मुशाफिर

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

मुशाफिर..
या शब्दाचं एक वेगळंच आकर्षण आहे मला. पूर्वी वाटायचं हे बंजारा लोक किती मजा करतात ना.
सारखी नवीन गावं, तंबू, शेकोट्या(त्याभोवतालचे नाच पण. पण नंतर लक्षात आलं ते प्रत्यक्षात नाहीच
पाहिलेत. तो सिनेमांचा परिणाम), त्यांचे ते वेगळेच कपडे. घराची ऊब काय असते ते बाहेर पडल्यावर जाणवतं.
मग कळलं की हे काही मजा म्हणून नाही फिरत असं. पण तरीही लहानपणच्या ग्रेट, जादूच्या वाटणार्‍या
गोष्टी त्यातलं कोरडं सत्य प्रखरपणे डोळ्यांवर आघात करत असतानाही पुन्हा तो आकर्षणाचा खेळ मांडतातच.
काहीतरी तात्पुरतं असलं की खूप गूढ, आकर्षक वाटायला लागतं.
एखादं गाव, माणूस, वस्तू यानंतर परत कधी भेटणार नाही असं वाटलं की एक हुरहुर लागते.
ते गाव, माणूस, वस्तू कायमचे पदरात पडले तर आवडतीलच असंही नसतं खरं तर.
पण दुर्मिळ गोष्ट जास्त आकर्षक वाटते.
म्हणूनच कदाचित अतिशय सुरक्षित असं आयुष्य जगत असताना त्या मुशाफिरांचं आयुष्य हा एक
कुतुहलाचा आणि ओढीचा विषय होतो.
सगळीकडं हे मुशाफिर भेटत रहातात. जी एंच्या,खानोलकरांच्या गोष्टींत, ग्रेस, रॉय किणीकरांच्या कवितांत.
ते लेखक कवी तसं म्हणतात असंही नसेल पण मला ते तसे जाणवत रहातात.
मागं झुळूकवर या शब्दावर जुगलबंदी झाली होती.
आता पूर्ण आठवतही नाहीयेत माझ्याच चारोळ्या.
पण हा नवीन सुचलेला मुक्तछंद.

पोचल्यावर थोडी विश्रांती घ्यावी खरंतर.
पण श्वासही न घेता कामाला लागला तो.
कुठं कशाची गरज आहे ते मनाशीच ठरवत
सगळीकडं फिरला तो.
मग..
जमीन अंथरली खाली.
फाटली होती थोडी कुठं कुठं.
पण फाटक्या डोळ्यातूनही,
जमीनच दिसत होती तिथं.
मग एक राखाडी निळसर कपडा..
बोचक्यातून शोधून काढला.
मोठा होतोय थोडा म्हणत..
हातानंच कोपर्‍यात फाडला.
मग थोडे खिळे काढून
वर ठोकून टाकला पक्का...
धुवायला हवा आता पुढच्या वेळी,
नदीजवळ थांबलो की,
हा आकाशाचा तुकडा...
मनाशीच म्हणाला.
नाही म्हटलं तरी
जवळपास घरच झालं हे...
मग थोडी शोभा हवीच म्हणत..
जमिन फाटल्या जागी,
एक झाड मांडून टाकलं.
मग त्याखाली तीन दगड हेही ओघानंच आलं.
दिवस उरकला की हात उंचावला जरा...
फार नको डोळ्यावर, थोडाच प्रकाश बरा.
मालवून सूर्याचे तेज..
पेटवले काही मंद तारे.
सुखावते तनुला पण मन जाळते..
हे पश्चिमेचे मंद वारे.
जिथून येतंय तिथं कदाचित
संपेल का कोहमचा शोध?
होणार असेल का
आयुष्य नावाच्या रहस्याचा बोध?
उद्या उठून तिकडंच निघावं हाच बहुधा संकेत...
आणि तो? पोचलाही विसाव्याच्या दुनियेत...

विषय: 
प्रकार: 

लहानपणी आमच्या गावी शेळ्या, मेंढरं घेऊन काही लोक असे भटकायचे. आता ऊसतोड करणारे असतात. फार मजा वाटते आणी दु:खही होते त्यांची अवस्था बघून.

व्वा!! क्या बात है.. सही लिहिलस...

- अनिलभाई

अतिशय सुरेख अन मनाला भावणार लिहिल आहेस.
लिहित रहा ग...

क्लास कविता आहे सन्मी.. मस्त!

वा वा सन्मे मस्त कविता, कित्ती दिवसानी कवितेला हात लावलायस पण तू Sad
ये नही चलेगा Happy

खूपच सुंदर........

क्या बात है.

सन्मी,
खूप सुंदर लिहिलय. कविता अप्रतिम.

अप्रतीम..

मालवून सूर्याचे तेज..
पेटवले काही मंद तारे.
सुखावते तनुला पण मन जाळते..
हे पश्चिमेचे मंद वारे.>>>>. कविता तर अतिशय सुंदर.........

खासच लिहिली आहेस कविता सन्मे!!

अप्रतिम!!!

अभि_

सन्मे मस्त कविता

पण श्वासही न घेता कामाला लागला तो. >>> ह्यासारखी काही वाक्ये तर भन्नाट...

visit http://milindchhatre.blogspot.com

धन्यवाद सगळ्यांना तुम्ही वाचलंत आणि सांगितलंत त्याबद्दल. कविता लिहायची सवयच गेलीय असं वाटत होतं.
श्यामली आता लिहीणार. नक्की Happy
अनिलभाई Happy

>>सुखावते तनुला पण मन जाळते..
हे पश्चिमेचे मंद वारे

सुरेख. हे ज्यानं सोसलय त्यालाच यातली तीव्रता कळेल.

या निमित्ताने 'तांडा चालला' .. आठवलं.
जिंदगी एक मुशाफिर.. असं कुठेतरी वाचलं होतं त्याचा प्रत्यय या कवितेत आला.