भारतातील भ्रष्टाचार - अमेरिकन चश्म्यातून

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

विमानाचे दरवाजे उघडले आणि एक ओळखीचा वास नाकात शिरला. मुंबई विमानतळावर, विशेषतः तुम्ही परदेशात वास्तव्य करुन येत असाल तर हा वास लगेच जाणवतो. इमिग्रेशन, स्वाईन फ्लू तपासणी, कस्टम्स वगैरे सोपस्कार पार पडले आणि टॅक्सी पकडण्यासाठीच्या खिडकीवर येऊन थडकलो. एक व्यवस्थित दागिने घातलेल्या जाडेलशा बाईंनी २४१२ हा टॅक्सीचा नंबर सांगितला आणि हातात एक रसीद दिली.

बाहेर आलो आणि थोड्याश्या शोधाशोधीनंतर २४१२ मिळाली. मुंबईकरांना परिचीत असणारी नेहमीचीच प्रिमीयर पद्मिनी होती ती. तिच्या डिकीत सी. एन्. जी. सिलींडर असल्याने माझी मोठी बॅग त्यात राहीना. अखेर मोठी बॅग पाठी सीटवर ठेऊन मी पुढे बसण्याचे ठरले. टॅक्सीवाल्याने टॅक्सी सुरु केली. विमानतळाबाहेर पडताना रसीद एका छोट्याशा कचेरीत देऊन टॅक्सीवाल्याने पैसे घेतले. तो हे पैसे घेत असताना मी पोलिसांनी एक टॅक्सी अडवलेली पाहिली. परत आल्यावर मी काही न सांगताच टॅक्सीवाल्याने मला पोलिसांना दाखवून म्हटले - "साहब कोई बाहरका बकरा मिल गया इन्हे. ऐसेही परेशान करते है साले." मी चकीत झालो. बाहेरचा टॅक्सी नंबर दिसला की त्याला थांबवून पोलिस त्याच्याकडून पैसे उकळतात असे त्याने मला सांगितले. भारतात येऊन मला उणापुरा तासभर झाला होता आणि इथल्या भ्रष्टाचाराचे काळे दर्शन व्हायला सुरुवात झाली होती.

टॅक्सी विमानतळ परिसराच्या बाहेर पडली. १५ एक मिनीटांनी टॅक्सीवाल्याने टॅक्सी एका सी. एन. जी. पंपावर थांबवली.
"साहब बोरिवलीतक जाना है, गैस भरनाही पडेगा." पंपावर भली मोठी टॅक्सी आणि रिक्शांची रांग होती. मग त्याने मला त्या पंपाच्या सुरस कथा सांगायला सुरुवात केली. तो पंप म्हणे १५ दिवसापूर्वी एका आठवड्याकरता बंद करण्यात आला होता. गॅसच्या वजनाची चोरी केल्याबद्दल पकडले गेल्यामुळे. दंड भरुन पुन्हा चालू केलेला. मी त्याला विचारलं "मग आता बरोबर गॅस देत असतील नाही?" यावर तो उत्तरला "नही साहब. अभी भी उतनाही चुराते है". "मग तू दुसऱ्या पंपावर का जात नाहीस?" "दूसरा सी. एन. जी. पंप पास नही है". यावर मी निरुत्तर झालो. मुंबईत येऊन पुरे दोन तासही झाले नव्हते तर ही दुसरी भ्रष्टाचाराची घटना बघत होतो.

मन सुन्न झालं होतं. मला आपल्या समाजातच दोष दिसायला लागला. सगळेच भ्रष्टाचारी. कोण कुणाला बोलणार? राजकारणी लोकांना दोष देऊन कसं चालेल? तेही याच समाजातून वर आलेले. आपल्यातलेच एक. लाल दिवा चालू असताना पोलिस नाही हे बघून सिग्नल तोडणारी माणसं भ्रष्टाचारी नव्हेत काय? आणि वर जर पकडलं गेलंच तर ५०० रुपयांचा अधिकृत दंड भरण्याऐवजी ५० रुपयाची लाच देणारी माणसं भ्रष्टाचारी नव्हेत काय? ही माणसं आपल्यातलीच असतात - आपल्या ओळखीतलीच असतात. अशा प्रसंगाच्या सुरस कथा आपल्याला गप्पांच्या ओघात सांगतातही. पण आपण काय करतो? ५० रुपयात आपला मित्र सुटला म्हणून आनंद व्यक्त करतो! हे भ्रष्टाचाराचं समर्थनच नव्हे काय?

यदा यदा ही धर्मस्य...... गीतेतला श्लोक आठवला मला. 'जेव्हा जेव्हा भारतात अधर्माचं राज्य प्रस्थापित होईल तेव्हा तेव्हा मी जन्म घेईन.' अशा आशयाचा. कदाचित असा जन्म त्याने महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, धोंडो केशव कर्वे, महात्मा फुले यांच्या रुपाने घेतलाही असेल या पूर्वी. पण आजचे काय? आजच्या समाजात हा भ्रष्टाचाराचा अधर्म दूर करणारा एकही नेता दिसत नाही. असं का? कुठलाही सुदृढ समाज जेव्हा अध:पतनाच्या वाटेला लागतो तेव्हा त्या समाजातील सुजाण लोक जागे होतात आणि अविश्रांत मेहनत करुन सुधारणेचं पर्व आणतात. कुठे गेले आमच्या समाजातील सुजाण लोक? कि आपल्या समाजाचा आत्माच मेलाय?

