चुकुन-चुकुन

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

आज बर्याच दिवसांनी पुन्हा एकदा इंदिरा संतांचं 'गर्भरेशीम' चाळायला घेतलं. बहुतेक पहिल्यांदाच, अगदी माझ्याही नकळत मी ते 'वाचायला' लागलो. २-३ कविता वाचल्या आणि जाणवलं की मी आज 'भाषा, शब्द, काव्य, कविता' हे सगळं नव्याने अनुभवतो, शिकतो आहे. 'तरलता' या शब्दाचा अर्थ आज कळतो आहे. कुणी हे असं इतकं नाजूक लिहू कसं शकतं? ही कविताच पहा -

चुकून चुकून कधींतरी डोळ्यांना डोळे
भेटले असतील, नसतील.
चुकून-चुकून कधींतरी चार शब्द
दिले घेतले असतील, नसतील ...

चुकून-चुकूनमधले अचूक उभें करणारे-
असतील-नसतील मधल्या क्षणांचे स्पंदन
स्थिर करणारें
एकामागून एक कवचें निघळून मनासारख्या
नितळ संगमरवराचें घडलेलें तें शिल्प ...

त्याचें अस्तित्व हेंच सर्वस्व. जोखीम जपून ठेवायची.
त्याचें दर्शन हीच शिक्षा. मुकेपणानें सोसायची.

'त्या' क्षणाचं असं वर्णन आणि 'त्या' क्षणाचं असं जतन करणं ही कल्पनाच शब्दातीत आहे. कवितेत कुठेही तो क्षण 'पकडण्या'चा अट्टाहास नाही की आविर्भाव नाही. कुठलीही चिकित्सा नाही, विश्लेषण, विवेचन काहीही नाही. पण तो क्षण आपणही जगून येतो. निदान मी तरी तो जगलो. कविता वाचताना 'अंतर्बाह्य मोहरणे' हा अनुभव घेतला. असं म्हणतात की एखादी कविता वाचताना, ऐकताना 'व्वा' किंवा 'क्या बात है' अशी उत्स्फूर्त दाद गेली म्हणजे ती कविता चांगली, किंवा ती कविता वाचणार्याला भावली. पण मला दाद द्यावी हेच सुधरत नव्हतं.

आता हेच बघा. दुसरी एक कविता - 'त्याला परत यायचें नव्हतें'

मावळत्या सूर्याचीं किरणें अंगावर घेत
पायतीवर निश्चल बसून रहावें.
कुठें पाहंू नये. कांही ऐकूं नये. मन मात्र
मोकळें सोडावें. अगदी मोकळें ...
त्या चिमुकल्या पांखराला भरार्या घेताना तें
झिरीमिरी आभाळही अपुरें व्हावें. आणि आपण
ओघळून पडलेल्या पानासारखें
स्वस्थ निश्चिंत असावें.

उतरत्या काळोखाबरोबरच तें परत आलें.
परत आलें, सगळ्या देहांत दिवे उजळले.

या ओळी वाचल्या आणि अंग अंग शहारलं. माझ्या लेखी कविता इथेच विसावली (संपली म्हणत नाहिये मी). पुढची कविता शीर्षकाला साजेशी आहे. पण 'परत आलें, सगळ्या देहांत दिवे उजळलें' या ओळीत एक अखंड कविता आहे.

विषय: 
प्रकार: 

>>>पण 'परत आलें, सगळ्या देहांत दिवे उजळलें' या ओळीत एक अखंड कविता आहे.

खरच आहे, आणि तू खूप छान लिहीले आहेस, लिही अजून या पुस्तकातल्या कवितांबद्दल... मी वाचतेय