बटाट्याच्या गोल काचर्‍या.

Submitted by दक्षिणा on 16 September, 2009 - 07:31

लागणारा वेळ:
१० मिनिटे.

साहीत्य :
आकाराने साधारण छोटे ४ बटाटे (खूप मोठे असतील तर चकत्या खूप मोठ्या होतील) २ कांदे, तिखट, हळद, एक आमसूल, मीठ, साखर, कोथिंबीर, ओलं/सुकं खोबरं.

क्रमवार पाककृती:
प्रथम बटाट्याच्या साली काढून, गोल पातळ चकत्या कराव्यात, कांद्याच्याही तशाच पातळ चकत्या कराव्यात. (पंजाबी जेवताना हॉटेलात देतात तशा :)) फोडणी करावी, तेल किंचित जास्ती घ्यावं, फोडणीत प्रथम हिंग आणि हळद घालून कांदे आवडीनुसार परतून घ्यावेत, आमसूलही तेव्हाच घालावे, चांगले परतल्यावर मग बटाट्याचे काप घालावेत, शक्यतो त्यात पाण्याचा कमीत कमी अंश राहील असे पहावे.... म्हणजे भाजी चरचरीत होते. मग तिखट आणि साखर घालून भाजी शिजवत ठेवावी. खूप गिर्र आवडत असेल तर तशी किंवा थोडी अलिकडे काढली तरी चालते. गॅस बंद केल्यावर कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून खावी.

वाढणी/प्रमाण:
१ माणसासाठी, २ वेळा किंवा भाजी जास्ती लागत असेल तर एक वेळेसाठी.

अधिक टिपा:
वरती दिलेली कृती ही अगदी साधारण आहे, पण हवे ते बदल करून आपापल्या पद्धतीने करता येईल.
उदा. आलं घालणे, किंवा शेंगदाण्याचं कूट घालणे. साखरे ऐवजी गुळ ही घालता येईल. मी स्वत: गुळ घालते त्यामुळे भाजी थोडी मऊ होते. आपाल्या आवडीनुसार हवे ते बदल करता येतील.
बटाटे घरात असतातच शिवाय पटकन होते.

माहितीचा स्रोत:
खरंतर अशी भाजी मी इयत्ता ४थी मध्ये असताना वर्गातली एक मुलगी आणायची, तेव्हा कृती वगैरे काय विचारणार? Sad त्यामुळे त्याची चव लक्षात राहीली होती, मोठेपणी अंदाजाने मीच प्रथम करून पाहीली..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगळ्या प्रकारच्या काचर्‍यांची पाककृती आवडली.
खूप गिर्र आवडत असेल तर तशी >>>> गिर्र म्हणजे कशी?
आणि साखर/गुळ घातल्यानंतर काचर्‍या शिजतात का नीट?
मी नेहमी पदार्थ शिजल्यानंतरच साखर/गुळ घालते म्हणून विचारले.

भागो, छोटे घ्यायला सांगितलेत बटाटे, नारळाइतके नाही... Proud आणि मी तर सगळ्यात साखर गुळ घालतेच, त्याशिवाय मी खाऊच शकत नाही. अगदी तांदूळ मुगाच्या डाळिच्या खिचडीतही गुळ घालते.

मेधा, पाण्याचा अंश न राहू दिल्यास, आणि साखर घातल्यास बटाटे नीट शिजतात... काही प्रॉब्लेम येत नाही.

स्मिते, गुळ घालणार नसु तरिही आमसुल चांगलं लागतं, एकच असल्याने किंचित आंबट होते भाजी. मी साखर/गुळ घालते त्यामुळे चविला आमसूल. Happy

छान Happy

>>पण गिर्र म्हणजे कशी करु ते नाही सांगितलेत.. >> मेधा Lol
अगं गिर्र हा शब्द कोल्हापूर आणि बाजूला प्रचलित आहे. गिर्र म्हणजे भाज्या एकदम मऊ शिजवतात
त्याला कोल्हापूर, सांगली साईडला गिर्र म्हणतात... Happy

हे एकटे पालकाना पण आदर्श आहे. >> मामी Lol

दक्स पा.कृ भारी आहे. साधी सोपी. मी बटाट्याला कंटाळलोय आता. नाहीतर करून पाहीली अस्ती ! Proud

कोल्हापूर, सांगली साईडला गिर्र >> हो अगदी सर्रास वापरतात..
दक्स चुकुन पुढ्-माग कधी तरी... भाजी गिर्र.. काटा किर्र अस पण लिहिशिल.. Proud

दक्षिणा एकतर रेसिपी वेगळी..काचर्‍या शक्यतो अश्या करत नाही ना आपण आणी दुसरे म्हनजे गिर्र शब्द..मजा आली त्या शब्दाने..:) आता करुन बघेन ह्या काचर्‍या..:)

दक्षा... मी चार 'गरगरीत' बटाटे घेउन, त्यांचं 'गिर्र' तयार करुन बघितलं...
नवा पदार्थ बरा लागला चविला... 'गरगरीत बटाट्यांचे गिर्र'...

अशाच पद्धतीची अरेबिक डिश आहे.पण त्यात टोमॅटो घालून फारच आंबट चवीची करतात.
अरेबिक नाव्..सनईट पटाटस.:स्मित: