हरिश्चंद्रगड : नळीच्या वाटेतून..

Submitted by Yo.Rocks on 18 December, 2009 - 15:43

ट्रेकर्सलोकांची पंढरी म्हणुन प्रसिद्ध असलेला हरिश्चंद्रगड अनेक संधी मिळुनसुद्धा पहायचा राहिला होता.. पण अचानक माझ्या आवडत्या "ट्रेक मेटस" ग्रुप बरोबर जाण्याची संधी मिळाली.. ती सुद्धा "हरिश्चंद्र व्हाया नळीची वाट" या मार्गे !!!

हरिश्चंद्रगडावर जाण्यास असलेल्या अनेक वाटांपैंकी दोन नंबरची ही अवघड वाट.. एक नंबरवर अर्थातच कोकणकडाची वाट आहे !!

म्हटले इकडुन आपल्याला एकट्यादुकट्याला काही जाता येणार नाही म्हणुन लगेच मी जाण्याचे नक्की केले.. त्याचबरोबर सुन्याला (पुण्यातील मायबोलीकर, गजालीकर) फोन करुन प्लॅन सांगितला.. तोदेखिल लगेच तयार झाला.. १२-१३ डिसें. असा शनि-रविवार दोन दिवसाचा ट्रेक होता.. पण शुक्रवारी रात्रीच निघायचे ठरले होते.. कल्याणला रात्री १०.३० ला भेटण्याचे ठरले.. तिथुनच मग एसटीने ८० किमीचा प्रवास करायचा होता.. पुण्याहुन येणारे ५-६ जण थेट बैलपाडा (गडाच्या पायथ्यालगतचे गाव) इथे भेटणार होते..

कल्याणहुन निघण्यास थोडा उशीर झाला.. नि मग एसटीने कल्याण् ते टोकावडे पर्यंत प्रवास केला.. आम्ही टोकावडेला रात्री दोनच्या सुमारास आधीच बुक करुन ठेवलेल्या जीपची वाट पाहत बसलो.. नि काही वेळेतच दोन जीप हजर झाल्या नि तेथुन पुढे रवाना झालो.. नि ठरल्याप्रमाणे आम्ही मोरोशीला येउन पोहोचलो.. बैलपाड्याऐवजी इथेच पुणेकर येताहेत असे कळले.. खरे तर इथुन पुढचा प्रवास पायी करायचा प्लॅन होता पण नशिबाने तो कॅन्सल झाला Happy पुणेकरांची वाट बघत असतानाच थंडीचा जोर वाढु लागला नि तेव्हाच गडावरती काय हालत होणार याचाही अंदाज आला.. काही अवधीतच पुणेकर आले, जीपमध्ये चढले नि आम्ही बैलपाडयाला (वलिव्हरे) रवाना झालो.. पुणेकर जीपमध्ये चढताना मी अंधारातच सुन्या सुन्या ओरडु लागलो ! तो इकडे तिकडे शोधत होता.. (तसा मी त्याच्या बाजुलाच होतो ) ही आमची पहिलीच प्रत्यक्षात भेट होती Proud त्यामुळे मायबोली अंदाजातच आमची भेट झाली.. Happy

तीन साडेतीनच्या सुमरास आम्ही बैलपाड्याला पोहोचलो.. तसे म्हणावे तर छोटेच गाव.. तिथेच एका घराच्या समोर शेणाने सारवलेल्या मोकळ्या अंगणात आम्ही झोपण्यासाठी तयारी करु लागलो.. कधी एकदाची सकाळ होतेय नि चढाईला सुरवात करतोय असे झाले होते.. काय करणार.. झोप उडाली होती, रात्र थंडीची होती Proud
आकाशात तांबडे पसरताच गावाच्या मागे डोलाने उभा असलेला हरिश्चंद्रगडाचा डोंगर नजरेस पडला..
IMG_0432.jpg
चहापाणी आटपताच ओळखपरेड झाली नि सगळ्यांचा मोर्चा गडाकडे वळाला ! डोंगरमाथ्यांशी सुर्यकिरणांचा चालणारा लपाछपीचा खेळ बघत आम्ही पुढे चालु लागलो..
IMG_0448.jpg

