चीझ

Submitted by मेधा on 28 August, 2009 - 00:03

पहिल्यांदा युनिव्हर्सिटी कॅम्पसवर काहीतरी खायची वेळ आली तेव्हा त्या ट्रक्सवर लावलेल्या बोर्डांवरचे कुठलेही प्रकार ओळखीचे वाटत नव्हते. अर्ध्या पदार्थांचा उच्चार कसा करायचा तेही माहीत नव्हतं. ओरिएंटेशनच्या नंतर एका सिनियरने सांगितल्यावरून "रिचीच्या ट्रकवर त्यातल्या त्यात बरे प्रकार मिळतात, बाकीच्या ट्रक्सवरचे प्रकार देशी लोकांना आवडत नाहीत/चालत नाहीत" एवढं ऐकून माहीत होतं. म्हातार्‍या रिचीने तीन वेळा "मे आय हेल्प यू?"म्हटल्यानंतर घाबरत घाबरत 'ग्रिल्ड चीझ' सँडविच मागितलं अन् माझं वाक्य संपायच्या आत त्याने "व्हॉट काइंड ऑफ चीझ?'"विचारल्यावर परत ' मुखं च परिशुष्यति' अवस्था झाली होती. 'व्हॉट काइंड डु यू हॅव?' हा कुठल्याही 'व्हॉट काइंड ऑफ?' या प्रश्नाचा प्रतिप्रश्नही माहीत नव्हता तर त्याची संभाव्य उत्तरं कुठून माहीत असणार? त्यानेच "ट्राय चेडर", म्हणून पिवळीजर्द, जवळपास आंब्याच्या रंगाची स्लाईस दाखवली होती. ते ग्रिल्ड चीझ सँडविच चक्क बरं लागलं होतं याचं कारण त्याची $१.५० किंमत तर होतीच पण त्या चेडरची चवसुद्धा आवडली होती.

हळूहळू असल्या चीझच्या स्लाइसेस ग्रोसरी स्टोअरमधे विकत मिळतात अन् त्या आणल्या तर घरच्या घरी ग्रिल्ड चीझ सँडविच करता येईल हे उमगलं. अधेमधे पिझ्झा खायची वेळ आली तेंव्हा परत त्याच्यावर काहीतरी वेगळंच चीझ असल्याचं जाणवलं खरं, पण त्याकाळात मुंबईत मिळणार्‍या पिझ्झाच्या तुलनेत हा पिझ्झा इतका वेगळा होता की चीझच्या वेगळेपणा इतका ठळकपणे विचारात आला नाही.

आता इथल्या जेवणाखाणाला सरावलो आपण अशी स्वतःची समजूत होते न होते तोवर डिपार्टमेंटमध्ये मिड-सेमेस्टर वाईन अँड चीझ पार्ट्या व्हायला लागल्या. तिथे चीझचे वेगवेगळ्या रंगांचे चौकोन पाहून साक्षात गुरु बरोबर वाईन पिण्याचं जितकं दडपण आलं त्यापेक्षाही जास्त त्या चीझची भिती वाटली होती. पण इतर विद्यार्थी ते चीझ कसं वाढून घेतात, कसं खातात याकडे लक्ष ठेवून त्यांचं अनुकरण करत वेळ निभावून नेली होती.

शिकून झाल्यावर नोकरी लागली म्हणून, मग ग्रीन कार्ड होतंय म्हणून, मग घर घेतलं म्हणून असं एकेक करत इथलं वास्तव्य वाढत गेलं. हमखास चालणारा टी व्ही आला, केबल घेणं चैन न राहता गरज झाली, सी डी क्लब, बूक क्लब अन कूक बूक क्लब या हे टप्पे झाले, अमेरिकेत अन इतर देशात प्रवास झाला, देशोदेशींच्या लोकांशी मैत्री जुळली. या सर्व प्रवासात अनेक ठिकाणी, अनेक प्रकारचं चीझ खाल्लं, खरेदी केलं, त्याचे प्रकार करुन पाहिले, इतरांना खिलवले. त्या सगळ्यातल्या आवडत्या काही चीझबद्दलची माहिती सगळ्यांना द्यावी, सोप्या व हमखास आवडणार्‍या रेसिपी द्याव्या या उद्देशाने हा लेख.

