ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग १०

Submitted by बेफ़िकीर on 30 September, 2010 - 04:18

आत्मानंदमधे पडलेला मोठा फरक कशामुळे पडला आहे हे कुणाला समजत नव्हते. जन्मापासून जवळपास दोन दशके आई वडिलांसोबत राहिलेला मुलगा केवळ दिड, दोन महिन्यात आजवर वागायचा त्यापेक्षा इतका वेगळा वागू शकतो? चांगले काय वाईट काय हा विषय वेगळा! दारू वाईट हे सगळ्यांनाच समजते. अती दारू पिणे अधिकच वाईट! याचा अनुभव अशोकच्या रुपाने सगळ्यांनाच नुकताच आलेला! पण ज्याच्या गेल्या कोणत्याही पिढीत कुणीही दारू प्यायलेली असणे शक्य नाही तो केवळ काही दिवसांच्या कालावधीत दारूचा चाहता कसा काय झाला?

खरे तर प्रश्नातच उत्तर होते.

मनावर असलेला संस्कृतीचा, संस्कारांचा, अवलंबित्वाचा, अपेक्षांचा, निर्मळतेचा दबाव इतका प्रचंड होता की आत्मानंद ठोंबरे या आधी खरोखरच एक 'ठोंबरे कुटुंबातील व्यक्ती' या पलीकडे काहीच नव्हता.

त्याचे आयुष्य म्हणजे आई वडिलांनी सांगीतलेल्या दिशेने त्यांनीच सांगीतलेल्या शैलीत प्रवास करत राहणे, इतकेच होते. जन्मापासूनची अठरा वर्षे अत्यंत कडक सोवळे, पूजा अर्चा, वागणुकीवर असलेली कडक बंधने, कर्तव्यापासून जराही शिफ्ट न होता येणे अशा वातावरणात गेलेली होती.

लहान असताना आत्मानंद रडायचा! जे साहजिकच होते. एखाद्या मुलाला चॉकलेट खावेसे वाटणे किंवा बेकरीतील अनेक रंगीबेरंगी केक्सपैकी एखादा खावासा वाटणे अत्यंत नैसर्गीक होते. पण त्याला ते मिळायचे नाही. न मिळण्याचे कारण गरीबी नव्हतेच! न मिळण्याचे कारण होते 'बाहेरचे पदार्थ वाईट' ही शिकवण व हा विचार सातत्याने मनावर ठसवलेला असणे!

हे सगळे माणूस कधी जाणू शकतो? जेव्हा तो वयाने इतपत मोठा होतो की त्याला स्वतःलाच ते समजू लागावे. पण त्या वयाचा झाल्यावर चॉकलेटचे काय आकर्षण राहणार? आणि ज्या वयात आकर्षण असते त्या वयात चॉकलेट खाऊ नये हे कळणार नाही.

तू पूर्णपणे गेलास विसरुनी की मग
मिळते तेव्हा.... केव्हाचे आवडलेले

हा न्याय आहे जीवनाचा!

आत्मानंदच्या व्यक्तीमत्वात काहीच नव्हते. रूप देवाकडून मिळते. त्याबाबत बोलण्यात काहीच अर्थ नाही. पण चारचौघात कसं वागावं, कसं बोलावं, जग कुठे गेले आहे आणि आपण वागणुकीच्या दृष्टीकोनातून किती मागे आहोत, कुठे आहोत याची जाण तर असायलाच हवी. आत्मानंदला ती जाणच नव्हती. त्याचे भावविश्व म्हणजे कीर्तनकार ठोंबरे यांचे घर, जिथे त्याने जन्म घेतलेला होता. जालन्यात शाळेत असतानाही त्याची थट्टा व्हायचीच! पण ठोंबर्‍यांच बर्‍यापैकी दबदबा असल्यामुळे मुले तशी वचकूनही असायची. आत्मानंद फक्त पुस्तकी बोलू शकायचा. तो केवळ तत्वज्ञान व्यक्त करायचा कोणत्याही प्रसंगात! एखादा नापास झाला तर आत्मा म्हणायचा 'प्रयत्न अपुरे पडले असतील, हरकत नाही, दु:खांच्या झळा सोसल्यानेच सोन्यासारखे तावून सुलाखून निघतात लोक'! अर्थातच या विधानाचा त्या मुलाला राग यायचा. त्याला वाटायचे की आत्मा म्हणत आहे 'एक प्रकारे बरे झाले तू नापास झालास हे'!

