मडिकेरी-कुर्ग

Submitted by डॅफोडिल्स on 13 October, 2009 - 05:59

एखादा लाँग विकेंड आला की मस्त कुठेतरी फिरून येउ हा विचार बरेच दिवस मनात होता. मग बंगळूरच्या जवळपास कुठे तरी जाउया म्हणून शोधाशोध करताना मडिकेरी समोर आलं. मडिकेरीला जायचं ठरलं. आहे काय हे मडिकेरी म्हणून इंटरनेटवर शोधले असता समजले की, मडिकेरीला कूर्ग ला भारताचं स्कॉट्लंड समजलं जातं तर कुणी कुणी दक्षिणेतला कश्मिर म्हणतात. अरे वा!, भर मार्च मध्ये गारवा कुणाला आवडणार नाही. कसं जायचं काय पहायचं अशी जुजबी माहिती गोळा करून आम्ही निघालो.

मडिकेरी म्हणजे कूर्ग चे जिल्हा हेडक्वार्टर्स. समुद्रसपाटीपासून ५००० फूट ( साधारण १५२५ मिटर्स) उंचीवर असलेला हा प्रदेश. उतरणीच्या टेकड्यांवर वसलेलं एक छोट्टसं गाव. बुटक्या बैठ्या लाल कौलारु बंगल्यांची शोभा काही निराळीच. इथे रहाणारे कोडवू लोक हिंदू क्षत्रिय व खूप शूर. हे मडिकेरी किंवा मर्केरी १६८१ मध्ये हलेरी चा राजा मुद्दु ह्याने वसवलं. म्हणूनच त्याला मुद्दुराजकेरी आणि नंतर अपभ्रंशित मर्केरी किंवा आत्ताचं प्रचलित नाव मडिकेरी मिळालं असावं.

इथल्या संस्कृती बद्दल समजावून घेताना कळलं की, कोडवू हा शब्द मुळच्या कुडू ह्या शब्दापासून आला आहे. कोडाईमालेनाडू म्हणजे टेकड्यांचा प्रदेश -"dense forest on steep hills". दक्षिण भारतातल्या नयनरम्य निसर्ग सौन्दर्य लाभलेल्या हिलस्टेशन्स पैकी एक असलेले कोडवू म्हणजे कावेरी नदीचे उगमस्थान आहे. कोडवू लोक कावेरीची पूजा करून स्वतः ला तिची लेकरे मानतात. आदरातिथ्य करण्यात कोडवू लोक सर्वश्रुत आहेत. कोडवू रेसिपिज सुद्धा तेवढ्याच छान आहेत.

पूर्वापार चालत आलेल्या इतीहासापासून ते १६ व्या शतकापर्यंतच्या शीलालेखांवरून असे समजते की कूर्ग वर कुण्या एकाच राजघराण्याची सत्ता नव्हती. तर अनेक राजांनी वेगवेगळ्या काळात इथे राज्य केले होते. इथे असणार्‍या शीलालेख आणि ताम्रपटांवर इथे गंगा, कदंब, छोला, कोंगवा, होयसाला आणि नायक ई. वेगवेगळ्या लोकांनी राज्य केल्याच्या नोंदी आहेत. हा झाला मडिकेरीचा इतीहास.

कूर्ग कर्नाटकाच्या पश्चीमी घाटावर सुमारे ४१०२ स्के. मी ईतकं वसलेलं दर्‍या खोर्‍यांचं गाव आहे. बंगळूर ते मडिकेरी अंतर २५२ किलोमिटर आहे. चहा कॉफीच्या बागा मळे पहायच्या तर कूर्गला जावे. मऊ धुक्याने भरलेली दरी पहायला, नगमोड्या वळणावळणाच्या रस्त्यांचा आनंद घ्यायला कूर्गला जावे. खरं तर ऑक्ट्बर ते मे हा इथला मेन सिझन. पण पावसा आधी पावसा नंतर केव्हाही जाण्यात आनंदाची पर्वणीच आहे.

