ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग १५

Submitted by बेफ़िकीर on 8 October, 2010 - 05:28

डोंगराच्या कड्यावरून खाली कोसळणारे पाण्याचे चार प्रवाह कोसळताना एका धबधब्यात मिसळणे व काही अंतर तसेच मिसळून पुढे वाहणे व आणखीन पुढे गेल्यानंतर आपापल्या मार्गात आलेल्या दगड धोंड्यांमुळे किंवा अडथळ्यांमुळे पुन्हा दिशा वेगवेगळ्या होणे....

.... अशी मैत्री होती रूम नंबर २१४ मधली!

मिसळण्याआधी न मिसळण्याचा प्रयत्न करता करता, मिसळल्यावर मात्र एकमेकांना एकमेकांचा रंग देऊन आणि एकमेकांचा रंग घेऊन वाहत होते आणि काही दिवसांनी वेगवेगळे होताना मात्र स्वतःच्या रंगात आमुलाग्र बदल झाल्याचे अनुभवत वेगळे होणार होते .... आणि मग.... काही विशिष्ट कारणाने पुन्हा एकत्र येणार होते...

सतत समोर अनुभवता येणारे मुक्त स्वातंत्र्य, तारुण्याचा दैदीप्यमान उत्सव आणि आजवरच्या संस्कारांमधला फोलपणा पदोपदी जाणवून देणारे होस्टेलचे जीवन... या तिन्हीमुळे आत्मानंद आधीपेक्षा खूपच वेगळा झाला होता. त्याला आता दारू पिण्यात भूषण वाटू लागले होते. दारूमुळे येणारी तरलता, झिंग आता रोजच हवीशी वाटू लागली होती. आई वडिलांचे विचार बुरसटलेले वाटू लागले होते. एक अहंगंड मनावर पसरू लागला होता. मी परिक्षेत मार्क्स मिळवतोय ना? मग बाकी मी काय करतोय याच्याशी कुणाला काय घेणेदेणे? हा अहंगंड व्यक्त होत नसला तरी आतल्या आत फोफावू लागला होता. अलका देवने मैत्री कमी केल्यापासून स्त्रीबाबतची त्याची भूमिका किंचित बदलली होती. मुली काय बघतात, मुलांमधील कोणत्या घटकांचा विचार अधिक करतात याबाबतच्या आधीच्या विचारांना सुरुंग लागून आता नवे विचार स्थानापन्न झाले होते मेंदूत! आता त्याच्या दृष्टीने कॉलेजमधील मुली या अविश्वासार्ह ठरू लागल्या होत्या. आधी त्याला वाटायचे की कोणतीही मुलगी बघताना मुलाचे मन, त्याचे विचार, त्याच्या घरचे वातावरण, एकंदर आर्थिक परिस्थिती, मग व्यक्तिमत्व आणि शेवटी आकर्षण अशा क्रमाने विचार करत असावी. तसेही, शिकायला आलेल्या मुलांमध्ये व मुलींमध्ये फरक असणार हेही त्याला ठाऊक होतेच! मुले जशी वेळ मिळाला की फक्त मुलींबाबत बोलतात तितक्या काही मुली बोलत नसणार एकमेकींमध्ये! त्यांच्यावर घरच्यांचे अधिक प्रेशर असणार, वागण्याबाबत त्या नेहमीच अधिक काळजी घेणार हे त्यालाही माहीत होते. पण अलका देवशी इतके चांगले वागून, तिच्या वडिलांच्या आजारपणात इतकी मदत करूनही आज ती एक शब्दही बोलायला तयार नसते यात आपण केवळ तिच्याकडे आकृष्ट झालो हे जाणवल्यामुळे आलेला 'काळजी' हा घटक आहे याचा त्याला राग येत होता. मग तुम्ही काय बघता मुलांमध्ये? फक्त पर्सनॅलिटी? ठीक आहे.. तो महत्वाचा घटक आहेच. पण आज जर मी तुझ्या घरी थेट येऊन पोचलो तर तुझे आई वडीळ सुद्धा मला व्यवस्थित वागणूक देतील मी केलेल्या मदतीचे स्मरण ठेवून! पण तू मात्र लांब लांब राहतेस! या वागण्याचा अर्थ काय?

अलका देव हा विचार आत्माने त्यमुळेच मनातून दूर केलेला होता. पण वनदासचे आणि दीपा बोरगेचे प्रेम चांगले सुरू झाले आहे हे पाहून मात्र त्याला वाटायचे. सगळ्याच मुली अशा नसणार! वनदास काही हिरो नव्हता दिसायला. उलट तो ग्रामीण भागातून आलेला होता. याचाच अर्थ अलका देवपेक्षा दीपा बोरगे स्वभावाने अधिक चांगली असणार किंवा अलकाकडे आपण बघताना आपली नजर फारच तिरस्करणीय वाटत असावी.

त्यामुळे आत्मानंदने मुलगी हा विषयच मनातून काढून टाकलेला होता.

मात्र त्या दिवशी नाटेकर काकूंना त्या अवस्थेत पाहिल्यापासून मात्र त्याला या सर्व प्रकरणात भलताच इंटरेस्ट वाटू लागला. एरवी सर्व विषयांवर भरपूर मतप्रदर्शन करणारा आत्मा दारू आणि स्त्री या विषयांबाबत मात्र फारच लाजरा, स्वतःची रहस्ये जपून ठेवणारा असा होता. त्यातच अशोकने रूममधे लावलेल्या चित्रांची आठवण येऊन त्या आठवणीचा परिणाम मनावर होऊ लागला होता. त्या दिवसापासून पुन्हा होस्टेलवर येईपर्यंत आत्मा रोज संध्याकाळी आठला जेवून स्वतःच्या 'कक्षात' बसून राहायचा. नाटेकर काकूंना 'हल्ली शेजारच्यांचा मुलगा आत्मानंद सुट्टीमुळे घरी आलेला आहे आणि आपल्याला त्याने एकदा बघितल्यापासून रोज तो त्या खोलीत अंधार करून आपल्या खिडकीकडे टक लावून बघत असतो' याची सुतराम जाणीव नव्हती. बरेचदा त्या काळजीपुर्वक खिडकी बंद वगैरे करूनच चेंज करायच्या! त्यामुळे आत्मा नाराज झालेला असायचा. पण महिन्याभरात त्याला त्यांचे तसे दर्शन जवळपास आठ वेळा झाले. या सर्वाचा त्याच्या मनावर होणारा परिणाम फार विचित्र होता. त्याला आता विविध घरातील बायका मुली असे काही करताना दिसतील का, दिसू शकतील का या विचाराने हैराण केलेले होते. अंधार पडल्यावर उगीचच एखाद्या इमारतीसमोर तो बराच वेळ उभा राहू लागला होता. नाटेकर काकू असतील पंचेचाळिशीच्या आणि बर्‍याचश्या बेढबच! त्यांची मुलगी नंदिताच जवळजवळ आत्म्याएवढी होती. पण आत्मा बिघडू लागला होता.