बोलण्याची शैली पुस्तकी, पोक्त आणि विचारवंतांसारखी! या वयातही वागणे साधूसारखे! दिसणे बेंगरुळ! आपल्या बोलण्या - वागण्याने आपली थट्टा होत आहे हे माहीत असूनही बदलू न शकणे!

अनेक 'मायनसेस' होते आत्म्यात!

देसाई होस्टेलच्या नुसत्या कल्पनेनेच त्याच्या घरचे तीव्र चिंता करत होते. दर पंधरवड्याला बाबा चक्कर टाकून जाणार होते. आत्मानंदला कित्येक सूचना दिल्या गेल्या होत्या. असा वाग, तसा वाग, वगैरे!

त्याच मूडमधे आणि घर सोडावे लागले या दु:खात तो कसाबसा रूम नंबर २१४ मधे प्रकटला होता.

आणि हा उंबरा ओलांडताना आपण आपल्या व्यक्तीमत्वातून जेथे सुटका मिळते ती हद्दही ओलांडत आहोत हे त्याला माहीत नव्हते.

या खोलीत सिगारेटचा धूर कायमचा भरलेला, दारूच्या बाटल्या इतस्ततः विखुरलेल्या, सिगारेटची थोटके कुठेही पडलेली, दिल्याचा अवतार, खोलीतील एकंदर अस्वच्छता, अशोक, वनदास आणि दिल्याची एकमेकांना चालू असलेली शिवीगाळ, शकिलाचे, रेश्माचे फोटो... आणि त्यातच... आत्मानंद ठोंबरे!

खूप सोसले त्याने पहिल्या पंधरा दिवसात! खूप सोसले. पण दुसरी खोली मिळण्याची शक्यताही नव्हती आणि इतर खोल्यांमधेही काही फार वेगळे प्रकार नव्हते. तडफड व्हायची आत्मानंदची! काय हे वातावरण? आपल्या घरातलं वातावरण काय आणि हे वातावरण काय?

धुराने डोळ्यांची आग व्हायची, दारूचा वास नकोसा व्हायचा, शिवीगाळ ऐकवायची नाही, आदरणीय शिक्षिकांबाबत घाणेरडे बोलले जाणे सहन व्हायचे नाही. पण.. पर्याय नव्हता.

पण तो प्रसंग! तो प्रसंग मात्र त्याच्यात पूर्ण उलथापालथ करणारा ठरला. बाबांचे येणे, दिल्याने त्यांना बसस्टॅन्डवर सोडणे आणि मग.. त्यांचे ते पिशवी बदलल्यामुळे पुन्हा येणे!

या सर्व कालावधीत घडलेला तो प्रसंग फार फार महत्वाचा होता. हेच तिघे, जे एरवी सतत शिवीगाळ करायचे, घाणेरडे राहायचे आणि दारू, सिगारेट यात गुंगलेले असायचे.. त्या ह्याच तिघांनी आपल्या बाबांना केवळ 'सर्व काही ठीक आहे' असे वाटावे म्हणून स्वतःच्या वागण्यात, तात्कालिक का असेना, पण केलेला आमुलाग्र बदल पाहून आत्मानंदच्या मनात उलथापालथी झाल्या!

हे सगळे जण चांगले आहेत.. आपले स्वतःचे वडील आल्याप्रमाणे वागले त्या दिवशी... बाबांची धोतरावरून थट्टा करणार्‍याला दिल्याने मारले... तोच त्यांना स्वतः सोडून आला... सर्वांनी त्यांना वाकून नमस्कार केला... खोली लख्ख केली होती सगळ्यांनी आदल्या मध्यरात्री... कुणीही सिगारेटचा 'सि' सुद्धा उच्चारला नाही.. हे सगळे.. फक्त आपल्या बाबांचा आदर ठेवण्यासाठी... म्हणजे येता जाता आपली थट्टा करणार्‍या या व्यसनी मुलांनी आपल्याला आनंद व्हावा आणि आपल्या बाबांना समाधान मिळावे यासाठी... किती प्रयत्न केले ... आणि आपण खोली सोडायची??? एकवेळ शुद्ध हवा, जिथे आजवर एकही सिगारेट ओढली गेली नाही अशी खोली मिळेल सुद्धा! पण...अशी मने तिथे नसली तर??? धनराज गुणे सारखी मने असली तर???

काय केले आपण अठरा वर्षे आयुष्यातील? अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास! एवढे करूनही कधी पहिले आलोच नाहीत. चांगले गुण मिळायचे! पण बारावीला पडलेले गुण इतकेही चांगले नव्हते की औरंगाबादच्या शासकीय अभियांतिकीत प्रवेश मिळावा! मिळाला तो इथे, इतक्या दूर, तेही पैसे भरून.. देणगीचे!

