ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग २२

Submitted by बेफ़िकीर on 22 October, 2010 - 06:20

दिल्यासारखा माणूस होता म्हणूनच तीन महिन्यात बरा झाला. लग्न पुढे ढकलवे लागलेच होते. पण आता सुरेखाच्या माहेरी एक शंका उपस्थित केली जात होती की मुलगा असाच गुंड प्रवृत्तीचा असला तर हा प्रस्ताव पुन्हा विचारात घ्यावा की काय? मात्र ती शंका सुरेखाने एका दणक्यातच नष्ट करून टाकली होती. दिड महिना तर दिल्या घरीच होता. सुरेखाही सतत येऊन जाऊन होतीच! सारखे तिथे राहणे योग्य दिसणार नव्हते. त्यामुळे आठवड्यातून दोन दिवस राहून यायची. आत्मा, अशोक आणि वन्या आळीपाळीने सतत कोल्हापूरला जाऊन यायचे.

दिल्याच्या या आजारपणामुळे एक मात्र झाले. काही ना काही कारणाने अशोक आणि वन्याला आत्माशी बोलायला लागायचे. त्यामुळे आत्माही आता बिनधास्त त्यांच्याबरोबर गप्पा मारू लागला होता. तो त्या दिवशी एकटाच होस्टेलवर असल्यामुळे काय काय व कसे कसे झाले हे त्यालाच विचारावे लागत होते दोघांना! दोघेही गावाला गेले तसे तडक परत पुण्याला आले होते आणि आत्म्याला प्रश्न विचारून भंडावून सोडत होते.

या तीन महिन्यात अशोक आणि वन्याला आत्म्याबद्दल अजिबातच सहानुभुती निर्माण झालेली नसली तरीही दिल्याच्या त्या प्रसंगाच्या पहिल्या रात्री व दुसर्‍या दिवशी आत्म्याने केलेली मदत, नंतर सतत कोल्हापूरला जाऊन दिल्याची घेतलेली काळजी या दोन बाबींमुळे त्यांच्यादृष्टीने तो किमान संबंध ठेवण्याच्या तरी पात्रतेचा झाला होता. त्याच वेळेस आत्म्याच्या मनात पश्चात्तापाचा डोंगर निर्माण झाला होता. त्याला माहीत होते की त्याने सांगीतले नसते तरीही गुणेच्या गॅन्गने दिलीप यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना कुठेतरी मारलेच असते. पण त्य गोष्टीला आपण निमित्त झालो याचे वैषम्य पराकोटीचे होते. घाबरून त्याने ते कुणालाही सांगीतले नव्हते. पण कसा कुणास ठाऊक, त्या गॅन्गचा सूड घ्यायची इच्छा त्याच्या मनात घर करून बसली होती.

हे असे होण्याचे कारण फार विचित्र होते. आत्म्याने चोरी करणे व अन्य गोष्टी करणे यावरून जरी या तिघांनी त्याच्या संबंध संपवलेले असले तरीही मनातून आत्म्याला गुणेच्या गॅन्गपेक्षा केव्हाही हेच तिघे प्यारे होते. हे तिघे म्हणजे त्याचे आयुष्य झालेले होते. कारण बाबा पैसेही पाठवत नव्हते व त्यामुळे सुट्टीत घरी जाण्याचीही इच्छा होत नव्हती. दिवाळी होस्टेलवरच होणार होती. त्यामुळे आत्म्याचे जीवन म्हणजे आता फक्त कक्ष क्रमांक २१४ व त्यातील सहाध्यायी!

त्यातच त्याच्याशी एक शब्दही न बोलता तिघेही आपापल्या घरी निघून गेले होते. मागच्या वर्षी दिलीप होस्टेलवर एकटा राहणार म्हणून आत्मा, अशोक व वनदास या तिघांनीही त्याला स्वतःच्या घरी बोलावले होते. तो प्रसंग आत्माला आठवला. आपण एका वर्षात इतक्या पातळीला पोचलो? की आता आपल्याशी बोलावेसेही वाटत नाही तिघांना?

काय झाले? दारू? फक्त दारूमुळे? निश्चीतच नाही. आपण चोरी केली, उधारी केली, या सर्वामुळे!

सुवर्णा मॅडमच्या चोरलेल्या पैशात्ञून आत्म्याने सगळी उधारी फेडून टाकली होती. पण आता पुन्हा नव्याने प्रश्न निर्माण झाला होता की प्यायला पैसे कुठून आणायचे! पण हा प्रश्न निर्माण होईपर्यंतच विरला कारण दिल्याला मारहाण झाल्यामुळे अशोक आणि वन्या दोघेही पुन्हा पुण्याला आले. तीन दिवस पुण्यात राहिले. तिसर्‍या दिवशी दिल्याला कोल्हापूरला हलवले त्या दिवशी सगळेच कोल्हापूरला गेले. तिथून मात्र दुसर्‍या दिवशी अशोक आणि वन्या आपापल्या गावी गेले आणि आत्मा होस्टेलवर परत आला. मात्र येताना त्याने दिल्याच्या आईकडून आणि सुरेखाकडून थोडे थोडे पैसे घेतले. थोडे थोडे म्हणजे चांगलेच बर्‍यापैकी! या हवालदाराला द्यावे लागले, त्या वार्ताहराला द्यावे लागले असे करून! आत्मा चक्क दिड हजार रुपये घेऊन आला कोल्हापूरहून! हे दिल्याला माहीतच नव्हते. कारण तो वेदनांमध्ये तळमळत होता हॉस्पीटलमध्ये!

पण इकडे जी केस झाली ती पुन्हा आमदारसाहेबांच्या सांगण्यावरून दाबण्यात आली. मात्र यावेळेस आमदारांनी आपल्या बहिणीलाही दम भरला. धनू पास झाला म्हणून ठीक आहे, पण त्याचे काय चालले आहे त्याचा तुच तपास कर असे सांगीतले. बहुधा तो एखाद्या गॅन्गवॉरमध्ये वगैरे असावा असे त्यांना वाटत होते. त्यावर उलटेच झाले. कौशल्या राऊट यांनी भावालाच झापले. तू आमदार असताना माझा मुलगा इतका मार खातो आणि तू मलाच बोलतोस? ते ऐकून मग आमदारांनी आपला एक माणूस त्या परिसरात पुढची दोन वर्षे ठेवण्याचे कबूल केले. पण या सगळ्या प्रकरणात आत्म्याला मात्र दिड हजार रुपये मिळाले हे अशोक आणि वन्याला माहीतच नव्हते.

पण दिवाळीच्या आदल्या दिवशी आईचा आलेला तो फोन, त्यावर आई आणि त्रिवेणी जे बोलल्या ते... ते सर्व ऐकून आत्म्याला अक्षरशः आत्महत्या करावीशी वाटली.

आपलं हक्काचं, प्रेमाचं घर आपल्या नतद्रष्टपणामुळे आपण गमावून बसलो आहोत आणि या वेळेसच्या अभ्यंगस्नानाला आई आपल्या अंगाला तेल लावणार नाही, या भाउबीजेला आपण जाणे शक्य असूनही जालन्याला जाणार नाही.

खूप रडला आत्मा! पण.. एक चमत्कारच झाला.

चक्क, शिपायाने एक ग्रीटिंग आणून दिले आत्म्याला! हे भेटकार्ड आहे आणि ते दिवाळीनिमित्त असून ते खास आपल्यासाठी आहे हेच लक्षात यायला आत्म्याला काही काळ लागला.

आणि पाहतो तर काय?? हॅपी दिवाली आत्मानंद - फ्रॉम... युअर फ्रेन्ड.. अलका देव....

हे काय? असे कसे झाले? म्हणजे वनदास आणि अलका यांचे काहीच नाही आहे. याचाच अर्थ गुणेची गॅन्ग आपल्याला फसवत आहे.

भेटकारडाच्या आनंदात आर सी घेतली आत्म्याने त्या दिवशी आर सी! आणि भर दिवाळीतही पीतच होता. रोज घरून फोन येत होते. पण वडिलांसमोर जाण्याची नुसती भीतीच वाटत नव्हती तर अपराधी फीलिंगही प्रचंड होते.

कशीबशी सुट्टी संपली आणि अशोक आणि वन्या परतले. त्या सुट्टीतही ते एकेकदा दिल्याला भेटून आलेच होते. एकदा तर चक्क दोघांनी आत्म्यालाही फोन केला होता. आत्माही तीन वेळा कोल्हापूरला जाऊन आला. तीनही वेळा त्याला थोडे थोडे पैसे मिळाले. सुरेखा खरे तर पहिल्यापासूनच आत्म्यावर उखडून होती. पण दिल्यासाठी तो घेत असलेले कष्ट पाहून तिने राग आवरला होता व आत्म्याला तिकिटाचे वगैरे असे पैसे दिले होते. आत्म्याने बराचसा प्रवास शेअर जीपने किंवा ट्रकने वगैरे करून त्यातलेही काही पैसे वाचवले होते.