सगळ्यांचे कॅमेरे एव्हाना "क्लिक क्लिक" ओरडु लागले होते.. काही अवधीतच रानातुन जाणार्‍या पाउलवाटेचा अंत झाला नि अतिशय सपाट, पायांना जराही त्रास न देणारी वाट लागली.. खालच्या फोटोतुन अंदाज येईलच Proud

IMG_0434.jpg

असल्या या "डिंगडाँग" वाटेचा आस्वाद घेत आम्ही इकडुन तिकडुन उड्या मारत मार्गाक्रमण चालु केले.. Proud मला तर "क्रिश" मधला असाच उड्या मारणारा ऋतिक रोशन आठवला ! Happy

या वाटेचे रहस्य म्हणजे इथुनच पावसाळ्यात येथुन पाण्याचा प्रवाह वाहतो.. म्हणुनच सगळीकडे डोंगरावरुन वाहत येणारे दगडधोंडे नि मोठाले खडक दिसत होते.. इथे म्हणे दर पावसाळ्यानंतर इकडचा मार्ग बदलतो !! नळीची वाट म्हणजेच घळीची वाट.. डोंगररांगाच्या घळीतुन वाट जात असल्याने या वाटेला 'घळीची वाट' म्हणतात.. पण घळीचे नळी कसे झाले वा का म्हणतात ते ठाउक नाही.. (असेही म्हणतात की कोकणकड्याचा आकार हा घोड्याच्या नाळीसारखा असल्याने "नाळीची वाट" म्हणतात.. पण ही वाट कोकणकड्याच्या बाजुने जाते.. ) असेही ऐकुन होतो की पावसाळ्यात इथुन गडावर चढायचे म्हणजे मरणाशी दोन हात करणे !

आम्ही अशाच उड्या मारत मारत एका Giant Step (ही देखील नैसर्गिक पायरीच) जवळ येउन पोहोचलो.. इथेच पाण्याची छोटी वाहती धार असल्याने आम्ही काही मिनिटांपुरती विश्रांती घेतली..
इथुन वरती पाहिले तर कोकणकड्याची भिंत आपल्या उंचीची जाणीव करुन देत उभी होती !!

IMG_0437.jpg

थोड्याच वेळात वाट वरती सरकु लागली.. चढण सुरु झाले होते.. पंधरावीस मिनीटातच चढ असलेल्या या वाटेने जोर घेतला.. आधीच ही वाट म्हणजे दगडघोंड्याचे भंडार होते त्यामुळे लौकरच एका ठिकाणी सावलीत विश्रांतीसाठी थांबलो.. 'ही शेवटची मोठी सावली.. दम घेण्याची शेवटची संधी.. खाउन घ्या, विश्रांती करा नि मग जवळपास अर्धातास तरी फक्त उन्हातुन चढायचेच आहे..' असे सांगण्यात आले.. पण सकाळची वेळ असल्याने कोवळे उन अंगावर झेलण्यास काहीच वाटत नव्हते.. थंडगार झुळुकही अधुनमधुन गारवा देत होती.. असे पुढे चढता चढता पहिल्या घळीचे दर्शन झाले.. आहाहा ! काय जबरी वाटत होते.. दोन्ही बाजुला दोन अवाढव्य पहाड.. नि त्या पहाडाच्या घळीतुन वाहणारा हा दगडी प्रवाह !!!!