आपण कोणताही मैदानी खेळ कधीही खेळलो नाही. आपल्या वर्गातला, सतत नापास होणारा जम्या आता जिल्ह्याच्या क्रिकेट टीममधे आहे. निदान त्या क्षेत्रात तरी तो असामान्य होऊ पाहात आहे. आपण?

बाहेरचे खायचे नाही, असे करायचे नाही, तसे बोलायचे नाही, प्रार्थना करायची वगैरे वगैरे! आणि काय? इंजीनीयर होऊनही कीर्तनच करायचे?? आपण जर एखाद्या खासगी उद्योगात नोकरी करायला गेलो तर या खोलीत आपल्याला सांभाळतात तसे तिथे कोणी सांभाळेल?? तिथे तर म्हणे राजकारण असतं! मग? बुवा ठोंबरेंचे नाव तिथे उपयोगी पडेल? आईचे कडक संस्कार अन शिस्त... तिथे चालतील?? ज्या जगात मैत्री ही पुस्तकातल्या मैत्रीनुसार न होता समान आवडीनिवडी असणे या तत्वावर होते.. या जगात आपण आपले बाळबोध पुस्तकी विचार घेऊन कुणाची मैत्री संपदान करू शकू??

कधीच कसे जाणवले नाही की आपण वेगळे वागतो. या समाजाच्या दृष्टीने विचित्र, थट्टेस पात्र असे वागतो. आई बाबांनी का नाही कधीच जाणवून दिले आपल्याला हे?? त्यात त्यांचा काय हेतू असेल? अशोक म्हणतो त्यात काय खोटे आहे? की मुलांना जन्म देणे ही आई वडिलांची इच्छा असते व त्यानंतर त्या मुलाने त्यांना सांभाळावे, त्यांनी सांगीतलेल्या मार्गावर चालावे हा मुलाला जन्म देण्यातला मूळ हेतू असतो?? काय खोटे आहे याच्यात? म्हणूनच आपल्या आई वडिलांनी आपल्याला असेच वागायला शिकवले. जेणेकरून आपण सत्शील राहू व मोठे झाल्यावर त्यांचे प्रेमाने करू! काहीच चुकीचे नाही य अपेक्षेत! मान्य! पण... मग मी म्हणजे कोण? फक्त एक 'त्यांचा मुलगा??' एवढंच?? मी स्वतः म्हणजे कुणीच नाही??

................................

आत्मानंदला इतके विचार सुचलेच नसते. पण अशोकने घेतलेल्या बौद्धिकामुळे त्या विचारांना प्रचंड चालना मिळाली. त्या प्रसंगानंतर आत्मा वारंवार त्याच विचारांमधे बुडलेला असायचा. त्या दिवशी त्याने स्वतःचाच उबग आल्यामुळे बिनदिक्कत एक पेग भरायला सांगीतला होता वन्याला! आणि... पर्यवसान हे झाले की दारूमुळे येणारी एक मस्त झिंग, तरलता, हलकेपणा, आत्मविश्वास.. हे सगळे खूप खूप मजेशीर वाटू लागले होते. आवडू लागले होते. इतर मुलांच्या सबमिशन्सच्या ऑर्डर्स मिळाल्यामुळे हातात असलेले पैसे पुन्हा पुन्हा तीच मजा घ्यायला प्रवृत्त करत होते. आणि इतर तिघेही मुळातच व्यसनी असल्यामुळे 'आत्मा अचानक पिऊ लागला' ही त्यांच्या दृष्टीने दु:खद नाही तर आनंददायी बाब ठरणार हे त्याला माहीत होते.

