* औंदाचा पाऊस *

Submitted by अभय आर्वीकर on 25 November, 2009 - 10:58

औंदाचा पाऊस

सायबीन झालं पोटलोड, पराटी केविलवाणी,
कोमात गेलं शिवार सारं, व्वारे पाऊसपाणी ......!!

उन्हाळवाही-जांभूळवाही, शेती केली सुधारीत,
बी-बेनं खत-दवाई, बिटी आणली उधारीत,
नवं ज्ञान, नवं तंत्र, उदिम केला पुरा,
पावसाच्या उघाडीनं, स्वप्न झालं चुरा,
खंगून गेली कपाशी, बोंड बोरावाणी ......!!

बेनारचा बाबू म्हणे कापूस नाही बरा,
औंदा पेर सायबीन, बरकत येईन घरा,
नाही उतारा तिलेबी, खासर उलार होते,
रोग झाला गेरवा,एकरी दीड पोते,
बिनपाणी हजामत, चीत चारखानी ......!!

सायबाचं दप्तर म्हणते, पीक सोळा आणे,
अक्कल नाही तूले म्हून, भरले नाही दाणे,
विहिरित नाही पाझार, नयनी मात्र झरे,
किसाना परिस कईपट, चिमण्या-पाखरं बरे,
भकास झालं गावकूस, दिशा वंगळवाणी .....!!

, गंगाधर मुटे

..........**..............**............. **.............

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

औंदाचा पाउस आमच्या गावात फिरकलाच नाही..... सदरहू पीक आम्ही आसवांच्या पाण्यावरच काढले आहे !! या ओळी आठवल्या. येत्या पावसासाठी शुभेच्छा!! काले वर्षन्तु पर्जन्या... पृथिवी सस्यशालीनी...!!

गंगाधरजी,

फारच छान कविता,....

फार फार वर्षांपुर्वी वाचलेले, ....
शेती : उत्तम
व्यवसाय : मध्यम
नोकरी : कनिष्ठ

आणि आता उमजलेले, ......

नोकरी : उत्तम
व्यवसाय : मध्यम
शेती : कनिष्ठ ( दुर्लक्षीत ?? )

Pages