तुझ्या नसानसांत मी..

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

१.

"हाऽऽऽऽऽय ऑल माय यंग ऍंड लव्हली फ्रेन्ड्ज!! ओळखलात ना आवाज? येस्स! यूअर अमि इज बॅक! मला किती आनंद होतोय इथे परत यायला, तुमच्याशी बोलायला, मी सांगू शकणार नाही फ़्रेन्ड्ज.. पण तुम्हाला कळेल नक्कीच.. गेला एक-दिड महिना मी टोटल झोपून काढला, इतकं फ्रस्ट्रेटींग असतं ते माहित्ये, पण तुमच्या, केवळ तुमच्यामुळे मला परत यावंसं वाटलं.. फ्रेन्ड्ज, आय कान्ट रियली थँक यू फॉर यूअर सपोर्ट, तरी पण मनापासून मनापासून थँक्स.. थँक्स त्या असंख्य ईमेल्स आणि मेसेजेससाठी, त्या प्रार्थनांसाठी, आशीर्वादांसाठी आणि शुभेच्छांसाठी!!

चला, आता फार बोलत नाही.. सुरू करूया आपला सगळ्यांचा आवडता कार्यक्रम ’सूरोंके साथसाथ’.. आज मी थोडीशी ईमोशनल झालेय, त्यामुळे आजच्या कार्यक्रमाची सुरूवात एका अतिसुंदर गाण्याने करूया- ’चलते चलते’.. हे गाणं खास तुमच्या सगळ्यांसाठी फ्रेन्ड्ज- 'चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना'.. फॉर ऑल माय दादादादीज ऍंड नानानानीज.. एन्जॉय!!"

इतकंसं बोलूनही अमृताला थकल्यासारखं झालं.. पाण्याचा एक घोट घेऊन तिने मोठा श्वास घेतला.. थकली, तरी बरं वाटत होतं या परिचित वातावरणात यायला, अत्यंत आवडतं काम करायला.. आजचं बोलणं थोडं कृत्रिम झालं का? पण हरकत नाही.. किती दिवसांनी थेट संवाद साधत होती ती तिच्या आवडत्या आजोबा-आजींशी!

खास तिचा असलेला हा स्लॉट- रात्री ८ ते १०.. खरंतर प्राईम स्लॉटमधला एक तास काढून दिला होता तिला रणधीरने, केवळ तिची अफाट लोकप्रियता, फोनवर श्रोत्यांशी बोलायची हातोटी आणि कौशल्य आणि तिच्या प्रोग्रामचं कायमच असलेलं प्रचंड मोठ टीआरपी! हा तिचा प्रोग्राम अगदी वेगळा होता- एरवी दिवसभर यंग न पेप्पी लोकांसाठी गाणी सगळे चॅनेल लावायचे.. पण अमि ह्या प्रोग्राममध्ये खास फक्त सीनीयर सिटीझन्सशी बोलायची.. सीनीयर सिटीझन्सना त्यांचं ऐकायला हवा असतो एक श्रोता, आणि ते काम अमि अगदी न थकता, मनापासून करायची.. मग ती गार्‍हाणी असोत, तक्रारी असोत, एकूण व्यवस्थेवरचा राग असो, की जुन्या आठवणींना उजाळा असो.. अमि सगळ्यांशी दोन मिनिटं प्रेमाने बोलायची आणि त्यांच्या काळातली गाणी ऐकवायची.. ह्या सीनीयर सिटीझनसचा भरभरून प्रतिसाद मिळत होता प्रोग्रामला.. त्यांच्या जेवणाची, किंवा सीरीयल्सची वेळ असली तरीही. त्याचं बरचंसं श्रेय अमिचं होतं, हे रणधीरला मान्य करावंच लागलं होतं..

म्हणूनच तब्बल दोन महिने अमि जेव्हा नव्हती, तेव्हा कसाबसा दुसरा कार्यक्रम चालू ठेवून, सीनीयर्सच्या अनेक प्रश्नांना थोपवत, अमि परत येईल हे आश्वासन देत तिची वाट बघण्यात दिवस काढले त्याने. ती जॉईन झाल्यानंतरच त्याने निश्वास टाकला आणि खुशीने तिच्याकडे सूत्र सोपवली.

अमिने सर्व ट्रॅक्सवर नजर टाकली..आज फक्त तिच्या आवडीची गाणी होती.. जुनी, पण तरल, हळूवार, खेळकर अशी.. कटाक्षाने तिने विरहगीतं, दु:खी गीतं विचारातही घेतली नव्हती.. तो कप्पा बंदच केला होता, बंद करायला लागला होता.. आजचा कमबॅक मस्त गाण्यांनी करायचा हे ठरवलेलंच होतं.. आधी जाहिरात करून 'अमि येणार' अशी हवा केली होतीच.. प्रोग्राम सुरू झाला आणि कॉल्सची रीघच लागली. श्रोत्यांच्या सगळे प्रश्नं आज तिच्या तब्येतीच्या काळजीचे, तब्येतीच्या चौकशीचे होते.. आज फॉर अ चेंज, त्यांना कोणीतरी सापडलं होतं काळजी करायला.. आपल्या असलेल्या लोकप्रियतेपुढे, अगदी त्रयस्थ लोकांच्या आपुलकीमुळे भारावून गेली ती.. हेच तिच्या जगण्याचं टॉनिक होतं आता..

शेवटचा कॉल पावणेदहाला घेऊन अमृता तिच्या क्यूबमध्ये परत आली.. आता थकवा मात्र खरंच जाणवत होता.. खुर्चीत ती जवळजवळ शिरलीच आणि डोळे मिटून स्वस्थ बसून राहिली.. या क्षणी कॉफी प्यायची जबरदस्त इच्छा होत होती. पण ती तिने महत्प्रयासाने दाबली. एक तर आजारपणामुळे पथ्य बरीच होती.. आणि कॉफी! अंहं, कॉफी सोडली होती तिने.. निग्रहाने तिने मऊ दहीभाताचा डबा उघडला आणि तिला परत भरून आलं! प्रकर्षानं आईची आठवण आली.. ती रोज सांभाळत असलेलं तिचं पथ्य-पाणी आठवलं.. पण एका जिद्दीने, आईची समजूत घालून ती आली होती परत इथे तिच्या कर्मभूमीत.. एकटी.

आणि अचानक हा एकटेपणाच एकदम अंगावर धावून आला तिच्या.. भोवंडून गच्च डोळे मिटून बसली ती.. वरवर कितीही ठरवलं की आता एकटीनेच रहायचंय, एकटीनेच उभं रहायचंय आणि निभावून न्यायचंय, तरी नको नको म्हणत असतानाही खोल कप्प्यातून उफाळून वर आली ती गौरवची आठवण! ओ गौरव!! ’कुठे आहेस तू? कसा आहेस? माझं हे असं झालेलं नक्कीच माहित असणार तुला.. तरी एकदाही मला भेटावंसं वाटलं नाही का रे?’ अमृताच्या गालावरून अश्रू आठवणींबरोबरच कधी ओघळू लागले, तिला समजलंही नाही. ते भांडण, वाद, तिची अस्वस्थ मन:स्थिती, तो ताबा सुटून झालेला अपघात, हॉस्पिटलमध्ये आणि घरी सहन करायाला लागलेल्या वेदना.. सगळं सगळं जणू अंगावर धावून आलं.. आणि ह्या सगळ्या उजळणीनंतर नेहेमीप्रमाणे परत मनभरून उरला तो फक्त गौरव! न थोपवता येणार्‍या हुंदक्यांनी ती थरथरू लागली..त्या क्षणी गौरवची नितांत गरज होती तिला.. त्याचे मजबूत बाहू, त्याची आश्वासक मिठी, त्याचा हळूवारपणे समजावणारा स्पर्श.. खूप, खूप जास्त गुंतली होती ती त्याच्यात.. आणि म्हणूनच कदाचित एकटी होती आज..

******
काय मखमली दिवस होते ते! They were beautiful.. their coming together was magical..

गौरवचं व्यक्तीमत्त्व अतिशय लोभसवाणं होतं.. राजस होतं.. त्याच्या अंगात भरपूर धमक होती, प्रचंड कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वास होता आणि झोकून द्यायची तयारीही. पण तो तितकाच सणकी, वेळप्रसंगी तुसडा आणि माणूसघाणाही होता- पण त्याच्या अगदीच खराब मूडमध्ये असला तर.. एरवी समोरच्याला आपल्या बोलण्याने, चतुराईने बांधून टाकायचा तो. स्वतःची एक अत्यंत हटके, उत्तम आणि चमकदार कल्पना सामोरी आणणारी अ‍ॅड-एजन्सी असावी असं त्याचं स्वप्न होतं. आपण जे करू ते उत्तमच असेल असा एक रास्त अभिमान होता.. आपण कसे आहोत याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्यामुळेच नोकरीत फक्त प्राथमिक अनुभव मिळवण्याइतका राहिला तो आणि नंतर नोकरी सोडून स्वत:ची जाहिरात संस्था काढली होती. त्यात त्याच्यासारखेच वेडे लोक घेतले होते त्याने- क्रियेटीव्ह कल्पनांनी ओसंडून वाहणारे. त्यांच्यावर कोणतंच बंधन नव्हतं कामाचं, बंधन असलंच तर फक्त उत्तम कामगिरीचं होतं.