दारू पिण्यात आता त्याला 'स्व शोधल्यासारखे' वाटू लागले होते. आंगनमधल्या ओपन गार्डनमधे निवांत एकट्याने बसून ओल्ड मंकचे दीड किंवा दोन पेग घ्यायचे अन थोडा भात वगैरे खाऊन मस्त चालत चालत परत यायचं! काय आयुष्य होतं! सातारा रोडच्या त्या रात्रीच्या थंडगार वार्‍यात आकाशाकडे बघत बघत, खुर्चीवर मान रेलून, एक एक घोट घेताना आत्मानंदला ब्रह्मानंद मिळायचा. आणि प्रत्येके वेळेगणीक त्याला येत असणारी मजा अधिक नवीन वाटू लागायची. ताजीतवानी वाटायची. एकदम सगळे प्यायला येऊ शकत नसल्याने दारू पिण्यातली एक मुख्य मजाच समाप्त झालेली होती ती म्हणजे गप्पा! कारण अशोकला मोह होऊ नये म्हणून उरलेल्या तिघांपैकी केवळ एकानेच एका वेळेला बाहेर जायचं असं ठरवलं होतं दिल्याने! दिवसभर अशोक वर्गात, डोळ्यासमोर असल्याने काहीच काळजी नव्हती. पण आजवर इतकी पिणारा माणूस हृदयविकाराने घाबरला असला तरी एखादेवेळेस संध्याकाळचा मोह झाला तर काय? म्हणून मग सर्वात पहिल्यांदा दिल्या थोडीशी लावून यायचा! वनदासने पिणे खूपच कमी केले होते. आठवड्यातून एखादवेळेस! पैसेही नसायचेच! आत्मा मात्र आता हळूहळू एक दिवसा आड, दोन दिवसा आड असा आंगनला जाऊ लागला होता. ही प्रगती अशोकला अ‍ॅतॅक आल्यानंतरच्या तीन महिन्यांमधली होती. एवढं होऊनही बेट्याने स्वतःची तुपट भाषा काही बदललेली नव्हती.

पहिली सेमिस्टर संपली होती. परिक्षेत कुणी काय दिवे लावले होते ते ऑक्टोबर महिन्यात, दिवाळी झाल्यानंतर समजणार होते. परिक्षेनंतर जी सुट्टी देतात ती या कॉलेजला नसायची. ते पुढची सेमिस्टर चालू करायचे आणि सहामाहीची सुट्टी दिवाळीत द्यायचे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत आपापल्या घरी जाणार्‍या मुलांना पहिल्या सहामाहीच्या निकालाचे टेन्शन आणि दुसर्‍या सहामाहीच्या सबमिशनचा ताण असे दोन्ही असायचे. हा सप्टेंबर महिना चालू होता. अजूनही मधून मधून पावसाच्या सरी येत होत्या. पण आजचा दिवस फार फार आनंददायी होता.

आज केलेल्या एका मेडिकल टेस्टमधे अशोकमधे बर्‍यापैकी सुधारणा झाल्याचे समजले होते. स्मोकिन्गला डॉक्टर नाही म्हणाले असले तरी अशोकने हळूच कुजबुजत 'एखादं ड्रिन्क घेतलं तर चालेल का?' असं विचारल्यावर गालातल्या गालात हसत डॉक्टर म्हणाले होते.. 'नीट जगायचं असलं तर नको घेऊस.. पण एखाद म्हणत असशील तर... लगेच काही अगदी त्रास होईल असे नाही'! हा प्रचंड आनंद घेऊन अशोक रूमवर आला होता आणि ते ऐकून वन्याने अशोकला शेक हॅन्ड करून एक घट्ट मिठी मारली होती. गेल्या तीन महिन्यात अशोकचे वडील तीन वेळा येऊन गेले होते. अशोकनेही बराच व्यायाम, चालणे वगैरे प्रकार करून स्वतःचे वजन चक्क सहा किलो कमी केले होते.

पण रूममधे आणखीन तीन आनंद अशोकच्या आनंदाची वाट पाहात होते.

पहिला आनंद म्हणजे दीपा बोरगे आज चक्क वन्याच्या आमंत्रणावरून धनकवडीच्या अक्षय हॉटेलमधे चहा प्यायला आली होती. ही अफाट स्टेप कशी काय झाली असेल हे अजून विचारातच घेत नव्हते कुणी! नुसतेच वन्याची थट्टा करत होते.

ते ऐकून होतंय तोच दिल्याचे वाक्य! 'सुरेखा म्हणाली... माझं हे शेवटच वर्षं आहे दिलीप.. या वर्षी तरी आपण बोलत जाऊ एकमेकांशी... एकदा माझं कॉलेज संपलं की तू कुठे अन मी कुठे! माझ्या भावाने तुला तीन वर्षांपुर्वी मारलं ते सोडून दे... मी तुला भेटायला अक्षयमधे आले होते... पण नेमका नीताने घोळ केला.... "

हे वाक्य ऐकून दिल्यासारखा पाषाण भर उन्हात कॉलेजच्या लॉबीत विरघळला होता... आणि स्वतःच केलेला नियम कुणालाही न विचारता स्वतःच मोडून आज चक्क आर्.सी. चा खंबा घेऊन रूमवर आला होता. म्हणे मी एकटा पिणार, कुणी बोलायचं नाही! पण एकटा कसा काय पिणार? च्यायला अश्क्या जवळपास बरा नाही का झाला? आणि... वन्यालाही नाही का दीपा भेटली?? त्यांना नाही होय काही आनंद बिनंद??

