'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे'

Submitted by अभय आर्वीकर on 27 November, 2009 - 05:37

. शेतक-यांच्या आत्महत्यांच्या समस्येवर सद्ध्या बरीच चर्चा आणि उहापोह सुरु आहे. या समस्येची उकल करतांना अनेक मान्यवरांनी शोधलेली कारणे आणि सुचविलेले उपाय बघितले तर "शेतकरी मरतोय तर मरू द्या पण त्याच्या आत्महत्येची कारण-मीमांसा करणे आणि उपाय सुचविणे बंद करा" अशा स्वरुपाची आत्मक्लेशी प्रतिक्रिया शेतकरी समाजमनात उमटल्याशिवाय राहत नाही. कारण शेतक-यांच्या आत्महत्येच्या दु:खद वेदनांपेक्षा यांच्या प्रतिक्रिया अधिक वेदनादायी असतात.
शेतकरी आळशी किंवा कामचुकार आहे असे वाटते त्या सर्व मान्यवर तज्ज्ञांनी आयुष्यात एकदातरी सलगपणे काही दिवस शेतकरी समाजासोबत (पाटलाच्या वाड्यात किवा राजकीय पुढा-याच्या बंगल्यात नव्हे ) घालवायला हवे. त्याखेरीज शेतकरी कशाला म्हणतात,तो कसे जीवन जगतो आणि किती कष्ट करतो याचा अनुभव येणे अशक्य आहे. ४-५ तास किंवा अर्धा-एक दिवस शेतक-याच्या झोपडीत घालवल्याने जर कुणाला शेतकरी समजला असे वाटत असेल तर खुशाल वाटू दे,पण हा देश आपण कोण्या कामचुकार,आळशी,अलायक तज्ज्ञांचा हातात सोपवला असा प्रश्न जर कोण्या ग्यानबाला पडला,तर त्याच्याशी वाद घालता येईल,मुजोरीही करता येईल पण त्या ग्यानबाच्या प्रश्नाचे समर्पक निराकरण करता येईल.?
झोप,जेवण आणि अन्य शारीरिक विधींसाठी लागणारा काळ सोडला तर उर्वरित वेळात शेतकरी काय करतो? स्विमिंग करायला जातो? क्रिकेट / सिनेमा बघायला जातो? बायकोला घेऊन बागेत फिरायला जातो? बीअरबारवर जातो? बारबालांचे नृत्य बघायला जातो कि इतवारी / बुधवारपेठेत फेरफटका मारायला जातो? मान्यवर तज्ज्ञांनी पहिल्यांदा या प्रश्नांचे उत्तर शोधायला हवे.( आणि जरी का या प्रश्नांचे उत्तर होकारार्थी असेल तरीही बिघडते कुठे? सर्व उपभोगाचा भोग भोगणारी आमच्या सारखी भोगवादी मंडळी कुठे आत्महत्त्या करताहेत? आम्ही जिवंतच आहोत कि अजून.)
औताच्या बैलाला वर्षातून फक्त १२० ते १४० दिवस तर शेतक-याला मात्र ३६५ दिवस काम करावे लागते,बाप मेला सुट्टी नाही,बापाला तिरडीवर तसाच ठेवून बैलाचे शेनगोटा, चारापाणी करायला जावेच लागते.पोरगा तापाने फणफणत असेल किंवा अगदी Gastro जरी झाला तरीही पेरणी थांबवता येत नाही हे वाजवी सत्य तज्ज्ञ मंडळींना कधी कळेल?
तरीही या तज्ज्ञ मंडळींना शेतकरी आळशी आणि कामचुकार दिसत असेल तर त्यांनी खालील प्रमाणे शास्त्रशुद्ध मार्गाचा अवलंब करून स्वत:ची खातरजमा करून घ्यावी.
आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याच्या घरी जावून ;
१) प्रेताचे वजन करावे व शारीरिक उंची मोजावी. वजन व उंची यांचा रेशो काढावा. तो डॉक्टरला दाखवावा.मय्यत व्यक्ती सुदृढ कि कुपोषित,कष्टकरी कि कामचुकार या विषयी सल्ला घ्यावा.
२) मुखवट्याचा एक क्लोजअप फोटो घ्यावा.त्यावरून मरण्यापूर्वी त्याच्या चेहऱ्यावर काय भाव होते, मरण्यापूर्वी त्याची मानसिक स्थिती काय होती याचा याचा शास्त्रीय दृष्टीकोनातून रिपोर्ट मागवावा.
३) त्याच्या घरातील नेसनीची वस्त्रे,अंथरून-पांघरून,भांडी-कुंडी यांची यादी बनवावी. त्यावरून मय्यत व्यक्ती काटकसरी कि उधळखोर याचा अंदाज काढावा.
४) व्यसनाधीनतेमुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे.तसे असेल तर तो कोणती दारू पीत होता? गावठी, देशी कि इंग्लिश याचा शोध घ्यावा. गावठी,देशी आणि इंग्लिश मद्याचे अनुक्रमे बाजारभाव माहित करून घ्यावे.(मान्यवरांना गावठी, देशीचे भाव माहित नसणार) दरडोई येणारा खर्च याचा तुलनात्मक तक्ता/गोषवारा बनवावा. बिगरशेतकरी मद्यप्यांमध्ये आत्महत्त्यांचे प्रमाण आणि शेतकरी मद्यप्यांमध्ये आत्महत्त्यांचे प्रमाण याची आकडेवारी गोळा करून तुलना करावी.