अमृताचेही ते उमेदवारीचे दिवस होते.. ती ज्या रेडीयो स्टेशनला जॉईन झाली होती ते शहरातलं पहिलं प्रायव्हेट एफएम स्टेशन होतं.. त्यामुळे रोज शिकायला मिळत होतं काहीतरी. रेडीयोवर प्रोग्राम चालू असताना शहरातल्या मॉल्समध्ये जा, तिथल्या लोकांशी बोल, स्टुडीयोमध्ये ट्रॅक्ससाठी मदत कर, आलेले फोनकॉल्स घे अशी उमेदवारी चालू होती. ऍड डिपार्टमेन्टमध्ये तिला रस होता.. काही इन-हाऊस ऍड्जसाठी स्क्रिप्ट लिही, काही थेट, लोकल कस्टमर्सच्या ऍड्जसाठी आवाज दे असं चालू असताना तिची आणि गौरवची भेट झाली होती..

झालं काय होतं की गौरवच्या क्लायंटची एक ऍड होती.. तेव्हा रागिणीच्या हाताखाली अमृता काम करत होती.. त्या ऍडमध्ये एक अत्यंत द्वयर्थी शब्द होता.. ती ऐकल्याबरोब्बर रागिणी म्हणालीही- ’काय शब्द वापरतात, शी!शी!.. गौरवनेच लिहिलं असणार हे स्क्रिप्ट! नॉटी बॉय’! ऍड परतपरत ऐकताना अमृताला तो शब्द सारखा खटकायला लागला.. तिने रागिणीला विचारलेही, "रागिणी, फारच ऑड वाटतंय हे ऐकायला.. बदलायला सांगूया का?"

"बदलायला? कोणाला? गौरवला? त्याचा शब्द? वेडी आहेस की काय? गौरवला इतकासाही बदल खपत नाही, आणि उद्या ही ऍड एअर होत्ये.. आता कसले बदल करतेस बाई? फर्गेट इट.. जाऊदे तसंच, थोड्या दिवसांनी कोणी ऑब्जेक्शन रेझ केलं, तर बदलू.."

रागिणीने खांदे उडवले, पण अमृताला स्वस्थ बसवेना.. एक तर ती नवीन होती, आणि रक्त सळसळत होतं! त्या भरात तिने केला एक शहाणपणा! तिने चक्क गौरवच्या ऑफिसमध्ये फोन केला आणि त्याच्याशी बोलायची पृच्छा केली.. रेडीयोस्टेशनवरून फोन असल्याने, ताबडतोब कनेक्ट झाली ती.. गौरवचा रूबाबदार ’हॅलो’ कानावर पडताच, तिने त्याची ऍड म्हणायला सुरूवात केली.. त्या ऍडमध्ये ग्रामीण ढंगाचं बोलणारी एक बाई होती.. अमृता हुबेहूब आवाज काढत होती.. आणि अगदी शेवटाला जिथे ’तो’ शब्द होता, तो तिने बदलला, आणि एक नेहेमीचा शब्द टाकला..

आणि गप्प बसली.

इकडे गौरव अवाक! कोण होतं हे? हा काय शहाणपणा होता? रागावूनच त्याने विचारले, "काय आहे हे? व्हूज धिस?"

एकदा बोलून झाल्यानंतर अमृताला कापरं भरलं! हे काय करून बसलो आपण? कोणी सांगितला होता जादापणा करायला? तिने भीऊन धाडकन फोन ठेवूनच दिला.

ताडताड पावलं टाकत, गौरव पुढच्या अर्ध्या तासात जेव्हा रागिणीच्या ऑफिसमध्ये येऊन थडकला, तेव्हा क्षणभर अमृताचा थरकाप झाला! एक तर रागिणीलाही तिने काही सांगितलं नव्हतं.. अविचाराने फोन उचलून मोकळी झाली होती! गौरव अर्थातच थेट रागिणीच्या केबिनमध्ये शिरला होता.. इतक्यात तिचा इन्टरकॉम वाजला आणि रागिणीने तिला बोलावलं.. ’गेली आपली नोकरी’! तिने मनाची तयारी केली, आणि ती आत गेली.

"अमृता, तुझी ओळख करून देते.. हे मिस्टर गौरव अध्यापक. ’मॅड आय’ ह्यांची. ह्यांच्याकडूनच ती शेव्हिंग प्रॉडक्टची ऍड आली होती.. आत्ता अर्ध्या तासापूर्वी कोणीतरी ती ऍड बदलून त्यांना अप्रूव्हलसाअठी फोन केला होता.. आपलं बोलणं झालं होतं यावर.. तू केला होतास तो फोन?"

अमृताने अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. रागिणी रागावली होती का? गौरवकडे पहायची तिची हिंमतच नाही झाली. रागिणी कूल होती, पण चूक तिची होतीच. तिने मान्य करून टाकावे आणि विषयाला पूर्णविराम द्यावा असे ठरवले. ती बोलायला लागली तेव्हा तिच्या आवाजातली थरथर लपत नव्हती..
"I am extremely sorry Ragini. मीच केला होता फोन. मला अगदी राहवेना. किमान तुला आधी विचारायला तरी हवं होतं, खरंतर मी असं करायलाच नको होतं. I understand. I am really sorry Mr. Adhyapak." मान खाली घालून गप्प उभी राहिली ती. मध्ये दोन क्षण गेले..

"हे सगळं त्या ग्रामीण आवाजात आणि त्या ढंगाचे हेल काढून म्हणा.." गौरवचा आवाज आला.
अं? तिने गौरवकडे चमकून पाहिलं. तो चक्क हसत होता, त्यामुळे रागिणीही.

"Ragini, this is great! मला ह्या मुलीचे गट्स आवडले. And you are right.. बदलूया आपण तो शब्द. mind you, हे असं पहिल्यांदाच होतंय.. जनरली मी असं ऐकत नाही कोणाचं, but I liked your daring. रॅग्ज, मी नवीन डबिंग करून देतो तुला. पण मला हा- हिचा आवाज पाहिजे. अमृता, तुम्ही कराल ही ऍड डब?" गौरवचे पिंगट डोळे तिच्यावर स्थिरावले, आणि ती आंतरबाह्य थरथरली.

एकतर हे सगळं तिच्या कॉलच्या शहाणपणापेक्षाही अनपेक्षित होतं. ’आ बाबा रागावला नाही? उलट ऍडची ऑफर? अं? आणि ही नजर? वॉव! काय डोळे आहेत, अथांग!’ ती बघतच राहिली त्याच्याकडे.

"सांगा ना.. any problem? रॅग्ज, तुला चालेल ना? Of course, you will be paid.. as a proper commercial artist..."

तरी अमृता गप्पच. रागिणीने ओळखले बरोब्बर. "ya ya, she'll do it. मी करते तुला फोन थोड्यावेळने.. she'll be there at your studio."

"ओके." गौरवने दोघींकडे हसून पाहिलं आणि तो उठला..

ते डोळे, तो कॉन्फिडन्स, ती चूक सुधारण्याची तयारी, नव्या अननुभवी लोकांचंही म्हणणं ऐकून घ्यायची तयारी... एकाहून एक सगळे गुणच होते गौरवकडे.. सहवासात आल्यानंतर हळूहळू अजून काही पैलू उलगडत गेले.. सहवासही वाढत गेला.. आणि तिला कळायच्याही आत ती गौरवमध्ये गुंतत गेली. आणि तोही.

आधी अ‍ॅडनिमित्त, मग ’ही अ‍ॅड बरी वाटतेय का गं?’ असे सल्ले विचारणं, तिच्याकडून नव्या आयडीया घेणं, ’तुझा आवाज फार छान आहे अमू.. Voice modulation course करून रेडीयोवर एअर हो ना..’हा आग्रह, अधूनमधून लंचेस, जमतील तेव्हा, जमतील तशा गाठीभेटी, फोन्स, मेसेजेस.. वाफाळणारी गरम कॉफी हाही त्यांच्यातला दुवा होता.. अगदीच काही नाही, तर कॉफीसाठी अर्धा तास तरी ते काढायचेच.. भराभर जवळ आले ते एकमेकांच्या.. अमृतावर तर गौरवची धुंदीच पसरली होती जणू.. त्याचे सल्ले किती अचूक आहेत, त्याचं माणसांचं रिडींग किती पर्फेक्ट आहे, हे तिला स्वत:वरूनच समजलं होतं. आता तर गौरवच्या सल्ल्याशिवाय एकही निर्णय घेऊच शकत नव्हती ती- कामासंबंधी तर ते बोलायचेच, पण त्याहीपलिकडे त्यांची मैत्री सरकली.. शॉपिंग, छोट्या ट्रीप्स, सिनेमे, नाटकं.. एकमेकांच्या आवडी जपत चालू झालं होतं..

पुढेमागे तिला रेडीयोवर एअर होण्याची संधी मिळणार होतीच, पण आवाजाची फेक, पट्टी, समतोल कसा साधायचा यासाठी तो कोर्स तिला अतिशय उपयुक्त ठरला होता.. बिचकत बिचकत तिने सुरूवात केली.. आधी अजून एका आरजेबरोबर आणि मग स्वतंत्र. तोपर्यंत अजून चार एफेम चॅनेल सुरू झाले होते, त्यामुळे स्पर्धाही वाढली होती. जुने, चांगले आरजे टिकून रहावेत यासाठी रणधीर कायम प्रयत्न करायचा.. त्याशिवाय, नवनवीन कल्पना, प्रोग्रामसनाही संधी द्यायचा.. तिच्या ’सूरोंके साथ’ला तो परवानगी देईल का ह्याची मात्र तिला शंकाच होती. पण अर्थातच गौरवने तिला ओके दिला होता आणि रणधीरने टेस्ट बेसिसवर ३ महिन्याची परवानगी दिली होती तिला..

