आमच्याकडचा गणपती

Submitted by संयोजक on 19 August, 2009 - 15:57

गणपती बाप्पा ssss मोरया!
मंगलमूर्ती ssss मोरया!

श्रावण सुरू झाला की तुम्हा-आम्हाला सगळ्यात मोठे वेध लागतात ते आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे .. लहान मुलांपासून ते अगदी वडीलधार्‍या मंडळींपर्यंत, समाजातल्या कुठल्याही स्तरांतल्या व्यक्तीला गणपती बाप्पा हे सगळ्यात लाडकं दैवत वाटतं .. गणेशोत्सवातल्या ह्या दीड किंवा पाच किंवा दहा किंवा काही काही ठिकाणी एकवीस दिवसांतला क्षणन् क्षण भारावून टाकणारा असतो .. गेली कित्येक वर्षं आपण गणेशोत्सव साजरा करतोय पण तरीही दरवर्षीचा गणेशोत्सव नेहमीच एक नविन अनुभूती देऊन जातो ..

आदल्या दिवशी रात्री उशीरापर्यंत जागून केलेली आरास असो वा गणेशचतुर्थीच्या दिवशीचं ताला-वाद्यातलं आगमन असो, प्रतिष्ठापना असो, पहिली आरती असो, उकडीच्या मोदकांचा नैवेद्य असो, बाप्पाजवळ बसून केलेलं प्रसाद वाटण्याचं काम असो, रोजच्या आरत्या, रात्र रात्र जागून सादर केलेले किंवा आस्वाद घेतलेले कार्यक्रम असोत आणि अगदी महाआरती आणि 'निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी ..' म्हणत दरवर्षी दिलेला भावपूर्ण निरोप असो... दरवर्षीचा गणेशोत्सव एक सुखद, प्रफुल्लित करणारा आणि नव्याने पुन्हा वर्षभर वाट बघायला लावणारा एक अनोखा सोहळा असतो !!

तेव्हा तुमच्या मनातल्या, घरातल्या, कॉलनीतल्या, आळीतल्या, देशातल्या, विदेशातल्या लाडक्या गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हां-आम्हां सगळ्यांना घडवून आणा .. लिखीत, छायाचित्रीत, ध्वनीमुद्रीत अगदी कसल्याही स्वरुपात ..

तसेच, घरी किंवा कॉलनीत, तुम्ही कार्यरत असलेल्या गणेश मंडळांकडून केल्या जाणार्‍या सामाजिक उपक्रमांबद्दल माहिती दिलीत तर उत्तमच!
उदा. एखादे गणेश मंडळ निर्माल्याची विल्हेवाट लावताना पर्यावरणाचे भान ठेवून काम करत असेल तर त्यापासून मायबोलीकरांना आणि इतरांनाही प्रेरणा घेणे शक्य होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय मस्त वाटतय सगळे फोटो पाहून.
सगळ्यांचे बाप्पा छान. अमॄता, प्रीती आणि फ ह्यांच्या घरी घडवलेल्या मुर्त्या पण खुपच छान आहेत.
सगळ्यांचे नैवेद्य आणि आरास पाहून घरची आठवण झाली.
माझ्या माहेरी १० दिवसांचा गणपती असतो आणि सासरी दिड. मी इथे दिड दिवसांचा बसवते.
Ganapati.JPGGanapati1.JPG

माझे आजोबा (आईचे वडिल) पाटबंधारे खात्यात अभियंता होते.ते उत्तम चित्रकार आणि मूर्तिकार देखिल होते.दरवर्षी तेच गणपतीची मूर्ती घडवत.२००७ साली ते आम्हाला सोडून गेले.त्यावर्षी काय करावे मोठा प्रश्न होता.त्यांची उणीव तर पदोपदी जाणवत होतीच पण त्यांचा इतक्या वर्षांचा नेम मोडतो का काय अशी भीती पण वाटू लागली.त्यावर माझी आई आणि मावश्या ह्यांनी आपण त्यांचा नेम मोडू द्यायचा नाही असा निश्चय केला आणि मूर्ती घडवायला सुरूवात केली.त्या तिघीमिळून ३ मूर्ती घडवतात.आजोबांनी केलेल्या मूर्तीचा फोटो सध्या माझ्याकडे नाही पण २००७ साली आईने केलेल्या मूर्तीचा हा फोटो आहे. आजोबांकडून वारसा म्हणून मिळालेल्या कलेचं पूजन हाच आमचा गणेशोत्सव!!