आम्ही सकाळी सहा ला मडिकेरिला जाण्यासाठी बंगळूर हून निघालो. SH-17 वरून श्रीरंगपट्टना, व्हाया मड्डूर बायपास, रंगनथिट्टु, हुंसूर असे करत मग SH-88 मार्गे कुशलनगर वरून मडिकेरीला जावे लागते. साधारण अकरा बारा वाजेपर्यंत कुशलनगर पार करून सुन्तिकोप्पल सोडलं पुढे मडिकेरीकडे जवळच आहे असं समजलं. रस्ता फारच छान होता. जसजशी वळणे वाढत गेली त्याचबरोबर हिरवाईही. रस्त्यात भरपूर बांबूची वनं आहेत. सर्वत्र पसरलेल्या हिरव्यागार बागांमध्ये कसलीशी टप्पोरी फुलं फांदीभर लगडलेली दिसू लागली. त्या फुलांचा वास आसमंतात भरून राहिला होता. गाडी पुढे जाउ लागली तशी ह्या झाडांची शेतीच आहे.. मळे फुललेले दिसले आणि आम्ही खात्री केली हेच ते कॉफीचे मळे. उतरणीच्या रत्यांवर लाल कौलारू घरं दिसू लागली. अमुक तमुक कॉफी इस्टेट.. होम स्टे असे बोर्ड दिसू लागले. इथले लोकल लोक खास घरं ट्युरिस्ट लोकांना होम स्टे देतात. तिथल्या रहाण्याबद्द्ल आणि जेवणाबद्द्ल एक दोन स्नेह्यांकडून बरेच ऐकले होते. आम्ही क्लब महिन्द्रा रिसॉर्ट ला जाणार असल्याने ते शोधत खुद्द मडिकेरीमध्ये पोहोचलो. एका चौका सारख्या ठिकाणी ट्युरिस्ट इन्फॉर्मेशन साठी मोठठा बोर्ड दिसला. काही लोकल साईट सिईंग पॉईंट्स आहेत. सगळे जवळ जवळ होते. रिसॉर्ट् वर जाउन फ्रेश होउन, जेउन निघालो साईट सिईंग ला.

मडिकेरी किल्ला : (Madikeri Fort)

आधी मातिच्या असलेल्या ह्या किल्यांची टिपू सुलतानाने सध्या असलेल्या दगडी किल्ल्यात पुनःबांधणी केली. अठराव्या शतकात टिपू सुलतानाने इथे राज्य केले होते. किल्ल्याच्या आत साधे बांधकाम असलेला लिंगायत राज्यकर्त्यांचा राजवाडा आहे. ह्या किल्ल्यावरून पूर्ण मडिकेरी भागाचे उत्तम दर्शन होते.

गदिग्गे : (Raja's Tomb)

ह्या ठिकाणी राजा लिंगराजेन्द्र ह्यांची सन १८२० मध्ये बांधलेली समाधी आहे. तसेच त्या बरोबर राजाचे धर्मगुरु आणि मोट्ठा विरराजेंद्र आणि राज्याच्या दोन सैनिकांच्याही समाधी आहेत इथे. मडिकेरी शहरातल्या महादेव पेठेच्या उत्तरेकडे ही गद्दिगे आहे.

ओंकारेश्वर मंदीर : (Omkareshwara Temple)

omkareshwar.jpg

कोडवू राजा लिंगराज याने सन. १८२० मध्ये बांधलेले थोडेसे मुघलाई धाटणीचे हे शंकराचे मंदीर आहे. मध्यभागी मोठा मशिदीसारखा घुमट आणि त्या बाजुला चार छोटे मिनार आहेत.
मुख्य मंदिराच्या गाभार्‍याभोवती प्रदक्षिणा करायला मोठ्ठा परिसर आहे. काही खोल्यांची तटबंदी आहे. त्याच्या भंतींवर देवदेवतांची सुंदर चित्रे पहायला मिळतात. मंदिर परिसरात एक अतिप्राचिन विहीर आहे.

om2.jpg

मंदिरासमोरच एक छोटासा तलाव आहे.

ह्या मंदिराविषयी एक गोष्ट सांगण्यात येते. लिंगराजेन्द्राने स्वतःच्या राजकिय स्वार्थासाठी एका प्रामाणिक सद्भक्त ब्राह्मणाला मारले. तो ब्राह्मण ब्रह्मराक्षस झाला आणि राजाला छळू लागला. मग राजाने काशीहून एक शिवलिंग आणले व मंदिरात स्थापन केले आणि त्याची ह्या तथाकथीत ब्रह्मराक्षसाच्या त्रासापासून मुक्तता झाली. असेही सांगितले जाते की ह्या मंदिराच्या खिडक्यांचे गज पंचधातूचे आहेत आणि त्यावर लिम असे लिहिलेले आहे.

