'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे'

Submitted by अभय आर्वीकर on 27 November, 2009 - 05:37

. शेतक-यांच्या आत्महत्यांच्या समस्येवर सद्ध्या बरीच चर्चा आणि उहापोह सुरु आहे. या समस्येची उकल करतांना अनेक मान्यवरांनी शोधलेली कारणे आणि सुचविलेले उपाय बघितले तर "शेतकरी मरतोय तर मरू द्या पण त्याच्या आत्महत्येची कारण-मीमांसा करणे आणि उपाय सुचविणे बंद करा" अशा स्वरुपाची आत्मक्लेशी प्रतिक्रिया शेतकरी समाजमनात उमटल्याशिवाय राहत नाही. कारण शेतक-यांच्या आत्महत्येच्या दु:खद वेदनांपेक्षा यांच्या प्रतिक्रिया अधिक वेदनादायी असतात.
शेतकरी आळशी किंवा कामचुकार आहे असे वाटते त्या सर्व मान्यवर तज्ज्ञांनी आयुष्यात एकदातरी सलगपणे काही दिवस शेतकरी समाजासोबत (पाटलाच्या वाड्यात किवा राजकीय पुढा-याच्या बंगल्यात नव्हे ) घालवायला हवे. त्याखेरीज शेतकरी कशाला म्हणतात,तो कसे जीवन जगतो आणि किती कष्ट करतो याचा अनुभव येणे अशक्य आहे. ४-५ तास किंवा अर्धा-एक दिवस शेतक-याच्या झोपडीत घालवल्याने जर कुणाला शेतकरी समजला असे वाटत असेल तर खुशाल वाटू दे,पण हा देश आपण कोण्या कामचुकार,आळशी,अलायक तज्ज्ञांचा हातात सोपवला असा प्रश्न जर कोण्या ग्यानबाला पडला,तर त्याच्याशी वाद घालता येईल,मुजोरीही करता येईल पण त्या ग्यानबाच्या प्रश्नाचे समर्पक निराकरण करता येईल.?
झोप,जेवण आणि अन्य शारीरिक विधींसाठी लागणारा काळ सोडला तर उर्वरित वेळात शेतकरी काय करतो? स्विमिंग करायला जातो? क्रिकेट / सिनेमा बघायला जातो? बायकोला घेऊन बागेत फिरायला जातो? बीअरबारवर जातो? बारबालांचे नृत्य बघायला जातो कि इतवारी / बुधवारपेठेत फेरफटका मारायला जातो? मान्यवर तज्ज्ञांनी पहिल्यांदा या प्रश्नांचे उत्तर शोधायला हवे.( आणि जरी का या प्रश्नांचे उत्तर होकारार्थी असेल तरीही बिघडते कुठे? सर्व उपभोगाचा भोग भोगणारी आमच्या सारखी भोगवादी मंडळी कुठे आत्महत्त्या करताहेत? आम्ही जिवंतच आहोत कि अजून.)
औताच्या बैलाला वर्षातून फक्त १२० ते १४० दिवस तर शेतक-याला मात्र ३६५ दिवस काम करावे लागते,बाप मेला सुट्टी नाही,बापाला तिरडीवर तसाच ठेवून बैलाचे शेनगोटा, चारापाणी करायला जावेच लागते.पोरगा तापाने फणफणत असेल किंवा अगदी Gastro जरी झाला तरीही पेरणी थांबवता येत नाही हे वाजवी सत्य तज्ज्ञ मंडळींना कधी कळेल?
तरीही या तज्ज्ञ मंडळींना शेतकरी आळशी आणि कामचुकार दिसत असेल तर त्यांनी खालील प्रमाणे शास्त्रशुद्ध मार्गाचा अवलंब करून स्वत:ची खातरजमा करून घ्यावी.
आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याच्या घरी जावून ;
१) प्रेताचे वजन करावे व शारीरिक उंची मोजावी. वजन व उंची यांचा रेशो काढावा. तो डॉक्टरला दाखवावा.मय्यत व्यक्ती सुदृढ कि कुपोषित,कष्टकरी कि कामचुकार या विषयी सल्ला घ्यावा.
२) मुखवट्याचा एक क्लोजअप फोटो घ्यावा.त्यावरून मरण्यापूर्वी त्याच्या चेहऱ्यावर काय भाव होते, मरण्यापूर्वी त्याची मानसिक स्थिती काय होती याचा याचा शास्त्रीय दृष्टीकोनातून रिपोर्ट मागवावा.
३) त्याच्या घरातील नेसनीची वस्त्रे,अंथरून-पांघरून,भांडी-कुंडी यांची यादी बनवावी. त्यावरून मय्यत व्यक्ती काटकसरी कि उधळखोर याचा अंदाज काढावा.
४) व्यसनाधीनतेमुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे.तसे असेल तर तो कोणती दारू पीत होता? गावठी, देशी कि इंग्लिश याचा शोध घ्यावा. गावठी,देशी आणि इंग्लिश मद्याचे अनुक्रमे बाजारभाव माहित करून घ्यावे.(मान्यवरांना गावठी, देशीचे भाव माहित नसणार) दरडोई येणारा खर्च याचा तुलनात्मक तक्ता/गोषवारा बनवावा. बिगरशेतकरी मद्यप्यांमध्ये आत्महत्त्यांचे प्रमाण आणि शेतकरी मद्यप्यांमध्ये आत्महत्त्यांचे प्रमाण याची आकडेवारी गोळा करून तुलना करावी.
५) अज्ञानतेमुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे.तसे असेल तर बिगरशेतकरी पण अज्ञानी अशा अन्य समुदायातील लोक आत्महत्त्या का करीत नाहीत? किंवा बारामतीचे लोक फारच सज्ञानी आहेत काय?
६) वेडसरपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे. वेडसर लोक आत्महत्त्या करतात? कुठले? अमेरिकेतील? ब्रिटनमधील? फ्रांसमधील कि पाकिस्तानातील?
७) मनोरुग्णपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे. त्यासाठी गावागावात मानसोपचार शिबिरे आयोजित करावी असे त्यांना वाटते. पण ग्यानबाला हे पटत नाही.एका दाण्यातून शंभर दाण्याच्या निर्मितीचा चमत्कार घडवणारा व स्वत: अर्धपोटी राहून जगाला पोटभर खाऊ घालणारा शेतकरी मनोरुग्ण कसा काय असू शकतो? कदाचित वैफल्यग्रस्त असू शकतो. मग तो वैफल्यग्रस्त, नाउमेद का झाला याची कारणे शोधावी. ती कारणे सामाजिक कि आर्थिक याचाही शोध घ्यावा? शेतात गाळलेला घाम, दामात का परावर्तीत झाला नाही याचाही शोध घ्यावा. याउलट प्याकेजची रक्कम गिळंकृत करणारे राजकीय पुढारी आणि आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मिळणाऱ्या शासकीय मदतीचा चेक काढण्यासाठी लाच खाणारी नोकरशाही मानसिक विकृतीने ग्रासली असून त्यांच्या भावनिक संवेदना बधीर झाल्या आहेत.तेच खऱ्या अर्थाने मनोरुग्ण असून त्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये, मानसोपचार शिबिरे आयोजित करावी असे ग्यानबाला वाटते. शेतकऱ्याला आत्महत्त्या करायला भाग पाडणाऱ्या या व्यवस्थेचे शुद्धीकरण आणि मतपरिवर्तन होणे गरजेचे आहे,ज्या अर्थी शेतीविषयक धेय्य-धोरणामध्ये मुलभूत बदल होतांना दिसत नाही त्या अर्थी शेतीविषयक धेय्य-धोरणे आखणाऱ्याकडून शेतकरी आत्महत्या बद्दल व्यक्त होणारी चिंता हा वरपांगी देखावा आहे,ज्या अर्थी शेतीला न्याय देणारी कृषी विषयक धोरणे आखण्यासाठी लागणारी कणखरता त्यांच्यामध्ये नाही त्याअर्थी तेही मानसिक दुर्बल असावे असा ग्यानबाचा कयास आहे,त्यासाठी मंत्रालयामध्ये मानसोपचार शिबिरे आयोजित करावी असेही ग्यानबाला वाटते. जे ग्यानबाला उमजते ते या तज्ज्ञांना का उमजू नये? उमजत असेलही कदाचित परंतु शेतकऱ्याला आत्महत्त्या करायला भाग पाडणाऱ्या या व्यवस्थेवर उदरनिर्वाह करणारी मंडळी सिंहासनाच्या इच्छे विरुद्ध काही निष्कर्ष काढतील ही अशक्य कोटीतील बाब आहे,असेही ग्यानबाचे स्पष्ट मत आहे.
८) प्याकेजमुळे आत्महत्त्या थांबत नाही,असा काहींचा निष्कर्ष आहे. परंतु ते प्याकेजच्या स्वरूपावर अवलंबून आहे. क्यांसरच्या रोग्याला प्यारासीटामोलचे प्याकेज द्यायचे,रोगी बरा झाला नाही अथवा दगावला कि रोगी अज्ञानी होता,त्याने औषधे घेण्यात कुचराई केली, असा काहीसा बावळट निष्कर्ष काढण्याचा हा प्रकार आहे. त्या ऐवजी प्याकेजच्या मूळ स्वरूपातच गफलत झाली, रोगाचे निदान करण्यात,औषधांची निवड करण्यात चूक झाली हे कबूल करण्यासाठी लागणारी मानसिक औदार्यता आमच्यामध्येकेव्हा येणार हाच खरा लाख मोलाचा प्रश्न आहे.
मान्यवर तज्ज्ञांनी या प्रश्नांची उत्तरे शोधायलाच हवी. विषयाच्या खोलवर जायला हवे. अभ्यासांती निष्कर्ष काढून सप्रमाण सिद्ध करायला हवे,पण हे होतांना दिसत नाही. पुर्वाग्रह बाजूला सारून त्रयस्थपणे मुद्द्याची उकल केल्याखेरीज निर्दोष निष्कर्ष निघू शकत नाही. परंतु बाटली आणि पंचतारांकित संस्कृती वृद्धिंगत झालेल्या स्वनामधन्य तज्ज्ञांना याची गरज भासत नाही. एरवी शेतकरी आत्महत्या सारख्या संवेदनशील मुद्द्यावर तज्ज्ञांनी येरेगबाळे मतप्रदर्शन करण्यापेक्षा चूप बसने शेतकऱ्यासाठी समाधानाचे ठरेल. आणि कदाचित शेतकरी आत्त्महत्यासारख्या संवेदनशील मुद्द्याची उकल होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांच्या प्रारंभाचे तेच पहिले पाऊल ठरेल.

