इट्स गॉट टु गो

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

घराबाहेर पाऊल टाकलं नि एक बस समोरून निघून गेली. जरा अर्धं मिनिट आधी निघायला काय होतं असं मनात म्हणत मी परत घरात शिरले. बाहेर थंडीत १२ मिनिटं उभं राहण्यापेक्षा उबेत घरात थांबलेलं बरं. आत आलेच आहे तर म्हणून मग तीन जिने चढून मघाशी विसरलेली टोपी घेतली. ही नवी टोपी एकदम मस्त आहे. कान झाकणारी. शिवाय तीन वेण्या, दोन बाजूला दोन आणि शेंडीसारखी आणखी एक. मेड इन नेपाळ! पुन्हा बस जायला नको म्हणून मग लगेच बाहेर पडले. बसस्टॉपवर एक आजी आधीपासून उभ्या होत्या. त्यांना गुड मॉर्निंग घालून मी बसच्या वाटेकडे डोळे लावले. नकळत दोन्ही हातांनी कानावरून चाललेल्या टोपीच्या त्या दोन वेण्या ओढल्या आणि आजी बोलत्या झाल्या.
"मस्त टोपी आहे ना!"
"अं... हो. कान झाकते ना, त्यामुळे मला फार आवडली." मी तोंडभर हसून उत्तरले. या आधी कोणी बसस्टॉपवर असं गुड मॉर्निंग सोडून बोललं नव्हतं. इंग्रज लोकांशी, त्यातून ज्येष्ठांशी बोलायचं म्हणजे मला अजुनी जरा गडबडायला होतं. कुठे काय चुकेल अशी काळजी वाटत राहते.
"दक्षिण अमेरिकेहून आणलीस का? इंकांच्याच असतात ना असल्या टोप्या?"
"इंका!?" मला मी ऐकले ते बरोबर का चूक कळेना. "काय म्हणालात?"
"असल्या कान झाकणार्‍या टोप्या इंकांच्या. तिकडे अँडीज पर्वतांत खूप वारं, थंडी त्यामुळे त्यांनी अश्या कान झाकणार्‍या टोप्या तयार केल्या. त्या आता जगभर गेल्या आहेत. तू कुठे घेतलीस ही टोपी?"
आजींच्या सामान्य ज्ञानावर थक्क होत, मान डोलवत, मी म्हणाले, "इथेच, बाथमध्ये, गावात..."
"सगळीकडे सगळं मिळतं हल्ली"
"हो ना"
खरंतर इथे संभाषण थांबायला हरकत नव्हती. बसची वेळ झालीच होती पण ती येत नव्हती. मी घड्याळात पहातेय हे पाहून आजींनी १२ मिनिटांनी येणारी बस आपण नसतो तेव्हाच फक्त वेळेवर येते हे माझेच आवडते मत व्यक्त केले. मी पुन्हा हो-ना-ले. पण आजी पुढे म्हणाल्या, "मी इथे वर टेकडीवर राहते, तू?"
थेट प्रश्न! मी गडबडून काय सांगावे, का सांगावे अशा विचारात, खरं उत्तर देती झाले, "इथेच, या रस्त्यावर, इथून चौथ्या घरात."
"पण तू आहेस कुठली?"
"आणखी कुठली? भारतातली." आता आजी चौकस आहेत हे मी मान्य करून टाकले.
"पण भारतात कुठे?"
"अं... पश्चिम भारत. महाराष्ट्र. हे म्हणजे भारतातलं एक राज्य आहे. मुंबई, त्याची राजधानी." मी आपली नेहमीची टेप टाकली. "माझे आई बाबा मुंबईच्या दक्षिणेला साधारण ३००किमीवर राहतात."
"अच्छा! मी राजस्थानला गेले आहे." टिपिकल. ब्रिटिश लोक भारत म्हटलं की राजस्थानला जातात.
तितक्यात बस येताना दिसू लागली. बसला हात हलवत मी म्हटलं, "वा वा. सुंदर आहे राजस्थान. मीही जाईन म्हणते कधीतरी."

