गुरुदक्षिणा

Submitted by सुपरमॉम on 19 September, 2007 - 12:41

सकाळची वेळ. कामतसाहेब आपल्या केबिन मधे आठ वाजताच येऊन बसले होते. कडक इस्त्रीच्या गणवेशावरची काल्पनिक धूळ झटकून टाकत त्यांनी टेबलावरच्या फ़ाईल्स पुढे ओढल्या. 'सुधीर कामत. आय. पी. एस.' लिहिलेली धातूची छोटीशी पाटी नीट सरकवून ठेवली. चपराश्याने आणून दिलेला पाण्याचा ग्लास तोंडाला लावून एक घोट घेतला. अन समोरची फ़ाईल ते चाळू लागले.

तोच बाहेर कसल्याशा गडबडीने त्यांचे कान टवकारले गेले. थोडीशी धक्काबुक्की, चढ्या आवाजातली बोलणी या सार्‍यानं ते सावध झाले.

'कसला गोंधळ आहे रे तिथे? मोरे? ....काय चाललंय?
धारदार स्वरात त्यांनी ओरडून विचारलं.

तेवढ्यात संतप्त झालेला चपराशी मोरे नि त्याच्याबरोबर एक सत्तरीच्या पुढचे गृहस्थ पडदा बाजूला करून आत शिरले. शिरले कसले, जबरदस्तीनं आत घुसलेच.

'साहेब, हे काळे आले होते आपल्याला भेटायला.... मी सांगितलं की साहेब लोकांच्या तक्रारी शुक्रवारी चार वाजता ऐकतात. तेव्हा या म्हणून. पण ऐकेचनात. वाद घालू लागले....'

'आपण शुक्रवारी या. आज मी फ़ार कामात आहे. तसाही इथे ऑफ़िसमधे मी कोणाला भेटतच नाही....' कामतांनी कडक सुरातच सांगितलं...

'माझं काम फ़ार महत्वाचं आहे हो. मला... आपण मला ओळखलं नसेल कदाचित... मी काळे... काळे गुरुजी...'

'काळे गुरुजी...?'
एक क्षणभर काहीच न समजल्यासारखी कामतांनी मान हलवली. अन मग वीज चमकावी तशा सार्‍या लहानपणीच्या शाळेतल्या आठवणी त्यांच्या डोळ्यांसमोर तरळून गेल्या.

'सर... सर.. तुम्ही? इथे कसे? माफ़ करा सर.. मी ओळखलं नाही आपल्याला आधी. खूप वर्षं गेलीयत मधे...'

खुर्चीवरून उठून ते पुढे आले, अन सरळ काळे सरांच्या पायाशी वाकले. मोरे आ वासून बघतच राहिला. आपला इतका कडक, सगळीकडे दरारा असलेला तरणाबांड साहेब एका फ़ाटक्या माणसाला चक्क नमस्कार करतो?...

'मोरे..जा तुम्ही बाहेर.. काही लागलं तर बोलावीन मी. अन हो, दोन चहा सांगा आधी.... या सर. बसा आपण इथे...'
हाताला धरून हळुवारपणे कामतांनी गुरुजींना खुर्चीत बसवलं.

'सांगा सर. काय करू शकतो मी आपल्यासाठी ? तब्येत फ़ारच खराब झालेली दिसते या मधल्या काळात...'

सहानुभूतीच्या दोन शब्दांनी इतका वेळ आवरलेल्या गुरुजींच्या भावना अनावर झाल्या. म्हातार्‍या डोळ्यात अश्रूंचे ढग दाटून आले.

'सुरेश... माझा मुलगा..खोट्या आरोपात अडकलाय रे...शाळेतल्या मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे त्याच्यावर...'

एक क्षणभर कामत साहेब स्तब्ध झाले. गुरुजींचा मुलगाही शाळेत शिक्षक असल्याचं फ़ार पूर्वी कळलं होतं त्यांना. पण हा असा गंभीर आरोप? अन यात आपण काय करू शकणार आहोत? गुरुजींचे एकेकाळी खूप उपकार आहेत आपल्यावर हे खरं, पण ....'

