लगता नहीं है दिल मेरा , उजडे दयारमें ........

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

दि. १२ डिसेम्बर २००९
रत्नागिरीत तिथल्या कलेक्टरांच्या मुलीच्या लग्नासाठी आलो होतो. गणपती पुळ्याहून सकाळी निघालो तर प्रवासातच विचार करता करता 'लाल किला' चित्रपटातल्या गझलने सकाळीच 'ताबा' घेतला. गझलकार(आणि चित्रपट विषयही) आहे शेवटचा मुगल सम्राट बहादूरशाह 'जफर'.
बहादूरशाह सत्तेवर आला तेव्हा दिल्लीला ब्रिटीशानी विळखा घातला होता आणि त्याची सत्ता फक्त लाल किल्ल्याच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली होती.(सन १८३७). १८५७ च्या बंडात सर्व हिन्दू मुस्लिम राजांनी त्याला सर्वानुमते हिन्दुस्तानचा सम्राट म्हणून दिल्लीच्या तख्तावर बसवले. खरे तर सम्राट म्हणून त्याला काही कामच नव्हते. तो एक संवेदनशील कवी म्हणूनच प्रसिद्ध होता. त्याचे बरेच काव्य १८५७ च्या धामधुमीत नष्ट झाले पण उरलेलेही अगदी अस्सल आहे.परन्तु राजा म्हणून ब्रिटीशांचा विजय निश्चित झाल्यावर जफर , हुमायुनाच्या कबरीजवळ लपून बसला . ब्रिटीशानी तिथून त्याला पकडले आणि त्याच्या काही मुलाना गोळ्या घातल्या.
जफरवर एक थातुर मातुर खटला चालवून ब्रिटीशानी त्याला कैद केले आणि ब्रम्हदेशातील (म्यानमार) रंगून (यंगून) येथे १८५८ मध्ये बन्दिवासात ठेवले.तेथेच वयाच्या ८७ व्या वर्षी जफरला मृत्यु आला. मरेपर्यन्त जफर मातृभूमीत मृत्यु यावा म्हणून तळमळत होता. कारागृहाच्या भिन्तीवर जफरने कोळशाने गझला लिहून ठेवल्या. त्यातील ही एक
अन्तःकरण पिळवटून टाकणारी....

लगता नहीं है जी मेरा उजड़े दयार में
किसकी बनी है आलम-ए-नापायेदार में

बुलबुल को पासबाँ से न सैयाद से गिला
क़िस्मत में क़ैद लिखी थी फ़स्ल-ए-बहार में

इन हसरतों से कह दो कहीं और जा बसें
इतनी जगह कहाँ है दिल-ए-दाग़दार में

इक शाख़-ए-गुल पे बैठ के बुलबुल है शादमाँ
काँटे बिछा दिये हैं दिल-ए-लालाज़ार में

उम्र-ए-दराज़ माँगके लाए थे चार दिन
दो आरज़ू में कट गए, दो इन्तज़ार में

दिन ज़िन्दगी के ख़त्म हुए शाम हो गई
फैला के पाँव सोएँगे कुंज-ए-मज़ार में

कितना है बदनसीब “ज़फ़र″ दफ़्न के लिए
दो गज़ ज़मीन भी न मिली कू-ए-यार में.........................................

(तितक्याच करुण आवाजात रफीने गायली आहे. संगीत- एस एन त्रिपाठी..)

आता एखाद्या लग्नाला जाताना असलं काही डोक्यात भिरभिरणं अस्थानीच नाही का?
पण आजचा आपला विषय बहादूरशहा जफरचा नाहीच आहे Happy

त्याचं खरं कारण होतं अगदी एक्झॅक्टली अशाच दुर्दैवी राजाची वास्तू रत्नागिरीत पहायचे मी ठरवले होते. या योगायोगाचे आश्चर्य आणि दु:खही एकाच वेळी वाटत होते.
हा राजा म्हणजे ब्रम्हदेशाचा (म्यानमार) राजा 'थिबॉ' ! रत्नागिरी येथे थिबा राजाचा 'थिबा पॅलेस' नावाचा राजवाडा आहे. ब्रिटीशानी ब्रम्हदेशाच्या या राजाला कैद करून या राजवाड्यात नजर कैदेत ठेवले होते. येथेच त्याचा मृत्यु झाला आणि कुटुम्बियाची परवडही !