५) अज्ञानतेमुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे.तसे असेल तर बिगरशेतकरी पण अज्ञानी अशा अन्य समुदायातील लोक आत्महत्त्या का करीत नाहीत? किंवा बारामतीचे लोक फारच सज्ञानी आहेत काय?
६) वेडसरपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे. वेडसर लोक आत्महत्त्या करतात? कुठले? अमेरिकेतील? ब्रिटनमधील? फ्रांसमधील कि पाकिस्तानातील?
७) मनोरुग्णपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे. त्यासाठी गावागावात मानसोपचार शिबिरे आयोजित करावी असे त्यांना वाटते. पण ग्यानबाला हे पटत नाही.एका दाण्यातून शंभर दाण्याच्या निर्मितीचा चमत्कार घडवणारा व स्वत: अर्धपोटी राहून जगाला पोटभर खाऊ घालणारा शेतकरी मनोरुग्ण कसा काय असू शकतो? कदाचित वैफल्यग्रस्त असू शकतो. मग तो वैफल्यग्रस्त, नाउमेद का झाला याची कारणे शोधावी. ती कारणे सामाजिक कि आर्थिक याचाही शोध घ्यावा? शेतात गाळलेला घाम, दामात का परावर्तीत झाला नाही याचाही शोध घ्यावा. याउलट प्याकेजची रक्कम गिळंकृत करणारे राजकीय पुढारी आणि आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मिळणाऱ्या शासकीय मदतीचा चेक काढण्यासाठी लाच खाणारी नोकरशाही मानसिक विकृतीने ग्रासली असून त्यांच्या भावनिक संवेदना बधीर झाल्या आहेत.तेच खऱ्या अर्थाने मनोरुग्ण असून त्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये, मानसोपचार शिबिरे आयोजित करावी असे ग्यानबाला वाटते. शेतकऱ्याला आत्महत्त्या करायला भाग पाडणाऱ्या या व्यवस्थेचे शुद्धीकरण आणि मतपरिवर्तन होणे गरजेचे आहे,ज्या अर्थी शेतीविषयक धेय्य-धोरणामध्ये मुलभूत बदल होतांना दिसत नाही त्या अर्थी शेतीविषयक धेय्य-धोरणे आखणाऱ्याकडून शेतकरी आत्महत्या बद्दल व्यक्त होणारी चिंता हा वरपांगी देखावा आहे,ज्या अर्थी शेतीला न्याय देणारी कृषी विषयक धोरणे आखण्यासाठी लागणारी कणखरता त्यांच्यामध्ये नाही त्याअर्थी तेही मानसिक दुर्बल असावे असा ग्यानबाचा कयास आहे,त्यासाठी मंत्रालयामध्ये मानसोपचार शिबिरे आयोजित करावी असेही ग्यानबाला वाटते. जे ग्यानबाला उमजते ते या तज्ज्ञांना का उमजू नये? उमजत असेलही कदाचित परंतु शेतकऱ्याला आत्महत्त्या करायला भाग पाडणाऱ्या या व्यवस्थेवर उदरनिर्वाह करणारी मंडळी सिंहासनाच्या इच्छे विरुद्ध काही निष्कर्ष काढतील ही अशक्य कोटीतील बाब आहे,असेही ग्यानबाचे स्पष्ट मत आहे.
८) प्याकेजमुळे आत्महत्त्या थांबत नाही,असा काहींचा निष्कर्ष आहे. परंतु ते प्याकेजच्या स्वरूपावर अवलंबून आहे. क्यांसरच्या रोग्याला प्यारासीटामोलचे प्याकेज द्यायचे,रोगी बरा झाला नाही अथवा दगावला कि रोगी अज्ञानी होता,त्याने औषधे घेण्यात कुचराई केली, असा काहीसा बावळट निष्कर्ष काढण्याचा हा प्रकार आहे. त्या ऐवजी प्याकेजच्या मूळ स्वरूपातच गफलत झाली, रोगाचे निदान करण्यात,औषधांची निवड करण्यात चूक झाली हे कबूल करण्यासाठी लागणारी मानसिक औदार्यता आमच्यामध्येकेव्हा येणार हाच खरा लाख मोलाचा प्रश्न आहे.
मान्यवर तज्ज्ञांनी या प्रश्नांची उत्तरे शोधायलाच हवी. विषयाच्या खोलवर जायला हवे. अभ्यासांती निष्कर्ष काढून सप्रमाण सिद्ध करायला हवे,पण हे होतांना दिसत नाही. पुर्वाग्रह बाजूला सारून त्रयस्थपणे मुद्द्याची उकल केल्याखेरीज निर्दोष निष्कर्ष निघू शकत नाही. परंतु बाटली आणि पंचतारांकित संस्कृती वृद्धिंगत झालेल्या स्वनामधन्य तज्ज्ञांना याची गरज भासत नाही. एरवी शेतकरी आत्महत्या सारख्या संवेदनशील मुद्द्यावर तज्ज्ञांनी येरेगबाळे मतप्रदर्शन करण्यापेक्षा चूप बसने शेतकऱ्यासाठी समाधानाचे ठरेल. आणि कदाचित शेतकरी आत्त्महत्यासारख्या संवेदनशील मुद्द्याची उकल होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांच्या प्रारंभाचे तेच पहिले पाऊल ठरेल.