. . . गंगाधर मुटे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गंगाधर, मला वाटते की तुम्ही मूळ प्रश्नाविषयी बोलण्याऐवजी भावनिक आवाहन जास्त करीत आहात. माझा प्रश्न प्रामाणिक आहे की कुत्सित हे तुम्ही उत्तर द्यायच्या सोयीनुसार ठरवणार असाल तर अवघड आहे! पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी जास्त सुखी आहे असा माझा अजिबात दावा नाही,मात्र तुम्ही वर उल्लेख केलेल्या सर्व संकटांचा सामना तो वैदर्भिय शेतकर्‍यापेक्षा वेगळ्या पद्धतीने करतो त्यामुळे 'आत्महत्या' हा पर्याय त्याच्यासमोर सहसा येत नाही एवढेतरी मान्य व्हायला हरकत नसावी.
या देशातल्या शेतकर्‍यांचे आधीच खुप तुकडे करुन झालेत>>> ते गरजेचेच आहे कारण त्याशिवाय खरी कारणमिमांसा करणे अवघड होते. मी जरी वरती पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी असे म्हणत असलो तरी माझ्या सोलापूर जिल्ह्यातील कोरडवाहू जमीन कसणारा अल्पभूधारक आणि कोल्हापूर- सांगली पट्ट्यातील अमका-तमका डावा-उजवा कालव्याच्या जोरावर ग्रीनहाउस असणारा तालेवार यांना एकाच तराजूत तोलणे घोडचूक ठरेल.
युपी-बिहारचे लोंढे मुंबई ऐवजी पश्चिम महाराष्ट्राकडे नसते का धावले?>>>>>
ते तिकडेच धावत आहेत! गेल्या ५ वर्षात सांगली,कोल्हापूर आणि सोलापूर या तीन शहरात प्रचंड प्रमाणात उत्तरभारतीयांचे स्थलांतर झाले आहे.