त्यांना विचारात हरवलेलं बघून गुरुजी कळवळून म्हणाले...'तो तसा नाही रे सुधीर. विश्वास ठेव माझ्यावर. दोन लहान मुलं आहेत त्याला...'

पण गुरुजींच्या बोलण्याकडे सुधीर कामतांचं लक्षच नव्हतं.

वीस वर्षांपूर्वीची त्यांची शाळा नि तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला त्यांच्या समोर.
तेरा चौदा वर्षांच्या सुधीरनं सरपंचाच्या मुलाला परीक्षेत कॉपी करताना पाहिलं होतं. वर्गावर देखरेख करणार्‍या दोन मास्तरांमधे एक काळे गुरुजीही होते. प्रकरण दाबायचा खूप प्रयत्न झाला पण गुरुजी ठामपणे सुधीरच्या मागे उभे राहिले होते. वर्गातले दुसरे मास्तरही फ़िरले. पण सुधीर अन काळे गुरुजी दोघांच्या खंबीरपणानं शेवटी तो मुलगा कबूल झाला होता. प्रकरण दाबायचा प्रयत्न केल्याबद्दल सरपंचांनीही माफ़ी मागितली होती अखेरीस. काळे गुरुजींची सत्यप्रियता नि आदर्शवादी वृत्ती यांची जन्मभरासाठी सुधीरच्या मनावर छाप पडली होती.

आत्यंतिक गरिबीतून वर येऊन, कष्टानं आय पी एस होऊन, आज एक जबाबदार पोलीस अधिकारी म्हणून सुधीर कामतांचा लौकिक होता. त्यांच्या सारखे अधिकारी पोलीस दलात क्वचितच सापडत. आपल्या यशाचं श्रेय ते मनातल्या मनात नेहमीच काळे गुरुजींना अर्पण करीत असत.

पण आज त्याच गुरुजींनी त्यांना पेचात टाकलं होतं.

गुरुजींनी सारी गोष्ट नीट उलगडून सांगितल्यावर त्यांच्या मुलाच्या निरपराधीपणाची कामतांना थोडी जाणीव झाली. पण नीट पडताळणी केल्याशिवाय ते कोणावरही विश्वास ठेवीत नसत.

'मी बघतो सर. नक्की वचन नाही देता येत मला. पण बघू या काय करता येईल ते...'
गुरुजींच्या खांद्यावर थोपटून त्यांनी सांगितलं.

घरी परत आल्यावर त्यांनी बायकोला तीन चार दिवसांसाठी बाहेरगावी जाणार असल्याचं सांगितलं. सारी तयारी करून ते गावी दाखल झाले.
तिथे पोचल्यावर अन पोलीसी खाक्यानं चौकशी केल्यावर मास्तरांच्या मुलाच्या निरपराधीपणाची त्यांना खात्रीच पटली.
शाळेत मोठ्या प्रमाणावर पैशाचा अपहार सुरू होता. त्याला विरोध केल्यानं हा खोटा आळ आणला होता त्याच्या हितशत्रूंनी. सगळी चौकशी करून ते रात्री गेस्ट हाऊसवर आले.

झोप येणं शक्यच नव्हतं. मनात विचारांचं थैमान सुरू होतं. आपलं वजन वापरून, विरुद्ध बाजूला समजावून, धमकावून त्यांना सुरेशची सहज सुटका करता आली असती. अशी प्रकरणं दाबताना त्यांनी कित्येकदा आपल्या पोलीस खात्यातल्या मित्रांना पाहिलं होतं. पण मग त्यांच्या सार्‍या आदर्शांना तडे गेले असते. दुसर्‍याच्या हद्दीतल्या तपासात ते कधी ढवळाढवळ करीत नसत. अन निर्दोष असला तरी त्यांच्याकडे वर वर्णी लावून सुरेश सुटणं हा त्यांच्या गणवेशाला लागलेला डाग ठरणार होता. कोणाला कळलं नसतं तरी त्यांच्या मनाला ती गोष्ट खात राहणार होती. तसं न करावं तर एक निष्पाप आयुष्य तर उध्वस्त होणार होतंच, पण गुरुजींनाही त्याची झळ पोचणार होती. त्या मानी माणसावर जीव द्यायचीच पाळी आली असती. सध्या सुरेश नुसता पोलीस ठाण्यात कैदेत होता, पण विरुद्ध बाजूचे लोक सारं प्रकरण चव्हाट्यावर आणून सुरेशला आयुष्यातनं उठवायची धमकी देतच होते.