अ‍ॅबी फॉल्स : (Abbey Falls)

बोली भाषेत अ‍ॅबी म्हणजे धबधबा. मडिकेरीपासून साधारण १-२ किमी आत एका खाजगी कॉफी ईस्टेटीत हा नयनरम्य धबधबा आहे. ह्या भागात पर्यटकांची बरीच गर्दी असते. इथे आल्यावर बाहेर बर्‍याच खाउच्या कणसं नारळपाणी उसाचा रस विकणार्‍या गाड्या दिसल्या. गाडी पार्क करून आत खाली बरंच चालत गेल्यावर हा धबधबा आहे. कावेरीचे पाणी उंच खडकांवरून पडताना फारच सुंदर दिसते. धबधब्याचा चांगला व्ह्यु मिळावा म्हणून एक झुलता पूल बांधलेला आहे.

abbey.jpg

अ‍ॅबे फॉल्सहुन परत येइ तोपर्यंत संध्याकाळ व्हायला लागली होती. राजाज सिट ला जाउन सनसेट बघायचा होता.

राजाज सिट :

rajas.jpg

फोर्ट पासून एक किलोमिटर अंतरावर हा पॉईंट आहे. कोडवु राजे इथे बसून सुर्यास्त बघत. एक छोटीशी बाग आहे. आणि बच्चेकंपनीला खेळवायला फिरून आणायला छोटीशी ट्रेन आहे इथे. बागेच्याच पश्चीमेकडे एका उतरत्या टेकडीच्या पाहिर्‍यांवरून मडिकेरी भोवतालच्या निसर्गाचे एकाच ठिकाणाहून दर्शन होते. न मावळणारा सूर्य, हिरवे हिरवे गालिचे पसरलेले चहा कॉफीचे मळे, आणि हिरवाईवर पांघरलेले चंदेरी ढगांच्या दुलईसारखे भासणारे आकाश. मावळतिच्या त्या लालभडक मोठ्या सुर्यबिंबाचे दर्शन घेउन मन अगदी तृप्त झाले.

खुद्द मडिकेरीमध्ये पहाण्यासारखे इतकेच होते. मग दुसर्‍यादिवशी जवळपास फिरून यायचे ठरले.
सकाळी नाष्ता करून भगमंडला नावाचा नदिचा संगम आणि तलकावेरी म्हणजे कावेरीचे उगमस्थान पहाण्यासाठी निघालो.

भगमंडला : (Bhagamandala)

मडिकेरी पासून ३३ किलोमिटर वर हे ठिकाण आहे. ह्या ठिकाणी कावेरी आणि कनिका ह्या दोन नद्यांचा संगम आहे. तिसरी सुज्योती नावाची नदीही ह्या संगमाला जमिनीअंतर्गत मिळते. १७ किंवा १८ ऑक्टोबर ला जेव्हा तुला संक्रमण असते तेव्हा अनेक यात्रेकरू ह्या संगमात स्नान करून पुण्य मिळवतात. ह्या संगमाजवळच भगंडेश्वराचं मंदिर आहे. केरळी पद्धतीने बांधलेल्या ह्या मंदिरात शंकर, सुब्रमण्या, महाविष्णू आणि गणपतीची छोटी छोटी मंदिरं आहेत.

हा भगमंडला नावाचा भाग सन १७८५ ते सन १७९० या काळात टिपू सुलतानाच्या अधिपत्याखाली होता. तेव्हा ह्या भागाला अफिसालाबाद असे म्हणले जायचे. मग १७९० ला राजा विरराजेन्द्राने तो पुन्हा कोडागू म्हणून स्वतंत्र मिळवला.

तलाकावेरी : (Talakaveri) कावेरी नदीचे उगमस्थान

talakaveri.jpg

ब्रह्मगिरी पर्वताच्या पुर्वेकडील उतारावर, भगमंडलापासून सुमारे ८ किलोमिटर अंतरावर कावेरी नदिचे उगमस्थान आहे.