"चला" बसमध्ये चढता चढता मी म्हणाले.
पण आजी चलत नव्हत्या, "कुठे बसूया?"
मी पुन्हा थक्क. किती गप्पा मारणार आहेत या! समोरासमोरच्या दोन बाकांवर आम्ही बसलो.
"मग कोणती भाषा बोलतेस तू घरी?"
"मराठी. महाराष्ट्रातले लोक मराठी बोलतात. राजस्थानातले राजस्थानी." ऑफिसच्या पार्ट्यांमुळे मला या संवादाचाही चांगलाच सराव होता.
"मग हिंदीचं काय?"
"उत्तरप्रदेश नावाचं आणखी एक राज्य आहे. तिथले, झालंच तर दिल्लीचे लोक हिंदी बोलतात."
"... आणि बॉलिवुड ...?"
"हो, बॉलिवुडचे सिनेमे मुंबईत तयार होतात सहसा. पण ते हिंदीत असतात."
"पण मग वेगवेगळ्या राज्यांतले लोक कोणत्या भाषेत बोलतात?"
"इंग्लिश! म्हणजे तसे वेगवेगळ्या भाषांत बोलू शकतात. पण लसावि इंग्लिश."
"मग हिंदी? ती राष्ट्रभाषा आहे ना?"
"भारताची राजधानी दिल्लीत आहे. म्हणून तिथली भाषा राज्यकारभाराला वापरतात. पण तश्या सगळ्या मुख्य राज्यभाषा चालतात. लोकसभेतले खासदार त्यांच्या मातृभाषेत बोलू शकतात. आणि दुभाषेही असतात."
"तुला कोणत्या भाषा येतात?"
आजी असे थेट माझ्याविषयीचे प्रश्न विचारू लागल्या की मी थोडी चकित होत होते खरी. पण मलाही आता गप्पांमध्ये मजा येऊ लागली होती. हिंदी काही भारताची एकमेव भाषा नाही हे माझं लाडकं मत मांडायची संधी मिळाल्याचा परिणाम.
"मराठी, इंग्लिश, हिंदी. झालंच तर कन्नडा थोडी नि थोडीफार संस्कृत."
खरं म्हणजे अशी यादी सांगितली की सगळे ऐकणारे बर्‍यापैकी कौतुक करतात. पण आजींचा पुढचा प्रश्न तयार होता.
"पण मग तुझं शिक्षण कोणत्या भाषेत झालं?"
"मराठी ..."
"मग इंग्लिश कशी काय शिकलीस तू?"
"पाचव्या इयत्तेपासून आम्ही इंग्लिश तिसरी भाषा म्हणून शिकलो. आता बहुतेक पहिल्या इयत्तेपासूनच शिकवतात."
"पण मग तुला इथे नोकरी कशी मिळाली?"
कशी म्हणजे काय!? हा काय प्रश्न आहे! मला थोडा रागच आला.
"मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. इथे एका चिपा बनवणार्‍या कंपनीत काम करते. तसलं काम मी गेली ८ वर्षे करते आहे. या आधी केंब्रिजमध्ये ..."
"पण तेही मराठीत शिकलीस तू?" आजींना मराठीतला ठ म्हणता येतो हे पाहून मी पुन्हा चकित.
"नाही हो! उच्चशिक्षण इंग्लिशमध्येच होतं. सोळाव्या वर्षांनंतरचं सगळं शिक्षण इंग्लिशमध्ये. तोवर इंग्लिश यायला लागलेली असते ना."
"पण त्या आधीचं, गणित, विज्ञान वगैरे?" आजींचे मुद्द्याला हात घालणारे प्रश्न येत होते.
"ते आधी मराठीतच शिकले. गणिताला काही फारशी भाषा लागत नाही. विज्ञानातल्या संज्ञांचे शब्द मात्र नव्याने शिकायला लागले. पण फार काही अवघड नव्हतं ते."
"पण मग आधीपासून इंग्लिशमध्ये शिकली असतीस तर सोपं गेलं असतं ना."
"अं ... काही शाळांत शिकवतात तसं. विज्ञान, गणित इंग्लिशमध्ये आणि बाकी विषय मराठीत. पण आमच्या शाळेत सोय नव्हती. आणि एबीसीडी शिकून थेट इंग्लिशमध्ये एखादा विषयच शिकायचा तेही अवघडच जाणार थोडं."
"लिपी कोणती वापरतात मराठीसाठी?" विषयाचा रूळ बदलण्याचा आजींचा वेग भारी होता.
"देवनागरी. मूळ संस्कृतची लिपी. जशी इंग्लिशची रोमन."
"हम्म. म्हणजे ही अगदी अख्खी भाषा आहे म्हणायची."
"हो मग!"
"किती दिवस टिकणार तशी..."
"म्हणजे!? लाखो लोक बोलतात ही भाषा. साहित्यनिर्मिती होते. न टिकायला काय!"
"पण उपयोग काय?"
"आँ!" मी अवाक्.