मात्र भीतीमुळे संपूर्ण महिन्यात त्याने दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नाही. मात्र यावेळेस घरातून निघताना त्याला दु:ख जरी होत असले तरी एका मोठ्या सुटकेचा आनंदही मनाला व्यापून राहिलेला होता. आजपासून जवळपास सहा महिने रोज पिता येणार होते. मग हळूच संध्याकाळी लेडिज होस्टेलच्या मागच्या बाजूला असलेल्या एका टेकाडावर अंधारात बसून होस्टेलमधल्या खोल्यांमधे असलेल्या मुलींचा हालचाली आरामात निरखता येणार होत्या. आजवर आपल्याला हे सुचलेच कसे नाही हेच त्याला समजत नव्हते. चक्क एक वर्ष फुकट घालवलं आपण!

त्याच वेळेस आत्मानंदच्या घरचे संस्कार, त्याने लावलेला हनुमंताचा फोटो, अशोकला आलेला हार्ट अ‍ॅटॅक आणि दिल्यासारखा माणूसही आई भेटल्यावर प्रचंड बदलणे या घटकांचा परिणाम होऊन वनदासचे सगळे लक्ष आता आई आणि बहिणीच्या सुखाकडे लागले होते. त्याला मात्र घरून निघताना खूप वाईट वाटले होते. वनिताला रोज फोन करण्यासाठी त्याने बजावून तर ठेवलेच होते वर स्वतः आईकडे पैसे मागायच्या ऐवजी स्वतःजवळचेच थोडे पैसे त्याने वनिताला फोन करण्यासाठी देऊन ठेवले होते. निघतानाही आबा त्याच्याशी एक शब्द बोलला नव्हता. नुसता रागारागाने पाहात होता. पण का कुणास ठाऊक, वन्याच्या उग्र अवताराला तो घाबरलेला मात्र होता. वन्याने मात्र निघताना त्यालाही नमस्कार केला.

वन्याने मात्र महिन्याभरात चार, पाच वेळा दारू प्यायली होती. पण त्या सर्व वेळेस तो त्याच्या वाडीतील मित्रांबरोबर एकाच्या शेतावरच राहिलेला होता. घरी काहीच समजले नव्हते.

आणि इकडे दिलीप ऊर्फ धनंजय राऊतचे मन मात्र पूर्णपणे सुरेखाच्या विचारांनी व्यापलेले होते. ती परत कोल्हापूरला आलीच नाही. पण दिल्याने तिला कित्येक फोन करून यायचा आग्रह केला होता. तिने हसत हसत तो नाकारला होता. त्यामुळे काही लाडिक रुसवे निर्माण झाले होते. आणि या सर्वाचा परिणाम होऊन दिल्या आता एक गृहस्थ असल्याप्रमाणे वागू लागला होता. कित्येक वर्षांनंतर त्याला स्वतःच्या घरात आईकडून अतोनात प्रेम मिळाले होते. गावातील कित्येक जण त्याला भेटायला येन गेले होते. लग्न ठरल्यामुळे शुभेच्छांचा वर्षाव होत होता. लग्न मात्र दिल्या तिसर्‍या वर्षाला गेल्यावर करायचे ठरले होते. तोवर सुरेखाने कोर्स करावा असा विचारही ठरत आला होता. सुरेखा पुढच्याही वर्षी कॉलेजलाच असेल हे रहस्य अजून घरात कुणाला माहीतच नव्हते. आणि यावेळेस दिल्या एक बुलेट घेऊनच होस्टेलला परत आला होता. आता दर वेळेस निशिकान्तला त्याची टू व्हीलर उधारीत मागण्याची जरूर भासणार नव्हती. दिल्याच्या राहणीत सभ्य फरक पडले होते. त्याचे कपडे आता जंटलमन टाईप होऊ लागले होते. रो़आ दाढी करू लागला होता. मात्र, दिल्याने सुरेखाला दिलेली शपथ पूर्णपणे पाळलेली नव्हती. त्याने किमान दहा बारा वेळा तरी दारू प्यायली होती महिन्याभरात! पण तोही दर वेळेला मित्रांकडेच राहायचा!

अशोक पवार! सगळ्यात मोठे वादळ मात्र पवारांकडे झाले होते. आधी अशोकने काही सांगीतलेच नाही. मग एक दिवस तो आणि वहिनी घरात दोघेच असताना वहिनीने थट्टा सुरू केली. 'काय, कुणी मुलगी वगैरे आवडली की नाह' यावरून! एक मात्र झाले होते. या भेटीत अशोक पवारला स्वतःच्या आधीच्या समजुतींना पूर्ण रद्द करावे लागले होते. भावाने तर अशोक परत आला म्हणून एक छोटेखानी फंक्शनही केले होते. दादाबद्दलची सर्व मते अशोकला बदलायला लागली होती. त्याचा परिणाम म्हणून अशोक महिन्यात एकदाही प्यायला नव्हता. पण.......

..... पण तो तीन वेळा निपाणीला मात्र गेला होता. उगाचच! रशिदाचा फक्त पत्ताच त्याला माहीत होता. तिच्या घरापासून खूप लांब अंतरावर तो अर्धा अर्धा तास उभा राहायचा. तिला माहीतच नाही. आणि त्याचा आनंद इतकाच की ती दिसली तरी बास! आणि एकदा झाला की तो प्रकार! तिसर्‍या वेळेला!

