कोहोजगड.. अधुर्‍या ट्रेकची कहाणी !!

Submitted by Yo.Rocks on 1 October, 2009 - 08:12

सध्या एकामागुन एक ट्रेक्स झाले.. त्यामुळे ठरवले होते लांब कुठे जायचे नाही.. रविवार् नि सोमवारी रमझान ईदची सुट्टी लागुन आली होती तरीही कुठे जावेसे वाटत नव्हते..! त्यात हा ऑक्टोबर हिट सालाबादाप्रमाणे सप्टेंबरमध्येच सुरु झाला.. पण झाले काय.. अख्खा रविवार कंटाळा करण्यात गेला नि अजुन सोमवार बाकी होता नि सांजवेळेस पुन्हा ट्रेक्सचे विचार मनात येउ लागले.. मित्रालाही समस पाठवला तर रात्री कळवतो म्हणुन आशादायी प्रतिसाद आला.. पण जायचे कुठे हा प्रश्न्न होता.. आता पुन्हा कर्जतला तरी जावेसे वाटत नव्हते.. कुठेतरी जवळपास वेगळ्या ठिकाणी जायचे ठरवले.. नि नेट ऑन केला.. क्षणात विरार्-पालघर आठवले.. नि तिकडच्या गडांबद्दल माहिती मिळवताना एक नाव समोर आले "कोहोजगड" ! वर्णन वाचुन हा गड सोप्पा अर्ध्याएक दिवसात करण्याजोगा वाटला.. नि त्यात पालघरच्या दिशेला कधी गेलो नव्हतो..
कोहोजगड.. पायथ्याचे गाव वाघोटे.. तिथे जाण्यासाठी पालघरहुन वाडयाला जाणारी एसटी पकडावी लागते.. या गडाला काहि विशेष इतिहास नाही.. पण तिथे एकदोन मंदिरे नि निसर्गनिर्मीत माणसाच्या आकाराचा पुतळा ही वैशिष्ट्ये बघुन हाच गड करायचे ठरवले..
रात्री मित्राचाही समसद्वारे होकार आला पण त्याची 'पाचच्या आत घरात' अशी अट होती.. मी सोसायटीतल्या अजुन एका मित्राला (ट्रेकसाठी नवखा) विचारले नि तोदेखील "सोप्पा ट्रेक आहे" कळल्यावरच येतो म्हणाला.. रात्री उशीरापर्यंत बोरिवली-विरार ट्रेन नि विरार-डहाणु शटल यांचे वेळापत्रक शोधण्यात वेळ गेला.. शेवटी बोरिवलीला पहाटे ५.१५ वाजता भेटण्याचे ठरवले जेणेकरुन विरारवरुन ६.१५ ची शटल पकडता यावी (हीच एक वेळ कळली होती)...
नेहमीप्रमाणे वेळेत भेटण्यास उशीर झाला.. नि अपेक्षेप्रमाणे शटलही चुकली. (मला असे होण्याची शक्यता वाटत होती त्यामुळे मी तसा "प्लॅन बी (अर्नाळा किल्ला)" पण तयार ठेवला होता.. पण तिथे चौकशी केली असता लक्षात आले की अजुन एक वसईहुन येणारी शटल आहे ७.०५ ची.. म्हटले चला अजुन कोहोजगड ट्रेक ऑन आहे तर.. Happy वेळ बराच असल्या कारणाने मी दोघांनाही नाश्तापाणी करण्याचे सुचवले.. पण दोघेही तयार नव्हते.. 'पुढे बघु' असा नारा होता.. पण मला भिती होती कारण आधीच एक तास उशीर झाला होता त्यात पुढे पालघरहुन जर सलग एसटी मिळाली तर खाण्याचे वांदे.. कारण वाघोटे इथे खाण्याची काहीच सोय नव्हती.. आणि आम्ही तिघांनी मिळुन चार पाण्याच्या बाटल्याच आणल्या होत्या.. नि खाण्यासाठी ८-१० च लाडु..
तासभरातच शटल आली नि आम्ही तसेच उपाशीपोटी मार्गस्थ झालो.. सकाळी शटलच्या दरवाज्यावरच बसुन थंड हवेचा नि बाहेरील निसर्गाचा आस्वाद घेण्याची मजा औरच ! त्याचवेळी लागलेल्या खाडीतले हे दृश्य
Image017.jpg