यावर वाद सुरू होऊन त्याचे पर्यवसान 'आजच्या दिवस सगळ्यांनी एकत्र अन रूममधे प्यायला हरकत नाही' अशी दिल्याची परवानगी मिळण्यात होतंय न होतंय तोवर.... साहेब बोलले... आत्मानंद ठोंबरे साहेब... !!

"आज अलका म्हणाल्या... बाबांच्या आजारपणामुळे मॅथ्स मागे पडतंय... शिकवाल का??? मी... हो म्हणालो... सहाध्यायींना आपण जमेल ते सहकार्य करायलाच हवं... नाही का??"

आणि प्रेमासारख्या घनघोर विषयातही तसलीच तुपट भाषा वापरतो याबद्दल दिल्याचे दोन दणके खाऊन झाल्यावर वनदासने हाताच्या बुक्कीने कांदे फोडले, अशोकने सोडा आणि ग्लास काढले, दिल्याने दाताने आर्.सी.चे सील ओपन केले... आणि...

एकमेकांच्या आनंदी बातम्या समजल्यामुळे प्रेमाने भरून आलेल्या मनांनी स्वतःच्या हातांना प्याला उंचावून एकमेकांच्या प्याल्यावर आपटून किणकिणाट करण्याचे आदेश दिले... आणि तब्बल तीन साडे तीन महिन्यांनी....

... रूम नंबर २१४ ... पुन्हा जिवंत झाली....

"चीअर्स"

रॉयल चॅलेंज खरे तर परवडायचीच नाही. पण सुरेखा स्वतःहून येऊन बोलल्याचा दिल्याला झालेला आभाळाएवढा आनंद खरे तर किमान हंड्रेड पायपरच्या पात्रतेचा तरी होताच! पण हंड्रेड पायपर हे फार दूरचे स्वप्न होते. अजून तर व्हॅट ६९ आणि अ‍ॅन्टिक्विटीही चाखलेल्या नव्हत्या. आर सी मात्र चाखलेली होती आधी सगळ्यांनी! पण आज कित्येक महिन्यांनी पुन्हा आर सी चाखण्याची संधी मिळत होती. दिल्याने आजपासून स्वतःच्या बाजूची खिडकी 'हे वर्ष संपेपर्यंत' उघडी ठेवायचे ठरवले होते. आणि आर सी आल्याच्या आनंदात पहिली राउंड झाल्यावर जी हलकी झिंग आली.. त्यातून तीन महिन्यांपुर्विचा अशोक जागा झाला.

अशोक - नेमकं सांगाल का? कसा संवाद झाला ते??
आत्मा - खरे तर प्रेमासारख्या नाजूक व खासगी बाबी चर्चेला घ्याव्यात की घेऊ नयेत याबाबत..

'याबाबत' हा शब्द पूर्ण होईपर्यंत बसल्याबसल्याच दिल्याने घातलेली लाथ आत्मानंदच्या पाठीत बसली.

आत्मा - आपण फार संतापता..

पाठ चोळत आत्मा म्हणाला.

अशोक - तुम्ही बोला हो.. या रूमच्या बाहेर जायची नाही ती बातमी...
आत्मा - छे छे! तो संदेह मनात नाहीच्चे माझ्या.. पण.. उद्या जिच्याबरोबर विवाह करायचा आहे..

दिल्याचा पाय पुन्हा वळवळलेला पाहून आत्मा स्वतःच बोलायचा थांबला.

अशोक - विवाह झाल्यावर काही कथन करण्यासारखे उरतच नाही...
आत्मा - तेही खरंय...
अशोक - मग सांगा बरे.. आज काय झालं??
आत्मा - त्या ... त्या आल्या...
वनदास - कितीजणी होत्या.... ???

'कोण होत्या या चौघी' या आत्म्याने चार महिन्यांपुर्वी अत्यंत नाजूक क्षणी वनदासला विचारलेल्या प्रश्नाचा वनदासने आत्ता सूड घेतला.