रशिदा घरातून तिच्या गॅलरीत केस विंचरायला आली अन सहज नजर टाकली तर खूप लांबवर... एक माणूस टक लावून आपल्याकडे पाहतोय! ... अशोक???????

खूप वेळ रशिदा पाहात होती. तोही पाहात होता. दोघांनाही समजत होते की आपण एकमेकांकडे बघतोय! आणि मग अचानक... अशोकने इतर कुणाला समजणार नाही अशा पद्धतीने हात हलवला....

रशिदाने दचकून इकडे तिकडे पाहिले. कुणीच पाहात नव्हते असे पाहून... तिने हळूच... मनगटापासून हाताचा पंजा हलवून 'हाय' असा मेसेज पाठवला..

आणि मग.. सगळंच संपायची वेळ आली. कारण तिच्याकडे फोन नाही. अशोककडे फोन होता पण त्याचा नंबर रशिदाकडे असूनही ती फोन करत नव्हती. मग आता करायचं काय? मुहल्ला मुसलमान लोकांचा! आपण 'कुणाकडे तरी आलोय' असं दाखवूनही सहज चक्कर टाकली अशा अर्थाने जाता येणे शक्य नाही.

बिचारा होऊन अशोक परत निघाला आणि घरी पोचून दोन तास झाल्यावर आला की फोन! आधी दादाने घेतला. अशोकसाठी आहे कळल्यावर अशोकला दिला. पण दादाला कसलीच शंका आली नाही. अशोकने फोन घेतला तर....

रशिदा - .... रशिदा बोल रही हूं...
अशोक - ... अरे?????
रशिदा - .. आप... क्यूं आये थे...???
अशोक - ......

आता काय बोलायचं? घरात असताना फोनवर तिला कसं सांगायचं की सहज आपलं, तुला बघायला म्हणून आलो होतो.

अशोक - नही अ‍ॅक्च्युअली वहांसे गुजर रहा था.... पहले भी आया था मै दो बार...
रशिदा - ......पूना कब जायेंगे आप??
अशोक - अगले मंगलवार...आप...??
रशिदा - मै उसके तीन चार दिन बाद... होस्टेलपे रहते है क्या आप..
अशोक - .. हां...
रशिदा - ठीक है फिर...

आता आली का वेळ फोन ठेवून द्यायची? दादा घरात असताना कसं सांगणार की बये मधून अधून मला फोन करत जा, तुझं फक्त दर्शन घ्यायला मी इतक्या लांब येत होतो.

अशोकने विचार करून वाक्य टाकले.

अशोक - वो सारसबाग है ना?? उसके बाहर काफीसारे स्टॉल्स होते है भेलवेल के?? है ना?? उसमेसे एक आनंद भेळ करके है... वहां मिलते है फिर... अगले इतवार को.. शामके छे बजे... ठीक है??

रशिदाने क्षणभरच विचार केला. मुली वेड्या नसतात. ज्या पद्धतीने अशोक खूप लांबून का होईना पण तिच्याकडे टक लावून बघत होता त्यावरून तो आपल्यालाच पाहायला आला आहे हे तिला कधीच समजले होते. आजवर तिने त्याला फोन केला नव्हता कारण जाणीवपुर्वक ती स्वतःच्या मनातून त्याचा विचार काढायचा प्रयत्न करत होती. पण आज एकदम अशोक असा उभा होता पाहून तिच्या मनात वादळे निर्माण झाली होती. त्यात तो आजवर आणखीन दोन वेळा येऊन गेला होता हे ऐकून तर ती फारच गंभीर झाली होती. म्हणूनच आज तिने त्याला सरळ फोन केला होता बाहेरून! आणि त्याने पुढचा मागचा विचार न करता सरळ बागेपाशी भेटायला बोलवले म्हंटल्यावर रशिदा अक्षरशः विरघळलीच होती फोनवर! तरीही विचारपुर्वक तिने फक्त 'हं' असे म्हंटले.

अशोकला त्या 'हं' मध्ये खात्रीलायक होकार जाणवत नव्हता. त्यामुळे त्याने आणखीन एक वाक्य टाकले.

अशोक - और अगर आप नही आ सकती है तो आपका पता बताईये.. मै आकर सारी किताबे देकर जाऊंगा.. इतवार के दिन मुझे छुट्टी रहती है...

रशिदा - नही नही... मै आजाउंगी!
अशोक - .... ओके...
रशिदा - रख्खूं??
अशोक - ... हं...
रशिदा - ...... बाSSSSय...

तिचा तो 'बाय' या शब्दाचा अगदी प्रेमभरला आणि खास अशोकसाठी असल्यासारखा कुजबुजणारा आवाज ऐकून अशोक पवारला खात्री पटली...

आग दोनो तरफ...... बराबर लगी है.....

आणि आज घरात दुसरे कोणी नसताना वहिनी थट्टा करून विचारते....

"काय अशोक... कुणी आवडली की नाही मुलगी कॉलेजमधली..??"

आधी जाडजुड अशोक जरा लाजलाच! पण मग त्याने आयुष्यातील मोठा बावळटपणा केला.

दादा आणि बाबा यांचे टेन्शन असल्यामुळे तो जे बोलत नव्हता... ते त्याने वहिनीने बराच वेळ थट्टा केल्यावर सरळ सांगून टाकले...

रशिदा अख्तर... रशिदा बेगम! राहणार निपाणी..... परित्यक्ता आहे... वय पंचवीस... तिचाच फोन होता परवा!

डेंजर टेन्शन!

पवार कुटुंबातील सुनेला भयानक टेन्शन आलं ते वाक्य ऐकून!

