’तुझ्या पासपोर्टसाठी फोटो काढून आणले नाहीस तर... तर माझ्याबरोबर नेणार नाही.’, मला अजून नवर्याकडून असल्या निकराच्या धमक्या मिळतात.
’नेताय कसले? मला चढूच देणार नाहीत विमानात’, मी अक्कल पाजळली.
’विमानाचं नंतर.... मी आज घरी जाण्याबद्दल म्हणतोय’. ह्यावेळी फारच विचार-बिचार करून धमकी काढली होती.
निमूटपणे मी तंगड्या तोडत ऑफिसच्या जवळच्याच शॉपिंग सेंटरमध्ये गेले.
आपल्याला जळ्ळा असला फोटो कितीवेळा काढावा लागतो?
विचारलं तर, ’हे काय? एव्हढं साधं माहीत नाही? चांगले शिकले-सवरलेले दिसता’ असा भाव चेहर्यावर थापलेल्या एका बयेनं, कॅमेर्याच्या दुकानात किंवा पोस्ट ऑफिसमध्ये फोटो काढून घेता येईल असं सांगितलं.
भारतातल्यापेक्षा इथली पोस्ट ऑफिसं बरीच बरी... पण कशाला विषाची परिक्षा म्हणून कॅमेर्याच्या दुकानात गेले.
’तुझ्या चेहयावर भावच तसले असतात म्हणून तुला असले प्रश्नं विचारतात, लोक’ असं नवर्याचं मत. तरीपण कॅमेर्याच्या दुकानात शिरल्या शिरल्या बाहेरच्या दिशेने चालवीत चालवीत, ’कुठच्या दुकानात जायचय तुम्हाला?’ असला प्रश्नं माझ्याच वाट्याला का?
मीही दुसर्या एका कॅमेर्याच्याच दुकानाचं नाव सांगितलं. मग मात्रं जवळ जवळ हाताला धरून ओढत नेल्यासारखं करीत, ’काय सेवा करू?’ इथपर्यंत तो सुबक ठेंगणा आला.
मी हसतमुख चेहर्याने ’पासपोर्ट साठी फोटो काढायचेत’ हे वाक्य पूर्णं बोलायचा प्रयत्नं केला. ’पासपोर्ट’ ह्या एकाच शब्दानंतर फुकट्या जेवणार्याला एखाद्या खानावळीत जसा भटारखान्याचा रस्ता दाखवतात, त्याच अविर्भावात त्या भुंग्याने मला नुस्ती दिशा दाखवली.
तिथे त्याच्याहुनही एक ठेंगणी आली, फोटो काढायला.
मी आपला केसांवरून हात फिरवला.... उगीच ऑस्ट्रेलियन इमिग्रेशन ऑफिसरला, माझा पासपोर्ट बघून ’तेरी जुल्फोंसे जुदाई तो नही मांगी थी’... असलं काही सुचायला नको. असला कायतरीच पीजे मनातच मारीत मी परत एकदा एक झटका देऊन कपाळपट्टी मोकळी केली.
आधीच डोळ्यांच्या फटी, त्यात डोक्याच्या वर कॅमेरा धरून फोटो काढायचं दिव्य करताना तिने उरले-सुरले डोळेही किलकिले केले होते. माझ्याच नकळत माझेही डोळे किलकिले झाले असणार.
हो! लहान मुलांना भरवताना माझी होतात तोंड, त्यांच्यासारखी... घरात पाना-पक्कड असली हत्यारं घेऊन सहसा मला मदतनीस म्हणून उभं करीत नाहीत... 'माझी तोंड बघण्यात हसून हसून त्यांची कामं होत नाहीत', इति नवरा आणि मुलगा.
हं तर.... छान पोज घेतलेली ती थांबली. ’यू डोन्ट हॅव टू डू दॅट’, दरडावणं संपल्यावर गुरगुरली, ’कीप स्टिल’
आता आपल्यात ’स्माईल प्लीज, किंवा झालच तर... वन... टू... थ्री... किंवा गेला बाजार से चीज...’ असलं काय काय म्हणायची पद्धत आहे की नाही?
ह्यांच्यात नसावं.