IMG_0462.jpg

लिडरने सांगितले दोन पहाडाच्या मधुन जो मध्यभागी पहाड दिसतोय त्याला वळसा घालुन जायचे आहे !!
आमची उत्सुकता आणखीनच वाढली.. सगळेजण फौजीप्रमाणे उड्या मारत पुढची वाटचाल करु लागले..
IMG_0463.jpg

आमच्यातले काही पटापट चढत डाव्या बाजुच्या पहाडाच्या असणार्‍या सावलीपर्यंत जाउन पोहोचलो.. तिथुन मागे वळुन पाहिले नि...
IMG_0470.jpg

लै भारी.. तिथेच क्षणभर विश्रांती करुन फलाहार करुन आम्ही पुढे निघालो.. वाटेत काहीच बदल नव्हता. फक्त दगडधोंड्याचे आकार बदलत होते Proud
आम्ही सावलीचा आसरा सोडला नि मागे वळुन पाहिले..
IMG_0483.jpg

इथुनच पुढे काही अंतरावर आम्ही एका निमुळत्या जागेत येउन पोहोचलो.. इथेच दहा पंधरा फुटीचा रॉक पॅच होता.. जो बॅगेसकट करणे थोडे कठीणच होते.. त्यामूळे प्रथम सगळ्यांच्या अवजड बॅगा पुढे ढकलण्यात आल्या तो क्षण..
IMG_0484.jpg
इथे ज्यांना फ्रि क्लायम्बिंग करत चढायचे होते त्यांना चढु दिले तर इतरांसाठी दोर लावला.. मी आणि सुन्या फ्रि क्लायंम्बिंग करतच वर पोहोचलो.. ती मजा काहि औरच ! इथे फक्त एकच अडचण होती.. वरती पोहोचताना पायाखालची दगडमाती सरकायची नि त्यामुळे लगेच खाली अरुंद जागेत उभे असलेल्यांना "डोकेबचाव आंदोलन" करावे लागत होते Proud
IMG_0492.jpg
सगळे तेथुन वरती आल्यावर आपापल्या बॅगा घेत पुन्हा चढाई सुरु केली.. आता वाट अधिकाधिक ढिसूळ बनत जात होती..
IMG_0510.jpg
सुट्या दगडधोंड्याचा पसारा पडला होता.. वर वाट चढणीची.. त्यामुळे कुठला दगड ढासळु शकतो याचा अंदाज घेत सगळे काळजीपुर्वक चढत होते.. तरीपण एखादा दगड निघालाच वा पायाखालचा दगड सरकला तर लगेच "watch out" ओरडायचे.. म्हणजे मागाहुन येणारा सावध होत होता.. हाच खरा या ट्रेकींगमधला थरार होता..

चढतानाच पावसात इथे काय हालत असेल याची कल्पना आली.. वाहत्या पाण्याचा जोर, निसरडी वाट नि पाण्याबरोबर ओघळत येणारे दगडधोंडे ! वेड्यागत धाडस करण्याजोगेच ठरेल.. तरीपण असे नको ते धाडस करणारे काही शुरवीर आहेत !!!

''चला लवकर, अजुन बरेच रॉक पॅच वाट बघताहेत'' असे म्हणत लिडरलोक्स सर्वांना उत्तेजीत करत होते.. सगळेजण स्वतःला जपत योग्य त्या वाटेने पुढे सरकत होते.. वाटही तशी अधुनमधुन अरुंद होत होती.. आमचा एक लिडर काहिजणांना घेउन पुढे गेला जेणेकरुन त्याला दुसर्‍या रॉक पॅचसाठी दोर लावता येईल.. हा रॉक पॅच तसा दोर लावुनच पण बॅगेसकट पार करायचे ठरले होते ! इथे परिस्थिती वेगळी होती.. कारण पकड सकटली तर घरंगळत खाली ! सर्वात अवघड रॉक पॅच होता.. त्या जागी नीट उभे रहायला जागा नसल्याने सगळे सावरुन एकामागोएक रांगेत बसले..
OgAAAPwEZSEK8EhYbZ-FjVa-iUmUKCs__GFAXnd0_XVwbxQg5VKKsZT5HdraXjax0z0GhRLkoVSywcZ01fdBHcSobzMAm1T1UI32nhRQ1K8HTE82LN13bMh5R1wo[1].jpg