Ganpati ani Gauri-2007 057.jpg

धन्यवाद सगळ्यांना!! Happy
वॉलमार्ट मधे क्रेयोलाचा natural air dry clay मिळतो. तो वापरुन बनवली मुर्ती. डोळ्यांचच जरा टेंशन होत, रंगवायला भिती वाटत होती. त्यामुळे नवर्‍याने कगदाचे डोळे आणि डोक्यावरच गंध बनवल.

सगळ्यांचेच गणपती, आरास, नैवेद्यं... खूप खूप भिडलं मनाला. कुठेही असलो तरी आहे त्या परिस्थितीत, हाती असलेल्या साधनसामुग्रीसह गणेशाचं आवाहन, त्याची राखलेली भिस्तं, पुरवलेलं कोड... ह्यासार्‍यासाठी मनाची जी बैठक हवी... ती इतकी घडीव आहे तुमच्या सगळ्यांमधे की... त्या गणेशाआधीही तुमच्यातल्या ह्या भक्तीला माझा नमस्कार... तो सरळ जाऊन "त्या"ला पोचतो ही माझी श्रद्धा आहे.
जियो... तुमच्या मनाची ही शक्ती, ही भक्ती अशीच राहो... आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगी ही जिद्दं, ही कर्मावरली निष्ठा सदैव जागृत असो... माझ्यात त्याचा अंशतरी येवो... हीच माझी त्याच्याकडे मनापासून प्रार्थना.

GANAPATI bappa.jpg

हा आमच्या बाप्पाचा फोटो Happy
गेली ७ वर्ष आम्ही ह्या व्हाईट मेटलच्या मुर्तीची घरच्या घरी प्राणप्रतिष्ठा, विसर्जन करतो आहोत. ५ व्या दिवशी उत्तरपुजे नंतर घरातल्याच टबात विसर्जन होते, नंतर ते पाणी तुळशीला आणि इतर झाडांना घालतो. ज्यावेळी आम्ही अशाप्रकारे पुजा करायला सुरुवात केली त्यावेळी इकोफ्रेंडली मुर्ती फारश्या नव्हत्या, शाडुच्या मुर्ती देखील फार कमी ठिकाणी मिळायच्या. प्लास्टर ऑफ पॅरिसची मुर्ती आणायची नाही आणि थर्माकोलची सजावट करायची नाही हे पक्क ठरवलेल होत म्हणुन अशाप्रकारे घरातल्या घरात मेटलच्या मुर्तीची पुजा करायला सुरुवात केली. कारण पुजा तर करायची आवड आणि इच्छा दोन्ही होतं. जेव्हा सुरुवात केली तेव्हा सुरुवातीची २ वर्ष तरी बहुतेक सगळ्यांनी भुवया उंचावुनच प्रतिसाद दिला. अजुनही काही जण मनातल्या मनात तसच म्हणत असणार (आता हे वाचणार्‍यांपैकी पण बरीच जण हे पटलेली/ न पटलेली असु शकतात कारण ज्याचा त्याचा प्रश्न) पण आपल्या मनातला भाव महत्वाचा, आपण जे करतोय ते आपल्याला पुर्ण पटलय नी त्यामागची भावना ही शुद्ध आहे हे स्वतःला सांगत टिकेकडे कानाडोळा करत गेली ७ वर्ष अशाप्रकारे उत्सव करतोय. पहिली दोन वर्ष सोडता आता बर्‍याच लोकांचा आमच्या कडे बघायचा दृष्टिकोनही बदलत गेलाय हे जाणवतय (म्हणजे उत्सव म्हणजे काय भातुकलीचा खेळ म्हणायचा का काय अशा प्रकारे करायला? इथपासुन सुरु झालेला प्रवास, खरच चांगला प्रयत्न आहे, काही हरकत नाही अशा प्रकारे देखील करायला इथपर्यंत आलाय) Happy आमच्या पुरत म्हणाल तर जे शुद्ध भाव पहिल्या वर्षी होते तेच दरवर्षी अनुभवतोय Happy

सुरेख.......सुरेख सगळ्यांचे बाप्पा पाहुन मन कसं प्रसन्न झालं अगदी !
घरी बनविलेल्या सर्व मुर्त्या खासच!

|| मोरया ||

वा , मस्तच आहेत सर्वांच्या घरचे गणपती. ज्यांनी घरी मुर्ती घडवल्यात त्यांना दंडवत.
कविता खरंय, भावना महत्वाची .
धनु.

मागच्या वर्षी शीट्टीत आला होता बाप्पा आमच्याकडे आणि ह्यावर्षी बंगुत Happy
अजुन आहेत फोटो पण size मोठा असल्याने टाकता येत नाहियेत.. Sad

Image8.jpg

वाह! एकाहून एक आहेत सजावटी, मूर्ती, नैवेद्य वगैरे. ज्यांनी घरी मूर्ती तयार केल्यात ते तर महान आहेत.