पण या सुट्टीत घडलेल्या आणखीन काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे..

रूमवर एकटाच असल्यामुळे आत्मा सकाळीही घ्यायला लागला होता....

त्यात आता त्याला ब्रिस्टॉल ओढण्यात मजा येऊ लागली होती व स्मोकिंग सुरू झाले होते...

आत्म्याला आले तसेच ग्रीटिंग कार्ड दीपा बोरगेला शेखरकडून आले होते...

आणि....

रिझल्टचा दिवस उद्यावर आला होता.

अख्खं पब्लिक कॉलेजमध्ये होतं! दिल्या सोडून! आणि रूम नंबर २१४ च्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. याही वेळेस आत्मा वर्गात सहावा आला. वन्या आणि अशोक बघतच राहिले. माणूस आहे का काय हा? हा सहावा आलाच कसा? ते दोघेही व्यवस्थित पास झाले होते. तेवढ्यात दिल्याचाही रिझल्ट समजला. चक्क तोही पास झाला होता.

आणि... मागचं सगळं सगळं विसरून त्या दिवशी अशोक आणि वन्याने आत्म्याला पार्टी दिली रूममध्ये!

आत्म्याच्या घरी वन्यानेच फोन करून ही बातमी कळवली. बुवा ठोंबरेंचा विश्वासच बसेना! त्यांना भरून आलं! ते म्हणाले.. दोन, तीन दिवसात मी व त्याची आई तेथे येऊन जाऊ!

आणि आले की? खरच आले. केवळ चारच तास पुण्यात होते. त्यातही एक तास एका नातेवाईकांकडे काढून लगेच अहमदनगरला आत्म्याच्या आजोळी निघूनही गेले होते.

आणि त्यातील जे दोन तास ते होस्टेलवर होते, त्या दोन तासात आत्म्याने सरळ सांगून टाकले होते की त्याची ती सवय बरीचशी नियंत्रणात आलेली असून लवकरच तो मद्य सोडेल! असे सांगण्याचे कारण इतकेच होते की आई वडिलांना अगदी खरे खरे सांगून त्यांच्या मनाला कशाला क्लेष द्यायचे? ते कुठे रोज असतात इथे? आपल्याला जे करायचंय ते आपण करत असतोच! मग निदान त्यांना तरी समाधान देऊ! आणि आत्म्याच्या या खोटेपणाला त्या दिवसापुरती अशोक आणि वन्याने साथही दिली.

मात्र ते गेल्या गेल्या वन्या आणि अश्क्याने आत्म्याला खूप झापले. यापुढे तुझ्या पिण्यावर आम्ही नियंत्रण ठेवणार म्हणाले. आत्मा त्यावर मिश्कील हासला त्याचा त्यांना राग आला. आत्मा हाताबाहेर गेलेला आहे हे त्यांना समजले.

मागच्या वर्षी वर्गात आठवा आलेला आत्मू या वर्षी तर सहावा आला हे पाहून या वेळेस बुवांनी चक्क त्याला हजार रुपये दिले व अशोकला बजावून सांगीतले की हे पैसे आत्मू व्यवस्थितच खर्च करेल यावर तुम्ही लक्ष ठेवा.

कॉलेजमध्ये मात्र आत्मा गाजू लागला होता. कर्णोपकर्णी झाले होते की तो रोज पितो पण नंबरही मिळवतो. असा अद्भुत विद्यार्थी कुणी पाहिलेला नव्हता.

गुणे गॅन्ग हासत होती. बरेच दिवस दिल्या घरी बसला या आनंदात व सूड उगवल्याच्या खुषीत!

आत्म्याला आता पैसे जवळ असल्यामुळे चोरी करावी लागतच नव्हती, पण आंगनवाला मात्र अजूनही त्याला आत घेत नव्हता. कारण त्याला भीती होती दिल्याची! दिल्या परत आल्यावर जर त्याला कळले की आपण आत्मानंदला हॉटेलमध्ये बसू द्यायचो तर आपलीच कणीक तिंबेल अशा भीतीने तो आत्म्याला नाही म्हणत होता. बिघडत काहीच नव्हते. अंजुली ढाबा होताच!

आता आत्मानंदला सबमिशनचे एकही काम मिळत नव्हते. पण आता मनी ऑर्डर येणे शक्य झाले होते. शेवटी बापाचे हृदय! किती दिवस शिक्षा देणार मुलाला? मुलाची मात्र ती लायकी राहिलेली नव्हती.

या तीन महिन्यातील पहिल्या चार दिवसांतच आत्म्याने अलकाला समक्ष भेटून भेटकार्ड मिळाल्याचे सांगीतले व आभार मानले. तीही मोकळेपणाने हासली. अलकाच्या मनातील कित्येक वादळांचा आत्म्याला पत्ताच नव्हता. कुठूनतरी तिला समजले होते की आत्म्याने चोरी केल्याचे तिने वनदासला सांगीतल्यामुळे आत्म्याला दिलीपचा मार खावा लागला होता. यामुळे ती खूप वरमलेली होती. तिचा हेतू चांगला असला तरी दिल्याची शैली तिला पटली नव्हती. अर्थात, दिल्याबद्दल मनात काहीच राग नव्हता, पण आत्म्याला बिचार्‍याला मार मिळायला नको होता असे तिला सतत वाटत होते. ज्या मुलाने आपल्या वडिलांसाठी इतके केले त्याला आपल्याच सांगण्यामुळे मार बसावा हे तिला खूप खूपत होते. म्हणूनच तिने मैत्रीचा हात पुढे करण्यासाठी भेटकार्ड पाठवले होते.

या तीन महिन्यात ती आत्म्याशी विशेष बोलत नसली तरीही लांबून का होईना, निदान हासत तरी होती.

प्रचंड मद्यपान करूनही वर्गात सहावा येणार्‍या आत्म्याच्या महाविद्यालयीन जीवनात आता जरासा तरी अर्थ निर्माण झाला होता... व त्या अर्थाला एक नांवही होते... अलका देव....!!!!!

कित्येकदा अशोक आणि वन्याला आठवायचे! रशिदाचे कपडे चोरणारा आत्मा हाच! पैसे चोरणाराही हाच! आपल्याचबरोबर राहून आपल्याच विरुद्ध असलेल्या तक्रारीत साक्षीदार म्हणून नशेत सही ठोकणारा आत्मा हाच! पण त्याचवेळेस, आपले आणि रशिदाचे जमवणारा, आपले आणि दीपाचे जमवणारा, दिल्या आणि सुरेखाचे जमवणारा, दिल्याची सेवा करणारा... हे सगळे करणाराही आत्मा हाच! आणि... कधी एकदा संध्याकाळ होतीय अन प्यायला बसतोय यासाठी उतावीळ होणारा आत्मा हाच... आणि एवढे सगळे करून परत वर्गात सहावा येणारा आत्माही.... हाच!

चक्रावून जायचे दोघे त्यच्या व्यक्तीमत्वातील पैलूंचे वैविध्य पाहताना!

आज रात्री अकरा वाजता दिल्या येणार बसमधून!

आजही आत्मा एकटाच अंजुलीला बसला होता. त्याला आता कुणीही अडवायचे नाही असा अलिखित नियम झाला होता त्याच्या 'कक्षात'! अशोक आणि वन्या आपले निवांत वाचन करत रूमवर बसून होते. दिल्याच्या यायची वाट पाहात होते. आत्मा अंजुलीला येऊन बसला होता.

भन्नाट गार वारा, लालभडक शेवटातून धुरांची वलये सोडत जळणारी ब्रिस्टॉल, सोबतीला ओल्ड मंक आणि अलका देवचे विचार!

दचकलाच आत्मा! एकदम खांद्यावर हात पडला तसा!

"मियां भूल गये हमे क्या? अकेले अकेले दौरे-जाम हो रहे है????"

साजिद शेख! एक नस तडकली आत्म्याच्या मेंदूतील! मागोमागच गुणेची सगळी गॅन्गच होती तिथे उभी! प्रत्येकाच्या चेहर्‍यावर मैत्रीपूर्ण हसू होते. खोटे खोटे हासला आत्मा!

सगळे बसले आणि कुणीतरी व्होडकाची बाटली काढली. आज अंजुलीवरचा स्टॉक संपलेला असल्यामुळे धनकवडीतून बाटली विकत आणली होती. आत्म्याकडे स्वतःकडे पैसे असल्यामुळे त्याला त्य बाटलीबाबत काहीच मोह नव्हता.

