मनमोकळं-५

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

या रस्त्यावर एक छोटं तळं आहे. आता तळं म्हणावं असं काही सौंदर्य त्यात नाहीये.
खरं तर एक मोठा खड्डाच आहे तो. मुंबईच्या पावसाच्या आणि इथल्या जमिनीच्या पोटातल्या पाण्याच्या कृपेनं
तो भरलेला असतो इतकंच. त्याच्या भोवती झाडं नाहीयेत किंवा एखादी वळणांची पायवाट त्याला
वळसा घालून त्याची शोभा वाढवत नाही. त्याच्या पाण्याच्या जवळ जाऊन त्यात पाय बुडवून बसता यावं अशीही काही
सोय नाहीये. भर म्हणून समोर असलेल्या वस्तीतले लोक त्यात कचरा टाकतात. आणि कधीकधी...
त्या दिवशी अशीच तिथून जाताना गर्दी दिसली. " पुन्हा कुणीतरी उडी मारली वाटतं. " कुणीतरी सहज म्हणालं. माणसाला
कुठल्याही अतर्क्याची फार लौकर सवय होते.
कान फाटणारा आवाज झाला की मुंबईत " अगं बाई बॉंब ब्लास्ट वाटतं. पटकन घरी फोन करून
घ्यावा. नंतर नेटवर्क जॅम होतं. " हे उद्गार ऐकू आले तरी आता आश्चर्य वाटणार नाही.
किती घाबरणार आणि किती ओझं वहाणार उरावर?
तर त्या दिवशी पोलिसांची गाडी बघून एखादा उडी पराक्रम झाला असावा हे कळलंच.
माणसं स्वतःचं आयुष्य संपवण्याचे प्रयत्न का करत असावीत? आयुष्य अगदी इतक्या टोकाला का आणून ठेवावं वाटत असेल?
का इतरांच्या अपेक्षांच्या चौकटीत बसत नाही म्हणून ती चौकटच मोडून टाकण्याचा मार्ग सोपा वाटत असेल?
माझ्या वडिलांच्या मित्राच्या अतिहुषार मुलानं अकरावीत असंच स्वतःला संपवलं. मी त्याच्याहून एखादवर्ष मोठी.
बारावीत. माझे वडील इतके डिस्टर्ब झाले होते त्यानंतर. पोरांच्या मनात काय चाललेलं असतं कसं कळणार?
हे टेन्शन असावं.
आत्तापर्यंत आयुष्यातलं प्रत्येक टेन्शन त्यांच्याशी शेयर करणारी मी हे समजूनही बोलायला धजावत
नव्हते की पपा तुम्ही काळजी करू नका. मी असलं काही करणार नाही. तुम्हीच तर इतकं टफ बनवलयंत मला.
अतिअपेक्षांचं ओझं माणसाला दुबळं बनवत असेल का? दुसर्‍यांनी आणि स्वतः स्वतःवरच लादलेल्या अपेक्षा.
मिल्या नावाचा लहानपणचा सौंगडी. मोठी दोन्ही भावंडं खूप हुषार. गुणवत्ता यादीत आलेली.
हा मात्र असा काही स्पार्क न दाखवलेला. म्हणजे अभ्यासात. (इतर स्पार्क बरेच होते. त्याच्याबरोबर असलं की हास्याच्या
धबधब्याची खात्री. ) जिथं जाईल तिथं शाळेत, क्लासेस मधे, भावंडांच्या गुणवत्तेचा टॅग असायचाच.
शिक्षक म्हणायचे अरे तू त्या ह्याचा भाऊ ना. मग असं कसं तुला हे येत नाही?
यानं ते कधीच मनाला लावून घेतलं नाही. बारावीनंतर मार्क कमी पडले तर डिप्लोमाला ऍडमिशन घेतली. दोन वर्षं
वाया गेली. तो म्हणायचा माझं शिक्षण तिर्‍हेमार्गे झालंय.
(पंढरपुराहून सोलापुरला यायला तिर्‍हेमार्गे एक लॉन्ग रूट आहे. संकटकाळात तिकडून यावं लागतं. )
ही समज जपणं फार गरजेचं आहे. स्वतः ती दाखवावी हे तर आहेच पण आजूबाजूच्यांनी पण असं पराण्या घेऊन
उभं राहू नये. इतरांनी म्हणजे निदान जवळच्यांनी तरी.
अर्थात कुवत असून आयुष्याचं आव्हान न स्वीकारणार्‍यांना टोचायला, ढोसायला, फटकावायला, गदागदा हलवायला हवंच.
तुम्ही कुठल्याही दिशेनं चालत असाल तरी एकतरी सौंदर्य स्थळ लागणारच. फक्त काहींना जास्त चालावं लागेल,
काहींना लगेच त्यांचा ब्युटीस्पॉट सापडेल.
आयुष्य सुंदर आहे यावर गाढ विश्वास आणि कितीही वाईट घडलं तरी ते अशा अवचित मरणाइतकं वाईट आणि अनसर्टन नाही ही खात्री यावर माणूस 'त्या' ला दिलेलं एक वचन तरी नक्की पाळू शकतो. मांडलेला खेळ अर्धवट न सोडण्याचं.

विषय: 
प्रकार: 

अगदी सुरेख जमलय, मनापासून आवडल.