खूपच मस्तं वाटलं! मी लहानपणी गुहागर ला होतो कोकणात, तेव्हा घरोघरी गणपतीच्या दर्शनाला जायची पद्धत होती. मला तशा आनंदाची मस्त झलक मिळाली (actual खिरापत/मोदक्/लाडू मिळाले नाही ना! म्हणून झलक :-))
आणि अगदी आनंद झाला. बघतो मी आज रात्री आमच्याकडच्या गणपतीचा फोटो काढून तुम्हाला देखील त्याच्या दर्शनाचा लाभ द्यायचा प्रयत्न करतो!
जय हेरंब!

गणपती बाप्पा ssss मोरया! मंगलमूर्ती ssss मोरया!

आमचा बाप्पा जय!
DSC00589.JPG

इतक्या सगळ्या बाप्पांच्या दर्शनाचा लाभ मिळाला..मंडळ आभारी आहे !!

आमच्या घरचा गणपती
घरी आणताना
DSC04904.JPG
प्रसाद
DSC04954.JPGDSC04987.JPG

सगळ्याचे गणपती, प्रसाद पाहुन , आठवणी वाचुन मस्त वाटल एकदम.
मी पुर्वी २००६ च्या "आमच्या घरच्या गणपती" मध्ये हे लिहिलेल. आताही परत तेच लिहिन. Happy
.............................................................................................
आमच्याकडे पण अशीच असते गौर .
पण आमच्याकडे तेरड्याच्या फांद्या , झेंडुच्या फ़ुलासकट फ़ांद्या,दुर्वा,आघाडी याना एकत्र करतात . मग पांढर्‍या चाफ़्याची पाच पान बाजुला लावुन याचा गुच्छ तयार करतात आणि तो रिकाम्या तांब्यात ठेवतात .
मुखवटे वगैरे नसतात .
मग दुपारनंतर नदिवर,बोरींग वर किंवा ओढ्यावर, किंवा विहिरीवर सगळ्या मुली बायका जातात. सगळ्या जणी इतक्या नटलेल्या असतात ना!! जणु त्याच गौरी सारख्या दिसत असतात. पुढे band लावलेला असतो. आणि मागे हि मिरवणुक. नदीवर पाच खडे घेवुन त्याची पुजा करुन ते या तांब्यात टाकतात आणि पाणी भरुन वरती ती गौर ठेवतात.

ओढ्यावर शंकराच मंदिर होत . अगदी चित्रात काढल्यासारख. मग झिम्मा, फ़ुगडी वगैरे खेळ खेळले जायचे. चिरमुरे,भेंड बताशे वाटायचे. मग घरी आल्यावर गौरीची स्थापना करायची. मग हळदीकुंकु.

गौराक्का एक दिवस शेपुची भाजी,भाकरी आणि एक दिवस पुरण पोळी जेवायची.
आई नैवेद्य दाखवताना इतकी तृप्त असायची ना ! मला तर तीच गौर होवुन आली आहे अस वाटायच .

इतके सुंदर दिवस होते ना ते!! आता सुद्धा आमच्याकडे तशीच गौर बसवली जाते. त्याच style चा गणपती आणला जातो आणि त्याच्या शेजारचा छोटा मातीचा गणपती (गणोबा)सुद्धा त्याच कुंभाराच्या घरातुन येतो.
फ़क्त आम्ही बहीनी तिथ नसतो इतकच.
आई सांगत होती आता तो कुंभार फ़ार वाकलाय. त्याला काम होत नाही. त्याची मुल मोटार लावलेल चाक वापरुन भांडी तयार करतात.
पण गणपतीत मात्र अजुनही तो ते मातीचे गणोबा तयार करतोच.
वरती मोटोळीचा उल्लेख निघालाय म्हणुन आमच्याकडे फ़ळाच्या माळा करतात. शेंगदाने,चुरमुर्‍याच्या पण माळा तयार करतात आणि त्या गणपती समोर बांधतात.

एरवी मी इतकी homesick होत नाही. बहुदा वय वाढेल तस आठवणी पण बोथट होत जातात. पण गणपती आणि दसरा दिवाळी ला मात्र जुने सगळे दिवस आठवतातच. आणि मग आश्चर्य वाटत रहात कि इतके पटकन कसे संपले ते दिवस. बहुदा बालपणातले हे दिवस म्हणजे त्या bombay मिठाई सारखे असतात वाटत. जिभेवर ठेवुन आस्वाद घ्यावा तोवर संपुन पण जातात.
पण मागे रेंगाळणारी ती चव मात्र विसरता विसरु येत नाही.
आपण फ़ार मोठे झालो नाही याची तेवढीच एक खुण. Happy

सगळ्यांच्या मुर्ती खुपच सुंदर आहेत...हे पहा आमच्या बाप्पाचं गोंडस रुपडं आणि त्याचा आवडता नैवेद्य...