तिच्या ’कीप स्टिल’ सुचनेला न जुमानता डोळ्यांवर येऊ घातलेल्या एका बटीला, मी हाताने वार्याच्या वेगाने मागे केलं.... मी मारे वार्याच्या वेगाने करतेय, पण हिला धीर नको? क्लिकलन, नेमकं तेव्हाच.
आलेल्या फोटोत फक्तं बट आणि बोटं!
’ओके, नाऊ... टेक टू’..... असं मी म्हणताच ती फिस्कारलीच, ’धिस इज डिजिटल कॅमेरा. नो नीड फॉर टू’
’हिची उंची किती... ही बोलतेय काय... काय चाल्लय काय.....' असलं मनात बोलत आम्ही दोघींनी आपापल्या जागा घेतल्या.... म्हणजे मी मराठीत, माझ्या मनात.
ती चायनीजमध्ये कायतरी बोलली असणारच..... कारण तिच्या मनातलं चुकून मोठ्याने ऐकू येत होतं.... कुजबुजलं तरी काय झालं? आणि चायनीज असलं तरी... भावार्थं कळतो बरं....
’स्टेडीsssssss'
’कर बाई क्लिक एकदाचं’ असं मनात चिडून म्हटलं मी कारण तिच्या त्या स्टेडीssssss च्या ताला-सुराबरहुकूम हळू हळू सरकत बट पुन्हा कपाळावर येत होती. तिची ’स्टेडीssssss’ च्या शिट्टीचा दम संपेपर्यंतच्या वेळात होईल म्हणून ह्या वेळी हात न हलवता मी जुन्या हिंदी चित्रपटातल्या हिरोंच्या स्टाइलमध्ये खालचा ओठ पुढे काढून जोरात हवा सोडून ती बट उडवण्याचा प्रयत्नं केला.....
है शाब्बास! बट जाग्यावर गेली पण तिने नेमकं क्लिकून घात केला.
तिचं माझं टायमिंग बर्यापैकी जमलं होतं फक्तं १८० अंशांचाच काय तो फरक होता!
बयेनं ’काय चाल्लय काय? आ? आ?’ अशा अविर्भावात हात कमरेवर ठेवले होते. ह्यावेळचा माझा फोटो कोणत्याही जुन्या हिंदी सिनेमातला साईड हिरो म्हणून खपला असता.
’नॉट बॅड... एक्सेप्ट द फेस... हं?’, माझ्या इतक्या विनोदी बोलण्यावर, फटी जितक्या वटारता येतिल तितक्या वटारून तिनं माझ्याकडे बघितलं. आम्ही दोघींनी परत एकदा आपापल्या पोजा घेतल्या.
’देव विनोदबुद्धी वाटीत होता तेव्हा ही, सैतानाकडे फोटोग्राफीचे धडे घेत असणार बहुतेक’ मी मनात म्हटलं तरी चेहर्यावर हसू फुटलच.
’नो स्माईल, यू वॉन्ट पास्पोर्ट फोटो? ऑस्ट्रेलिया पासपोर्ट? नो स्माईल’, असं तिने वैतागलेल्या चेहर्याची परिसीमा करीत सांगितलं.
तिला सांगून काही उपयोग होता का? विश्वास ठेवला असता का तिने?.... की माझा चेहराच हसरा आहे म्हणून?
तोपर्यंत माझ्या चेहर्याच्या, इतकावेळ गप्पं बसलेल्या वेगवेगळ्या स्नायूंना वाचा फुटली होती.... डावी पापणी फडफडणे, ओठ कोरडे पडणे, उजवी नाकपुडी हुळहुळणे (हे निवारताना, कितीही प्रयत्नं केला तरी दोन्ही नाकपुड्या फुलतात), उजव्याच कानाला खाज, असल्या अजिबात आपल्या हातात नाहीत अशा अनेक गोष्टी घडायला सुरूवात झाली होती. प्रत्येकवेळी माझ्या वेगवेगळ्या स्नायूंना अवदसा सुचत होती, त्याला मी काय करू?