या थिबा राजाचे आयुष्यच नाट्यपूर्ण आणि नियतीचे क्रूर खेळ दाखविणारे आहे
हा राजा थिबा ब्रम्हदेशाचा शेवटचा राजा. २९ नोव्हेम्बर १८८५ ला ब्रिटीश सैन्याने त्याचा पराभव केला आणि त्याचे साम्राज्य सम्पले. याचा जन्म मंडाले येथे १८५९ साली झाला आणि मृत्यु रत्नागिरी येथे १९ डिसेम्बर १९१६ ला झाला.ब्रम्हदेशाचे राजे मिन्दॉन यांचा हा राजपुत्र. १८७८ मध्ये मिन्दॉनच्या मृत्युनन्तर तो राजा झाला.त्याची सावत्र आई अलनन्दाही अत्यन्त महत्वाकांक्शी बाई होती. मिन्दॉनला ४२ मुले होती.ब्रम्हदेशाची सत्ता आपल्या हाती असावी म्हणून तिने बाकी पुत्रांची हत्त्या करवली आणि सौम्य प्रकृतीच्या व धार्मिक वृत्तीच्या थिबाला राजा केले. थिबा आपल्या कह्यात राहावा म्हणून तिने आपल्या मुली म्हणजे थिबाच्या दोन सावत्र बहिणी सुपायम्बी आणि सुपायलती यांची लग्ने थिबाबरोबर लावून दिली! राणी सुपायलती आईपेक्षा सवाई होती . तिने अलनन्दाला राज्याबाहेर हुसकावून दिले आणि स्वतः महाराणी बनली आणि महत्वाचे निर्णय घेऊ लागली. थिबा हा धार्मिक वृत्तीचा व मुळातच मारून मुटकून राजा केलेला माणूस होता. त्यामुळे सुपायलतीने कुटील कारवाया सुरू केल्या .
थिबा राज्यावर आला त्या वेळी अर्धाधिक बर्मा ब्रिटीशानी काबीज केला होता.त्यामुळे ब्रिटीशांचा अन त्याचा संघर्ष होऊ लागला. ब्रिटीश अधिकारी त्याच्या दरबारात पादत्राणे उतरवून येण्याची प्रथा असतानाही बूट घालून प्रवेश करीत. थिबाने त्यावर आक्षेप घेतला. शिवाय ब्रिटीशाना शह देण्यासाठी तो फ्रेंचान्च्या आहारी जाऊ लागला होता.शेवटी तर ब्रिटीशव्याप्त ब्रम्हदेशाची मुक्ती करण्याचे त्याने फर्मानच काढले.
शेवटी ब्रिटीशांच्या सैन्यापुढे निभाव न लागल्याने व पळून न जाता आल्याने हे राजघराणे ब्रितीशांच्या हातात सापडले.२८ नोव्हेम्बर १८८५ ला ब्रम्हदेशाचे पारतंत्र्य सुरू झाले.
थिबा, त्याची राणी सुपायलती आणि त्यांच्या दोन मुली याना ब्रिटीशानी अतक करून अगोदर सिलोन (श्रीलंका) व पुढे मद्रास (चेनै)येथे ठेवले,(१५-१२-१८८५)
त्यानन्तर त्याना रत्नागिरी येथे आणून अक्कलकोटचे दिवाण रावबहादूर सुर्वे व रावसाहेब विष्णू फडके यांचे बंगले भाड्याने घेऊन तेथे कैदेत ठेवण्यात आले.
पण या जागा अपुर्‍या पडू लागल्या म्हणून मग ब्रिटीशानी रत्नागिरीच्या दक्षिण बाजूस भाट्ये खाडीच्या कडेस हा राजवाडा बांधला.(१९०६) मात्र हा राजवाडा थिबाच्या पसंतीने व देखरेखीखाली बांधण्यात आला. स्वतः थिबाने लाकडे, इतर साहित्य निवडून डिझाईन करून बांधकाम केले आहे.१९१० मध्ये थिबा तेथे रहावयास आला.
आत दिलेल्या माहितीनुसार ब्रिटीशानी खर्चास मंजुरी दिली होती असे दिसते पण माझ्या एकामित्राने सांगितल्या प्रमाणे थिबाच्या खर्चातूनच तो राजवाडा बांधला.
ख. खो. इं.आ.थि.जा.!
या राजवाड्यात थिबा आयुष्याच्या अंतापर्यन्त म्हणजे १६-१२-१९१६ पर्यन्त नजरकैदेत होता. या दिवशी त्याने शेवटचा श्वास या इमारतीत घेतला. थिबा आणि त्याच्या कुटुम्बियांच्या समाध्या रत्नागिरीतील शिवाजीनगर भागात आहेत असे तिथे म्हटले आहे. रत्नागिरीतील कुत्र्यानाच ते बहुधा माहीत असावे...
रत्नागिरीचा 'थिबा पॅलेस'