अमेरिकेत भ्रष्टाचार नाही असं मी अजिबात म्हणणार नाही. पण सामान्य माणसाला भ्रष्टाचार करायची संधीच मिळत नाही. कुठल्याही सरकारी कचेरीत कामे विनायसास होतात. जागेच्या लाखो डॉलर्सच्या व्यवहारात टॅक्स वाचवण्यासाठी कोणी कधीच एक पैसाही ब्लॅकने देत नाही. पोलिसाने वाहतुकीचा नियम तोडल्याबद्दल पकडलंच तर त्याने तिकीट फाडू नये म्हणून त्याला लाच देण्याचा कोणी विचारही करत नाही. कोर्टात केसेस चा निकाल काही महिन्यात लागतो. जो काही भ्रष्टाचार चालतो तो राजकारण्यांच्या पातळीवरुन. कदाचित मोठी कंत्राटे देताना तिथेही भ्रष्टाचार होत असेल पण ज्याला कंत्राट मिळतं त्याला काम बरोबर आणि वेळेवर करुन द्यावंच लागतं. एखादा राजकारणी भ्रष्टाचाराच्या आरोपात पकडला गेलाच तर त्याची कारकिर्द लगेचच संपुष्टात येते. पोलिसांवर कुठल्याही प्रकारचा दबाव आणला जात नाही. एकंदरीत समाजाची मुल्येच आपल्या समाजापेक्षा बरीच वरच्या दर्जाची आढळतात. अमेरिकेकडून आपण नको त्या गोष्टींचं अंधानुकरण करतो. मग अमेरिकन समाजातल्या चांगल्या गोष्टींचं अनुकरण कधी करणार?

"साहब आगयी आपकी सोसायटी". माझी तंद्री तुटली. टॅक्सी माझ्या इमारती समोर थांबलेली असते. पहिल्या मजल्यावरच्या खिडकीतून माझे आई वडिल डोळ्यात प्राण आणून माझी वाट बघत असताना दिसतात. मी सगळं काही विसरतो आणि सामानासकट वर धाव घेतो.

विषय: 
प्रकार: 

अमेरिकेकडून आपण नको त्या गोष्टींचं अंधानुकरण करतो. मग अमेरिकन समाजातल्या चांगल्या गोष्टींचं अनुकरण कधी करणार?>>>

देव जाणे. त्यात राजकारण्यांना पैसे खाणे सोडून देशाची कुठलीही तमा नाही.

मी कॅनबेरात राहते. आमच्या स्टेटचा चीफ मिनिस्टर कुठलाही लवाजमा/सुरक्षासैनिक न घेता स्वतःच्या गाडीतून सगळीकडे हिंडतो. स्वतःचे ग्रोसरी आणि इतर शॉपिंग स्वत:च करतो. तो भाजी घेत असताना, सुपरमार्केट्मध्ये क्यूत उभा असतानासुद्धा लोकं त्याला त्याच्या पॉलिसीज्/कामकाजाशी संबंधित प्रश्न विचारतात आणि तो उत्तरे देतो. त्याला चीफ मिनिस्टर म्हणून कुठलाही खास मान लोक देत नाहीत की सारखी त्याच्या समोर मान झुकवून हाजी हाजी करत नाहीत. राज्याची आणि लोकांची कामे करण्यासाठीच नेमलेला 'पगारी माणूस' अशीच त्याची स्वतःबद्दल व लोकांची त्याच्याबद्दल भावना आहे.
फक्त तोच नाही, तर त्याचे सगळे मंत्रीमंडळ पण असेच बिना सुरक्षा/लवाजम्याचे हिंडते.

हे असे आपल्याकडे कधी होईल?

उत्तर भारतीयांचा IAS/ IPS etc. बनण्याकडे जास्त ओढा असतो.... याची इतरही कारणे असू शकतील पण एक कारण कळले ते हे की या पदावरच्या मुलांना सर्वात जास्त हुंडा मिळतो. आता हुंडा देणारेही का बरं देतात इतका हुंडा... कारण सरळ आहे.... त्याची भावी मिळकत लक्षात घेतली जाते. त्याच बरोबर हे हुंडा देणारे मोठमोठे व्यावसायिक वगैरे असतात. त्यांनाही 'वर' पर्यंत रिलेशन्स ठेवण्यासाठी जवळची शिडी हवीच असते.

भारतातल्या भ्रष्टाचाराबद्दल माझ्यासकट इतरांनी खूप अतिशयोक्ति केली आहे. कारण अमेरिकन चष्म्यातून इतरांच्या डोळ्यातले कुसळ देखील दिसते.

जणू भारतात चांगले काहीच नाही.

अमेरिकेत भ्रष्टाचार कमी आहे एव्हढेच म्हणता येईल. फक्त सरळ सरळ वैयक्तिक भ्रष्टाचारा ऐवजी, इतर अनेक मार्गाने भ्रष्टाचार चालतो. नुकतेच न्यू जर्सी मधे बरेच लोक पकडल्या गेले. त्यात राज्यपालाच्या कचेरीतले लोक होते. त्यामुळे इथला राज्यपाल पुनर्निवडणूक हरला. तसेहि न्यू जर्सी हे भ्रष्टाचारात पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे असे म्हणतात. येथे बांधकामाच्या कंत्राटातील भ्रष्टाचाराबद्दल उघड उघड चर्चा होते.

