खानदेशी मांडे

Submitted by साधना on 29 November, 2009 - 10:44

मांडे हा शब्द मी पहिल्यांदा साधारण दुसरी-तिसरीत असताना मराठीच्या पुस्तकात वाचला. मनातल्या मनात मांडे खाल्ले, मनातले मांडे मनातच जिरले.. वगैरे वाचुन मांडे म्हणजे काहीतरी खायचा पदार्थ आहे हे लक्षात आले. पण हा पदार्थ दिसतो कसा, खातात कशाबरोबर इत्यादी प्रश्न मनात उपस्थित झाले. म्हणजे तसे मला तेव्हा जिलेबी, पुरणपोळी इत्यादी पदार्थही कसे दिसतात ते माहित नव्हते. पण ते शब्द कानावरुनही गेले नव्हते, त्यामुळे अर्थात दिसतात कसे हा प्रश्न उपस्थित झाला नव्हता.

मग काही दिवस मी आईच्या मागे भुंगा लावुन दिला, 'मांडे म्हणजे काय ते मला सांग.' आता आंबोलीसारख्या खेड्यात राहणा-या माझ्या आईनेही मांडे कधी ऐकले नव्हते. ती मला काय सांगणार कप्पाळ??!! तिला फक्त तांदळापासुन बनवण्यात येणारे पोळ्या, खापरोळ्या, शिरवाळ्या इत्यादी पदार्थ माहित होते. शेवटी तिने मांडे हे आंबोळीसारखेच असतात असे मला सांगुन स्वतःची सुटका करुन घेतली. सगळे जग तांदुळमयच आहे यावर माझा तेव्हा खुपच विश्वास होता, त्यामुळे मीही मांडे हा आंबोळीसारखा दिसणारा, तांदळापासुन बनवलेला काहीतरी गोड गोड पदार्थ आहे असा माझा समज करुन घेतला. कालांतराने मी हे सगळे विसरुनही गेले.

काही वर्षांपुर्वी लोकप्रभाचा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील पदार्थांवर एक विशेषांक निघाला होता. त्यात मांड्यांचा उल्लेख वाचला. परत सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. पण एक पदार्थ म्हणुन मांड्यांबद्दल काहीच माहिती त्या अंकात दिली नव्हती. लेखकाने 'मांडे खुप मोठे होते, एकाचे चार तुकडे करुन आम्ही खाल्ले' म्हणुन लिहिले होते. परत माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू..... इतका मोठा पदार्थ की चारजणांना खावा लागला? नक्कीच लेखकाची खाण्याची क्षमता कमी असणार....... Happy

तेव्हा इंटरनेट वगैरे फारसे नसल्याने गुगलुन वगैरे पाहताही आले नाही.. (आता सगळे कसे सोप्पे झालेय ना?? डोक्यात प्रश्न आला की चला लगेच गुगलवर...... Happy )

मांड्यांना मी परत एकदा विसरले. तीनचार वर्षांपुर्वी ऑफिसात सटाणा-नाशिकच्या एका मित्राने पुरणपोळीसदृष्य एक पदार्थ आणला. एकदम पातळ कवर आणि त्यात अतिशय कोरडे असे गोड सारण. आकार कसा असणार याचा पत्ता लागेना कारण त्याने तुकडे करुन आणलेले. हे काय आहे असे विचारल्यावर तो म्हणाला, आमच्याकडे ह्याला मांडे म्हणतात. तुम्ही पुरणपोळी म्हणा आणि खा. मी एकदम उडीच मारली. म्हटले, गेले कित्येक वर्षे मी जे मांडे मांडे म्हणुन ऐकतेय ते आज असे अचानक पुढ्यात आले....

मग त्या मित्राला विचारले कसे करतात वगैरे वगैरे. तो म्हणाला, खुप कठीण आहेत करायला. माझी आई हातांवर अश्शी अश्शी फिरवुन करते आणि मग खापरावर भाजते. मी परत बुचकळ्यात. आमच्याकडे मातीचे मडके फुटले की त्याच्या तुकड्याला खापर म्हणतात. Happy आता ह्या लोकांनी खापराच्या तुकड्यांवर कसे काय भाजले असणार हे मांडे. छ्या.. खुप गर्दी झाली डोक्यात विचारांची. त्या मित्राला माझी दया आली. तो म्हणाला, कधीतरी माझ्या गावी ये आणि बघ कसे करतात ते मांडे.