IMG_0452[2].JPG

सध्या हा पॅलेस पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे आणि त्यात वस्तुसंग्रहालय उभारले आहे. त्यात इतरत्र सापडलेल्या जुन्या म्हनजे १० व्या, १२ व्या इ. शतकातल्या मूर्ती वगैरे ठेवलेल्या आहेत . ९ रुपये तिकीट आहे ते नऊच का या प्रश्नाचे उत्तर १३ , ४१ असे शुल्क ठेवणारे टोल नाक्यावालेच सांगू शकतील. मूर्त्याना त्रास होऊ नये म्हणून (बहुधा) वाड्याच्या आतल्या भागातील फोटो काढण्यास मनाई आहे.थिबाच्या मृत्युनन्तर राजवाडा ब्रिटीशांच्या ताब्यात होता आणि १९६२ पर्यन्त तिथे कलेक्टरांचे निवासस्थान असे.
थिबा राजवाड्याची यन्दा जन्मशताब्दी आहे.
याची चक्क विभागाला जाणीव आहे Happy

IMG_0422[3].JPGIMG_0442[1].JPGIMG_0443[1].JPGIMG_0436[2].JPGIMG_0433[1].JPGIMG_0432[3].JPGIMG_0430[1].JPGIMG_0427[2].JPGIMG_0426[2].JPGIMG_0424[1].JPG
काचा फुटू लागल्या आहेत..

IMG_0434[1].JPGIMG_0441[1].JPG

टेलिफोनचे जुने कप. बहुधा कलेक्टरांच्या फोनचे.
IMG_0437[1].JPG

आकाशातून दिसणारा पॅलेस त्यावरून ले आउट लक्षात यावा...

thiba pal1.jpg

रत्नागिरीत एक्झक्टली इथे आहे थिबा पॅलेस....

thiba pal2.jpg

राजवाड्याचे ठळक दोन भाग आहेत पुढची बैठक आनि मागच्या बेडरूम्स इ. दोन्ही भागाना जोडणारा तळमजल्यावर व्ह्रांडा व त्याचे वरचे मजले जोडणारा पूल आहे. खाली पोर्च , व्हरांडे आहेत. दोन्ही भागांचे मधले चौकात कारंजे आहे. पोर्चचे दर्शनी भागावर प्रवेश द्वारापाशी कमानी वर नक्षी आहे तो मोर हा ब्रम्ही राजघराण्याचे मानचिन्ह आहे

या राजवाड्यात थिबाची बेडरूम , कपडे आणि काही साहित्य जतन करून ठेवले आहे. १९६२ पर्यन्त जिल्हाधिकारी रहात असल्याने इमारत सुस्थितीत आहे.इमारत जाम्भा दगड आनि सागवानाची आहे. काही काचा फुटल्या आहेत. एकंदरीत इमरतीची उतरती कळा सुरू झाली आहे असे समजायला हरकत नाही....

या थिबा राजाला सहा मुले झाली.त्यातील ६ब्रम्हदेशात असताना आणि २ रत्नागिरीला. पहिली ४ अपत्ये देवीच्या रोगाला म्यानमारमध्येच बळी पडली. जिवन्त मोठी मुलगी म्यात फया ग्यि ,आणि दुसरी म्यात पया. ह्या वाचल्या. १८८५ ला अटक झाल्यानन्तर राणी सुपायालता हिने मद्रास येथे तिसर्या मुलीला जन्म दिला (म्यात फया ). रत्नागिरीला आल्यावर त्याना मयात फया गलाय या चौथ्या मुलीला जन्म दिला.

