स्माईल, प्लीज

Submitted by दाद on 21 November, 2008 - 00:20

’तुझ्या पासपोर्टसाठी फोटो काढून आणले नाहीस तर... तर माझ्याबरोबर नेणार नाही.’, मला अजून नवर्‍याकडून असल्या निकराच्या धमक्या मिळतात.

’नेताय कसले? मला चढूच देणार नाहीत विमानात’, मी अक्कल पाजळली.

’विमानाचं नंतर.... मी आज घरी जाण्याबद्दल म्हणतोय’. ह्यावेळी फारच विचार-बिचार करून धमकी काढली होती.

निमूटपणे मी तंगड्या तोडत ऑफिसच्या जवळच्याच शॉपिंग सेंटरमध्ये गेले.
आपल्याला जळ्ळा असला फोटो कितीवेळा काढावा लागतो?
विचारलं तर, ’हे काय? एव्हढं साधं माहीत नाही? चांगले शिकले-सवरलेले दिसता’ असा भाव चेहर्‍यावर थापलेल्या एका बयेनं, कॅमेर्‍याच्या दुकानात किंवा पोस्ट ऑफिसमध्ये फोटो काढून घेता येईल असं सांगितलं.

भारतातल्यापेक्षा इथली पोस्ट ऑफिसं बरीच बरी... पण कशाला विषाची परिक्षा म्हणून कॅमेर्‍याच्या दुकानात गेले.
’तुझ्या चेहयावर भावच तसले असतात म्हणून तुला असले प्रश्नं विचारतात, लोक’ असं नवर्‍याचं मत. तरीपण कॅमेर्‍याच्या दुकानात शिरल्या शिरल्या बाहेरच्या दिशेने चालवीत चालवीत, ’कुठच्या दुकानात जायचय तुम्हाला?’ असला प्रश्नं माझ्याच वाट्याला का?

मीही दुसर्‍या एका कॅमेर्‍याच्याच दुकानाचं नाव सांगितलं. मग मात्रं जवळ जवळ हाताला धरून ओढत नेल्यासारखं करीत, ’काय सेवा करू?’ इथपर्यंत तो सुबक ठेंगणा आला.

मी हसतमुख चेहर्‍याने ’पासपोर्ट साठी फोटो काढायचेत’ हे वाक्य पूर्णं बोलायचा प्रयत्नं केला. ’पासपोर्ट’ ह्या एकाच शब्दानंतर फुकट्या जेवणार्‍याला एखाद्या खानावळीत जसा भटारखान्याचा रस्ता दाखवतात, त्याच अविर्भावात त्या भुंग्याने मला नुस्ती दिशा दाखवली.

तिथे त्याच्याहुनही एक ठेंगणी आली, फोटो काढायला.
मी आपला केसांवरून हात फिरवला.... उगीच ऑस्ट्रेलियन इमिग्रेशन ऑफिसरला, माझा पासपोर्ट बघून ’तेरी जुल्फोंसे जुदाई तो नही मांगी थी’... असलं काही सुचायला नको. असला कायतरीच पीजे मनातच मारीत मी परत एकदा एक झटका देऊन कपाळपट्टी मोकळी केली.

आधीच डोळ्यांच्या फटी, त्यात डोक्याच्या वर कॅमेरा धरून फोटो काढायचं दिव्य करताना तिने उरले-सुरले डोळेही किलकिले केले होते. माझ्याच नकळत माझेही डोळे किलकिले झाले असणार.
हो! लहान मुलांना भरवताना माझी होतात तोंड, त्यांच्यासारखी... घरात पाना-पक्कड असली हत्यारं घेऊन सहसा मला मदतनीस म्हणून उभं करीत नाहीत... 'माझी तोंड बघण्यात हसून हसून त्यांची कामं होत नाहीत', इति नवरा आणि मुलगा.

हं तर.... छान पोज घेतलेली ती थांबली. ’यू डोन्ट हॅव टू डू दॅट’, दरडावणं संपल्यावर गुरगुरली, ’कीप स्टिल’

आता आपल्यात ’स्माईल प्लीज, किंवा झालच तर... वन... टू... थ्री... किंवा गेला बाजार से चीज...’ असलं काय काय म्हणायची पद्धत आहे की नाही?
ह्यांच्यात नसावं.
तिच्या ’कीप स्टिल’ सुचनेला न जुमानता डोळ्यांवर येऊ घातलेल्या एका बटीला, मी हाताने वार्‍याच्या वेगाने मागे केलं.... मी मारे वार्‍याच्या वेगाने करतेय, पण हिला धीर नको? क्लिकलन, नेमकं तेव्हाच.
आलेल्या फोटोत फक्तं बट आणि बोटं!