ह्या काळात अर्थातच गौरव प्रचंड व्यस्त होता.. कधीकधी रोज त्याची आणि अमृताची गाठभेट व्हायची आणि कधीकधी आठाठ दिवस ठावठिकाणाही माहित नसायचा तिला.. त्याच्याकडे फक्त रेडीयोच्याच जाहिराती नव्हत्या, खरंतर रेडीयोच्या अगदी मोजक्याच होत्या. जास्त करून प्रिन्ट मीडीयामधल्या होत्या, आणि टीव्हीमधल्या काही. पण टीव्हीसाठी तो जोरदार प्रयत्न करत होता. एखादाच मोठा नाव असलेला क्लायंट मिळावा यासाठी झटत होता तो. सहाजिकच शहराबाहेर जाणे, टूअर्स, सतत लोकांना भेटणे, पार्ट्या अरेंज करणे, अटेंड करणे, क्लायंट ऑफिसच्या चकरा मारणे हे चालू होते, शिवाय रोजचे काम होतेच.. त्यामुळे त्याला सतत चाकं लागलेली असायची..

अमृताला तो प्रथम भेटला तेव्हाच तिच्यातलं आकर्षक आणि साधं व्यक्तीमत्त्व त्याने जोखलं. नंतर भेटी होत राहिल्या, तेव्हा मात्र त्याला प्रकर्षाने जाणवलं की ती खरंच इतर ढोंगी, मतलबी मुलींपेक्षा खूपच वेगळी आहे. तिला तिच्या कामात मनापासून रस होता, त्यासाठी पडेल ते काम करायची, शिकायची इच्छा होती आणि तरीही ती स्वत:मधला एक निरागसपणा टिकवून होती. अमृताच्या निमित्तानं तो दूर राहिलेला निरागसपणा, फ्रेशेनेस परत त्याच्या आयुष्यात आला आणि ह्याच कारणामुळे तोही झपाटल्यासारख्या तिच्या जवळ आला..

तिच्याबरोबर असताना तो ’तो’च राहू शकायचा. त्याला मोजूनमापून बोलायची, समोरच्याचा अंदाज घ्यायची, तोलूनमापून वागायची गरज नव्हती. त्यामुळे त्याचा दिलखुलास, गमत्या स्वभाव तिच्यासमोर मोकळा व्हायचा.. अमृता तर ते एन्जॉय करायचीच, पण खुद्द गौरवलाही ती सगळी जोखडं तिच्यासोबत असताना उतरवायला मनापासून आवडायचं.

ती समोर आली की एक लहर त्याच्यामधून फिरायची.. झटकन पुढे होऊन तिला जवळ घेऊन कुठेतरी लांब जावंसं वाटायचं.. जिथे फक्त ते दोघे असतील अशा निर्व्याज जगात.. त्याला नक्की समजत नव्हतं हे नुसतंच नेहेमीचं आकर्षण आहे, की खरंच तो त्याच्यापुढे गेलाय.. तिच्याशिवाय त्याला चैन पडत नव्हतं हे खरं. अमृताच्या मात्र डोळ्यातून, बोलण्यातून, हालचालीतून कळायचं, ती किती ओढली गेली होती गौरवकडे.

’सूरोंके साथ’चे तीन महिने यश्वस्वी झाले आणि रणधीरने कार्यक्रमाचा स्लॉट ’अमि’च्या नावे केला.. त्यादिवशी अमृता खरंच हवेत होती.. इतकी खुश याआधी कधीच नव्हती झाली ती, कारण ह्या निमित्ताने तिच्या आत्मविश्वासावर केवढं तरी मोठं शिक्कामोर्तब झालं होतं. जे करीयर आपण करू शकू का, मोठ्या शहरात आपला टीकाव लागेल का ही शाश्वती नव्हती, तिथे एक आख्खा कार्यक्रम एकटीच्या बळावर यशस्वी करून दाखवण was a big leap for her. एकटीने? अंहं. गौरवशिवाय ते शक्यच नव्हतं. रणधीरने ओके दिल्यावर ऑफिसमध्येच कलीग्जबरोबर एक छोटं सेलेब्रेशन झालं, केक कापला, अमृताचं ’पोती’ असं नामकरणही झालं.. थोडी पांगापांग झाल्यानंतर तिने गौरवला फोन केला, आजच्या सेलेब्रेशनचं सांगितलं आणि विचारलं, "गौरव, आज तुझ्याशिवाय हे शक्य नसतं झालं. You mean a lot to me. आज ही मोमेन्ट मला तुझ्याबरोबरही शेअर करायची आहे. आज डिनरला भेटणार? तू म्हणशील तिथे जाऊया.."
"जाऊया की, गुड आयडीया.. अं? कुठे जायचं? चल, तुला आधी पिकप करतो, मग ठरवू, ओके?"

संध्याकाळी सातच्या सुमारास गौरव रेडियोस्टेशनला आला. अमृता लगबगीने गाडीत शिरली..
"Hearty Congrats अमि" असं म्हणत गौरवने एक छोटासा फ़ुलांचा गुच्छ तिच्या हातात दिला आणि खांद्यावर नेहेमीप्रमाणे थोपटलं. आज मात्र अमृता त्या स्पर्शाने शहारली..
"Thanks.."
"आज छान दिसत्येस.. is that a promotion glow or just me?" त्याने नेहेमीप्रमाणे मजेने विचारलं..
"अंऽऽऽ" मनापासून हसत अमृताने उत्तर टाळलं.. "खूप खूप खुश आहे मी आज. सातार्‍यासारख्या छोट्या शहरामधून पुण्यात झक्क बस्तान बसवू शकले.. मस्त वाटतंय.. आणि ही तर फक्त सुरूवात आहे. जम तरी बसलाय. आता या पुढचा विचार करू शकेन. पण आज मोकळा श्वास घ्यावासा वाटतोय.. इतक्या दिवसांची इनसेक्युरिटी होती, ती कमी झाली.. आता जास्त फ़ोकस करू शकेन. Thanks Gaurav. जितका सपोर्ट रणधीर, रागिणी, माझे आई-बाबा, स्टेशनवरचे सगळे यांनी दिला, त्यापेक्षाही जास्त तू दिलायेस मला.. तुला कल्पना नसेल, पण दिलायेस. तू इतका established आहेस, मोठा आहेस.. पण मला अजूनही आठवतंय, मी किती वेळा डाऊन झाले की तुला फोन केला असेल, रडले आहे अनेकदा, आणि सल्ले तर कसकसले विचारलेत मी.. you were always there, I can't thank you enough really!"

इतकी स्तुती ऐकून गौरव थोडा embarass झाला. ""बापरे! अगं इतकं काय? you deserve it! मी फक्त इन्पुट्स देत गेलो, बस. आता इथेच थांबू नकोस पण.. सतत काहीतरी नवीन विचार कर. हा प्रोग्राम, त्यात अजून काय करता येईल, अजून कोणते प्रोग्राम करता येतील, स्क्रिप्ट रायटींग, प्रोड्युसिंग, डबिंग.. मग झालंच तर आमचं जाहिरात क्षेत्र.. काय?" मनापासून बोलत होता तो..
"येस सर."
गौरव जरा चपापला.."ओह! मी सुरूच झालो का? सॉरी.. एक आयडीया आली की मला पुढे इतकं काय काय सुचायला लागतं, की मी बोलतच बसतो. सॉरी! कान पकडतो. आजचा दिवस तुझा. तू बोल..कॉफी प्यायला जाऊया आधी, की लाँग ड्राईव्ह आणि मग डिनर?" असं म्हणत त्याने तिच्याकडे पाहिलं..

तेव्हा मात्र अमृता स्वतःला थांबवू शकली नाही. त्याच्या त्या पिंगट डोळ्यात डोकावत तिने पटकन त्याच्या ओठावर ओठ टेकवले..

आणि पुन्हा एकदा, तो क्षण गेल्यावर तिला भान आलं.. चटकन तिने त्याच्याकडे पाहिलं.. गौरवचे डोळे वेगळंच काही बोलत होते.. एका क्षणात त्यांनी तिच्या अंतरंगाचा वेध घेतला.. "you sure?"
तिने कळतनकळत मान हलवली.. आणि त्याचा उष्ण श्वास तिच्यात मिसळला..

ते सगळं आठवून अमृताला आताही पुसटसं हसू आलं! छोट्या गावातून आलेली ती साधी मुलगी.. एक टीपीकल शहरी मुलाची अशी काही मोहिनी पडली की सर्वार्थाने त्याची होताना मनात किंतूही शिवला नाही.. It was so natural, as natural as pieces of jigsaw puzzle falling into their places perfectly..