चीअर्स झाले. आत्म्याच्या रक्तातून आता खरे तर ओल्ड मंक ऐवजी क्रोध वाहात होता क्रोध! या सगळ्यांना काय करावे ते त्याला समजत नव्हते. दिल्यासारखी मारामारी करणे त्याला शक्यही नव्हते. त्यामुळे तो गपचूप बसून पीत होता व फक्त हसून प्रतिसाद देत होता. दिड पेग झाल्यावर एकेकाच्या गप्पांना सुरुवात झाली. मध्येच साजिद शेखने ते वाक्य टाकले आणि अडीच पेग्ज झालेल्या आत्म्याच्या डोक्यात त्या वाक्याचा अर्थ पोचायलाच काही वेळ लागला. पोचला तेव्हा मात्र आत्म्याची एकदम खाडकन उतरलीच!

"जन्नतकी हूर है वो तो... काफिरसे मुहोब्बत जतारही है... हम तो अपना बनाकरही रहेंगे उसे... बहोत पसंद आयी... वल्लाह... क्या जोबन है.. मेरी बेगम बनेगी.... रशिदा बेगम...."

ह्याने कुठे पाहिले तिला? काय चाललंय काय? आपण नुसतं ऐकावं!

शेखर - वो तो कबकी उसके बाहोंमे बाहे डालके सपने सजारही है दोस्त...
साजिद - हमारी कौम छोडेगी उसे क्या?
शेखर - कौमसे क्या लेना देना? ये प्यारका मामला है भो***
साजिद - तू चूप कर... क्यूं आत्मानंद... आखिर बिरादरीभी तो कोई चीज है यार??
आत्मा - खरे आहे... कोण... कुणाबद्दल बोलताय??
धनराज - तुझ्या रूमवरच्या त्या पवारची नाही का ती डेम?? रशिदा अख्तर...

विषय बदलला तरी आत्म्याच्या डोक्यातून काही रशिदबद्दल साजिदने काढलेले उद्गार जाईनात!

अतिशय हळू पीत होता आत्मा आज दारू चढू द्यायची नाही असे ठरवले होते त्याने!

याचा परिणाम असा झाला की त्या चौघांना दिड तासातच भरपूर चढली, तरीही पुढचे पेग भरत होते.

हळूहळू मनातील राग बाहेर यायला लागले. धनराजच्या तोंडातून शिव्या यायला लागल्या. त्या कुणासाठी होत्या हे न कळायला आत्मा मूर्ख नव्हता.

दिलीपला शिव्या देत होता तो! अख्या कॉलेजसमोर लाज काढल्याबद्दल! आणि त्याची कशी हालत केली त्याबाबत हळूच एखादा उद्गार काढून आनंदही व्यक्त करत होता.

संतापाच्या अनेक तिडिकी उठल्या आत्म्याच्या मनात! चढली त्यालाही होतीच! पण त्याचबरोबर तो सावधही राहिलेला होता.

खरे तर स्वतःचे पिणे संपवून गेलाही असता तो! पण हे काय काय बोलतात ते ऐकण्यासाठी थांबला होता! बेसावध असल्याचे दाखवत होता. कधीही हसत होता. पण आता ते त्याच्याशी कमी आणि स्वगत स्वरुपाचे अधिक बोलू लागले होते. मध्येच धनराज दिल्याला शिव्या देत होता. मध्येच शेखर दीपा बोरगेच्या फिगरवर अत्यंत अश्लील रिमार्क पास करत होता. हर्ष नुसताच पीत आकाशाकडे बघत होता. आणि साजिद शेख.... रशिदाबद्दल बोलता बोलता अशोकला शिव्या देत होता.

आणि आत्म्याने अचाट कल्पना राबवली. हे आपल्याला कसे सुचले हे त्याचे त्यालाच समजेना! पण सूड तर घ्यायचाच होता.

आत्मा - खरे आहे तुम्ही म्हणता ते... प्रेम वगैरे सबकुछ झुट असते....

साजिद - और क्या... स्साली अपनेसे छोटेके साथ घुमरहेली है... वो भी स्साला हिंदू...

आत्मा - पण मला काय वाटतं... आता.. हिंदू असणे हा काही दोष नाही...

साजिद - चुप बे... बक मत... हम लोग बहोत अलग होते है... लडकी हिंदू और लडका मुस्लीम हो तो ठीक आहे...

आत्मा - तुम्ही वेगळे कोणत्या बाबतीत असता?? शेवटी प्रेम ते प्रेमच....

साजिद - अच्छा?? तो तेरी बहन किसी मोहमेडियनसे **वायेगी तो सहलेगा??

त्रिवेणीचा असा उल्लेख आत्म्याला सहन झाला नाही. तरीही शांत राहिला. मुळात आत्म्याला बहीण आहे हे साजिदला माहीत असण्याचीच शक्यता नव्हती. साजिदचे विधान फार जनरलाईझ्ड स्वरुपाचे होते असे आत्म्याने स्वतःला समजावले.

आत्मा - तुमची चौघांची एवढी घट्ट मैत्री आहे... मला सांगा... धनराज यांना बहीण भाऊ काय आहे हे माहीत नाही मला... पण समजा त्यांना बहीण असती अन त्यांच्यावर तुमचे प्रेम बसले असते... तरीही तुमचे विचार हेच असतील का??

धनराज - ए *****... थोबाड सांभाळ...

आत्मा - आपण रागवू नयेत... हे फक्त उदाहरण होते... जसे माझ्या बहिणीचे उदाहरण दिले यांनी तसे..

धनराज - गेम करून टाकीन तुझी *****... तिच्यायच्चा ***

आत्मा - एक मिनीट.. मी आपल्या बहिणीबद्दल असे बोलत नसून हिंदू मुसलमानबद्दल बोलतोय... शेख.. तुम्ही का बोलत नाही??

साजिद - हम हिंदुओंकी बेटी नही लाते घरपे...

आत्मा - का??

साजिद - हरामी औलाद होती है वो... जनानी तौरतरीकेसे पेश नही आती.. किसीकोभी घुरके देखेगी...

वात तर बरोबर बसलेली होती स्फोटकावर! आता फक्त पेटवायचे काम राहिले होते.

आत्मा - बघा धनराज... मी काय बोलतोय अन हे काय बोलतायत..

धनराज - क्युं बे?? तुम्हारी औलाद क्या होती है सब जानते है.. तू जानता नही???

नक्कीच धनराजला बहीण असणार ... आत्म्याला वाटले.

साजिद - राज... ये अपने बीचकी बहस नही है....

धनराज - नही नही ... बता ना... हम लोग हरामी है तो तुम लोग क्या हो??

साजिद - क्या हो मतलब??

धनराज - भो***... हमने पचपन करोड दिये तब जाके घर बसा सके ***... और अपने नाजायझ बच्चे यही छोडके चले गये....

साजिद - राज... एक मिनीट.. ज्यादा बात कर रहा है तू... अब बस कर...

अचानक धनराजला जाणवले, चर्चा तिसरीकडेच चालली आहे. त्यामुळे तो शांत होणार तेव्हढ्यात आत्म्याने आणखीन एक पिल्लू सोडले.

आत्मा - पवारांच्या घरी अन रशिदाताईंच्याही घरी खूप वाद झाले त्या दिवशी! पवारांचे बाबा तर म्हणत होते असली हीन जमातीची मुलगी आणायचीच नाही सून करून...

साजिद - कोण हीन बे????

शेखला अस्खलीत मराठी येते हे आत्म्याला माहीतच नव्हते.

आत्मा - नाही नाही... त्या मुलीबद्दल म्हणत होते ते... म्हणाले मुसलमान आहे...

साजिद - तो????

आत्मा - नाही.. त्यांच्यामते मुसलमान लोक चांगले नसतात...

साजिदने हे ऐकून सलग सहा शिव्या घातल्या अशोकच्या वडिलांना!

आत्मा - तुम्ही उगीच त्यांना शिव्या देताय... आता या गुणेंच्या अन शेखर यांच्या वडिलांनी पण हीच भूमिका घेतली असती...

शेखर - जाने दो यार... ये क्या बक रहे है अपन लोग....

साजिद - नही नही... इसमे मजहब कहांसे आया बता ना... हम लोग बुरे है तो तुम लोग क्या है फिर??

आत्मा - म्हणजे काय? या भूमीवर आमचा हक्क आहे.. मी, हे गुणे, हे शेखर, कुमार...

साजिद - ***** लोग हो तुम सब... ** मे दम नही और देश हमारा कहने निकले.. अ‍ॅक्च्युअली हमनेही राज किया है यहांपर सदियोंसे... तुम छक्कोंसे क्या होनेवाला था???

