मनमोकळं-४

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

खरंतर प्रत्येक गोष्टीत दुसर्‍यांमधे आपल्यापेक्षा काहीतरी वेगळेपणा शोधून त्यावरून वाद घालणं
हा मनुष्याचा स्वभावच आहे. जात, धर्म, प्रांत, भाषा. वेगळेपण शोधून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करायचं.
आणि सारखेपण शोधून आपुलकी जोपासायची.
इथं महाराष्ट्रात किती सहज पुणेकर मुंबईकर अशासारखे वाद घालतो आपण. इंग्लंडच्या बस मधे समोरच्या
बाकावर बसलेल्या मायलेकींमधल्या मायेच्या साडी कुंकवारून अंदाज बांधतच होतो इतक्यात कान तृप्त करणारे
" अमृतातेही पैजा जिंके " शब्द कानी पडले. की लग्गेच आम्ही सरसावून बोलायला लागलो. आणि त्या तर अगदी
गहिवरून आल्या. तिथं मग मुम्बई पुणे विदर्भ असल्या चर्चा पार बाजूला पडतात. केवळ मराठीच बोलू आणि ऐकू
वाटतं.
गावी जात असताना टळटळीत उन्हात रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून शेतावरच्या पायपावर पाणी पीत असताना लाल
रंगाचं नऊवारी नेसलेल्या अखंड सुरकुतलेल्या म्हातारीनं ओल्या शेंगा देऊ का वाईच म्हणून थांबवून गप्पा मारल्या
होत्या आणि आमच्या मूळ गावाचं नाव ऐकून प्रत्येक सुरकुतीचं एक वेगळं हसू झालं होतं. ते तिच्या मामाचं गाव
होतं. तिचं अवघं लहानपण सापडल्यागत खूश झाली होती ती. लाल रिबिनी बांधून फुलाफुलांच्या फ्रॉकमधली
सावळी मुलगी माझ्या डोळ्यासमोर उभीच राहिली.
अवचित येणार्‍या गोष्टीमधे आपण हे असं बंधुत्व शोधत असलो तरी अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात तसं रोज
भेटणार्‍या गोष्टींमधे वेगळेपण किंवा खरं म्हणजे आपलं वरचढपण शोधत रहातो. अगदी पिंडापासून
ब्रम्हांडापर्यंत. मी किती छान पासून ते माझा देश कस महान पर्यंत.
सगळं सारखं आहे, सगळं आलबेल आहे अशी परिस्थिती विचार करायलाही बोअरींग वाटते. माणसाला जगण्यात
सुखाची गरज असते त्याहून जास्त गरज मी भारी हे दाखवायची असते. तसं नाही झालं तर तो काहीतरी कारणं
शोधायला लागतो. एका सेमिनारमधे एका गुरूनं सांगितलं होतं ते अगदी पटतं अशा वेळी. ते म्हणाले होते
" बघ मी म्हणालो होतो की नाही? हे सिद्ध करायसाठी माणूस अगदी वाट्टेल ते पणाला लावू शकतो. "
पैसा, सत्ता तर सोडाच पण जवळच्यांचं प्रेमसुद्धा. आणि कशासाठी तर आय - ऍम - राईट हे एक वाक्य उच्चारता
यावं म्हणून. नाहीतर " आजपासून तू मला मेलास " ही असली वाक्यं कशी तोंडात आली असती आपल्या
प्रियजनांसाठी?
मी मधे आहे तशीच " आम्ही " या शब्दामधेही एक नशा आहे.
" मराठी लोक फार बाई कंजूस आणि रुक्ष. लग्न सुद्धा किती अगदी करून टाकल्यासारखं करतात. आमच्याकडे बघ कसं
सॉल्लिड एंजॉय करतात. " हे ऐकवणारी मैत्रीण बाहेर जाऊन आल्यावर " भारतीयांना कसे संस्कार असतात नाही?
नाहीतर ते... " इथपर्यंत पोचली म्हणजे फार काही नाही फक्त या " आम्ही " च्या कक्षा रुंदावल्यात एवढंच. पण
काहीतरी काढून वेगळेपण हवंच. नाक मुरडायला संधी मिळणं महत्वाचं.
हापिसात सुद्धा हल्ली आम्ही बघा कशी जास्त मज्जा करतो ते दाखवायची चढाओढच असते. उगीच बॉसबरोबर
कॅंटीनच्या भिंतींना फुगे चिकटवले की झाली मज्जा. लंच, डिनर, कॉफी विथ अमकातमका आणि हाय टीज या
गोष्टी हापिसात होतात हे कळल्यावर आईनं विचारलं होतं " हे सगळं करून उरलेल्या वेळात तुम्ही जे काम करता
त्याचा एवढा पगार देतात? "
पण खरंच मिळून काहीतरी केलेली कुठलीही गोष्ट एक नशा आणते. आणि आपण एका विशिष्ट समूहाचं प्रतिनिधीत्व
करतोय ही जाणीव पण. राष्ट्रगीत सुरू झालं की, भारत मॅच जिंकला की जे फीलिंग येतं तेच अनोळखी ठिकाणी आपलं
काही सापडलं की पण येतं. अरे तुम्ही सोलापूरचे का? असं केवळ ऍक्सेंटवरून पण ओळखता आलं की समोरचा माणूस
ऑलमोस्ट गहिवरलाच म्हणून समजा. हेच सोलापुरात त्याच्या बंगल्याच्या गेटसमोर बाईक लावून बघा.
यावरून आठवलं. आम्ही सोलापुरात फिरत होतो. अचानक नवर्‍याला आठवलं की याच एरियात आपल्या एका मित्राचं घर आहे.
तो मित्र होता देशाबाहेर. घरातून त्याचा तिथला नंबर घ्यावा म्हणून नवरा म्हणाला चल डोकावून जाऊ.
गाडी पार्क करत होतो तर मित्रपिता कट्ट्यावरच्या आरामखुर्चीतून ओरडले. " ओ इतं गाडी लाऊ नका "
नवरा आतून " अहो पण काका.. "
तरी काका आपले " ओ तिकडं लावा ओ गाऽऽडीऽऽ इतं फक्त आमचीच गाडी लावत असतो आमी "
तशीच नेटानं गाडी लावून नवरा उतरला " ओ काऽऽका मी... "
" अरे तू होय. अरे अशी आत आण की गाडी. खूप पार्किंग आहे बंगल्यात. " मग नको म्हटलं तरी काका ऐकेनात.
एखाद्या लग्नात जरा वयस्कर बायकांच्या जवळ पाच मिनिटं बसून बघा. लगेच तुम्ही-आम्ही, अगं बाई पुण्यात कसबा
पेठेत का? ते हे... तुमचे कोण मग? किंवा मग, म्हसवड का? माझ्या नणदेची भाची पण... आम्ही म्हणजे, आमच्यात ना
हे चालू असतंच. खालिद होसेनी म्हणतो कुठलाही अफगाणी माणूस हा दुसर्‍या अफगाणी माणसाशी थोडा वेळ बोलला की
कुठूनतरी नातं जोडतोच. आपल्या इथं काय वेगळंय?
आता थोड्या दिवसांनी चंद्रावर जाणारे स्पेस क्रूज चालू झाले की होणारी बोलणी मला तर आत्ताच ऐकू येतायत.
" पण काही म्हणा पृथ्वी ती पृथ्वी. " किंवा " आमच्या पृथ्वीवर नाही ब्वा असलं "
चला. काल कॉलवर टीममधे लोक काम न करता टिवल्याबावल्या करतायत म्हणून ओरडणारा बॉस आज विचारतोय
" अपने टीम का ऍन्युअल फंक्शन मे पार्टीसिपेशन इतना कम क्यूं है? डान्स, गाना, फॅशन शो कुछ तो करो यार. "
आम्ही-सिंड्रोम दुसरं काय?