माफ करा, मी कुणाला प्रामाणिक की कुत्सित म्हटलेले नाही,फक्त प्रश्नकर्त्यांच्या दोन तर्‍हा सांगीतल्या.
ज्याचा निर्णय त्याने घ्यायचा आहे.
तसेच ही चर्चा व्यक्तीगत पातळीवरही येवु नये. वाद-विवाद करण्यापेक्षा विचारांची देवान-घेवान करण्याचा प्रयत्न करुया.
मी माझे मत मांडतो,ते खरेच आहे असा दावा नाही. कारण मी या विषयाचा विद्यार्थी आहे, तज्ज्ञ नाही.
गंगाधर मुटे

<< पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी जास्त सुखी आहे असा माझा अजिबात दावा नाही,मात्र तुम्ही वर उल्लेख केलेल्या सर्व संकटांचा सामना तो वैदर्भिय शेतकर्‍यापेक्षा वेगळ्या पद्धतीने करतो त्यामुळे 'आत्महत्या' हा पर्याय त्याच्यासमोर सहसा येत नाही एवढेतरी मान्य व्हायला हरकत नसावी.>>
<< या देशातल्या शेतकर्‍यांचे आधीच खुप तुकडे करुन झालेत>>> ते गरजेचेच आहे कारण त्याशिवाय खरी कारणमिमांसा करणे अवघड होते. मी जरी वरती पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी असे म्हणत असलो तरी माझ्या सोलापूर जिल्ह्यातील कोरडवाहू जमीन कसणारा अल्पभूधारक आणि कोल्हापूर- सांगली पट्ट्यातील अमका-तमका डावा-उजवा कालव्याच्या जोरावर ग्रीनहाउस असणारा तालेवार यांना एकाच तराजूत तोलणे घोडचूक ठरेल >
>
हे तुमचे मत आहे आणि ते व्यक्त करण्याचा तुमचा अधिकार आहे, हे मी मान्य करतो.

सोलापूर जिल्ह्यात कापसाखालील क्षेत्र १५ हजार हेक्टरच्याही खाली आहे, पण जिल्ह्यात सहकारी सूतगिरण्या व कापड गिरण्याचे प्रमाण व सोलापूरी चादरी-टॉवेलची निर्यात भरारी ह्या गोष्टी उगाळण्याची गरज नाही. भारतातला सर्वात जास्त कापूस उत्पादक जिल्हा म्हणून (कापसाखालील क्षेत्र ३ लाख हेक्टरच्या आसपास) ओळखला जाणार्‍या अकोला जिल्ह्यात किती सूत व कापड गिरण्या आहेत?
[सर्व आकडेवारी दोन्ही जिल्ह्यांच्या स्टेट गॅझेटमधे मिळाली]

<<सोलापूर जिल्ह्यात कापसाखालील क्षेत्र १५ हजार हेक्टरच्याही खाली आहे, पण जिल्ह्यात सहकारी सूतगिरण्या व कापड गिरण्याचे प्रमाण व सोलापूरी चादरी-टॉवेलची निर्यात भरारी ह्या गोष्टी उगाळण्याची गरज नाही. भारतातला सर्वात जास्त कापूस उत्पादक जिल्हा म्हणून (कापसाखालील क्षेत्र ३ लाख हेक्टरच्या आसपास) ओळखला जाणार्‍या अकोला जिल्ह्यात किती सूत व कापड गिरण्या आहेत? >>
सहकारी सूतगिरण्या व कापड गिरण्या काढण्याचे काम पुढार्‍यांचे आहे,शेतकर्‍याचे नाही.
मग विदर्भातील पुढार्‍यांना दोष द्याना,मी पण तुम्हाला मदत करतो.

अकोल्यातल्या कापड गिरण्या आणि तेलगिरण्या या बंद पडल्या त्याला कामगार व त्यांच्या संघटनांचं राजकारण कारणीभूत आहे.

<< पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी जास्त सुखी आहे असा माझा अजिबात दावा नाही,मात्र तुम्ही वर उल्लेख केलेल्या सर्व संकटांचा सामना तो वैदर्भिय शेतकर्‍यापेक्षा वेगळ्या पद्धतीने करतो त्यामुळे 'आत्महत्या' हा पर्याय त्याच्यासमोर सहसा येत नाही एवढेतरी मान्य व्हायला हरकत नसावी.>>>

विदर्भात अंदाजे २-३ कोटी शेतकरी असतील.त्यापैकी २-३ हजार शेतकरी आत्महत्या करतात.याचा अर्थ उरलेले सर्व वैदर्भिय शेतकरी सुद्धा सर्व संकटांचा सामना वेगळ्या पद्धतीने करतातच.
त्यासाठी एकदम "वैदर्भिय शेतकरी विरुद्ध पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी" असे द्वंद रंगविण्याचे मला काहीच कारण दिसत नाही.
(नक्की आकडेवारी मिळाल्यास दुरुस्ती करता येइल.)

.

एक प्रश्न,

तुम्ही मोट्ठा कठीन प्रश्न टाकला. या प्रश्नाचे उत्तर वाटते एवढे सोपे नाही.
तुम्हाला बहुतेक शेतक-यांच्या आत्महत्याला जबाबदार कोण असे म्हणायचे आहे,कारण या लेखाची सुरुवातच तिथुन झाली. परंतु शेतकरी समस्येचे मुळ शेतक-यांच्या आत्महत्यापासुन सुरु होत नाही.तसेच याला जबाबदार एखादा व्यक्ती असु शकत नाही. एखादी उपाययोजना केल्याने हा प्रश्न निकालात निघेल असेही दिसत नाही.मग याला जबाबदार कोण? माझ्याजवळ जर नक्की उत्तर असते तर एवढा लिखाण-प्रपंच करायची गरजच नव्हती. पहिल्याच लेखात अधीकारवाणीने शेतकर्‍यांच्या मुक्तीचा मंत्र सांगुन टाकला असता.
मी चार वाक्यात सांगीतला असता आणि इतरांनी आठ वाक्यात उधळुन लावला असता. एका दिवसात निकाल,ट्वेंटी-ट्वेंटी मॅच सारखा. निकाल लागला असता सर्व आपआपल्या घरी गेले असते पण....
शेतकरी जेथला तेथेच राहीला असता...
आपण समाधानी,मात्र शेतकर्‍यांच्या समस्या कायमच्या कायमच.
पुढार्‍यांच्या भाषनाने,तज्ज्ञांच्या लेखाने आणि पंतप्रधाच्या पॅकेजने प्रश्न सुटला नाही,कारण रोगाचे निदान करण्यात चुक झाली असावी. म्हणुन आपल्याला आता कोणावर दोषारोपन करण्यापेक्षा रोगाचे निदान करण्यावर भर दिला पाहीजे, अगदी एखाद्या निष्नात डॉक्टरसारखा.
रोग कितीही असाध्य असला तरी डॉक्टर पेशंट सोडुन पळत नाही,पेशंट दगावनार हे माहीत असुनही प्रयत्नांची शर्थ करतोच.
शेतकर्‍यांच्या प्रश्नाला वाचा फोडणे,त्याच्या दु:खात सहभागी होणे,आणि जनजागृती करणे.
हे सर्व करतांना मार्गामध्ये जे जे म्हणुन अनिष्ट दिसेल त्यावर प्रहार करणे आणि जे जे चांगले दिसेल ते ते रुजवायचा प्रयत्न करणे हाच सध्यातरी माझ्यापुरता का होईना पण एकुलता एक मार्ग दिसतो.
निधपाजी, तुमच्या प्रश्नाचे या घडीला माझ्याजवळ एवढेच उत्तर आहे.

गंगाधर मुटे

मुटे,
भा.पो.
पण विदर्भावर भारीच राग की तुमचा. असो. रागाच्या भरात लोकं काहीही करतात.. कधी सगळं साफ करा म्हणतात तर कधी ठिपके (शिंतोडे) उडवत बसतात...... Happy

त्यासाठी एकदम "वैदर्भिय शेतकरी विरुद्ध पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी" असे द्वंद रंगविण्याचे मला काहीच कारण दिसत नाही.>>>
माझाही तो उद्देश नाहीच आहे,माझा मुद्दा एवढाच आहे की एकाच राज्याच्या काही भागात शेतकरी आत्महत्या करतात आणि दुसर्‍या भागात करत नाहीत अशा परिस्थितित दोन्ही भागातील सारखे आणि वेगळे घटक कोणते हे तपासून बघायला काय हरकत आहे?
सारखे घटक - कर्जबाजारीपणा, पावसाचा लहरीपणा, धरसोडीचे सरकारी धोरण
वेगळे घटक - सहकार चळवळ, शेतकरी संस्थांची वाढ,उद्योजकता आणि त्यातून शेतकर्‍याला आपल्या उत्पादनाच्या भवितव्याबद्दल येणारा आत्मविश्वास.
आता जे घटक वेगळे आहेत, त्यांचा शेतकरी आत्महत्या का करतात यावर परिणाम होतो हाच माझा मुद्दा आहे,जो मी वरती मांडला आहे.
सहकारी सूतगिरण्या व कापड गिरण्या काढण्याचे काम पुढार्‍यांचे आहे,शेतकर्‍याचे नाही.मग विदर्भातील पुढार्‍यांना दोष द्याना,मी पण तुम्हाला मदत करतो.>>>>
गिरण्या काढणारे पुढारी काही आकाशातून पडत नाहीत,ते शेतकर्‍यांमधूनच पुढे येतात,त्यातले बरेच नालायक आहेत यात शंकाच नाही पण पुन्हा मी वर उल्लेख केल्याप्रमाणे सहकारात हजारो दोष असले तरी त्यामुळे नेते आणि शेतकरी यांच्यात आधी परस्पर फायद्याचे आणि आता परस्पर उपद्रवमूल्याचे जे समीकरण निर्माण झाले आहे त्याने बराच समतोल साधला गेला आहे.