इतिहास, भूगोल, जीव-रसायन-भौतिकशास्त्र :

चीझचा उगम मुळात अतिरिक्त दुधाचा साठा करण्याच्या उद्देशाने झाला असावा असा कयास आहे. इजिप्तमध्ये ख्रिस्तपूर्व २००० या काळातसुद्धा चीझ करत असत असे पुरावे आहेत.

क्रीम चीझ हे दुधात आम्लपदार्थ घालून ठरावीक वेळानंतर ते तापवून केलं जातं - आपल्या पनीरसारखंच जवळपास. बाकी बहुतांश चीझचे प्रकार हे रेनेट नावाचे एंझाईम वापरून केले जातात. रेनेट हे सर्व सस्तन प्राण्यांच्या आतड्यात आढळणारं एंझाईम- याचा मुख्य उपयोग मातेच्या दुधाचं पचन होण्यासाठी असतो. ख्रिस्तपूर्व ५००० ते ८००० या काळात भटक्या जमाती प्राण्यांच्या आतड्यांचा पखालीसारखा, पिशव्यांसारखा उपयोग करत असत. त्या लोकांना रेनेटच्या दुधावर होणार्‍या परिणामांचा शोध लागला असावा, असा इतिहासकारांचा कयास आहे. रेनेटसदॄश एंझाईम वनस्पतिजन्य किंवा बुरशीतून केलेलेसुद्धा असतात. असे एंझाईम वापरुन केलेले चीझ शाकाहारी लोकांना चालावे. चीझ करताना वापरलेले दूध, त्यातील स्निग्धांश, चीझ करतानाचे तापमान व इतर पद्धती यांतील फरकांमुळे जगभर चीझचे शेकडो प्रकार असतील. स्कॉच व्हिस्की, अन शँपेनप्रमाणे काही चीझ हे त्यात्या भागातच तयार झालेले असले तरच ते ते नाव लावू शकतात असे कायदे आहेत.

मॉझ्झरेला : ब्रेडक्रम्बसमध्ये घोळवून तळलेल्या मॉझ्झरेला स्टिक्स ही या चीझची पहिली ओळख. बरेच दिवस यापलीकडे मॉझ्झरेलाचा इतर काही उपयोग असेल असा विचारही आला नव्हता. टी जी आय एफ, बेनिगन्स, हुलिहँस किंवा तत्सम रेस्टॉरंटमधे हमखास मिळणारं शाकाहारी अ‍ॅपेटायझर, ग्रोसरी स्टोअरमध्ये याचीच फ्रोझन पाकिटं मिळतात. ती घरी आणून ओव्हनमधून काढली की झालं. तळण्याचे घोळ नाहीत अजिबात. तसल्याच चिकन विंग्स अन हे स्टिक्स हे अगदी मस्ट असायचे प्रत्येक पार्टीमधे. अशातच एकदा एक मैत्रीण 'चल, तुला चांगली इटालियन होगी खाऊ घालते' म्हणून एका इटालियन दुकानात घेऊन गेली. तिथे नमुन्यादाखल ताजं मॉझ्झरेला देत होते त्याचा एक तुकडा खाल्ला अन ताज्या मॉझ्झरेलाचं व्यसनच लागलं. ग्रोसरी स्टोअरमधनं फ्रोझन स्टिक्स आणणं तर दूरच, तिथनं मॉझ्झरेला आणणंसुद्धा बंदच केलं. ओळखीच्या, नावाजलेल्या इटालियन दुकानातून नाहीतर स्पेशल्टी चीझ दुकानातून चांगलं मॉझ्झरेला आणावं. म्हशीच्या दुधापासनं बनणारं जवळपास एकमेव चीझ. हे फारसं टिकाऊ चीझ नाही. घरी आणल्यानंतर एक-दोन दिवसात संपवावे.

