तो दिवस

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

शलाकाने लिहिलेलं "ओरखडा" वाचलं.. असच एक प्रसंग मला पण बर्‍याच दिवसापासुन सांगायचा होता. आज शलाकाने लिहिलेलं वाचलं आणि डोळ्यासमोर हा प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला. माझ्या सुदैवाने या शिक्षकाची लवकरच दुसर्‍या वर्गावर बदली झाली.

माझं लहान्पण फ़ार चांगल्या परिस्थितीत गेलं नाही. दोन वेळचं जेवण, रहायला घर आणि इतर जुजबी गरजा भागवणं एवढंच जमायचं. त्यामुळे माझी लहानपणी फ़ार हौस झाली नाही. सातवीपर्यंत मी म्युन्सिपाल्टीच्या शाळेमधून शिकले. अर्थात दामले शाळेचा दर्जा मात्र चांगला होता. स्कॉलर्शिपला दरवर्षी दहा तरी विद्यार्थी आणायचेच हे "कर्तव्य" समजून शिकवणारे शिक्षक होते. शाळा "नगरपालिकेची" होती याचा आम्हाला कधीच त्रास झाला नाही. उलट एक हुशार मुलगी म्हणून मला दरवेळेला सर्वत्र पुढे करायचे. मग ते कसली परीक्षा असो, नाटक असो, डान्स असो किंवा बास्केटबॉल. तशी मी सातवीपर्यंत हुशार होते. पहिला नंबर क्वचित यायचा पण पहिल्या पाचात कायम असायचे.

आठेवीला मी पहिल्यादा "मोठ्या" शाळेत गेले. स्वत्:चं एक सात वर्षाचं जपून ठेवलेलं चिमुकलं विश्व सोडून भलतीकएच आल्यासारखं वाटायचं. मोठे वर्ग, खूप तुकड्या, खूप मुलं. आडनावाने हाक मारणारे शिक्षक. सगळंच वेगळं वाटायचं..

त्यात माझ्या वर्गातल्या कुणीच पूर्ण संस्क्रुत घेतलं नाही. अख्ख्या वर्गात माझ्या ओळखेचं कुणीच नव्हतं. शाळेतले ते पहिले दोन महिने मी अक्षरश्: एकटीने बसून काढले. आजूबाजूला पन्नास जण असताना एकटं राहण्याचं दु:ख नंतर आयुष्यभर भोगायचं आहे याची त्यावेळेल जाणीव पण नव्हती.

पहिल्या घटक चाचणीची परीक्षा झाली. आईबाबाबी आधीच सांगितलं होतं. "नवीन शाळा आहे कमी मार्क मिळाले तरी वाईट वाटून घेऊ नकोस."
तरी बर्‍याच विषयामधे मला ठीक मार्क होते. अगदीच नापास कशामधे झालेले नव्हते.
त्या दिवशी तुफ़ान पाऊस पडत होता. मी वर्गामधे एका कोपर्‍यात बसायचे. लाईट नव्हती त्यामुळे वर्ग बराचसा अंधारलेला होता. आमचे इंग्लिशचे सर वर्गात आले. त्याच्या हातात पेपरचा गठ्ठा होता. एक बालसुलभ कुतुहल मनात दाटून आलं. सरानी पेपर वाटायला सुरुवात केली. माझा नंबर त्यानी घेतलाच नाही. माझं कुतुहल वाढत होतं. सर्वात शेवटी त्यानी चष्मा काढुन पुसला आणि म्हणाले.
"नंदिनी.?"
मी उभी राहिले. या सराचा माझ्यावर विशेष राग होता. का ते मला माहीत होतं. त्याच्यामते मी म्युन्सिपल्टिच्या शाळेतून आले होते आणि तरीही "अ" तुकडीमधे होते. अर्थात असं करणारी मीच पहिली होते अशातला भाग नाही. पण तरी खुन्नस ठेवायला नक्की कारण लागतंच असंही नाही ना.

"मी किती वेळा सांगितलय अशा मुलाना अ तुकडी मधे घेऊ नका म्हणून.." माझ्या डोळ्यातून पाणी आलं. त्याच्या बोलण्यातला तिरकसपणा काय त्रास देऊन गेला ते आता सांगता येणार नाही. ते पुढे पण बरंच काही बोलत राहिले. एकंदरीत माझं ईंग्लिश फ़ार वाईट होते. मला कशाचीही अक्कल नव्हती. मी या शाळेत आले हे शाळेसाठी फ़ार दुर्दैवी गोष्ट होती. खरंतर माझी शाळा शिकायची लायकीच नव्हती. कुणाच्या तरी धुणं भांडी करून मी माझं आयुSय घालवणार असताना मी शाळेत कशाला येत होते?