7.jpgscan0008.jpg8.jpg9_0.jpg11.jpgImage039-2.jpg
ही सजावटीसाथी वापरलेली कागदी फुलं. ही फुलं आणि मोदक माझ्या आईच्या कलाक्रुती आहेत.

मस्तच!!!! मूर्ती, सजावट, प्रसाद सगळे एकदम देखणे दिसतय.
फुले कागदी आहेत असे अजिबात वाटत नाही.

परदेशात वास्तव्य करायला लागल्यापासुन माझ्याकडे एक गणेशमुर्ती असते. पण १० दिवसांचा गणपती मी परदेशात कधीही बसवला नाही. कारण १० दिवसानंतर गणपती विसर्जीत करणे मला भयंकर वेदना देणारे वाटते.

त्यापेक्षा हा ऑनलाइन गणेशुत्सव खुप छान! गणपती विसर्जन होत च नाही!

नमस्कार मंडळी,

हे आमच्या घरच्या (कॅनबरा) गणपती बाप्पाचे फोटो.

************

गणपतीबापा दीड दिवस येतात. आमच्या परीने आम्ही त्यांची सेवा करतो. रात्री जागुन आरास, मोदकांचा, लाडु चा प्रसाद, आरती, पूजा सर्व करतो. इथे मातीची मुर्ती नाही पण मखरात चंदनाची मुर्ती आणि ताम्हनात चांदीच्या मुर्तीची पूजा करतो. ताम्हनातच विसर्जन...

मखरातला चंदनाचा गणपती बाप्पा.
Picture 008.jpg

आरास
Picture 017.jpg

माव्याच्या मोदकाचा प्रसाद...
Copy of IMG_1149.JPG

बेसनाचे लाडु आणि काजु बर्फी...
Copy of IMG_1145.JPG

************

लहानपणी सगळे काका, मावशी, भावंड आदल्या दिवशी घरी जमायचे. रात्री जागुन आरास करायची. दरवर्षी काहीतरी नाविन्यपुर्ण आरास असायची. आम्ही एकीकडे गाण्याच्या, नावांच्या भेंड्या खेळायचो. रात्री ११.३० - १२ वाजता शेवटी आई आम्हाला झोपायला पिटाळायची. सकाळी लवकर उठुन, पटकन आवरुन (कधी नाही ते) तय्यार होऊन बप्पाला आणायला जायचे. 'गणपती बप्पा मोरया' म्हणत बप्पाला घरी आणायचे. दारात आईने तांदुळ पाणी उतरवले की बप्पाला घरात न्यायचे आणि सजवलेल्या मखरात बसवायचे. मग पूजा, प्रसाद, आरत्या.. संध्याकाळी सगळ्या कॉलनीतले यायचे आरती आणि प्रसादाला. झांजा, घंटा, टाळ्या.. कानात अजुन आवाज घुमतो. काका आणि बाबा यांच्यात मंत्रपुष्पांजली म्हणताना 'आविक्षितस्य कामःप्रे........' इथे कोण जास्त वेळ श्वास रोखुन ठेवतो याची चढाओढ व्हायची...
आणि प्रसाद तरी किती.. सर्व प्रकारचे मोदक, पेढे, खिरापत, लाडु, खिर, पुरण... आम्हा पोरांची नुसती चंगळ असायची.
मग दुसर्‍या दिवशी विसर्जनाची वेळ जवळ ययला लागली की डोळे अगदी भरुन यायचे. 'पायी हळुहळु चाला, मुखाने गजानन बोला' म्हणत, दादर चौपाटीवर आणि नंतर पुण्यात नदीकाठी विसर्जन.. आरती, वाटली डाळ्-खिरापती चा प्रसाद... बाबा आणि काका मुर्ती पाण्यात विसर्जन करुन येताना पाटावर थोडी वाळु-खडे घेउन यायचे. आम्ही बहिणीतर रड रड रडायचो...घरी परत आल्यावर स्गळ एकदम शांत शांत आणि रिकाम वाटायच..
हे सगळ आठवुन अत्ता पण डोळ्यात पाणी उभ राहिल... आपण मोठे होतो पण त्या लहानपणीच्या आठवणी मनात घर करुन बसतात....आणि आठवल्या की डोळे आपसुकच ओलावतात...

Pages