गगनी उगवला सायंतारा

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

आमच्या इथे एक 'ज्येष्ठ नागरिक संघ' आहे. म्हणजे साठीच्या पुढच्या व्यक्ती एकत्र येऊन तयार झालेला एक ग्रुप आहे. सदस्यत्त्वाची किमान पात्रता वयाची साठ वर्ष पूर्ण.
त्यांच्या सभासदांची यादी ठेवणे, वर्गणी वगैरे काढायची असेल तर त्याची यादी, आलेल्या देणग्यांची यादी, हिशेब, फंड वगैरे कामं ते वाटून घेऊन करतात. नेमाने एकत्र येऊन मिटींगज्, परिसंवाद वगैरे कार्यक्रम करतात. कधी काही निमित्ताने तर कधी असंच नुसत्याच गप्पा मारायला म्हणून ते जमतात.

दोन आठवड्यांपूर्वी या संघाने विरंगुळा म्हणून एक गाण्याची मैफिल आयोजीत केली होती. शास्त्रीय गायन आणि सुगम संगीत असा मिश्र कार्यक्रम होता. मला त्यांचा हा अड्डा अगदी जवळच असल्याने आणि जे गाणार होते त्यातले काही मित्र-मैत्रिणी असल्याने मीपण या मैफिलीला गेलो होतो. अगदी छोटीशीच. श्रोत्यांना जास्त वेळ बसणे जमणार नाही म्हणून फक्त दोन तासांत कार्यक्रम संपणार होता. सकाळच्या नऊला मैफिल सुरू होणार होती. साडे-आठपासून हळूहळू हजेरी लागायला सुरुवात झाली. साठ ते नव्वदी दरम्यान असलेला एकेक सदस्य एवढ्या सकाळी थंडीत इतका तरतरीत असलेला बघून मलाच ओशाळायला झालं. (रविवार असून सकाळी आठला वगैरे हजर व्हायचं म्हणजे जरा.. अशी स्वतःची समजूत.) जवळ-जवळ चाळीस-पंचेचाळीस पर्यंत उपस्थिती गेली. त्यांचे हास्यविनोद, एकमेकांच्या टांगा खेचणे सुरू झाले. यात "अरे बेटा, तू या म्हातार्‍याच्या टकलावरची खोक बघून त्याच्याकडे जास्त लक्ष पुरवू नको. या म्हातार्‍याला भान राहत नाही. उद्या त्या बच्चनच्या पोराशी दोन हात करायची वेळ आलीच तर काय? म्हणून तो बॉक्सींगची प्रॅक्टीस करत होता, त्यात तोल जाऊन डोके फोडून घेतले." इथपासून ते "आज सूनबाईला सुट्टी असते, म्हणून तिला मी उशिरा उठायला सांगते, नाश्त्याचं वगैरे उरकून यायला जरा उशीर झाला. लगेच कुंभकर्णाच्या वंशात कोंबू नको." इथपर्यंत त्यांच्या गप्पा आणि उरल्या-सुरल्या दंतपंक्तीतून निघलेले हास्यस्फोट सुरू झाले.

नंतर एका काकूंनी कार्यक्रमाची छोटीशी प्रस्तावना देऊन कार्यक्रम सुरू झाला. आणि खुसखुशीत सूत्रसंचालनासहीत छोटे ख्याल, भावगीतं, गीतरामायण, नाट्यगीतं यातून रंगत गेला. मध्येच तीन-चार काका एका गायिकेला बाजूला घेऊन, कुजबुजून परत येऊन बसले. आणि पुढचं गाणं मोठ्या जोशात सुरू झालं "लटपट लटपट तुझं चालणं गं मोठ्या नखर्‍याचं!" श्रोत्यांमध्ये आश्चर्यमिश्रीत खसखस पिकली. यानंतर 'आमचे सदस्य अजून एवढे हिरवे(जीभ चावून) आपले रसिक राहिले असतील याची कल्पना नव्हती', 'म्हातारीला बसायला जमतंय की नाही वाटलं होतं पण लावणी सुरू झाल्यावर ताठ होऊन बसली की!', 'अहो शिटी मारायला माझी बोटं तर तोंडापर्यंत गेली पण जीभेनेच दात नसल्याचा मोठा सायरन वाजवला' असे मिश्कील शेरे येऊन आणखीन हसं पिकलं. त्यांनंतर 'धन्यभाग सेवा का अवसर पाया' या भैरवीनं सांगता झाली. नंतर चहापान आणि तीळगूळ आले. देणगीदारांची नावं जाहीर झाली आणि नंतर आभार प्रदर्शन.
कार्यक्रम चांगला झाला.

अनपेक्षीतपणे एवढ्या मोठ्या ज्येष्ठ समुदायाच्या सहवासात आल्यामुळे असेल किंवा शेवटच्या भैरवीचा परिणाम किंवा या दोन्हींचा एकत्र परिणाम असेल पण मला शेवटी खूप रितं वाटायला लागलं. घट्ट मुठीतली रेती निसटताना आतून तळहाताला जी निसटून चालल्याची जाणीव होते, तसं वाटायला लागलं.

विषय: 
प्रकार: 

सायंतारा चांगलाच चमकदार आहे की!! छान लिहीले आहेस. खूप आवडले.

असे ग्रुप्स असणं आणि त्यांनी ते सगळ आयोजित करुन पार पाडणं हे खरच खुप महत्वाच आहे. बरेच निवृत्त जेष्ट नागरिक आता काय मी निवृत्त झालो/झाले आता सगळ संपल वगैरे सारखे विचार करत असतात." खरं तर असे काही उपक्रम करुन स्वत:ला कशात तरी का होईना अडकवून घेणं ही खुप महत्वाची गोश्ट आहे.

छान लिहीलेय गजानन.
तुमचे मागचे रंगीबेरंगी पण वाचतेय. वनभोजन मस्त. हेवा वाटला वाचून. लिहीत रहा.

'म्हातारीला बसायला जमतंय की नाही वाटलं होतं पण लावणी सुरू झाल्यावर ताठ होऊन बसली की!', 'अहो शिटी मारायला माझी >>. ह्अ.पुरेवाट.. छान लिखाण.. मागचे सगळे वाचतेय आता..

मंडळी, धन्यवाद.

श्यामली अगदी! निवृत्ती नंतर लगेचच येणारे मानसिक चढ-उतार सावरण्यासाठी तर असा एखादा अड्डा फार महत्त्वाची कामगिरी बजावतो.

मला वाट्ल होत कि तरुण मुलच मैफिल जमवुन हौस करतात ,पण वयस्कर लोक ग्रुप तयार करुन मैफिल जमवुन हौस करतात हे वाचुन बर वाट्ल्.खुप सुन्दर..........