शेवटी मी ठरवलं ते काही नाही. दोन क्षण स्तब्ध उभं रहाता येत नाही म्हणजे काय? असा काहितरी जबरदस्तं वैतागवाणा विचार आलाच पाहिजे मनात, की यंव रे यंव.
मी चेहर्यावरचं उरलंसुरलं हसू नीट हाताने पुसलं, केस नीट केले. डोकं, मान, पोटरी... कुठे कुठे खाजत होतं त्या सगळ्याची शांती केली आणि तिला म्हटलं, ’आय ऍम सिरियस, नाऊ’.
माझी जोरदार तयारी बघून तिला जरा हुरूप आला. तिने पोज घेतली.... मी माझा ठरवलेला वैतागवाणा विचार मनात आणला, ’मला हिचा फोटो काढायचा असला तर मी काय करेन?’
........
विचारांचं काय्यै, ते एकावर थांबत नहीत. ’बाय वन गेट वन फ़्री’ असं प्रत्येक विचारचं असतय..... पुढचा विचार खाजेसारखा मला न विचारता आलाच.
’स्माईल प्लीज’ म्हणायचं नाही, तर मी तिला ’आईज प्लीज’...... असं म्हणेन बहुतेक!
झालं. हा विचार यायला आणि तिने क्लिकायला एक गाठ असण्याचं कारण नाही. पण तिने काय आणि कधी करावं ह्यावर माझा कंट्रोल असता तर....
असो.... आलेल्या फोटोत मी नव्हतेच.... हसताना पोट धरून वाकले होते....
ती हतबुद्ध होऊन बघतेय आणि मी हस हस हसतेय.... वेड्यासारखंच दिसत असणार, ते.
सॉरी सॉरी.... असं म्हणताना मला परत परत हसू येत होतं....
शेवटी, ’मी जरा वेळाने माझं हसून झालं की येईन’ असं कसतरी म्हणून निघालेच....
’फोटो काढले का?’ असा आत्ताच नवर्याचा फोन येऊन गेला.... परत एकदा फिस्कारून हसू जे फुटलं ते एक शब्दंही बोलण्यासाठी थांबेना. वैतागून त्याने फोन ठेवला.
आता घरी जाण्यापूर्वी दोन कामं..... एक पासपोर्ट साठी फोटो काढणे, मग नवर्याला फोन....
त्या आधी ही 'फिसफिस' थांबवणे!
समाप्तं.
दाद
दाद काहीही.
~~~~~~~~~~~~
ज्याचा त्याचा प्रश्न!!
~~~~~~~~~~~~
दाद डोक्या
दाद
डोक्यावर लॉन मॉवर म्हणजे जरा अतीच !!!!!!!!!!खूप हसून गडाबडा लोळणारी स्मायली!
झकास!! मला
झकास!!
मला तर अस्ल्या फोटोला बस्लं की जोरदार शिंका येतात त्या उग्र लाईटमुळे.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
मजा आली गं
मजा आली गं दाद! हहपुवा!
मला तर फोटोग्राफर म्हणजे जिवंत उच्छाद वाटतो. डोळे मोठे करा जरा.. ओठ दाबू नका.. थोडे सैल ठेवा.. स्माईल्..च च इतकं नाही..दात दाखवू नका.. हनुवटी खाली.. मान ताठ ठेवा... सीरीयस नका हो होऊ..
अर्रे!! आपला चेहरा काय इतका वाईट आहे की काय की सरळ नीट उभं राहून नॉर्मल एक दोन इंचाचा फोटो धड येऊ नये? चिडचिडाट !! या सूचनांप्रमाणे चेहरा ऍड्जस्ट करता करता फोटो नको पण सूचना आवर असे होऊन जाते अगदी..
---------------------------------------------------------------------------
The only thing you take with you when you're gone is what you leave behind.
आज
आज ऑफिसमध्ये test environment बन्द आहे म्हणून इथे आले आणि एवढी हसतेय की हॉलंडची माणसं आता मला येडी समजत आहेत.
माझ्या आकारमानामुळे नेहमी त्रास होतो. दिव्याभारतीसारखा गोल चेहरा आता टुणटुणचे बाळसे धरुन आहे त्यामुळे माझे कानच दिसत नाहीत, मग कानामागे बोळे घाला वै. सुरु होतं नी मग तो फोटो फिस्कटतोच!