धनराज - छक्का कौन है बे यहांपे???

साजिद - सब साले तुम लोग... मै तेरी बात नही कररहा हूं... लेकिन ...

एकदम दारू चढलेला धनराज उठून उभा राहिला. आत्तापर्यंत त्याने 'मित्र' म्हणून साजिदचे बरेच ऐक्न घेतले होते. आता मात्र त्याच्या डोळ्यातून आग बरसत होती.

तेवढ्यात आत्मा उगीचच म्हणाला...

आत्मा - शेख...काही झालं तरी तुम्ही यांच्या बहिणीला शिव्या द्यायला नको होत्यात...

शेखने शिव्या दिल्या होत्या की नव्हत्य हेही लक्षात ठेवण्याची कुणाची परिस्थितीही नव्हती अन मनस्थितीही!

अचानक धनराजने उभे राहूनच त्याला शिव्या द्यायला सुरुवात केली. आजवर धनराजच्या प्रत्येक कृत्यत त्याची साथ देणारा साजिद आत्ता मात्र व्होडका चढल्यामुळे संतापला. तेवढ्यात अंजुली ढाबावाला लांबून धावत येताना दिसताच आत्मा त्याच्याकडे धावला आणि त्याला चुचकारून परत पाठवले.

इतर गिर्‍हाईक नव्हतेच! धनराज आणि साजिद आता एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहात होते. तेवढ्यात आत्म्याने उगाचच हायवेवरच्या एका स्लो झालेल्या गाडीतल्या माणसांना उद्देशून एक वाक्य टाकले. ते वाक्य त्या माणसांना ऐकू जाणे शक्यच नाही इतक्या कमी आवाजातच तो बोलला, पण इतपत जोरात जरूर बोलला की ते या चौघांना निश्चीत ऐकू जावे. ती गाडी ढाब्यावर चाललेल्या शिवीगाळीची चिन्हे बघून केवळ सेकंदभरच स्लो झाली होती. तेवढ्यात आत्मा म्हणाला...

"काही नाही... बहीणीवरून चाललंय... बहिणीला शिव्या दिल्या म्हणून.. तुम्ही जा..."

साजिदने धनराजच्या बहिणीला शिव्या दिलेल्याच नाहीत हे त्या पाचजणांमध्ये फक्त आत्म्यालाच समजत होते. पण आत्म्याचे ते वाक्य ऐकून मात्र धनराजने खरच साजिदला बुकलायला सुरुवात केली.

कसली आलीय मैत्री! व्यसने आणि मुली या विषयाबाबत समान मते असलेले मवाली टोळके होते ते! गैरसमज पसरायला पाच मिनिटेही लागलेली नव्हती.

आधीच्या डिप्लोमा कॉलेजमध्ये एकाच बाकावर बसून काढलेली तीन वर्षे मसणात घालून आत्ता हमरीतुमरीवर येऊन साजिद आणि धनराज एकमेकांना फटके देऊ लागले होते. कुमार आणि शेखर सुरुवातीला भांबावले तरीही नंतर दोघांना आवरायला गेले पण तेवढ्यात साजिदने आणखीन एक शिवी हिंदुंना दिली हे ऐकून तिघांनी मिळून त्याला पिटला. आता मात्र हद्द झाली होती. आत्मा निवांत बघत थोड्या अंतरावर उभा होता आणि साजिद उगाचच मार खात होता. दारू! एकच कारण! माणसाला पशू बनवणारे द्रव्य! दारू!

मात्र आता अंजुली ढाबावाला धावत तिथे आला. त्याला ढाब्यावर राडा नको होता. तो चांगला पहिलवान असल्यामुळे त्याने आधी दोघांना वेगळे केले आणि धक्के मारत बाहेर घालवायला सुरुवात केली. त्यातच आत्म्याने त्यालाही सांगीतले.

"यांना मारू नका.. चांगले मित्र होते... पण हे मुसलमान आहेत आणि यांच्या हिंदू बहिणीला यांनी घाण घाण शिव्या दिल्या म्हणून मारामारी झाली.. मिटेल आता...थोड्या वेळाने..."

ते ऐकून त्या अंजुली ढाबावाल्याने साजिदला उगाचच दोन मुस्काडात लगावल्या. हेलपाटलेला साजिद एकदम हायवेवर गेला. त्याच्यामागे ढाबावाला सोडून बाकी सगळे धावले. खरे तर आता मिटायला पाहिजे होते. पण धनराज अजून शिव्या देऊन साजिदच्या अंगाशी करत होता.

आत्मानंद ठोंबरे... यांनी त्या दिवशी त्यांना अजिबात शोभणार नाही असे एक कृत्य केले... आणि... घडलेला प्रकार पाहून सगळेच हबकले.

चौघांची एकमेकांशी झटापट चाललेली असताना आत्म्याने 'अरे सोडा त्यांना, सोडा, नका मारू' असे बोलत मिटवण्याच्या आविर्भावात धनराजला मागून एक जोरदार धक्का दिला आणि तोही... नेम धरून...

कोंबड्या घेऊन पुण्यात जाणार्‍या एका ट्रकच्या खाली जरी धनराज गेला नसला तरी त्या ट्रकचा त्याला जोरदार धक्का लागला आणि तो ढाब्याच्या गेटमध्येच धाडकन कोसळून पडला.

प्रचंड धक्का बसलेल्या तिघांना पाहून आता आत्म्याने खोटा खोटा गळा काढला आणि भसाड्या आवाजात रडू लागला. ढाबेवाला पुन्हा धावत बाहेर आला तेव्हा आत्मा ओरडला...

"यांनी गाडीखाली ढकलले यांना... मेले... मेले गुणे...."

केवळ पाऊण तासात, ढाबेवाल्याच्या मदतीने ससूनमध्ये अ‍ॅडमिट झालेल्या गुणेला चार फ्रॅक्चर्स झाल्याचे समजले तेव्हा अत्यंत दु:खी चेहरा करून परंतु मनात आनंदलेले आत्मानंद ठोंबरे साजिद शेखसमोरच शेखरला विचारत होते...

"आता शेखांचे काय होणार हो??... "

"ए.. ए यार.. तुम लोग अ‍ॅक्सीडेन्ट बोलना हां... मै.. जो चाहिये वो दे दुंगा... लेकिन.. ये अ‍ॅक्सीडेन्ट बोलनेका... क्या????"

'एक' मारणारे अनेक असतात, 'दोन' मारणारे बर्‍यापैकी, 'तीन' मारणारे मात्र क्वचित दिसतात....

... आत्म्याने एका दगडात अनेक पक्षी मारले..

दिल्याचे मन जिंकणे...

धनराजला अ‍ॅडमिट करून त्याला जन्माची अद्दल घडवून स्वतः नामानिराळे राहणे....

साजिद शेखला उपकारांच्या ओझ्याखाली ठेवणे...

त्यांच्या गॅन्गमध्ये कधीही न मिटणारी भांडणे निर्माण करणे....

त्यांच्या गॅन्गच्या प्रत्येक मेंबरच्या दृष्टीने एक महत्वाचा माणूस बनणे...

'तुमच्या ढाब्यावर काही येत नाही' असे पहिलवानाला सांगून साईड बिझिनेसप्रमाणे त्याचे मन जिंकणे..

.... आणि... जवळपास पाव खंबा व्होडका.. म्हणजे एक क्वार्टर... बोनस म्हणून फुकट मिळवणे...

एखाद्या पक्ष्याच्या पिसासारखे तरंगत तरंगत ठोंबरे स्वतच्या 'कक्षात' आले तेव्हा अशोक त्यांची व स्वतःची बॅग भरून दारात उभा होता...

अशोक - दिल्यासाठी वन्या थांबतोय... आपण दोघे जायचंय जालन्याला... आई गेली तुझी...

===========================================

मन आक्रंदणे म्हणजे काय याचा एकेका क्षणाला अनुभव घेत होता त्या पंधरा दिवसात आत्मा! एकेका क्षणाला!

अशोकबरोबर जालन्याला पोचला आणि घरात आईचे पार्थिव पाहून त्याचा धीरच सुटला. आजी, आजोबा तर पारच खचलेले होते. त्रिवेणी काल रात्रीपासून म्हणे बेशुद्ध असल्यासारखीच होती. आणि बुवा ठोंबरेंनी आजवर कीर्तनात सांगीतलेले सत्य, 'देह म्हणजे आपण नव्हे... देह हे फक्त वस्त्र आहे' आज त्यांनाच पटत नव्हते. एका कोपर्‍यात बसून ते भकास चेहर्‍याने उजडलेल्या संसाराची दशा पाहात होते.