वहिनी - डोकं ठिकाणावर आहे का?
अशोक - ..... मला वाटलंच तुम्ही असं म्हणणार..
वहिनी - वाटलंच म्हणजे?? ... वेड लागलंय का वेड??
अशोक - वहिनी ... जरा शांतपणे विचार कराल का? ऐकल्या ऐकल्या रागावता कसल्या?
वहिनी - रागावता म्हणजे?? तुझ्या दादांना सासुरवाडीला तोंड दाखवता येईल का??
अशोक - तिकडे तोंड दाखवण्याचा काय संबंध??
वहिनी - काय संबंध?? तुला अजून काही कळत नाही.. तुझं हे वय नाही आहे असलं काही करण्याचं!
अशोक - थट्टा तुम्हीच करत होतात ना? मग खरं सांगीतलं तर चिडता काय??
वहिनी - दादांना सांगीतलंयस का?
अशोक - छे?? काहीतरी काय??
वहिनी - बाबांनाही माहीत नसणार....
अशोक - तुम्हाला पहिल्यांदा सांगतोय..
वहिनी - मग आता ऐक! हे डोक्यातून काढून टाक... पुन्हा निपाणीला जायचं नाही...
अशोक - वहिनी... तुम्ही हे सगळं विचार न करता बोलताय...
वहिनी - तुला अक्कल नाहीये अजून... मी सांगते तेच झालं पाहिजे... तिचा विषय संपला..
अशोक - असा कसा संपेल विषय..??
वहिनी - मग काहीही कर... मला सांगत जाऊ नकोस.. आणि हे होणार नाही हे आत्ताच लिहून ठेव....
अशोक - दादाला तुम्ही सांगावत म्हणून मी तुम्हाला सांगीतलं तर तुम्हीच उलटलात..
वहिनी - उलटले?? डोक जागेवर नाहीये तुझं... उलटले काय?? तुझ्याच भल्याचंय हे...
अशोक - पण काय प्रॉब्लेम आहे...??
वहिनी - एक प्रॉब्लेम असला तर बोलायचं ना?? हजार प्रॉब्लेम आहेत...

वहिनी आपल्या बाजूची नाही हे कळल्यावर बिचारा निराश झाला. आणि वहिनीने पुढचा घोळ घालण्याची जबाबदारी छान पार पाडली. तिने आल्याआल्या नवर्‍याला कुजबुजत सांगून टाकलं! तुमचा धाकटा भाऊ मुसलमान बाई आणणारे घरात... नवर्‍याने सोडलेली... आजच्या आज निकाल लागला पाहिजे या प्रकाराचा!

दादा आधीच भडक डोक्याचा! घरात आपले वडील असताना आपण आदळआपट करण्याची गरज नाही हे त्याला समजत नव्हतं! त्याने काढला आवाज..

दादा - अशोक... इकडे ये... तुझी वहिनी काय सांगतीय?? कोण आहे ही मुलगी?? आं?? परस्पर काहीही चाललेलं असतं की काय तुझं??

बाबा धावत हॉलमधे आले.

बाबा - काय रे?? काय झालं??
दादा - मुलगी ठरवून ठेवलीय गाढवाने...
बाबा - म्हणजे??
दादा - मुलगी मुलगी... लग्न करायला मुलगी...
बाबा - पण लग्नाचा आत्ता संबंध काय??
दादा - ते याला समजायला पाहिजे ना पण?
बाबा - कोण मुलगीय??
दादा - मुलगी बिलगी नाहीये ती... परित्यक्ताय परित्यक्ता... मुसलमान आहे.. तीही याच्यापेक्षा बरीच मोठी!

झालं! व्हायचा तो स्फोट पूर्णपणे पार पडला.

आणि प्रचंड वादावादीनंतर पाच दिवसांनी पुन्हा पुण्याला निघालेल्या अशोकने घरात सगळ्यांना निक्षून सांगीतले.

"रशिदा आणि मी एकमेकांचे व्हायचे ठरवले आहे... मग काहीही होवो"

धसका घेतलेल्या वडिलांनी आता बोलणेच सोडले होते. दादा मात्र आरडाओरडा करत होता. वहिनी अशोकला झापत होती. आणि अशोक पवार कुणाचा एक शब्द अंगालाही न लागू देता पुण्याच्या बसमधे बसला होता.

===============================================

अगंगंगंगंगंगं!

कसली ती पार्टी!

झाली रूममध्येच! पण नुसता धुमाकुळ झाला. दिड खंबा होता दिड, नंबर वन व्हिस्कीचा! आणि त्यातला अर्धा खंबा संपलेला असतानाच जीभा जड होणे, तरल तरल वाटणे आणि मन मोकळे करावेसे वाटायला लागणे हे प्रकार सुरू झालेले होते.

दिल्या - आत्म्या... बापाच्या घरी गेल्यावर दोन घोट मारायचास की नाय??
आत्मा - छे हो... कसं शक्यंय??
वनदास - मी तर बापालाच झापला यावेळी..

वनदासचा सगळा किस्सा ऐकून झाल्यावर दिल्या म्हणाला..

दिल्या - तुम्हाला बारक्या सारक्या पोरांना खरं म्हणजे काही सांगायला नको...
अशोक - इथे कोण बे भXX बारकंय?? जे बकायचंय ते बक पहिला...
दिल्या - ऐक... किस जो असतो ना किस?? तो घेण्यातील मजा काही औरच असते तिच्यायला..
अशोक - दिल्या XXXXX ... बंडला सोडतोयस तू... हे कधी झालं??
दिल्या - अशाच एका बेसावध क्षणी...
अशोक - वन्या.. तुझी भाषा बोलायला शिकलंय ब्येनं... दिल्या ... आट्या टाकतोयस ना?
दिल्या - आट्या?? साल्यांनो तुम्हाला एका मित्राची भौतीक प्रगती बघवत नाही हेच खरं....
आत्मा - यांची भाषा आता माझ्यासारखी व्हायला लागलीय...
वनदास - तू गप रे जरा... दिल्या... हिम्मत असती तर मीच कोचा केला असता कोचा..
दिल्या - हिम्मत?? हा शब्द तुझ्यासारख्या उंदराला शोभत नाही...
वनदास - नाही ते ठीक आहे.. पण तू असा किस घेतोसच कसा काय मधेच??
दिल्या - मधेच म्हणजे??
वनदास - अरे लग्न बिग्नं नको का व्हायला...??
दिल्या - या फुटकळ कल्पना अहमदनगरमधे चालत असतील..
अशोक - दिल्या... नेमकं काय झालं ते सांग....
दिल्या - त्या म्हातार्‍याचं करडू भर पावसात हरवलं...

दिल्याचा संपूर्ण 'किस्'सा ऐकून झाला तेव्हा प्रत्येक जण स्वप्नाळू डोळ्यांनी आढ्याकडे बघत होता. एकेक घोट घेत होता. जणू आपण स्वतःच कुणाचातरी किस घेतलेला आहे असे वाटून घेत होता. पण आत्मा गंभीर झालेला होता.