’ओके, नाऊ... टेक टू’..... असं मी म्हणताच ती फिस्कारलीच, ’धिस इज डिजिटल कॅमेरा. नो नीड फॉर टू’
’हिची उंची किती... ही बोलतेय काय... काय चाल्लय काय.....' असलं मनात बोलत आम्ही दोघींनी आपापल्या जागा घेतल्या.... म्हणजे मी मराठीत, माझ्या मनात.
ती चायनीजमध्ये कायतरी बोलली असणारच..... कारण तिच्या मनातलं चुकून मोठ्याने ऐकू येत होतं.... कुजबुजलं तरी काय झालं? आणि चायनीज असलं तरी... भावार्थं कळतो बरं....

’स्टेडीsssssss'
’कर बाई क्लिक एकदाचं’ असं मनात चिडून म्हटलं मी कारण तिच्या त्या स्टेडीssssss च्या ताला-सुराबरहुकूम हळू हळू सरकत बट पुन्हा कपाळावर येत होती. तिची ’स्टेडीssssss’ च्या शिट्टीचा दम संपेपर्यंतच्या वेळात होईल म्हणून ह्या वेळी हात न हलवता मी जुन्या हिंदी चित्रपटातल्या हिरोंच्या स्टाइलमध्ये खालचा ओठ पुढे काढून जोरात हवा सोडून ती बट उडवण्याचा प्रयत्नं केला.....
है शाब्बास! बट जाग्यावर गेली पण तिने नेमकं क्लिकून घात केला.
तिचं माझं टायमिंग बर्‍यापैकी जमलं होतं फक्तं १८० अंशांचाच काय तो फरक होता!

बयेनं ’काय चाल्लय काय? आ? आ?’ अशा अविर्भावात हात कमरेवर ठेवले होते. ह्यावेळचा माझा फोटो कोणत्याही जुन्या हिंदी सिनेमातला साईड हिरो म्हणून खपला असता.

’नॉट बॅड... एक्सेप्ट द फेस... हं?’, माझ्या इतक्या विनोदी बोलण्यावर, फटी जितक्या वटारता येतिल तितक्या वटारून तिनं माझ्याकडे बघितलं. आम्ही दोघींनी परत एकदा आपापल्या पोजा घेतल्या.

’देव विनोदबुद्धी वाटीत होता तेव्हा ही, सैतानाकडे फोटोग्राफीचे धडे घेत असणार बहुतेक’ मी मनात म्हटलं तरी चेहर्‍यावर हसू फुटलच.

’नो स्माईल, यू वॉन्ट पास्पोर्ट फोटो? ऑस्ट्रेलिया पासपोर्ट? नो स्माईल’, असं तिने वैतागलेल्या चेहर्‍याची परिसीमा करीत सांगितलं.
तिला सांगून काही उपयोग होता का? विश्वास ठेवला असता का तिने?.... की माझा चेहराच हसरा आहे म्हणून?

तोपर्यंत माझ्या चेहर्‍याच्या, इतकावेळ गप्पं बसलेल्या वेगवेगळ्या स्नायूंना वाचा फुटली होती.... डावी पापणी फडफडणे, ओठ कोरडे पडणे, उजवी नाकपुडी हुळहुळणे (हे निवारताना, कितीही प्रयत्नं केला तरी दोन्ही नाकपुड्या फुलतात), उजव्याच कानाला खाज, असल्या अजिबात आपल्या हातात नाहीत अशा अनेक गोष्टी घडायला सुरूवात झाली होती. प्रत्येकवेळी माझ्या वेगवेगळ्या स्नायूंना अवदसा सुचत होती, त्याला मी काय करू?

शेवटी मी ठरवलं ते काही नाही. दोन क्षण स्तब्ध उभं रहाता येत नाही म्हणजे काय? असा काहितरी जबरदस्तं वैतागवाणा विचार आलाच पाहिजे मनात, की यंव रे यंव.

मी चेहर्‍यावरचं उरलंसुरलं हसू नीट हाताने पुसलं, केस नीट केले. डोकं, मान, पोटरी... कुठे कुठे खाजत होतं त्या सगळ्याची शांती केली आणि तिला म्हटलं, ’आय ऍम सिरियस, नाऊ’.

