"आजोळचे दिवस"

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मी तसा मुळचाच खुप नॉस्टेल्जिक माणुस... मला माझा आजचा 'आज', उद्या परवा 'काल' म्हणुन आजच्या 'आज' पेक्षा जास्त आवडतो... असो! "आजोळचे दिवस" हा तर माझा सगळ्यात आवडता नॉस्टेल्जिया!
या आठवणी सुरु होतात साधारणत: मी पहिली-दुसरीत असल्यापासुन... त्याकाळी आम्ही रहायचो इस्लामपुरला आणि माझे आजोळ कोल्हापुर, म्हणजे जेमतेम एका तासाच अंतर, त्यामुळे फारच फ्रिक्वेंटली आजोळी येणं व्हायच.
बर्‍याचदा शनिवारची शाळा झाली की आमची स्वारी दुपारच्या एसटीने कोल्हापुरला यायची... कोल्हापुर स्टँडवरचं यळगुड दुध आणि सहकारची बिस्कीटे हे सगळ्यात पहिल आकर्षण... तिथच पहिला स्टॉप पडायचा.
त्याकाळी आमच घर होत मिरजकर तिकटीला, पोतनीस बोळात.... आज्जीआजोबा, मामामामी, मामेबहिणी असं एकदम भरल घर होत, मावशीही कोल्हापुरातच रहायची आणि येणंजाणंही खुप असायच त्या घरात.... चांगल पाच खोल्यांच ऐसपैस घर होत तिसर्‍या मजल्यावर, शिवाय ऐसपैस गॅलरी आणि भलीमोठ्ठी गच्ची! दिवाळी-मे महिन्याच्या सुट्टीत जेंव्हा सगळी भावंड एकत्र जमत तेंव्हा तर धम्माल चालायची नुसती!
साधारण ८६-८७ चा काळ असेल तो.... तर आजोळच्या सुट्टीत आमचा दिवस सुरु व्हायचा भल्या पहाटे सहा-साडेसहा वाजता... गोधडीची उब सोडता सोडवत नसे पण तरीही मस्त दुध-बिध पिउन सगळी बच्चे कंपनी आणी आज्जीआजोबा अशी प्रभातफेरी निघे रंकाळ्याला... आज्जीआजोबांचे फिरुन होइपर्यंत आम्ही मस्त मनसोक्त झोपाळे घसरगुंड्या खेळुन घ्यायचो... घरी परतेपर्यंत जाम भुक लागलेली असायची.... मग गच्चीवर किंवा गॅलरीत आमची पंगत बसायची... त्यावेळचा नाश्ता म्हणजे एकतर आटवलभात, उप्पुतुप्पु किंवा दुधगुळ पोहे नाहीतर भाजलेली कणिक किंवा मस्त तुपसाखर पोळी!
मग बंबाच्या उन्-उन पाण्यात मस्त आंघोळी आणि त्यासाठी नंबर लागायचे (आणि शेवटच्या नंबरासाठी भांडाभांडी).... आंघोळी-बिंघोळी झाल्या की मस्त पत्त्यांचे डाव पडायचे किंवा नवा व्यापार नाहीतर काचाकवड्या वगैरे!... पण गँग जरा जास्त असली की हमखास अंधारी लपंडावची टुम निघायची... मस्त खिडक्या दारांना चादरी-बिदरी लावुन टेबलाखालचे, ट्रंकेमागचे अंधारे कोपरे शोधले जायचे लपायला आणि तास्-दोन तास मस्त धुडगुस चालायचा. आजोबांचा ओरडा पडेपर्यंत .... कारण एव्हाना त्यांच्या शिकवण्यांची वेळ झालेली असायची.... माझे आजोबा बॉटनीचे प्राध्यापक होते राजाराम कॉलेजला!
त्यांच्याकडच्या सुक्ष्मदर्शकाचे त्याकाळी कोण आकर्षण होते आम्हाला.... फावल्या वेळात आजोबांचा डोळा चुकवुन आम्ही कसले कसले डिसेक्शन करुन महान महान शोध लावत बसायचो!
दुपारी परत ऐसपैस पंगत बसायची... एकुण यच्चयावत भाज्यांशी आम्हा पोरांचे भांडणच असायचे त्याकाळी... आणि उगीच प्रत्येकाच्या आवडीनिवडी विचारुन स्वयपाक वगैरे असले फाजील लाड नसायचे... मग मस्त गुळांबा, साखरांबा, टोमेटोचा पाक आणि शेंगदाण्याची चटणी असले मित्र मदतीला यायचे!