तासभरातच आम्ही पालघर गाठले.. नि आम्ही एसटी स्टँड चौकशी केंद्राकडे वळालो.. "वाड्याला जाणारी ८.०५ ची एसटी उभी आहे ती असेल तर बघा नंतर डायरेक्ट ९ ची गाडी आहे" हे मास्तरांनी सांगताच आम्ही एसटीच्या शोधात धावत बाहेर आलो.. नशिबाने आम्हाला सुटलेली एसटी थांबवण्यात यश आले नि 'वाघोटे' थांबा आला की सांगा म्हणत बसलो.. पालघरहुन अर्धा पाउण-तास आहे म्हटल्यावर माझ्या दोन्ही मित्रांनी माझ्यावर जबाबदारी टाकुन निर्धास्तपणे डुलक्या काढायला सुरवात केली.. पण मला टेंशन होते नाश्तापाणी नि जेवणाची.. काहिच सोय केली नव्हती नि तिथे काहि नाहि मिळाले तर बोंब सगळी ! तरी बरे मध्ये मनोरला एसटी काहि मिनीटांसाठी थांबली नि मी लगेच एकाला उठवुन बिस्कीटचे पुडे आणायला सांगितले.
मनोर गेल्यानंतर पंधरावीस मिनीटातच आम्ही वाघोट्याला उतरलो.. नि आजुबाजुला कुठे डोंगर दिसतो का पाहिले.. नि भलामोठा डोंगर रस्त्याच्या पलिकडे उभा असलेला दिसला.. माथा नेहमीप्रंमाणे ढगांमध्ये गायब.. त्या डोंगराकडे बघताच नवख्या ट्रेकरने "नक्की इथेच जायचेय का ? चढणार कसे ? एका दिवसात झेपणार का?" अश्या नेक प्रश्न्नांची सरबत्ती सुरु केली.. आम्ही केवळ स्मितहास्य करत "चल, होईल सगळे ठिक" म्हणत पलिकडच्या वाटेने पुढे गेलो.. गोळा केलेल्या माहितीप्रमाणे एक प्रेमवाल्या बदामी (Heart Shaped) आकाराचे तळे लागले.. ! ह्या तळ्याचा आकार खरच थक्क करणारा आहे..
hearthshapedlake.jpg
इथे जवळपास कुठे टेकडी असती तर वरतून हे छोटे तळे बघायला सहीच वाटले असते..