त्यानंतरचा प्रत्येक दिवस-रात्र ते एकत्र होते.. कसंबसं काम उरकून ते एकमेकांकडे धाव घ्यायचे. स्टेशनला अमृता दुपारी जायची. एरवी जमेल तशी दुपारपासून त्याच्या ऑफिसलाच असायची. तिथे ती गेली की आपोआप त्याच्या ऑफिसमधल्या मुली उगाच गौरवभोवती रेंगाळणार नाहीत असं तिला उगाचच वाटत असे. पण सगळे लोक कूल, ईझीगोईंग होते. कोणालाच तिच्यामध्ये वा गौरवमध्ये तसा इन्टरेस्ट नव्हता.. तरी अमृता गौरवबद्दल कमालीची पझेसिव्ह झाली होती. हळूहळू त्याच्या ऑफिसमधल्या इतर लोकांशीही छान ओळख, मैत्री झाली होती तिची.. तिथे ती तिला जमेल ते, सुचेल ते करायची किंवा जस्ट गौरवला बघत बसायची.. तिची शिफ्ट संपली की गौरव तिला घ्यायला येई. पेईंग गेस्ट म्हणून अमृता जिथे रहात होती, तिथे फक्त क्लेम म्हणून दर महिन्याला पैसे देण्यापुरती आणि गौरव गावात नसेल तेव्हा रहायची ती. एरवी गौरवचं तीन खोल्यांचं छोटं घर तिचंही झालं होतं..

२.

गौरव एक वादळ होतं.. तिचा होता, तेव्हा तिचा आणि तिचाच. पण काम, बिझनेस, एखादी कॅम्पेन, डोक्याला खाद्य असलं की तो एकटा असायचा, झपाटल्यागत. त्यावेळी तो कोणाचंही मन राखणं, मान देणं वगैरेच्या भानगडीत पडत नसे. गप्प गप्प स्वतःच्याच विचारात हरवून जाई, किंवा फोनवर, नेटवर असे.. त्याचे हे अटॅक अमृताला झेपायचे नाहीत..
'गप्प का गौरव? काही झालंय का? कॉफी करू मस्त? किंवा काही मदत करू तुला? मी आहे ना, मला सांग..'
'च्च! nothing. just leave me alone, I am thinking something..' तो आपल्याच नादात..
'मला सांग तर, कदाचित मी काही सुचवेन.. मला पण येतं अरे यातलं..' ती समजूतदारपणाकडून चिडचिडीकडे आपसूक जायची..
'अरे हो.. पण हे तुझ्यासाठी नाहीये.. जेव्हा असतं तेव्हा बोलतोच ना.. कमॉन.. can't I have some space here??'

आपल्याला असं का होतंय हे अमृतालाही समजत नव्हतं. संशयी नव्हती ती, पण गौरवच्या आसपास सतत रहावं, त्याचं सगळं आपल्याला माहित असावं आणि त्यालाही आपल्याबद्दल सगळं माहित असावं अशी अपेक्षा मात्र होती तिची. नेमकं हेच गौरवला पसंत नव्हतं..

’वेळीच सावर, इतकी पझेसिव्ह होऊ नकोस’- तो समजवायचा तिला. 'हे बघ, मी खूप जास्त मनस्वी आहे.. आणि माणसांच्या बाबतीत बेपर्वा! मला कोणी बांधून ठेवू शकत नाही, कोणी प्रयत्न केला, तर मी त्यांच्याकडे चक्क दुर्लक्ष करतो.’ त्याच्या पारखी नजरेने एका झटक्यात तिचंही अवलोकन करून टाकलं होतं. ’तुला नाही जमायचं अमू.. तू ना एखाद्या घारीसारखी आहेस, तुला तुझी माणसं, तुझ्या वस्तू सतत तुझ्या पंखांखाली लागतात, तुझ्या घरट्यात, तुझ्या उबेत.. ती नाही आली, तर तु अस्वस्थ होतेस.. तुला ना रीपोर्टींग लागतं सगळ्यांचं, if I may put it that way.. नसते हट्ट धरू नकोस.. be normal and sporting about people and things."

अमृताला तिच्या स्वभावाचं इतकं अचूक विश्लेषण तिच्या तोंडावर सांगणारा असा पहिलाच भेटला होता.. त्यामुळे ती तर जास्तच प्रेमात पडली त्याच्या!

दिवस पळत होते.. दोघेही हळूहळू कामात बस्तान बसवत होते.. अमृता स्टेशनवर आता प्रॉडक्शनही करायला लागली. एका अ‍ॅनिमेशन स्टुडीयोमध्ये तिथल्या कार्टून्सला, छोट्या फिल्म्सना आवाज द्यायचे कामही करत होती. रेडीयोवर स्वतःच्या कार्यक्रमाबरोबरच नवीन काही सुरू करत होती, शिकत होती. बाहेर फिरत होती. तिच्या दादा-दादींसाठी थोडा वेळ घालवत होती, जमेल त्या पब्लिक ईव्हेन्ट्समध्ये 'आजी-आजोबांवर प्रेम करा, त्यांचे प्रश्न समजून घ्या' असं सांगत असे ती.. मनासारखं आयुष्य चालू होतं अगदी.. गौरव तर पदोपदी तिला लागायचाच. त्याचा बिझनेस तर दुप्पट वेगानं पळत होता. आणि त्याचबरोबर त्याच्या मुंबईच्या वार्‍याही. अजून दोन पार्टनर, अजून अनेक ज्युनिअर्स, कदाचित मुंबईतच अजून एक पार्टनरशिप, त्याशिवाय पुण्यातल्या आजूबाजूच्या छोट्या शहरातले कस्टमर्स.. वेळ म्हणून पुरत नव्हता कशाला..

अशी जवळजवळ चार वर्ष गेली. तिच्या घरून आता लग्नासाठी छेडाछेडी सुरू झाली. तिचे आई-बाबा सुशिक्षित होते, त्यांचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता.. आणि गौरवमध्ये तर नाव ठेवायला जागाच नव्हती! त्यामुळेच गौरवबद्दल त्यांना सांगून पटकन लग्न करूनच टाकू असा तिचा विचार होता.. पण गंमत म्हणजे गौरवशी अजून ती एकदाही ह्या विषयावर बोलली नव्हती.. ते लग्न करणार हे काळाच्या ओघात कधीतरी होणार होतंच.. त्यावर आता तारखेचं शिक्कामोर्तब हवं होतं.. लवकरात लवकर त्याला विचारायचं ह्याची खूणगाठ तिने मनाशी बांधली.

त्या रात्री चार दिवसांच्या अंतराने ते एकत्र होते.. अजूनही नात्यातलं ताजेपण टिकवून होते ते.. खरंतर बिझी शेड्यूल्समुळे जेवढा वेळ मिळेल तो सत्कारणी लावायची ओढही होती.. तो जवळ असताना जितकं रीलॅक्स्ड वाटायचं, तितकं कधीच वाटायचं नाही अमृताला.. त्याच्या शरीराची ऊब, त्याचा मजबूत स्पर्श, त्याचे मधाळ श्वास.. गौरव असताना परत एकदा स्वतःच्याच अस्तित्त्वाची खात्री जणू तिला पटत असे..

नंतर तो नुसताच पहुडलेला असताना तिने त्याला आवडते तशी कॉफी करून आणली.. कप त्याच्या हातात देत तिने बिचकतच तो विषय काढला..
"गौरव, आपण लग्न कधी करायचं?"
"काय??" त्याला पूर्णपणे हे अनपेक्षित असल्यामुळे तो दचकलाच.. कॉफीही थोडी सांडली..
"हंऽऽ लग्न.. इतकं दचकायला काय झालं?" ती थोडी सरकून बसली.. "लग्न करायचंय ना आपण? 'कबूल कर आता तरी, तुझ्या नसानसांत मी'"- ती खोडकरपणे म्हणाली..
.."'फितूर श्वास सांगती उभ्या जगास बातमी!'"- त्याने पूर्ण केलं.. "अरे, दुनिया जानती है, यह नाचीज किसके आगे झुकता है, किसकी आहें भरता है.. पण लग्न...? इतकं छान चाललेलं आहे आपलं, कशाला लग्नबिग्न?" अगदी कॅज्यूअली म्हणाला तो..
अमृताला धक्काच बसला.. "म्हणजे??? तू माझ्यावर प्रेम करत नाहीस???"

त्याला हसूच आलं! त्याने तिला जवळ ओढत तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं अन् म्हणाला, "प्रेमाचा आणि लग्नाचा काय संबंध? I love you more than anything.. you know that sweetheart.." एक मिनिटभर दोघेही गप्पच होते.. अमृता शॉक्ड, तर गौरव तिचा अंदाज घेत..

नंतर एक मोठ्ठा श्वास घेत तो म्हणाला, "अमू, प्लीज जरा शांतपणे ऐक. माझं चुकलंच.. आपण खरंतर ह्यावर बोललोच नाही कधी.. ओके, ऐक.. माझा लग्नसंस्थेवर विश्वास नाही. माझं तुझ्यावर निस्सीम प्रेम आहे, पण लग्न केल्यानेच ते सिद्ध होईल असं आहे का? लग्न करून सुखी झालेले लोक असतीलही, पण मी लग्न करून दु:खी झालेलेच लोक जास्त पाहिलेत.. I myself have come from a broken family.. माझे आई-वडील विभक्त झालेत, माझ्या बहिणीला मी अनेक वर्ष भेटलेलो नाहीये.. माझ्या दोन मैत्रिणी लग्न होऊन परत आलेल्या मी पाहिल्या आहेत, एका मित्राचं रखडत चाललेलं लग्न पहातोय .. आपण वावरतो ती इन्डस्ट्री- टीव्ही, कॉर्पोरेट्स.. लोकांना वेळच नाही लग्नबिग्न करून ते टिकवायला.. ज्यांनी केलंय, ते त्यातल्या कमिटमेन्ट्सना वैतागलेत, फ्रस्ट्रेट झालेत.. I have seen enough to experience.. तूही विचार कर अमू.. We are better this way.. seriously..तू माझ्या जवळ आहेस, आपण एकमेकांबरोबर खुश आहोत, समाधानी आहोत, आहोत ना?"
"अं? हो.." अमृता अजूनही सुन्नच होती..
तिला हाताने परत वेढून घेत तो म्हणाला, "मग? अजून काय पाहिजे?" त्याचे डोळे तिच्यात रुतवत त्याने विचारले आणि अमृता त्यात परत एकदा वाहून गेली.. कॉफी अर्धवटच राहिली..