Insalata Caprese ( Capri पद्धतीचे सॅलड ) २ बॉल मॉझ्झरेला, २ व्हाईन राईपन्ड किंवा रोमा टॉमेटो, सात-आठ बेसिलची पानं, चांगलं ऑलिव्ह ऑइल, सी सॉल्ट, मिरपूड

मॉझ्झरेला बॉलच्या अर्धा सेमी जाडीच्या चकत्या कापाव्या. टॉमेटोच्या पण तशाच चकत्या कापाव्या. एका खोलगट प्लेटमधे एक मॉझ्झरेलाची चकती , एक टॉमेटोची चकती असे करत सगळ्या गोल रचाव्या. वरून ऑलिव्ह ऑइल, सी सॉल्ट अन मिरपूड शिंपडावे. बेसिलची पाने हातानेच तोडून सगळ्यावर टाकावी. छानशा क्रस्टी इटालियन ब्रेडच्या स्लाईसेस बरोबर खावे. उन्हाळ्यात एकदा तरी करून बघाच. इतर दिवसात मिळणारे टॉमेटो वापरून हे सॅलड केलं तर सगळ्या इटालियन सुगृहिणींचा कोप होणार .

चीझ करताना उरलेलं पाणी परत उकळून केलेलं चीझ ( 'recooked')म्हणजे रिकोटा . हे चीझ वापरून रसमलाई किंवा भाप्पा दोई, मिष्टी दोई करायच्या अनेक रेसिपी इंटरनेटवर, इमेलमधून येत असतात. पण रिकोटाची खरी चव कळायला कनोली खायला हव्यात. शंकरपाळ्यासारख्या चवीची कुरकुरीत कनोलीची नळकांडी ( ट्यूब ) अन त्यात ठासून भरलेलं गोड रिकोटा चीझ. कधी छोट्या छोट्या चॉकलेट चिप्स घालून तर कधी नुस्तंच . हा घरी करायचा प्रकार नव्हे. ज्या दुकानात तयार कनोली मांडलेल्या दिसतील तिथनं सुद्धा घेऊ नये. जिथे कनोली मागितल्यानंतरच त्या नळकांड्यामधे रिकोटा भरून देतात तिथनंच घ्याव्यात, अन् घेतल्याबरोबर २-३ तासात संपवाव्यात. इटलीच्या दक्षिण भागातल्या कसाटा केकमध्येदेखील रिकोटा चीझचे थर असतात. अर्थात आपण खाल्लेल्या कसाटामध्ये आयसिंगच असतं. चीझकेक, कूकी इत्यादी गोड पदार्थांसाठी अमेरिकन, डब्यात मिळणारे रिकोटा चालून जाईल पण रॅव्हिओली, लसान्या वगैरे 'तिखट्या' पदार्थांसाठी इटालियन दुकानात मिळणारे थोडे खारट, कमी पाणी असलेले रिकोटा जास्त चांगले .

मास्कारपोने: तिरामिसु केकचा अविभाज्य भाग. मास्कारपोने शिवाय तिरामिसु म्हणजे कांदे-बटाटे न घालता मसाला-डोसाच. हे चीझ क्ररताना रेनेट वापरत नाहीत, त्यामुळे हे चीझदेखील शाकाहारी व्यक्तींना चालेल. घट्ट क्रीमसारखं दिसणारं हे चीझसुद्धा फार दिवस टिकत नाही. सॉसमधे, रिसोटोमध्ये याचा वापर होतो, पण मुख्य उपयोग गोड पदार्थात. मास्कारपोने चीझ अन् crème fraîche हे एकमेकांना सबस्टीट्यूट म्हणून वापरता येतात पण ते अनुक्रमे इटालियन अन फ्रेंच लोकांना सांगू नये !