आत्मा - एकट्याच होत्या...
अशोक - पाखरं वगैरे किलबिलाट करत होती का?
आत्मा - छे हो... टळटळीत माध्यान्ह ती!
अशोक - नाही.. यांच्या प्रेमात करतात बर्‍याचदा.. म्हणून विचारलं...
आत्मा - आमचं प्रेम विशुद्ध आहे.. गंगेप्रमाणे...
वनदास - ए तुझ्यायला... आमचा काय कॅनॉल आहे का? उसात सोडलेला???
आत्मा - मला आपली थट्टा करायची नव्हती..
वनदास - माझ्या अन दीपाबद्दल बोलायचं नाही हां?? आधीच सांगतोय...
आत्मा - नाही बोलणार... नाही दुखवणार आपलं हृदय...
अशोक - तुम्ही पुढचं सांगा हो...
आत्मा - आज दाणे नाहीयेत का??
अशोक - दाणे बिणे नाहीयेत.. बोला..
आत्मा - मी अवाकच झालेलो होतो...
अशोक - .....बोला बोला.. थांबू नका..
आत्मा - भर दुपारी चारचौघात चक्क या आपल्या समोर??
अशोक - अहो हो ना...
आत्मा - मला म्हणाल्या...
अशोक - ....
आत्मा - बाबांचं करण्यात सगळा वेळ जातो...
अशोक - ....
आत्मा - गणित मागे पडलंय... अशा वेळेस मला फक्त तुमचाच आधार वाटतो...

या विधानावर दिल्याने एक बुक्की मारली भिंतीवर! वनदासच्या घशातली जस्ट गिळलेली दारू हसल्यामुळे नाकातून बाहेर यायची वेळ झाली.

वनदास - ह्याचा कुणाला तरी आधार वाटतो हे वाक्य झेपत नाय मला अश्क्या..
आत्मा - तुम्ही थांबा हो जरा.. तुमचं नाही का आम्ही ऐकून घेत?? ते सूर्य चढत होता बिता..
अशोक - बोला बोला..
आत्मा - मी उच्चारलेले शब्द ऐकून त्यांच्या चेहर्‍यावर रंगपंचमी झाली...
वनदास - काळ्यानिळ्या पडल्या का त्या??
अशोक - काय वाक्य उच्चारलेत आपण??
आत्मा - मी म्हणालो... अवश्य.. विद्यार्थ्यांनी एकमेकांना सहाय्य करायलाच हवं...

आता मात्र दिल्या भडकला. त्याने सरळ आत्म्याची गचांडी धरून आत्म्याला उभा केला. अशोक आणि वनदास हसत होते.

दिल्या - XXX ... असलं तृतीयपंथी उत्तर तुझ्या नानाने दिलंवतं का मैत्रिणीला?? आं?? या रूममधे ही असली कासवाच्या गतीची प्रेमं चालणार नाहीत मला... कोचा करीन कोचा.. म्हणे विद्यार्थी.. ती रंगपंचमी नाही झाली... एकदम हसणं शक्य नसल्यामुळे ती आतल्याआत गदगदली असेल अन त्यामुळे डोळ्यातून पाणी आलं असेल अन गाल लाल झाले असतील साल्या..

आत्मा हबकलेला होता. दिल्याने त्याला सोडल्यावर तो घरंगळल्यासारखा खाली बसला. अशोककडे पाहात निरागसपणे म्हणाला..

आत्मा - माणसांना माणसाळण्याची काही सोय असते का हो??

पुन्हा मार खाल्ला त्याने! कोणीही वाचवत नव्हतं त्याला दिल्यापासून! दिल्या भडकून पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसला.

अशोक - लागलं का?
आत्मा - प्रेमात असल्या संकटांची भीती बाळगणे पुरुषार्थाला शोभेसे नाही..
वनदास - तुमच्या दोघात पुरुष कोण आहे?
आत्मा - हे अश्लील बोलतायत.. त्यावर तुम्ही काहीच करत नाही आहात... मला मात्र मारता..
दिल्या - त्यालाही कुदडायचंय त्याचं ऐकलं की..
आत्मा - वनदास.. तुमची कथा ऐकवा...
वनदास - का??
आत्मा - यांनी तुमच्यावर काही प्रहार केलेले पाहिल्याचा आनंद मला मिळावा म्हणून..
वनदास - लईच बोलतं रे हे??
अशोक - तू ऐकव रे.. काय झालं तुझं आज ते...

वनदास दिल्यापासून खूप लांब जाऊन एका पलंगावर बसला. दिल्याला आधीच कल्पना आलेली होती. या नालायकाने आजही कविता केलेली असणार...