आजकाल नोकरी देण्याबाबतच्या भ्रष्टाचाराच्या काही बातम्या ऐकल्या. त्यात देखील ज्याला नोकरी हवी त्याला वैयक्तिक रीत्या लाच द्यावी लागत नाही, पण नोकरी देणारी कं ताशी $१०० देत असेल नि कायदेशीर खर्च, कमिशन वजा करता, नोकरी करणार्‍याला ८०. मिळायला हवे असतील, तर ७५ च मिळतात. मधले ५ डॉ. तासाला, कुठे, कसे नाहीसे होतात हे सांगता येत नाही. पण जो नोकरी देणारा असतो, त्याला ते मिळतात. कदाचित् कायद्याने सिद्ध करताहि येणार नाही.

असे अमेरिकेतील भ्रष्टाचार 'कायदेशीर' आहेत. फक्त अतिलोभ केला, गर्व केला की पकडले जातात.

झक्की अहो नोकरी देणार्‍याला मिळणारा 'रेट कट' काढला तर अमेरिकेतल्या हजारो देसी कन्सल्टिंग /प्लेसमेन्ट कंपन्या जातील की बाराच्या भावात Happy

अमेरीकेत public transport का चांगले नाही. (GM & other comapnies)
http://en.wikipedia.org/wiki/Great_American_streetcar_scandal

Califonia वाल्यांना वीज का मिळत नव्हती (Enron)
http://en.wikipedia.org/wiki/California_electricity_crisis#Involvement_o...

2008 मधे गोल्डमन ने त्यांच्या १४ बीलीअन डॉलर्स कमाईवर फक्त १% कर भरला (जेथे नॉर्मल माणूस ३४.५% कर भरतो)
http://www.bloomberg.com/apps/news?pid=20601110&sid=a6bQVsZS2_18

टेक्सास ओहायो मधे छोट्या छोट्या गावांत लोकांकडुन कसा पैसा उकळला जातो
http://en.wikipedia.org/wiki/Speed_trap#United_States
http://edition.cnn.com/2009/CRIME/05/05/texas.police.seizures/index.html...

Healthcare in US... we all know it

Internet, wireless phone service is another big scandal

ईथले कार्पोरेट लोकांचा बराच छळ करत असते, तुमच्या कमाईतला जास्तीत जास्त पैसा कसा उकळता येईल ह्याकडे त्यांचे लक्ष असते. त्यामूळे ह्या न त्या प्रकारे तुमचे पैसे जायचे ते जातच असतात.

ईथले govt. देखील काय चांगले आहे असे म्हणता येणार नाही.

वैभव तुम्हाला आलेला अनुभव हा प्रातिनिधीक नसावा... मला सहा महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी विमानतळावर वेगळाच अनुभव आलेला... मी टॅक्सी कांऊटरवर गेलो (तिकडे महाराष्ट्र पर्यटनाचा कांऊटरपण भल्या पहाटे चालू होता Happy ). मला खालील प्रश्न विचारले...

१. एसी कि नॉनएसी ?
२. किती माणसे आणि लहान मुले ?
३. किती मोठ्या (चेकइन) बॅगा आणि लहान (कॅबिन) बॅगा ?
४. कुठे जायच मुंबई/ नवी मुंबई/ ठाणे?

वरिल प्रश्नांच्या उत्तरांवर चार्जेस ठरविलेले जातात. त्यानी मला टेलिफोन हेल्पलाईन दिली; टॅक्सी सर्व्हीसचा फिडबॅक/ कॅम्पलेट्स (असेल तर) द्यायला...

मी टॅक्सी शोधली आणि बसलो. टॅक्सी जुनीच होती; मी नॉनएसी सांगितली होती. Wink मी टॅक्सीवाल्याला विचारून घेतले की मला टोलचे पैसे द्यावे लागणार नाही कारण मी टॅक्सी कांऊटरवर भरले आहे. तो म्हणाला हम्म. मी त्याचाशी असाच बोललो.. कि एअरपोर्टवर टॅक्सी रेट जास्त आहे... तो म्हणाला... त्यांना सकाळी उठून सीएनजी गॅसच्या लाईनीत ऊभ राहावं लागतं... नंतर रात्री इकडे एअरपोर्टच्या क्यूमध्ये.. मग एक पूर्ण दिवस वाया जातो...

इराकमधे नोबिड contracts हॅलिबर्टनलाच का मिळाली? उपराष्ट्रपती छेनी ची ती कंपनी होती म्हणून? छे: छे:, केवळ योगायोग हो!

नुसती लाचलुचपतीच्या पैश्याची तुलना केली तर भारतातील एक्कूण एक लाचलुचपत, अगदी राजकारणी लोकांची लाचलुचपत धरून सुद्धा, अगदी पोलीसला दिलेले ५० रु. धरून सुद्धा, एका वर्षात होत नाही, तेव्हढी इथे एका दिवसात होते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला येत नाही कारण न्यू जर्सीतले finger prints, सारख्या गोष्टीत कायदेशीर लाचलुचपत आहे, त्यात सर्वांनाच सारख्या रकमेसाठी लुटले जाते. अजूनहि काही काही गोष्टी आहेत.