आत्मा - किस म्हणजे... तुम्ही चुंबन घेतलंत का??

तिघांनाही आत्ता आत्मानंदला लाथाबुक्क्यांनी तुडवून काढावासा वाटत असूनही ते शांत होते.

दिल्या - होय... चुंबनच घेतलं...
अशोक - दिल्या... जरा नेमकं डिटेल्डमधे सांग तू...
दिल्या - काय??
अशोक - किस घेताना काय काय प्रक्रिया होतात..
दिल्या - हरामखोर तुमची वहिनी आहे ती...
अशोक - नाय नाय.. म्हणजे.. एक आम किस गृहीत धरला.... तर काय काय प्रक्रिया होतात..
दिल्या - आम म्हणजे?
अशोक - म्हणजे कुणीही कुणाचाही घेतलेला...
दिल्या - ते मी कसं सांगणार बे??
अशोक - आपल्या सगळ्यात वरिष्ठ आणि अनुभवी तूच आहेस..
दिल्या - मला असं सलग नीट सांगता यायचं नाय...
अशोक - तसं सांगूच नकोस... मी तुला सुरुवात करून देतो..
दिल्या - हां.. दे बरं करून..??
अशोक - म्हणजे वहिनी अशा तुझ्या जवळ आल्या...
दिल्या - मी ओढली जवळ... ती कसली येतीय...
आत्मा - हे समाजातील एका घटकाचं शोषण आहे..
दिल्या - वन्या... हा आत्मा उद्या तुला शरीरात आत्मा नसलेल्या अवस्थेत सापडेल मधे बोलला तर..
वनदास - ए आत्म्या... मधेमधे बकू नकोस..
अशोक - रिझल्ट एकंच आहे ना शेवटी? मग तू काय केलंस??
दिल्या - मग मी आणि तिने एकमेकांकडे पाहिलं..
अशोक - ते माहितीय! तुम्ही काय बेळगाव सीमा प्रश्नावर बोलणार काय? पुढे काय झालं??
दिल्या - अश्क्या.. तुझी लायकी नाही एका निर्मळ प्रेमातील काही नाजूक प्रसंग ऐकण्याची..
अशोक - नसुदेत.. तू बोल.. तुझी आहे ना लायकी??
दिल्या - मग आम्ही आणखीन जवळ आलो...
वनदास - अरे बाबा पूर्ण जवळ आल्यावर काय झाले ते सांग...
दिल्या - किस घेतला...

अशोक उठला अन त्याने दिल्याला दोन चार फटके लावले. ते सहन करून दिल्याने दिला त्याला ढकलून! होता तसाच मटकन खाली बसला अशोक! मग दोन चार ठेवणीतल्या शिव्या देऊन म्हणाला..

अशोक - ह्याचं नमनाला घडाभर! अरे किस घेताना काय वाटलं ते विचारतोय..
दिल्या - मस्त वाटलं...
अशोक - मस्त म्हणजे??
दिल्या - मस्त म्हणजे... खूप मऊ.. रेशमी... मखमली.. उबदार... गोड... आश्वासक ..हिंसक .. असं कायसं..
अशोक - हिंसक????? तिच्यायला किस घेतोय का गॅन्गवॉर करतोय??
वनदास - एक एक फॅक्टर नीट सांग दिल्या... आश्वासक म्हणजे काय??
दिल्या - म्हणजे हे ओठ.. हे विश्व लयाला जाईपर्यंत असेच तुझ्या ओठात असतील अशी एक खात्री..
अशोक - घंट्याचं विश्वं... आधी हिंसक म्हणजे काय ते सांग...
दिल्या - हिंसक म्हणजे असं... म्हणजे.. असं... आपलं ते...
अशोक - अरे काय ?? असं तसं काय करतो??
दिल्या - म्हणजे असं... चावून खाऊन टाकावं असं काहीतरी...
आत्मा - हे सगळं अश्लील, बीभत्स आणि मानवी संस्कृतीला तडा देणारं आहे...
दिल्या - तुझ्या आई वडिलांनी हे तडे दिले म्हणूनच आज तू इथे दारू पितोयस...
आत्मा - माझी गोष्ट वेगळी आहे...
दिल्या - का?? तू कशाला तडे देतोस??
आत्मा - मी तडे देत नाही... मला तडे जातात...
अशोक - वन्या.. लेका गेल्या अख्या वर्षात हे आत्मं ल्येकाचं इतकं भारी वाक्य बोललं नाय बघ..
वनदास - आत्म्या.. तुला तडे जातात म्हणजे काय??
आत्मा - म्हणजे.. माझ्या गुहीतांना.. माझ्या विचारांना... संस्कृतीला.. अपेक्षांना...
वनदास - नीट बोलला नाहीस तर एकच मोठा तडा जाईल तुला...
आत्मा - नाटेकर काकू...
वनदास - नाटेक........ काय????
अशोक - कोण नाटेकर काकू???
आत्मा - आमच्या सख्ख्या शेजारीण बाई..
अशोक - आत्म्या...बरा आहेस का??
आत्मा - पूर्ण शुद्धीत बोलतोय मी...
दिल्या - काय केलंस बे तू??
आत्मा - मी?? मी कसलं काय करणार?? ...... ..... त्यांनीच केलं.... करायचं ते.....
वनदास - ... दिल्या.... अरे हा गेला कामातून..
अशोक - ... काय केलं त्यांनी..????
आत्मा - सरळ आपली वस्त्रे उतरवून पलंगावर फेकून दिली.....

ताडकन अशोक उभा राहिला. दिल्या आणि वन्या डोळे विस्फारून आत्म्याकडे बघू लागले.

अशोक - घरी कुणी नव्हतं??
आत्मा - होते ना.. आई, बाबा, त्रिवेणी, आजी, आजोबा...
अशोक - मग???
आत्मा - मग काय??
अशोक - मग असं कसं केलं त्यांनी ???
आत्मा - कसं म्हणजे काय??? दिवसभराची वस्त्रे उतरवून त्यांनी घरगुती वस्त्रे परिधान केली...
अशोक - म्हणजे??? त्या कुठे होत्या??
आत्मा - त्यांच्या घरी...