माझी जोरदार तयारी बघून तिला जरा हुरूप आला. तिने पोज घेतली.... मी माझा ठरवलेला वैतागवाणा विचार मनात आणला, ’मला हिचा फोटो काढायचा असला तर मी काय करेन?’
........
विचारांचं काय्यै, ते एकावर थांबत नहीत. ’बाय वन गेट वन फ़्री’ असं प्रत्येक विचारचं असतय..... पुढचा विचार खाजेसारखा मला न विचारता आलाच.
’स्माईल प्लीज’ म्हणायचं नाही, तर मी तिला ’आईज प्लीज’...... असं म्हणेन बहुतेक!

झालं. हा विचार यायला आणि तिने क्लिकायला एक गाठ असण्याचं कारण नाही. पण तिने काय आणि कधी करावं ह्यावर माझा कंट्रोल असता तर....
असो.... आलेल्या फोटोत मी नव्हतेच.... हसताना पोट धरून वाकले होते....
ती हतबुद्ध होऊन बघतेय आणि मी हस हस हसतेय.... वेड्यासारखंच दिसत असणार, ते.

सॉरी सॉरी.... असं म्हणताना मला परत परत हसू येत होतं....

शेवटी, ’मी जरा वेळाने माझं हसून झालं की येईन’ असं कसतरी म्हणून निघालेच....

’फोटो काढले का?’ असा आत्ताच नवर्‍याचा फोन येऊन गेला.... परत एकदा फिस्कारून हसू जे फुटलं ते एक शब्दंही बोलण्यासाठी थांबेना. वैतागून त्याने फोन ठेवला.

आता घरी जाण्यापूर्वी दोन कामं..... एक पासपोर्ट साठी फोटो काढणे, मग नवर्‍याला फोन....
त्या आधी ही 'फिसफिस' थांबवणे!

समाप्तं.

गुलमोहर: 

सहीच सही Happy

’आईज प्लीज’ Lol
********************************************
The trouble with being punctual is that, no one is there to appreciate it!!

>> मान, पोटरी... कुठे कुठे खाजत होतं त्या सगळ्याची शांती केली >>
दाद Lol

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

दादच असणार ही नक्कीच. हे मी पहीली ४/५ वाक्य वाचुन म्हंटल. Happy
मजा आया गो. Lol
- अनिलभाई

हो! लहान मुलांना भरवताना माझी होतात तोंड, त्यांच्यासारखी... घरात पाना-पक्कड असली हत्यारं घेऊन सहसा मला मदतनीस म्हणून उभं करीत नाहीत... 'माझी तोंड बघण्यात हसून हसून त्यांची कामं होत नाहीत', इति नवरा आणि मुलगा >>>

अगदी अगदी.......माझा नवरा ,आई आणी माझ्या बहिणी मला हेच म्हणतात्.मला वाटायच कि मीच एकटी अशी..

लेखन छान.... आवडलं ...........
तुमच लिखाण मला नेहमीच खुप आवडतं.

<< ’ओके, नाऊ... टेक टू’..... असं मी म्हणताच ती फिस्कारलीच, ’धिस इज डिजिटल कॅमेरा. नो नीड फॉर टू’
’हिची उंची किती... ही बोलतेय काय... काय चाल्लय काय.....' >>

Lol ... सही गं दाद... नेहेमीप्रमाणे मस्त...

डावी पापणी फडफडणे, ओठ कोरडे पडणे, उजवी नाकपुडी हुळहुळणे (हे निवारताना, कितीही प्रयत्नं केला तरी दोन्ही नाकपुड्या फुलतात), उजव्याच कानाला खाज, असल्या अजिबात आपल्या हातात नाहीत अशा अनेक गोष्टी घडायला सुरूवात झाली होती>>>>>>>>>>>>>
मर्फीज लॉ Lol
घरात पाना-पक्कड असली हत्यारं घेऊन सहसा मला मदतनीस म्हणून उभं करीत नाहीत... 'माझी तोंड बघण्यात हसून हसून त्यांची कामं होत नाहीत'>>>>>>>>>>
कात्री घेवुन काहि कापताना काय होत मग. Happy
आइज प्लीज Rofl
जरा लवकरच संपल हा. एक मोठ्ठी विनोदी कथा येवुदे की. बरेच दिवस झाले.

तिला सांगून काही उपयोग होता का? विश्वास ठेवला असता का तिने?.... की माझा चेहराच हसरा आहे म्हणून? >>>> how sweet! Happy

बाकी पंचेस जबरी! बटा, उंची, खाज- अगदी अगदी!! Lol

आता एखादा 'हसरा' फोटो पेस्ट कर इकडे Happy
------------------------------------------
'घोड'चूक जरी केली, तरी होतो 'गाढव'पणाच! Proud

खी खी.. कस काय जमत ग तुला... ईंडियात कधी येते आहेस...

