गणेशोत्सव २००९ आभार प्रदर्शन

Submitted by संयोजक on 3 September, 2009 - 01:19

गेले बारा दिवस चालू असलेल्या मायबोली गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. 'मायबोली गणेशोत्सव : हमखास यशस्वी पाककृती' मध्ये सांगितल्याप्रमाणे भरपूर उत्साह, आवडीनुसार कल्पनाशक्ती, विनोदाचा मसाला, कोपरखळ्यांची फोडणी, दाद आणि प्रतिसादांची सजावट आणि रांधायला-वाढायला-चाखायला
लेखण्या, कॅमेरे, झारे, कढया, चॉपस्टिक्स आणि रंगपेट्या हे सगळे घटक पदार्थ घेऊन साजरा केलेला गणेशोत्सव दणक्यात साजरा न होता तरच नवल !!! हा उत्सव यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी संयोजक मंडळाला पडद्यामागच्या अनेक कलाकारांची खूप मदत झाली. ह्या मायबोलीकरांना पडद्यासमोर आणून त्यांची ओळख व आभार प्रदर्शनाचा हा एक महत्वाचा आणि गोड कार्यक्रम.

मायबोलीकरांच्या सक्रीय सहभागाशिवाय गणेशोत्सव साजरा होणं शक्यच नव्हतं. त्यामुळे सर्वप्रथम गणेशोत्सवात स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, अवांतर कार्यक्रम आणि जाहिराती ह्यांना मनमोकळी दाद व भरभरून प्रतिसाद देणार्‍या सर्व मायबोलीकरांचे संयोजकांतर्फे मन:पूर्वक आभार. तुम्हा सगळ्यांचा हा सहभाग आम्हा संयोजकांना रोज नवीन उत्साह देऊन जात असे.

मागच्या वर्षी चालू झालेला लिखित व श्राव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचा उपक्रम यंदाही उत्साहात साजरा झाला!

लिखित विभागामध्ये यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात घडणार्‍या घडामोडींचा आढावा कथामालिकेच्या माध्यमातून खास नेमाडे शैलीत घेतला मायबोलीकर बो-विश ह्यांनी. ही कथामाला आवडल्याचे अनेक मायबोलीकरांनी आम्हांला तसेच बो-विश ह्यांना कळवले आहे. श्री गणेशाचे, अष्टविनायकाचे दर्शन चित्रांच्या माध्यमातून पल्ली ह्यांनी आपल्याला घडवले तर अवती भवती असणार्‍या परिचितांमधल्या अपरिचित व्यक्तींची ओळख मायबोलीकरांना अ‍ॅडम ह्यांनी करून दिली. चीझ ह्या विषयावरची माहितीपूर्ण लेखमाला मायबोलीकर शोनू ह्यांनी सादर केली. ह्या सर्व लेखमालांबद्दल बो-विश, पल्ली, अ‍ॅडम आणि शोनू ह्यांचे संयोजकांतर्फे आभार!

ह्या व्यतिरिक्त लिखित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गुंडाळलेल्या कापडाची कहाणी, ॐ नमोजी आद्या, आई..ते लेखिका-कवयित्री, सार्थ गणपत्यथर्वशीर्ष, तू असे विविध विषयांवरचे लेख सादर केल्याबद्दल अनुक्रमे नीधप, बासुरी, प्राजु, झक्की व श्रावण मोडक ह्या मायबोलीकरांचे तर आपल्या खास शैलीतल्या गुंफण, दृष्टीभ्रम, आणि सुरूवात ह्या कथा सादर केल्याबद्दल अनुक्रमे सुपरमॉम, कविता नवरे, आणि विशाल कुलकर्णी ह्या मायबोलीकरांचे शतश: आभार!

मायबोलीकर उपासक यांनी संगीतबध्द केलेल्या 'जय हेरंब' ह्या ध्वनीफितीतली सगळी गाणी श्राव्य विभागात सादर झाली. संगीतप्रेमी मायबोलीकरांना ही एक अनोखी मेजवानीच मिळाली. मायबोलीवरचे प्रसिध्द कवी वैभव जोशी ह्यांचे काव्य वाचन तर प्रसिद्ध विडंबनकार मिल्या ह्यांचे हझल वाचन सांस्कृतिक कार्यक्रमांत निराळेच रंग भरून गेले. स्वत: रचलेल्या गणेशविषयक रचना स्वरबध्द करून त्या आपल्या गणेशोत्सवासाठी मायबोलीकर श्यामली आणि जयावी ह्यांनी उपलब्ध करून दिल्या. आपल्या कलाकृती मायबोलीकरांसाठी घेऊन आल्याबद्दल संयोजकांतर्फे उपासक, वैभव जोशी, मिल्या, श्यामली आणि जयावी ह्यांचे आभार.

