एक सकाळ

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

..आज सकाळी उशीरा जाग आली. नवर्‍याला ८:३० ची मीटिंग होती, मला ९ चा एक इंटरव्यु. तो घाई-घाई आवरुन पळाला. रोज सकाळी जी काय थोडी-फार कामं तो करतो ती पण न करता. उशीरच झाला मग त्याला इलाज नाही. लेकाला डब्यात बटाट्याचे पराठे द्यायचे म्हणून त्याची तयारी केली होती. पटकन दोन पराठे लाटू म्हंटल तर नेमकं एकदा डायपर इमर्जन्सी आली आणि एकदा अंगावर पाणी सांडून घेतल्यानं कपडे इमर्जन्सी! बर्नर बंद करा, त्याचं आवरा आणि परत कामाला लागा. डबे भरत होते तेव्हा त्याला जे काही खायला दिलं होतं ते सगळं अंगावर माखून घेतलं. पुन्हा धुवाधुवी. मग कपडे घालायला त्यानं इतकं पळवलं की शेवटी त्याला नुसतंच जॅकेट घालून घेऊन जावं असं वाटलं. कसं-बसं दोघांचं आवरलं तर घराची चावी सापडेना. सापडायला सोपी म्हणून गाडीची आणि घराची चावी माझ्या हँडबॅगमधे असते. आज-काल लेकाला झिप काढता येते, त्यानेच कधीतरी चावी काढून कुठे तरी भिरकावली असणार. नवर्‍याला फोन केला तर त्याने मीटिंगमधुन येउन हळू आवाजात काय सांगितलं त्यालाच समजलं नसणार. काहीतरी कॉफी टेबल असं ऐकू आलं. सगळ्ळा कॉफी टेबल धुंडाळला पण काही सापडली नाही. शेवटी एका टेबलाच्या खणात सापडली. दाराला कुलूप घातल्यावर लक्षात आलं माझं जॅकेट घरातच राहिलं. ते घेऊन एकदाची निघाले तर पहिल्याच रस्त्यावर काम सुरु होतं म्हणून रुट-१ला जावे लागले. तिथेही काम सुरु म्हणून एक लेन बंद होती. मग रुट-१ची नेहेमीची रहदारी, ते काम वगैरे मिळून तिथे पोचायलाच अर्धा तास आणि त्यापुढे रुट-१, मग एक गावातून जाणारा रस्ता आणि मग हायवे असं यायला आणखी वेळ. हायवेवर पण काम सुरु आहे. काम रात्री करत असले तरी सामान-सुमान-ट्रका मिळून एक लेन बंद. बॉसला फोन करु म्हंटलं तर मध्ये एक चढं वळण घेताना बॅग सीटवरुन खाली पडली होती. ड्रयविंग सीटवरुन तिथपर्यंत माझा हात पुरेना. रडत-खडत १० मिनिटांचं अंतर एक तास ड्राइव्ह करुन पार केल्यावर एकदाचं एक्झिट आलं. लेकाला एव्हाना झोप यायला लागली होती. आज-काल पाने झडून गेल्याने हाय-वे वरुनच पाळणाघराचे पार्किंग दिसतं. दोन जागा रिकाम्या होत्या. इतक्या उशीरा कोण येणार आहे असा विचार करत एक सिग्नल ओलांडून तिथे पोहोचेपर्यंत दोन्ही भरलेल्या. परत गाडी मागे घेऊन इमारतीतल्या आतल्या पार्किंगमधे गेले. आधी बॉसला फोन केला, तर तो जाग्यावर नव्हता. लेकाला गाडीतून काढून पाळणाघराकडे निघाले तर चष्मा गाडीतच राहिला. तरी बरं रस्त्याने चालताना चष्म्याची गरज अजूनतरी पडत नाही. एकदाचं त्याला पाळणाघरात सोडलं आणि धावत-पळत 9:45 वाजता ऑफिसला आले. आल्या आल्या मॉनिटरवर चिठ्ठी- Please join me in the empty room next to Pete's office- Dan 09:15 am. बॉस तसा भला गृहस्थ. त्याने पुष्कळच खिंड लढवली होती, इंटरव्यु अजून संपला नव्हता. टेक्निकल प्रश्नांसाठी माझ्याकडे हँड-ओवर करुन तो पुढल्या मीटिंगसाठी पळाला. इंटरव्यु संपवून जागेवर आले तेव्हा वाटलं, आधी एक तास झोप काढावी आणि मग कामाला सुरुवात करावी.

एखादी सकाळ अशीच येते ना, सावळ्या गोंधळाची...काय म्हणतात ते chaotic!!

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

भलताच गोंधळ की! Happy
मग झोप घ्यायला मिळाली की नाही शेवटी? Happy

३ rd प्लोअर वर quite room आहे, तिथे जावुन झोप काढु शकतेस.

पण मी म्हणतो माणसाने सकाळी उशीरा उठावेच का?

>>माणसाने सकाळी उशीरा उठावेच का?

माणसा, तू का उशीरा उठतोस हे तुलाच माहित हवे ना?? Happy

माणसा, तू का उशीरा उठतोस हे तुलाच माहित हवे ना?? >>>> अगदी Wink

माणसा, तिसर्‍या मजल्यावरील ती खोली lactation room आहे.