तर मित्रांनो, माझ्या त्या दिव्य मित्राच्या घरी जाऊन मांडे बघण्याचे भाग्य मला ह्या दस-याला लाभले. त्याच्या घरी चक्रपुजा होती. त्या निमित्ताने त्याने बोलावले. म्हणाला, मांडे हा चक्रपुजेतला एक महत्वाचा घटक आहे, तर तुला त्या निमित्ताने पहायला मिळेल मांडे कसे करतात ते. मी मग अगदी सुरवातीपासुन पाहिले मांडे कसे करतात ते आणि तुमच्यापैकी कोणी माझ्यासारखेच अज्ञ असतील मांड्यांच्या बाबतीत तर त्यांचेही अज्ञान दुर व्हावे म्हणुन इथे लिहिण्याचा उद्योग करतेय... Happy

बाकी हे मला पाककृतीतही टाकता आले असते, पण जी पाकृ मला ह्या जन्मात करायला जमणार नाहीय ती उगाच इथे टाकायला जीव धजावला नाही. इथे टाकण्यासाठीची पाकृ आधी आपल्याला तरी करता यायला पाहिजे ना.....

तर मंडळी, आता मांड्यांच्या पाकृ बद्दल.

मांड्यांचे सारण आपण पुरणपोळीचे करतो तसेच करतात. चणाडाळ धुवुन चुलीवर शिजत ठेवतात, शिजली की मोठ्या चाळणीवर ओतुन पाणी पुर्णपणे काढतात आणि मग परत चुलीवर चढवुन तिच्यात गुळ घालुन गुळ शिजेपर्यंत आणि सारण थोडे सुकेपर्यंत ढवळत राहतात. गरम असतानाच पाट्यावर वाटायचे. मिक्सरवर वाटले तरी चालते. एकदम बारीक वाटले गेले म्हणजे झाले.

सारणाचा वेगळा फोटो नाहीय, पण खालच्या फोटोत सारण दिसतेय, त्यावरुन अंदाज येईल सारण कसे दिसत असेल त्याचा.

saaran.JPG

मांड्यांचे कवर पाहुन ते मैद्याचे केलेय असे वाटते पण ते तसे नाहीय. अगदी उत्तम प्रतिचा लोकवण वगैरे गहु घ्यायचा, तो स्वच्छ धुऊन उन्हात वाळवायचा आणि जात्यावर अगदी बारीक पिठ दळायचे. जर गिरणीवर दळुन आणले तरी चालते. नंतर चाळणीने चाळण्याऐवजी वस्त्रगाळ करुन घ्यायचे. पिठ वस्त्रगाळ करुन घेतले नाही तर मांडा बनवताना कडेला जाड राहतो, भाजताना कडा निट भाजल्या जात नाहीत आणि मग तेवढी गोल कड काढुन टाकावी लागते.

pith.JPG

मग हवे तितके पिठ घेऊन थोडे तेल घालून, मीठ घालुन पाण्याने भिजवायचे. मीठ अगदी नेमके, योग्य प्रमाणात घालायला हवे, कारण कमी पडले तर मांडा करताना मोडतो. साधारण पोळ्यांसाठी भिजवतो तसे भिजवायचे नी मग त्याला तासभर तरी तेल लावुन उलटेसुलटे फिरवत तिंबत बसायचे. तासाभराने अगदी मैद्याच्या पिठासारखा पोत आणि लवचिकपणा येतो या पिठाच्या गोळ्याला. सारणापेक्षा पिठ निट जमायला हवे, नाहीतर सगळेच ओम्फस व्हायचे. मांडा करताना मोडत असल्यास मीठ बरोबर पडले का ते चेक करतात आणि कमी असल्यास घालुन परत मळतात. मग मांडा न मोडता व्यवस्थित होतो.

पिठ भिजवणा-या आजीबाईंनी दोन चमचे पुरण टाकले पिठात आणि परत एकदा तिंबुन मग झाकुन ठेवले गोळ्याला. असे केल्याने छान लाटले जाते म्हणे. Happy

gola.JPG

आता पिठ आणि सारण दोन्ही तयार आहेत. तिन विटा मांडुन वेगळी चुल लावली जाते. अर्थात आज भरपुर मांडे करायचे असल्याने ही सोय केलीय. अन्यथा रोजच्याच चुलीवर खापर ठेऊन मांडे भाजायचे. हे खापर म्हणजे खास मांडे भाजण्यासाठी बनवलेलेल मातीचे भांडे! साधारण १५०-२०० रु. पर्यंत किंमत असलेले हे मडके दिसायला दोन बशा एकमेकींवर उपड्या ठेवल्या तर जशा दिसतील तसे दिसते. त्याला खालच्या बाजुने तोंड असते. तिच्यातुन धग वरपर्यंत पोचुन मांडे भाजले जातात. शहरवासिय मांडेप्रेमींसाठी गॅसवर वापरता येतील अशी लहान आकाराची खापरेही आता बाजारात मिळु लागलीत अशी माहिती आजीबाईंनी दिली.