त्यानंतर दुपारचा वेळ हा वाचनाचा असायचा... आजोळच्या घरी पुस्तके ही खुप आणि शिवाय आम्ही सगळे जमणार म्हणुन वेगवेगळ्या वाचनालयातुन खुप सारी पुस्तके आणुन ठेवलेली असायची.... मग प्रत्येक जण आपापल्या वयानुसार पुस्तके उचलायचा आणि मस्त एखादी खिडकी, ध्यानाची खोली, गॅलरी किंवा जिन्याच्या पायर्‍या अशी कुठलीही जागा पकडायचा आणि पुस्तकांच्या दुनियेत रमुन जायचा.... राजपुत्र्-राजकन्या, जादुगार आणि उडत्या चटया, दुष्ट राक्षस हे सगळे किती खरे वाटायचे त्याकाळी... अगदी स्वप्नातही यायचे!...... पुढे मग प्रत्येक सुट्टीमध्ये वाढत्या वयानुसार पुस्तकांची आवडही बदलत गेली... म्हणजे पहिल्यांदा जादुची पुस्तके, मग चांदोबा-चंपक नंतर हितोपदेश्-इसापनिती, अकबर्-बिरबल वगैरे मग पुढच्या एखाद्या सुट्टीत ऐतिहासिक वगैरे!
दुपारच्या वाचनात ब्रेक असायचा तो म्हणजे आइसक्रीम कांडीचा... अडीच्-तीन च्या सुमारास "पेरिना"ची ढकलगाडी घंटा वाजवत यायची... व्वा!... आजही त्या कांडीची चव जिभेवर तशीच आहे!
संध्याकाळचा चहा झाला की आम्ही सायकली घेउन विठोबा मंदिरात जायचो... नळीखालन पाय टाकुन हाफ पँडल मारत सायकल चालवता यायला लागली होती तेंव्हा जग जिंकल्याचा आनंद झाला होता... कधी कधी मग भाड्याने छोट्या किंव्वा लेडिज सायकली आणल्या जायच्या... तासाला आठाणे... आता आठ्वुन आठवुन हसु येत.
सायकली फिरवुन झाल्या की मग मस्त विषामृताचा डाव पडायचा किंवा जोडसाखळी!
तिथुन परतताना हमखास स्टॉप असायचा कोपर्‍यावरच्या सरदेसांईच्या दुकानात... तिथे मग पारले, रावळगाव, पेपरमिंटनी खिसे भरले जायचे... कॅडबरी-बिडबरी प्रकार फारसे दिसायचेच नाहीत तेंव्हा... आमच्यासाठी सगळ्यात श्रीमंत चॉकलेट म्हणजे "डॉलर".... डॉलरसारखे दिसणारे सोनेरी वेश्टन असणारे गोल चॉकलेट!
संध्याकाळचा उरलेला वेळ मस्त चिरमुर्‍या शेंगदाण्याची भेळ खात आणि गप्पा मारत वरती गच्चीवरती (ज्याला आम्ही पत्र्यावरती म्हणत असु) जायचा किंवा मग मोठे कोणीतरी आम्हा सगळ्या लहान भावंडांना घेउन पद्माराजे समोरच्या बागेत किंवा अंबाबाईच्या देवळात घेउन जाई.... म्हणजे मोठ्या लोकांना किंवा ताई-दादा लोकांना जेंव्हा सिनेमाला जायचे असेल तेंव्हा तर आमचा पिच्छा सोडवण्यासाठी हा बेत हमखास आखला जायचा... म्हणजे कालांतराने थोडे मोठे झाल्यावर हेच डावपेच आम्ही आमच्या लहान भावंडांवर वापरले Wink
रात्रीचे जेवण म्हणजे अजुन एक धम्माल गोष्ट असायची.... जेवणापेक्षा सुद्धा जास्त वेळ चालायच्या त्या अगदी हात वाळेपर्यंत चालणार्‍या कौटुंबिक गप्पा.... इचलकरंजीच्या (म्हणजे माझ्या आईच्या आजोळच्या) वाड्यातल्या आठवणी, मामा-मावश्यांचे लहानपणीचे किस्से-खोड्या.... फार मज्जा यायची हे सगळे ऐकायला...
घरात टीव्ही होता पण त्याकाळी खंडीभर वाहिन्या नव्हत्या... दुरदर्शन झिंदाबाद!... पण कोणी आजच्यासारखे अ‍ॅडिक्ट नव्हते त्याकाळी.... बुनियाद, नुक्कड वगैरे मात्र न चुकता पाह्यल्या जायच्या.
जेवणं झाली की एव्ह्ढ्या लोकांसाठी अंथरुण घालणं आणि सकाळी ती काढणं हे एक अतिशय बोअर काम असायच! मग अंथरुणावर पडल्या-पडल्या विविधभारती ऐकायचे किंवा आडव्या टेपरेकॉर्डरवर मामाने रेकॉर्ड करुन आणलेल्या सोनीच्या ९० M जुन्या गाण्यांच्या कॅसेट्स लावल्या जायच्या... लता, रफी, मुकेश, तलत! (जुन्या गाण्यांची आवड लागण्यात या दिवसातल्या श्रवणभक्तीचा फार मोठा वाटा.)
दिवसभरातल्या दमणुकीने झोप कशी लागायची कळायचेच नाही... सुट्टीचे पंधरा-वीस दिवस असेच निघुन जायचे.... डोळे अगदी काठोकाठ भरुन यायचे निघायच्या दिवशी आणि पाय तर असे जड व्हायचे... वाटायचे... वाटायचे की हे पंधरा दिवस मागे जाउन परत जगावेत... संपले की परत रिवाइंड करता यावेत!