. . . गंगाधर मुटे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गंगाधरजी , आगदी मनातले बोललात , शेतकर्याची आत्मह्तेची कारणे शोधायला जे शाशकीय आधीकारी असतात त्यांना शेतीतील झॅ .......? कळत नाही . आणी सगळ्यात मोटी हाइट म्हणजे राजकीय पुढारयांचा शेतकरयांच्या भेटीचा कार्यक्रम पण कुटे ,शेतात ? शेतकरयाच्या घरी ? नाही नाही तर ?????????? तो आसतो पाटील , सरपंच , वा गावतील एखादी बडी आसामी ( श्रीमंत ) यांच्या घरी . तो बीचार शेतकरी या लोकांसमोर काहीच सान्गु शकत नाही .पाटील , सरपंच , तलाटी ,ही लोक सांगतील तीच कारणे सांगावी लागतात . नाही तर गावाक्डच्या मान्साना माहीत्य काय होत्य ते ?

खुप छान मागोवा घेतला आहे, खोलवर विचार करायला लावतो. लेखाला जास्त प्रसिद्धी मिळायला हवी असे मला मनापासुन वाटते आहे. माबो वर अशाच आशयाचे अजुन दोन लेख प्रसिद्ध झाले आहेत. तिघांचे विचार एकत्रीत करुन या गंभीर प्रश्नाला लोकांसमोर आणाता येईल कां? मधातले दलाल जरी कमी झाले तरी त्यांच्या पात्रात थोडे जास्त धन पडेल.

मला किंवा घरात कोणाला सर्दी ताप आला तरी आमची पगारी रजा असते, वयाच्या ६० नंतर आम्हाला काहीच कष्ट न घेता सेवानिवृत्तीचे वेतन आरामात मिळते... वरचे वाचुन थोडे ओशाळल्या सारखे होते. बिचार्‍या शेतकर्‍यांना उतार वयात काय आधार असतो?

{ .२. }
१)तो बीचार शेतकरी या लोकांसमोर काहीच सान्गु शकत नाही .पाटील , सरपंच , तलाटी ,ही लोक सांगतील तीच कारणे सांगावी लागतात.
२)मला किंवा घरात कोणाला सर्दी ताप आला तरी आमची पगारी रजा असते... वरचे वाचुन थोडे ओशाळल्या सारखे होते.
एस.लक्ष्मणजी,उदयजी... जे आपनास कळते,ते या तज्ज्ञांना का कळत नाही?

गंगाधरजी. लेख बराचसा पटला नाही.

तुम्ही काही काही मुद्दे खूप छान मांडले आहेत आणि काही अगदीच हास्यास्पद. उदा. प्रेताच्या मुखवट्याचा क्लोजप.
कृपया लिहिताना अभिनिवेष थोडासा बाजूला ठेवा, नाहीतर तुमच्या लिखाणाला आणि त्यामागील तळमळीला कुणीच गंभीर रीत्या घेणार नाही.

जर सरकारी तज्ज्ञाचे काही चुकत असेल तर ते दाखवून द्या. विविध माध्यमातून ते पुढे येऊ देत. शेतकरी आत्महत्या का करतो हा वादाचा मुद्दा नाहिये तर "विदर्भातला" शेतकरी आत्महत्या का करतो ही चिंतेची बाब आहे..

याबाबतीत कोकणातल्या माण्सांना मानले पाहिजे. वास्तविक पाहता कोकणाइतकी गरिबी, अज्ञान, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा कुठेच नाही. त्यात वर भाऊबंदकी!!
पण कोकणी माणूस समोरच्याला अख्खा कापेल् पण जीव देणार नाही!! ही मानसिकता विदर्भामधे रूजवणे गरजेचे आहे असे वाटत नाही का??

(२)
<<कोकणी माणूस समोरच्याला अख्खा कापेल् पण जीव देणार नाही!! >>.
नंदिनीजी, 'जिव घेणे किंवा जिव देणे' दोन्ही वाइटचं. समर्थन नाही करता येत..तुमच्या इतर मुद्यांबद्दल मी सविस्तर लिहिनार आहे.

<<कोकणी माणूस समोरच्याला अख्खा कापेल् पण जीव देणार नाही!! >>.
नंदिनीजी, 'जिव घेणे किंवा जिव देणे' दोन्ही वाइटचं.
---- त्यांना कोकणी म्हणजे जिद्दी, चिवट किंवा एखादी गोष्ट कराविशी वाटली तर स्वत: कडे असलेली संपुर्ण शक्ती पणाला लावणारे असे म्हणावयाचे असेल... विजीगिषू वृत्ती.