मास्कारपोने वापरून सोपे डेझर्ट : फ्रोझन किंवा ताज्या स्ट्रॉबेरी- ब्लूबेरी-रास्पबेरी सर्व मिळून दोन कप, दीड-दोन कप मास्कारपोने, दोन टेबलस्पून कुठलीही फ्रूट लिकर, दोन चमचे मध.

फळांवर ( फ्रोझन असल्यास फ्रीझ मधे थॉ करून ) फ्रूट लिकर घालून हलवून झाकून तासभर बाहेर किंवा १०-१२ तासपर्यंत फ्रीझमधे ठेवावे. लिकर आवडत/चालत नसल्यास थोडी साखर अन् व्ह्ननिला इसेंस घालून ठेवावे. मध अन् मास्कारपोने चीझ एकत्र करून फेटून घ्यावे. वाईन ग्लास किंवा सुंदरशा काचेच्या पेल्यांमधे फळांचा थर, चीझचा थर असे आलटून पालटून घालावे. सुरवात फळांपासून करावी अन शेवटचा थर चीझचा असावा. वरती एखादी रास्पबेरी अन दोन पुदिन्याची पानं ठेवावी. 'नो कूक डेझर्ट', शिवाय दिसायला एकदम सुंदर.

इटालियन चीझबद्दल बोलताना पार्मेझान अन पेकोरिनो रोमानोबद्दल सांगितलंच पाहिजे. ऑलिव्ह ऑइल-बेसिल-लसूण या खालोखाल इटालियन स्वैपाकात या दोन प्रकारच्या चीझचा वापर होत असावा.

पार्मा भागातलं चीझ ते पार्मेझान ( इटालियनमध्ये Parmigiano-Reggiano )पार्मा अन् रेजिओ या भागातल्या गाईंच्या दुधापासून सातशे वर्षं जुन्या कृतीने बनवलेल्या चीझलाच फक्त हे नाव वापरण्याचा हक्क आहे. हे चीझ करताना रेनेट व्यतिरिक्त इतर काहीही पदार्थ वापरले जात नाहीत. चीझ गाळून पार्मेझान चीझ बनवल्यानंतर दीडेक वर्ष 'क्युअर' व्हावं लागतं. या अवधीत त्यातला पाण्याचा अंश कमी होतो अन दुधातल्या / वातावरणातल्या बॅक्टेरिआंच्या प्रभावाने त्याची चव खुलते. हजारभर लिटर दुधापासुन पार्मेझानची ८०-८५ पाउंडाची दोन चाकं तयार होतात. क्युअर व्हायला ठेवायच्या अगोदर चीझ बनवणार्‍या कंपनीचं नाव, तारीख, बॅच ह्याचा ठसा प्रत्येक चाकावर उमटवला जातो. पार्मिज्जियानो-रेजियानोचं सर्टिफिकेट मिळण्याअगोदर एक सरकारी अधिकारी प्रत्येक चाकाची तपासणी करतो. खाऊन नाही, फक्त एका छोट्या मॅलेटने प्रत्येक चाकावर ठोकून आत तडे, भेगा, मोकळ्या जागा आहेत की नाही हे तपासून तडे/भेगा नसलेल्या चाकांवर पार्मेज्जियानो रेजियानोचा ठसा उमटवला जातो. मोठ्या चीझच्या दुकानात गेल्यास वेगवेगळ्या आकाराची पार्मेझानची चाकं थप्पी लावून ठेवलेली दिसतात. शक्य असल्यास क्राफ्टचं किंवा इतर बाटलीत / डब्यात मिळणारं, अगोदरच तुकडे केलेलं पार्मेझान घेण्याऐवजी असल्या दुकानातून पार्मेझानच्या चाकाचा तुकडा आणून पहा. त्याची चव जास्त nutty असते अन पोत थोडा खरखरीत असतो. पेस्तो सॉस, अल्फ्रेडो सॉस यात पार्मेझान हा महत्वाचा घटक. पण सूप किंवा रिसोटोवर देखील किसलेले पार्मेझान शिंपडायची पद्धत आहे. हे चीझ इटालियन लोकांचं इतकं आवडतं की त्या चाकाची साल सुद्धा टाकून देत नाहीत , सूपमधे किंवा पास्ता सॉसमधे त्याचे तुकडे घालून उकळतात. रेचल रे अन् जियाडा डिलॉरेंटिस दोघी टी व्हीवर सुद्धा सांगतात याबद्दल.