दिल्या - कविता ऐकवलीस तर हात पाय मोडून घेशील...
वनदास - नाय नाय.. कविता बिविता नाय केली...
दिल्या - हां...

वनदासने धीर येण्यासाठी हातातल्या ग्लासमधून एक मोठा घोट घेतला. आकाशाकडे पाहिल्यासारखं बघत हातवारे करत म्हणाला...

वनदास - ती तिच्या लुनावरून अशी आलेली....
अशोक - ... हं..
वनदास - सगळा निसर्ग तिच्या दर्शनाने पावन झालेला..
अशोक - (कुजबुजत) घंट्याचा निसर्ग!
वनदास - तिच्या लोचनांमधे सोनेरी स्वप्नं होती..

दिल्या चुळबुळू लागला.

वनदास - हे विश्व अत्यंत मनोहारी भासू लागलं...
अशोक - पुढे...
वनदास - जाणारे येणारे त्या मोहक शिल्पाकडे वळून वळून पाहात होते...
अशोक - मग ती आत आली अन तुम्ही चहा घेतलात अन निघालात.. बोलणं काय झालं तेवढंच सांग..
वनदास - तिच्या लुनावरून उतरून चालत येण्यात एक अद्वितीय लय होती...
अशोक - बसा आता तासभर ऐकत....
वनदास - तिच्या त्या दिलखेचक चालीनुसार कंबरेपर्यंत असलेली तिची वेणी हालत होती...
आत्मा - हे समोरून बघत होते ना??? यांना वेणी कशी दिसली??
अशोक - प्रेमात फालतू शंका काढायच्या नसतात...
वनदास - लांबूनच मला पाहून तिने लाजून हासत मान खाली घातली चालता चालता...
अशोक - हं...
वनदास - ती समीप आली..
दिल्या - ... काय आली म्हणाला हा??
अशोक - समीप समीप.. समीप म्हणजे जवळ..
दिल्या - तिच्यायच्ची समीप...
वनदास - तेवढ्यात मला भारद्वाज दिसला..
अशोक - ....तो पॉलीमरचा??
वनदास - नाही... पक्षी भारद्वाज... सोनेरी पंखांचा शुभशकुनी पक्षी...
अशोक - .... वन्या... अजून दिड मिनिटात मुद्यावर आला नाहीस तर थोबाड फोडीन...

अशोक आणि दिल्या दोघेही विरुद्ध पार्टीत असणे वन्याला परवडण्यासारखे नव्हते.

वनदास - आणि मग आम्ही चहा वगैरे घेतला.. छान गप्पा झाल्या... अन निघालो...

सन्नाटा पसरला.

अशोक - XXXX हे एवढं सांगायला एवढा वेळ लावतोस होय? आं? शिल्प काय, भारद्वाज काय, वेणी काय!

वनदास - पुढील तपशील.. अर्थातच ... जाहीर करण्यासारखे नाहीत...
अशोक - ..वन्या... लेका हात बित घेतलास की काय हातात??
वनदास - हा हा हा हा! हात? हात तर काय... हा आत्म्याही घेऊ शकेल...
आत्मा - ही स्तुती आहे की निंदा हो??
दिल्या - तू माझ्याशी बोललास तर शेप बदलीन...

आत्म्याला कुणाशी बोलावं तेच समजत नव्हतं!

अशोक - वन्या.. नीट सांग.. हेच तपशील महत्वाचे आहेत...
वन्या - ... छे छे... तिने शपथ घातलीय मला...
अशोक - तिची शपथ चुलीत गेली... इथे आपण एकत्र राहतोय त्याची काय निष्ठा आहे की नाही??
वन्या - त्या निष्ठेची विष्ठा केली आज संध्याकाळी मी अशोक..
अशोक - हे तुला परवडणार नाही... पुढे मागे ते प्रेम जमवायला माझीच गरज भासणार आहे..
वन्या - इतक्या तुच्छ पातळीला आमचे प्रेम येईल असे मला मुळीच वाटत नाही...
अशोक - दिल्या... याची भाषा बघ.. म्हणजे आपण कुणीच नाही.. आता सबकुछ ती दीपा...
वन्या - आधीच सांगतोय अशोक... तिला वहिनी म्हणायचं.. नाव घ्यायचं नाय तोंडाने तिचं...
दिल्या - फॅमिली रूममधे काय झालं त्याचा अहवाल या मिनिटाला हवाय मला...

दिल्याच्या धमकीवर गंभीर व्हायलाच हवं होतं वनदासला!