पण ते तिच्या मनात राहिलंच. 'ह्याचं आपल्यावर नुसतंच प्रेम आहे, पण लग्न केलंच पाहिजे असं नाही' हे पचायलाच अमृताला खूप वेळ लागला. किंबहुना ते नाहीच पचू शकलं तिला.. प्रेम असलं की लग्न करतातच ना लोक? जे करत नाहीत त्यांच्या प्रेमात काहीतरी खोट आहे ही समजूत तिची इतकी पक्की झाली, की त्या दोघांचे संबंध अचानक खूपच तणावपूर्ण झाले.. वरवर पाहता सगळं ठीक होतं, पण आता सगळ्यातच अमृताला इनसेक्यूरिटी वाटायला लागली.. हा लग्नच करणार नाही, म्हणजे कधीही मला सोडून जाऊ शकेल!- ह्या विचाराने खरोखर भयभीत व्हायची ती! गौरवशिवाय आयुष्य? छे! त्यापेक्षा मरून जाऊ आपण!

शिवाय 'लोक काय म्हणतील' होतंच. घरी काय सांगणार होती ती? बिचार्‍या आई-बाबांना हे सहन झालं असतं का? पुण्यात तर ती उघड त्याच्याबरोबर रहात होती. तिच्या-त्याच्या ऑफिसमधल्या सगळ्या लोकांना माहित होतं.. आणि का नाही करायचं लग्न? दोनचार लग्न नाही झाली ठीक, म्हणजे सगळीच तशी होतात का? आख्खं जग चाललंय ना तसंच? काहीही बोलतो हा. त्याचं मन वळवायचंच..

मग तर तो तिच्या जगण्यातलाच जणू वन-पॉईंट अजेंडा झाला. हरप्रकारे गौरवला लग्नासाठी राजी करणं! तिच्या कामावर त्याचा परिणाम होऊ लागला, आजकाल आजी-आजोबांशीही प्रेमाने बोलायची नाही ती.. त्यांची ४०-५० वर्ष जुनी झालेली लग्न, कोणाचे जोडीदाराविना चाललेले दु:खी दिवस तिला अजूनच डीप्रेस करायचे. नवीन प्रॉडक्शनबद्दल तर ती विचारही करत नव्हती- सगळा मोकळा वेळ 'गौरवशी लग्न' यातच!

एके सकाळी गौरव ऑफिसला जातानाच्या गडबडीत तिला म्हणाला
"अमू, आज पार्टी वेअर काहीतरी घाल. रात्री स्टेशनवरून तसंच देवेनच्या पार्टीला जाऊ.."
"ओह! आज आहे? ए मी नाही येत.."
"का? तुला तर आवडतं ना.. चल ना.. सगळे ओळखीचे लोक आहेत, शिवाय आपल्या ऑफिसचा ग्रूपही आहे.. किती दिवस झाले we haven't chilled out!"
"सगळे ओळखीचे आहेत, म्हणूनच नको.."
"अं? का?"
"आपल्याकडे विचित्र नजरेने पहातात ते.. लग्न न करता तसेच रहाणारे म्हणून.."
"काय? काहीही काय????" गौरवचा विश्वासच बसला नाही! "कमॉन अमृता! असं कोणीही नाहीये. आपल्या आयुष्यात कोणीही ढवळाढवळ करू शकत नाही! नाही केलं लग्न आपण तर त्यांना काय प्रॉब्लेम आहे? आणि त्यांना असला, तरी तुला का आहे? We make a good couple, म्हणून जळतात ते.." तिला खुलवायचा प्रयत्न करत तो म्हणाला..
"हो न? मग लग्न करून त्यांची तोंडं बंद करून टाकू ना?"
"Oh God! You are impossible! आलीस का परत तिथेच?" गौरव चिडलाच. मोठ्या मुश्किलीने स्वतःवर ताबा मिळवत तो म्हणाला, "हे बघ, साधा प्रश्न आहे- पार्टीला येणारेस की नाही?"
"लग्न करायचं प्रॉमिस करणार असलास तर येईन.." तीही हटवादी!
"What? This is ridiculous!!! Fine! यापुढे विचारणार नाही, तूही असले मूर्खासारखे प्रश्न मला विचारू नकोस!" संतापातच तो निघून गेला.
अमृता त्यानंतर रड रड रडली.. पण काय उपयोग होता?

तिलाही समजत होतं, आपण असं वागून-बोलून त्याला दुखावतोय, दुरावतोय त्याच्यापासून. पण लग्नाचं भूत इतकं मानगूटीवर बसलं होतं की दुसरं काही सुचतच नसे. कधी आई फोनवरून विचारतेय म्हणून, कधी कोण्या मैत्रिणीने त्याच्यावरून चिडवलं म्हणून.. कुठूनही विषय वळून तिकडेच जाई.

गौरवही वैतागायला लागला होता.. 'लग्न'हा नुसता विषयच काढला तर हे असं, केलंच असतं तर??? आपला निर्णय योग्य आहे हे पुन्हापुन्हा पटत होते त्याला.. त्याचं खरंच अमृतावर प्रेम होतं.. सुंदर दिवस चालले होते.. तिची अवस्था पाहून त्यालाही तुटायचं.. पण तिचं ते जणू ऑब्सेशन झालं होतं.. समजावायला गेलं की ती लिटरली लग्नाची भीक मागायची त्याच्याकडे, इतकी, की त्याला तिटकारा यायचा, आणि निश्चय दृढ! तो विषय सोडून काहीही बोललं, तर अमृता त्याला रिस्पॉन्सच द्यायची नाही.. त्यामुळे त्याने एकट्याने कितीही प्रयत्न केले तरी दरी रूंदावतच होती!

त्या सकाळी तो नेहेमीच्या वेळी ऑफिससाठी निघाला नाही. उलट सावकाश आवरत होता.. मध्येच उठून बॅग भरायला लागला.. अमृता इतका वेळ नुसतं बघतच होती.. बॅग पाहून मात्र तिला राहवलं नाही..
"कुठे बाहेरगावी चाललायेस?"
"हो. दिल्ली. संध्याकाळची फ्लाईट आहे."
"यावेळी मला विचारलं नाहीस..."
"आपलं लग्न झालेलं नाहीये. असं एकत्र बाहेरगावी जाणं चांगलं दिसत नाही- असं ऐकवलं होतंस ना? येणारेस का?"
"माझा दादादादींबरोबर ओल्डएजहोमच्या भेटीचा प्रोग्राम आहे उद्या सकाळी..."
".. नसता, तर आली असतीस का?"
"मी येणार नाही ही खात्रीच आहे तुला.. म्हणून मला जमणार नाहीये, तेव्हाच जातोयेस का मुद्दाम? म्हणजे मी हो म्हणण्याचा चान्सच नाही!.." सटासट तोंडाला येईल ते बोलत चालली ती..
"करेक्ट! पर्फेक्ट ओळखलंस! काय रिडींग केलंयस माझं! ग्रेट!" उपहासाने तो म्हणाला.. इतक्यात त्याचा सेल वाजला.. "हेऽऽ! हाय!.." बोलत बोलत तो बाहेर गेला.. पुसटसे ऐकू येत होते तिला.. मनात संताप धगधगत होता.. आता हा आपल्याला साधं विचारतही नाही??? इतक्यात त्याचे.. "..ए सोनाली, ऐक, ते प्रिन्ट्स आण, नक्की.. नायतर कत्लेआम होईल.. चल, सीयू अ‍ॅट थ्री, दोन तास आधी चेकईन आहे.. ओके, बाय.." आणि हसल्याचे आवाज आले.. सोनाली?? ही असणारे बरोबर?

"सोनाली येत आहे तुझ्याबरोबर?"
"हो"
"मला सांगितलं का नाहीस?"
"काय संबंध तुझा?"
"बरोबर! मला का सांगशील तू? मी काही तुझी लग्नाची बायको नाही!"
"There you go!! हो, नाहीस तू माझी लग्नाची बायको. कधी होणारही नाहीस. I am fed up of you now! सारखं तेच तेच.. I am glad की आपण नाही केलं लग्न..."
"असंच म्हणणार रे तू.. लग्न केलं नाही की बरं असतं, काल प्रीती, आज अमृता, उद्या सोनाली.." तिने मुद्दामच अतिशय हीनपणे त्याच्या आधीच्या गलफ्रेन्डचा उल्लेख केला..
"Shit! Shit!! I don't believe this! You know well.. I have loved you like anything Amruta.. तरी हे असं????? Gosh!! Just get lost! आत्ता या क्षणी माझ्या डोळ्यासमोरून जा.. नाहीतर माझा ताबा सुटेल.. Just GO!!" तो ओरडला!

असं म्हणला खरं आणि तोच ताडताड घराबाहेर पडला!