{ .१७> }
आगाऊ,
तुमच्या आणि माझ्या उद्देशामध्ये काहीही फरक नाही,या विषयावर चर्चा व्हावी हे जे माझे मत ,तुमचेही तेच मत आहे. फरक असलाच तर एवढाच की काही ठरावीक मुद्यांवर चर्चा व्हावी या बाबतीत तुम्ही आग्रही आहात.
मला वाटते की ज्या मुद्यांवरुन चर्चा भरकटु शकते,किंवा विषयांतर होवु शकते ते मुद्दे तात्पुरते बाजुला ठेवायला हवेत,यथावकाश त्यामुद्यांवर चर्चा करता येईल.
राज्याच्या सर्व विभागात सारखे घटक म्हणुन कर्जबाजारीपणा, पावसाचा लहरीपणा, धरसोडीचे सरकारी धोरण हे तिन मुद्दे अधोरेखित केलेना ते अत्यंत महत्वाचे तर आहेतच पण हे मुद्दे विभाग्,राज्य यांच्या सीमा ओलांडुन संपुर्ण देशातील शेतकर्‍यांना लागु पडतात.
म्हणुन आपण सध्या चर्चा याच विषयावर केंद्रित करुया.
सहकार चळवळ, शेतकरी संस्थांची वाढ,उद्योजकता याची चर्चा प्रक्रिया आणि विपणन यावर चर्चा करतांना करुया.

"वांगे अमर रहे !" या ललित लेखावर आलेली श्री रॉबीनहुड यांची प्रतिक्रिया महत्वाची वाटते म्हणुन येथे पेस्ट करीत आहे.
कोणीतरी माल फेकून देण्यापेक्षा निम्म्या दरात गोरगरीबाना विकण्याची सूचना केली आहे. दिसायला फारच रोमँटिक वाटते ते. पण फसवे. मला लहानपणी वाटायचे नोटा म्हणजे पैसा. मग गरिबी दूर करण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर नोटा का छापत नाही.? एकदम गरिबी हटाव. तसे वैयक्तिक ग्राहकाला जो माल विकला जातो त्याला हात विक्री असे म्हनतात आणि ते किरकोळ व्यावसायिक करतात. त्यावर त्याच्या दिवसाच्या श्रमाचे मूल्य मिळते. तसेच कुठलाही किरकोळ भाजी वेक्रेता केवळ वांगी , केवळ टोमेटो विकत नाही. सर्व भाज्या थोड्या थोड्या विकतो. १०० तले १० च ग्राहक वांगी साधारण पने नेतात असे मानले तरी फार स्वस्त मिळताहेत म्हणून कुणी नुसती वांगी खात सुटत नाही.त्यामुळे त्या ग्राहक संख्येत फार तर दिडेक पटीने फरक पडेल. (शेपूची भाजी अगदी एक पैशाला किलो दिली तरी ती मी घेनार नाही. ) शिवाय शेतकर्‍याने पाच दहा पोती वांगी हातविक्रीवर विकणे शक्य नाही. शिवाय त्याला विक्रयकला अवगत असणे प्रत्येक वेळी शक्य नाही .तेही वेगळे स्किल आहे. त्याला मनुष्यबळही लागते. त्याने शेती करावी की तराजू काटा घेऊन बसावे? वितरण व्यवस्थेचे समाजात आणि अर्थव्यवस्थेत वेगळे स्थान आहे. अन्यथा कारखानदारानी डिलर्सना कमिशन देण्याऐवजी कारखान्याच्या बाहेरच दुकाने लावून निम्म्या किमतीत साबण, प्रसाधने , टीव्ही दिले असते. नाशवन्त मालाच्या बाबतीत ज्यात मिनिटामिनिताला मालाची किंमत कमी होत जाते त्यात तर ही सूचना एकदम अशक्य आहे.....
रॉबीनहूड

<< वितरण व्यवस्थेचे समाजात आणि अर्थव्यवस्थेत वेगळे स्थान आहे. >>
रॉबीनहूड,
कोणीतरी माल फेकून देण्यापेक्षा निम्म्या दरात गोरगरीबाना विकण्याची सूचना केली आहे. यात त्यांचा भावनिक आणि प्रामाणिक हेतु आहे. शेतकर्‍यांच्या व्यथांची जाणिव झाल्यावर सहज आणि स्वाभाविक व्यक्त झालेली भावना आहे.शेतकर्‍याविषयीची तळमळ आणी आपुलकी आहे.
पण गंभीर बाब अशी की तुम्हाला जे कळते ते अजुनपर्यंत या देशातील हायलेव्हल पुढारी ,शेतीतज्ज्ञ आणि नामांकित अर्थतज्ज्ञांनाही कळलेले नाही.ही अर्थशास्त्रातील मुलभुत बाब असताना, अजुनपर्यंत या देशातील हायलेव्हल पुढारी ,शेतीतज्ज्ञ आणि नामांकित अर्थतज्ज्ञांनाही कळलेले नाही असे जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्याचे तुम्हाला नवल वाटेल किंवा मी उपहासाने अथवा अतिरेकाने बोलतो असे वाटेल.पण तसे नाही. हे सत्य आहे.
शेतीविषयावरची यांची सल्ले तपासा म्हणजे मी यांच्या सल्ल्यांना मुक्ताफळे का म्हनतो हे लक्षात.येइल.
शेती कसतो तो शेतकरी,शेतकरी म्हनजे उत्पादक.शेतीमालाची विक्री करणे म्हणजे विक्रेता/वितरक.
शेतीमध्ये एकच व्यक्ती एकाच वेळी उत्पादन आणि विपणन हे दोन्ही विभाग नाही सांभाळू शकत.जे असे करायला गेले ते त्यांची गत "ना घरका ना घाटका" अशी झाली. कारण हे दोन्हीही स्वतंत्र आणि पुर्णवेळ विभाग आहेत, आणि नेमके हेच कोणी समजुन घ्यायला तयार नाही.
जो उत्पादन सोडून वितरनाकडे गेला तो वितरक/विक्रेता झाला,तो शेती कसत नाही,म्हनजे शेतकरीच नाही.
शेती कसत नाही पण नांवाने शेतीचा ७/१२ असेल तर शेतीमालक म्हणता येईल.
जेव्हा आपण शेतकर्‍यांच्या समस्या म्हणतो तेव्हा त्या उत्पादकाच्या भुमिकेत असलेल्या शेतकर्‍यांच्या समस्या असतात. हे ज्या दिवशी राज्यकर्त्यांना/प्रशासनाला कळेल त्या दिवसापासून शेतीच्या समस्या सुटायचा प्रारंभ होईल. ...
.
गंगाधर मुटे.

<< हरितक्रांती करायची असेल तर त्यात सरकारचा वाटा जास्त असणार. इस्त्रायल चे उदाहरण आहे... भाग्यश्री >>
भाग्यश्रीशी सहमत.
सगळीच जबाबदारी सरकारवर ढकलून आपण वाट बघत बसल्यानंतर काहीच घडणं शक्य नाही,असे अनेकांना वाटते .पण ते शक्य नाही.हरितक्रांती सारखे विषय शेतकरी किंवा देशातील सामान्य जनता नाही हाताळू शकणार. ही कामे सरकारचीच आहेत आणि सरकार जर काहीच करणार नसेल तर मग सरकारची गरजच काय..?

याच लेखावर कानोकानी मध्ये skyprince75 यांनी प्रतिसाद मध्ये कविता लिहिली आहे.ती तेथे देत आहे.
भुमीपुत्रच भूमीहीन झालाय...
skyprince75

भुमीपुत्रच भूमीहीन झालाय...

भुमीपुत्रच भूमीहीन झालाय,
दाही दिशांना वणवण फिरतोय.
लोकांचे पोट भरणाराच आज मात्र
उपासमारीने मरतोय.

शेतक-याचा पोर उपाशी
शेतक-याच्या देशामध्ये.
कुपोषणाच्या वेषात
बालमृत्यू थैमान घालतोय.
लोकांचे पोट भरणाराच आज मात्र
उपासमारीने मरतोय.

बँकांकडून कर्ज घेतले
दुष्काळाने लादली नादारी.
घाव हा दुहेरी प्रवृत्त
आत्महत्येला करतोय.
लोकांचे पोट भरणाराच आज मात्र
उपासमारीने मरतोय.

सरकारी अनुदाने होत आहेत
मंत्र्यांच्या तिजोरीत बंद.
कर्जवसुलीसाठी शेतक-यांच्या
घरादारावर नांगर फिरतोय.
लोकांचे पोट भरणाराच आज मात्र
उपासमारीने मरतोय.

श्रीमंतांच्या, हिरोन्च्या भल्यासाठी
नवस सायास केले जातात.
गरीब शेतक-याला आपण
पद्धतशीर विसरतोय.
लोकांचे पोट भरणाराच आज मात्र
उपासमारीने मरतोय.

skyprince75

शेतीत नुकसान होण्याची कारणे

१. शेतीमलाचा भाव उत्पादक ठरवत नाही
२. कष्टाच्या तुलनेत अत्यल्प मोबदला (पैसा)
३. खते, औषधे, बी-बियाणे यांचे गगनाला भिडलेले दर.
४. सरकारचे ९५% दुर्लक्ष. उदाहरण द्यायचे झाले तर मला RCF चे खत मिळत नाही कारण कोणी विक्रेता RCF चे खत ठेवत नाही कारण त्यामधे पोत्यामागे ६ रु. एवढा नफा असतो.
५. शेती मग ती कोणतीही असो, निसर्ग आणि हवामानावर अवलंबुन असते.
६. शेतकर्‍याची फसवणुक. येथे मला साखर कारखान्याचे उदाहरण देऊ वाटते. ऊसाचे सरासरी उत्पादन ४० टन प्रती एकर येवढे खाली आले आहे. कारखाना वजनात शेतकर्‍याला फसवतो

७. राजकीय पुढार्‍यानी सहकाराचा लावलेला वेगळा अर्थ.
८. शेतकर्‍यांची मोठी संख्या, त्यामुळे संगठन नाही, आणि झालेच तर त्यात पण राजकारण.
९. अपुरा पैसा. (मला ७/१२ वर बँका कर्ज देत नाहीत ना विमा कंपनी विमा देते.)
१०. शेतीसाठी अपुरा आणि अशिक्षित कामगार वर्ग.
११. बजार पेठेची उपलब्धता जवळ नसणे.
१२. समाजात असलेली शेतकर्‍याची ओळख (कमी शिकलेला, अशिक्षित, गरीब ... आणखी अनेक..)
१३. शेतकर्‍याला असलेला राजकारणाचा छंद.
१४. पाण्याची कमतरता (सरकारने पॅकेज देण्याएवजी पुरेशे पाणी द्यायचा प्रयत्न करवा. अपुर्‍या राहिलेल्या योजना पुर्ण कराव्या)