पार्मेझान रिसोटो - २ कप आर्बोरिओ किंवा तसलाच जाड, बुटका तांदूळ ( बासमती, सोना मसूरी, कोलम, जॅस्मिन वगैरे वापरू नये - गचका होणार ) , पाच कप चिकन ब्रॉथ, २ टेस्पून अन्सॉल्टेड बटर, २ टेस्पून कनोला किंवा कॉर्न ऑइल, २ टेस्पून बारीक चिरलेले शॅलट्स, ( याऐवजी छोटे लाल कांदे चालतील ) अर्धा कप किसलेले पार्मेझान .

एका पातेल्यात ब्रॉथ मंद आचेवर गरम करत ठेवावे, उकळी आली नाही पाहिजे पण ब्रॉथ गरम असावे.
एका जाड बुडाच्या पातेल्यात १ टेबलस्पून लोणी अन् सर्व तेल घालून त्यात कांदा (शॅलट्स) घालून मध्यम आचेवर कांदा पारदर्शक होईपर्यंत परतावे. मग तांदूळ घालून नीट परतून घ्यावे. आता अर्धा कप ब्रॉथ घालून तांदूळ परतत रहावे. ब्रॉथ आटत येईल तसे अर्धा अर्धा कप गरम ब्रॉथ घालून तांदूळ परतत रहावेत. वीसेक मिनिटे असे केल्यावर तांदळाचा दाणा शिजला की नाही ते पहावे. दाणा शिजला पाहिजे पण मऊ-गचका होऊ नये. गरज पडल्यास २ टेबलस्पून ब्रॉथ घालून तांदूळ परतावेत. तांदूळ शिजला की आच कमी करून किसलेले चीझ व एक टेवलस्पून लोणी घालून नीट मिसळून घ्यावे व लगेच वाढावे. रिसोटो बनवत असताना तांदूळ सतत परतत रहायला हवे नाहीतर बुडाला लागतील किंवा दाणे चिकट होतील.

याच कृतीत चिकन ब्रॉथच्या ऐवजी कोलंबीचे शेल्स उकळलेलं पाणी घातलं अन तांदूळ शिजत आल्यावर लोण्यावर परतलेली कोलंबी / स्कॅलप्स घातले की सी फूड रिसोटो तयार.

पेस्तो सॉस - जितक्या इटालियन बायका तितक्या पेस्टो सॉसच्या कृती असं म्हटलं तर अतिशयोक्ती नसावी. पण सर्व कृती इतक्या साध्या अन सोप्या असतात की जेव्हा ताजा बेसिल मिळतो तेव्हा हा सॉस करून ठेवला तर पास्ता अन सँडविचेसमध्ये सुद्धा वापरता येतो.

२ कप गच्च भरून बेसिलची पाने ( स्वीट जेनोवीज बेसिल सगळ्यात चांगला ) धुऊन, निथळून , कोरडी करून
३ टेबलस्पून पाईन नट्स
२ मोठ्या लसणीच्या पाकळ्या
अर्धा कप किसलेलं पार्मेझान चीझ
२ टेस्पून किसलेलं रोमानो चीझ
अर्धा कप चांगलं एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल
३ टेबलस्पून लोणी - रूम टेंपरेचरला
कोशर सॉल्ट किंवा सी सॉल्ट
बेसिल, लसणीच्या पाकळ्या, पाईन नट्स , ऑलिव्ह ऑइल अन् थोडे मीठ फूड प्रोसेसर किंवा ब्लेंडरमध्ये एकजीव होईपर्यंत फिरवावे. मग एका भांड्यात काढून दोन्ही चीझ त्यात घालून नीट मिसळून घ्यावे. शेवटी मऊ झालेले बटर त्यात घालून नीट मिसळावे.