रत्नगिरीत हळू हळू त्यांचे जवळचे पैसे सम्पले मग त्याना तुटपुंज्या पेन्शनवर गुजराण करावी लागली.
सर्वात मोठी मुलगी फया ही रखवालदार गोपाळ भाऊराव सावन्त यांच्या प्रेमात पडून लग्न आणि दोन अपत्ये झाली.
१९१६ मध्ये राजाचे निधन झाले. त्यानन्तर राणी सुपयलात रंगूनला परतली. आणि १९२५ मध्ये निधन पावली.
मोठ्या मुलीचे दुर्दैवाचे दशावतार चालूच होते . तिला दोन मुले होती . १९४७ ला इंग्रज गेल्यावर ती रंगूनला परतली पन तिने सामान्य माणसाशी आणि परधर्मीयाशी लग्न केल्यामुळे तिला तिथे स्वीकारण्यात आले नाही. जगात रंगून वगळता रत्नागिरी ही एकच जागा माहीत असलेली ती पुन्हा रत्नागिरीला आली. आणि थोड्याच काळात ती निधन पावली.
तिची खूप विपन्नावस्था झाल्याने जिल्हाधिकार्‍यानी वर्गणी काढून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. त्याआधीच नवरा गोपाळ वारला होता. एका अनाथ मुलीला जगात सोडून तिने जगाचा निरोप घेतला. टू टू नाव असलेली ही मुलगी गरीब आणि अशिक्षित होती आणि तिला तिच्या राजवंशाची काहीही माहिती नव्हती. फक्त तिच्याकडे तिच्या आईचे एक चित्र तिच्या देव्हार्‍यात होते. विपन्न आणि अडाणी टूटूने एका रिक्षावाल्याशी (शंकर पवार) लग्न केले आणि त्याना ५-६ मुले झाली. तिचा ब्रम्ही भाषेशी काहीही संबंध राहिला नाही . ती खेडवळ मराठी भाषा बोलत असे आणि उदरनिर्वाहासाठी कागदी फुले करून विकत असे.मध्यन्तरी तिच्या निधनाची बातमी आली होती असे स्मरते....

दुसर्या मुलीने म्हनजे म्यात पाया लता हिने तिच्या पित्याची खासगी सचिवाशी लग्न केले आणि तिचे पुढे दार्जीलींगजवळ कॅलिम्पोंग येथे १९५६ निधनही झाले अशी वदन्ता आहे.....

तिसर्‍या मुलीने ब्रम्ही राजघराण्यात लग्न केले.
सर्वात धाकटी राजकुमारी मायात फाया गलाय हिने एका साधूबरोबर लग्न केले आणि संसार केला.तिच्या एका मुलाचा कम्युनिस्टानी खून केला एक सैन्यात कामी आला, तिचे बाकी मुलगे आनि नातू म्यानमारमध्ये हयात आहेत.

म्हणजे तारुण्यसुलभ उर्मीने आणि भवितव्य अंधःकारमय असलेल्या मोठ्या मुलीने रखवालदाराशी केलेल्या विवाहाने तिची फारच अमानुष परवड झाली असे दु:खाने म्हणावेसे वाटते......
राजा थिबा ....

210px-Konbang-Thibaw[1].jpg
(फोटो सौजन्य विकीपिडीया)
ब्रिटीशानी बहादूरशाह जफरच्या निधनानन्तर त्याचे पार्थिव भारतात न्यायला विरोध केला आणि त्याच्या दफनाची जागाही गुप्त ठेवली. तसेच थिबाचा अंत्यसंस्कार करण्यासाठी पार्थिव म्यानमारमध्ये नेण्यास बन्दी केली. व रत्नागिरीतच दफन केले. कारण ही स्मारके लोकांचे स्फूर्तीस्थान होतील अशी त्यांची भीती होती.

अटल बिहारी वाजपेयी जनता राजवटीत परराष्ट्रमंत्री असताना ब्रम्हदेशात गेले असता त्यानी बहादूरशाहच्या मजारला भेट दिली , भारर्ताचा सम्राट आणि एक थोर कवी म्हणून.त्याच वेळी सगळ्याना थिबा राजा आणि त्याच्या वंशजांची आठवण झाली. जफर आणि थिबा यांचे स्मृतीअवशेषांची अदलाबदल करण्याचे घाटू लागले. आणि धावाधाव सुरू झाली. टूटू चा अर्ज घेण्यात आला तिला रु.२५० नक्त (प्राप्तीकरास आधीन :फिदी:) मानधन मंजूर करण्यात आले. त्यातला एक छदामही मिळाला नाही....तिला काही प्रॉपर्टी द्यायचे चालले होते पण जनता सरकार पडले अन पुन्हा सगळे थंडावले. आणि अदलाबदल काही झाली नाही....