"आता बघ, मी ट्युनिशियाला होते काही वर्षं. तर तिथे आमचे शेजारी बर्बर भाषा बोलत."
"ओह! हो, माहितेय मला. पण बर्बर भाषेला लिपी नाहीये ना? फ्रेंच किंवा अरबी भाषेत लिहायचे व्यवहार करतात ना ते?" चला, बर्बर घरमैत्रिणीच्या कृपेने आजींसमोर आपण काही अगदीच 'हे' नाही हे दाखवता आलं.
"तेच ना. तर ते त्यांच्या घरात कायम बर्बर भाषेत बोलणार. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत मुलांना केवळ तीच एक भाषा येते. आणि शाळेत गेल्यावर अचानक सगळे अरबी भाषेत. हाल होतात गं मुलांचे खूप. मी म्हणायची त्यांच्या आयांना, कि घरात थोडं अरबी बोला. मुलांना सवय करा. पण नाही! भाषा हरवून जाईल म्हणे!"
"पण खरंच आहे ना ते", माझ्या डोळ्यासमोर मुलांना गणपतीची आरती शिकवणारे अनिवासी मराठी आईबाबा, "एक भाषा म्हणजे एक संस्कृती असते म्हणतात. जपायला नको का ती? लिपी नसली तरी त्यातली गाणी, वाक्प्रचार ..."
"पण काय उपयोग!" आजींनी बस थांबवण्याचं बटण दाबलं. "एक दिवस जाणारच आहे ना ते सगळं. दरवर्षी सहाशे भाषा गतप्राण होतात म्हणे. त्या कोवळ्या मुलांना द्यायचं का हे मरू घातलेलं ओझ? का उगाच?"
"..." मी काही प्रत्युत्तर द्यायच्या आत त्या उठल्या.
"इतिहास, संस्कृती सगळं वाहत्या नदीसारखं आहे." खिडकीपलिकडच्या न दिसणार्‍या नदीकडे हात करत त्या म्हणाल्या. "थांबून उपयोग नाही."
बस थांबली आणि त्या भराभर उतरून गेल्या.

---
या आजी भेटून दोनेक आठवडे झाले. माझी ती इंका टोपी बघितली की त्यांची आठवण होते. एकदाच भेटल्या त्या. पण डोक्यात किडा सोडून गेल्या. बसमधल्या पाच दहा मिनिटातल्या गप्पा. त्यांच्या विषय बदलण्याच्या वेगावरून, हा त्यांचा आवडता मुद्दा असावा असं मला फार वाटलं. बस थांबायच्या आत चर्चेचा हवा तसा शेवट व्हावा हा त्यांचा हट्टही उघडच होता. पण तरी त्यांच्या किंचित थरथरत्या आवाजातलं, "आफ्टर ऑल इट्स गॉट टु गो" विसरण्यासारखं नाही.

प्रकार: 

छान लिहिलंस मृदु. लिहीत रहा.

छानच लीहीलयस म्रुदू.

माझा एक मित्र आहे ट्युनीशीयन त्याला आता विचारल "तूला येते का बर्बर"
"नाही"
" तूझ्या वडिलांना?"
"नाही"
"आजोबांना?"
" नाही. बर्बर जून्या लोकांची भाषा आहे (लॅटीन सारखी). फक्त बोली भाषा. अल्जेरीया आणि मोरक्को मध्ये थोड्या प्रमाणावर बोलतात.पण ट्युनीशीया मध्ये जवळ जवळ नाहीच"

खरच विचार करण्यासारख आहे. आपली संस्क्रुत आणि आपली मराठी. खूप जपायला हवीये Sad

मृदु, तुझ्या डोक्यातला किडा आता आमच्या डोक्यात सोडलास ना... छान लिहिलं आहेस. शिक्षण इंग्रजीतून झालं तरी घरच्या घरी मुलांना मराठी लिहा - वाचायला शिकवणं एवढं अवघड नाही. दरवर्षीच्या त्या ६०० भाषांमध्ये आपली मराठी कधीच येऊ नये हीच इच्छा.

फारच सुन्दर लिहुले आहे. प्रसन्ग अगदी दोल्यासमोर उभा राहतो आहे. फ्लो चान्गला जमला.
हे असेच चित्र आता आपल्याकदेहि बघायला मीलते. १८ - २५ या वयातिल किति मुल आवर्जुन मराथि बोलतात? वाचतात?

आजींना नक्की काय म्हणायचे होते? आपण मराठी टिकवायचा प्रयत्न नाही करायचा? मग जगभर फक्त ईंग्रजीच बोलली गेली पाहीजे का? अजूनही असे कितीतरी देश आहेत जिथे सर्व शिक्षण, कारभार, सरकार, सर्व सर्व काही फक्त त्यांच्या स्थानिक भाषेतुनच होतं.
मराठीचे म्हणाल तर ... मला त्यामध्ये बरीच प्रगती दिसते... मराठी वाहिन्या आल्या आहेत. मराठी चित्रपटांचाही दर्जा आणि प्रेक्षक वाढले आहेत. हिंदी क्षेत्रात सुद्धा पुरस्कार देउन त्याचे अस्तित्व मान्य केले आहे. मराठी ऑनलाईन वृत्तपत्र, फॉन्टस, ब्लॉग्स आहेत.