दुसरा पर्याय नव्हता तिथे.. तेवढ्याच जागेत बसायला, स्थिर व्हायला जागा होती.. उजवीकडुन सुट्या दगडांची निसरडी वाट होती जिथे उभे राहणे अवघड होते.. तिथुन घसरलात तर घरंगळत जिथुन वरती आलो पुन्हा त्याच जागी..!!! डावीकडे तर त्याहुन खाली जायला शॉर्टकट होता.. Proud
IMG_0523.jpg

वरती पाहिले तर एक लिडर तसाच फ्रि क्लायम्बिंग करत रॉक पॅच चढुन गेला होता.. शेवटी त्यालाच दोर टाकायचा होता.. तर दुसरी लिडर खाली चढणार्‍यांना सुचना देण्यासाठी उभी होती.. कमरेला दोरी बांधण्याचे कामही चोखपणे पार पाडत होती..
या रॉक पॅचमध्ये खर्‍या अर्थाने कसोटी होती.. कारण पकड मिळवणे फार जिकरीचे काम होते.. अर्थातच बर्‍याच जणांची त्रेधापट झाली चढताना...
IMG_0534.jpg
-------------------
IMG_0538.jpg

माझा नंबर शेवटुन चौथा असल्याने प्रत्येकाचे चढतानाचे प्रयत्न बघताना मजा आली.. पण दोघा तिघांचा तोल जाताना बघुन काळजाचा ठोकाही चुकला ! थोडेही इकडचे तिकडे झाले की दोरीला घेउन "लटकेराम" बनत होते.. हे बघुन माझ्या आधी नंबर असलेल्या मुलीचा धीरच खचला.. शेवटी कसेबसे ती तयार झाली नि सफाईने तीने पॅच सर केला..

या पॅचने वरती गेले की तिथुनच कड्याच्या भिंतीला चिकटत हळुहळु पुढे सरकायचे होते..
IMG_0537.jpg

मघाशी खालुन घळीमधुन दिसणार्‍या पहाडावर आम्ही एव्हाना पोहोचलो होतो नि तिथुनच वळसा घालत सगळे एके एक करत पुढे सरकत होते ! तिथुनच एका ठिकाणी धोकादायक वळण घेउन तिसर्‍या रॉकपॅचपाशी येउन पोहोचलो ! तसे म्हणायला उभे रहायला फारशी जागा नसल्याने ग्रुपमध्ये फाळणी झाली होती.. बरेचसेजण पुढे गेले होते.. इथुनच मागे वळुन पाहिले तर दृश्य छानच होते..

IMG_0556.jpg

तिसर्‍या रॉकपॅचच्या वरती पाहिले तर सुन्या वरती दगडावर माझी वाट बघत मस्तपैंकी पहुडला होता.. हा पॅच फारच छोटा जवळपास आठ फुटी होता.. पण इथेही कोणी वर चढला की दगडमाती पडत होतीच !(एकाच्या डोक्यावर टेंगूळ आलेच !!) इथेही वरती पोहोचताना पकड नसल्याने दोर लावणे जिकरीचे होते ! इथे लिडरलोकांचे मदतनीस याबाबत काळजी घेत होते.. इथे चढताना तर त्या घाबरलेल्या मुलीने चढताना अचानक रडायलाच सुरवात केली..! का ते कळले नाहि.. हा पॅच त्यामानाने बराच सोप्पा होता.. (कदाचित आधीच्या रॉक पॅचच्यावेळी रडायचे विसरली असेल Proud ) समजवुनदेखील समजत नव्हती... शेवटी कसेबसे तिला वर चढवण्यात लिडरलोकांना यश मिळाले नि तेव्हा कुठे ती शांत झाली.. हे दोन रॉक पॅच करेस्तोवर बराच अवधी गेला त्यामुळे पुढे असणारे वरती निघुन गेले होते..
IMG_0558.jpg
हा पॅच चढुन झाल्यावर आम्ही पेट्पुजा केली नि पुढे चढु लागलो.. आता आम्ही जवळपास शेवटच्या टप्प्यात होतो.. इथुन चढताना तर कुठल्या दगडावर विश्वास ठेवावा हेच कळत नव्हते.. पुर्णतः निसरडी अशी वाट पार करत आम्ही एकदाचे घळीतुन पुर्णतः वर आलो !
घळ संपली पण रॉक पॅच काही संपत नव्हते.. आता पठरावर जाण्यास अजुन एक पॅच सर करायचा होता.. इथे अजुन एकाने आत्मविश्वास गमावला ! पुढे येण्यास तयारच नव्हता ! खरे तर सर्वात बर्‍यापैंकी सोप्पा पॅच होता.. पण हे बाजीराव बसले ते बसले ! त्याच्यासाठी खास दोर लावला.. पण ऐकेनाच ! शेवटी लिडरने खडसावले 'इकडुन यायचे नसेल तर जिथुन वरती आलो त्याच वाटेने तुला खाली उतरावे लागेल.. ते देखिल अंधारात !" तेव्हा कुठे तो नाईलाजास्तव तयार झाला.. Happy एव्हाना संध्याकाळचे पाचसाडेपाच झाले होते.. सकाळपासुन आम्ही जल्ला चढतच होतो Proud
वाटले होते सुर्यास्त बघण्याची संधी हुकणार ! पण वेळीच मी, सुन्या आणि दोघेचौघेजण पुढे गेलो.. आमच्यापुढे गेलेले ट्रेकर्स एव्हाना कोकणकड्यावर पोहोचले होते ! पण आम्ही सुर्यास्ताच्या मंदधुंद प्रकाशात फोटोशुट करत बसलो..
IMG_0587.jpg
(सूर्य न्याहाळताना सुन्या )
------
IMG_0572.jpg

आता अंधार होण्याच्या आत कोकणकड्यावर जायचे होते.. वाटेतच पाणी लागले नि कोरड्या घश्यामुळे मला ते पाणी "फुंकर" मारुन पिण्याचा मोह आवरला नाही.. Proud
IMG_0594.jpg
(पाणी खराब होउ नये म्हणुन हात न बुडवता पाणी पिण्याची ही ट्रेकर्सलोकांची खास शैली Proud )

पुढे पठारावरुन पुन्हा वाट गर्द झाडीत शिरली.. तिथुनच पुढे एक शेवटचा रॉक पॅच पार करत आम्ही कोकणकड्याच्या पठारावर पोहोचलो ! पुन्हा सगळे एकत्र झाले.. इथे हवेचा जोर साहाजिकच वाढला होता.. अंधार पडल्याने कोकणकड्यावर पुन्हा सकाळी येण्याचे ठरले.. मग तिथुनच कॅम्पफायरसाठी जवळपासच्या जंगलातील सुकी लाकडे तोडुन आणली नि आम्ही गडावरील गुहेच्या दिशेने निघालो.. प्रत्येकाच्या हातात टॉर्च नि आपापल्या ताकदीप्रमाणे लाकडांची मोळी होती.. !! पाठीला बॅगेचे वजन होतेच ! काही झाले तरी मस्त वाटत होते.. गारव्यामुळे थकव्याचा प्रश्णच नव्हता.. माझ्यासाठी अशी रात्र अनुभवण्याचा पहिलाच अनुभव असल्याने सहीच वाटत होते..