विषय: 
प्रकार: 

अगदी चपखल लिहिले आहेस. आवडले.
पण एवढी गॅप का म्हणे मनमोकळं -३ आणि ४ मधे? येऊदेत बर पटपट!! Happy

>>आमच्या पृथ्वीवर नाही ब्वा असलं ..
सन्मे.. Lol

मित्रा! कसल जमुन आलय..एकदम फ़क्कड.. आधिचेही भाग वाचले,खुप खुप आवडलय लिख़ाण..लिहित रहा.

>>>माणसाला जगण्यात
सुखाची गरज असते त्याहून जास्त गरज मी भारी हे दाखवायची असते. तसं नाही झालं तर तो काहीतरी कारणं
शोधायला लाग>>>>>>
अगदी अगदी!! मनला भिडलं. मस्त आहे ही मनमोकळी सिरिज. जरा लवकर लवकर येउद्या!!

सन्मे, याहून अजून मोठी दाद ती कोणती... अगदी अगदी माझं लिहिलं आहेस. ह्या तुझ्या मनमोकळ्यासाठीतरी नक्की भटकते मी इथे.

अगदी ऍप्ट लिहिलं आहेस सन्मी.. 'तुमचं-माझं' आणि 'आपलं' हे व्यक्तिसापेक्ष आणि स्थानसापेक्ष असतं आणि पटापट पार्ट्या ही बदलतं Happy

सन्मे, हे 'मनमोकळं' मनापासून आवडलं.

वेगळेपण शोधून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करायचं.
आणि सारखेपण शोधून आपुलकी जोपासायची.

हे अगदी पटलं मनापासून.........

असच मनमोकळे लिहित् रहा...

राष्ट्रगीत सुरू झालं की, भारत मॅच जिंकला की जे फीलिंग येतं तेच अनोळखी ठिकाणी आपलं
काही सापडलं की पण येतं.>>> व्वा! सन्मे, याहून अजून मोठी दाद ती कोणती... अगदी अगदी माझं लिहिलं आहेस. >>> दादला ती म्हणेल तितके मोदक!!!