त्या तळ्याला लागुनच असलेल्या वाटेने आम्ही पुढे चालत होतो.. तिथेच एक वयस्कर काका भेटले ज्यांना आम्ही 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' फेम निळुकाका नाव पण लगेच ठेवुन दिले.. आम्ही विचारले नव्हते तरी ते आम्हाला शेतीतला रस्ता दाखवत, "गाईडगिरी" करत आमच्याबरोबर चालु लागले ! (तेव्हाच कळले त्यांना स्वतःसाठी चायपाण्याची सोय करायची होती ) फक्त एवढच कि ते मागाहुन येत होते नि आम्ही बरेच पुढे होतो.. 'अरे म्हातारा माणुस मी, हळु चाला' ओरडत होते.. तर आम्ही 'या तुम्ही हळुहळु.. सांभाळुन या' सांगत पुढे जात होतो.. पुढे ही वाट उजवीकडे वळते नि कोहोजगडाच्या दिशेने वाट जाउ लागते..
Image054.jpg
इथे आजुबाजुचा परिसर बघुन तर अगदी आमच्या कोकणात गेल्यासारखे वाटत होते.. पुढे एका वाटेकरुला 'पारझर तलावा'बाबत विचारले.. हे तलाव म्हणजे गडाच्या अगदी पायथ्याशी पोहोचल्याची खुण.. 'थोड्या अंतरावरच आहे' असे कळल्यावर आमची उत्सुकता वाढली.. या तलावाचे वैशिष्ट्य असे की कोहोजगडाच्या डोंगराचे पुर्ण प्रतिबिंब या तलावात समावते !!! काहि अंतर चालुन गेल्यावर हा विशाल तलाव एकदमच समोर आला ! नि आम्हि थबकलोच ! "अहाहा" "सुपर्ब" "लवली" उद्गार नाही निघाले तर नवलच.. क्षणभर आम्ही तिघे नुसते बघतच राहिलो ! सकाळची निरभ्र शांतता, विशाल तलावाच्या पाण्याची स्तब्धता नि त्या स्तब्धतेमुळे पाण्यावर उमटलेले कोहोजगडाचे स्पष्ट प्रतिबिंब !!! फोटोग्राफी करणार्‍यांसाठी मस्त स्पॉट ! आम्ही कोणीही डिजी कॅम घेतला नव्हता पण आम्ही डोळ्यांनीच ते निसर्गसौंदर्य टिपत होतो ! Happy
kohojgad.jpg
-------
Image062.jpg
आमचे निरीक्षण चालु असतानाच निळुकाका पोहोचले..! त्यांनी तलावाची खोली जवळपास ५० फुट (!!!) आहे असे सांगितले.. हे खरे- खोटे माहित नाही पण त्या पाण्यात उतरुन तोंडावर पाणी मारण्याचा मोह झालाच.. पण पाणी वाटले तितके थंड नसल्याचे जरा नवलच वाटले . Sad येताना निदान काठावरच्या पाण्यात डुंबायचे ठरवले नि आम्ही पुढे निघालो.. ! पण नवखा ट्रेकर "इकडेच बसुन वेळ काढुया.. सहि स्पॉट आहे.. कशाला वरती चढायचे.. " सांगु लागला.. Happy
तिकडुन निघण्यापुर्वी त्या निळुकाकांची एक गंमत सांगतो.. मी तलावाकाठी निळुकाकांना मित्रासोबत फोटोसाठी उभे रहायला सांगितले.. त्यावर ते म्हणाले."काय माझा फोटो !! नकोरे रे बाबा, मी पायात चप्पल घातलिये" Lol