टूटूची मुले आणि नातवंडे पूर्णपणे भारतीय आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी उपजीवीका करीत आहेत.
त्यातील एक नात जयु कुळे ही विवाहित असून तिला प्राची नावाची मुलगी आहे. आणि मुम्बईत एका कुटुम्बात घरकाम करीत आहे. आणि एका खोलीच्या घरात रहात आहेत. आणि तिला या ऐतिहासिक वारशाची कल्पना नाही. जयूच्या दिसण्यात तिची ब्रम्ही मुळे अजिबात नाहीत पण प्राचीमध्ये थिबा राजाशी थोडे साम्य आहे असे म्हणतात.....

नियती नियती म्हनतात ती यापेक्षा काय वेगळी असू शकेल. ? 'द लास्ट एम्परर' मध्येही चिनी सम्राटाचा असाच अस्त होतो. ब्रम्ही राजघराण्याचे एका शाखेचे तर भिकार्‍याच्या वर हाल झाले. तिकडे बहादूरशाह जफर ' दो गज जमीन ना मिली कू-ए-यार मे ..' म्हणत अल्लाघरी गेला.......

म्हणून रत्नागिरीच्या वाटेवर डोक्यात भिरभिरत होते

'लगता नही है दिल मेरा उजडे दयार मे..................." Sad

[रफीच्या आर्त आवाजात ऐका 'लगता नहीं..http://www.youtube.com/watch?v=-SA_pC_FFEs
चित्रपट व्हिडीओ' 'लगता नही....http://www.youtube.com/watch?v=KiAfTauealQ&feature=related]

विषय: 

.

माझ्या आठवणींप्रमाणे,बहादुर शाह जफरच्या काहि गझला कोणत्यातरी सिरीयल मधे पाहिल्या / ऐकल्या होत्या, कोणत्या ते सांगु शकाल का ?

बहादुरशाह जफर हीच ती सिरिअल होती. त्यात महेन्द्र कपूरची सपक गाणी होती

बाय दवे आपण थिबाच्या थडग्याकडे दुर्लक्ष केले . हे थडगे रत्नागिरीच्या शिवाजीनगर भागात आहे असे म्हणतात. पण म्यानमार मध्ये बहादुरशाह जफरचे थडगे चांगले प्रिझर्व केल्याचे दिसते आहे
http://www.youtube.com/watch?v=whbFbKDnYOc&feature=PlayList&p=DE665721EF...

हुड , सुंदर अन माहितीपुर्ण लेख , फोटोही छान आलेत .
जफर आणि थिबा या दोघांच्या आणि त्याच्या वारसांच्या शोकांतिका मनाला चटका लावून गेल्या.

रत्नागिरीचे कोणी असेल , नन्दिनीच आहे वाटते सध्या , तर हा शिवाजीनगर भाग कुठे आहे आणि थिबा आणि इतरांच्या कबरी आहेत का तिथे कोणी सांगू शकेल काय?

अरेच्चा, हा लेख मी अजून वाचलाच नव्हता Sad

थिबा राजाची ही टू टू नावाची नात आम्ही लहानपणी पाह्यलीये. तेव्हा ती अगदीच म्हातारी झाली होती. पॉवर हाऊसच्या बाजूलाच तिचे एक कोकणी पद्धतीचे घर होते. ती परकर पोलकं अशा वेषात दिसायची. आणि कायम भडकलेली असायची. तोंडून सतत शिव्या चाललेल्या असायच्या. तिच्या घराच्या परिसरातून आम्हाला शाळेत जायचा शॉर्ट कट होता. पुढे नंतर ती वारल्यावर तिच्या पोरा बाळानी ती जमिन सोन्याच्या भावाने विकली. तिथे आता अपार्टमेंट्स वगैरे उभ्या आहेत. तिच्या वारसदाराविष्यी काहीच माहिती नाही.

शिवाजीनगर हा भाग रत्नागिरीच्या सुरूवातीलाच येतो. (हायवेने आल्यास) सुमारे १० वर्षापूर्वी हा भाग रत्नागिरीच्या बाहेरचा गणला जायचा. मात्र आता तिथे घनदाट वस्ती आहे. सारेगामा लिटल चॅम्प्स मधल्या शमिका भिडेच्या काकाचे घर याच परिसरात आहे. एके ठिकाणी थिबाची समाधी आहे असे ऐकले होते पहायची उत्सुकता जाम होती. पण असल्या ठिकाणी जायला कोण परवानगीदेणार?? . तिथे देखील आता अपार्टमेंट उभ्या आहेत. सतिशने ही समाधी पाहिलेली आहे.