'नाटेकर काकू स्वतःच्या घरी असणे व त्यांनी स्वतःच्या घरी कपडे बदलणे' यात आपण मार खाण्यासारखं काय आहे ते आत्म्याला समजेना!

आत्मा - का?? का मारलंत या निष्पाप मनाच्या मला..??? का असे अत्याचार करता?? का हे शोषण??
अशोक - का मारलं?? तिच्यायला सांगतोस कसा?? जश्या काही त्या तुझ्याकडे आल्या अन असं केलं..
आत्मा - असं कसं करतील त्या??
वनदास - सुंदर आहेत का रे??
आत्मा - नाटेकर काकू??? .... आजवर नाही वाटायच्या.. आता वाटू लागल्या आहेत..
दिल्या - वय कितीय??
आत्मा - एकोणीस लागेल अता..
दिल्या - त्या बाईचं..
आत्मा - त्यांच वय?? असेल?? चाळीस..
वन्या - अन तू कुठे होतास??
आत्मा - माझ्यासाठी राखीव असलेल्या कक्षात..
अशोक - अन त्या?
आत्मा - त्यांच्या??
अशोक - अन खिडकी उघडी...???
आत्मा - सताड...
अशोक - दिल्या... हाही पुड्या सोडतोय...
दिल्या - हाही म्हणजे?? आणखीन कुणी सोडल्या??
अशोक - आत्म्या.. ल्येका त्यांनी तुला पाहिलं नाही??
आत्मा - माझ लक्ष त्यांच्या डोळ्यांकडे नव्हतंच...
वनदास - मग?? .. मग कुठे होतं???
अशोक - केव्हा झालं हे??
आत्मा - रोज व्हायचं.. मला आठ वेळाच दिसलं...
अशोक - आठ वेळा??? लेका नाही तो नाद लागेल तुला.. मार खायच्या गप्पायत या...
आत्मा - मी माझ्या कक्षातून जे दिसेल ते बघणारच ना??
दिल्या - तू परत खोलीला कक्ष म्हणालास तर पक्ष बदलावा लागेल तुला जेन्ट्स होस्टेलचा..
आत्मा - हे पुन्हा चिडलेत...
वनदास - तू जरा डिटेल्ड सांग...
आत्मा - छे छे! आईसारख्या आहेत त्या...
अशोक - आता मात्र खराखुरा मार खाशील.. आईसारख्या आहेत तर खिडकी का नाही बे बंद केली ??
आत्मा - आवाज आला असता ना खिडकी बंद करण्याचा...
वनदास - हां! आणि परत ती बाई दिसली नसती...
आत्मा - तुम्ही फारच खोलात शिरता....
वनदास - तुला साल्या स्वतःला वय बिय समजत नाही अन आम्हाला बोलतो होय??
अशोक - वन्या... खर्‍या प्रेमात वयाचा प्रश्न येत नाही...

हे वाक्य बोलताना अशोक खाली बसत होता व शुन्यात पाहू लागला होता. पण आत्म्याला तो हीन आरोप सहन झाला नाही.

आत्मा - मी ?? त्यांच्यावर मी कसं खरं प्रेम करीन?? तुमच्या जिभेला काही हाड??
अशोक - तुझं नाही चाललेलं...

दिल्या आणि वन्याने अशोककडे नीट नजर लावून पाहिलं!

दिल्या - मग कुणाचं चाललंय बे??
अशोक - काही नाही...
वनदास - अश्क्या.. नीट बोल..
अशोक - अरे कसलं काय??... एक पुस्तकी वाक्य आहे ते...

यावर जराशी शांतता पसरतीय तोवर अशोक म्हणाला...

अशोक - खर्‍या प्रेमात धर्म, वय आणि सामाजिक किंवा कौटुंबिक अंतरे मध्ये येत नाहीत..
आत्मा - फार सुंदर विधान केलंत आपण... मला कांदा द्या...

पण दिल्या आणि वन्याला संशय आला होता.

दिल्या - अश्क्या... कोण आहे सांग...

"रशिदा बेगम... राहणार निपाणी.. वय पंचवीस... परित्यक्ता..."

हे ऐकल्यावर रूममधे पसरलेला एक प्रदीर्घ सन्नाटा संपवण्यासाठी आत्मानंद म्हणाला...

आत्मा - प्रेम असावं तर असं... इतकी अंतरे असतानाही बसतं ते प्रेम खरं प्रेम...

अशोकने पहिल्यांदाच आत्म्याकडे कृतज्ञ नजरेने पाहिले. दिल्या आणि वन्या मात्र गंभीर झालेले होते.

वन्या - अश्क्या... ल्येका वाईट लफडंय रे हे??
अशोक - का??
वन्या - कुठे भेटलात तुम्ही??

अशोकने सगळा किस्सा सांगेपर्यंत दिड खंब्यातील फक्त अर्धा खंबा शिल्लक राहिला होता. किस्सा संपल्यानंतर सगळेच गंभीर झालेले होते. अशोकच्या घरातून प्रचंड विरोध होणे अपेक्षितच होते. मुळात वयातील अंतरच इतके होते की.. आणि अशोकचा अजून लग्नाचा काही संबंधच नव्हता. दिल्या निदान तेवीस वर्षांचा तरी होता. हा वीसच वर्षांचा होता.