अशोक दुसर्‍या दिवशी निघून गेला. अंत्यविधी करताना आत्मा अक्षरशः उभा राहू शकत नव्हता. आईला आपण पाहूही शकलो नाहीत याचे त्याला अतीव दु:ख झाले होते. अशोक गेल्याच्या दुसर्‍या दिवशी लगेचच वन्या आला. तोही एक दिवस थांबून निघून गेला. हळूहळू लोक येऊन भेटून जाणे संपू लागले.

मात्र दहाव्या, बाराव्या आणि तेराव्या दिवशी ही गर्दी झाली प्रसादाला! उभ्या महाराष्ट्रातून कोण कोण आले होते. आपले वडील प्रत्यक्षात काय आहेत हे त्रिवेणी आणि आत्मा यांनाच काय तर आपला मुलगा काय आहे हे आजी आजोबांनाही त्या दिवसांमध्ये समजले.

आई! दोन अक्षरे ज्यातील एक किंवा दोन्ही.. जी मूल बोलायला लागल्या लागल्या उच्चारते. जिच्यामुळे आपण असतो आणि जिच्या संस्कारांचा आपल्या आयुष्यात सर्वात जास्त प्रभाव असतो ती व्यक्ती!

दारूची आठवणही आली नाही आत्म्याला त्या दिवसांमध्ये! घराच्या प्रत्येक कोपर्‍यावर, प्रत्येक कणाकणावर, प्रत्येक वस्तूवर आईचे अस्तित्व उरलेले होते. तिचा स्पर्श उरलेला होता. खळ्ळकन अश्रू यायचे त्याच्या डोळ्यात! त्रिवेणीला धीर द्यायला हवा म्हणून तो रडायचा नाही. बुवा आणि दादाला कित्येकदा मिठी मारून त्रिवेणी खूप रडायची.

पण काळ थांबतो कुठे? आत्म्याला पुन्हा कॉलेजला यावेच लागले. घरातून निघताना सगळ्यांना अक्षरशः मिठी मारून रडून निघाला तो! बिचारा आत्मा! तसा खूप चांगला होता मनाने! पण दारूमुळे लांब गेलेला होता काही माणसांपासून! पण.. अशा प्रसंगाला त्यातला आधीचा निष्पाप आत्मानंद दिसायचा.

पोरका झालेला आत्मा होस्टेलवर परत आला. मग त्याला कॅन्टीनमध्ये भेटायला अलका देव आली. नंतर संध्याकाळी सुरेखा, रशिदा आणि दीपाही भेटून गेल्या. आश्चर्य म्हणजे धनराज जरी हॉस्पीटलमध्ये असला तरीही बाकीचे तिघे त्याला भेटून गेले. ते पाहून या तिघांना आश्चर्यच वाटले.

आत्म्याने मग दिलीपला अजिबात न घाबरता सगळे सांगीतले. सुरुवातीला हिंस्त्र झालेला दिलीप नंतर समजून चुकला. गुणेला आपल्यावर डाव टाकायचाच होता. आत्म्याने दिलेली माहिती हे केवळ निमित्त होते. ती दिली नसती तर गुणेने नंतर केव्हातरी हेच केले असते.

त्याहीपेक्षा आत्म्याने टाकलेली गेम जबरच होती. बराच वेळ सगळे हादरून आत्म्याकडे पाहात होते. हळूहळू विश्वास बसल्यावर आणखीनच धक्का बसला सगळ्यांना! आत्म्यासारख्याने हे कृत्य केले कसे? मग लक्षात आले... जे केले ते केवळ पश्चात्ताप झाल्याने व दिल्यावर खरेखुरे प्रेम असल्याने!

साजिदच्या रशिदाबाबतच्या आणि शेखरच्या दीपाबाबतच्या मतांबद्दल मात्र आत्मा एक शब्दही बोलला नाही.

गेल्या तीन महिन्यात आत्म्याला चोरी करायची गरज भासली नव्हती. उधारीची गरज भासली नव्हती.

आता या सेमिस्टरचे जवळपास चार महिने होऊन गेले होते आणि पुन्हा अभ्यासाचे वातावरण निर्माण झाले होते. आत्मा आता पुन्हा पिऊन अभ्यास करू लागला होता. मध्येच आईची आठवण आली की हळवा व्हायचा! मग अशोक त्याला समजावून सांगायचा की 'मलाही आई नाही आहे, बघ, शेवटी धीर धरावाच लागतो' वगैरे!

आणि आजही संध्याकाळी सात वाजता आत्मा एक स्मॉल घेऊन मोठ्याने पुस्तक वाचत असताना दिल्या आणि अशोक ते वाचन फक्त ऐकत होते. रोजच ऐकायला मिळायचे ते! तसेच आजही ऐकत होते. हाच अभ्यास भरपूर व्हायचा पास व्हायला! मात्र वन्या दीपाला भेटायला धनकवडीत गेला होता.

आइ साडे सात वाजता तीरासारखा आत येऊन वन्याने एक कागद सगळ्यांदेखत आत्म्याच्या अंगावर फेकला आणि म्हणाला...

"तेच केलं याने.. जे रशिदाचं केलं... ही बघ दिल्या चिठ्ठी या हराम्याने लिहिलेली... दीपाला.. रडून रडून नुसती अर्धमेली झाली होती ती... *****... तू साप आहेस साप"

हबकून सगळेच बघत होते. एखादा विषारी किडा असावा तशी आत्म्याने ती चिठ्ठी उचलली.

'दीपा.. तुमच्याबद्दल मनात खूप काही आहे.. पण.. वनदास यांच्यामुळे बोलवत नाही मला.. एखाद दिवशी भेटाल का एकट्याच?? खूप खूप बोलायचे आहे... - आत्मानंद..."

अक्षर आत्म्याचे नाही ही एकच बाब आत्म्याच्या बाजूने होती. आणि तीही मोडून पडली कारण वन्याने दिल्याला सांगीतले...

"अरे सतरा जणांची सबमिशन्स करतो हा... सतरा प्रकारची अक्षरे जमतात याला लिहायला *****"

आत्म्याचा पुर्वेतिहास बघता शंकास्पद वातावरण निर्माण झालं! त्यात वन्या इतका चिडलेला की त्याला शांत करावे की आत्म्याला झापावे हेच दिल्या आणि अशोकला समजत नव्हते.

अशोक - आत्म्या... हरामखोर... खरं बोल..

आत्मा - लाज वाटते का विचारायला?? मी हे केलेलं नाही, करणार नाही आणि तुम्ही सगळे खड्यात जा...

अशोक - वन्या... हे अक्षर आत्म्याचं नाही आहे...

वन्या - एक काम कर ना?? आजवर ज्यांची सबमिशन्स केली ना?? ती सगळी खणून काढ.. मग बघू...

दिल्या - **** आत्मा कशाला असलं काही करेल??

वन्या - तुम्हाला झेपणारच नाही हे कधी! रशिदाचं काय झालं??

अशोक - ते सोडून दे... ते एकदाच झालं...

वन्या - मग बिंदिया नैनचं काय??

अशोक - आत्म्या.. खरं काय ते सांग...

आत्मा - अरे हाड... कुठे आहेत त्या.. मीच आत्ताच्या आत्ता त्यांना भेटतो... चला...

वन्या - घरीय ती... नाही नाही.. तुला नेणारच आहे मी उद्या तिच्या बापासमोर...

बराच वेळ वादंग झाला. का कुणास ठाऊक वन्याला आत्म्याचा पुरेपूर संशय होता. पण अशोक आणि दिल्याला तितकं वाटत नव्हतं! पण त्यांना हे निश्चीत माहीत होतं की हे बेणं कधी काय करेल काही सांगता येत नाही. त्याने रशिदाचे कपडे पळवलेले होते, होस्टेलच्या पोरींना निरखायला जायचा, उधारी केलेली होती, चोरी केलेली होती, दारू तर रोजचीच झालेली होती....

अत्यंत कलुषित वातावरणात काही दिवस गेले. वन्याने दीपासमोर आत्म्याला येऊच दिले नाही. दीपाही आता आत्मानंद या विषयावर बोलतही नव्हती आणि आत्मा समोर दिसला तर लांबूनच निघून जायची दूर!

रूम नंबर २१४ पुन्हा एकदा गढूळ वातावरणाने भारली गेली होती. वन्याने पहिल्यांदा भांडून आत्म्याचा मोठमोठ्याने होणारा अभ्यास बंद पाडला होता. 'आमचा अभ्यास होत नाही' या कारणावरून! त्यामुळे आत्मा पार आंगनच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत जाऊन उजेड असेल तोवर वाचन करायचा. 'मीही कक्षाचे पैसे भरले आहेत' हे विधान त्याने करून पाहिले होते. पण अशोकने वन्याची बाजू घेतली. दिल्याची मात्र अडचण झाली. आजवर तो नुसतच कानावर पडेल ते ग्रास्प करत होता. आता स्वतः वाचायची पंचाईत निर्माण झाली.