जर भरपूर प्रमाणात करायचे असेल तर चीझ अन बटर मिसळायच्या आधी फ्रीझ करून ठेवता येईल. लागेल तेव्हा थोडे थोडे थॉ करून त्यात चीझ अन् बटर मिसळायचे. फ्रीजमध्ये गच्च झाकणाच्या बाटलीत ७-८ दिवस टिकेल हा सॉस.

झटपट पार्मेझान टॉमेटो
प्लम टॉमेटो अर्धे चिरून एका ओव्हनप्रूफ ट्रे मधे फॉइलवर ठेवावे. पार्मेझान चीझ, मीठ, मिरपूड व ब्रेडक्रम्स मिसळून त्यात ताजी बेसिलची पाने / रोझमेरीची पाने / ओरेगनोची पाने यांपैकी एक काहीतरी बारीक चिरून मिसळावे. हे मिश्रण प्रत्येक अर्ध्या टॉमेटोवर अर्धा-पाऊण चमचा घालावे. थोडं ऑलिव्ह ऑइल सगळ्यांवर शिंपडून ४००डिग्री ओव्हनमध्ये १०-१२ मिनिटे ठेवावे. नंतर २-३ मिनिटे ब्रॉइल करून परत थोडे ऑलिव्ह ऑइल शिंपडावे व लगेच सर्व्ह करावे.

पेकोरिनो रोमानो म्हणजे रोम अन् जवळच्या भागात ( किंवा त्या पद्धतीने ) बनवलेलं मेंढीच्या दुधाचं चीझ. मेंढी हा आद्य माणसाळलेला प्राणी असल्याने पेकोरिनो चीझ हे कदाचित आद्य चीझ असावं. सर्वसाधारणपणे बटर वापरून केलेल्या सॉसवर पार्मेझान शिंपडावे अन ऑलिव्ह ऑइल वापरून केलेल्या सॉसवर पेकोरिनो शिंपडावे असे संकेत आहेत. या चीझची चव पार्मेझानपेक्ष बर्‍यापैकी उग्र असते. चांगलं पार्मेझान चीझ जसं नुसतंच किंवा बाल्सामिक व्हिनेगर बरोबर खाता येतं, तसं हे चीझ नाही खाता येत. याची शान 'ग्रेटर' सोबत!

आयरिश चीझ : आपल्याला इतिहासात आयर्लंडचा कुप्रसिद्ध दुष्काळ माहीत असतो, पण आयर्लंडमध्ये दुधदुभतं मुबलक असतं, तिथेसुद्धा चीझ बनवण्याची जुनी परंपरा आहे हे कळल्यावर बहुतेक भारतीयांना आश्चर्य वाटत असतं. आयरिश चीझचे माझ्या आवडीचे प्रकार कुलिआ अन डब्लिनर्स. हे दोन्ही हॉलंडच्या गूडा चीझ सारखे लागतात. अपेटायझर म्हणून या चीझच्या स्लाईसेस , लाल अन् हिरव्या सफरचंदाच्या स्लाइसेस, सोबत थोडी बिनबियांची लाल द्राक्षं एका ट्रेवर मांडावीत, भोवती आयरिश सोडा ब्रेडच्या पातळ स्लाईसेस रचाव्यात अन् आपल्या आवडीच्या वाईनसोबत या सर्वाची लज्जत चाखावी.

ग्रीक चीझ
ग्रीक सॅलड किंवा गिरो / यिरो / जायरो अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणार्‍या पदार्थांमुळे फेटा चीझची पहिली ओळख झालेली. अंमळ खारट, उग्र चवीचं , घट्ट चक्क्यासारखं दिसणारं हे चीझसुद्धा मेंढीच्या दुधापासून बनवतात. टर्की, बल्गेरिया, जॉर्जिया या भागात सुद्धा फेटा चीझचं उत्पादन अन् वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. बहुतेक ग्रोसरी स्टोअर्समधल्या सॅलड बारमध्ये हे चीझ दिसणारच. फिलो पेस्ट्री किंवा पफ पेस्ट्री यांच्यामध्ये फेटा चीझ व पालकाचे मिश्रण भरुन स्पनाकोपिटा नावाचा प्रकार मिळतो तोही मस्त लागतो. ग्रीक, टर्किश, मिडल इस्टर्न किंवा इस्रायली रेस्टॉरंटमधे शाकाहारी मंडळींचा आवडता प्रकार.