हे वाचून मज्जा आली. अगदी डोळ्यासमोर आले की तू कशी दिसत असशील?!
जाईजुई,
जाईजुई, <<दिव्याभारतीसारखा गोल चेहरा आता टुणटुणचे बाळसे धरुन आह>>
काढला एकदाचा तो फोटो. काय ध्यान आलाय माहितीये? मी खरच इतकी वैतागवाणी नाहीये गं.... ते पासपोर्ट तपासणारे कायम लांबट आणि आंबट चेहरा करून का असतात ते आत्ता कळलं... असलेच फोटो बघायचे असतात त्यांना दिवसभर.
दाद मस्तच,
दाद मस्तच, मी एकटीच हसत होते ऑफीस मधे.
दाद, अफलातू
दाद,
अफलातून!
फुल गेंदवा ना मारो पासून इथपर्यंत सारच ग्रेट!!!
छान! तुझी
छान! तुझी वर्णने क्लासच असतात.
शरददा
सह्हिच
सह्हिच !
आणि
मिक्सर लावताना एक बघण्यासारखा होणारा चेहरा माझ्या घरी आहे....
चाफा ह.ह.पु. वा, !
तसं स्क्रु कोणत्या बाजुला पिळायचा हा प्रश्न असलेला चेहरा सहसा सर्वांच्या घरी सापडेल....
रात्रीचे २:३० वाजलेत माझ्या
रात्रीचे २:३० वाजलेत माझ्या इथे.....आणि मी एकटीच अशक्य हसतेय !

अफलातून ! रुबिक कृष्ण.. नंतर मी चुकून सरळ इथेच उडी मारली. दोन्ही प्रकारचं काय लिहितेस गं तू !
मस्तच माझे फ्लॅश पडला की
मस्तच
माझे फ्लॅश पडला की एकतर डोळे मिटतात किंवा ते मिटू नयेत म्हणून ताणून मोठे ठेवायचा प्रयत्न केला की भूत पाहून टरकल्यासारखे दिसतात
त्यातल्या त्यात बर्या फोटोची निगेटीव्ह जपून ठेवली आहे त्यामुळे आता काही वर्ष काळजी नाही.
ह्या साईटवर जा, आपले स्वतःचे
ह्या साईटवर जा, आपले स्वतःचे फोटो (नवर्याने काढलेले) अपलोड करा आणि घर बसल्या पासपोर्ट फोटो मिळवा (पण मग आम्हाला हे असे विनोदी लेख कसे वाचायला मिळणार? )
मस्त, खुसखुशीत लिखाण
दाद परवाच लेकीला भारतीय विसा
दाद
परवाच लेकीला भारतीय विसा साठी फोटु काढायला घेऊन गेले होते त्याची आठव्ण झाली
आमची ठमकाई पण एक क्षण स्थिर बसेना... ती बाई बिचरी शांतपणे टेक वर टेक्स घेत होती 
दाद >>>तिच्या ’कीप स्टिल’
दाद

>>>तिच्या ’कीप स्टिल’ सुचनेला न जुमानता डोळ्यांवर येऊ घातलेल्या एका बटीला, मी हाताने वार्याच्या वेगाने मागे केलं.... मी मारे वार्याच्या वेगाने करतेय, पण हिला धीर नको? क्लिकलन, नेमकं तेव्हाच.
आलेल्या फोटोत फक्तं बट आणि बोटं...
आलेल्या फोटोत मी नव्हतेच.... हसताना पोट धरून वाकले होते....
ती हतबुद्ध होऊन बघतेय आणि मी हस हस हसतेय.... वेड्यासारखंच दिसत असणार, ते.<<<
नुसती हसतेय, कसे बसे टायपले हे
मजा आली वाचताना..
मजा आली वाचताना..
मस्त !! अप्रतिम ...
मस्त !! अप्रतिम ...
एकदम लोट्पोट...
एकदम लोट्पोट...:D
आईज प्लीज....
आईज प्लीज....

जबरदस्त!!! खूप छान.
जबरदस्त!!! खूप छान.
Pages