पाचवी-सहावीत जाईपर्यंत आमच्या सगळ्या सुट्ट्या अश्याच गेल्या थोडेफार तपशील वगळता... म्हणजे झोपाळा घसरगुंडीची जागा बॅडमिंग्टन्-कॅरम ने घेतली, दुध-बोर्न्व्हिटा बंद होउन रीतसर चहा सुरु झाला, पारले रावळगावच्या जागी जेम्स आणि 5 स्टार आल्या, वाचनाची पुस्तके बदलली आणि अधुनमधुन सिनेमाला आम्हालाही नेले जाउ लागले... पण बाकी एकुण सुट्टीचा पॅटर्न तोच!

त्याच दरम्यान आम्ही सातारला शिफ्ट झालो आणि आज्जीआजोबा गावातले घर सोडुन मुडशिंगीला नव्या बंगल्यात रहायला गेले... उचगावच्या थोडे पुढे आणि मुडशिंगीच्या अलीकडे अशी १०-१५ बंगल्यांची एक कॉलनी वसवली होती.... मध्ये मोठ्ठे गोल ग्राउंड (आम्ही त्याला मुडशिंगीचा माळ म्हणायचो) आणि बाजुने सगळे बंगले असा एकंदर थाट होता... त्यातली बरीचशी घरे ही आमच्या नात्यातली नाहीतर अगदी चांगल्या ओळखीतल्यांचीच होती... त्यामुळे आमच्या तिथल्या सुट्ट्या म्हणजे नाश्ता एका घरात, आंघोळ दुसर्‍या घरात, जेवायला तिसरीकडे आणि झोपायला चौथ्याच घरात असा एकंदर मामला असायचा.... एखाद्याला शोधायचे म्हणजे महा जिकिरीचे काम.... सुट्ट्या संपताना चार घरात पसरलेले आम्हा भावंडांचे कपडे आणि इतर वस्तु शोधुन बॅगा भरताना आमच्या आई-बाबांच्या नाकीनऊ यायचे!