अर्थात् भारतातली लाचलुचपत खुपते, कारण आपल्या संस्कारात ते बसत नाही, आपल्या भारताकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत (निदान माझ्या तरी). शिवाय आपण त्यात गोवले जातो, नाईलाजाने का होईना!

<<झक्की अहो नोकरी देणार्‍याला मिळणारा 'रेट कट' काढला तर अमेरिकेतल्या हजारो देसी कन्सल्टिंग /प्लेसमेन्ट कंपन्या जातील की बाराच्या भावात >>
पण एक अमेरिकन गृहस्थ नेहेमी देसी कंना नोकरी देतात ते या अटीवर की त्यांनी भारतातून आणलेल्या मंडळींनी त्या अमेरिकन माणसाच्या अपार्टमेंट्स मधे भाड्याने रहायचे!' आम्ही पैसे नाही खात हो!
'

झक्की, अमेरिकेत भ्रष्टाचार नाही असं मी अजिबात म्हणत नाही. पण सर्वसामान्यांना त्याचा फटका भारतातल्याप्रमाणे नेहमी बसत नाही असं मला नक्कीच वाटतं.

माझ्या लिंक्स बघा... अमेरीकेत देखिल सर्वसामान्यांनाच फटका बसतो भ्रष्टाचाराचा. फक्त ते आपल्या लक्षात येत नाही.

हे आजच वाचलेले उदाहरण बघा
http://www.msnbc.msn.com/id/33863680/ns/health-health_care/

माझे रोजचे २०-२२ $ public transport वर जातात, एवढे पैसे देवुनही प्रवासात ३ तास जातात.
कारण रेल्वे चे डबे १९७७ मधे बनवलेले आहेत, they have no plan to replace it. on board one way ticket in this train is $ 18. रेव्लेत मधेच a/c चालत नसतो, तर toilet चा वास आसपासच्या सगळ्या सीट वर येत असतो.

<<अमेरीकेत देखिल सर्वसामान्यांनाच फटका बसतो भ्रष्टाचाराचा. >>
अगदी बरोबर. वर उल्लेखलेल्या finger print प्रकरणात मलाच पैसे भरावे लागले. नि तसे सर्वांनाच भरावे लागतात.
असो. थोडक्यात असे, की हे प्रकार इतके जगभर आहेत की त्यात भारताचा मुद्दाम उल्लेख करण्याचे कारण नाही. नुकतेच नोव्हेंबर ३० च्या टाईम मासिकत वाचले. (हो, नोव्हे. ३० च्या. टाईमचा हा काय आचरटपणा आहे कळत नाही. नोव्हे. ३० चा अंक २० नोव्हे. लाच माझ्या हातात. ) असो.

10 most corrupt countries:
१. सोमालिया
२. अफगाणिस्तान
३. ब्रम्हदेश
४. सुदान
५. इराक
६. चाड
७. उझबेकीस्तान
८. तुर्कमेनिस्तान
९. इराण
१० हैती.
तेंव्हा भारत अजून बरा म्हणावे.
जेंव्हा या यादीत नाव येईल, तेंव्हा विचार करू.

हे परवड्ले इतके सेल्स टॅक्स वाले वाइट असतात.
--- सोबत customs, income-tax आहेतच... कधी तरी CBI नावाची संस्था या लोकांवर धाडी टाकल्याचे नाटक (आम्ही पण कामे करतो) करत असते... पण असल्या धाडींचे पुढे काय होते? एक अजुन विनोदी प्रकार म्हणजे anti-corruption वाले, ते बोलणी फिसकटल्यावर धाडी टाकतात असे म्हणतात.

मला ५०-१०० रु. खाणारा ट्रॅफिक नाक्यावरच्या पोलिसाचा जास्त राग येत नाही, पण ३०० कोटी रुपये गादी मधे लपवले असतांना, रंगेहाथ पकडले गेल्यावरही माणुस सलामत सुटूच कसा शकतो याची चिड येते.

भ्रष्टाचाराची भारतातील परंपरा फार जुनी आहे. आर्य चाणक्याने त्याच्या 'अर्थशास्त्र' या ग्रंथात नमूद करून ठेवले आहे, की मासा पाण्यात असताना कसा पाणी पितो, हे समजत नाही त्याचप्रमाणे सरकारी अधिकारी कसा लाच खातो ते इतरांना समजत नाही. बरं फक्त सरकारी अधिकारी किंवा कारकुनांना दोष देऊन चालणार नाही. खासगी कंपन्यांतही या ना त्या मार्गाने तेच चालू असते. खोटी बिले, वाढीव खर्च सादर करणे चेक काढण्यासाठी चिरीमिरी मागणे हे चालूच असते. राजकीय नेते सरकारी निधीवर डल्ला मारत असतात. मंत्री आपल्या खात्याच्या माणसांच्या बदल्या, बढत्या यातून पैसे मिळवतात. कंत्राटातील कमिशन खातात. पत्रकार माया जमा करतात, एजंट म्हणून काम करतात. सर्व व्यवस्था सडलेली आहे. नीती मूल्यांचा र्‍हास झाला आहे. काही अपवाद आहेत, पण त्याने मनाचे समाधान करून घेत बसण्यात काही अर्थ नाही. अमेरिकेकडून काही शिकण्यापेक्षा अमेरिकेनेच आमच्याकडून शिकण्यासारखे भरपूर आहे. स्वतःच्या नातलगांना बिनदिक्कत कर्जवाटप करून बँका, पतसंस्था गोत्यात आणायच्या, ठेवीदारांच्या तोंडाला पाने पुसायची, कंपन्या बुडवून शेअर होल्डरना हात चोळत बसायला लावायचे हे सर्रास चालते. त्यामुळे कशाला कुठला चष्मा लाऊन बघता भारताकडे? तो चष्मासुद्धा लावायची गरज नाही. उघड्या डोळ्यानेही आपण ही घाण पाहू शकता.