वरील सर्व लेखक, कवी आणि कलाकारांनी हे कार्यक्रम आपल्यासमोर सादर करता यावेत म्हणून वेळात वेळ काढून अपार मेहनत घेतली आहे. गणेशोत्सव संयोजन समिती ह्या सर्वांच्या मेहेनतीला दाद देत त्यांचे मन:पूर्वक आभार मानत आहे.

यंदाच्या वर्षी प्रथमच गणेशोत्सवात दोन गद्य STY घेण्यात आली. ह्या दोन्ही STYची उत्कंठावर्धक आणि चटकदार सुरवात करुन दिल्याबद्दल मायबोलीकर psg (जळ्ळं मेलं 'लक'क्षण) आणि प्रकाश काळेल (अपराजित) ह्यांचे खास आभार!

मायबोलीकरांना कोड्यात टाकायला सदा उत्सुक असलेले स्लार्टी, गजानन देसाई आणि क्ष ह्यांनी वेळातवेळ काढून "परस्पर संबंध ओ़ळखा" साठी कोडी बनवून दिली तर "कायापालट" स्पर्धेसाठी मिल्या ह्यांनी मायबोलीवरच्या असंख्य कविता चाळून कवितांची निवड करून दिली. तसेच ह्या कवितांच्या रचनेबद्दल माहितीही दिली. याच स्पर्धेसाठी मायबोलीकर कवी वैभव जोशी, हरीष दांगट, झाड, आणि चक्रपाणी ह्यांनी आपल्या रचना उपलब्ध करून दिल्या. ह्या अमूल्य योगदानासाठी स्लार्टी, गजानान देसाई, क्ष, मिल्या, वैभव जोशी, हरीष दांगट, झाड, आणि चक्रपाणी ह्यांना धन्यवाद !

पाककृती स्पर्धेच्या परिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल परिक्षकांचे आभार. तसेच शुध्दीकरण, मुद्रित शोधन व वेळोवेळी लागेल ते सहाय्य केल्याबद्दल मायबोलीकर आयटीगर्ल, psg, शोनू, सुपरमॉम, सशल, चिनूक्स तसेच मंडळाच्या सल्लागार रुनी ह्यांचे विशेष उल्लेखनीय आभार!!

ह्यावर्षी मायबोलीकरांच्या परिवाराला गणेशोत्सावात सामिल करून घेण्यासाठी लहान मुलांची चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. आपल्या मुलांना ह्यात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल पालक मायबोलीकरांचे तसेच अतिशय छान छान चित्रे काढल्याबद्दल सर्व छोटुकल्यांचे कौतुक.

आता सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्वाचे. आम्हां सर्वांवर विश्वास दाखवून गणेशोत्सव संयोजनाची संधी दिल्याबद्दल संयोजक मंडळातल्या प्रत्येकातर्फे अ‍ॅडमिन ह्यांना मनापासून धन्यवाद. अ‍ॅडमिन आणि वेबमास्टर ह्यांनी वेळोवेळी तांत्रिक मदत, कायदेशीर बाबींबद्दल सल्ले, मार्गदर्शनपर प्रेमळ सूचना आणि अनुभवांचे बोल सढळ हस्ते आम्हाला उपलब्ध करून दिले. त्यांच्या मदती शिवाय तसेच सहकार्याशिवाय गणेशोत्सव पार पाडणे शक्यच नव्हते. त्यामुळे त्या दोघांचे आभार मानावे तेव्हढे कमीच आहेत !

गणेशोत्सवाच्या संयोजनामध्ये ज्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभार लागला आहे पण अनवधानाने इथे उल्लेख करायचा राहून गेला अशा सर्वांनाही संयोजकांतर्फे धन्यवाद!

कुठल्याही गोष्टीमध्ये सुधारणेला वाव असतोच. जर यंदा गणेशोत्सवात काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील किंवा काही गोष्टी अधिक चांगल्या पध्दतीने करता आल्या असत्या असं आपल्याला वाटत असेल तर ते आम्हाला नक्की कळवा. पुढच्या वर्षीच्या संयोजक मंडळाला त्याची निश्चित मदत होईल. आपल्याला काय आवडलं, काय नाही आवडलं किंवा आणखी काय करता आलं असतं ह्याबद्दल जाणून घ्यायला आम्ही सर्व जण उत्सुक आहोत.

स्पर्धांच्या मतदानासाठी ह्या दुव्यावर पहा.

धन्यवाद,
मायबोली गणेशोत्सव २००९ संयोजक मंडळ.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यावर्षी मायबोली वरच्या एकमेव बाप्पाचे दर्शन मी घेतले, यातच माझ्या भावना आल्या.
तसेच माझा प्रसाद बाप्पापर्यंत पोचवण्यासाठी, मला सिंड्रेला ने मदत केली. उल्लेख केला, आभार मानण्याइतकी काहि ती (वयाने) मोठी नाही.

यंदाचा मायबोली गणेशोत्सव एकदम भारी झाला. त्यासाठी झटणार्‍या प्रत्येकाचेच मनापासून अभिनंदन.