चांगले लिहिले आहे. माझ्या एका मैत्रिणीची आई सगळे शेतकरी ऊस लावुन लावुन गब्बर झालेत, त्यांना मदतीची काही(च) आवश्यकता नाही असं म्हणायची त्याची आठवण झाली Sad

खुपच सखोल अभ्यास आणि माहिती , पण वर नंदिनीने म्हटल्याप्रमाणे आत्महत्येचं प्रमाण विदर्भातचं जास्त का आहे ? महाराष्ट्रातचं नव्हे तर भारतात असे कित्येक जिल्हे कायमचे दुष्काळग्रस्त आहेत पण आत्महत्ये मध्ये विदर्भचं आघाडीवर का ? काय नक्की कारणं तरी काय आहे ?
लक्ष्मण च्या आधीच्या लेखात उल्लेख आला होता की शेतकरी स्वतःच्या शेतातली कामं आटोपली की इतर शेतकर्‍यांच्या शेतात किंवा रो. ह. यो. च्या कामाला जात नाहीत जेणेकरुन त्यांना अधिक पैसे मिळु शकतील.
शेतात जर मुबलक पाणी असेल तर शेतकर्‍याला आत्महत्या करण्याची गरज पडणार नाही आणि नसेल तर शेतकरी ३६५ दिवस शेतात काम कसा काय करु शकतो ?

नंदिनीजी, 'जिव घेणे किंवा जिव देणे' दोन्ही वाइटचं. समर्थन नाही करता येत..तुमच्या इतर मुद्यांबद्दल मी सविस्तर लिहिनार आहे.>> त्यांना कोकणी म्हणजे जिद्दी, चिवट किंवा एखादी गोष्ट कराविशी वाटली तर स्वत: कडे असलेली संपुर्ण शक्ती पणाला लावणारे असे म्हणावयाचे असेल... विजीगिषू वृत्ती.>> उदय अनुमोदन!!

कोकणी माणसाला ज्या कठिण परिस्थितीमधे रहावं लागतं ते पाहिल्यास खरंच त्याची "जगण्याच्या वृत्तीची" दाद द्यावीशी वाटते.

शेतात जर मुबलक पाणी असेल तर शेतकर्‍याला आत्महत्या करण्याची गरज पडणार नाही आणि नसेल तर शेतकरी ३६५ दिवस शेतात काम कसा काय करु शकतो ?>>> शेतात मुबलक पाणी का नसते? विदर्भामधे बोअरवेल अथवा विहीरीसाठी जमिनिमधे पाण्याचे झरे नसतात का? (मला तिथली भौगोलिक परिस्थिती माहित नाही).

गेल्या शंभर वर्षापासून विदर्भातली शेती ही कायमच तोट्यात जात आहे का? तसे असेल तर तिथले शेतकरी शेती सोडून इतर पर्यायाचा का विचार करत नाहीत??

विदर्भाप्रमाणेच आंध्रातील वारंगळ अन आस पास च्या जिल्ह्यातही आत्महत्यांचे प्रमाण खुप आहे. कारणे ठरलेली आहेत. अन उपायही. पण वर्षानुवर्षे हा प्रकार चालुच आहे. प्रत्यक्ष जाऊन पाहिल्या शिवाय काही बोलणे योग्य नाही.

एक गोष्ट. बर्‍याच देशात शेतकर्‍यांची परिस्थिती वाईट आहे, जसे की इथे ऑस्ट्रेलियातही. कारण इथेही दुष्काळ आहे आणि चायना इ. इतर देशातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला /शेतमाल आयात करतात. इथेही शेतकरी आत्महत्या करतात, भलेही मोठ्या प्रमाणात नसतील करत. इथली जमीन अत्यंत वाईट आहे, सगळाच मुरुम.

गेल्या शंभर वर्षापासून विदर्भातली शेती ही कायमच तोट्यात जात आहे का? तसे असेल तर तिथले शेतकरी शेती सोडून इतर पर्यायाचा का विचार करत नाहीत??>>>>

नंदिनी, तिथे पाणीच नाही. मी तिथलीच आहे आणि आमची शेती सगळी विकण्यात आली आहे कारण शेती हा एकच धंदा असा आहे की ज्यात अतोनात कष्ट असूनही उत्पादक आपल्या मालाचा भाव ठरवू शकत नाही आणि शेती ही पूर्णपणे दुसर्‍या घटकांवर अवलंबून असते. जसे आकाशातला पाऊस, पंपासाठी वीज, सरकारची धोरणे इ. तू सदानंद देशमुखांचे 'बारोमास' वाच, मग लक्षात येईल.

इथले सरकार पण इतर पर्यायाचा विचार करा हेच सांगते. शेती विकून दुसरा काही कामधंदा करणे हा एक पर्याय आहे. पण भारतात आणि इतर देशात मोठा फरक आहे. भारतात बरीचशी जनता शेतीवर अवलंबून आहे- अगदी ६०%. आणि भारताची लोकसंख्या बघता भारताने धान्य आणि भाजीपाला, दूध या सगळ्या उत्पादनांच्या बाबतीत स्वयंपूर्ण असले तरच बरे होईल. कारण सगळे देश असे शेतीप्रधान नाहीत.