आणि भाषेचं ओझ म्हणजे काय?

लेख छान लिहीला आहे आणि विचार करण्याजोगा आहे, पण मराठी विषयी किंवा कोणत्याही भाषेविषयी अश्या प्रकारचा आजींचा निराशाजनक दृष्टिकोन खटकला.

ईंग्रजी भाषेची संस्कृती काय आहे आणि ती कितपत जपली जाते? त्यांच्या भाषेत शिव्या घाणरडे शब्द किती सहजगत्या बोलल्या जातात. फक्त पुरुष नाही तर बायकासुद्धा. टिव्ही, चित्रपटामध्येतर आहेच, पण कामावर सुद्धा सहकर्मचारी असे बोलताना मी बर्याच वेळा ऐकतो.

जी लोकं आपला देश सोडून इतर ठिकाणी राहतात त्यांच्यासाठी. आपण फक्त आपल्याच नाही तर ईतर भाषांचा ही मान केला पाहीजे. मग सर्व भाषा टिकतील. मुलांसमोर जर दोन्ही भाषांना समान मान दिला गेला, दोन्ही संस्कृतीला समान मान दिला गेला तर तीसुद्धा आपली संस्कृती जपतील. पण आपण फक्त आपलीच भाषा आणि देश महान असे दाखवले तर त्याना ते पटणार नाही.

आजींना नक्की काय म्हणायचे होते हे मलाही नक्की माहित नाही. त्यांच्या ट्युनिशियाच्या उदाहरणातून असे वाटले की एखादी भाषा कारभारासाठी, शिक्षणासाठी वापरात नसेल तर तिला पुढे चालवण्यात फारसा अर्थ नाही. अल्जीरिया, ट्युनिशिया, मोरोक्को या देशात इस्लामी कायदा आहे. त्यामुळे अरबी ही (देवाची, प्रेषिताची इइ) एकमेव महत्त्वाची भाषा आहे. फ्रेंचांच्या आक्रमणामुळे, किंवा युरोपाच्या आकर्षणामुळे फ्रेंच शिकवली नि शिकली जाते. आणि जागतिकीकरणाच्या लेबलाखाली इंग्रजीही. तर यात बर्बरसारख्या बोलीचे स्थान कुठे? तर केवळ घरात. तेही आता कमी होत चाललेच आहे. माझ्या बर्बर मैत्रिणीला विचारल्यास तिची घरात बोलायची भाषा बर्बर, फ्रेंच आणि अरबीचे मिश्रण आहे. जर सातव्या वर्षानंतर शिक्षणात बर्बरचे स्थान कुठेच नसेल तर ती का शिकावी. पुढच्या आयुष्यात उपयुक्त भाषा शिकली तर आणखी चांगले नाही का? असा आजींचा मुद्दा होता.

मला त्यातून 'पहिलीपासून इंग्रजी' आठवले आणि मग बर्बर जात्यात तर मराठी सुपात आहे की काय असे वाटून अस्वस्थता आली.

मी दहावीपर्यंत मराठीतून शिकले. पण भारतात माझ्याबरोबर काम करणार्‍यांत (म्हणजे ५०-१०० लोकांत) स्थानिक भाषीय माध्यमातून शिकलेला केवळ एक माणूस मला भेटला आहे. मी पहिलीत गेल्याला पंचविसेक वर्षे झाली. अजून पंचवीस वर्षांनी काय चित्र असेल? खेडोपाडी इंग्रजी माध्यमाच्या शाळा? मग मराठी किंबहुना कानडी, तमिळ अशा सगळ्याच भारतीय भाषांचे बोलीभाषेत रूपांतर व्हायला किती काळ लागेल? आणि मग बर्बरच्या माळेत जायला किती? अशा काळजीत पाडणार्‍या विचारांनी गर्दी केली, म्हणून मग डोक्यातला किडा इतरांनाही द्यावा या हेतूने हे सगळे संभाषण इथे लिहिले. या आशेने की कोणी असे होणार नाही असे म्हणेल, थोडी कारणे देईल, सिद्ध करून दाखवेल.

तसं बघितलं तर मालवणी मा़झी मातृभाषा म्हणायला हरकत नाही, पण आधीच्या पिढीपासून मुंबईत राहिल्याने तिच्याशी नाळ जुळली नाही. आता तर ती जेमेतेम समजते एवढेच.
कामाच्या निमित्ताने, अरबी, स्वाहीली, फ्रेंच थोडेफार शिकलो. पण आता काही कारण उरले नाही.
मराठीशी संबंध मात्र केवळ मायबोलीमुळे टिकुन राहिला.
तो धागा मात्र कधी सोडणार नाही.