त्यादरम्यान माझी मावसभावंडे कॉलेजला जायला लागलेली आणि अस्मादिकांनाही हायस्कुल प्रवेशामुळे शिंगं फुटायला लागलेली.... एकुणच लाइफस्टाईल हळुहळु बदलायला लागलेली... सकाळचे लवकर उठणे- फिरायला जाणे एकदम बंद झालेले... नाश्त्याच्या फर्माइशी सुरु झालेल्या..... आटवल भात आणि दुधपोह्याची जागा मॅगी, ऑम्लेट किंवा सँडविचेस नी घेतलेली.... म्हण्जे पोहे-उप्पीट प्रकार असायचेच पण ते कुठले आता आम्हाला चालायला!
नाश्त्यानंतर मस्त टीव्हीपुढे लोळत पडायचे.... एव्हाना केबल-बिबल सुरु झालेले मग काय कार्टुन नेटवर्क, डेनिस द मेनिस, स्मॉल वंडर किंवा मग कुठल्याही मॅचेस काहीही चालयच बघायला.... बारा-एक वाजता कधीतरी आंघोळी व्हायच्या मग जेवणं नी परत टीव्ही नाहीतर व्हिडिऑगेम्स... कधीमधी कॅरम.... वाचन वगैरे एव्हाना बोअर करायला लागलेल.... चुकुन काही वाचलच तर 'जी' नाहीतर 'षटकार' सारखी मासिके किंवा पुल वगैरे!
संध्याकाळच्या चहानंतर आम्ही भावंडे आणि कॉलनीतली इतर मुले जमुन मोकळ्या माळावर मस्त मनसोक्त क्रिकेट किंवा फुटबॉल खेळत असु.... याच माळावर मी दुचाकी (द ग्रेट लुना) चालवायला शिकलो होतो!
कधी खेळायचा कंटाळा आला असला तर मस्त घरातले सगळे जण फिरायला बाहेर पडायचो.... MSEB चा गणपती, उजळाईवाडीची टेकडी, महावीर गार्डन किंवा थेट युनिव्हर्सिटीपर्यंत फिरुन यायचो!
एव्हाना रंकाळा हे प्रभातफेरीला नाही तर संध्याकाळीच फिरायला जायचे ठिकाण आहे हेही कळायला लागलेलं... त्याकाळी मुडशिंगीहुन गावात यायला जोडबस होती.... ते अजुन एक आकर्षण.
खास्बागची मिसळ, राजारामपुरीजवळची एक खाउगल्ली, भवानी मंडपातला चाट, सोळंकी अशी अनेक तीर्थक्षेत्रे हळुहळु माहिती व्हायला लागलेली आणि दर भेटीगणिक त्या ठिकाणावरची श्रद्धा आणिकाणिक दृढ होत चाललेली Happy
दर सुट्टीत एखादा तरी पिक्चर व्हायचाच... उमा, बसंत्-बहार, पार्वती अशी काहीकाही नावे आठवतायत थिएटर्सची... शिवाय एकदातरी VCR भाड्याने आणुन मस्त रात्र जागवायचा प्रोग्राम व्हायचाच... ते VCR चे भाडे वसुल करायला एका रात्रीत चार-चार पिक्चर्स बघितले जायचे... मग त्यात मामामावशी लोकांसाठी एखादा शम्मीकपुर किंवा देवानंदचा एव्हरग्रीन सिनेमा असायचा, ताई-दादा लोकांची फर्माईश म्हणुन एखादी लव्हस्टोरी ("आशिकी" टाईप), आमच्यासाठी म्हणुन एखादा अरनॉल्ड, बॉन्ड, ब्रुसली मंडळींचा मारधाडपट आणि खास लोकाग्रहाखातर एखादा कौटुंबिक रडुबाईपट किंवा अशोक्-लक्ष्याची एखादी कॉमेडी... हा एकदम ठरलेला पॅटर्न.... बिल्कुल बदल नाही!
तो VCR वाला एकदा येउन सगळ अ‍ॅडजेस्ट करुन देईपर्यंत जीवात जीव नसायचा... प्रत्येक एका सिनेमानंतर कॉफी-ब्रेक व्हायचा.... हेड्-क्लिंनिंगची कॅसेट फिरवुन घ्यायला तेव्हढाच वेळ मिळायचा!
की परत पुढचा पिक्चर सुरु!.... आता आठवल की जाम हसु येत पण त्या त्या काळातली क्रेझ होती ती!
प्रत्येक सुट्टीत एकदोन वाढदिवस यायचेच.... त्याचे मग जंगी सेलिब्रेशन असायचे... ज्याचा वाढदिवस त्याच्या नकळत गिफ्ट्स आणली जायची.... मग त्याला चोरी-चोरी गिफ्ट-रॅप केले जायचे.... मस्त पैकी गच्ची सजवली जायची.... भला -मोठा केक आणला जायचा आणि त्यानंतर व्हायची डान्सपार्टी.... यच्चयावत सगळ्यांना नाचणं कंपल्सरी असायचं.... एकुणच फार कॉमेडी प्रकार असायचा ही डान्सपार्टी Wink