सगळेच कार्यक्रम आणि स्पर्धा अगदी सुंदर आयोजित केल्या होत्या. मला गणेशोत्सवाच्या जाहिराती खास करून आवडल्या. आणि हा नंतरचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम सुद्धा चांगला झाला आहे. Happy

संयोजक, स्वयंसेवक, कलाकार सगळ्यांचे आभार... ग्रेट जॉब...!!!

गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला !!!

अतिशयच सुंदर आयोजन ,कौतुक करावं तेवढं थोडच आहे सर्व संयोजकांचं.. त्यानी ज्या मेहेनतीने हा एवढा मोठा सोहळा यशस्विरित्या पार पाडला ती मेहेनत रोज पाहात होते, समीरकडुन ऐकत होते.
घरची जबाबदारी, आणि नोकरी सांभाळुन सर्वजण बहुतेक रोजच पहाटेपर्यंत जागून काम करत होते उत्सवाच्या आधी आणि पूर्ण १२ + दिवस..
एखाद्या virtual सोहोळ्यासाठी एवढ्या आत्मियतेने काही करणं हे कित्ती कठीण असतं ते सुद्धा कसलिही अपेक्षा न बाळगता, केवळ त्या website च्या प्रेमासाठी..
आभार सर्व लेखक,कवी, चित्रकार,छायाचित्रकार, छोटे कलाकार,संगीतकार,गायक सर्वांचेच. Your expressions in the form of Art were just priceless!!

hatts off to everyone!!

संयोजक, तुमचे आणि इतर सर्व सहाय्यकर्त्यांचे अभिनंदन आणि आभार पण. लक्ष वेधून घेणारा हा ऑनलाईन गणेशोत्सव सोहळा होता. धन्यवाद.
-मुकुंद कर्णिक

गणपती उत्सव अगदी दणक्यात झाला. संयोजकांनी प्रचंड मेहेनत घेतल्याचं जागोजागी जाणवतंय. भारतात असल्यामुळे आणि व्यक्तिगत कामामधे खूप बिझी असल्यामुळे प्रतिक्रिया देता आल्या नाहीत. पण अधून मधून डोकावून मात्र जात होते. फारच सुंदर आयोजन होतं आणि सहभाग पण जबरदस्त होता.

आयोजकांचे अगदी मनापासून आभार....आणि खूप खूप कौतुक Happy

अनेक वर्षांनी विधायक गणेशोत्सव बघायला मिळाला. जय हेरंब, पल्ली यांची अष्टविनायक चित्रे, झब्बू या कल्पना खासच...सर्व स्पर्धाही वैविध्यपूर्ण होत्या.

यन्दाच्या गणेशोत्सवात इतक काही मटेरिअल आलय की अजुनही सगळ बघुन्/वाचून/ऐकून झाल नाहीये! Happy
उदण्ड प्रतिसाद लाभलेला गणेशोत्सव! Happy मजा आली!
[ही माझी या बीबीवरची दुसरी प्रतिक्रिया आहे]

सुरेख कार्यक्रम... मन्डपातल्या आरतीपासुन ते विसर्जनाच्या लेझीम पर्यन्त खुपच छान्..सगळ्याना धन्यवाद.
गणपती बाप्पा मोरया!!!

व्वा फारच मस्त झाला ह्यावेळचा गणेशोत्सव.. वर काहिंनी म्हटल्याप्रमाणे आत्तापर्यंत सर्वोत्तम

कार्यक्रमांची रेलचेल होती आणि अगदी जाहिरातींपासूनच संयोजकांनी घेतलेली मेहनत कळत होती.
जाहिरातिंचा विशेष उल्लेख केला पाहिजे. एकदम मस्त झाल्या होत्या जाहिराती ह्यावर्षीच्या.

अजूनही पूर्ण वाचून्/ऐकून झाले नाहीये...

इतक्या उत्तम संयोजनाबद्दल आणि उत्सवात सामिल करून घेतल्याबद्दल संयोजक आणि प्रशासक सर्वांचेच खूप आभार...

खूप सुंदर आयोजन झाले ह्या वेळेच्या गणेशोत्सवाचे...अगदी भरगच्च मेजवानी होती.सर्वच कार्यक्रम छान होते. मुलाखती अन झब्बू फार आवडले.
संयोजकांच्या कल्पकतेला दाद !!

मस्त झाला गणेशोत्सव! सगळ्या कार्यक्रमांच्या नियोजनापासून ते जाहिराती आणि प्रत्यक्ष कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरता सर्व संयोजक आणि अ‍ॅडमिन यांचं अभिनंदन!

यावेळचा गणेशोत्सव खरेच खुप सुरेख झाला. माहेरच्या बाप्पाची आठवण झाली. असेच दरवर्षी होवो, ही बाप्पाला प्रार्थना.
देश परदेशातल्या मराठी लोकांना असा अवर्णनीय आनंद देणार्‍या गणेशोत्सव टीमचे अभिनंदन आणि आभार.
मायबोलीची भरभराट होवो !!!

Pages