वीस मिनीटांची वाट तुडवल्यानंतर आम्ही एका जागी थांबलो जिथुन दुरवर (अंदाजे एक दोन किमी अंतर) गुहेतील कॅम्पफायरचा प्रकाश नजरेस पडला.. तेव्हाच गुहेत जागा नसेल हा अंदाज खरा ठरला.. शेवटी आम्ही तिथेच उघड्यावर राहण्याचा ठराव मांडला.. तिथेच कॅम्पफायर करण्यात आली..
IMG_0618.jpg
तिथे असलेल्या गुहेत दर विकेन्डला "बद्री" नावाचा आचारी असतो जो जेवणाची सोय करुन देतो.. त्यालाच ऑर्डर देण्यात आली.. काहि जण मग थोड्या अंतरावर असणार्‍या हरिचंद्रेश्वर मंदिरातुन पाणी घेउन आले.. हे पाणी खुपच गार पण पिण्यास योग्य आहे.. जेवण आटपलानंतर झोपताना दोन पर्याय ठेवण्यात आले.. ज्यांना गुहेत झोपायचे होते त्यांच्यासाठी खास सोय करण्यात आली.. (थंडीच तेवढी जबरदस्त होती ) बाकी आम्ही सगळेजण इथेच आकाशातील चांदणे बघत झोपण्याचे ठरवले.. चारी बाजुंनी असलेल्या मिट्ट काळोखात अंगाला झोंबणारा वारा झेलत आकाशातील "तुटणारे" तारे बघताना मस्तच वाटत होते !
जाकीट, चादर नेउनसुद्धा फायदा नव्हता.. सारे ओलसर पडले होते.. त्यामुळे झोपेचे अपेक्षेप्रमाणे खोबरे झाले.. मी आणि सुन्याने तर कॅम्पफायरमध्ये लाकडं टाकत रात्र काढली !
पहाटे पाचला उठुन तारामती (कळसुबाईनंतरचे दुसरे सर्वोच्च शिखर) करण्याचे ठरले होते.. पण थंडीचा जोर बघता कोणीच अंथरुणातुन बाहेर पडण्यास तयार झाले नाही.. त्यामुळे माझी नि सुन्याची थोडी निराशाच झाली.. Sad तारामती राहिलेच.. कारण अजुन हरिश्चंद्रेश्वर मंदीर, पुष्करणी तलाव, गुहेतील मोठे शिवलिंग बघायचे बाकी होते.. शिवाय कोकणकड्याला पुरेसा वेळ द्यायचा होता.. हेच करताना सकाळचे दहा वाजणार होते.. नि त्याच सुमारास तोलारखिंडमार्गे उतरण्याचे ठरले होते..!!
निटसे उजाडल्यानंतर आम्ही चहापाण्यासाठी गुहा गाठली..इथेच बाजुला गणेशगुहा आहे..
IMG_0628.jpg
तिथेच मग चहापाणी आटपुन आम्ही कोकणकड्यावर जायला निघालो.. नैसर्गिकरित्या तासलेल्या या कोकणकड्याची खोली (जवळपास ४००० फुट) डोळ्यांनी मोजण्याची मजा काही औरच !
yo n sunya.jpg
(दोन मायबोलीकर Happy )
----------
IMG_0642.jpg
------
IMG_0632.jpg
(कोकणकड्याचा मध्यभाग)
_____
OgAAAN_QQfx7f73GYHr2f0nszQpn8_TQdhDlO_CbZ10OQBlp91DT5qOpGCR4bi9218gtF-eCHVwZEQR2PqsK3bb2X00Am1T1UJxG7C0zj4hVR7QTFbtsWSVvBOze[1].jpg
(दुरवरुन घेतलेला कोकणकड्याचा फोटो - डावीकडील बाजू)
खोली बघुनच ठरवले याच कड्यावरुन एकदातरी "रॅपलिंग" करायलाच हवी.. Proud