आता पुढची वाट त्या तळ्याच्या बाजुनेच जात होती.. बाजुने जातानाही तळ्याकडेच बघत जात होतो.. इथे पाण्यातच असलेली एक विहीर दिसते..
reflection6.jpg
काहि वेळेतच जंगलातली वाट सुरु झाली.. आता कुठे खर्‍या जंगलाची सुरवात होत होती..
vaat.jpg
इथेच निळुकाकांनी चहापाण्याचे पैशे घेउन आमचा निरोप घेतला.. खरे तर ट्रेकला आता सुरवात झाली होती.. 'पुढे जंगलातुन याच वाटेने जा' असा सल्ला त्यांनी दिला.. वाटेत "बाणाच्या" पण खुणा (arrowe marking) आहेत असेही त्यांनी सांगितले.. नि आम्ही तिघे झाडाझुडुपातुन जात असलेल्या वाटेने चढु लागलो.. एव्हाना जरी गरमी जाणवत होती पण आजुबाजुच्या झाडाझुडुपांच्या सावलीचा दिलासा मात्र मिळत होता.. एका ठिकाणी क्षणभर विश्रांती घेउन आम्ही पुढे वाटचाल करु लागलो.. (इथुन खरी गोंधळाला सुरवात झाली Sad )
काहि अंतरावरच दोन पुसट पाउलवाटा लागल्या.. एक उजवीकडे नि दुसरी डावीकडे.. गड उजवीकडे झुकला असल्याने आम्ही अंदाज घेत उजवी वाट पकडली.. पण वाट सरळच जात होती वर चढतच नव्हती.. बर्‍याच वेळेनंतर एका ठिकाणी वर चढली पण तिथे भेटलेल्या लाकुडतोड्याने आम्ही चुकीच्या वाटेवर असल्याचे निदर्शनास आणुन दिले.. आता एवढे कुठे मागे फिरायचे म्हणुन त्यानेच एका झाडीझुडुपात शिरायला सांगितले.. जी मुख्य वाटेस मिळणार होती.. त्याच्या सांगण्याप्रमाणेच आम्ही वाट बनवली !! नि पुढे सरावलो.. पुढे त्याच्या सांगण्याप्रमाणे आम्ही डावीकडे वळालो.. बरेच अंतर चालुन गेलो पण वाट भरकटवतेय असे वाटु लागले.. जर वाट वरती जात नसेल तर काही चुकलेच समजा.. नशिबाने अजुन एक पुढे लाकुडतोड्या दिसला.. त्यानेदेखील दुरवरच्या झाडापर्यंत अजुन एक वाट बनवायला सांगितली !! "तिथे पोहोचलात की सरळ वर चढायला घ्या" ह्या त्याच्या सांगण्यानुसार आम्ही पुन्हा झाडाझुडपाच्या काटेरी वाटेत घुसलो ! पण गंमत अशी की नक्की कोणते झाड दाखवले होते तेच कळेना ! पुन्हा गोंधळ ! खुप पुढे गेलो तर फसगत व्हायची म्हणुन तिथेच थांबलो.. तोच एक मेंढपाळ आला नि आम्ही उभी होतो तिथुनच वरती वाट जात होती !! आता ही वाट आम्हाला दिसली नाही कारण ती वाट अशी नव्हतीच ! Proud खडकांवरती खडक नि त्यातुन अगदी निमुळती पुसटशी मातीची जी वाट होती ती वरच्या बाजुस सरकत होती.. नि तिथेच आम्हाला "arrow mark" आढळले.. म्हटले आलो मुळ वाटेवर.. Happy
नि पुढे चढु लागलो.. आता तर उंचपुरी गवतातुन चढणीची सुरवात झाली..
Image092_0.jpg
------
याच वाटेवर आधी कधीही न पाहिलेल्या नाकतोड्याची ओळख झाली.. खरे तर एवढ्या हिरव्या रानात नजरेस पडला हेच खुप होते.. त्याचे शरीर म्हणजे हिरव्या गवताची काडी नि पाय म्हणाल तर मोठ्या दुर्वा !!
grassstick0.jpg
--