उम्मीदसे दुनिया कायम है |
अजून बरेच देश आहेत जिथे कारभारासाठी आणि शिक्षणासाठी स्थानिक भाषा वापरली जाते... पण दुर्दैवानी भारतात नाही.. निदान उच्च शिक्षण नाहीच. आपल्यालाच आपली भाषा बोलायला ते सुद्धा मुंबईत असून लाज वाटणं (कुठेतरी वाचलं होतं) हा मुर्खपणा आहे.
पण पुढे काय होणार हे कसं कोण सिद्ध करेल? आपल्याला मराठी भाषेची गोडी आहे आणि आपण त्याचा आनंद लुटायचा... पुढच्या पिढीवर लादायचं नाही ... त्याना पण आपसूक गोडी लागून द्यायची. कोणतीही गोष्ट जबरदस्तीने होत नाही.

विषयांची निवड आणि वैचारिक संवेदना आवडली.

मृदू, छान लिहीले आहे.

<<आपली संस्क्रुत आणि आपली मराठी. खूप जपायला हवीये >> बर्‍याच लोकांना असे वाटत नाही. त्याचे कारण ते सांगतात, की मराठीत नाहीतरी इतर भाषांमधून अनेक शब्द आलेलेच आहेत, तर आणखी आले तर कुठे बिघडले? म्हणून मग मराठीतून बोलताना मुद्दाम इंग्रजी शब्द वापरायचे, मराठी शब्द असूनसुद्धा.

<<<"मराठीचे म्हणाल तर ... मला त्यामध्ये बरीच प्रगती दिसते... मराठी वाहिन्या आल्या आहेत. मराठी चित्रपटांचाही दर्जा आणि प्रेक्षक वाढले आहेत. हिंदी क्षेत्रात सुद्धा पुरस्कार देउन त्याचे अस्तित्व मान्य केले आहे. मराठी ऑनलाईन वृत्तपत्र, फॉन्टस, ब्लॉग्स आहेत.">>

डोंबल!! त्यातहि इंग्रजी किती आहे, मराठीत शब्द असूनहि? एका चित्रपटात एक वकील म्हणतो 'पर्निशन' द्यावी! का रे बाबा? परवानगी नाही का म्हणता येणार? एक निवेदिका म्हणते 'डिसिजन करणे डिफिकल्ट' झाले आहे. निर्णय घेणं कटीण झाले आहे म्हंटले तर काय होते? एका चित्रपटातले मराठी गाणे ' नंबर फिफ्टि फोर, हाउस विथ द बँबू डोअर' अश्या १९६०' मधल्या गाण्याने सुरु होते! इथे मायबोलीवर किती लोक अट्टाहासाने इंग्रजी लिहीतात!

माझ्या ओळखीचे एक स्वतःला या बाबतीत जास्त माहिती आहे असे समजणारे गृहस्थ म्हणाले, की शिकलेले लोक बहुधा इंग्रजीच बोलतात, फक्त अशिक्षित, खेड्यातले लोक मराठी बोलतात. मी म्हंटले मग आता भारतात सुद्धा मराठी बोलायलाच नको. तर त्यांनी मला आश्वासन दिले की, "नाही नाही, we must speak in Marathi only".

आता ही चर्चा वैयक्तिक पातळीवर येणार!! कुणि तरी येऊन म्हणेल, की तुम्ही लोक भारतात असताना इंग्रजी बोलणे शहाणपणाचे समजत होता, आता अमेरिकेत जाऊन आम्हाला शहाणपणा शिकवताहात!! तर ते खरे आहे, त्यामुळे काय, बोलणेच खुंटले.
पण मी सांगितलेले खोटे नाही हा लहान मुद्दा ते विसरतात!!

मृदुला मला हे लिखाण आवडलं. Happy छान (लिहिता?) लिहितेस.

पण मला नाही वाटत की मराठी भाषा टिकणार नाही, मरेल... आपण आपल्या संस्कृतीविषयी आग्रही असायलाच हवं. काळानुसार बदल हे होतच रहाणार!

आपल्या भारतिय संस्कृतिमध्ये भाषा या पूर्वांपार जतन केलेल्या आहेत्...हां आता भाषेतले शाब्दिक बदल हे होतच रहाणार. आपली प्राचीन भाषा हि संस्कृत. ईंग्रजी भाषा ही खुप अलीकडची आहे.तरीही त्यात व्याकरणाचे आणि शाब्दिक बदल हे पुष्कळच झालेत की. आपण आताच्या काळात मोडी लिपी तर नाही वापरू शकत (कारण काळाप्रमाणे भाषेतील बदल )आणि भाषेतले हल्लीचे मुख्य बदल म्हणजे ईंग्रजाळलेली आपली दृष्टी.चीनी आणी जपानी लोक आपली भाषा जतन करण्यात जास्तच आग्रही असतात्.आता आपल्याकडे काही लोकांना ईंग्रजी बोलण्यात (झाडण्यास्):D उगाचच अभिमान वाटतो .असो .......जोपर्यंत महाराष्ट्रात मराठी माणूस आहे तोपर्यंत आपली मराठी टिकणार.ती चिरंतन टिको.