दुसरं जरा कमी प्रसिद्ध ग्रीक चीझ हलूमी हे देखील मेंढी किंवा शेळीच्या दुधापासनं बनवलेलं असतं, पण फेटाइतकी त्याची चव उग्र किंवा खारट नसते. फेटा चीझचे स्लाईसेस किंवा चौकोन करता येत नाहीत पण हलूमी चीझचे जाडसर स्लाईसेस करता येतात.

फ्लेमिंग हलूमी : हलूमीच्या अर्धा इंच जाड स्लाईसेस तव्यावर जरासं लोणी घालून परतायच्या, दोन्ही बाजूंनी सोनेरी झाल्या की एका प्लेटमध्ये काढून त्यावर एक चमचा कोमट ब्रँडी ओतावी व ( सांभाळून, केस, चष्मा, दुपट्टा, टाय इत्यादी जपून ) ब्रँडी पेटवून द्यावी. लगेच अर्ध्या लिंबाचा रस त्या चीझवर पिळावा. पिटा ब्रेडच्या तुकड्यांबरोबर हे चीझ खावे.

"Tell me what you eat, and I will tell you what you are," असं म्हणणार्‍या Brillat-Savarin या प्रसिद्ध फ्रेंच लेखकाने चीझ बद्दल म्हटलंय, "dessert without cheese is like a beautiful woman with only one eye". तर फ्रेंच व इतर चीझ पुढच्या भागात!

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

’चीज’ म्हणजे माझा वीक पॉईंट आहे त्यामुळे लेख वाचणे मस्ट होते. छान दिली आहेत माहिती. पण ज्यांनी ’चीज’ च्या वाटा जास्त धुंडाळल्या नाहीयेत त्यांच्यासाठी अजून थोडं. धनुडी भारतात जास्त करुन जे चीज मिळतं ते चेडर चीज असतं. अमेरिकेत जास्त करुन केशरी चेडर मिळत असलं तरी ते पिवळ्या, पांढऱ्या रंगाचंही असतं.
शोनू, क्रीम चीझ पनीरसारखं हे वाक्य मला पटलं नाही. चवीनुसार सांगायचं तर आपल्याकडे भारतात जे चीज स्प्रेड मिळतात तसं काहीसं लागतं चवीला फक्त थोडं कमी मीठ . आणि घट्ट असतं ( क्रीम चिझची स्प्रेडस अमेरिकेतही मिळतात ) चीजकेक करण्यासाठी क्रीम चीज वापरतात.

आपल्या पनीरच्या जवळपास जाणारं कॉटेज चीज म्हणता येईल. पण अगदी नेटकं सांगायचं तर घोटलेल्या दह्यात पनीरचे छोटे तुकडे टाकले तर कसं लागेल तसंच ते दिसतं आणि लागतं सुद्धा. त्यामुळे पनीरच्या जागी कॉटेज चीज सबस्टिट्युट करायला गेलात तर फ्लॉप होईल रेसिपीचा. पनीरच्या जागी फक्त टोफू वापरुन चालतं. पण तो एक स्वतंत्र विषय.

रिकोटा चीज खव्यासारखं लागतं पण ओला खवा. आपल्याइथे मिळतो तसा नाही. त्यामुळे शाही पेढे, बर्फी बनवायला मस्त आहे हे चीज. ह्याला मीठाची किंवा आंबूस चव नसते.