सुट्टीचा हा पॅटर्नही बरेच वर्षं चालला.... मग पुढेपुढे आम्ही भावंडे इंजिनिअरिंग-मेडिकलला गेल्यानंतर दिवाळी-मे महिन्याच्या सुट्ट्या बंद झाल्या... त्यावेळी नेमक्या पीएल नाहीतर परिक्षा असायच्या.... हळुहळु कोल्हापुरातली भावंडे ही आपापल्या करिअरच्या निमित्ताने बाहेर पडली... पुण्या-बेंगलोरात शिफ्ट झाली आणि सुट्टीतले आजोळ बंद झाले ते कायमचेच!

तसे आजही आम्ही सगळी भावंड वरचेवर भेटतो.... एकमेकांचे वाढदिवस, रक्षाबंधन, भाउबीज यानिमित्ताने जमेल तसे जमतील ते एकत्र येतो किंवा वर्षा-सहा महिन्यातुन पुण्याजवळच्या एखाद्या रिझॉर्टला जमतो, खुप धम्माल करतो, मस्ती करतो.... लहानपणीच्या त्या आजोळच्या सुट्टीत विणले गेलेले नात्यांचे बंध अजुन तेव्हढेच घट्ट आहेत, मनात अजुन तेव्हढीच ओढ आहे.... त्यामुळेच खुप एंजॉय करतो आम्ही ही गेट्-टुगेदर्स.... पण तरीही त्याला कोल्हापुरच्या त्या दिवसांची सर येत नाही.... अश्या प्रत्येक गेटटुगेदर नंतर अजुनच तीव्रतेने आठवतात ते दिवस!.... most nostelgic.... "आजोळचे दिवस".

विषय: 
प्रकार: 

सुंदर.
गावे वेगळी असली तरी मुलांचे सुटीत वेळ घालवण्याचे मार्ग साधारण सारखेच असतात.
आवडलं हे स्मरणरंजन. Happy

किती छान लिहिलय. अस वाटल कि माझ्याच लहानपणचे दिवस लिहिलेत. Happy
काचाकवड्या , पेरिना आईसक्रीम ,भाड्याने आणलेला व्हसीआर सगळ अगदी तेच. सगळ्या कोल्हापुरी लोकांच्या फिरण्याच्या जागा सुद्धा अगदी सेम Happy मस्त आवडल एकदम.

खूपच छान लिहीलय स्वरूप. अगदी माझे लहानपण आठवल.
आता आजी आजोबा नाही राहिले, सगळे मुंबई पुण्यात सेटल ,त्यामुळे बरेच वर्षे आजोळी जाणे नाही. पण आठवणी आजही ताज्या आहेत.

एकदम मस्त वाटलं वाचून Happy वीसीआर बद्दल अनेक मोदक. आमच्याकडेपण थोड्याफार फरकाने तेच चालायचे. छान दिवस होते ते.

काय मज्जा यायची न ! आमच्या पण आजोळी अशीच धमाल करायचो..आपल्यासारखे हे बालपण आता आपल्या मुलांच्या वाट्याला येत नाही म्हणुन वाइट वाटते.

लेख खुपच छान झाला आहे. मला ही माझे लहानपण आठवले. वीसीआर ,पेरिना ( एक फेमिला नावाचे ही होते) ,काळी मैना सगळी धमाल होती. वाचून एकदम हळवं व्हायला झालं.