पहिल्या वर्षाची मजा केव्हाच गेलेली होती. विविध नट्यांची पोस्टर्स, दारू, शिव्या, विनोद, एकमेकांना खेचणे, सगळेच संपलेले होते. दुसर्‍या वर्षी तर अनेक प्रकार घडलेले होते. आत्म्याचे अधःपतन, ग्रूपमध्ये त्याची प्रतिमा बिघडणे, तो विश्वासास पात्र न राहणे, चोरी, अती मद्यपान, दिल्याला मारहाण, सगळेच प्रकार विचित्र! आणि या तिसर्‍या वर्षाची सुरुवात जरा कुठे ठीकठाक होतीय तोवर आत्म्याची आई जाणे आणि त्या पाठोपाठ हा दीपाला पत्र लिहिण्याचा प्रकार!

वनदासला तर कधी एकदा हे कॉलेज लाईफ संपतेय आणि आपण नोकरीला लागतोय असे झाले होते.

हल्ली रूमवर कुणी एकमेकांशी फारसे बोलायचेही नाही. जो तो आपापल्याच विश्वात असायचा. अभ्यास करायचा, कॉलेजला जायचा, जेवायचा आणि झोपायचा! मधेअधे अशोक आणि वन्या एखादी क्वार्टर आणून लावायचे. दिल्या मात्र आठवड्यातून दोनदा घ्यायचा. पण त्याची त्याची! तिघे मिळून कधीच नाहीत. आत्मा हमखास प्यायचा पण!

ओल्ड मंकने आत्म्याचे सगळे विश्व बदलून टाकले होते. अतर्क्य उलथापालथ झाली होती त्याच्या आयुष्यात!

आजही वनदास असाच फिरत फिरत पिरियड संपल्यावर रूमकडे चालला असताना कुणीतरी येऊन म्हणाले..

"कॉन्ग्रॅट्स लामखडे... तुझ्या वडिलांना पुरस्कार मिळाला..."

"वडिलां...ना??? कसला???"

"ग्रामीण विभागातील अर्धशिक्षित कुटुंबातील मुलाला इंजीनीयर बनवणे आणि शिक्षणाची कास धरणे"

हे काय आहे ते वनदासला समजले नाही. तो नोटीस बोर्डकडे धावला.

खरच की? नोटीस लागली होती.

'या वर्षी संस्थेचे संस्थापक धर्मराज मेहता यांच्या मातु:श्री कै. श्रीमती रज्जूबहेन मेहता यांच्या नावाने काही पुरस्कार दिले जाणार आहेत.

उत्कृष्ट क्रीडापटू - सोलोमन डिसूझा - टी.ई. कॉम्प

उत्कृष्ट कलाकार - विभागून - चित्रकला - राणी पत्की - एस्.ई. इलेक्ट
नृत्य - वर्षा गोरे - बी.ई. सिव्हिल
तबला - हेमंत गायकवाड - एस्.ई. पॉली.

आर्थिक मागास व यशस्वी विद्यार्थ्याचे वडील - आबा उर्फ सोनूराम लामखडे
(वनदास लामखडे - टी.ई. प्रॉड यांचे वडील)

अपंग विद्यार्थी - मिलिंद काणे - बी.ई. मेक.

समाजोपयोगी कार्य करणारा विद्यार्थी - श्रावण दप्तरदार - टी.ई. इलेक्ट्रॉनिक्स

महाविद्यालयातील कार्यालयात उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ही नावे निवडलेली असून यात कोणतीही स्पर्धा घेण्यात आलेली नव्हती. हा उपक्रम विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणे अथवा शिक्षणास प्रवृत्त करणे या बाबींना उत्तेजन देण्यासाठी आखण्यात आलेला असून या अंतर्गत दर वर्षी असे पुरस्कार देण्यात येतील याची नोंद घ्यावी. वरील प्रत्येक पुरस्कारांतर्गत रोख रक्कम, शाल, श्रीफळ, मानपत्र असून हा सोहळा दिनांक १८ एप्रिल १९९१ रोजी सायंकाळी सहा वाजता महाविद्यालयाच्या प्रमुख पटांगणात साजरा होईल. माननीय संस्थापक धर्मराज मेहता यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होतील व त्यांचे मार्गदर्शनही होईल. सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे.

- डॉ. एम. एम. बोरास्ते
प्राचार्य - अभियांत्रिकी महाविद्यालय

१८ एप्रिल?? म्हणजे परवा??

हबकलेला वनदास रूमवर आला आणि एकच कल्ला झाला. आत्मा बाहेर गेलेला होता. आज तर पार्टी करायलाच हवी होती. तत्पुर्वी वन्याने आधी वाडीतल्या वाण्याला अर्जंट वनिताला बोलवायला सांगीतले अन दहा मिनिटांनी पुन्हा फोन केला. आईपण आली होती फोनपाशी! वन्याने हा सुखद धक्का दिला आणि परवा सकाळी तिघांनाही निघून यायला सांगीतले. त्याचदिवशीच्या रात्रीच्या गाडीचे रिझर्व्हेशन मी इथेकरून ठेवतो असेही सांगीतले. फोन ठेवून मागे वळला तर समोर आत्मा... मोकळेपणाने हासत होता वन्याकडे पाहून!

आत्मा - अभिनंदन तुमचे आणि काकांचे.. मी सूचनाफलक वाचला..
वन्या - थॅन्क यू आत्मा...

नाही म्हंटले तरी तीन वर्षांचे प्रेम होतेच की? तो अभिनंदन करायला आल्यावर आणि आपली मनस्थिती इतकी चांगली असताना त्याला तोडून कसे बोलता येईल??

आत्मा अजूनही निष्पापपणे हासतच उभा होता.

वन्या - थांबशील आज रूमवर??
आत्मा - .... का???
वन्या - ... पार्टी आहे...

दोघांच्याही डोळ्यांत आसवे आली. 'पार्टी'! काय शब्द होता तो! तय एका शब्दावर पहिले वर्ष काढले होते. अशोक थोडा मोठा होता या दोघांहून! दिल्या तर बराच मोठा होता. हे दोघे एकाच वयाचे होते.

आत्मा - म्हणजे काय?? पार्टी असणारच की?? म्हणून तर मी कुठेच गेलो नाही...

भरून आले वन्याला! किती छान मैत्री होती एकेकाळी! असो... आज तरी कुठल्या आठवणी काढायच्या नाहीत.

वन्याने स्वतःजवळचे काही पैसे व अशोककडून काही उधार घेऊन आज खंबा आणला...

... रूम नंबर २१४ ने असला खंबाच कधी पाहिलेला नव्हता. ब्लेन्डर्स प्राईड - बी.पी.

चकणाही चांगल्यपैकी! सिगारेटीही चक्क विल्स! आणि आंगनवरून चिकन आणि रोटी! दोन राईस! गार झाले तरी चालेल.

आणि जो पार्टीला जोर आला.

दिल्या - वन्या.. भ*** तुझा बाप उडलाच असेल हे ऐकून...
वन्या - ते काय मला फोनवर दिसलं नाय...
आत्मा - तुम्ही त्या दिवशी धोतर नेसा...
वन्या - गप ***... तिच्यायला... गेला पोटात घोट की हा झाला सुरू....
आत्मा - मद्य असतंच तसं... निष्पाप माणसाला आणखीनच निष्पाप बनवतं...
अशोक - घंट्याचा निष्पाप तू... त्या दिवशी स्टारडस्टमधला मौसमीचा फोटोच बघत बसला होता...
आत्मा - बघण्यासारखीच गोष्ट आहे ना ती??
अशोक - पापी नजर आहे तुझी...
आत्मा - जे दिसतं तेच बघणार माणूस...
अशोक - अरे पण किती वेळ??
आत्मा - ही निरागस नजर स्वतःहून हटेपर्यंत...
अशोक - ती कसली हटतीय?? तोच तर प्रॉब्लेम आहे..
दिल्या - त्यात आधीच ती मौसमी चटर्जी...
आत्मा - त्यांनी काही विशिष्ट औषधे घेतलेली असावीत असा माझा प्राथमिक कयास आहे...
वनदास - का बरं??
आत्मा - उगाच एखाद्यावर निसर्ग अशी यौवनाची उधळण करणार नाही...
अशोक - आपण काय निसर्ग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जी. एम. आहात का??
आत्मा - नाही... पण.. काही काहींना पाहून मला नेहमी तसा संशय येतो...
अशोक - कोण काही काही..???
आत्मा - त्या राज कपुरांच्या स्नुषा कोण त्या??
अशोक - बबिता...
आत्मा - नाही.. त्या ज्येष्ठ आहेत.. कनिष्ठ...
अशोक - नीतु सिंग...
आत्मा - हां... नंतर.. त्या हिम्मतवालामध्ये हिम्मत दाखवणार्‍या...
अशोक - श्रीदेवी...
आत्मा - हां... हे सगळं अनैसर्गीक असावं...
दिल्या - तुझं काय गेलं बे??? तूही घे की औषध??
वनदास - नको... आहे तेच चिक्कार आहे...
आत्मा - कशाबद्दल बोलत आहात??
वनदास - निसर्गाने तुमच्यावर करता करता राहिलेल्या उधळणीवर...
आत्मा - मी एक परिपूर्ण पुरुष आहे हे मी सिद्ध करू शकतो...
दिल्या - आणि तू नाही आहेस हे मी...