भाग्यश्री. मी शेती विकून इतर पर्याय म्हणत नाहिये.. पण शेतजमिनीवर इतर उत्पादने घेऊन (उदा, फळबागा, सायाची झाडं) ज्याला पाणी कमी लागेल आणि पैसा नियमित मिळेल असे काही उपाय आणता येणार नाही का?

धारवाडला माझ्या काकाने शेती सोबत असेच अजून बरेच उद्योग चालू केले आहेत, सॉस बनवणार्‍या कंपन्याना टोमॅटो विकणे, यामधे भरपूर पैसा मिळतो आणि हा आलेला पैसा अजून कुठेतरी गुंतवून काका शेतजमिनीची खरेदी करतो. त्याचे शेतीमधले लौशल्य पाहून पप्पानी त्याच्या वाटणीची सर्व जमिन त्याला लिहून दिली (हा काका पप्पाचा चुलत भाऊ आहे) तो आम्हाला न मागता वर्षभराचे जोंधळे आणि इतर काही धान्य देतो. रत्नागिरीमधून आन्ब्याची कलमे नेऊन त्याने ४०० कलमाची बाग केलेय आणि तो सर्वच्या सर्व आंबे निर्यात करतो. सर्वच भावंडामधे लहान असूनपण तो सर्वात जास्त श्रीमंत आहे!!

याचा अर्थ शेतीमधे पैसा आहे.. पण काम करायची कष्ट करायची तयारी हवी!!

कोनत्या विभागातील शेतकरी काय करतो आणी शेतात कोनती उत्पन्न घेतो .
१ ) कोकण: - आंबा , फणस , सुपारी, काजु , मासे , तांदुळ ( घरातील एक तरी व्यक्ती :- मुम्बई , ठाणे, पुणे )

२ ) खानदेश: - केळी , द्रांक्षे , कापुस , ज्वारी , बाजरी ( घरातील प्रत्येक व्यक्ती आहे तीथेच )

३ ) पश्चीम महाराष्ट्र: - उस , फळबागा , द्रांक्षे , पाले भाज्या ( घरातील काही व्यक्ती :- राजकारण , तमाशा , गळ्यात सोन्याची चेन , स्कार्पीयो गाडी आन्खी काही ????? ) आव जमीनीला लय भाव आलाय ?

४ ) वीदर्भ : - मोसंबी , कापुस , गहु , ज्वारी ,बाजरी ( घरातील प्रत्येक व्यक्ती:- गड्या आपला गावच भला )

५ ) मराठवाडा :- ज्वारी, बाजरी, हारभरा , मुग , कापुस , पण पाणी आसेल तर ( घरातील प्रत्येक व्यक्ती :- उसतोड मजुर , कींवा शेती नसेल तर पुणे , मुम्बई , या ठीकाणी मीळेल ते काम करु झोपडपटीत राहायचे ) मराठवाडयातील १९७२ च्या दुष्काळा नंतर मुम्बई ठाणे पुणे येथील झोपडपटीत बहुसंख्य लोक हे मराठवाडयातील आहेत .

.

३ ) पश्चीम महाराष्ट्र: - उस , फळबागा , द्रांक्षे , पाले भाज्या ( घरातील काही व्यक्ती :- राजकारण , तमाशा , गळ्यात सोन्याची चेन , स्कार्पीयो गाडी आन्खी काही ????? ) आव जमीनीला लय भाव आलाय ? >>>
लक्ष्मण पश्चिम महाराष्ट्रात अशा किती लोकांकडे वर जे लिहीलयसं ते आहे ???

महाराष्ट्रातल्या सगळ्या गरीब शेतकर्‍यांची परिस्थिती जवळ्पाससारखीचं आहे . गळ्यात सोन्याची चेन अन बुडाखाली स्कॉर्पियो असणारे मोजके शेतकरी / राजकारणी फक्त पश्चिम महाराष्ट्रातचं नाही तर विदर्भ , खानदेश , मराठवाड्यात पण भेटतील .