तर आता मांडा बनवतात कसा ते पाहु. प्रथम आपली मोठी पोळी असते त्या आकाराच्या दोन पोळ्या करुन घेतात. मग साधारण नारळाच्या आकाराचा सारणाचा गोळा घेऊन त्याला ह्या दोन पोळ्यांच्या मधे ठेवतात. बाजु हळु बंद करुन घेतात आणि मग बाजुबाजुने हळुवारपणे लाटायचं. लाटताना पोळपाट न वापरता मोठे ताट उपडे घालुन त्यावर लाटतात म्हणजे मोठा पृष्ठभाग मिळतो लाटायला. लाटत लाटत ताट भरले की पोळी हळुच उचलुन हाताने फिरवायची. फिरवत फिरवत अलगद दोन्ही हात आडवे घेऊन कोपरांचा आधार द्यायचा आणि कोपराकोपरांनी मांड्याला फिरवायचे. हे काम जलद करावे लागते त्याचबरोबर जपुनही करावे लागते. जलद अशासाठी की सारण सरकून एकाच बाजुला यायला नको आणि हे करताना मांडा मोडु नये म्हणुन जपायचे.

maande.JPG

असा तयार झालेला मांडा आता खापरावर टाकायचा. एवढा मोठा मांडा गोल आकाराच्या खापरावर अजिबात चुणी वगैरे न पाडता टाकणे ही सुद्धा एक मोठी कला आहे असे वाटले पाहुन.
maande-4.JPG

मांडा खापरावरुन घसरुन पडु नये म्हणुन कधीकधी काहीतरी जड ठेवतात वर.

maande-1.JPG

मग एका बाजुने भाजला की अलगदपणे आणि अतिशय वेगात तो उलटवायचा.

maande-2.JPG

दोन्ही बाजु भाजल्या की खाली काढायचा आणि जरा थंड झाला की घडी घालायची. ही घडी आयताकृती घालतात. जर कोणी नुसती घडी बघितली की त्याला पत्ताच लागणार नाही हा पदार्थ गोल आहे ह्याचा.

maande-3.JPG

आपण पुरणपोळीला वरुन तुप लावतो तसे मांड्यांना तुप वगैरे काही लावत नाहीत. चणाडाळ शिजवल्यावर जे पाणी काढतात त्याचीच आपण कटाची आमटी करतो तशी आमटी करतात. त्यात मांडा बुडवुन खातात. तसेच दुध थोडे आटवुन त्यात साखर घालुन बासुंदीसारखे करतात. चक्रपुजेला हे दोन प्रकार करतात आणि मांडा त्यात बुडवुन खातात.

आंब्याच्या मोसमात आमरस करायचा आणि सोबत मांडे! एरवी एक माणुस फक्त अर्धाच मांडा खाऊ शकतो एकावेळी. पण आमरस केल्यास मात्र १ ते दिड मांडा एक माणुस सहजपणे खाउन जातो अशी आमरसाची किमया आजोबांनी ऐकवली!!!!

चक्रपुजा ही घरात धनधान्य भरपुर यावे, समृद्धी यावी यासाठी केली जाते असे मला पुजेचे स्वरुप पाहुन वाटले. सांज्याच्या करंज्या करतात, त्यांना सांजोरी म्हणतात. गुळाचे पाणी घालुन गव्हाच्या गोड पु-या करतात, त्यांना सोळी म्हणतात.

पुजा मांड्ताना एका बाजुला वीटा रचुन होमाची तयारी करतात. होमापुढे तांदुळ पसरतात आणि मुठीत तांदुळ घेऊन एकात एक अशी पाच्-सात वर्तुळे काढतात. त्या वर्तुळावर घरच्या बागेतल्या आंबा, सिताफळ, लिंबु वगैरे झाडांच्या छोट्या फांद्या अंथरतात. त्यावर गोलाकारात मांडे रचतात. मधे एक आणि बाजुला गोल दहा मांडे असे अकरा मांडे रचतात. मांड्यांवर सोळी, सांजोरी लावतात. तळलेल्या कुरडया रचतात. त्यावर दहा दिवे आणि मध्ये एक मोठा दिवा (ह्याला मेंढ्या म्हणतात) असे पिठाचे दिवे ठेवतात. हे दिवेही आधी बनवुन उकडुन तयार ठेवतात.

dive.JPGchakra.JPGchakra-1.JPG

होम पेटवल्यावर होमाच्या ज्योतीने मधला दिवा आणि बाजुचे दहा दिवे पेटवतात. मग सगळ्यांनी नमस्कार करायचा. सगळे झाले की पंगत बसते आणि मग मांड्याचा यथायोग्य समाचार घेतला जातो.