grasssticke096.jpg
```````````````````````````````
(नेटवर शोधले असता कळले ह्याला "Grass Stick" असे म्हणतात )
````````````````````````````````
काही अंतर कापल्यावर आम्ही जवळपास उंची गाठली होती नि मघाशी दिसत असलेला विशाल तलाव आता मात्र छोटुसा वाटत होता
Image101.jpg
इतके उंचावर आल्यावर वाटले आम्ही जवळपास पोहोचलो.. कारण दोन पहाडांच्या मध्ये आलो होतो.. तो सगळा भाग मोठ्या गवताने व्यापला होता.. पण कसलीही खुण दिसत नव्हती.. आम्ही गवत आडवे करुन बघु लागलो तर मला डावीकडे वाट दिसली नि माझ्या मित्राला उजवीकडे सिमेंटचे छोटे बांधकाम दिसले ! ही माहिती नेटवर मिळाली होती.. बरेच वर्षापुर्वी एक उत्साही ट्रेकर इथे पडुन मरण पावला होता त्या स्मरणार्थ बांधले होते.. त्यामुळे हाच रस्ता समजुन माझ्या मित्राने तिथुनच सरळ पहाडावर चढाई सुरु केली !! तर मी डावीकडे पुढे जाउन काहि खुणा (निसर्गनिर्मीत पुतळा वा मंदिरे) दिसताहेत का पाहु लागलो.. कोणाला विचारावे तर तिथे वस्तीचाच पत्ता नव्हता.. पुढे काही नसावे याचा अंदाज घेत मी पुन्हा माघारी आलो तर हे दोघे शुरवीर बर्‍यापैकी चढुन गेले होते ! एक मित्र जवळपास तीनमजली उंचीच्या आसपास जाउन पोहोचला होता तर दुसरा नवखा ट्रेकर (हा भाई ट्रेक "सोप्पा" म्हटल्यावर केवळ स्लिपर्स घालुन आला होता !!) चाचपडत चाचपडत मध्यावर जाउन पोहोचला होता.. त्यांना वरती बघुन 'तुमच्या दोघांसाठीपण इथे खड्डा खणु का ?? ' म्हणुन विचारले Lol
मला दाट शंका येत होती कारण नेटवर अशा चढाईचा कुठेही उल्लेख नव्हता.. पण दोघे चढुन गेले म्हणुन मीदेखील चढायला घेतले.. या पहाडाचे वर्णन म्हणजे गवताची चादर ओढुन घेतलेला काळा कातळ..
Image111.jpg
थोडे अंतर चढुन गेल्यावर लक्षात आले 'च्यामारी.. उतरायचे कसे ! पहिला मित्र जिथे पोहोचला होता तिथुन तो अजुन वरती टोकावर जाता येईल का पाहत होता.. मी त्याला तिथेच थांबायला सांगितले.. आपण नक्की चुकलोय, भलत्याच ठिकाणी चढतोय असे वाटु लागले.. काहि सुचेनासे झाले.. वरती काय आहे की नाही ते चढुन गेल्याशिवाय दिसु शकत होते.. त्यातच उन्हाचे चटके बसु लागले.. या सगळ्या गोंधळात नवख्या ट्रेकरची पंचाईत झाली.. तो अगदी बसलेल्या स्पायडरमॅनची पोझ देत आखडुन बसला होता.. "काय ते ठरवा लवकर.. मी अजुन वरती नाहि चढणार" अशी ओरड चालु केली.. मी पुन्हा एकदा खाली पाहिले तर उतरणे खुपच धोक्याचे वाटले.. proper holds पण नव्ह्ते.. शेवटी दोघांना खाली उतरण्यास सांगितले.. प्रयत्न करुन आम्ही यशस्वी झालोही असतो पण त्या वेडेपणात जीव धोक्यात घालायचा नव्हता.. !
इकडुन उतरताना मात्र भांबेरी उडाली.. कसे उतरायचे तेच कळत नव्हते..
Image118.jpg
---
Image123.jpg