Lol मस्तंच दाद,

आता एक फर्मास कथा येऊ देत, तुझ्या कथेची भूक लागलीये. Happy

सॉलीड गं....... अशक्य लिहितेस तू...... Happy

Lol दाद एकदम मस्त!!!!
<<’बाय वन गेट वन फ़्री’ असं प्रत्येक विचारचं असतय>>
सही Happy
बर्‍याच दिवसांनी आलीस ??
पण मस्त !!! नेहमी प्रमाणेच Happy
*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

हुर्रेर्रे SSSSS एकदाची दादने कथा लिहीली तर ! गुलमोहोराचा सडा शोधताना कुठे हरवली नाही माझ्याकडून हेच नशीब.

घरात पाना-पक्कड असली हत्यारं घेऊन सहसा मला मदतनीस म्हणून उभं करीत नाहीत... 'माझी तोंड बघण्यात हसून हसून त्यांची कामं होत नाहीत'>>>>>>>>>>
हा बर्‍याच (की सगळ्याच ?) स्त्रीवर्गाचा विकपॉइंट असतो की काय ? मिक्सर लावताना एक बघण्यासारखा होणारा चेहरा माझ्या घरी आहे Lol
.................................................................................................................................
** खरे मित्र असाल तर तुमच्या दुखा:तही सहभागी करुन घ्या ! **

daad,
यावेळी जरा कमी फीसफीसलो.. Happy
waiting for next..

धन्स रे आणि गं....
योग, <<<<<यावेळी जरा कमी फीसफीसलो.. >>>>
अगदी बर्रोबर. ह्यात माझ्या अकलेतून फारसं काही उगवलं नसल्याने असणार. जस्सं घडलय तस्सं लिहून काढलंय.
फोटो काढले बरं.... त्याच दिवशी. नवर्‍यालाच घेऊन एका पोस्ट ऑफिसमध्ये गेले. नवरा आणि पोस्ट ऑफिस दोन्ही एकाच ठिकाणी असल्याने मला हसू-बिसू काय येण्याची शक्यताच नव्हती. फोटो काढणाराच चांगला होता बिचारा.... अजून एकदा काढू काय म्हणाला.
मी सांगितलं... की ह्यापेक्षा मी चांगली दिसणं शक्य नाही... शिवाय परत एकदा मला झटका आला तर काय.... म्हणून मीच जरा आवरतं घेतलं.
पूनम खास तुझ्यासाठी.... तू म्हटल्याप्रमाणे.... हसरा चेहरा Happy
launghing.gif

दाद मस्तच. खुप हसवलस.

दाद, सगळा डोळ्यासमोर येतोय हा सीन. माझा पण हाच प्रॉब्लेम आहे गं, मी पण अशीच एकदा हसायला लागले की मला आवरतच नाही. एकदा घरी सत्यनारायणाची पूजा चालू असताना भटजींच्या instructions व त्यावर नवर्‍याची कृती यामुळे मी हसू लागले. हसू दाबण्याच्या प्रयत्नात गदगदा हलू लागले. थोड्यावेळाने नवरा पण गदगदू लागला त्यापाठोपाठ सासूबाई व नणंदही. नणंद हसण्यात माझ्यापेक्षाही सवाई आहे त्यामुळे ती हसत हसत आत पळाली. इतकावेळ control ठेवलेले गुरुजीपण हसू लागले. मग आरती सुरु केली तेव्हा नणंद तिथे येई हसू यायला लागले की टाळ्या वाजवतच आत पळे. ते सत्यनारायणपण त्यादिवशी खूप हसले असतील.

भारीच दाद.. Happy
अन वर पेस्टलेला फोटू पण भारी. त्या पासपोर्टवाल्यांना विचारून बघ, हा चालेल का म्हणून..!

--
भेटण्याआधीच ठरलेली असते वेळ जेव्हा जायची-
शहाण्या मुलासारखी खेळणी आवरून घ्यायची..!!

लेख आणि फोटु - दोन्ही मस्त...