याच थिबा पॅलेसमधे एम एस बी टी ईचे पॉलिटेक्निक ८७ पर्यंत बसायचे. नंतर नविन बिल्डिंग बांधल्यावर राजवाड्यामधे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र चालू होते. (९७ पर्यंत) अता मात्र राजवाड्याचे रूपांतर वस्तुसंग्रहालयामधे केले आहे. आणि एक पर्यटक स्थळ म्हणून विकसित करायचे चालू आहे.

हूडा, रत्नागिरीत येऊन तू सावरकराचे पतित पावन मंदिर, टिळकाचे निवास स्थान पाहिलेस का?

अप्रतिम. सुंदर लेख.

जफरची गझल तर कातील....

उम्र-ए-दराज़ माँगके लाए थे चार दिन
दो आरज़ू में कट गए, दो इन्तज़ार में

मार डाला..... !!!!

काय एकेक शोकांतिका असतात.... Sad

सगळं इंटरनेटवरुन घेतलंय म्हटलात, पण.. ते आहे म्हणुन आम्ही कुठे वाचणार होतो शोधुन ?
म्हणुन धन्यवाद तुम्ही केलेल्या संकलनाबद्दल.

रॉबीन, माझा पण हा लेख वाचायचे राहिले होते. या राजाचे थडगे, मालवणला मेढ्यात, राजकोट म्हणून एक पडका किल्ला आहे, तिथे दाखवतात. आमचे घर तिथे होते. लहानपणी अनेकदा त्या भागात गेलोय, पण तिथे त्या काळात दिवसाउजेडी भिती वाटायची, त्यामूळे कमी जाणे व्हायचे.
मेढ्यात आता साळगांवकरानी, गणपतिचे देऊळ बांधलेले आहे, तिथून हा भाग जवळ आहे, पण विचारल्याशिवाय सापडणार नाही. कधी गेलास तर अवश्य जा.

अप्रतिम लेख व माहिती.

जफरसारख्या एका कवीची व त्याचा राजघराण्याची अशी शोकांतिका झाली हे बघून वाईट वाटले.

लेख वर काढल्याबद्द्ल धन्यवाद.

हुडा,माहितिपूर्ण लेखा बद्दल अभिनंदन.
जफरच कारुन्य मन हेलावुन टाकते.
असो
टूटू च लग्न कांबले नावच्या दलित युवकाशी झाले होते आनी ती उतरोउत्तर विक्षिप्त होत गेली.

फिल्म 'लाल किला' मधली ही जफरची गझल ऐका रफीच्या आवाजात . संगीत एस एन त्रिपाठी. त्रिपाठी हे माय्थॉलॉजिकल फिल्म ना संगीत देण्यासाठी ओळखले जातात पण गझलचा मूड छान पकडला आहे. जफरच्या भूमिकेत भाभू आहे .
https://www.youtube.com/watch?v=Sg4EQcmeBl0

ह्या गझलचे हबीब वली मुहम्मद साहब यांच्या आवाजातही एक व्हर्शन आहे सुरेखच आहे ते. अगदी सैगलच्या वळणावर जाणारे....
https://www.youtube.com/watch?v=dX05yZNT2hk

रॉबिनहूड,

बहादूरशहा आणि थिबाच्या कथा अंतर्मुख करून गेल्या. टिळकही त्याच मार्गाने चालले होते. पण चिवटपणे तग धरून राहिले.

पूर्वीच्या काळी राजेलोक जोहार का करायचे ते समजतं! Sad हल्लीच्या काळातल्या होस्नी मुबारक, कर्नल गदाफी, सद्दाम हुसेन यांच्या कथाही फारशा वेगळ्या नाहीत.

आ.न.,
-गा.पै.

रॉबिनहूड, लेख आवडला, फोटोही. गतस्मृतींना लेख लिहून व आता तो पुन्हा खोदून वर काढून उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद.

मूळ गझलेतच अशी काही कसक आहे की कुणीही गायली तरी तिचं सोनंच व्हावं....>> +१००

बाकी माहीती संकलन करुन त्या इतिहासाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. फोटोही मस्त.

Pages