कित्येक महिन्यांनी शमाल चाललेली होती. सगळेच आनंदात असताना रशिदाचा विषय निघाला. दारू चढलेला आत्मा बोलून गेला.

आत्मा - ते साजिद शेख आहेत त्यांना त्या आवडतात...

एकदम गहन शांतता पसरली रूममध्ये!

अशोक - तुला कसं माहीत????
आत्मा - त्याच्याच वरून त्या दिवशी वाद झाले...
अशोक - काय म्हणतो तो...
आत्मा - आणि.. ते शेखर आहेत त्यांना दीपा ....
वनदास - आत्म्या.. **न काढीन.. नीट बोल..
आत्मा - मी जे सांगीतलं तेच खरं आहे...
वनदास - बघ दिल्या... तुला खरं वाटत नव्हतं ना? याला अजूनही रशिदा आणि दीपाबद्दल तेच वाटतं...

अचानक वेगळे वळण लागले पार्टीला! बघता बघता शब्द वाढत गेला. शेवटी पर्यवसान भांडणात झाले. आणि चुकून आत्मा काहीतरी रागाने बोलला तेव्हा.. आयुष्यात पहिल्यांदाच... स्वतःच्याच पार्टीत त्याला निमंत्रीत करून... वन्याने त्याच्या खाडकन कानाखाली लावली..

खूप खूप अपमान झालेला आत्मा... एकेक पाऊल ओढत रूमबाहेर गेला..

===========================================

सहाच्या ऐवजी साडे सात वाजता सुरू झाला कार्यक्रम! कारण संस्थापकांना यायलाच उशीर झाला. वन्याची चुळबुळ यासाठी चालली होती की दहाच्या गाडीचे त्याने रिझर्व्हेशन करून ठेवले होते. हे कॉलेज आणि पुणे बघून वनिता तर चक्रावलीच होती. केवढं हे शहर आणि केवढाल्या इमारती! वन्याचे वडील आज अगदी फेटाबिटा घालून आले होते. ते एकटेच विचित्र आणि वेगळे दिसत होते त्या गर्दीत! नाही म्हंटले तरी दोन अडीचशे विद्यार्थी व इतर जमलेच होते तिथे. प्राचार्यांतर्फे संस्थापकांचे स्वागत वगैरे झाल्यावर प्राचार्यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी महाविद्यालयातील पास होण्याची वाढलेली टक्केवारी, असलेल्या सुविधांचा सुयोग्य वापर होत असणे, नसलेल्या सुविधांची मागणी वगैरे विषय कव्हर केले. त्यानंतर संस्थापक बोलायला उठले. त्यांनीही कॉलेजच्या एकंदर प्रगती व विकासाबाबत समाधान व्यक्त केले. त्यानंतर गोखले मॅडम सूत्रसंचालनाच्या व सोहळ्याच्या पुढच्या भगासाठी उठल्या. एकेक पुरस्कार जाहीर करताना त्या पुरस्काराची पार्श्वभूमी व विजेत्यची माहिती देत होत्या त्या!

सोनूराम लामखडे!

नाव उच्चारल्यावर पटकन वन्याचे वडील अर्धवट उठले. त्यांना वन्याने बसवले.

"अजून माहिती सांगायचीय.. मंग जा वर" म्हणाला..

"सोनूराम लामखडे हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत या तालुक्यात असलेल्या एका अत्यंत लहान वाडीत गेले अनेक वर्षे राहतात. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय! पूर्णपणे पावसावर अवलंबून असलेल्या आपल्या उदरनिर्वाहाच्या साधनाबाबत कधीही दु:ख व्यक्त न करता त्यांनी ठरवले होते. त्यांच्य पाल्याला, म्हणजे टी.ई.प्रॉडमधील वनदास लामखडे याला इंजिनीयरिंगला घालायचे.

अत्यंत तुटपुंजे उत्पन्न, गरीब राहणी व प्रचंड अडीअडचणी अशा परिस्थितीत खरे तर एखाद्याने हारच मानली असती. परिस्थितीला शरण गेला असता. पण.. सोनुराम यांनी हार मानली नाही. मुलाला शिकवायचेच या जिद्दीने त्यांनी शेतीवर लक्ष केंद्रीत केले. मिळेल त्या उत्पन्नापैकी बराच मोठा भाग त्यांना या खर्चासाठी द्यावा लागला. एवढे करूनही पैसे अपुरेच पडत होते. अशा वेळेस, वनदास याच्या पाठीवर एक बहीण असतानाही आणि तिच्या लग्नासाठी जमवलेले सोने असतानाही.. सोनुराम यांनी आपल्या पत्नीस, म्हणजे वनदास याच्या आईस सांगीतले की...

... हे सोने काय?? मी पुन्हा मिळवीन आपल्या वनिताच्या लग्नासाठी.... पण आपला मुलगा शिकलाच पाहिजे.. वनदासच्या आईलाही अतिशय कौतुक वाटले आपल्या पतीचे... त्यांनी विनातक्रार आपले सोने विकले... त्या पैशातून शिकणारे वनदास गेल्या दोन वर्षात समाधानकारक गुण मिळवून उत्तीर्ण होत आले आहेत... आता हे चालू वर्ष व पुढील शेवटचे वर्ष ही दोनच वर्षे राहिलेली आहेत.. ती पूर्ण झाली की सोनुराम लामखडे व त्यांच्या पत्नीचे स्वप्न पूर्ण होईल.. एका गरीब घ्रातील एक मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहील..उत्तम नोकरी मिळवेल...

अशा त्यागी स्वभावाच्या व शिक्षणाबाबत अत्यंत आस्था असणार्‍या सोनुराम लामखडेंना मी विनंती करते की त्यांनी सपत्नीक येऊन आपला पुरस्कार माननीय संस्थापकांच्या हस्ते स्वीकारावा...."

टाळ्यांचा अभुतपुर्व कडकडाट होत होता. अत्यंत लाजर्‍या चेहर्‍याने व ग्रामीण पोशाखात वन्याचे वडील खुर्च्यांमधून वाट काढून स्टेजकडे जात होते. त्यांच्यामागून त्याची आई त्यांच्याहून जास्त लाजून वाट काढत होती. वन्याच्या आईने ठेवणीतले नऊवारी नेसले होते. सुरुवातीला या जोडप्याच्या पोषाखाला हसणारी तोंडे आता गप्प तर झालीच होती पण उत्स्फुर्तपणे टाळ्यांचा कडकडाट करत होती.

वनिता ते बहुतपुर्व दृष्य बघून गारच पडली होती. आपला बा एवढा मोठा आहे??

वनदास बसल्या जागी खिळलेला होता. त्याच्या खांद्यावर दिल्याचा हात होता. त्याचा उजवा हात अशोकच्या डाव्या हातात होता. आत्मानंद लांब उभा राहून टाळ्या वाजवत होता. त्याचा चेहरा दु:खी होता. त्याचे त्या ग्रूपमधले स्थान पुन्हा गेले होते.

आणि कुणाचाही विश्वास बसणार नाही असा प्रकार झाला. वन्याचे वडील पुरस्कार घेताना अक्षरशः रडले. अक्षरशः रडले. इकडे ते पाहून वनिता आणि वन्याही रडले. त्यांची आईही डोळे पुसत होती. आणि अचानक वन्याच्या वडिलांनी गोखले मॅडमना खुण करून माईकचा ताबा घेतला.

"वनदास.. लय शिक बाळा.. तुझ्यामुळं ह्यो दिस दिसला या तुझ्या बापाला.. आन... आन यापुढे कसलीही काळजी करू नको हां?? ... तुझ्या आयची आन भनीची समदी काळजी घेईल म्या... लय शिक बाळा.. लय शिक..."