{ .३. }

 • आपल्या सर्वांच्या प्रतिसादा बद्दल आभार. आभार एवढ्या साठी कि, हा लेख मायबोलीवर पोस्ट करतांना मुळातच शेतकरी केंद्रबिंदू असलेल्या या लेखास कुणी एवढ्या गंभीरतेने घेईल,असे वाटलेच नव्हते. कारण सध्या शेतकरी उपेक्षेचा विषय झाला आहे. त्यातल्या त्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी तर कुचेस्ठेचा.त्याच्याबद्दल आत्मीयता कमी आणि उपहासच जास्त.बाकी जावू द्या पण दस्तुरखुद विदर्भातच स्थानिक पुढारी,विद्वान,तत्ववेत्ते हा प्रश्न गंभीरतेने घेतांना दिसत नाही.विदर्भातच शेतकरी आत्महत्त्या का होतात याचे कारण स्थानिक पुढारी,विद्वान,तत्ववेत्ते आणि लाचखोर प्रशासन यांची उदासीनता हे एक असू शकते.आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला एक लाखाची मदत देण्यापुरतच याचं शेतकरी प्रेम असतं. आजकाल तर तेही बदललं,शासकीय निकषामध्ये नव्वद टक्के प्रकरणे अपात्रच ठरविली जातात.
  आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला एक लाखाची मदत देणे हा सुद्धा माझ्या मते वादाचा विषय आहे. संकटाशी सामना करून होतकरूंनी जिद्दीने जगायचं म्हटलं तर पावलोपावली लाच मागणारी,लाचलुचपत दिल्याशिवाय काम न करणारी मंडळी भेटतात.खिशात पैसा नसेल तर कामच होत नाही.जगायची इच्छा असणारांचे हे हाल पण आत्महत्त्या केली तर एक लाख,हा का न्याय झाला?. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला एक लाखाची मदत देणे म्हणजे आत्महत्त्येसाठी प्रलोभन देण्यासारखं नाही का? कि लाखाचं आमिष दाखवून आम्हीच त्याला आत्महत्तेस प्रवृत्त करीत आहोत?
  नंदिनिजीन्ना हा लेख बराचसा पटला नाही,त्याची काही कारणे नक्कीच असू शकतात. खरं तर या लेखाची भाषा,शैली आणि वाक्यरचना मलाच आवडली नाही. पण शेतकऱ्यांना कामचोर म्हणणा-यांना त्याच भाषेत उत्तर द्यायला दुसरे शब्द सापडले नाहीत. शेतकरी आत्महत्त्यांचे कारण उधळखोरपणाशी जोडणाऱ्या एका नामवंत महाभागाची प्रतिक्रिया वाचली आणि मन गलबलून आलं, आणि तेच कागदावर उतरलं.त्याला संपादन करून सौम्य किंवा मवाळ करायला हवं होतं,पण सभ्यतेच्या हव्यासापायी मूळ भावनेला तडा जाण्याची भीती होती,म्हणून ते टाळल.तेव्हा या लेखाकडे मनाची स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणूनच बघावे.
  गंगाधर मुटे

  भाग्यश्री. मी शेती विकून इतर पर्याय म्हणत नाहिये.. पण शेतजमिनीवर इतर उत्पादने घेऊन (उदा, फळबागा, सायाची झाडं) ज्याला पाणी कमी लागेल आणि पैसा नियमित मिळेल असे काही उपाय आणता येणार नाही का?>>>

  विदर्भ मराठवाडा भागातही नवीन प्रयोग करणारे आणि ते प्रयोग करून यशस्वी झालेले शेतकरी आहेत.
  गेल्यावर्षी लातूरला सिंचन परिषदेत काही उदाहरणं समजली होती. एक म्हणजे आवळा उत्पादक गणेश म्हात्रे आणि दुसरे म्हणजे नांदेडमधे मिश्र फळबागेचा प्रयोग यशस्वी करणारे>>>>

  या शेतकर्‍यांचं तर कौतुकच आहे. भारताला जलनियोजनाबरोबरच या अशा पर्यायांची गरज आहे, पण त्याला सुरुवातीला तरी काही ना काही भांडवल लागतंच लागतं. थोडं का होईना पाणी आणि वीज लागतातच. साधी बैलजोडी पण ५०,००० च्या खाली येत नाही. आणि या साठी मुख्य म्हणजे शेतकरी त्या त्या प्रयोगांसाठी थोडे तरी प्रशिक्षित हवेत. अनेकांनी स्ट्रॉबेरी, फुलं इ. ची पण शेती केलीय, पण हे सगळे बाकीच्या शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवायला हवे. आणि सरकारने मदत देताना सधन शेतकर्‍यांना न देता खरोखर गरजू जे आहेत त्यांना द्यावी आणि त्यांच्यापर्यंत ती पोहोचली गेली पाहिजे. अन्यथा सातबार्‍याचा उतारा घेण्यासाठी पण बरेचदा लाच द्यायला लागते.

  आणि मुख्य म्हणजे हा सर्वात पहिले ही एक मोठी समस्या आहे हे कबूल केले पाहिजे. आणि मग योजना आखून राबवल्या पाहिजेत. आपल्याकडचे मनुष्यबळ आणि उत्तम प्रतीची काळी माती (काही अपवाद सोडता) यामुळे अशा योजना खरे तर यशस्वी व्हायला हव्यात. या वर्षीच पाऊस उशीरा आणि अवेळी पडला. परिणाम तांदूळ, डाळ, भाज्या ह्या किती महाग झाल्या आहेत हे तर सर्वांनाच माहित असेल. जर वेळीच उपाय केलेत नाही तर भविष्यात हा प्रश्न अजून मोठा होऊ शकतो. आपण आत्ताच चीनहून लसूण आयात करतो. भारतासारख्या देशाला लसूण आयात करण्याची गरज मुळात पडायलाच नको.

  माझे काही विद्यार्थी ज्यांची गावाकडे शेती आहे त्यांचे मत असे की , ज्याची नोकरी किंवा तसेच दुसरे उत्पन्न असते त्यांना शेती परवडते. कारण
  १. एखाद्या वेळेस शेत पडिक ठेवने ते लोक afford करु शकतात.
  २.आयत्यावेळेस किटकनाशक किंवा इतर खर्च करायला त्यांच्याकदे पैसे उपलब्ध असतात.