मस्करपोने चीज चवीला घोटलेल्या मलाईसारखं लागतं. गोडसर. मीठ अजिबात नाही. त्यामुळे जिथे मलाई असेल अशा ठिकाणी रीप्लेस करायला हरकत नाही. म्हणजे पंजाबी भाज्यांवर, फ्रूट सॅलेड वगैरे. चीजकेक मध्ये क्रीम चीज बरोबर हेही वापरलं तर केक अगदी रॉयल होऊन जातो. चीजकेक फॅक्टरीचा केक वेगळा लागतो ते त्यातल्या मस्करपोनेमुळेच.

रिकोटा चीझ वापरुन रसमलई किवा अगूर मलई कशी करायची ? प्ली़ज रेसीपी मिळेल का ? गूगल सर्च करुन झाला आहे.मला कुणीतरी ट्राय केलेली खात्रीची रेसीपी हवी आहे.

शोनू, क्रीम चीझ पनीरसारखं हे वाक्य मला पटलं नाही. >> चवीबद्दल म्हटलंच नव्हतं मी. क्रीम चीझ बनवण्याची पद्धत ही इतर चीझच्या पद्धतीपेक्षा वेगळी आहे. आपल्या पनीर बनवण्याच्या पद्धतीसारखी आहे. ( दोन्ही बनवताना दुधात आम्ल पदार्थ घालतात )

बरोबर आहे तुझं Happy ... लेख खूप छान आहे. अभ्यासपूर्ण. पण माझा असा अनुभव की लोकं नवीन नवीन चीझ ट्राय करायला बिचकतात. म्हणून जरा चवींविषयी लिहिलं. चवीची आयडीया आली की पटकन उचलला जातो नवीन प्रकार.

मस्त गं शोनु छान लिहिल आहेस..
सुरुवातीला मला चीज हा प्रकार अज्जीबात आवडायचा नाही. ब्लु चीज मी अजूनही खाऊ शकत नाही. आणि मोझरेल्ला शिवाय दुसरा प्रकार माहित नव्हता. पण मग नंतर चीज मधली गंमत कळायला लागली. Gruyère cheese dry bread वर मस्तच लागत. आणि Gouda cheese with pears is heaven. Happy
मस्त लिहिल आहेस.

धन्यवाद शोनू, एकदम वेगळं काहीतरी वाचायला मिळालं आणि तू खूपच छान लिहिलसं.
नारळाच्या किसासारखी जी पावडर असते ते कुठले चीझ?

शाकाहारी लोकांना एक विशेष सुचना! अमेरिकेत आणि इतर पाश्च्यात देशात जे चीझ वापरले जाते त्यामध्ये रेनेट नावाचा पदार्थ असतो. हा पदार्थ गाईच्या वासराच्या पोटाला कापून काढलेला असतो. तुम्हाला जर चीझ खायचेच आहे तर अमूल चे खा. आम्ही परदेशात १० वर्षे राहलो आणि नेहमी वेगन पिझ्झा बेस आणून (एमीज किचेन ) त्यावर अमूल चीझ टाकून एन्जोय करतो. आमची मुले कधीच शाळेतला किंवा पिझ्झा हट चा पिझ्झा खाण्याचा हट्ट करीत नाही कारण त्यांना वासराचे प्राण वाचवणे जास्त महत्वाचे वाटते! आणि अजून इक महत्वाची गोष्ट, अमेरिकेत शुद्ध शाकाहारी म्हणून वास्तव्य करणं खूप सोप्पं आहे. फक्त थोडं डोकं वापरण्याची आवशक्यता आहे. फ़क़्त हे ठरवायचं कि हे डोकं आपण कुणाचे प्राण घेण्यासाठी वापरायच कि वाचवण्या साठी! अधिक माहिती साठी कृपया en.wikipedia.org/wiki/
Rennet संकेतस्थळा ला भेट द्या.

तुम्ही जर शुद्ध शाकाहारी आहात तर लोविंग हट (www.lovinghut.us/)सारख्या वेगन ठिकाणी जायला हवं.

अधिक माहिती साठी खालील संकेतस्थळा ला भेट दया !www.happycow.net/

Pages