>>मामी, लोक तुमच्याकडून कंपनीची अत्तरे मागतात, यात काही विशेष नाही. ते देऊनही दिवाळीला मिठाईचे बॉक्स पाठवावे लागतात. पूर्वी आपण जेवणातला काही भाग कृमी कीटकांसाठी चित्राहुती, काकबळी, गोग्रास म्हणून काढून ठेवायचोच ना? तसेच हेही समजा. अहो वाहनाची सगळी कागदपत्रे दाखवून आणि नियमाचे पालन केल्यावरही 'चहापाण्यासाठी काहीतरी द्या' म्हणून हात पसरणारे हवालदार आहेत. रोज दोनदा जेवल्याबद्दल सरकार आपल्याकडून कर वसूल करत नाही, हे नशीब समजा.

रोज दोनदा जेवल्याबद्दल सरकार आपल्याकडून कर वसूल करत नाही, हे नशीब समजा.
>>
भारतात सरकारला परवडत नसताना किती तरी वस्तु सरकार subsidisedविकते. cooking gas,petrol.
investment साठी income-tax मधुन सुट हेही एक प्रकारे सरकारने आपले केलेले लाडच वाटतात. आपण घरात कपदे धुणे ,भान्डी घासने यासाठी जे प्यायचे पाणी वापरतो ते आपल्या नळाल येइइपर्यन्त सरकारचे जेव्हडे पैसी खर्च होतात त्याच्या १/१० देखील आपण municipal bodyला देत नाही.
ससून सारख्या hospitalsमधे निष्णात doctors कडुन लोकाना मोफत उपचार मिळतात ते केवळ सरकारी क्रुपेने.उगीचच सरकारला नावे ठेवायची म्हणुन ठेउ नयेत.

ए आर सी.. अनुमोदन...... एवढंच कशाला, भारतात जे शिक्षण घेऊन हे साहेब अमेरिकेत गेलेत, त्याच्या किंमतीतला किती भाग यानी /यांच्या घरच्यानी भरलेला आहे, ते त्याना आधी इथे जाहीर करु दे आणि मग असले हे वांझोटे लेख ते खुशालपणे लिहू देत!!

रोज दोनदा जेवल्याबद्दल सरकार आपल्याकडून कर वसूल करत नाही, हे नशीब समजा.
हे वाक्य म्हणजे डॉलरलंपट वृत्ती !!! .. बाकी काही नाही..

रोज दोनदा जेवल्याबद्दल सरकार आपल्याकडून कर वसूल करत नाही, हे नशीब समजा.
हे वाक्य म्हणजे डॉलरलंपट वृत्ती !!! .. बाकी काही नाही..
>> जामोप्या, तुम्हाला जर समोरचा माणूस भारतातच राहाणारा आहे, की एनआरआय, हे माहीत नसेल तोवर उगाच आपल्या बेअकलेचे प्रदर्शन करू नका. जो माणूस भारतात राहून रुपये मिळवण्यासाठी कष्ट करत असेल त्याची कसली आलीय डॉलरलंपट वृत्ती? मी माझे शिक्षण भारतातच घेतले असल्याने पहिल्या तीन ओळी मला लागू पडत नाहीत. फक्त त्यातील वांझोटे लेख हा शब्द तुमच्या मूर्खपणाचे द्योतक आहेत. कुणाच्या विचारांना वांझोटे म्हणण्याचा तुम्हाला काय अधिकार्? मग स्वतःचे विचारच तपासून घ्या.
>> भारतात नंदनवन फुललंय आणि टीका करणार्‍यांना वेड लागलंय अशा थाटात तुम्ही बोलताय. इथे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे जिणे हराम झाले आहे. रोज सरकारच्या नाकर्तेपणाची आणि बेफिकीरीची लक्तरे वेशीवर टांगली जाताहेत. ते दिसत नाही का? भारतात राहणार्‍या ज्यांना महागाईचे आणि भ्रष्टाचाराचे चटके बसताहेत त्यापैकी मी आहे. तेव्हा केवळ कुणाच्या तरी प्रतिक्रियेची कुचेष्टा करायची म्हणून उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हे करू नका.

उगीचच सरकारला नावे ठेवायची म्हणुन ठेउ नयेत.
>> आर्क, तुमचं म्हणणं खरंय. भारतात रामराज्य नांदत असताना सरकारचा काय दोष? जनताच मूर्ख. नाही का?