मी नुसती रडत होते. अपमानाने आणि संतापाने थरथरत होते. "रडताय काय? दीडदमडी नाही खिशामधे आणि आलेत वर तोंड करून इथे." वास्तविक माझे वडील त्यावेळेला चांगल्या नोकरीला होते. आर्थिक चणचण कधीच नव्हती. तरी पण त्याचं असं बोलणं ऐकून मला अजूनच रडू आलं. "या इथे आणि घ्या तुमचे दिवे." त्यानी पेपर माझ्या तोंडावर फ़ेकला. मला वीसपैकी तेरा गुण मिळाले होते. म्हणजे इतके पण काही वाईट नव्हते. पण तरी त्यानी बोलून माझा मनावर हा "ओरखडा" उठवलाच होता ना...

नंतर खूप वर्षानी शाळेत गेले. मुद्दाम त्याना भेटले. मी कोण कुठली विद्यार्थिनी याची आठवण करून दिली.
"काय करतेस हल्ली?" त्यानी मला विचारलं.
"मुंबईमधे नोकरी करतेय." एवढंच सांगितलं. पुढचं वाक्य ओठापर्यंत आलं होतं. पण बोलले नाही.
मी मुंबईमधे इंग्रजी वर्तमानपत्रामधे पत्रकार म्हणून काम करते हे त्याना जरी समजलं असतं तरी माझ्या मनाचा ओरखडा तसाच राहिला असता आणि जर तो ओरखडा नसता तर मी तरी इंग्रजी वाचनाचा इतका अट्टाहास का धरला असता?

विषय: 
प्रकार: 

नंदे, नेहमीप्रमाणेच छान हो!!
पण तु मास्तरांना सांगितले का नाहीस?? Sad

सांगून उपयोग काय?
तो क्षण तो वर्ग तो अपमान आणि तो दिवस आयुष्यातला परत तर मिळणार नाही ना?

ऐसा भी होता है??
स्वत्वाची जाणीव असावी लागते ह्यासाठी बहुतेक. (जी त्या वयात सुद्धा तुला आणि दादला होती )
कारण माझ्या बाबतीत ह्यापेक्षाही जास्त काही घडलय पण कधी वाइट वाटलच नाही.
आम्ही बिनचेहर्‍याची कॉमन मुल त्यावेळी. निम्न मध्यम वर्गीय असल्याने असेल तसा ऍटिट्युड. की आपल्या साठी चांगल काहीच नाही अस. शिवाय आई बाबा देखिल फार शिकलेले नाहीत. त्यांची अक्षरओळख आहे फक्त. त्यामुळे मुलांवर त्यानी जमेल तसे सन्स्कार केले.
त्यात देखिल आपण कसे दबुन राहिल पाहिजे हेच जास्त असेल. म्हणुनच मी जसजसा मोठा होत गेलो तस तसा जास्त बंडखोर होत गेलो.
उलट मला छान मार्क आहेत अस दिसल की शिक्षकच आश्चर्यचकीत होत होते. Happy
आम्हाला ६वी आणि ७ वीत गणिताला मांडरे सर होते. (चंद्रकांत-सुर्यकांत ह्यांचे पुतणे होते म्हणे)
तर एकदा मी त्यानी घरुन करुन आणा असा सांगितलेला अभ्यास केला नव्हता (६ वीत)
तर त्यानी मला सगळ्या वर्गासमोर सन्नकन एक कानाखाली मारली होती. त्रास फक्त शारिरीकच झाला.
एकच परिणाम झाला की मी रोजचा अभ्यास रोज करु लागलो. (कमीत कमी त्यांनी दिलेला तरी)
त्याच सराना माझा पेपर एका शाळु सोबत्याने सर्व वर्गासमोर चेक करायला लावला होता आणि मला चाचणी परिक्षेत ४० पैकी ४० गुण
मिळाले होते. Happy
जितके कमी मार्क तितक्या छड्या अशी पैज होती आणि माझ्या तर्फे त्या शाळु सोबत्याने पैज लावली Happy (मी नको म्हणत असताना)
और भी बहुत किस्से है Happy

संताप आला नंदिनी हे वाचून. त्या काळात मुलांची मानसिकता वगैरे कुणी विचारात घेत नसत, हे खरे आहे, पण असे शिक्षक कुठल्याही शाळेत असणे, हे त्या शाळेलाच नव्हे तर या पेशालाच लांछनास्पद आहे.