  शेती मध्ये बरेच प्रश्न असतातः

  १. साधारणपणे एखाद्या व्यवसायाची उभारणी एखाद्या पिढीच्या डोळ्यादेखत घडलेली असते, त्याच लोकाना त्याची किंमत रहाते. ते गांभिर्याने काम करतात.... एकदा या पिढ्या स्म्पल्या की पुढच्या पिढ्या कमीजास्त प्रमाणात मस्तवाल होतात... ज्याने कष्टाने शेती मिळवली, ती पिढी कधीच संपलेली असते... पुढच्या पिढीला एक उत्पन्नाचा स्त्रोत या पली कडे भावना असेलच असे नाही... अशी बरीच उदाहरणे पहायला मिळतात, हे सार्वत्रिक नाही, पण तरीही... त्यामुळेच एका शेतकर्‍याला ४ मुली जरी झाल्या तरी मुलीच नव्हे तर २-३ जावईही सगळे सोडून २-४ एकरासाठी भांडतात, अशी उदाहरणे कमी नाहीत... अशा लोकाना काही वाटेकर्‍यानी शांतपणे दुसरा मार्ग धरावा, हे पटत नाही... स्वतः ते करत नाहीत, कुणी सांगितले तरी पटत नाही... बदलण्याची प्रव्रुत्ती हा टिकून रहाण्यासाठी महत्वाचा गुण आहे, जो आयती शेती मिळालेल्या लोकांकडे काही वेळेला कमीच असतो... याउलट त्याच घरातील दुसरा भाऊ आपली वाटणीची शेती दुसर्‍याला करायला देऊन २० वर्षे नोकरी करुन पुन्हा शेतीत आनंदात परतला असेही उदाहरण दिसते... कारण तो फ्लेक्सिबल राहिलेला असतो.... पहिला मात्र कर्जात बुडालेला आणि दुसरा पैशात लोळत असतो....

  २. शेती मध्ये फ्लेक्षिबिलिटी नाही.... सरकारी नोकर खाजगी क्षेत्रात जाऊ शकतो... देशातला परदेशात नोकरी शोधू शकतो..... नॉलेज अपडेट करुन पुढचे प्रमोशन पदरात पाडता येते... शेतीत असे बदल घडवण्याची संधी फारशी नसते.... पीक बदला, बी बदला, खते बदला, कारखाना बदला... संपलं.. फ्लेक्सिबिलिटी एवढीच... बाकी पूर आला काय किंवा दुष्काळ पडला काय, जागा बदलता येत नाही...

  शेती आणि शेतकरी या दोन्हीतही फ्लेक्सिबिलिटी नाही.... त्यामुळे हे डेडली कॉम्बिनेशन झालेले आहे...

  सगळीच जबाबदारी सरकारवर ढकलून आपण वाट बघत बसल्यानंतर काहीच घडणं शक्य नाहीये.>>>

  मला हे पटतं नी, पण हरितक्रांती करायची असेल तर त्यात सरकारचा वाटा जास्त असणार. इस्त्रायल चे उदाहरण आहे.

  पश्चीम महाराष्ट्र: - उस , फळबागा , द्रांक्षे , पाले भाज्या ( घरातील काही व्यक्ती :- राजकारण , तमाशा , गळ्यात सोन्याची चेन , स्कार्पीयो गाडी आन्खी काही ????? ) आव जमीनीला लय भाव आलाय ?

  ४ ) वीदर्भ : - मोसंबी , कापुस , गहु , ज्वारी ,बाजरी ( घरातील प्रत्येक व्यक्ती:- गड्या आपला गावच भला )
  >> एस लक्ष्मण, तुमच्या या मुद्द्याला आक्षेप!! प्रत्येक घरातील काही व्यक्ती या "राजकारणात तमाशात गळ्यात सोन्याची चेन" वगैरे जे काही लिहिलय त्याला काय बेस आहे?? कशावरून हे विधान करताय??

  कोकण: - आंबा , फणस , सुपारी, काजु , मासे , तांदुळ ( घरातील एक तरी व्यक्ती :- मुम्बई , ठाणे, पुणे )
  >> या व्यतिरिक्त सध्या कोकम, करवंद, मिरी, इत्यादिचे उत्पन्न घेऊन त्याचे मार्केटिंग करणे सुरू आहे. कुळीथ, नाचणी आणि भाजीपाला तर आहेच, योजक व रत्नकोकणचे प्रॉडक्ट्स आंबा पोळी, फणसपोळी, कोकम सरबत, कोकम आगळ सर्वत्र मिळतात. आणि शेतकरी "माशाचे" उत्पन्न घेत नाही, कोळी व तत्सम लोक घेतात. तो मुद्दा यात नको.

  आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला एक लाखाची मदत देणे म्हणजे आत्महत्त्येसाठी प्रलोभन देण्यासारखं नाही का? कि लाखाचं आमिष दाखवून आम्हीच त्याला आत्महत्तेस प्रवृत्त करीत आहोत?
  >>> यावर खरंच विवचार करायला हवा. कारण आत्महत्या करून शेतकरी स्वतःच्या कुटुंबीयानाच कर्जात ढकलत असतो मग तरी तो का करतो??