<<भारतात जे शिक्षण घेऊन हे साहेब अमेरिकेत गेलेत, त्याच्या किंमतीतला किती भाग यानी /यांच्या घरच्यानी भरलेला आहे,>>

माझे पालन पोषण शिक्षण माझ्या आईवडीलांनी केले, मी अमेरिकेत यावे ही माझ्या वडीलांची इच्छा. त्यासाठी तिकीटाचा खर्च, तयारी हे सर्व मी माझ्या पगारातून केले. भक्कम पगार होता टाटा मधे मला. आपण शिकावे, कष्ट करावे, नि पैसा भरपूर मिळवावा हे या जगात तेंव्हा पासून महत्वाचे होते. इंजिनियरिंगला मला सतत स्कॉलरशिप होती. मग माझे आईवडील इथे आले, त्यांचा सर्व खर्च, जाण्या येण्याचा, इथे रहाण्याचा, आम्ही भावंडांनी मिळून केला. हिशेब ठेवला नाही, फक्त सगळ्यांना समाधान मिळावे हीच अपेक्षा, नि ती सुदैवाने पूर्ण झाली.
घरच्या घरात कुणि किती खर्च केला ते मोजत नाही आम्ही.
सामाजिक जबाबदारी: हंSS! त्याबद्दल लिहीले की म्हणाल मी भारतविरोधी आहे!! पण कॉलेज संपल्यावर माझ्या कॉलेजात दीड वर्षे मास्तरकी केली, नवीन विषय, मास्टर्'स डिग्रीचे अभ्यासक्रम सुरु करण्यात हातभार लावला. सर्व कर व इन्कम टॅक्स अधिकार्‍यांना हवी असलेली लाच पूर्णपणे भरली.आता लाच ही भारतात द्यावीच लागते, तर उगाच रडा कशाला!

<<स्वतःच्या नातलगांना बिनदिक्कत कर्जवाटप करून बँका, पतसंस्था गोत्यात आणायच्या, ठेवीदारांच्या तोंडाला पाने पुसायची, कंपन्या बुडवून शेअर होल्डरना हात चोळत बसायला लावायचे हे सर्रास चालते.>>

अहो, इथे बँकिंग असेच करतात. १९८० च्या दश्कात, बुशचा भाऊ, मॅकेन अश्या मातब्बर व्यक्तींनी बँका बुडवल्याच होत्या!!त्याशिवाय का निवडणूका लढायला पैसे जमा होतात! त्याच्या मालकीची किती घरे आहेत हे हि मॅकेनला माहित नाव्हते!

<<कधी तरी CBI नावाची संस्था या लोकांवर धाडी टाकल्याचे नाटक (आम्ही पण कामे करतो) करत असते... पण असल्या धाडींचे पुढे काय होते?>>

याचा एक गमतीदार किस्सा मी मागे लिहीला होता. आमचा एक मित्र, ठक्कर. अत्यंत कष्टाळू, उद्योगी. एका लहान चष्मे दुरुस्त करण्याच्या धंद्यापासून वीस वर्षात त्याने एक फारमसी, एक इलेक्ट्रोनिक्स चे दुकान इ. अनेक उद्योगधंदे वाढवले. मी १९८९ मधे भारतात जाण्याच्या एक आठवडा मला कळले की त्याच्या घरावर सिबिआयची धाड पडली. मी भारतात गेल्यावर त्याला भेटून गंभीरपणे म्हंटले 'वाईट वातले तुझ्यावर धाद पडली. सगळे ठीक आहे ना!' तेंव्हा तो हसून म्हणाला, अरे मीच ती धाड घडवून आणली! म्हणजे आता गावात लोकांना नि इतर व्यापार्‍यांना कळले की मी खूप श्रीमंत आहे. माझे क्रेडिट वाधले. म्हणजे मग मला धंद्यासाठी ते कर्ज देतील. मी त्याला म्हंटले अरे कर्ज पाहिजे तर बँकेकडून का घेत नाहीस? तर तो माझ्या कडे एक केविलवाणी नजर टाकून (छ्या:, काय हा बावळट घाटी!) म्हणाला - अरे बँकेकडून कर्ज काढायचे तर किती कागदपत्रे लागतात, नि ती तर मी ठेवतच नाही! खरी माहिती त्यांना सांगायची? त्यापेक्षा आमचे आपआपसात ठीक चालते.

खूपच गहन चर्चा चालू आहे पण उपाय एकच...

देश कोणताही असूदे... सरकार कोणतेही असू दे... सिस्टीम बदलली पाहिजे... आणि ते एकाचे काम नाही सगळ्यांचेच काम आहे...

लाच देऊ नका आणि लाच घेऊ नका!

इथे मी पूर्वी लिहिलेले मागे घेण्यात आले आहे. कुणितरी लिहीले की त्यांना धंदा चालू ठेवायला बरीच लाचलुचपत द्यावी लागते, नाहीतर धंदा करणे कठीण होते. तेंव्हा दुसर्‍या कुणि लिहीले लाच देऊ नका, घेऊ नका. म्हणून मी म्हंटले अहो मग यांचा धंदा कसा चालणार? तर त्याचा गैरसमज झाला की मी ती पहिली व्यक्ति लाच घेते असे म्हंटले. असे कसे म्हणीन मी?