अमृता 'आपण हे काय बोलून बसलो' म्हणत रडतरडत खाली कोसळली. स्फुंदून स्फुंदून रडल्यावर 'आपण आपल्या हाताने ह्या नात्याचा शेवट केलाय' हे उमगलं तिला. ज्या एका गोष्टीवर ती कॉम्प्रोमाईज करायला तयार नव्हती, नेमकी तीच गोष्ट गौरवला क्षुल्लक वाटत होती. स्वतःलाच दोष देत राहिली ती.. 'गौरव, गेलास तू? मला सोडून गेलास.. I am sorry.. फार दुखावलं मी तुला.. मी हा हट्ट धरला नसता, तर आजही आपण तसेच आनंदात असतो.. मला हक्क नाही तुझ्या आयुष्यात रहायचा आता..' एका क्षणात निर्णय घेऊन ती उठली.. भराभरा जमेल तसं तिने दोन बॅगांत तिचं सामान कोंबलं आणि तडक घर सोडून निघाली. जाण्यापूर्वी त्या घरावरून तिने नजर फिरवली.. कधी नवखं वाटलंच नव्हतं ते तिला.. गौरवसारखंच त्याचं घरही तिला नेहेमीच आपलंसं वाटलं होतं.. रडतरडतच तिने आपल्यामागे दार ओढून घेतलं आणि बाहेरच्या कुंडीखाली किल्ली ठेवली- शेवटचीच. खिन्नपणे तिने तुळशीकडे पाहिलं आणि जिना उतरायला लागली..

जाण्यापूर्वी गौरवची माफी मागायची अनिवार इच्छा झाली तिला.. डोळे पुसत तिने त्याला फोन लावला.. नुसत्या रिंग्ज्स.. त्याने फोन उचलला नाही.. 'बोलणार नाहीस का रे कधीच आता? माझा शब्दही ऐकवत नाहीये तुला?' पुन्हा एकदा हुंदके द्यायला लागली ती.. तसंच सामान टूव्हीलरवर टाकलं आणि निघाली ती.. शरीर अजूनही हुंदक्यांनी गदगदत होतं.. डोक्यात गेल्या सहा महिन्यातले कटू प्रसंग फिरत होते.. आणि हे आत्ताचं भांडणही.. कुठे जायचं, काहीच ठरवलं नव्हतं.. गाडी भरधाव मात्र निघाली होती.. 'पेईंग गेस्ट म्हणून क्लेम आहे तिथेच जाऊ' असं तिने ठरवलं आणि लक्षात आलं की हा रस्ता भलताच आहे..'सगळे मार्ग चुकतच आहेत..' तिने खेदानं मान हलवली आणि तंद्रीतच रस्त्याच्या उजवीकडे आली.. आता वळणार.. त्या समोरच्या ट्रकचा अंदाजच तिला आला नाही.. आणि!!! क्रॅश!!!

एका क्षणात तिच्या दुचाकीचं चाक ट्रकच्या मागच्या चाकात अडकलं आणि तिची दुचाकी उजवीकडे पडली.. पाय सामानात अडकल्याने तिला धड सुटकाही करून घेता आली नाही.. डिव्हायडरच्या दगडवर तिचं डोकं आपटलं आणि तत्क्षणी तिची शुद्ध गेली..

३.

त्यानंतरचं तिला धड आठवतच नव्हतं.. जाग आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती.. डोक्याला, पायाला, कंबरेला- सगळीकडे बॅन्डेजेस होती.. अंग कमालीचं दुखत होतं, तरी मनातलं दु:ख भळभळत होतंच.. समोर बाबांचा चेहरा दिसला मात्र, आक्रोश करून ती परत रडायला लागली..

देवाच्याच दयेनं तिला खूप इजा झाली असली तरी गंभीर काही नव्हतं. रस्त्यावरच्या लोकांनी तिला अ‍ॅडमिट करून घेतलं.. तिच्याकडे तिचं ओळखपत्र होतं त्यावरून रेडियो स्टेशनवर फोन केला.. सगळे तत्परतेनं पळत आले.. तिच्या घरीही कळवलं..

हॉस्पिटलमध्ये भेटायला सतत लोक येत होते.. पोलिसही सारखे येत होते.. अपघात झाल्याने पोलिसकेस झाली होती.. फोन तर सतत चालूच होता.. पण अमृताला कोणातच रस नव्हता.. तिला सतत गौरवची अनुपस्थिती जाणवत होती.. मोठ्या कष्टाने दोन-चार शब्द बोलायची ती दिवसाकाठी. तिच्या आई-बाबांना तिची अवस्था बघवेना. त्यांनाही इथे रहायला धड जागाही नव्हती.. शेवटी दोन दिवसांनी पोलिस पंचनामा झाल्यानंतर बाबांनी तिला सातार्‍याला नेण्याचा निर्णय घेतला..

ते दिवस एकंदरीतच अमृताचे अतिशय वाईट गेले.. शरीराच्या जखमा होताच, शिवाय मनही घायाळ! जागी असताना टक लावून कुठेतरी बघत जुने दिवस आठवत बसे आणि रडे. नाहीतर औषधाच्या ग्लानीत पडून राही. जखमा हळूहळू भरू लागल्या, पण मन कोमेजलेलंच राहिलं.. एक दिवस मात्र तिने आई-बाबांना बोलताना ऐकलं- 'बरी झाली की तिचं लग्न करून देऊया, तोवर राहिल इथेच. बास झाली नोकरी!'
हे ऐकलंन मात्र आणि अमृताला वास्तवाचं भान आलं. गौरवच्या आठवणी तिला आयुष्यभर पुरला असत्या.. अजून कोणाशीतरी लग्न, संसार.. छे! अशक्य! ज्या लग्नाच्या हट्टामुळे हे सगळं झालं, ते दार आता कायमचं बंद केलं होतं तिने. मग काय इथेच रहायचं? सातार्‍यात? आणि काय करायचं? तिकडचं करीयर, चिरपरिचित वातावरण, आजी-आजोबांबरोबर निर्माण झालेले अनुबंध?- सगळे तोडायचे? नाही नाही!! आणि रणधीर ऑफर देतोय तोवरच परत जायला हवं, नाहीतर कॉम्पीटीशन टफ आहे.. सहज रीप्लेसमेन्ट मिळेल त्याला..

गौरव नाही तर नाही, पण बाकी आयुष्याची वाट लावायची नाही असं तिने ठाम ठरवलं आणि आधी आई-बाबांना तिने गौरव आणि तिच्याबद्दल सगळं सांगून टाकलं.. आणि परत इकडे यायचा निर्णयही. अवाक झाले ते काही वेळ! आपली छोटी, मुलगी, राजरोसपणे शहरात हे काय करत होती? म्हणजे कानावर आलेली कुणकुण खरी होती? आणि आता परत तिथेच जाणार आहे? परत ठेचा खायला? लग्न करणार नाही म्हणते, करीयर करणार म्हणते? आहे तरी काय हे? पण अमृताने त्यांना समजावलं.

"आई-बाबा, प्लीज मला वेळ द्या थोडा.. गौरवचं बाजूला ठेवा.. पण काम हाच माझा प्राण आहे आता! इथे मी नाही राहू शकत अशी नुसतीच. आता कुठे मला ते विश्व कळायला लागलंय, समजायला लागलंय.. लोक माहिती झालेत.. एक मोठी ठेच खाल्लीये मी, पण आता नाही त्या वाटेला जाणार मी, शप्पथ सांगते. पण प्लीज मला नोकरी करायला परवानगी द्या.. रणधीरचे फोन ऐकलेत तुम्ही.. ईमेल्स दाखवल्यात मी तुम्हाला जमेल तशा.. (गौरव नसला, तरी) लोक वाट पहात आहेत माझी.. प्लीज आई.."

*****

आणि अतिशय निग्रहाने शरीराने बरी होऊन, पण मनाने पांगळीच होऊन ती परत आली होती आज.
"अम्रिता, यू ओके ना?" अचानक प्रियाच्या आवाजाने खडबडून ताळ्यावर आली ती..
"अं? हो, या.. अ‍ॅम फाईन, थँक्स.. जस्ट रिलॅक्स होत होते.. कितने बजे? ओह! बारा वाजत आले.."
स्टेशनमध्ये सगळ्यांचीच गडबड चालली होती.. रात्रीच्या प्रोग्राम्सचे आरजे, त्यांचे को-ऑर्ड्ज, उद्याच्या ट्रॅक्सची तयारी करणारे लोक, चुकार प्रोड्यूसर्स सगळे कामं आटोपून घरी निघाले होते..
"तू घर कैसे जायेगी? कहाँ रहती हो अब तुम?' प्रियाने सहजच विचारलं, तरी अमृता ठेचकाळली.. तिच्याही नकळत ती गौरवची गाडी शोधत होती- तिला घरी घेऊन जायला.. हळूच ती म्हणाली,
"मी एका रिलेटीव्हकडे रहातेय थोडे दिवस.. मग परत पेईंग गेस्ट म्हणून राहिन.. अभी जाना है मुकुंदनगर.."
मग अचानकच सगळे जमलेले तिच्या मदतीला पुढे आले.. तिची नाजूक अवस्था सगळ्यांनाच ठाऊक होती ना.. 'तिने एकटीने जाता कामा नये, तिला कोणीतरी सोडले पाहिजे' यावर एकमत झाले आणि शेखरच्या बाईकवर ती बसली. शेखर तिचा चांगला मित्र होता.. त्यामुळे ती तशी ओके होती.. पण अचानक तिला स्वतःचीच लाज वाटली! "किती परावलंबी झालोय आपण! सुमाआत्याकडे तिच्या मनाविरूद्ध रहातोय- कारण अजून पूर्ण शक्ती नाही म्हणून आई-बाबांना मी एकटीनं रहाणं पसंत नाही.. गाडीही चालवायची नाही म्हणे- पण रात्री रिक्षा तरी कुठे मिळते धड? आता काय रोज लिफ्ट मागत बसायचं लोकांकडे? शी! हे असले प्रश्न गौरव असताना कधी पडलेच नाहीत.. दिवस-रात्र-अपरात्र कशाचाच हिशोब नव्हता तेव्हा.. ते काही नाही. उद्या १०ला बाहेर पडायचं म्हणजे पडायचं. तेव्हा मिळतात रिक्षे. आज आत्याकडचे कटाक्ष झेलायला लागतील ते वेगळंच.. पण तिचीही चूक नाही ना.. साडेबाराला कोणी दार वाजवणार असेल तर कोणीही वैतागेल.. छे! पटपट बरं होऊन इन्डीपेन्डन्ट व्हायला हवं.."