तिथुनच मागे फिरत आम्ही पुन्हा गुहेपाशी नाश्त्यासाठी आलो.. इथुन हरिश्चंद्रेश्वर मंदीर सोनेरी उन्हात छानच वाटत होते.. हेमाडपंथीच्या बांधणीत असणारे नि पुष्पकरणी तलावाच्याबाजुस असलेले हे जुने मंदिर न्याहाळण्यात खरा आनंद मिळत होता.. बराचसा भाग उद्धव्स्त आहे.. शिलालेख, कोरीवकाम ध्यानपुर्वक बघितले असता नजरेस पडते..
IMG_0630.jpg
---
या मंदिराच्या दोन्ही बाजूस असणार्‍या प्रवेशद्वारावर नंदीची दगडी मुर्ती आहे.. मागच्या बाजुने घेतलेला हा एक फोटो..
IMG_0676.jpg
इथुनच मग या मंदीराच्या बाजुस असलेल्या केदारेश्वर गुहेपाशी गेलो... याच गुहेत भल्यामोठ्या आकाराचे प्राचिन शिवलिंग आहे.. चारही बाजुने ढोपराएवढे पाणी (अतिशय थंड) होते.. इथे असणार्‍या चार खांबापैंकी एकच खांब शिल्लक आहे..
IMG_0689.jpg
तारामती शिखर सोडले तर बाकी सर्व गोष्टी पाहुन आम्ही साधारणता सकाळी अकराच्या सुमारास परतीची वाट धरली.. वाटेतच बालेकिल्ला नजरेस पडला.. येताना 'नळीच्या वाटेने' आलो असल्याकारणाने ह्या वाटेत काहीच दम नसल्यासारखे वाटत होते.. पटापट सात डोंगर उतरत आम्ही दुपारी १ च्या सुमारास पायथ्याशी आलो.. तिथेच एका घरात जेवणाची ऑर्डर देउन आम्ही जवळच असणार्‍या खिरेश्वराच्या प्राचीन शिवमंदीरास भेट दिली.. या मंदिराची रंगरंगोटी सोडली तर फारशी डागडुजी झालेली दिसत नाही.. पण या मंदीराच्या बाहेरील सभामंडपाचे छत बघण्यासारखे आहे..
IMG_0716.jpg
---
IMG_0717.jpg
इथुनच पुन्हा जेवणासाठी परतलो.. नि जीपनेच खीरेश्वर गावातुन खुबी फाट्यापर्यंत जाण्याचे ठरले.. हे अंतर म्हणजे धरणावर बांधलेला कच्चा रस्ता ! एकाच जीपमधुन आम्ही २२ जण प्रवास करणे खरच अवघड आव्हान होते पण आम्ही ते लीलया पेलले !:P
IMG_0742.jpg
लौकरच आम्ही गावाबाहेरील हायवेला येउन पोहोचलो.. पण आमचा ट्रेक काही संपला नव्हता.. इथुनच मग ट्र्क, टेम्पो सारख्या गाडीकडे लिफ्ट मागुन जायचे होते.. सुन्याला पुण्याकडे जाणारा ट्र्क लगेच मिळाला मात्र आमचा एक तास लिफ्ट मागण्यातच गेला.. त्यातही धमालमस्ती केली गेली.. शेवटी एका छोट्या पण ओपन टेम्पोतुन आम्ही मार्गस्थ झालो.. ! अंधार पडल्याने नि आमचा टेम्पो ओपन असल्याने इथेही थंडीने आमची काही मुंबई येईस्तोवर पाठ सोडली नाही Happy
पण एकंदर दोन अडीच दिवसांत झालेला "कल्याण-मुरबाड-टोकावडे-मोरोशी-वालिव्हरे (बैलपाडा)-नळीची वाट-कोकणकडा-हरिश्चंद्रगड-तोलारखिंड-खिरेश्वर-खुबीफाटा-माळशेजघाट-कल्याण्" हा प्रवास अविस्मरणीय ठरला ! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त झाला हा ट्रेक तुमचा, वाचायला मजा आली आणि फोटो तर नेहमीप्रमाणेच अफलातुन आहेत प्रश्नच नाही.
त्या मुलीला विचारले की नाही शेवटी का रडत होती ती ते? Proud