१. शेतीमलाचा भाव उत्पादक ठरवत नाही

- शेती बर्‍याच प्रमाणात सरकारवर अवलम्बून आहे. शेतीला कर्जमाफी, अनुदान, अत्यल्प दरात वीज, नुकसानभरपाई इ. सरकारकडूनच मिळते. शेती हा व्यवसाय सरकारच्या मदतीशिवाय independently चालू शकत नाही. त्यामुळे शेतमालाचा भाव शेतकरी न ठरवता सरकारने ठरवणे हे स्वाभाविक आहे.

भारतात सरकारकडून अनुदान घेणार्‍या शाळान्ना सरकारने विद्यार्थ्यांसाठी ठरविलेली फी मान्य करावी लागते. अशा शाळेतील शिक्षक सरकारी कर्मचारी असतात व सरकारी नियमांप्रमाणे त्यांची नेमणूक होते व पगार मिळतो. पण सरकारकडून अनुदान न घेणार्‍या शाळा स्वतःच फी ठरवितात तसेच तिथे मोठी डोनेशन सुद्धा द्यावी लागते.

तसेच जोपर्यंत शेती हा व्यवसाय सरकारच्या मदतीशिवाय independently चालू शकत नाही (म्हणजे कर्जमाफी, अनुदान, अत्यल्प दरात वीज, नुकसानभरपाई इ. सरकारकडून न घेता) तोपर्यंत सरकार शेतीमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार उत्पादकाला देणार नाही. सरकार जिथे जिथे स्वत: मदत करते तिथे ते हस्तक्षेप करणारच. आम्हाला सरकारकडून सर्व प्रकारची मदत पाहिजे (अल्प दराने कर्ज आणि वीज, कर्जमाफी, अनुदान, नुकसानभरपाई, आयकर माफी इ.), पण आमच्या मालाचा भाव आम्ही ठरविणार असे होऊ शकत नाही.

२. कष्टाच्या तुलनेत अत्यल्प मोबदला (पैसा)

- इतर अनेक व्यवसायात अशीच परिस्थिती आहे.

३. खते, औषधे, बी-बियाणे यांचे गगनाला भिडलेले दर.

- फक्त शेतीतीलच नव्हे तर इतर अनेक वस्तूंचे, सेवांचे व खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडलेले आहेत.

४. सरकारचे ९५% दुर्लक्ष. उदाहरण द्यायचे झाले तर मला RCF चे खत मिळत नाही कारण कोणी विक्रेता RCF चे खत ठेवत नाही कारण त्यामधे पोत्यामागे ६ रु. एवढा नफा असतो.

- कोणताही विक्रेता ज्यात जास्तीत जास्त नफा मिळेल अशाच वस्तू विकणार. त्यात काहिही चूक नाही.

५. शेती मग ती कोणतीही असो, निसर्ग आणि हवामानावर अवलंबुन असते.

- प्रत्येक व्यवसायात अनेक dependencies असतात. राजकीय परिस्थिती, economy, supply, demand, market trend अशा अनेक dependencies कायम fluctuate होत असतात. पुर्वी गल्लोगल्ली सायकल दुरुस्तीची दुकाने दिसायची. आता तशी दुकाने अभावानेच दिसतात कारण २-wheeler ची वाढलेली संख्या. रस्त्याच्या कडेला खोके टाकून punccture काढणार्‍या व पन्पाने हवा भरून देणार्‍या कामगारान्चे आता काय झाले असेल? तात्पर्य काय, निव्वळ शेतीच नव्हे तर इतरही अनेक उद्योग संकटात आहेत. शेतकर्‍यान्ना निदान सरकारची मदत तरी मिळते, इतरान्ना कोणीही विचारत नाही.

६. शेतकर्‍याची फसवणुक. येथे मला साखर कारखान्याचे उदाहरण देऊ वाटते. ऊसाचे सरासरी उत्पादन ४० टन प्रती एकर येवढे खाली आले आहे. कारखाना वजनात शेतकर्‍याला फसवतो

- फसवणूक सर्व क्षेत्रात आहे. व्यापारी वजनात मारतात, फोन कंपन्या फसवतात, बिल्डर जमात तर फसवणुकीबद्दल कुप्रसिद्ध आहे, MSEB बहुतेक जगातील सर्वाधिक लबाड कंपनी असावी.

७. राजकीय पुढार्‍यानी सहकाराचा लावलेला वेगळा अर्थ.

- राजकीय पुढार्‍यानी फक्त सहकाराचेच नाही तर संपूर्ण देशाचे वाटोळे केले आहे.

८. शेतकर्‍यांची मोठी संख्या, त्यामुळे संगठन नाही, आणि झालेच तर त्यात पण राजकारण.

- शेतकरी मोठ्या प्रमाणात सरकारवर अवलंबून आहेत. त्यामुळे ते संघटित झाले तरी सरकार लक्ष देणार नाही.

९. अपुरा पैसा. (मला ७/१२ वर बँका कर्ज देत नाहीत ना विमा कंपनी विमा देते.)

- बँका पुरेशी security आणि परतफेडीची खात्रि असल्याशिवाय कोणालाही कर्ज देत नाहीत.