खाच्यात हात घालायचो तर कपचाच निघत होता.. बराच विचार करत, अंदाज घेत उतरु लागलो.. ह्यात आमचा बहुमुल्य वेळ नि तितकीच शक्तीही वाय गेली.. Sad नवख्या ट्रेकरचे तर हालच झाले.. त्याने आपली बॅग सरळ खाली भिरकावली(त्याच्या नंतर लक्षात आले त्यात मोबाईल होता !).. मग स्लिपर्सपण.. पण नेमकी ती निवडुंगाच्या झुडुपात एका बाजुला अडकली.. Proud
कसेबसे सरपटत दबकत गवताला मुठीत धरत आम्ही एकेक करुन खाली उतरलो.. नि सुटकेचा निश्वास सोडला.. नवख्या ट्रेकरला त्याचे सगळे सामान स्लिपर्ससकट परत मिळाले (फक्त मोबाईलला तडे गेले तो भाग वेगळा Happy )..
या सगळ्या व्यापात आमचा एक तास खर्ची गेला होता.. म्हटले ही सिमेंटची समाधी विसरणार नाही.. !!
या सावळ्यागोंधळात आम्ही ज्या वाटेने वर आलो होती तीच वाट पुढे गवताच्या जंगलातुन उतरणीला जात होती.. मघासपासुन त्या वाटेकडे आम्ही दुर्लक्षित केले होते पण कुठेच काही नाही म्हणुन शेवटी तोच पर्याय धरला.. चालत चालत आम्ही बरेच खाली जंगलात उतरलो.. नि थोड्याच वेळात एका खडकावर "arrow" दिसला.. झाले ! म्हणजे आधीचा डोंगर फसवा निघाला ! त्याच खडकापासुन पुन्हा वर चढणीची वाट सुरु झाली.. गर्द झाडीतुन जाणारी ही खडकाळ वाट भीमाशंकरच्या ट्रेकची आठवण देउन गेली.. पण आम्ही आता संकटात होतो.. कारण पोटात अन्न नव्हते नि पाण्याची केवळ एकच बाटली शिल्लक राहिली होती.. अर्ध्याएक तासाची चढण आम्ही पाच पाच मिनीटाच्या विश्रांतीने पार करत होतो.. दम निघत होता..
Image134.jpg
तहानवरती ताबा ठेवत आम्ही जिकरीने चढु लागलो ! हे हाल कमी म्हणुन की काय पुन्हा वाटेचा भुलभुलैय्या सुरु झाला.. विखुरलेल्या दगडांमुळे कळत नव्हते कुठुन वर जायचे ! उपाशीपोटी चुकीच्या मार्गाने जाणे मुर्खपणाचे होते.. त्यात ज्यांनी "arrow marking" केलीय तेदेखील धन्य असणार.. कारण दहा खडक धुंडाळल्यानंतर अनपेक्षितरित्या कुठल्या तरी नको त्या खडकावर खुण दिसत होती.. जस जशे वरती चढत होतो तशी आमची शक्ती कमी होत होती.. इथे कुणाचाही मागमुस नव्हता.. आतापर्यंत चढताना एक मात्र लक्षात आले होते की येथील स्थानिक लोकाचे पोटपाणी "लाकुडतोडी"वर अवलंबुन आहे.. बर्‍याच ठिकाणी भलीमोठी वॄक्ष कापलेली दिसत होती... नि त्यांच्या जंगलातील भटकंतीमुळेच अनेक वाटा तयार झाल्या असाव्यात..
आता आम्ही जिथवर पोहोचलो होतो तिथे कुणाचीही चाहुल नव्हती.. अचानक वरतुन काहिजणांचा आवाज,जल्लोष कानी पडला.. म्हटले वाट बरोबर आहे तर.. आता कुठेही न थांबता वरती पोहोचायचे असे ठरवुन आम्ही थांबत थांबतच माथा गाठला.. हुश्श ! Proud
पिवळ्याधमक सोनकीने फुललेले विस्तीर्ण पठार नजरेस पडले ! आम्ही तिघेही कुठे पाणी दिसते का शोधु लागलो.. समोरच छोटुसे मंदिर दिसले ! हे शंकराचे मंदिर होते ! डावीकडे पाहिले तर दुरवर पाणी दिसले नि आम्ही मोठ्या आशेने तिकडे मोर्चा वळवला.. पण जवळ जाताच पाण्यात बसलेल्या म्हशी बघुन आमची घोर निराशा झाली.. ह्या लागुन तीन चार टाक्या आहेत पण पिण्यायोग्य पाणीच नव्हते ! शेवटी तिथेच एका झाडाखाली आम्ही उताणे पडलो.. नावाला एक बिस्कीटचा पुडा उरल्यासुरल्या पाण्याबरोबर संपवला !
आमचे मामुली अन्नग्रहण चालु असतानाच त्या पठारावरील अजुनएक डोंगरावर काहीजण चढताना दिसले.. नि वरती पाहिले तर ज्यासाठी आलो होतो तो निसर्गनिर्मीत पुतळा नजरेस पडला ! तिथे जायची मी इच्छा प्रकट केली नि दोघांनीही स्पष्ट नकार दिला ! खरेतर मलाही तो साध्य असा डोंगर आमच्या वाईट स्थितीमुळे असाध्य वाटत होता.. Sad पाणी संपले तिकडेच ट्रेक संपल्यात जमा होता !
तासभराच्या विश्रांतीनंतर आम्ही आजुबाजुचा परिसर 'आलोच आहे तर थोडे बघुन घेउ' म्हणत उन्हाचे चटके खात नाईलाजास्तव धुंडाळु लागलो.. सभोवतालची दुरवर डोंगररांग पसरलेली दिसते.. या पठारावर जे मंदिर आहे त्यात शिवलिंग आहे..
Image172.jpg
---
Image164.jpg
एक लाजिरवाणी गोष्ट म्हणजे या मंदिरावर बाहेरुनच नव्हे तर आता चक्क देवीच्या मुर्तीच्या बाजुलापण रोमिओ लोकांनी नावे लिहीली आहेत Sad काय म्हणणार त्यांना..
आम्ही तिथुनच वर डोंगरावरती दिसणार्‍या पुतळ्याचे निरीक्षण करण्यात समाधान मानले !
Image150.jpg