तर असे हे मांडेपुराण.... आवडले तर पुढच्या वर्षी माझ्याबरोबर चला चक्रपुजेला.... Happy

विडिओज पण घेतलेले आहेत. खाली लिंक्स दिल्यात त्या कृपया पाहा. आवाज मात्र शुन्यावर ठेवा, अर्थात ज्यांना अहिराणी बडबड ऐकायची असेल त्यांनी ऐकावी.... Happy

विडिओ मी आता नीट लावले आहेत. पहिला आहे दोन छोट्या पोळ्या करण्याचा.

http://www.youtube.com/watch?v=BuTJlQbDfjo

दोन पोळ्या झाल्या की नारळाएवढे सारण घ्यायचे आणि भरायचे दोन पोळ्यांमध्ये आणि मग मांडा लाटायला घ्यायचा.

http://www.youtube.com/watch?v=2LFboZydbvo

जरासा मोठा झाला की अलगद हातावर उचलुन घ्यायचा आणि मनगट व कोपराचा आधार देत देत मोठा करायचा. अगदी पातळ झाला की मग खापरावर टाकायचा. कधीकधी मांडा सुळ्ळकन घसरुनही पडतो खापरावरुन. तसे होऊ नये म्हणुन काहीतरी जड ठेवतात वर. फोटोत मक्याचे दाणे काढल्यावर उरलेले कांड ठेवले आहे. एरवी त्याचा उपयोग सैपाकघरात जळण म्हणुन होतो.

एक बाजु पुरती भाजली गेली की मांडा उलटवायचा. मांड्याला खालच्या बाजुला कधीकधी आंच मिळत नाही त्यामुळे जळते लाकुड घेऊन त्याचा शेक देतात. दोन्ही बाजु शेकल्या की उतरवायचा आणि घडी घालायची.

http://www.youtube.com/watch?v=staE9-Vzts4

मला मांडे करुन पाहण्याचा खुप आग्रह झाला. पण इतक्या बायकांच्या फौजेसमोर आपले पितळ उघडे पडु नये म्हणुन मी नम्रपणे नकार दिला Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा,
एक्झॅक्टली हा प्रकार आमच्या 'पोस्टिरियर' कँटीनच्या शेट्टीच्या हॉटेलात मिळायचा.
डोसा-ऑम्लेट.
डोसा तव्यावर टाकून अर्धवट शिजला, की त्यावर अंड्याच्या आम्लेटची तयारी पसरायची. (अंडी+कांदा+मिरची+तिखट्+मीठ इ.) जबरदस्त सेक्षी अन टेस्टी प्रकरण.

साधना, किती मस्त लिहीले आहेस. फोटो आणि व्हिडीओ दोन्ही छान. व्हिडीओ शिवाय हे कसे करतात याची कल्पना येणं कठीण होत. मी ही मांडे ह्याप्रकाराबद्द्ल ऐकून होते पण बघितले नव्हते. काय कौशल्य आहे ग करण्याचं. तु हे सगळं लिहील नसतस तर कधी कल्पना ही आली नसती ह्या स्किल ची.

मनःस्विनी, तुम्ही पण ग्रेट्च आहात. मस्त जमलेत मांडे तुम्ही केलेले ही.

धागा वर काढल्याबद्दल ही धन्यवाद.

केवळ महान, जबरी, इ. साधना - इथे इतक्या तपशीलात दिल्याबद्दल धन्यवाद. आधी बघितलाच नव्हता. फेबुवर शेअर करते आहे Happy

वॉव! दिवस सार्थकी लागला माझा हा धागा वाचून! काय भारी पदार्थ आहे आणि त्या बायकांकडे किती सुरेख स्किल्स आहेत! सगळं वाचून बघून मांडे विशलिस्टमध्ये जाऊन बसले आहेत!

साधना, खूप खूप धन्यवाद! तांदूळमय जग ही फ्रेज आवडली! असं जग असणारे भातखाऊ पब्लिक आहे आमच्यकडे सगळे Lol

मनस्विनी, कित्ती भारी! Kudos!

मस्तच! मी मा.न्डे करताना बघितलेत , हातावर न तुटता तो वाढवत न्यायचा यात फारफार एक्स्पर्टिज लागतात..