>> माणूस 'त्या' ला दिलेलं एक वचन तरी नक्की पाळू शकतो. मांडलेला खेळ अर्धवट न सोडण्याचं.
अगदी खरय!

छान लिहिले आहे, आवडले पाच ही भाग. साधारण त्या मुन्नाभाई मधल्या विद्या बालनच्या रेडिओवरील बोलण्यासारखा टोन वाटला. पराण्या म्हणजे काय?

आयुष्य संपवावं या टोकाला खरंच का जात असतील लोक? अतर्क्य आणि खूप घाबरवून टाकणारं आहे!

छान लिहिलं आहेस.. नेहेमीप्रमाणेच Happy

थँक्स लोक्स. अमोल सगळे भाग वाचलेस बरं वाटलं. अरे पराण्या म्हणजे न ऐकणार्‍या जनावराला अंकुश म्हणून एक टोचणारी वस्तू वापरतात, ती पराणी.
आणि एकदम मुन्नाभाई! सुपरहिट झाल्यासारखं वाटलं Happy

मी स्वतहा ह्या प्रकाराचि बलि झाले आहे त्यामुले अश्या वेलि मनाचि काय अवस्था होते ते सान्गुन समज्ञार नाहि.
असे होउ नये म्हनुन लक्श्यात आल्यवर घरात्ल्या लोकनिच त्यचे इतर गुन लोकान्समोर आनुन त्याचा आत्मविस्वास वाधवला पाहिजे.

माणूस 'त्या' ला दिलेलं एक वचन तरी नक्की पाळू शकतो. मांडलेला खेळ अर्धवट न सोडण्याचं.>> छान लिहीलंय.

धनुडी मलापण आताच सापडला खजिना... Happy

तुम्ही कुठल्याही दिशेनं चालत असाल तरी एकतरी सौंदर्य स्थळ लागणारच. फक्त काहींना जास्त चालावं लागेल,
काहींना लगेच त्यांचा ब्युटीस्पॉट सापडेल.
आयुष्य सुंदर आहे यावर गाढ विश्वास आणि कितीही वाईट घडलं तरी ते अशा अवचित मरणाइतकं वाईट आणि अनसर्टन नाही ही खात्री यावर माणूस 'त्या' ला दिलेलं एक वचन तरी नक्की पाळू शकतो. मांडलेला खेळ अर्धवट न सोडण्याचं.>>> अगदी १००००% पटलं .. Happy

धन्यवाद ड्रीमगर्ल, एक फूल आणि रूपाली. तुम्ही शोधून वाचलंत आणि सांगितलंत हे पाहून छान वाटलं.
ड्रीमगर्ल तू लाजवतेयस बर का मला Happy

माणूस 'त्या' ला दिलेलं एक वचन तरी नक्की पाळू शकतो. मांडलेला खेळ अर्धवट न सोडण्याचं.>>>>>>>

एकदम ट्रू... Happy मस्त लेख...

माझ्या वडिलांच्या मित्राच्या अतिहुषार मुलानं अकरावीत असंच स्वतःला संपवलं. मी त्याच्याहून एखादवर्ष मोठी.
बारावीत. माझे वडील इतके डिस्टर्ब झाले होते त्यानंतर. पोरांच्या मनात काय चाललेलं असतं कसं कळणार?
हे टेन्शन असावं.
आत्तापर्यंत आयुष्यातलं प्रत्येक टेन्शन त्यांच्याशी शेयर करणारी मी हे समजूनही बोलायला धजावत
नव्हते की पपा तुम्ही काळजी करू नका. मी असलं काही करणार नाही. तुम्हीच तर इतकं टफ बनवलयंत मला.
अतिअपेक्षांचं ओझं माणसाला दुबळं बनवत असे ल का? दुसर्‍यांनी आणि स्वतः स्वतःवरच लादलेल्या अपेक्षा.>>>

भीडतं अगदी तु लिहीलेलं!!

बनत असतील लोक दुबळे अपेक्षांनी!! मला तरी हेच वाटतं!

आयुष्य सुंदर आहे यावर गाढ विश्वास आणि कितीही वाईट घडलं तरी ते अशा अवचित मरणाइतकं वाईट आणि अनसर्टन नाही ही खात्री यावर माणूस 'त्या' ला दिलेलं एक वचन तरी नक्की पाळू शकतो. मांडलेला खेळ अर्धवट न सोडण्याचं.

+१०००

या भागावर एवढंच! Happy

>>माणसं स्वतःचं आयुष्य संपवण्याचे प्रयत्न का करत असावीत? आयुष्य अगदी इतक्या टोकाला का आणून ठेवावं वाटत असेल?
>>का इतरांच्या अपेक्षांच्या चौकटीत बसत नाही म्हणून ती चौकटच मोडून टाकण्याचा मार्ग सोपा वाटत असेल?
>> मला वाटतं हेच कारण अधिक प्रमाणात असावं...

>>आयुष्य सुंदर आहे यावर गाढ विश्वास आणि कितीही वाईट घडलं तरी ते अशा अवचित मरणाइतकं वाईट आणि अनसर्टन नाही ही खात्री यावर माणूस 'त्या' ला दिलेलं एक वचन तरी नक्की पाळू शकतो. मांडलेला खेळ अर्धवट न सोडण्याचं.

प्रचंड आशावादी वाटावं असं वाक्य Happy Happy Happy