खरे तर गडाच्या खाणाखुणा याच डोंगरावर चढल्यास आढळतात.. जिकडे कृष्णाचे नि मारुतिचे मंदिर आहे, कोरलेल्या काही पायर्‍या आहेत नि उंचावर गेल्यास तो पुतळा आहेच स्वागताला.. केवळ वार्‍यामुळे त्या डोंगरावरील खडकाला मानवी पुतळ्याचा आकार लाभला आहे.. हे सगळे आम्ही मिस केले.. हा पहिलाच ट्रेक जो अपुर्णावस्थेत राहिला..

आम्ही अगदी नाईलाजास्तव उतरण्यास सुरवात केली ! ५ ला घरी परतणे कठीण वाटु लागले कारण माघारी फिरतानादेखील आम्ही अक्षरक्षः भरकटलो ! त्यात लाकुडतोड्याने एक नको तो शॉर्टकट दाखवला.. धबधब्याचा मार्ग होता ! नशिबाने पाणी छोटुश्या झर्‍याला शोभेल इतकेच होते.. तेच पाणी मनसोक्त पिउन घेतले नि तिथुनच तंगडतोड करत उतरु लागलो... एका ठिकाणी तर आम्ही पुन्हा वरतीच जातोय की काय असे वाटत होते.. शेवटी कसेबसे आम्ही दिडतासात पुन्हा तलावापाशी पोहोचलो.. तिथुन पुन्हा एकवार आम्ही त्या डोंगराकडे टरकावुन पाहिले तेव्हा तो मानवसदृश खडक मुंगीपेक्षा लहान दिसत होता.. डोंगराचे हे सर्वोच्च टोक सकाळी मात्र दिसले नव्हते..
तिथेच काहिकाळ विश्रांती घेउन आम्ही पुढे गेलो ! पाण्यात डुंबायचेदेखील वेळेअभावी राहुन गेले ! इतकेच काय तर तलावाच्या पुढे पण भातशेतीतुन जाताना आम्ही रस्ता चुकलो !!! उपाशीपोटी राहिल्याचे परिणाम होते की दिवसच आमचा नव्हता !!
अखेरीस थांब्यावरुन एसटी पकडुन आम्ही पाच सव्वापाचला पालघर गाठले.. तिथेच हॉटेल गाठुन पोटभर खाउन घेतले नि सहाच्या शटलने विरारला रवाना झालो ! एकंदर "पाचच्या आत घरात" ची अट गुंडाळावी लागली होती.. पोहोचेस्तोवर साडेसात वाजले !
तसे म्हटले तर अनुभवासाठी हा ट्रेक खुप फायदेशीर ठरला.. नि पुढचा ट्रेक करायचा तर भरगच्च नाश्तापाणी करुनच सुरु करायचा हा धडा देखील घेतला !

शेवटी ट्रेक पुर्ण केल्याचे सुख नव्हते.. पण सुरक्षित घरी परतल्याचे समाधान होते !! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही लिहलं आहे.
खुप जुनी आठवण ताजी झाली.

आठवीत असताना पाट्गाव (गारगोटी) पासुन रांगणा किल्यावर जाताना असाच रस्ता चुकला होता. सकाळ्पासुन रात्र होइपर्यंत चालतच होतो सगळेजण. फक्त short cut च्या हव्यासापोटी. फक्त चांगली गोष्ट एकच की ग्रुप (NCC, २० जण) मोठा होता आणि खायचे प्यायचे भरपुर सोबत होते.

मस्त वर्णन! Happy
जणू काही मी पण बरोबरच फिरतोय अस वाटत होत वाचताना!
नेक्स्ट टाईमकरता शुभेच्छा!
(स्लिपरवाल्याच्या पायान्चा फोटो टाकला अस्तास तर दन्डवत घालणे सोप्पे गेले अस्ते Wink )

इतका छान अनुभव, अधुरा कसा म्हणायचा ?
पाण्यासाठी नाचणीची बिस्किटे जवळ ठेवायची. नाचणीने बराच वेळ तहान लागत नाही. कुठेही
उंबराची फळे दिसली तर उघडून किडे फुंकून फळे खायची, त्यानेही बराचवेळ तहानभूक लागत नाही.
इतर खाऊपेक्षा, मूठभर बदाम जवळ ठेवावे, त्याने बरीच एनर्जी मिळते.