मृदुला, लेख मस्तच लिहिलायस.

पण आज्जीबाईंच मत आपल्याला नाही पटलं. त्याविषयी:
एक दिवस जाणारच आहे ना ते सगळं. दरवर्षी सहाशे भाषा गतप्राण होतात म्हणे.
>> दरवर्षी किती माणसं मृत होतात.. पण म्हणून उरलेली माणसं जगायचं सोडतात का? तसंच भाषेचही का नाही? तसं तर सगळच नश्वर आहे - अगदी इंग्रजी सुद्धा! मोठ्या मोठ्या (बलाढ्य) संस्कृती, राजघराणी जगभरात होऊन गेली - आज त्यांचं इतिहासात सोडून कुठेच काही शिल्लक नाही. हेच कुठल्याही देशाचं/राजवटीचं/भाषेच होऊ शकतं.
आणि कुठलीही भाषा कित्येक पिढ्यांचा इतिहास जतन करत असते.. हे अगदी माणूस बोलायला कसा लागला असेल इथंपासून सुरू होतं! भाषेनं प्रवाही असलच पाहिजे,सांस्कृतिक स्थित्यंतराबरोबर येणारे नवीन शब्द अंगिकारलेच पाहिजेत (जसं मराठीत फारसी, उर्दू वगैरे मधले शब्द आहेत).. त्यानी भाषा समृद्धच होईल..
आणि उद्या माझ्या मुलांना कुठला सांस्कृतिक वारसा मी द्यायचा? 'कडकडिला स्तंभ गडगडिले गगन' म्हटल्यावर त्या नरसिव्हाचं अन्यायाविरुद्धचं उग्र रूप त्यांच्याही मनात नको का साकारायला? त्यांनाच ते नको असेल तर ते नाकारतीलही - पण माझ्याकडे असून मी त्यांना समृद्ध करणारे अनुभव घेण्याची संधी मी त्यांना दिली नाही तर माझा करंटेपणा असेल तो.

आज्जीबाईंना ज्ञ, ळ, ट,थ त, द,ड ध - ह्या सगळ्याचा स्पष्ट उच्चार करून दाखवायला सांगायला हवा होतस.. सांगायचं होतस - की आमच्या कडे ह्यासाठी उच्चार आहेत, लिपी आहे आणि व्याकरणही आहे - जे तुमच्या इंग्रजीत नाहीत...

असो! दुसरी भाषा वापरता येते म्हणून पहिली सोडायची!! छ्या छ्या छ्या! प्रत्येक शिकलेल्या नवीन भाषेबरोबर मेंदूवर येणार्‍या असंख्य वळ्या, नवीन ज्ञान,नवीन अनुभूती सोडायची आपली तर बुवा तयारी नाही!

केवळ इंग्रजीच्या आक्रमणामुळे मराठी भाषा नष्ट होईल असे वाटत नाही. ह्यासाठी एक कारण असे देता येईल - मुघलांच्या राजवटीत फारसी भाषा राजभाषा होती. न्यायव्यवस्था, व्यापार, सरकारी कामकाज इ. सर्व फारसी भाषेतच चाले. पण त्याही काळात संस्क्रुत आणि मराठी भाषा टिकून राहील्या. त्यात काही परकीय शब्द शिरले पण भाषा नष्ट झाली नाही. आणि नंतर राजाश्रय मिळाल्यावर मराठी पुन्हा भरभराटीसही आली.
आता राजाश्रय मिळणे जरी कठीण वाटत असले तरी लोकाश्रय मिळण्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत.

" 'मराठी' चं कसं होणार??" बद्दल सर्वांनीच लिहीलं आहे. त्यामुळे मी नव्यानं काहीही लिहीत नाही.

(रच्याकः - आज्जींचा मुद्दा असेल बरोबर, पण तुलना चुकली माझ्याही मते.. )

एक मुद्दा मात्र नक्की आहे. वैयक्तिक मत म्हणा:-
जपानी भाषा शिकुन जपानमधे रहायला लागल्यापासुनच मराठी भाषेबद्दलचं प्रेम वाढु लागलं आणि मग थोडंफार ब्लॉगिंग चालु केलं. मग वाचन चालु केलं. मुद्दा असा आहे, की दुसर्‍या भाषा शिकुनही माणुस "आपल्या भाषेला कसं विसरु शकतो? कमी समजु शकतो?" हे मला कधीही समजणार नाही. ते प्रेम वाढायला नको का?