ज्या ठिकाणी नदिचा प्रवाह उगम पावतो त्याला गुंदिगे असं म्हणतात. त्याला लागूनच एक छोटसं पाण्याचं कुंड (तलाव) आहे. ह्या कुंडाचे पाणी पुढे जमिनीत अंतर्धान पावतं ते दूरवर साधारण एक दिड किलोमिटर खोल टेकडीवर पुन्हा आढळतं. दर वर्षी तुलासंक्रांतिला ह्या गुंदिगे ठिकाणच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढ्तो त्याला तिर्थोद्धवा असं म्हणतात. हे तिर्थ म्हणजे साक्षात पार्वती इथे अवतरते अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेक भाविक हे पवित्र तिर्थ भरुन आपल्या घरी घेउन जातात.

ह्या गुंदिके जवळच दोन छोटीशी मंडिरं आहेत. एक गणेशाचं आणि दुसरं शिवाचं. असं सांगण्यात येतं की इथे असलेल्या अश्वत्थ वृक्षाजवळ अगस्त्य ऋषींना त्रिमुर्ती-ब्रह्मा विष्णू महेषाचा साक्षात्कार झाला होता. तसेच ह्या ठिकाणी सप्तमहाऋषींनी मोठे यज्ञ केल्याचंही सांगितलं जातं.

brahmagiri.jpg

ह्या तलाकावेरीपासूनच वर ब्रह्मगिरीकडे जाण्यासाठी पाहिर्‍या आहेत.

आम्हीही थोड्या पाहिर्‍या चढून उतरून आलो. दमून संध्याकाळी उशिरा रिसॉर्टवर पोहोचलो. क्लब महिन्द्राच्या कॉटेजेस मस्त आहेत. सगळी व्यवस्थाही चोख आहे. जेवणासाठीही बरेच ऑप्शन्स उपलब्ध होते. तरिही आम्ही मडिकेरी मधे अजुन दोन तिन हॉटेल्स खादाडीसाठी शोधून ठेवली होती.

पुन्हा बंगळूर ला परताना परतीच्या वाटेवर कुशलनगर जवळ बरीच ठिकाणे आहेत. पिकनिक स्पॉट्स आहेत. ट्रेकिंग करणार्‍या हौशी लोकांसाठी छोटे छोटे अ‍ॅडव्हेंचर कॅंप्स आहेत.

वीरभूमी :

कर्नाटकातलं एकमेव थीम रेसॉर्ट आणि अ‍ॅडव्हेंचर कॅंप.

निसर्गधाम :

मडिकेरीपासून ३० किमी. आणि कुशलनगरपासून फक्त २ किमी अंतरावर हे रेसॉर्ट आहे. नावाप्रमाणेच निसर्गधाम आहे. इथे हरीणं, हत्ती, मोर आणि इतर बरेच प्राणि बघायला मिळतात. इथे इलेफंट सफारी असते. एक मस्त अविस्मरणीय सफर.

गोल्डन टेंपल : (GoldenTemple- Buddhist Monastery)

कुशलनगर पासून ४ किमी वर बायलाकुप्पे नावाच्या ठिकाणी तिबेटीयन लोकांचा रिफ्युजी कँप आहे. चिन ने तिबेटचा ताबा मिळवल्यावर, बरेचसे रेफ्युजी ह्या कुशलनगरजवळच्या बायलाकुप्पे ला स्थाईक झाले.
१९७२ ला ही बुद्धीस्ट मोनस्ट्री पुनःप्रस्थापीत केली.

goldentemple2.jpg

बायलाकुप्पेला आल्यावर सर्वत्र पिवळे झेंडे फडकताना दिसतात. स्तूप दिसतात. मग आपण गोल्डन टेंपल जवळ येउन पोहोचतो. गोल्डन टेंपल फारच प्रेक्षणिय आहे. मुख्य गेट पासूनच रांगोळ्यांसारखी रस्त्यावर सुंदर चित्रे रेखाटलेली आहेत.

goldentemple.jpg

मुख्य मंदिराच्या दालनात आतमध्ये ४० फुटी मोठ्या पद्मसंभव, बुद्ध आणि अमितयुस यांच्या मूर्ती आहेत.

buddha.jpgदुबेर : (Dubare)

elephant.jpg

कुशलनगर जवळच मडिकेरी सिद्धपूर रोडवर कावेरी नदीतीरावर कूर्ग वनविभागाचा दुबेर एलिफंट ट्रेनिंग कँप आहे. इथे जंगली हत्तींना पकडून त्याना इतर प्रशिक्षीत हत्ती आणि स्थानिक आदिवासी जमातीच्या लोकांकडून प्रशिक्षण दिलं जातं. ह्या प्रशिक्षण शिबिरात जाण्यासाठी कावेरीचा प्रवाह छोट्या बोटीतून पार करावा लागतो.

आणखी पुढे परतीच्या वाटेवर हुंसूर वरून नागरहोल अभयारण्याकडे एक फाटा आहे. पण वेळे अभावी आम्ही तिथे जाउ शकलो नाही. मग नागरहोल आणि बंदिपूर ही अभयारण्ये पुन्हा एखाद्या मोठ्ठ्या विकेंड ला येउन बघायचे ठरवून आम्ही घरी परतलो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच डॅफो. आम्ही पण अलिकडेच जाऊन आलो. झब्बू फोटो टाकु का Wink
अप्रतिम सुंदर जागा. आणि त्या हत्तींना अंघोळ घालताना आमच्या लेकीला खूप मज्जा आली.

फोटो आणि वर्णन मस्त!!!!:स्मित:
मडिकेरी फोर्ट आणि कॉफीच्या मळ्याचेही फोटो टाकायचे होते.चहाचे मळे पाहिले होते पण अजुन कॉफीचे मळे पाहायचेत.

डॅफो मस्त लिहिलस... मी पावसाळ्यात गेलो होत.. ३ दिवस खुप पाउस व धुक होत Happy मस्त मज्जा Happy

धन्यवाद Happy झब्बू देवू का??? Wink

डॅफो फोटो आणि वर्णन दोन्हीही मस्त.
राजाच्या समाधी शेजारी दोन सैनिकांची समाधी ... काही विशेष पार्श्वभुमी आहे का ??? सहज कुतुहल म्हणुन .

डॅफो मस्त सफर. बरिच वर्षे आम्हाला कुर्गी शेजारी लाभले होते.बरीच वर्षे ते तिकडे बोलावताहेत, पण अजून जमले नाही ( हे फोटो बघून जावेसे वाटतेय. )
त्यांचे खास पदार्थ पण चाखले आहेत. तिकडे एक खास बारिक सुवासिक तांदूळ मिळतो. त्याचे सांदण करुन वर ओले खोबरे व मध घालून खातात. याच तांदळाच्या पिठाचे गोळे करुन वाफवतात ( बहुतेक त्याला पुट्टू म्हणतात )
एक लिंबू वर्गीय फळ असते, ते भाजून त्याची कढी करतात. तसेच त्यांची डाळीची आमटी (कांदा व मिरपूड घातलेली ) मस्त लागते.
त्यांच्या कडे रानडूकराचे मटण, प्रत्येक सणाला व शुभकार्याला लागते.

सर्वांना धन्यवाद !

खालून फोटो क्र.४ आणि ७ उघडत नाहीत. रि-लोड करता का?>> केले Happy सातवा गोल्डन टेंपलचा आहे.

आशुतोष >> कॉफीचे फोटो टाकले होते मी पूर्वी. मळ्यांचे नाहियेत माझ्यकडे चांगले. कुणाकडे असतिल तर जरूर झब्बू द्या.

राजाच्या समाधी शेजारी दोन सैनिकांची समाधी ... काही विशेष पार्श्वभुमी आहे का ??? सहज कुतुहल म्हणुन .>>> श्री१२३ कुतुहल मलाही होतं पण कानडी कुठे नीट येतं त्यामूळे काय विचारणार त्या गाईड्ला Lol

जीटीजी करुयात का गं तिथे? >> Proud करुया ना.

दिनेशदा Sad आम्हाला नाही कूर्गी जेवण मिळालं. आम्ही पुन्हा गेलो की होमस्टे घेणार आहोत. म्हणजे छान कुर्गी जेवण जेवायला मिळेल.