
-प्रिन्सेस...

खुप छान आहे...... पण एकटेपणा कोनाला आवड्तो इथे? म्हणुनच मग आपण नविन नाती निर्माण करतो. त्यात गुंतुन जातो. जसे जवळ येणे अपरिहार्य तसेच दुर जणे पण. मग आपण भाणावर येतो. पुन्हा एकटे होतो. पुन्हा ती अश्वत्थाम्यासारखी भळभळणारी जखम घेउन नविन नात्याच्या शोधात फिरत रहतो.

तुम्ही वाचलंत आणि लिहीलेलं तुमच्यापर्यंत पोचतंय हे खूप आहे माझ्यासाठी.
बर्‍याचदा असं होतं की जे म्हणायचं असतं ते तितक्या इंटेन्सिटीनं कधीकधी लिहिता येत नाही.
शैलजा सुचलं तेंव्हा आता लिहीलंय तसंच वाक्य घुमत होतं मनात. ते खटकत होतं म्हणून तू म्हणालीस अगदी तशीच दुरुस्ती सुचली होती.
पण त्यातून मी आपली ठीक आहे एकटेपणात असा तडजोडीचा भाव जाणवला म्हणून तसंच ठेवलं.
(काय पण रसग्रहण! Happy )
पूनम खरंय गं जवळच्या माणसाचं दु:ख आठवूनही त्रास होतो.

फार त्रास दिलास गं सन्मे!

खूप खूप काही राहून गेलं
आणि त्याशिवायच माणूस हरवलं

परत परत अधोरेखित झालं!

आणि एकमेकांबरोबर असण्याची भूक!

सहीच. अपडेटस येवु द्या डीटेलमध्ये Proud

संघमित्रा,
तु वर्णन केलेले कितीतरी लोक आजुबाजुला बघीतलेत, काही तर अगदी जवळचेपण. वाईट वाटतं बघुन.
विचार करुनही नात्यांच अस का होत असेल आणि याच्यावर योग्य उपाय काय याच स्वतःला समाधानरक उत्तर मिळत(च) नाही.

छान आहे जाणवत असते हे बर्याच वेळा

मनातला पिळ अजुन घट्ट केलास संघमित्रा!! हल्ली ही वेळ माझ्यावर बर्‍याच्दा येते. मनाच्याह्या अवस्थेत खुप त्रास होतो, आणि तो कुणाला सांगायचा? ज्यांना हक्काने सांगावे, ते दोघेही खुप दुर निघुन गेलेत. Sad

विषयांतर झाले. लेख खुपच ट्ची झालाय.

हल्ली ही वेळ माझ्यावर बर्‍याच्दा येते. मनाच्या ह्या अवस्थेत खुप त्रास होतो, आणि तो कुणाला सांगायचा? ज्याला हक्काने सांगायला जावे,
त्यालाहि मी काय बोलतेय ते कलत नाहि.

ईन्टेन्स!! फार फार! अगदी आत रुतलं Sad

एक जखम खपली निघून वाहु लागली...

आणि जाणीव सुधा झाली, असं वाटणं माझ्या एकटीचं नाही.
हायसं का काय तेच वाटलं! एकटं नसणं हे ही किती चांगलं फीलींग असतं कधी कधी!

>>ऍब्सोल्युट एकटेपणाचा. सगळं इन प्लेस आहे पण तरीही येणारा अथांग एकटेपणा. संवादशून्यता. अगदी जवळच्या माणसाशीही काय बोलू असे प्रश्न पडणं यासारखं दुर्भाग्य नाही. त्यांचं नाही, प्रश्न पडणार्‍याचं.
>>परिस्थितीनं दूर व्हावं लागणं हे दुःख फारच वरवरचं. पण वेगवेगळ्या दिशांना मैलोन्मैल लांब बघत शेजारी बसणं यातून येणार्‍या एकटेपणाला फक्त रात्रीच्या गूढ आकाशाचीच उपमा देता येईल.

>>एकटेपणानं माणूस मरत नाही. नक्कीच. म्हणजे अक्खा तरी. पण कुठंतरी काहीतरी संपत जातं. मनातल्या
पालवीचं एखाददुसरं पान पिकून गळतंच.

हे सगळं म्हणजे........... आपल्याच मनातलं कुणीतरी भडाभडा बोलून टाकल्यासारखं वाटतंय.
नि:शब्द करणारं आहे!! जबरदस्त!!!

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
>>ओरडता येत नाही अशी वेदना आणि मूक राहता येत नाही अशी अनुभूती!
अनुमोदन आंद्या

>>>>>>>इतकी आनंदाची गोष्ट पण आता या लोकांशी बोलावं असे विषयच तिच्याकडं
राहिलेले नसतात.
केवळ दया येऊ शकते अशा लोकांची. इथपर्यंत नातं येऊ नये याची काळजी आधीपासून घेणं एवढंच करता येऊ शकतं. एकदा आलं की मग औषध>>>>>>>>>>>>>

अगदी मनातल लिहल आहे.... अगदी थेट माझ्या मनातला अनुभव उतरवला आहे इथे ...!!!

बाकी लेख अशक्य सुन्दर !!!! Happy