------------------------------------------------------

त्यामुळं 'इतर' गोष्टी:- लिहायची पद्धत वगैरे गोष्टींबद्दल बोलतो.
मस्त आहे पद्धत. Happy "इंका" टोपी वगैरे पासुन सुरुवात....
प्रवाह छान आहे संवादाचा. लिहीत रहा... Happy

बापरे, ठोकाच चुकत होता वाचता वाचता की वाहत्या नदीसारखं हे संभाषण कुठे जाऊन पोहोचणार आहे.
नदीसारखंच ते ही समुद्राला मिळूदे. मराठी टिकून राहूदे.
( असं म्हटलं तरी हा विषय डोक्यातून जात नाही ) मराठी जपायचं म्हणून मी मुलाशी अट्टहासाने मराठी बोलते. इथे अमेरिकेत त्याच्या वयाला आठ्वड्यातून एकदाच दीड तास शाळा असते. तेवढ्या वेळात कितीसं इंग्लिश कानावर पडणार ? त्याला शाळा आवडते पण बाई बोलतात ते समजत नाही. इतर अमेरिकन मुलं समजून उत्तरं देतात. मग मला वाईट वाटतं. समजत नाही की नक्की आपल्याला हवंय तरी काय ? इंग्लिश यायला हवं हे खरं पण आत्तापासून इंग्लिशच बोलायला लागलं तर मराठी पार हरवून जाईल. पण मग आत्ता इंग्लिश येत नाही म्हणून त्याच्या हातातून हे छान क्षण निसटत आहेत त्याचं काय Sad

मृदुला , फारच छान लेख .हा संवाद आजी आणि तुझ्यातला न रहाता तो अनेक मायबोलीकरांचा
होण ,हे या लेखाच वैशिष्ट्य .मला आजिंचा मुद्दा पटला नाही .मराठी भाषा ,मराठी संस्कृती मुळातच
समृद्ध आहे .स्वयंसमृद्धाला दुसर्‍याकडून सहसा घ्याव लागत नाही आणि वेळ पडली तर तो जितक
घेतो त्याच्या अनेक पटीने देतो .सर्व शाखातल सर्व शिक्षण मराठीतून देण घेण सहज शक्य आहे
पण ते जागतीकरणाच्या दृष्टीने व्यवहार्य नाही म्हणून मराठी भाषेतून शिक्षण ठरावीक इयत्तापर्यंतच
असत ,वास्तवीकपणे पुढे त्याची तितकी गरज सुद्धा नसते .एकदा मराठी अस्मिता जागृत झाली की
बस .त्यासाठी मात्र ,जिथे मराठी शिक्षणाची सोय नाही तिथे पालकानी ,जिथे पालकापैकी एक बिगर
मराठी आहे तिथे त्या एका पालकाने आपल्या मुलाच मराठीपण टीकवण्याचा प्रयत्न करायला हवा .
कारण मराठी ही नुसती भाषा नसून मराठी हा एक समृद्ध आचार ,समृद्ध विचार आहे ,तो टीकायला
हवा व तो टीकवण्याच सामर्थ्य मराठी भाषेत नक्कीच आहे हे मुळात पालकाना पटल पाहिजे .जशी
मराठी माणसाची प्रगती होते ,त्याचा वावर अनेक क्षेत्रात ,अनेक देशात वाढत जातो तशी ही संस्कृती
पसरत जाते .जसा मराठी माणूस नेत्रदीपक अस जागतीक पातळीवर कार्य करतो तेव्हा सहजपणे
त्याचा विचार ,आचार ,जो मराठी असतो तो जगात पोहोचतो .आज सचीन तेंडुलकर जेव्हा आपल्या
नम्र व संयमी वागण्याने जगासमोर येतो तेव्हा मराठी आचार मराठी विचार जगासमोर येतो .चांगले
लोक चांगल्याचच अनुकरण करतात व अशा रीतीने मराठीचा प्रचार प्रसार सहज होतो .आज इंग्रजी
भाषेत गुरू ,अवतार असे अनेक शब्द रोजच्या वापरात आले पुढे असे अनेक शब्द मराठीचे इंग्रजीत
नक्की जातील पण त्यासाठी मराठी माणसाची प्रगती व्हावी ,त्याच मराठीपण जपल जाव याचे सर्व
पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत कारण जगाची भाषा ही प्रगत माणसाची भाषा असते अस मला वाटत .

छान लेख! ओघवते संभाषण, प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहिले.