साधनाताई आज तुमच्यामुळे मला खुप वर्षापासुन पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. ज्ञानेश्वर माऊलींनी मांडे भाजायला खापर दिले नाही म्हणुन मुक्ताईला मांडे आपल्या पाठीवर भाजायला सांगितले हे लहानपणापासुन ऐकत आलो त्यामुळे मांडे हा खायचा प्रकार असतो हे माहिती होते. पण मला वाटायचं की पश्चिम महाराष्ट्रात मांडे हा प्रकार असावा म्हणुन मी तेथील अनेकांना ह्या बाबतीत विचारणा केली पण कोणीच समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही आज तुमच्या मुळेच कळंल की मांडे म्हणजे काय त्याबद्दल आपले आभार.
दिलेल्या माहितीवरून तरी हे खुपच कौशल्याचे काम आहे हे लक्षात येत आहे(कार्यालयात तुनळीला चाप लावल्यामुळे व्हिडिओ लिंक पाहू शकत नाही). आणि त्यामुळेच मनात मांडे खाणे हा वाक्यप्रचार रूढ झाला असावा असे वाटते:) Happy :स्मित:.

साधना... ! खुप सुन्दर! गावाकडे आता बाया लावुन हे मान्डे बनवण्याच काम करुन घेतात. इथे पवनाथडी जत्रेत प्रत्यक्ष करतान्ना बघितलेत.
आणी हो, चक्रपुजेबद्दल छान लिहिल आहेस.
ही यावर्षी नवरात्र अष्टमीला आमच्याकडे झालेली चक्रपुजा...
IMG_20141002_194358

साधना, मी फेबु वर लिंक शेअर केल्यावर भोपाळ येथील IGRMS म्हणजेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय च्या फेबु पेज ने माझ्या वॉलवरून तुझी लिंक शेअर केली आहे.

अभिनंदन Happy

साधना खुप छान लेख, माहिती, प्र.ची.. व्हीडीओ, सगळच छान ..

आमच्याकडे(नागपूरला) पण हा प्रकार प्रख्यात आहे... माझ्य घराजवळच काही बायका चुल आणि माठ याच्यावर करुन देतात. नॉनवेज सोबत लोक जास्त प्रेफर करतात... आंब्याच्या रसा बरोबर तर अप्रतिमच लागतात.(आम्ही शाकाहारी असल्यामुळे फक्त आमरसाबरोबरच....)

सायली , धुळे जळगाव भागा तही असे पुरण रहीत मांडे बनवतात जे मटणाबरोबर खाल्ले जातात. मी कधी खल्ले नाहीत पण वरच्या प्रतिसादात चिनुक्स, छावा यांनी लिहिलेय त्यांच्याबद्दल.

नयना, चक्रपूजेचा फोटो मस्तच.

इकडे 'महालक्ष्मी सरस' प्रदर्शन लागले की तिथे पुरणाचे व साधे मांडे मिळायचे स्टॉल्स असतात. मी गेल्यावर्षी पुरणाचा मांडा खाल्ला होता.

छान माहिती , माझे लहानपण गेले आजीच्या हातचे मांडे खाऊन, मांडे हा एक पुरणपोळी सदृश्य प्रकार, तिकडे शक्यतो पुरणपोळ्या नसायच्याच, उन्हाळ्यात आंब्याचा रस आणि मांडे हा तर फेवरेट बेत. माझ्या माहेरी आमच्या कॉलनीत लोकांना मांडे या प्रकाराबद्दल भयंकर औत्सुक्य, तेव्हा आजीने माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नात सगळ्या कॉलनीला मांड्याचे जेवण घातले होते, हे माझ्या नातीचे गडागणेर म्हणून. आमच्या इथे वडिलांना मागच्या बागेत चूल करायला लावली आणि मामाला खापर आणायला लावले एसटी ने, सगळ्या आठवणी जाग्या झाल्या या मांड्याच्या उल्लेखाने. हे फक्त चक्रपूजेलाच करतात असे नाही तर सणासुदीला करतातच

बापरे.
हा प्रकार मला कधी जमेल असं वाटत नाही.मांडे हातावर फिरवण्याचा, भाकरी 2 हातात थापण्याचा प्रत्येक व्हिडीओ मी ज्ञानेश्वर भिंत चालवताय वगैरे मायथोलॉजिकल पिक्चर मधल्या चमत्कारासारखा आ वासून बघते.
मायबोली वर प्रत्यक्ष असलेले मांडे कुक मला पायांचे फोटो पाठवा.

mi_anu Lol Lol

सही...
हि मी प्रयंत्न केलेली खापराची पुरणपोळी ... इकडे खापर available नसल्याने कढई वापरलाय..
IMG-20210814-WA0016.jpgIMG-20210814-WA0017.jpg

Grt

Pages