मला स्वतःला लाच कशी द्यायची ते कळत नाही. भारतात, माझ्या वतीने दुसरे कुणितरी लाच देऊन माझे काम करून देतात. मी एकटा गेलो, मुंबई दिल्ली विमानाचे तिकीट मागायला तर मला म्हणाले तुमचे सामान जास्त आहे, त्याचे डॉलरमधे २०० डॉ. पडतील, व तुमचा नंबर वेटिंग लिस्ट मधे ९२ वा आहे. मला सुचवण्यात आले की तिथे असणार्‍या एका बाईला २०० रु. द्या. पण ते द्यायचे कसे? तिच्यासमोर जाऊन म्हणायचे, की ही घ्या लाच नि माझे काम करा? तेंव्हा आमचे हरहुन्नरी मेव्हणे पुढे आले नि एका तासाने मी कुठलाहि सरचार्ज न भरता विमानात बसलो होतो.

माझ्या एका मित्राला अमेरिकेत येण्यापूर्वी इन्कम टॅक्स clearance हवा होता. तो टॅक्सच्या कचेरीत गेला नि दारातूनच ओरडून विचारले 'अहो इथे १००० रु. लाच दिली की ते सर्टिफिकेट लगेच मिळते ना? ते कुणाला द्यायची ती लाच? हे हजार रू. आणले आहेत मी, कॅश.' फारसे काही झाले नाही जरा वेळाने त्याचे हजार रु. घेऊन त्याला सर्टिफिकेट मिळाले.

खुद्द मला जेंव्हा तसे सर्टिफ्केट हवे होते तेंव्हा मला सांगण्यात आले की तू एक वकील कर. मग मी केला. नंतर तो वकील म्हणाला २०० रु. लाच द्यावी लागेल, मी ती देतो, नि फीत वळति करून घेतो. माझ्या जवळ पैसे होतेच. मी म्हंटले करून टाका! हाकानाका. त्यानंतर पुनः भारतात परत जाईस्तव॑र चार वर्षे लाच न देता, सोशल सेक्युरिटि,ड्राइव्हिंग लायसेन्स, नोकरी, अनेक एक्स्पेन्स रिपोर्ट्स कसे खडाखड एकेका दिवसात!

का नाही तिडीक येणार भारतातल्या लाचलुचपतीची!

लाच देऊ नका आणि लाच घेऊ नका!
---- राजू तुम्ही अगदी माझ्या मनातले लिहीले, मी भारतात असतांना यावर अगदी काटेकोर पणे अंमल करायचो... पदोपदी त्रास होतो पण तयारी ठेवायची.

.

झक्कीसाहेब - ते टायपलेले बदलले नाही, तुमचा बदल करायचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे. तुमच्या विचारात झालेला बदल सर्वांच्या पडद्यावर दिसू द्या... Happy

'आयटी' लाचलुचपतीला आळा अशक्य!

(मटा मधुन साभार)
'इन्फॉमेर्शन टेक्नॉलाजी'च्या ('आयटी') अद्ययावतीकरणामुळे भ्रष्टाचारात 'मुरलेल्या' सरकारी नोकरशाहीच्या लाच वसूल करण्याच्या 'प्रथे'वर काही परिणाम होतो का? दिल्ली सरकारसारखा एखादा सन्माननीय अपवाद वगळता या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर 'नाही', असे आहे!

एकीकडे केंद सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेल्या विविध खात्यांचे कम्प्युटरायझेशन करून, अद्ययावत सॉफ्टवेअर वापरात आणून त्यांचे 'मॉडर्नायझेशन' करीत आहे, तर दुसरीकडे लाचेचे दर मात्र महागाईबरोबर वाढतच आहेत, असा निष्कर्ष अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने ('आयआयएम') पाहणीतून काढला आहे.

देशातील १२ राज्यांच्या सरकारांनी आपल्या विविध खात्यांचे संगणकीकरण पूर्ण केल्यानंतर तेथे जमिनीच्या नोंदणीची अधिकृत कागदपत्रे मिळविण्यासाठी लोकांना द्यावी लागणारी लाच फक्त १६ रुपयांनी कमी होऊन ती सरासरी ८९ रु.वर आली असल्याचा निष्कर्ष 'आयआयएम'च्या या 'स्टडी'त काढण्यात आला आहे. उदाहरणार्थ, मध्य प्रदेशात 'लॅण्ड रेकॉर्ड' कागदपत्रे मिळविणाऱ्यांपैकी ९० टक्के लोकांना लाच द्यावीच लागलेली आहे. ओरिसात मात्र 'आयटी इम्प्लिमेंटेशन'नंतर उलट सरकारी कर्मचाऱ्यांच्या लाचखोरीचे हे प्रमाण २० टक्क्यांवरुन ५० टक्क्यांपर्यंत वाढले आहे!