  विदर्भातच शेतकरी आत्महत्त्या का होतात याचे कारण स्थानिक पुढारी,विद्वान,तत्ववेत्ते आणि लाचखोर प्रशासन यांची उदासीनता हे एक असू शकते.>>> मग हे स्थानिक पुढारी उलथून टाकणे कुणाच्या हातात आहे? सरकार नावाची गोष्ट आपणच बनवत असतो मग तरी हे शक्य का नाही होत?? वर्षानुवर्षे जर हेच दुष्टचक्र चालत असेल तर एक नागरिक म्हणून आपण काय करतोय??

  गणेश म्हात्रे मात्र पूर्णवेळ शेतकरी आहेत. आवळा उत्पादन आणि प्रक्रिया दोन्हीमधे आहेत. अतिशय डोकं चालवून आणि विचार करून केलेली बागायती, तितक्याच हुशारीने टाकलेली प्रक्रियेची युनिटस आणि तसंच हुशारीने चालवलेलं अ‍ॅग्रेसिव्ह मार्केटिंग. >> याच्यावर ईटीव्हीवर एक कार्यक्रम पण दाखवला होता.

  बरं, दापोली कृषी विद्यापीठाकडून विविध प्रयोग केले जातात आणि कोकणामधल्या शेतकर्‍यापर्यंत ते पोचतात. (शेतकरी जाऊ द्या, आमच्या अंगणात पाच माड आहेत तर भाट्ये नारळ संशेधन केंद्रातील लोक येऊन त्या माडांना इजेक्शन देऊन जातात) तसे काहीच विदर्भामधे नाहिये का? नविन सन्शोधनासाठी एखादे केंद्र वगैरे???

  ई-सकाळ मध्ये काही दिवसांपुर्वी एक बातमी आली होती .
  "सव्वाशे तरुणांची टीम घडवतेय कृषिक्रांती " , ह्या तरुणांकडुन बरचं काही शिकण्यासारखं आहे.
  http://epaper.esakal.com/esakal/20091129/4905301132663820116.htm
  असे प्रयोग जर महाराष्ट्रात सगळीकडे केले गेले तर महाराष्ट्रात कृषीक्रांती घडणं काही अवघड नाही .
  सहकारातुन मोठं मोठे साखर कारखाने सुत मिल्स उभ्या राहील्या आहेत . तसाचं प्रयत्न सहकार शेती मध्ये व्हायला हवा .

  <<<<सगळीच जबाबदारी सरकारवर ढकलून आपण वाट बघत बसल्यानंतर काहीच घडणं शक्य नाहीये.>>> मुळातच शेतकर्‍याला सरकारचीच गरज नाही. तेव्हा सरकारवर जबाबदारी टाकण्याचा विषय येतो कुठे. देश स्वतंत्र झाल्यानंतर यंत्रणाच तशी निर्माण झालीय. शाळा, महाविद्यालये संस्था चालवितात, पण पगार सरकारच्या नियमांनुसार ठरविले जातात. ते पगार महागाईच्या दरानुसार वाढत जातात. तसं शेतमालाच्या बाबतीत होत नाही. आज विदर्भ किंवा महाराष्ट्रातला शेतकरी जीव देतोय ते या सरकारच्या अनियंत्रीत पण भरपूर हस्तक्शेप असलेल्या धोरणापाई.

  (४)
  << विदर्भाप्रमाणेच आंध्रातील वारंगळ अन आस पास च्या जिल्ह्यातही आत्महत्यांचे प्रमाण खुप आहे. कारणे ठरलेली आहेत. अन उपायही. पण वर्षानुवर्षे हा प्रकार चालुच आहे. >> -- चंपक --

  ...... चुकिचे निदान आणि चुकिचे उपाय. हेच कारण असु शकतं..

  << शेती हा एकच धंदा असा आहे की ज्यात अतोनात कष्ट असूनही उत्पादक आपल्या मालाचा भाव ठरवू शकत नाही आणि शेती ही पूर्णपणे दुसर्‍या घटकांवर अवलंबून असते. जसे आकाशातला पाऊस, पंपासाठी वीज, सरकारची धोरणे..>> --- भाग्यश्री --

  --- हा मुद्दा महत्वाचा ---

  गंगाधर मुटे

  मुळातच शेतकर्‍याला सरकारचीच गरज नाही. तेव्हा सरकारवर जबाबदारी टाकण्याचा विषय येतो कुठे. <<
  अहो ते भाग्यश्री च्या पोस्टला म्हणलं होतं मी. शेतकर्‍याला सरकारची गरज पडायलाच नको हे तर माझंही म्हणणं आहे.
  सरकारी मलमपट्ट्यांपेक्षा स्वतः शेतकर्‍यानेच वेगळी पावलं उचलण्याची गरज आहे.
  आत्महत्या ही शेतीच्या अनेक गंभीर समस्यांपैकी एक किंवा अनेक गंभीर समस्यांची परिणती आहे असं म्हणूया. त्यामुळेच सगळ्या आत्महत्या एकसारख्या पद्धतीनेच बघणं हेही चुकीचं होईल.

  .

  Pages