तोपर्यंत माझ्या चेहर्‍याच्या, इतकावेळ गप्पं बसलेल्या वेगवेगळ्या स्नायूंना वाचा फुटली होती.... डावी पापणी फडफडणे, ओठ कोरडे पडणे, उजवी नाकपुडी हुळहुळणे (हे निवारताना, कितीही प्रयत्नं केला तरी दोन्ही नाकपुड्या फुलतात), उजव्याच कानाला खाज, असल्या अजिबात आपल्या हातात नाहीत अशा अनेक गोष्टी घडायला सुरूवात झाली होती. प्रत्येकवेळी माझ्या वेगवेगळ्या स्नायूंना अवदसा सुचत होती, त्याला मी काय करू? >>> अगदी, अगदी..

मला वाचताना खीखीखीखी, खुखुखुखु, ख्याख्याख्याख्या अस वाक्यागणिक सारख सारख हसू येत होते!
पण बॉस माझ्या समोरच हाप केबिनमधे बसलेला असल्याने, अन हल्ली त्याच माझ्यावर जरा "जास्तच लक्ष" असल्याने हसू कस आवरल माझ मला माहित! Sad
च्यामारी असले विनोदी लेख, सुतकी चेहरा करुन वाचणे कठीणच हो! Happy
त्यामुळे, हल्ली मी हसू आवरायचा एक नविनतम उपाय शोधून काढलाय,
म्हणजे काय? की हसत नाही अस नाही, हसतोच! Happy
फक्त गालान्ना खळ्या पाडण्याऐवजी कपाळाला आठ्या पाडतो! Proud

दाद, झकास! Happy मजा आली वाचताना
...;
आपला, लिम्बुटिम्बु

मस्त लिहीलय, मलापण एकदा हसु यायला लागल कि जाम आवरत नाही. रडायच्या बाबतीतही तीच गत आहे म्हणा. Happy

दाद....
वाचून खूप हसले........
अगं मी आत्ता परवाच व्हीसासाठी फोटो काढायला गेले तर तो फोटोग्राफर म्हणतो जरा केस नीट करा........मी आपलं पर्समधून कंगवा जरा विंचरल्यासारखं केलं पण त्याच्या काही पसंतीस उतरलेलं दिसलं नाही. (बहुतेक सूरत ही ऐसी है ...क्या करेंगे असं तो मनात म्हणत होता.) त्याने विचित्र नजरेनं माझ्याकडे पाहिलं. ....परत केस विंचरायला लावले......मला रागच आला त्याचा. हाच प्रकार दोन तीन वेळा झाल्यावर मी विचारलं ...काय रे भाऊ(नगरी पद्ध्तीने!) काय प्रॉब्लेम आहे तुझा? तर म्हणतो तुमचे कानच दिसत नाहीत.........! मी पटकन घाबरून आरशात पाहिलं ! तर कान तर जागेवरच होते.......आणि त्याच अजूनही समाधान होत नव्हतं. आता तो म्हणायला लागला...केस मागे ओढून घट्ट बांधा आणि कानाजवळ क्लीपा लावा. म्हणजे कान दिसतील........दाद, हे जरा जास्तीच झालं असं नाही तुला वाटत? अगं अगदी चप्प केस.....आणि त्यावर क्लीपा? शक्य आहे का ते? शेवटी कसं तरी करून काढला एकदाच फोटो! पण त्याचे समाधान झालेलेच नव्हते!

जबरदस्त.
छोटं का म्हणे इतकं? पण खरंच बर्का. मर्फीज लॉ तर अगदी. हे सग्गळं फक्त फोटू च्या वेळीच नाही तर टू मीनिट्स सायलंस, राष्ट्रगीत अशा बाक्या प्रसंगात होतंच.
ग्रूप फोटू चालू असताना तर मी बर्‍याचदा इतरांना अरे/अगं इकडं बघ ना कॅमेर्याकडं असं सांगतानाच क्लिक होतं. तो/ती छान स्माईलमधे आणि मी अधांतरी कुठंतरी हात असलेली अशी दिसते.

सुरेख!!!! तुझा सेंस ऑफ ह्युमर... क्लासच

-----------------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

धन्स, परत एकदा.
सन्मे, ते टू मिनिट सायलन्स वगैरे अगदी अगदी. आणि ग्रूप फोटो तर सहीच.
ते फोटो घेऊन गेले तर हे चालणार नाहीत, माझे कान दिसत नाहियेत असं मलाही म्हणाला तिथल्या काऊंटरमागचा किडा. आता कान दाखवणारे फोटो काढायचेत.
लेकाने केस अजून कापून घे, असा सल्ला दिलाय. डोक्यावर लॉन मॉवर फिरवायचा बाकी आहे.
आता, नाहीत माझे कान लांब त्याला मी काय करणार...
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

Pages