'आयटी अपग्रेडेशन'च्या प्रक्रियेत कॅमेरा, स्कॅनर, प्रिंटर हे 'आयटी हार्डवेअर्स' आणून बसविले जातात आणि त्यांच्या वापरामुळे हातांनी करावयाचे काम वाचते आणि काम पूर्ण होण्यास लागणारा वेळही कमी होतो, हे मात्र खरे. पण दलाल मात्र कम्प्युटरायझेननंतरही लाच वसूल करण्याचे काम पूवीर्च्याच 'कार्यक्षमते'ने करीत आहेत. विशेषत: स्थावर मालमत्तांच्या व्यवहारांमध्ये हे व्यवस्थित चालू आहे. दर 'प्रॉपटीर् ट्रॅन्झॅक्शन'ला संबंधितांना द्यावे लागणारे सरासरी 'कमिशन' सुमारे २,५५० रु. इतके पडते.

व्वा. पण 'आयटी इम्प्लिमेंटेशन'नंतर रेल्वेची तिकीटे मिळणे आता सोपे झाले आहे म्हणे. चार वर्षापूर्वी मी ऑन लाईन तिकीट बुक केले, संध्याकाळी सवडीने रेल्वेच्या ऑफिसात जाऊन तिकीट घेतले, लाईन नाही, काही नाही. उलट तो म्हणाला तुम्हाला सिनियर सिटिझन चा डिस्काउंट आहे. ते पैसे तुम्हीच ठेवा म्हंटले तर तो नको म्हणाला.

नाहीतर पूर्वी रेलवेची तिकीटे काढायला देखील लाच द्यावी लागे. स्लीपर ऐवजी साधे तिकीट मिळे. मग गाडी आल्यावर तिथल्या कंडकटरला लाच देऊन स्लीपर मिळे. सुदैवाने माझे मित्र त्या बाबतीत हुषार होते. मला कधीच जमले नाही.

<<'आयटी इम्प्लिमेंटेशन'नंतर उलट सरकारी कर्मचाऱ्यांच्या लाचखोरीचे हे प्रमाण २० टक्क्यांवरुन ५० टक्क्यांपर्यंत वाढले आहे! >>

धन्य धन्य ते 'आयटी इम्प्लिमेंटेशन'. अर्थातच. आता ते कर्मचारी पूर्वी सारखे नुसते 'बाबू' राहिले नाहीत. काँप्युटर चालवतात, आहात कुठे?

याला लाच म्हणू नका. अमेरिकेसारखे सरचार्ज म्हणा, नि सगळ्यांना सारखाच दर लावा.

का नाही तिडीक येणार भारतातल्या लाचलुचपतीची! >>

पुन्हा एकदा... तुमचा अनुभव प्रातिनिधिक नसावा...

मी पहिल्यांदा रेशनिग ऑफिसमध्ये गेलो... पांढरया रंगाचं रेशनिग कार्ड घ्यायला... कारण नवी मुंबईत घर घेतलं होतं.. आणि बहुतेक ठिकाणी रेशनिग कार्ड हे राहणाचा पुरावा म्हणून वापरतात (जरी रेशनिग कार्डवर लिहिलं असेल की हा पुरावा म्हणून वापरू नका.) तर मला हे कार्ड घेण्यासाठी मला आठ खेपा माराव्या लागल्या... ते पण प्रत्येक वेळी सकाळी आठ वाजता लाईनीत उंभ राहून... चहावाला/ शिपाई बोलत होता... १०० द्या, लगेच काम करुन देतो... पण मी संयम सोडला नाही Wink मी त्या कामातला स्टेपस माहिती करुन घेतल्यात... आणि एक चेकलिस्ट बनवली... नंतर मी दोनदा त्याच रेशनिग ऑफिसमध्ये गेलो... एकदा बायकोचं नाव आणि नंतर मुलाच नाव माझ्या रेशनिग कार्डमध्ये जोडण्यासाठी... आणि दोन्ही वेळेला माझे एका खेपेत काम झाले...

असेच अनुभव मला पासपोर्ट रिन्व्हू, गाडी रॅजिस्ट्रर करताना आले...

तात्पर्य - तुम्हाला काय करायच/ कोणकोणत्या कांऊटरवर जायचं याची माहिती, तुमची नियमात बसणारे कागदपत्रे, थोडी हुशारी आणि संयम याची गरज असते नाहीतर आहे तुमचा खिसा खाली करणारे...

<<<जामोप्या, तुम्हाला जर समोरचा माणूस भारतातच राहाणारा आहे, की एनआरआय, हे माहीत नसेल तोवर उगाच आपल्या बेअकलेचे प्रदर्शन करू नका. जो माणूस भारतात राहून रुपये मिळवण्यासाठी कष्ट करत असेल त्याची कसली आलीय डॉलरलंपट वृत्ती?>>>

जामोप्या,

अहो डॉलरलंपट म्हणजे काय? ह्या शब्दाची व्याख्या जरा समजावून सांगाल का? त्याचप्रमाणे ह्या पदवी करता कोण पात्र होत? हा शब्द कधी व कुणाला लागू होतो? भारताबाहेर राहणार्‍यांना का भारतात राहणार्‍याना ? नाही म्हणजे..डॉलर मिळवण्याकरता पण कष्टच करावे लागतात. माझी एक खूप कष्टाळू आणि हुशार मैत्रिण पुण्यात राहते आणी paycheck अमेरिकन डॉलर्स मधे मिळवते. ती या पदवीस पात्र आहे का?

वांझोटा लेख हा टोला वैभवला आहे का?

Pages