मराठीचं म्हणाल तर आज आपल्याकडे पाली, अर्धमागधी ह्या प्राकृत भाषांचे स्थान फक्त धर्मभाषा म्हणून त्या त्या धर्मीयांपुरते व संशोधकांपुरते राहिले आहे.

मराठी देखील कदाचित पुढील काळात अशीच 'उत्क्रांत' स्वरूपात पाहावयास मिळेल व आताची मराठी इतिहास व भाषा संशोधकांपुरती उरेल. Happy

उत्तम आणि विचार करायला लावणारा लेख!
मी माबो वर नवीन आहे. इथे येण्याचे मुख्य कारण म्हणजे मराठी शी संबंध टिकून राहावा, मुख्यतः नवरा अमराठी असल्यामुळे मराठी बोलायच्या विशेष संधी मिळत नाहीत..
इथे लोक मराठी टिकून राहावी म्हणून कळकळीने प्रयत्न करताना दिसतात (चर्चा करताना दिसतात), मात्र अनेकदा मिसलो, पोस्टले, सजेस्टले,वीकांत वगैरे लिहितात तेव्हा आश्चर्य वाटते.
जर असे शब्द वापरण्याचे कारण केवळ सोय असे असेल तर मग वरच्या आजीनी मांडलेला मुद्दा बरोबर ठरत तर नाहीये नं असा विचार येतो..कारण तसेही आपण बोलीभाषेत अनेक अमराठी शब्द तर वापरतोच आहोत, त्यात हे धेडगुजरी (ना मराठी ना इंग्रजी) लिखित मराठी का वापरायचे? त्यातून वरताण विनोदी म्हणजे proper noun चे मराठीकरण करणे, जसे youtube ला तुनळी वगैरे! त्यातून तर नक्कीच काही साध्य होत नाहीये Sad

उत्तरप्रदेश नावाचं आणखी एक राज्य आहे. तिथले, झालंच तर दिल्लीचे लोक हिंदी बोलतात."
"... आणि बॉलिवुड ...?"
"हो, बॉलिवुडचे सिनेमे मुंबईत तयार होतात सहसा. पण ते हिंदीत असतात."
"पण मग वेगवेगळ्या राज्यांतले लोक कोणत्या भाषेत बोलतात?"
"इंग्लिश! म्हणजे तसे वेगवेगळ्या भाषांत बोलू शकतात. पण लसावि इंग्लिश."

>>>
मृदुलाजी , तुम्ही भारतीयच आहात ना? अन्यथा असा विपर्यास तुम्ही केला नसता. तुमचा हिन्दी द्वेष मी समजू शकतो. हिन्दी या भारतीय भाषेपेक्षा तुम्हाला परक्यांची इंग्लिश भाषा प्रिय वाटते हेही समजता येईल. पण हे आंधळे प्रेम सिद्ध करण्यासाठी वस्तुस्थितीचा विपर्यास करण्याचे खरे तर काही कारण नाही. फक्त उत्तर्प्रदेशातले लोक आणि दिल्लीचे लोकच हिन्दी बोलतात काय? बिहार, मध्यप्रदेश, झारखन्ड ,छत्तीस गड , उत्तरांचल, राजस्थानचा पूर्व भाग हरियानाचा मोठा भाग कोणती भाषा बोलतात हे सांगता येईल का तुम्हाला.?गुजराती, मराठी, ओडीसी, बंगाली असामी या संस्कृतोद्भव भाषांचा को - रिलेशन कोइफिशियन्ट मोठा आहे याची दखल घ्यायचीच नाही का? केरलचा मलबारी पंजाबातल्या रस्त्यावर पंक्चरचे दुकान टाकल्यावर तिथल्या ड्रायव्हरांशी कोणत्या भाषेत बोलतो? मल्यालम मध्ये की तुमच्या इंग्रजीत? इथले काही बाटगे आपसात इंग्लिश बोलत असतील म्हणून त्याचा लसावि इंग्लिश येतो हा निषकर्ष तुम्ही कसा काढता? इंग्रजी 'जाणणार्‍या' ची संख्या भारतात १९९१ जनगनणेनुसार ९% होती. २००१ नन्तर ती सेकंड लँग्वेज धरून २१ % च्या आतबाहेर असावी.(जाणणार्‍यांची , बोलणार्‍यांची नव्हे.)माझ्या ७००० वस्तीच्या गावात ३ शब्दाचे इन्ग्रजी वाक्य बोलू शकणारे लोक बोटावर मोजता येतील की नाही याची शंका आहे.शरीराने व मनाने परदेशात स्थायिक झालेले लोक म्हणजे भारत नव्हे.

ब्रिटीश म्हातारीचा बुद्धिभेद करणे सोपे आहे , मायबोलीकरांचा नाही.....