वनदास - अशोक... काही म्हण.. पण.. हे सगळं राँग आहे राव...
अशोक - म्हणजे???
वनदास - तू .. मला वाटतं... याच्यात पडू नयेस...
अशोक - ... क्का???
वनदास - अरे... टोटली वेगळे लोक असतो आपण आणि ते...
दिल्या - मलाही तेच म्हणायचंय... म्हणजे प्रेम होऊ शकतं हे मान्यंय... पण...
अशोक - पण काय???
दिल्या - पण एका भेटीत अगदी जन्माची गाठ मारण्यासारखं काही नाही बर का अश्क्या...
अशोक - ते ज्याच्यात्याच्यावर अवलंबून नसणार का??
दिल्या - म्हणजे??
अशोक - आता कित्येक जोडप्यांचे सत्तर वर्ष संसार होऊनही प्रेम नसतेच...
वनदास - हे बघ अश्क्या.. तू उगाच लेक्चर देऊ नको...
अशोक - का पण?? मी मुद्दा मांडला की लेक्चर... अन तुमची मते मात्र योग्य का?
दिल्या - ल्येका डोकं चालंव की जरा.. ती बाई मुस्लिम, परित्यक्ता, तुझ्याहून केवढी मोठी..
अशोक - इथे येताना मला वाटलंवतं.. घरचे करत नसले तरी तुम्ही सपोर्ट कराल...
दिल्या - म्हणजे?? आम्ही काय वाईट पाहतोय??
अशोक - माझं अन तिचं प्रेम आहे... ते मोडायला सांगणं म्हणजे वाईट नाही का??
दिल्या - तुला रविवारी भेटणार आहे ना ती?? तेव्हा तू तिला शेवटचं सांगून टाक.. नाही जमायचं म्हणाव
अशोक - वा रे वा?? म्हणजे तुझ्या आईंना सुरेखाबद्दल मी सांगायचं.. आणि तू माझं मोडणार होय???
दिल्या - यात मोडायचा काय संबंधंय??
अशोक - उद्या जर मी म्हंटलं की तू सुरेखाला सांग.. आपली ही शेवटची भेट म्हणून.. चालेला का?

क्षणात दिल्याचा चेहरा हिंस्त्र झाला.

दिल्या - अश्क्या.. तोंड सांभाळून बोल... आम्ही एका जातीचे, एका धर्माचे आहोत..
अशोक - म्हणून तुमचं प्रेम खरं... आणि आमचं नाय .. आं??
वनदास - काही म्हण अश्क्या.. मला दिल्याचं पटतं..
अशोक - तुला आजपर्यंत त्याचंच पटायचं.. पैसे देतो ना बाटली आणायला..

सण्णकन वनदास उभा राहिला.

वनदास - काय बोललास?? दिल्या दारू पाजतो म्हणून त्याची बाजू घेतोय मी??
अशोक - अरे सोड... रोज संध्याकाळी बघत बसतोस की त्याच्याकडे आशेने...
दिल्या - अश्क्या.. हे सगळं पर्सनल होतंय..
अशोक - माझ पर्सनल मॅटरच आपण बोलतोय.. त्याबाबत तुम्ही काहीही बोललेलं चालतं का??
वनदास - अश्क्या.. शांत हो.. तुला चढलीय..
अशोक - अबे गप?? तुझ्या पाचपट पिणारा आहे मी.. खरं बोलल्यावर दुखलं ना?
वनदास - दिल्या... आईशप्पथ.. याच्यापुढे तुझ्या एका पैशाची दारू मला नको...
अशोक - मला काय घेणंय का देणंय... तुम्ही मला वाटेल ते सल्ले देणार... मी फक्त बोलायचं नाही..

रूम नंबर २१४ मधली पहिलीच भांडणं ही! सगळे आपापला ग्लास घेऊन आपापल्या पलंगावर भण्णपणे बसून पीत होते. कुणीच बोलत नव्हते. दिल्यासुद्धा!

पण आत्मा?? तो बोलणारच....आणि बोलला...

आत्मा - आत्ता जे काय झालं ते सगळे जण विस्मरणार टाका... आपण मतभेद टाळायला हवेत..

कुणाचंच या तुपट बोलण्याकडे लक्ष नव्हतं! जो तो विचार करत होता आपण असे कसे भांडलो???

आत्मा - अशोक हे आपलेच आहेत.. त्यांच्या आयुष्यातील इतक्या महत्वाच्या टप्प्यावर आपण तिघांनी त्यांना जमेल ते सहकार्य करायला हवे....

खाडकन तिन्ही माना आत्म्याकडे वळल्या. दोन चेहर्‍यांवर आश्चर्याची परिसीमा होती आणि एकावर कृतज्ञतेची... तेवढ्यात भरपूर दारू चढलेला आत्मा धीरगंभीरपणे म्हणाला...

"अशोक यांना त्यांचे प्रेम मिळवून देणे... हे उत्पादन अभियांत्रिकीचे द्वितीय वर्ष उत्तीर्ण होण्याइतकंच माझं या वर्षीच कर्तव्य आहे असे मी जाहीर करून पुढे आश्वासन देतो... की अशोक यांना मी स्वतः जमेल ती मदत करणार आहे..."

दिग्मुढ झालेले तीन चेहरे कितीतरी क्षण तसेच असतानाच.....

"वनदास लामखडे कोण आहे??"

एकदम धक्काच बसला.

वनदास - मी.... का??
शिपाई - फोन आहे... कर्जतहून...

वनदास विसरूनच गेला होता. संध्याकाळी सात वाजताच वनिताचा पहिला फोन यायला हवा होता.

आत्ता अकरा वाजता कसा आला??

गेला त्याहून वेगात धावत अन रडतच वन्या रूममधे आला आणि अक्षर न बोलता स्वतःची बॅग आवरू लागला..

आत्मा - काय हो??? ... क्...काय झालं????

"मी गेल्या गेल्या चामड्याने मारलंन माझ्या आईला XXXXने... अ‍ॅडमिट केलीय तिला.."

फक्त डोळ्यांनी जेवढ्या खाणाखुणा झाल्या तेवढ्याच....

रूम नंबर २१४ मधली पाचच मिनिटांपुर्वी झालेली भांडणे... विस्मरणाच्या कप्प्यात पार कुठल्याकुठे टाकून...

रात्री साडे बारा वाजता शिवाजीनगरहून अहमदनगरला चाललेल्या बसमधील कंडक्टरला....अशोक पैसे देऊन सांगत होता....

"चार..अहमदनगर"

गुलमोहर: 

बेफिकीर राग येईल, पण वाचक म्हणून मला हा आणि याआधीचा भाग फिल्मी वाटले.
म्हणजे दिल्या आणि सुरेखाला एकांत मिळण्यासाठी म्हाताऱयाचे करडू हरविणे हा प्रसंग अनेकदा दिसतो. तसेच आता अशोकचे प्रेमप्रकरण.
त्यांचे संवाद आणि तो प्रसंग खुलविण्याची आपली हातोटी सुरेख आहे म्हणून फार खटकत नाही पण मला हे प्रसंग फार घासून पुसुन गुळगुळीत झालेले वाटतात. अनेकदा कथा-कादंबऱाय-चित्रपट आणि मालिकांमधून समोर आलेले. क्लिशे.
राग नसावा ही विनंती.