१०. शेतीसाठी अपुरा आणि अशिक्षित कामगार वर्ग.

- जर शेतीत इतर कामापेक्षा जास्त पैसा मिळेल तर कामगार वर्ग शेतीकडे वळेल

११. बजार पेठेची उपलब्धता जवळ नसणे.

- शेतमालाला मागणी सगळीकडेच असते. तसेच बाजारपेठ लाम्ब असेल तर उत्पादकानेच वाहतुकीची व्यवस्था करावी लागते. पुण्यातल्या बजाजच्या स्कूटर भारतभर जातातच ना.

१२. समाजात असलेली शेतकर्‍याची ओळख (कमी शिकलेला, अशिक्षित, गरीब ... आणखी अनेक..)

१३. शेतकर्‍याला असलेला राजकारणाचा छंद.

- यावर उपाय शेतकर्‍यान्नीच शोधायचा आहे.

१४. पाण्याची कमतरता (सरकारने पॅकेज देण्याएवजी पुरेशे पाणी द्यायचा प्रयत्न करवा. अपुर्‍या राहिलेल्या योजना पुर्ण कराव्या)

- "सरकारने"!!! सरकार फार काही करेल अशा भ्रमात राहू नका. शेतकर्‍यान्नीच स्वत: नवीन विहिरी खणून किंवा गावासाठी सामूहिक प्रयत्न करून पाण्याची व्यवस्था केली पाहिजे.

--------------------------------------------------
चर्चेशी संबंधित अन्य महत्वाच्या लिंक.
शेतीवर आयकर का नको?
वांगे अमर रहे !
शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?
शेतीला सबसिडी कशाला हवी?
.-------------------------------------------------

मेटे साहेब,जबरदस्त लेख आहे! शेतकऱ्यांच्या दुखाला वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद ! सरकारची सगळी धोरणे आणि उपाय,हे दोन्ही शेतकऱ्याला गुलाम बनवणारी आहेत, तो एकदा गुलाम झाला कि त्याला बाहेर पडणं मुश्कील होतं, शेतकऱ्याच्या हक्कासाठी लढणाऱ्या अनेक चळवळी,आंदोलनं पद्धतशीर रित्या मोडून काढली गेली,नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न केला गेला हा इतिहास आहे,राजू शेट्टी सारख्या शेत्काराय्साठी रक्त सांडलेल्या नेत्याला किती त्रास सहन करावा लागतोय ,ते पाहताच आपण ,त्यासाठी तुमच्या सारखे समान विचार असलेले लोक जर एकत्र आले तर बरयाच चांगल्या गोष्टी घडू शकतील.

ही घ्या आजची बातमी...
गतवर्षी गाळप न झालेल्या उसाला हेक्टर २५ हजार रूपये देणार
- मुख्यमंत्री
अतिरिक्त उसाच्या गाळपासंदर्भात व्यवस्थित नियोजन करणे, बंद असलेले कारखाने येत्या हंगामात सुरू करणे आणि परराज्यांतील ऊस आयात करण्यावर बंदी घालणे, हे निर्णय आज झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आले. गतवर्षी गाळप न झालेल्या आणि पंचनामे झालेल्या उसाला हेक्टरी २५ हजार रूपये अनुदान देण्याचा महत्त्चाचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त उसाचा आढावा घेण्यासाठी आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या वर्षी उपलब्ध ७५३ लाख मे. टन ऊसगाळप करायचे असेल तर १६३ कारखाने सुरू राहिले पाहिजेत. त्यापैकी अतिरिक्त १०० लाख मे टन ऊस संपवायचा असेल तर २० कारखाने सुरू करावे लागतील, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
परराज्यातील ऊस आयात करण्यावर बंदी घालावी, मागील हंगामात बंद असलेले कारखाने पुढील हंगामात सुरू करावेत तसेच वाढीव वाहतूक अनुदान देणे, या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. १ ऑक्टोबरपासून उसाचे गाळप सुरू करण्याचे बैठकीत ठरले.
नक्तमूल्य उणे असलेल्या या कार्यक्षेत्रात गाळपासाठी ५० टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या कारखान्यांना शासन थकहमी देण्याचे धोरण आहे. यासंदर्भातही या बैठकीत चर्चा झाली. पण, त्यावर तोडगा निघाला नाही. विक्री करावयाच्या कारखान्यांच्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्याबाबत (डिस्पोजल ऑफ अॅसेट्स) नियोजन विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे समजते.
या बैठकीत उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, नाबार्डचे अध्यक्ष उमेशचंद्र सरंगी, राज्य सहकारी बँकेचे पदाधिकारी व सहकार विभागाचे प्रधान सचिव सुधीरकुमार गोयल आदी उपस्थित होते.

काय हो हे आहे का नुकसान भरपाई चे मोल?

पंकज,
सविस्तर माहीती दिली आहे ,तु काय पत्रकार आहेस का?
Happy
हेक्टरी रु. २५००० म्हणजे एकरी साधारण रु.१०,०००, यात वीजेच,पाण्याच बील तरी फेडता येईल का ?
आमच्या कडे कारखान्याच्या पाणी पुरवठा करणार्‍या स्किमस आहेत त्याची एकरी वार्षीक फक्त पाणीपट्टी ही ८००० रु. आहे ,
त्यामुळे ज्या शेतकर्‍याचा ऊस शिल्लक राहीला असेल तो सरकारकडुन असल्या भिकार मदतीची थोडीच वाट बघत बसला असेल ?

Pages