नंदू नेहमीप्रमाणेच छान हां...

दिनेशदा,तुम्हाला अनुमोदन. पूर्वीच्या काळी अश्या मानसिक, शारीरीक शिक्षा देणं स्पृहणीय मानलं जायचं. 'मिरच्यांची धूरी' हा शब्दप्रयोग खरोखरच अस्तित्वात होताच की. केवळ शाळेतच नव्हे तर घरी सुद्धा वडिल, काका, आजोबा लोकांकडून अघोरी शिक्षा व्हायच्या.. माझी आई सांगते, ती ७-८ वर्षाची होती तेव्हा तिने सुपारी चघळली म्हणून तिच्या काकानी तिच्या तोंडात त्यांची मूठ भरेल इतकी सुपारी कोंबली होती आणि दोन तास ती सुपारी तोंडात धरून अंगणात उभं रहायची शिक्षा केली होती.

नंदिनी हे वाचून संपल्यावर ओरखडा लक्षात रहात नाही. लक्षात राहते ती जिद्द!
बस लगे रहो!

दिनेशदा,, त्या काळात म्हणजे?
अवघ्या बारा वर्षापूर्वीची घटना आहे. अर्थात ते शिक्षक पण् नवीन होते त्यामुळे कदाचित त्याना मानसिकता वगैरे गोष्टी माहीत नसतील.

आजूबाजूला पन्नास जण असताना एकटं राहण्याचं दु:ख नंतर आयुष्यभर भोगायचं आहे याची त्यावेळेल जाणीव पण नव्हती.
>>>>>>>>>>>>>>>>

सुंदरच,

नेहमीप्रमाणेच अगदि छान!

नन्दिनी तू हे सकारात्मक घेतलेस म्हणून तुझी उत्तम प्रगती झाली हे खरे.
पण अश्या शिक्षकांच्या हातून किती कोवळ्या मनांचा चुराडा झाला असेल त्याची कोण गणती ठेवणार?
एका फार नाजुक प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल अभिनंदन.

नंदिनी, अगदी प्रामाणिक, आतलं लिहिलयस.
हे असे ओरखडे खरेतर ओरखडे नसतातच.... वर वर भरून आलेले खोल घाव असतात. कारण नाहीतर दुसर्‍या कुणाचा 'ओरखडा' वाचून तुला 'तो दिवस' आठवलाच नसता.
माझ्या त्या बाईचं पुढचं सांगत्ये- मी ही त्यांना भेटलेय नंतर जाऊन.
आश्चर्य आणि खेदही असा, की माझ्याशी अतिशय हसून खेळून बोलतात. त्या प्रसंगांची आठवण स्वतःच करून देऊन "तुमची बॅच जरा द्वाड मुलांचीच होती नाही? " असं म्हणाल्या.
म्हणजे एका अश्राप विद्यार्थिनीला काही विक्षिप्त वागवल्याचा दोष तिच्यावरच ठेवून मोकळ्या झाल्या.

असो... मी ही म्युनिसिपल शाळेची विद्यार्थिनी आहे. माझा भाऊही. ऐपत होती. पण सगळच मिळत असताना, "न मिळणं" म्हणजे काय ते दाखवण्याचा माझ्या आई-वडिलांचा तो प्रय्त्नं होता. एक वेगळा संस्कार म्हण ना. एक माणूस म्हणून जी काय आहे ते घडण्यात, ते दिवस कितीतरी कारणीभूत आहेत....

अगदी मनातलं बोललीस.
मला त्या प्रसंगा आधी किंवा नंतरही कधे मी म्युनिसिपालटीच्या शाळेत शिकल्याचं वाईट वाटलं नाही. उलट आजही मला माझ्या शाळेचा अभिमान वाटतो..
माझ्या जडणघडणीमधे शाळेचा खरंच खूप वाटा आहे. आणि त्यातले कित्येक शिक्षक आजही मला मुलीसारखं मानतात. Happy
पण ओरखडे राहतातच ना,.
मी माझ्या विद्यार्थ्याना म्हणून या बाबतीत फार जपलय..

तुझे लेखाण नेहमिच खुप आवडते.
खुप संवेदनशिल...मनाला स्पशृन जाणरे असते.