सही वर्णन नी फोटो.
ते रॉकी पॅचेस तर खतरनाक आहेत. बघूनच हॅटस ऑफ.
>>> चढताना तर त्या घाबरलेल्या मुलीने चढताना अचानक रडायलाच सुरवात केली..! का ते कळले नाहि.. हा पॅच त्यामानाने बराच सोप्पा होता.. (कदाचित आधीच्या रॉक पॅचच्यावेळी रडायचे विसरली असेल>>>>
नाही, मला वाटतं कल्पना/अपेक्षा नसतानाही मी एवढं कसं चढू शकले ह्या विचाराने गहिवरुन आलं असेल तिला. Proud

यो रॉक्स, एकदम छान वर्णन आणि फोटू तर लय भारी. या वाटेने जाण्याचा अनुभव घ्यायचाच आहे अजूनतरी. बघुया केव्हा जमतंय ते.
पण एवढ्या जिकीरीच्या वाटेवर सुद्धा तुम्हांला कॅमेरा काढून फोटो काढायचं सुचलं हे ही नसे थोडके. आत्ताच एका मित्राचा या वाटेवरुन जाताना हात फ्रॅक्चर झालाय.

मस्त फोटो आणि वर्णन Happy
ट्रेकर्स आणि हरिश्चंद्रगड यांच नातं खुपच जुनं आहे. Happy
नाणेघाट आणि हरिश्चंद्रगड नेहमीच ट्रेकर्सना भुरळ घालतात.

जबरदस्त..
एकदम छान वर्णन.इतका अवघड ट्रेक पार पाडल्याबद्दल अभिनंदन!
पण एवढ्या जिकीरीच्या वाटेवर सुद्धा तुम्हांला कॅमेरा काढून फोटो काढायचं सुचलं हे ही नसे थोडके.

Lol
खास यो ष्टायलीत वृतांत.
मला नाय वाटत मी कधी नळीच्या वाटेन जाइन अस. Proud

बाकी कोकणकड्याची खोली मोजतानाच्या फोटुत टोपी खाली पडली नाही ते बर झाल. नायतर..... Proud

---------- दोन माबोकरांचा सर्वांत उंचावरचा 'गटग'----------

पुण्यातून आलेले आम्ही गाडीच्या जवळ पोहचल्यावर योगीने सुन्याSSSSSS..सुन्याSSSSSS ओरडायला चालू केले. मी जरा मजा बघू म्हणून गप्पच राहीलो. गाडीत त्याच्या बाजूलाच जावून उभा राहीलो.
योगीला कळेना की पुण्यातल्या ४ जणांमध्ये मायबोलीकर सुन्या कोणता ! योगीचे अंधारात सुन्याSSSSSS... चालूच होते. मग मला पण मग रहावेना. मी पटकन 'हे योगी' केलं. खरतर 'भरत भेटीचा सीन’ करायचा होता पण गाडीत जागा कमी आणि योगी बसलेला आणि मी उभा असल्यामूळे हातात हात घेवूनच भेट झाली. त्याच्या बाजूलाच जरा जागा करून बसलो..
यापुढचा 'गटग वृत्तांत' वर लिहीलाच आहे. Happy

योगी, मस्तच लिहीलस रे ! Happy

वरुन घेतलेल्या रॉक पॅच क्लायंबींग चा फोटू आहे ना तो अक्षरशः मीच वर उभी राहून खाली बघतेय असं वाटलं आणि चक्क चक्कर आल्यासारखं वाटलं. (डोकेबचाव आंदोलन खालचा).

ह्या गडावर ट्रेकर्स व्यतिरिक्त कुणी जातं का?

अश्विनी.. ही अवघड वाट नेहमीच्या वापरातली नसल्याने (नि तसे शक्यही नाही) ट्रेकर्सच(तेही क्वचितच) जातात.. पावसाळ्यात खुपच धोकादायक नि उन्हाळ्यात खुपच तापदायक !!

काय जबरदस्त फोटो आहेत... फोटोमुळे कळलं की किती सही/अवघड आहे हा मार्ग ते... माझा एवढा दम नाही Sad
बरं झालं तू दर्शन करुन देतो आहेस ते... असंच येउ दे...
कीप रॉकिंग!!!

Pages