Sad :रागः अ‍ॅडमिन......... काय हो, काय हि साईट आहे, सारखि ऑफलाईन जाते, माझा नंम्बर हुकला ना राव, जरा डेताबेस ऑप्टिमाईज करा कि, मॅक्स नंम्बर ऑफ कनेक्शन चा झोल होतोय.

मि खरच पहिला होतो राव Sad

धन्यवाद बेफिकीर,
प्रतिक्षा लवकर सम्पवलीत.....

परेश्......ईथे नंम्बर नाही म्हणुन खट्टू होऊ नकोस....
खर तर तुच पहीला आहेस्...कारण इथे बेफिकीर यान्च्या लिखाणाची वाट पाहणारा प्रत्येक जण पहीलाच....म्हणुन तुही पहीलाच बरका..............

सावरी...

वनदास - काही म्हण अश्क्या.. मला दिल्याचं पटतं..
अशोक - तुला आजपर्यंत त्याचंच पटायचं.. पैसे देतो ना बाटली आणायला..>>>>>>>>>>>>>

जबरदस्त हे राव !!!!!! कसं सुचतंच कसं ......... mind-blowing

सर्वांच्या प्रेमळ प्रोत्साहनासाठी सर्वांचे मनःपुर्वक आभार!

आशू चॅम्प - मनःपुर्वक आभार! विचार करतो. कधी कधी काहीही लिहीलं जात असावं बहुधा!

पण आपण स्पष्टपणे दाखवत देत राहावेत. खरच आभार!

-'बेफिकीर'!

बेफिकिर, खरच एकाच पोस्ट मध्ये किति किति भाव वाचायला मिळाले, शब्द नाहित माझ्य्यकडे. आत्म्या लेका च काहि खर नाहि, आणि अशोक ... आज पर्यत ग्रेट वाटला होता, कारण त्याने आत्म्याच छान बॉद्धिक घेतल होत, त्याच रशीदा वर प्रेम आहे हे हि पटतय, पण वन्याला अस डायरेक्ट बोलणे म्हणजे अति होतय(असे लोक अविचारि अस्तात असे मला वाट्ते, आणि असे मित्र हि घातक).

सावरी धन्यवाद, म्हणजे ना... मला आत्ता काय वाट्तय ना, ते नेमक शब्दात नाहि मांडता येत, पण एक आधार मिळाल्या सारख वाटल, खरच धन्यवाद.

दिल्या - मी ओढली जवळ... ती कसली येतीय...
आत्मा - हे समाजातील एका घटकाचं शोषण आहे.. >>> आत्म्या लेका काय हे Happy Happy

आत्म्याच आस्वासनात "... की" च्या एवजि "की ....." अस हव होत का?(चुकल्यास माफि असावि कारण ह्लल्लि हल्लि माझ मराठि जरा बिघड्लय..)

बेफिकिर जी, दिल्याच किस डिस्क्रिशन जबरदस्त............
अशोक - हिंसक????? तिच्यायला किस घेतोय का गॅन्गवॉर करतोय?? >>>> हा हा हा हा.

कुणीतरी म्हण्टलय.........

शेवटी 'बेफिकीर' टच्...खरच...

सावरी

परेश मित्रा,

सावरी धन्यवाद, म्हणजे ना... मला आत्ता काय वाट्तय ना, ते नेमक शब्दात नाहि मांडता येत, पण एक आधार मिळाल्या सारख वाटल, खरच धन्यवाद.
..ह्म्म्म्म्म्म्म्म
आता हेच बघ ना....चान्गल्या गोष्टीन्च्या/लोकान्च्या सानिध्यात राहुन आपण खुप काही शिकतो...जस आधार मिळाल्या सारख वाटल...
गम्म्त करतेय्....हलक घे...

सावरी

छान Happy

ह्या भागातला भांडणाचा प्रसंग वाचून पोटात तुटल्यासारखं झालं... एकदम 'हाफ राईस दाल मारके' मधल्या राम-रहिम ढाब्यावरच्या भांडणाची आठवण झाली Sad कसे दोघे मित्र भांडले होते... आणि मग पुन्हा मने जुळलीही होती...
आज बर्‍याच दिवसांनी असे एकादमात ३-४ भाग वाचले. सावरी, परेश, डॉक, तुमच्यासोबतचे पहिल्या नंबरचे खेळ मी मिसले इतके दिवस... पुढच्या वेळी मीही असेन हं स्पर्धेत...बघू कोणाचा नंबर लागतो ते...
सर्व वाचकांना हॅपी विकांत... भेटूया पुढच्या भागात Happy

मला एक निषेधाचा ठराव माण्डायाचा आहे... बेफिकीर यांच्या लिहिण्याच्या गतीमुळे लोकांचा बराचसा वेळ वाचनात जातो... त्यामुळे माय्बोली वर बाकी लिखाण जवळ्जवळ बंद होत आले आहे...

Happy

--आनन्दा

आत्मा - हे समाजातील एका घटकाचं शोषण आहे..>>> Rofl
आत्मा - फार सुंदर विधान केलंत आपण... मला कांदा द्या... >>>> Rofl

बाकी दारु पिल्या नंतरची भांडणं जबरदस्त असतात .....(पुर्ण टल्ली अवस्थेतल्या असल्या भांडणांमुळे मी माझ्या २ दोस्तांशी जानी दुश्मनी करुन बसलोय ......आणि ते परत टल्ली कधी घावतात याची वाट पहातोय ...)

ते रंगवायला हवं होतं !!!

बाकी कादंबरी मस्त चालु आहे !

एक बाप , सोलापुर ...मध्ये शेवट काय होणार याचा अंदाज येत होता ...यात अजुन सस्पेन्स आहे !!!

मस्त

लिहित रहा ...

सावरी, परेश, डॉक, तुमच्यासोबतचे पहिल्या नंबरचे खेळ मी मिसले इतके दिवस... पुढच्या वेळी मीही असेन हं स्पर्धेत...बघू कोणाचा नंबर लागतो ते...
.....सानी आम्ही वाट पाहतोय......मज्जा....

सावरी

Pages