पुरुषासारखा पुरुष असा फेट्याचे टोक लावून डोळे पुसत इतका रडतो का आहे हे उपस्थितांना समजत नसले तरी रूम नंबर २१४ आणि वन्याच्या घरच्या तिघांनाही समजलेले होते.

खाली येऊन वडिलांनी सर्वांदेखत वन्याला जवळ घेईपर्यंत टाळ्या चाललेल्या होत्या. वन्याने दोघांना नमस्कार केल्यावर आणि सगळे खाली बसल्यावर मग टाळ्या थांबल्या.

रात्री निघताना सहज पाकीट पाहिले.

तीन हजार???

वडिलांनी ते वन्याला देऊ केले. वन्याने 'वनिताच्या लग्नासाठी आत्ता तुमच्याकडेच ठेवा' असे सांगीतले. सगळे सद्गदीत मनाने निरोप घेत असताना दिल्या, आत्म्या आणि अशोक या तिघांनी वन्याच्या आई वडिलांना नमस्कार केला. आता आजूबाजूला कुणीच नव्हते.

वन्याचे वडील म्हणाले..

"वनदास... किती रे मोठा हाईस तू... मी किती छळलं तुझ्या आयला.. नाय वागनार आता असा.. वनिते.. ये बाळ... मी... मी आता लय काळजी घेनार हाय तुमची..."

अजूनही सगळ्यांच्या डोळ्यांना पाणी होतेच.

आणि सगळे निघून गेल्यानंतर झलेल्या पार्टीच्या वेळेस आत्मानंद नव्हता. तो होता अंजुलीला!

आणि ... धनराज गुणेचा कट्टर शत्रू बनलेला साजिद शेख त्याचवेळेस रूम नंबर २१४ वर आला होता.

दिल्या - क्या बे *****... तू इधर????

साजिद - वो.... आत्म्या कहां है....

दिल्या - क्यूं????

साजिद - उसको बतानेका था.. शेख्याने उसको फसानेके लिये वो दीपा नामकी लडकी है ना.. उसको चिठ्ठी लिखी थी....

आणि त्याचवेळेस वन्याचे अभिनंदन करायला आलेला होस्टेलवरचा एक मुलगा मागून म्हणत होता...

"हे काय?? पार्टीला आत्म्याच नाही?? ल्येको.. त्याच्यामुळे वन्याच्या वडिलांच नांव फायनल झालं होतं... अन त्याला बोलवत नाही होय तुम्ही?????"

गुलमोहर: 

.

खरच मानलं पाहीजे राव तुम्हाला.
ग्रेट आहात तुम्हि.
अशा वेळी देखिल न चुकता संपादन करु शकत्ता तुम्ही.
तुमच्या ह्या प्रेमासाठी तुम्हाला धन्स.
लाख लाख धन्स.
मनातला एक कोपरा जिंकलात आज तुम्ही.
सहीच.
पण तितकीच आईची पण काळ्जी घ्या.
त्या लवकरात लवकर बर्‍या हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

सावरी आणि तृष्णाला माझं अनुमोदन..
बेफिकीरजी... तुम्ही खरोखर ग्रेट आहात आणि हे वेळोवेळी सिद्ध होते...
कथालेखन हे आमच्या प्रेमाचं ओझं नसून तुमचा ताण हलकं करणारं साधन असेल आणि त्याने तुम्हाला खरंच बरं वाटत असेल, तर आम्हाला आनंदच आहे- तुम्ही लिहिलेत याचा... Happy
पण स्वतःची नी आईंची काळजी घ्या. सगळे लवकरात लवकर ठिक होईल, आई बर्‍या होतील ह्या आमच्या प्रार्थना आणि शुभेच्छा कायम तुमच्या सोबत असतीलच, हा विश्वास असू द्या... Happy
शतशः आभार आणि प्रणाम!!!! Happy

बेफिकीरजी मानले तुम्हाला....
या अशा परिस्थितीतही तुम्ही पुढचा भाग टाकलात याबद्दल तुमचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. तुमच्या आईंना लवकर बरे वाटावे ही प्रार्थना
बाकी या भागाबद्दल काय बोलणार...तुफानी वेग एवढेच वर्णन करता येईल. काय एकापाठोपाठ घटना घडतायत. कसे जमते हो तुम्हाला या सगळ्याचे संतुलन साधायला. माझे तर डोके बधीर होऊन गेले आहे. पुढे काय होणार काय नाही याचा काहीही विचार करवत नाहीये.
आनंद, दुख, मिलन, वियोग, मैत्री, दुष्मनी आणि अनेक गोष्टींचा एकापाठोपाठ एक मारा झाल्यामुळे सुन्न झालोय आणि यातून बाहेर पडावेसे वाटत नाहीये.

बेफिकीर जी,

धन्यवाद.....

अप्रतिम !!

ग्रेट बेफिकिरजी,

धन्यवाद

खरोखरच प्रणाम...

बेफिकीर जी,
आजचा भाग ही सुंदर झाला आहे .... आत्ता परत एक वेगळं वळण ...
सानी , आशुचँप यांना अनुमोदन.. Happy
तुमची आणी आईंची काळजी घ्या
धन्यवाद

आनंद, दुख, मिलन, वियोग, मैत्री, दुष्मनी आणि अनेक गोष्टींचा एकापाठोपाठ एक मारा झाल्यामुळे सुन्न झालोय आणि यातून बाहेर पडावेसे वाटत नाहीये.>>> आशुला अनुमोदन....

प्रचंड मानसिक ताणानंतरसुद्धा लेखनाचा दर्जा उत्कृष्ट राखत सुसंगती कुठेही न ढळू देता लिहिलेल्या या मनोरंजक भागासाठी बेफिकीरजी, तुम्हाला सलाम!!!!

आत्मा खरोखर एक महान आत्मा आहे... त्याच्याविषयीच्या आदराने मन भरुन आले आहे... आता कथेच्या आशावादी पर्वाला सुरुवात झाली आहे, याचा खुप आनंद आहे... Happy बेफिकीरजी, जियो!!!

बेफिकीर,

आत्म्याच्या व्यक्तिम्त्वाचे विविध पैलु आपण उलगडत आहत्...खुप छान....
डोक खरच सुन्न झालय.....

प्रचंड मानसिक ताणानंतरसुद्धा लेखनाचा दर्जा उत्कृष्ट राखत सुसंगती कुठेही न ढळू देता लिहिलेल्या या मनोरंजक भागासाठी बेफिकीरजी, तुम्हाला सलाम!!!! ......१००% अनुमोदन.....

हा भाग प्रकाशित करुन तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त केलत ह्या प्रेमासाठी तुमचे आम्हा वाचक वर्गाकडुन खुप खुप आभार पुन्हा एकदा....शेवटी पुन्हा "बेफिकीर टच".

आईना लवकर बरे वाटेल...खात्री बाळगा.....कारण खुप पुण्य गाठीशी आहे तुमच्या....
आईची काळजी घ्या.....

सावरी

बेफिकीर,

आजचा भाग ही सुंदर झाला आहे अतीशय आवडला....

प्रचंड मानसिक ताणानंतरसुद्धा लेखनाचा दर्जा उत्कृष्ट राखत सुसंगती कुठेही न ढळू देता लिहिलेल्या या मनोरंजक भागासाठी बेफिकीरजी, तुम्हाला सलाम!!!! सानीला अनुमोदन...

आपल्या आईना लवकर बरे वाटेलच.

श्री बेफिकिर, सर्वप्रथम तुमच्या आईंना लवकर बरे वाटावे ही प्रार्थना, आपण याही परिस्थितीत लेख लिहिलात यावरुन तुमचे लेखणीवरचे प्रेम दिसुन येते. हाही भाग मस्त जमलांय...

"हे काय?? पार्टीला आत्म्याच नाही?? ल्येको.. त्याच्यामुळे वन्याच्या वडिलांच नांव फायनल झालं होतं... अन त्याला बोलवत नाही होय तुम्ही?????"
>>हे तर जबराच

आजचा भाग पण चांगला झालाय. आवडला.
आत्मानंदची व्यक्तिरेखा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मांडत आहात.
आपण मानसिक तणावामधे असताना सुद्धा इतके चांगले लेखन करत आहात, याबद्द्ल तुमचे कौतुक.

कथा आता जोरदार वेग पकडायला लागली आहे. बेफिकीर आभारी आहे, हा भागासाठी. बाकी सर्व भावना व्यनि तून कळवेन.

निशब्दः !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

पुरुषासारखा पुरुष असा फेट्याचे टोक लावून
डोळे पुसत इतका रडतो का आहे हे उपस्थितांना
समजत नसले तरी >
च्यामायला ४ प्याग झल्या
तरि चढत नाय व्हय ??????

लय भारि झाला ह्ये भाग