नंदिनी,
तुम्ही लिहीलेले वर्णन मनास भिडले. पण तुम्ही त्यांना सांगावयास हवे होते कि तुम्ही सध्या काय करता ते.
निदान त्यांना त्यांच्या चुकिची जाणिव तरी झाली असती. त्यांच्या चुकिचं सोडा, पण इतकी वर्ष, जी गोष्टं तुम्ही मनास लावून घेतली आहे त्याची निदान थोडीशी धग तरी कमी झाली असती.

पूढच्या लिखाणासाठी शुभेछा!

दक्षिणा.....

णन्दीनी ,सांगायच होत ना सरांना म्हणजे तो मास्तर दुसर्‍या कुणाशी परत तसे वागणार नाही.
आम्हाला पण शाळेत असताना उनाडपणाबद्दल ओरखडे बसले पण एखाद्याला कोणी शिक्षक टाकुन बोलला की इतर मित्र जाउन त्याचे सांत्वन करायचे. मग ८-९वीत तर कोडगेपणाच्या सीमा आमच्या वर्गाने क्रॉस केल्या होत्या. शिक्षक काहीही बोलले तरी आम्हाला काहीच वाटायचे नाही. काहीकाही विद्यार्थ्यांना तर शिक्षकांनी आपल्याला अस काही बोलल्याचा अभिमान वाटायचा. तो तास संपल्यावर आम्ही त्या शिक्षकावर यथेच्छ विनोद करायचो. २ शिक्षक तर आमची वागणुक करुन वर्गात रडले होते तरीही आमची मुले तास संपल्यावर त्यांच्या रडण्याची नक्कल करत. आजही आमच्या वर्गशिक्षीका भेटल्या की आम्हाला म्हणतात 'तुमची बॅच आयुष्यात कधी विसरणार नाही!!!'. आजही कधीकधी मित्र भेटले की ते विषय निघतातच व आपण इतके कोडगे कसे होतो याचे आश्चर्य वाटते.

सॉरी ,छान लिहिलय हे लिहायच विसरलोच

खरय णंदु , हे ओरखडे आयुश्य भर मनात राहाणारेच असतात , दहावीच शाळेत पहिला क्रमांक मिळुनही मला डावलुन एनवेळी दुसर्या मुलाला ते बक्शीस दिले गेले , बक्शीसाचा क्रायटेरिया बद्लुन ! का ? ह्याच उत्तर मला अजुनही कळ्ल नाहि ... कदाचीत कळ्णारही नाही...

नन्दिनी, सुन्दरच. भावना छान पोहचवतेस मनापर्यंत.
ही अवघ्या बारा वर्षांपुर्विइ घडलेली घटना असेल तर आत्ता तुझ वय काही फार नाही. मग हे "आयुष्यभर एकटं राहाण्याची" भाषा का?

नन्दिनी
असे अनुभव सामान्य अथवा मध्यम परिस्थीती असलेल्या मुलांना येतच असावेत. कारण बरेच शिक्षक काही मुलांच्या दिखाउपणाला अथवा त्यांच्या पालकांच्या आर्थीक, सामाजीक वा अन्य वलयाने भारावून जातात आणि इतरांचा पाणउतारा करतात. मुलांना स्वतंत्र व्यक्तीमत्व असतं स्वतंत्र जाणिवा असतात हेच त्यांच्या डोक्यात नसतं. त्यांच्या त्या वैचारीक मर्यादा असतात. ते ज्याला समजतं तो स्वत:वर त्याचा परिणाम करून घेत नाही व तुझ्यासारख पुढे जात रहातो पण काही मुलांवर खोल परिणाम होउ शकतात अश्या शिक्षकांमुळे.

असे प्रसंग बर्‍याच जणांच्या आयुष्यात येतात. जो/जी स्वत:ला सावरून अश्या प्रसंगातुन चांगलं काही शिकण्याचा प्रयत्न करतो / करते. तेच लोक यशस्वी होतात.

छान मांडलत तुम्ही. अगदी दोन्ही बाजूने.

>>>आजूबाजूला पन्नास जण असताना एकटं राहण्याचं दु:ख नंतर आयुष्यभर भोगायचं आहे याची त्यावेळेल जाणीव पण नव्हती. <<<
हा अनुभव मी पण घेतला आहे ..... डोल्यात पाणी येत आठवणीनी ..... खरच ओरखडाच असतो हा ..