कसेबसे अमृता दिवस ढकलत होती. घरी असताना पुण्याला गेल्यानंतर गौरवचं नाव काढायचं नाही असं तिने ठरवलं होतं. 'गौरव आणि आपले मार्ग आता वेगळे आहेत. गौरवला विसरायचं आहे. त्याच्याशिवाय भक्कम जगायचं आहे. तो बरोबर नसला तरी मोडून पडायचं नाहीये' हे तर ती सतत घोकतच होती. तरी पण तिचं अचपळ मन त्याच्यापाशी पळत होतंच. त्या मोठ्या भांडणानंतर त्याचा मागमूस नव्हता. ना हॉस्पिटलमध्ये तो कधी आला, ना त्याचा फोन, ना ईमेल, ना एसेमेस! 'आपण त्याला इतकं दुखावलं की आता आपलं तोंडदेखील पहायची त्याला उत्सुकता नाहीये' हा विचार अमृताला प्रचंड दुखवायचा. 'त्याला आपण नको असू, तर कशाला त्याच्याकडे जायचं? कशाला त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची? त्याने आयुष्यभर पुरेल इतकं सुख, आठवणी दिल्या आहेत, त्या बळावरच जगू' असं एक मन म्हणतंय तोवरच त्याच्या ठावठिकाण्याची उत्सुकता वाटायची. 'कुठे असेल तो? काय करत असेल? माझी आठवण खरंच येत नसेल त्याला?' दुसरं मन विचारायचं.. त्याच्या कंपनीथ्रू अ‍ॅड्ज तिच्या कार्यक्रमाला तरी नव्हत्या. पण इतर कुठे आहेत का हे चाचपून पहायचं तिचं धाडस झालं नाही.

दुपारी दोन ते रात्री दहा कामाची वेळ होती तिची, तरी ती अकराच्या सुमारासच जायची स्टुडीयोत. रविवारीही एका स्पेशल प्रोग्रामसाठी आता ती स्टेशनवर जायला लागली. कामात संपूर्णपणे झोकून दिलंन तिने स्वतःला. इतके श्रम तिला झेपत नव्हते.. औषधं होती, त्यापेक्षाही शारीरिक आणि मानसिक श्रम इतके व्हायचे तिला, की थकून झोप यायची. आता ती सिंगलरूममध्ये पेईंगगेस्ट म्हणून रहात होती. कशीबशी रात्री तिथे पोचायची. रात्री अशी झोप लागायची की सकाळी नऊ वाजल्याशिवाय जाग यायची नाही. कामाव्यतिरिक्त ना कोणाशी बोलायची, ना बाहेर जायची. ऑफिसमध्ये व्हेंडींग मशीनचा कॉफीचा वास यायचा गौरवची आठवण काढत, त्यामुळे पॅन्ट्री, कॅन्टीनमध्ये तिनं जाणं सोडलं. काम करताना टीमशी तेवढ्यापुरती देवाणघेवाण व्हायची. कॉल्समध्ये आजी-आजोबांशी जे काही बोलणं व्हायचं तेच मात्र मनापासून. त्यांचे प्रोग्राम करता करता तीही त्यांच्यासारखीच व्हायला लागली हळूहळू. निस्तेज, खंगलेली, आताची अमृता आणि अगदी काही महिन्यापूर्वीची अमृता यांत जमीन-अस्मानाचा चटका लावणारा फरक होता.

त्या दिवशी सकाळपासूनच अमृता अतिशत अस्वस्थ होती. आज गौरवचा वाढदिवस. नको नको म्हणता सगळं सगळं मन ढवळून टाकत होतं. तिला स्वस्थ बसवेना. किमान त्याच्या घरावरून तरी चक्कर मारावी अशी तीव्र इच्छा तिला झाली. झटपट आवरून तिने रिक्षा पकडली.

गौरवचा फ्लॅट पहिल्या मजल्यावर होता. रस्त्यावरून खिडक्या आणि गॅलरी दिसायची. त्याचं घर जवळ आलं तशी तिच्या काळजातली धडधड वाढली. कसाबसा धीर गोळा करून तिने वर पाहिलं.. पण... पण खिडक्या ओढून घेतलेल्या, गॅलरीचं दारही बंद! तिला फार आश्चर्य वाटलं! 'इतक्या सकाळी कुठे गेला? ऑफिसला गेला असेल? जाऊया तिकडे? असंच, एक झलक दिसली तरी पुरे आजच्यादिवशी..' असा विचार करून तिने रिक्षा तिकडे वळवायला सांगितली. तसं लवकरच होतं. साडेनऊ जस्ट होत होते. हे सगळे लोक उशीरापर्यंत काम करायचे रात्री त्यामुळे इतक्या लवकर ऑफिस उघडलं तरी असेल का शंकाच होती. तिने त्याच्या ऑफिसच्या अलिकडे रिक्षा सोडली अन् चालतच जायला लागली..

किती दिवसांनी येत होती इथे.. ती पार्किंगमध्ये शिरली.. आपसूकच नजर त्या नेहेमीच्या पार्किंगलॉटमध्ये गेली.. गौरवची गाडी नव्हती.. पण एक नवीन कोरी गाडी उभी होती. 'अरे वा! वाढदिवसाला नवीन गाडी घेतली वाटतं! पण आता काय करायचं? वर जायचं? त्याच्यासमोर उभं रहाता येईल? त्याचा हात धरून त्याला विश करता येईल? त्याच्या डोळ्यात बघण्याचं धाडस होईल? त्याला 'कसा आहेस' विचारता येईल?' क्षणात आलेलं अवसान गळालं आणि अमृता घामेजली.. 'इतके धक्के खाऊनही विचार न करता कृती करायची सवय कधी जाणार आपली?'

ती परत फिरणार इतक्यात समोर विनय दत्त म्हणून उभा राहिला! थेट समोर. की त्याला चुकवताही येईना. त्यालाही अमृताला तिकडे बघून मोठा धक्का बसला.. आणि त्याहीपेक्षा मोठा धक्का त्याला तिची अवस्था पाहून बसला.
"अरे! अमृता!! इथे?" त्याने गोंधळून विचारलं..
"अं? हो. अशीच.." तिला काय सांगावं कळेचना.
"वर चल ना."
"नाही, नको... मी अशीच आले होते.. जाते.."
विनयला एका क्षणात परिस्थितीचा अंदाज आला. विनय आणि गौरव पार्टनर्स आणि उत्तम मित्र होते. अमृता त्याला परकी नव्हती. ती अर्थातच इथे का आलीये त्याला समजलं. त्यांच्या ब्रेकअपचा अमृतावर फार वाईट परिणाम झालेला दिसतच होता.
"प्लीज. वर ये. बोलूया."

ऑफिसला कुलूपच होतं. विनयने कुलूप काढलं, दोघेही आत शिरले. तो खिडक्या उघड, लाईट लाव असं काही करत होता तोवर अमृताची नजर ऑफिसावरून फिरत होती. विनय सरळ गौरवच्या केबिनकडेच जायला लागला, तसे तिच्या मनात बारिक प्रश्न फेर धरू लागले? गौरव ऑफिसात येत नव्हता की काय? त्याचं आणि विनयचंही काही वाजलं होतं? विनय तसा चांगला होता.. गौरवसारखाच टॅलेन्टेड होता..

विनय आत गौरवच्याच खुर्चीवर जाऊन बसला, मग मात्र अमृताची खात्री पटली.. काहीतरी गडबड आहे. केबिनचा लूकही थोडा बदलला होता. ती गौरवची नक्कीच वाटत नव्हती.. त्याचा फील नव्हता त्या खोलीला.. तिने मोठा श्वास घेतला..
"बस ना.. पाणी?"
त्याने पाण्याचा ग्लास तिच्यापुढे केला.
"तब्येत फार खराब झालीये तुझी.."
ह्याला किती माहित आहे, किती सांगावं, अमृताचा गोंधळ उडाला. शेवटी सरळ काय ते सांगावं हेच तिने ठरवलं.
"मला अ‍ॅक्सिडेन्ट झाला होता काही महिन्यांपूर्वी.."
"हो.. I know.. बरंच लागलं होतं ना.. but it was good to hear you over the radio once again.. great comeback.."