अरे रे!!
योगल्या. पुर्ण ट्रेक झाला असता तर बर झाल असत.
आता तो चप्पलवाला परत काय येणार नाय तुझ्यासोबत. Proud
त्याला झाला तेवढा अनुभव लयी झाला.
फोटो फारच छोटूले आहेत रे.
नेक्स्ट टाइम तिकडे डिजिटल कॅमेरा घेवुनच जा. जागा फार मस्त दिसतेय. Happy

धन्यवाद दोस्तहो !
दिनेशजी.. सल्ल्याबद्दल खुप आभारी.. Happy तसे तिकडे करवंदाची झाडे भरपुर प्रमाणात आहेत.. पण या मोसमात कुठे काय ?
लिंबुभाव, झकासा.. Happy
झकास.. तसे काहि नाही.. कालच तो विचारत होता बापुजयंतीला काय प्लॅन म्हणुन.. शेवटी ट्रेकचा अनुभव वेगळाच असतो यार.. पुढच्यावेळी तुलाच घेउन जाईन म्हणतो.. म्हणजे आयता फोटुग्राफर पण मिळेल.. Proud

या पहाडाचे वर्णन म्हणजे गवताची चादर ओढुन घेतलेला काळा कातळ >>> सहि है भिडु!!! पण सांभाळुन करत जा रे बाबा!

योगेश, हे अनुभव तर फार मोलाचे असतात Happy घरातून कुठेही बाहेर जाताना काहीतरी तोंडात टाकावेच. अरे भटकायचे असेल तर शिदोरी हवीच.

नंदिनीसारखा माझ्या मनातही "चकवा" हाच शब्द आला.

पुढच्या ट्रेकसाठी बेस्ट लक.

श्रीमान योगी छान अनुभव. आपल्या शेजारचा परिसरही आपल्याला कधी कधी माहीत नसतो. प्रकाशचित्रे व वर्णन अफलातुन. खांद्यावरच्या ऐवढ्या मोठ्या पिशवीत फक्त पाण्याच्या बाटल्या? खायचे काहीच नाही?
तुझी शबनबची पिशवी व तो काताळावरचा फोटो आवडला. निसर्गाचा खराखुरा आनंदीवीर योगी.

आणि हो थ्रेप्टीन ची बिस्किटे जवळ ठेवायची. हि बिस्किटे केमिष्ट कडे मिळतात. दोन चार बिस्किटातून एका जेवणाईतके पोषणमूल्य मिळते. हल्ली नारळाच्या पाण्याची पाकिटे मिळतात, पाण्यात मिसळून मस्त नारळाचे पाणी तयार करता येते. (पाण्यात टाकायला क्लोरीनचे ड्रॉप्स हवेत. मी स्वतः कुठलेही पाणी पितो)
बाजारात, तयार उपमा, पोहे, खिचडि अशी अनेक पाकिटे मिळतात. आयत्यावेळि गरम पाण्यात मिसळून हे पदार्थ तयार करता येतात.

यो रॉक्स, वर्णन छान आहे.

पण तुम्ही काही फार मिस वगैरे केलेत असं समजू नका. कारण कोहोजला तो एक निसर्गनिर्मित मानवाकृती पुतळा सोडल्यास काहीच नाही. अगदी ऐसपैस बसण्याइतकी जागाही नाही.

आम्हीही नोव्हेंबर महिन्यात गेलो होतो. तेव्हाच उन्हाची इतकी काहिली होत होती. आणि इतकी पायपीट करून गडावर वरची एक गोष्ट सोडल्यास बघण्यासारखं काहीच नाही. Sad त्यात आमच्याबरोबर असलेले एक काका आम्हांला सारखं सांगत होते, की लवकर चला एक ताकवाली पुढे गेलीये. त्या वेड्या आशेवर आम्हीही पाय रेटत गेलो. Proud पण कसचे काय.....

रच्याकने, ठाण्याहूनही एस.ट्या जातात. नक्की लक्षात नाही, पण आम्ही डायरेक्ट वाघोट्याला उतरलो होतो.