मुलांचे ,आपले डब्बे रात्रीच भरून, लंच बॅगेसकट फ्रीज मधे ठेवायचे असतात Happy

माझा असतो रात्रीच भरलेला. इशानला काय द्यायचे ते अजून तरी मी सकाळी करुन/भरुन देते. आज-कालच त्याचा डबा पण आदल्या दिवशी संध्याकाळीच करावा की काय असा विचार चालु आहे.

बापरे... किती गडबड धावपळ झाली असेल!! :|
अवघड आहे !
मी तुझ्या जागी असते ना, तर एव्हढी धावपळ करण्यापेक्षा घरातच बसून झोप काढली असती.. :)))

बापरे.. वाचता वाचता धाप लागली!

झोप जाण्यासाठी कथा लिहिली का मग?? Happy

इतक्या धावपळी नंतर ज्याचा इंटरव्यु घेतला, त्याच्या विषयी छान गोष्ट लिही ना. Wink

तर एव्हढी धावपळ करण्यापेक्षा घरातच बसून झोप काढली असती >>> काय करणार कन्सल्टंट आहे. पैसे मिळत नाहेत कामावर नाही आले की (गरीब बिचारी मी, बाहुली नाही) Sad

हं असते एखादी सकाळ अशी घाई गडबडीची,चिडचिडीची.
संध्याकाळी माबोवर टाईमपास न करता कामं उरकली तर सकाळी उशिरा उठूनही आवरेल पटपट. (एक आगाऊ,भोचक सल्ला) Light 1 Proud

सिंडे, उशीर झाला तरी बाळाला घेऊन नीट ड्राइव्ह करतेस नं?

सिन्ड्रेला,

१) चाव्या एक कार मधे, दोन घरात, एक तुझ्याकडे आणि एक नवर्‍याकडे असे कर.

२) हिवाळ्याचे कपडे पण गाडी मधे ठेव. आगावू म्हणून.

३) सकाळी लवकर जाग आणायची असेल तर रात्री कमी जेवण कर. लवकर जाग येते शिवाय ताज वाटतं कमी झोप घेऊन सुद्धा.

४) बॉस लोकांचे मोबाईल नंतर जवळ असू देत.

बी, अरे तिच्याकडे बॉसचा मोबाईल होता पण पर्स मागे होती नी हात पोचत नव्हता असं लिहिलंय तिने.

एखादी सकाळ अशीच येते ना, सावळ्या गोंधळाची... >>>>>>>> अगदी बरोबर. बर्‍याचवेळा हे असंच होतं, म्हणजे सावळ्या गोंधळाबद्दल म्हणतोय मी. त्या क्षणाला काहीच सुचत नाही. पण नंतर एखाद्या निवांत क्षणी हे सगळं आठवलं की आपलं आपल्यालाच हसू येतं.

तू लिहिलेलं ललित आवडलं ......... Happy

~~~~~~~~~~~~~~
देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी

मजा वाटली वाचून, खरंच म्हणजे एखादा दिवस असतो असाच गडबड गोंधळ उडवून देणारा. आणि जरा निवांत बसलं की जाणवत बाप रे काय हे कसला गोंधळ उडाला होता तेंव्हा. ब-याचदा अगदी सगळी तयारी केलेली असली तरिही हे असले गोंधळ होतात

हाय रब्बा, धाप लागली ग सिन्ड्रेला वाचता वाचता.. पण तू चिडचिड न करता सगळं जमेल तितकं त्वरेने करत गेलीस हे आवडलं.:)

सिन्ड्रेला
खरंच धाप लागली वाचताना! पण एखादा दिवस येतो असाच कधी कधी!

अरे बापरे, खुपच धावपळ झाली की ... इशान ने धपाटा नाही खाल्ला का एखादा पराठ्या ऐवजी. बाकी उत्साह दांडगा आहे.

"बुर्जुगांचा" सल्ला ऐकलास तर असे होणार नाही Wink

बी, सूचनांबद्दल धन्यवाद. पण मी "एका" सकाळीची गोष्ट सांगितली, रोजची नाही Happy

सकाळी लवकर जाग आणायची असेल तर रात्री कमी जेवण कर >>> रात्री कमी जेवण केले तर उशीरा उठायचा प्रश्नच नाही कारण मला रात्रभर झोपच यायची नाही Wink

तू चिडचिड न करता >>> चिडचिड होतच नाही असेही नाही Wink पण मग मी ५ मिन. शांत बसते. भूक लागली असेल तर काहीतरी खाते आणि मग गाडी चालु Wink

हे हे हे.. माझ्या पण बर्‍याच सकाळी अश्या असतात. सेम रुटीन आहे माझेही, सकाळचे मुलीचे-माझे सर्व आवरुन, तिघांचे डबे भरुन धावत-पळत तिला सोडून हापिस गाठणे, शिवाय ट्राफीक अजून भयंकर. आणि भारतात असल्याने कामवाली बाई सकाळी आली नाही की अजून चिडचिड. रात्री कितीही कामे करुन ठेवली तरी सकाळी परत रोज नवा गोंधळ मांडते मुलगी.