'ह्याला माहित आहे? सगळं माहित आहे- अ‍ॅक्सिडेन्टचं, मी परत आल्याचं? म्हणजे गौरवला १००% ठाऊक असणार! तरी. तरी त्याने चौकशीचीही फिकिर केली नाही ना! त्रयस्थ, अनोळखी माणसासारखा वागला मी मरणाच्या दारात असताना? आणि मी? मी इथे तडफडत्ये त्याच्यासाठी!! त्याने एकदा बोलावं, मला माफ करावं म्हणून झुरत्ये!!' अमृताला सहन होईना..
"गौरव कुठंय विनय?"
विनयच्या चेहर्‍यावर 'आता हिला काय सांगू?' भाव आले. तो एकदम गप्प झाला. त्याच्या मनातली चलबिचल त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती.. अमृताला त्याचं गप्प बसण्याची अचानक भीती वाटली.. क्षणात आलेला राग वितळून गेला आणि कुशंकांनी तिला घेरलं.. काही बरंवाईट झालं होतं का? गौरव सुखरूप होता ना?
"गौरव कुठंव विनय? कसा आहे? तो ठीक आहे ना? प्लीज काहीतरी बोल.. प्लीज!"

"ह्म्म ओके. I guess आता मी बोललंच पाहिजे. ऐक. पॅनिक होऊ नकोस. Gaurav is fine. Relax. मी विचारात पडलो, कारण त्याला मी एक प्रॉमिस दिलं होतं ते आता मला मोडावं लागणार आहे. अमृता you shocked me! म्हणजे वीकनेस असतो, मी समजू शकतो. पण तुझी अवस्था हॉरिबल झालीये. तू स्वतःची हेळसांड करत्येस, लक्ष देत नाहीयेस हे उघड आहे. But you can't do this to yourself. You can't do this for Gaurav's sake damn it!" तो बोलता बोलता एकदम ईमोशनल झाला..

अं? काय बोलतोय? अमृताला नीटसं समजलं नाही. पण ती थांबली.
विनयने पाणी प्यायलं आणि तो बोलायला लागला.
"त्या दिवशी तुमचं भांडण झालं आणि तू घराबाहेर पडलीस. गौरव ऑलरेडी बाहेर पडला होता. तुला काही वेळाने अ‍ॅक्सिडेन्ट झाला.. चिकार लोक जमा झाले. त्यातल्याच काही लोकांनी तुला अ‍ॅडमिट केले. तुझ्या आयकार्डवरून रेडीयो स्टेशनला कळवलं आणि तुझ्या मोबाईलवरून लास्ट डायल्ड कॉल केला. तो गौरवचा होता. He was the first one to reach the hospital. तू क्रिटीकल अवस्थेत होतीस. तुझा खांदा डिसलोकेट झाला होता.. कानशिलातून, कपाळातून, हात-पाय सगळीकडून रक्त ऑलमोस्ट वहात होतं. You didn't have time till your parents came. You needed blood immediately. ते अव्हेलेबल नव्हतं. दुसर्‍या पेढीतून यायला वेळ लागत होता. गौरवने पटापट सगळे निर्णय घेतले. He told the Hospital that you were his wife! He authorised them to put you through all medication immediately. He dealt with the police. तो वेळेत आला नसता, तर माहित नाही तुझ्यावर उपचार व्हायला किती वेळ गेला असता.. हेच नाही, तर त्याने तुझ्यासाठी रक्तही दिलंय अमि. Only when he was sure you were safe, he disappeared from the scene. आज तुला हे आयुष्य दिसतंय ते फक्त गौरवमुळे. आज तुझ्या शरीरात जे रक्त वहातंय ते गौरवचं आहे अमि. Don't waste it for God's sake!!" विनयचा स्वर हेलावला.

"त्यानंतर तो थेट इकडे आला. He was shattered! त्याने मला हे सगळं सांगितलं. तुमच्या भांडणाबद्दलही. त्याला वाटतंय तोच कारणीभूत आहे तुझ्या अ‍ॅक्सिडेन्टला. तो सतत स्वतःला शिव्या देत होता. मी त्याला खूप शांत करायचा प्रयत्न केला, समजवायचा प्रयत्न केला. पण तो हेच बोलत राहिला- You didn't deserve this. You went through the trauma because of him. त्या दुपारी तो दिल्लीला जायचा होता. आमची एक क्रूशियल मीटींग होती. तिकडच्या एका एजन्सीसोबत एक मोठा क्लायंट मिळायची शक्यता होती. तो मिळाला असता, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि साऊथचं मार्केटींग आपल्याकडे येणार होतं. त्याही अवस्थेत गौरव तिकडे गेला, he clinched the deal for us! For this company and.. and along with the papers he put his papers too. त्याने पार्टनरशिपमधून रीझाईन केलं. तो परत आला ते जाण्यासाठीच. त्याने दिल्लीतच आमच्या सहयोगी एजन्सीत जायचा निर्णय घेतला. He simply ran away from here. जाण्यापूर्वी आम्ही एकदा भेटलो. त्याचं गिल्ट जात नव्हतं. मी सतत तुझा फॉलो-अप घेत होतो. तू ठीक आहेस, रीकव्हर होत्येस हे ऐकून he was very much relieved. तुझ्या आयुष्यात तो असता कामा नये, तो नसला तरच तू सुखी होशील, तुझ्यासारखाच कोणी चांगला साथीदार तुला मिळेल असं त्याचं म्हणणं होतं. हे सगळं मी तुला कधीही सांगणार नाही असं वचन त्याने माझ्याकडून घेतलं आणि तो इकडून गेला."

"आज माझा आणि त्याचा कॉन्टॅक्ट आहे, आम्हाला तो ठेवावाच लागतो कारण आम्ही एकत्र काम करतो. पण आता आम्ही strictly professionals आहोत. We don't discuss anything apart from work as a rule. त्या दिवसानंतर त्याने तुझं नाव घेतलेलं नाही. He doesn't want to spoil your life. पण तो बरा आहे. त्याचं आवडतं काम करतोय. आणि तूही आता बरी आहेस, तुझं आवडतं काम करत आहेस.. anyways, here we are. This is it."

अमृता ऐकता ऐकता जागच्याजागी थिजली. सुन्न झाली. 'हे इतकं सगळं केलंस माझ्यासाठी? तुझ्या प्रेमाला समजण्यात मीच तोकडी पडले रे! एकमेकांचे नवरा-बायको होण्यासाठी लग्नाचा उपचार गरजेचा नसतो हे मला कळलंच नाही कधी! मग गौरव, इतकं एकमेकांवर जीव तोडून प्रेम केल्यानंतर, शेवटी आपल्या वाट्याला हे भोग का यावेत रे?

ओ गौरव! तू माझ्या आयुष्यात असलास तर माझं काही चांगलं होणार नाही असं म्हणतोस? नाहीयेस तू आत्ता. काय चांगलं चाललंय मग माझं? सांग! मला कोणी चांगला साथीदार मिळेल म्हणतोस? कोणाला तुझ्या नखाचीदेखील सर असेल का रे? का नाही पुन्हा एकत्र येऊन एक नवीन जीवन सुरू करायचं? का तडफडायचं असं मनाविरूद्ध? मी नाही रे कोणताच हट्ट करणार आता. मला फक्त तू हवायेस. तुझ्याविना एक एक क्षण नकोसा होतोय मला. आणि तुलाही. मग का हे दु:ख सहन करायचं? का असे एकमेकांविना दिवस काढायचे?

पण हेच जर प्राक्तन असेल, तर मी ते स्वीकारते गौरव. नसेल नशीबाला आपलं एकत्र येणं मंजूर, तर नसूदे. आज माझं जीवन तुझं देणं आहे. आज माझ्या नसानसांत तू आहेस. तुझा सळसळता उत्साह, तुझी बुद्धीमत्ता, तुझं झोकून देणं- सगळं सगळं आता माझंही आहे गौरव. ते तर कोणी हिसकावून घेऊ शकणार नाही ना? आता मला नाही कोणाची पर्वा. मला आयुष्य दिलं आहेस तू, ते तुझ्यासाठीच जपेन मी. फक्त तुझ्यासाठी.'

*****

"हाऽऽऽऽऽय ऑल माय यंग ऍंड लव्हली फ्रेन्ड्ज!! कसे आहात? फोक्स, आज तुम्हाला काही सांगावसं वाटतंय.. तुम्ही तर सगळे सीनीयर्स.. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आल्यानंतर किती mixed feelings असतील ना तुमच्याकडे? खूप खूप प्रेमाची माणसं जवळपास असतील, तर काही आपल्या चुकीच्या बोलण्यामुळे, वागण्यामुळे दुरावलेली, दुखावलेली नातीही असतीलच.. ह्या अशा सुटलेल्या नात्यांकडे पाहून आपण नेहेमीच दु:खी होतो.. असं वाटतं, अरे का हे असं झालं? आपण हे टाळू शकलो नसतो का? हा दुरावा यायलाच हवा होता का? पण फ्रेन्ड्ज, हाच दुरावा आपल्याला कधीकधी खूप काही शिकवून जातो.. आपण कसं वागायला नको होतं, काय चुका करायला नको होत्या.. ह्यावर विचार करायला भाग पाडतो.. मग आपण फक्त एकच करू शकतो- मनापासून त्या दुरावलेल्याची माफी मागू शकतो.. देवापाशी प्रार्थना करू शकतो, की देवा एकदातरी माझी माफी त्याच्यापर्यंत पोचूदे.. त्यालाही कळूदे माझा पश्चात्ताप.

बाकी लाईफ गोज ऑन.. वी ऑल नो.. सुरूवात करूया अशाच एका गाण्याने, 'जीवनगाणे गातच जावे..' ही आहे अमि, तुमच्यासोबत, तुमच्यासाठी.."

-समाप्त.

विषय: 
प्रकार: 

ही कथा माहेरच्या फेब्रुवारी अंकात प्रसिद्ध झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, पूनम!
पुढल्या लिखाणास माझ्याकडून शुभेच्छा. Happy

Pages