विसूनाना उवाच.... (२)

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
<1’

आजकाल तसा मला खूप रिकामा वेळ असतो मंडळी!! आता निवृत्त माणूस मी. आमची पुढची पिढी त्यांच्या आयुष्यात व्यस्त आहे, अन सहधर्मचारिणी? त्यांच काय विचारता महाराजा? इतक्या वर्षांत, हळूहळू, त्यांनी घरी आणि थोड्या फार प्रमाणात दारीही आपल साम्राज्य स्थापन केलय. त्या साम्राज्याची वीट हलवायच स्वप्न पहायची देखील माझी टाप नाही!! होऽऽऽ! आपणच कबूल करुन टाकलेल बर, नाही का?? आणि एका अर्थी ते साम्राज्य न हलवलेलच बर खर तर! हो, उगाच मोहोळावर दगड का मारायचा?? काय, खर की नाही?? असो.

तर, मी हा असा बसतो इथे बाल्कनीत खुर्ची टाकून. काही बाही वाचतो, एखाद दुसर्‍या झाडाचं पान हालताना बघतो -आता एखाद दुसर्‍याच म्हणायच ना? झाडं राहिली आहेतच कुठे त्यांची पानं बघायला? - चालायचच. काळाचा महिमा म्हणायचं झाल! पण शहराची रया गेलीय अगदी त्यामुळे, एवढ खर मात्र. वाईट वाटत अगदी. किती ओकबोकं झालय आता हे शहर.... कधी कधी वाटत बरका, जसजशी झाडं कमी होताहेत, तसतसा हा वातावरणातला जाणवणारा वाढता रखरखाट माणसांच्या मनातही उतरत चाललाय की काय नकळे... खूप खूप फरक पडलाय, हे मात्र खर.

तर, मी आपला असा बसतो, काही बाही वाचन करतो, बाल्कनीमधून दिसणार आकाश पाहतो, रस्त्यावरची न थांबणारी गर्दी निरखतो, हिने दिलेले हुकूम पाळतो अन कधी कधी गेल्या दिवसांच्या आठवणींत बुडून जातो.....

तसा आयुष्यात मी तृप्त आहे मंडळी. फारशी तक्रार नाही. तसही बरका, आमच्या वेळी साधं सरळ आयुष्य होत, अन त्यामुळे जगणही खूप सोप होतं. आजकालच एकूणच चित्र पाहिल ना की कधी कधी वाटत, भाजी चार आण्याची अन मसाला रुपयाचा, अस काहीस आहे. म्हणजे प्रश्न असतो एवढासा, पण त्याला उगीच रुप मिळत ते हे एवढाल!! काही उमगत नाही अश्या वेळी मात्र. असो.

मी आपलं माझ्या अडाणी आज्जीने सांगितलेल साधं सोप्प तत्वज्ञान जगलो, अन भरून पावलो.

त्याच अस झाल, मी जेह्वा कॉलेजात गेलो की नाही, तेह्वाची गोष्ट. एकदा, एका वर्गात, आमच्या प्रोफेसरांनी एक वाद विवाद स्पर्धा आयोजित केली. विषय काय? तर 'प्याला अर्धा भरलाय का रिकामा?' असा. प्रत्येकाने, एक तर प्याला भरलाय किंवा रिकामा आहे अशी एकच बाजू घेऊन ती मांडायची अन सिद्ध करायची. आता आली का पंचाईत? दोन्ही एका परीने खरच की!! सिद्ध तरी कस करणार? आणि कोणत्याही अभ्यासाच्या पुस्तकातही याच उत्तर नव्हत हो!! मग आता काय करायच असा विचार करत आपला बसलो घरी येऊन......

ते पाहिलन आज्जीनं. आधीच कालिजात जाणारा नातू, म्हणून तिला कौतुक. म्हणाली, "काय रे, काय झाल?कसला विचार करतोस म्हणायच एवढा? भूकबिक लागलेय का तुला?"

म्हटल, "अग, भुकेच काय घेऊन बसलीस? काय सांगू तुला, प्रोफेसर म्हणताहेत की वादविवाद करा, प्याला अर्धा भरलाय की अर्धा रिकामा आहे यावर!! शोधा अन करा सिद्ध, अस म्हणताहेत ते! त्याचाच विचार करतोय ग... "

"हात मेल्या!! येवढच होय!!" म्हणत, माझी आज्जी, आपल बोळक घेऊन मनमुराद हसली!!

म्हटल "अग, हसतेस काय अशी?? वादविवाद स्पर्धा आहे यावर!!"

म्हणाली कशी, "तुझ्या प्रोफेसरला उद्योग नाही की काय रे? त्याला म्हणावे, आधी ह्याच उत्तर दे की पेल्यातल पेय पिताय का ओतून देताय?? ते सांगा म्हणाव आधी!! त्यावरन सांगतो म्हणाव की प्याला अर्धा भरलाय की रिकामा झालाय ते.....!!" किती सुरेख बोलली होती माझी आज्जी! आणि तेच आयुष्यभर ध्यानी ठेवून मी वागलो, अन प्रत्येक वेळी तिच्या म्हणण्यातल मर्म मला नव्यानच कळल.

पहा विचार करुन. आता वाट्याला आलेला प्याला ओठी लावायचा की ओतून द्यायचा, हे आपणच ठरवायच, नाही का मंडळी?? काय म्हणता?

विषय: 
प्रकार: 

<<भाजी चार आण्याची अन मसाला रुपयाच >> अगदी समर्पक उपमा!

<<जसजशी झाडं कमी होताहेत, तसतसा हा वातावरणातला जाणवणारा वाढता रखरखाट माणसांच्या मनातही उतरत चाललाय की काय नकळे>> खरच एक भयाण सत्य आहे.

आयटी गर्ल ! सलाम तुला.
पेय ओतून द्यायचे की प्यायचे याच्यावर ठरवणार प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा ते. मस्त कल्पना.

माधव आणि अंजू, दोघांचेही आभार Happy

आयटे,
छान लिहलय.. आवडल. keep it up.
- अनिलभाई

एकदम वाचनीय आहेत विसूनाना, अजून येऊदेत. शेवटचे ते पेला रिकामा का भरलेला चे उत्तर सही आहे.

अनिलभाई, अमोल दोघांचेही लेख आवडल्याच आवर्जून सांगितल्याबद्दल खूप आभार. असच तुमच मत सांगत जा, न आवडलेल पण सांगा Happy

आज वाचले हे.
मस्तच तत्त्वज्ञान अगदी समर्पक शब्दात. पटेश आणि आवडेश पण.

आयटे,
त्या आज्जीने एकदम सही सांगीतले. आवडले.

उत्तर आवडल. सगळच कस रिलेटिव्ह असत.

रमणी, रुनी आभार दोघींचेही Happy
केदार खरय. Happy

मस्त लिहीलेय गं. अगदी खरंय. आपण उगीच आयुष्याला नको ते पीळ पाडून अवघड करून ठेवतो.
लिहीत रहाच.

आयटे खूप छान लिहिलं आहेस. अशीच लिहित राहा..
अभि

हे माझ वाचायच राहुनच गेल होत की.
छान आहे.
पेल्याच उत्तर तर सॉलिड Happy

अभि, संघमित्रा, झकास खूप खूप आभार Happy
तुमचं प्रोत्साहनच लिहितं ठेवत मला Happy असच वाचत जा अन सांगतही जा Happy