आवडले, थोड्या फार फरकाने सगळ्यांचे लहानपणीचे आजोळ असच असणार फक्त फिरण्याच्या जागा, खेळ थोडेफार वेगळे. आता मोठे झाल्यावर जगातल्या कुठल्या कुठल्या कानाकोपर्‍यात रहायला गेलेली सगळी भावंड, आणि आजी आजोबाही नाहीत त्यामुळे आजोळ तुटले ते मात्र कायमचच, आठवणी मात्र खूप आहेत या सगळ्याच्या.

माशा, रुनि, रुपाली, डेफो..... धन्यवाद!

माशा, हो फेमिला पण असायचे!
आणि कोल्हापुरात शिरतानाची जंबो आईसक्रीमची फॅक्टरी पण आठवतीये पण ते जंबो आईसक्रीम कुठे मिळायचे कुणास ठाउक.... कधी खाल्ल्याचे आठवत नाही!

मस्तच .. Happy कोल्हापृला फार जाऊन नाही पण सगळी ठिकाण माहिती आहेत.. आम्ही पण सातारला आजोळी अशीच धमाल करायचो त्या दिवसांना तोड नाही .. एकूण काय आपल्या वेळी हे असच होतं.. आताच्या मुलांचे वेगळे असतील न नोस्ताल्जीया .. Happy .. गोवा , गणपती पुळे कुठले तरी रीझोर्त, वाटर पार्क .. जो पर्यंत सगळे भावंड एकत्र येतात तो पर्यत ह्या आठवणी नक्कीच राहतील..

खुप आवडल. रुनि म्हणतेय ते खरय सगळ्यांच्या आठवणि थोड्याफार फरकाने अश्याच. भाड्याचि सायकल (दरहि सारखे) आणि व्हिसीआर अगदि तंतोतंत. आणि त्या श्रीमंत चॉकलेट्स ना आमच्याकडेहि (नागपुर) डॉलरच म्हणायचे. दिनार आणि डॉलर म्हणजे त्या त्या देशांतलि सोन्याचि नाणि (पक्षि मोहरा) असतात असा आमचा (म्हणजे पहिलि/दुसरिच्या अख्ख्या वर्गाचा) ठाम समज होता आणि आखाति देशात पेट्रोल फुकट आणि पाणि विकत मिळत हा पण Happy

मस्त लेख...
आजोळी जाउन आल्यासारखे वाटले...
अगदी हेच सगळे करायचो आम्ही आमच्या लहानपणी Happy

त्या 'श्रीमंत' चॉकलेटच्या कव्हरच्या आणि दुधाच्या बाटलीच्या कव्हरच्या (झाकणाच्या) रिक्षा करायचो आम्ही.... म्हणजे त्या कव्हरम्ध्ये काचेची गोटी घालुन ती कव्हर मागच्या बाजुने चेपवायची आणि घरंगळत सोडुन दिली की अगदी सीटा गोळा करत फिरणार्‍या रिक्षांसारखी दिसायची!

काय लहानपणीचे खेळ एकेक Happy

फार छान. Happy

पेरिना कँडी, डॉलरचं चॉकलेट वगैरे सगळं एकदम अस्सच मीही अनुभवलं आहे कोल्हापुरात. तेच ८६-८७ किंवा जरा पुढे-मागे असेल दोनेक वर्षं. पण सगळं आठवलं.
अजुन एक तु(म्हा)लाही कदाचित आठवेल ते लिम्का किंवा तत्सम 'कोल्ड्रिंग'च्या 'बिल्ल्या'ला दगडानं सरळ करुन त्याची''भिंगरी' करायची, ती फिरवत बसायचं. ती फिरली की दोर्‍यावर कसा ताण येतो ते बघुन कुतुहल आणि तो आवाज ऐकायला कानाजवळ नेणं. Happy
अजुन एक म्हणजे 'राजवष्टर'/'राजवड्डर'. हारणार्‍यानं लंगडी घालताना म्हणायचं ते गाणं का काय ते मात्र काही केल्या लक्षात येईना झालंय आत्ता Sad