रात्रभर विचार करून शेवटी त्यांच्या मनानं निर्णय घेतला. सकाळी उठून ते पोलीस स्टेशनमधे आले. विरुद्ध बाजूवर दडपण आणून त्यांनी सारं प्रकरण निकालात काढलं. त्यांच्या भेदक नजरेपुढे अन कडक चौकशीपुढे विकत घेतलेले सारे लोक ढेपाळले. निर्दोष सुटून सुरेश घरी आला नि दोन्ही मुलं त्याच्या गळ्यात पडली तेव्हा कामतांची जीप धुरळा उडवत शहराच्या दिशेने जात होती. काळे गुरुजींच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.

गावातलं सारं बस्तान दुसरीकडे हलवायचं सुरेश अन गुरुजींनी आधीच ठरवलं होतं. त्याप्रमाणे दुसर्‍या गावात नोकरी घेऊन, सारं सुस्थित झालं तसे सुरेश अन गुरुजी कामतांना भेटून पुन्हा एकदा धन्यवाद द्यायला त्यांच्या ऑफ़िसमधे गेले. दारावर दुसरंच नाव बघून ते दोघं बुचकळ्यातच पडले.

कामत साहेबांनी राजीनामा दिलाय नि उद्या परवा ते सरकारी निवासस्थान सोडणार आहेत हे मोरे कडून कळल्यावर धावपळ करतच ते कामतांच्या घरी पोचले.

नमस्काराला वाकलेल्या कामतांना बघून गुरुजींना अश्रू आवरेनात.

'फ़ार मोठी गुरुदक्षिणा द्यावी लागली रे तुला... हे सारं माझ्यामुळे घडलं...'

पण कामत शांत होते.

'नाही सर.... आपण वाईट वाटून घेऊ नका. नोकरी मी स्वतः च्या इच्छेने सोडली आहे. माझ्या आदर्शांना न शोभेसं वर्तन घडलं माझ्या हातून.... म्हणून. शिवाय या नोकरीत असे अनेक प्रसंग येतात सर. ते मानवणार नव्हतंच माझ्या मनाला. अन गुरुदक्षिणेचं म्हणाल, तर मी सुरेशची सुटका केली ही खरी गुरुदक्षिणा नाहीच. उलट वयपरत्वे.. .. परिस्थितीसमोर आपण हतबल झालात.. पण आपण दिलेल्या आदर्शांचा वारसा मी पुढे सुरू ठेवू शकलो, हीच आपली खरी गुरुदक्षिणा आहे सर... नाही का? ...'
'अन माझी काळजी करू नका सर. एका सिक्युरिटी कंपनीत मी मुख्य पदावर नोकरी पत्करलीय. तेव्हा पुढच्या नवीन आयुष्यासाठी... या प्रवासासाठी मला आशिर्वाद द्या सर..'

कामतांच्या चेहर्‍यावरचे कृतार्थतेचे भाव मोलाचे, की आपल्या वडिलांच्या डोळ्यातले समाधानाचे अश्रू जास्त मोलाचे... हे सुरेशला कळेचना.

समाप्त.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'चव्हाट्यावर' हा शब्द चुकीचा टाइप केलाय. संयोजक, दुरुस्ती करता येईल का प्लीज?

सु.मॉ.,कथासूत्र आणि मांडणी दोन्ही आवड्लं.. छान आहे कथा...

हाय supermom,

सहीच आहे कथा!!

सुपरमॉम,
कथा फारच छान लिहिलित... प्रतिसाद उशिरा देत आहे त्याबद्दल सॉरी.