वनदास - मित्रांनो... दोन जण हॉटेलमधे गेले की... समोरासमोर बसतात की नाही???
अशोक - ..... ... हो.... मग????
वनदास - आम्ही शेजारी बसलो होतो....
अशोक - का?? समोर कोण होतं???
वनदास - समोर आमची स्वप्ने होती....
अशोक - मरणार आहे आज हा... खरच मरणार आहे..
वनदास - काही चुकून झालेले... काही सहेतुक असे ते गुलाबी स्पर्श....
अशोक - कसले??
वनदास - तिच्या मुलायम जुल्फांचे माझ्या खांद्याला...
अशोक - कसं वाटतं रे???
वनदास - अशोक... तुला सांगून नाही कळायचं रे... शब्दात नाही मांडता येत ते...
अशोक - तरी???
वनदास - जणू आपण फुलांच्या गालिच्यांवरून चालत आहोत असा भास होतो...
अशोक - पुढे??
वनदास - मी हळूच तिच्याकडे पाहिलं... ती डोळ्यांच्या कोपर्‍यातून पाहात होतीच...
अशोक - .....
वनदास - तिच्या गोर्‍यापान उजव्या हाताच्या करंगळीला हळूच माझी करंगळी चुकून लागली...
अशोक - ... चुकून लागली यावर किमान मी तरी विश्वास ठेवू शकत नाही...
वनदास - आणि काय सांगू आत्मानंद?? तिने तिची ती नाजूक करंगळी.. सरकवलीच नाही रे...
आत्मा - बधीर आहेत का त्या?
वनदास - तुझं अख्खं खानदान बधीर आहे... अश्क्या.. अरे काय ती करंगळी...
अशोक - ... काय..
वनदास - जणू परमात्म्याने पाथरवटांचा सेपरेट सेक्शन काढून कोरली असावी अशी ती करंगळी...
अशोक - करंगळीच्या पुढे गेलं का प्रकरण??
वनदास - गेलं तर?? हळूच आमची बोटे एकमेकांत अडकली...
अशोक - मग?
वनदास - तो स्पर्श फार वेगळा असतो दिल्या... फार वेगळा असतो तो स्पर्श..
दिल्या - माझाही वेगळा असतो...
वनदास - काय तो नाजूकपणा.. जणू माझ्या हातात मोरपीस विथ पास्चराईझ्ड बटर...
अशोक - पुढे??
वनदास - काढवेना रे हात??
अशोक - अरे हो ना...पुढे काय??
वनदास - कात्रजच्या घाटातून बेभान वेगाने दुधाचे टॅन्कर जातात ते बघतोस ना अश्क्या रोज सकाळी??
अशोक - .... .. हो?? ... का??
वनदास - ते दूध चितळ्यांना जातं..
अशोक - ... मग??
वनदास - पण त्याचं जे क्रीम असतं ना?? ते नक्कीच बोरगेंकडे जात असाव.. असा तो तळवा हाताचा..
अशोक - काय बोलेल...
वनदास - गुलाबी रंग निसर्गाने जणू त्या तळव्याकडूनच उचलला...
अशोक - हात हातात घेण्याव्यतिरिक्त काही केलं असलंत तर बोल नाहीतर बास कर..
वनदास - केलं तर???
अशोक - काय??
वनदास - मी तिला तिथल्या तिथेच तिच्यावर एक कविता रचून दाखवली...

बोंबललं! दिल्या उठला. अश्क्याने त्याला दाबला. कसाबसा दिल्या बसला.

अशोक - कविता ऐकवायची नाही ठरलेलंय .. बास कर तुझं पुराण...

===========================================

त्या दिवशीच्या पार्टीचा अशोकला काहीही त्रास झाला नाही. तरीही काळजी म्हणून दिल्याने पुन्हा पार्टी होऊ दिली नाही रूममधे! मात्र या महिन्याभरात आत्मानंद आंगनला किमान सोळा वेळा गेला होता. आता त्याच्याहीकडचे पैसे संपत आले होते...

.... आणि... कॉलेजचे ते दिवसही... दिवाळीची सुट्टी उद्यापासून...

आज रूम नंबर २१४ मधे कुणीच कुणाशी बोलत नव्हतं! खिडकी उघडायला लागल्यापासून दिल्या अंगभर कपडे घालून बसायचा! कॉलेजचा कालचा शेवटचा दिवस होता. आजचा एक दिवस फक्त आवराआवरीसाठी आणि रात्रीच्या गाडीने सगळे आपापल्या गावी!

खिन्न सकाळ होती ती! सामान फारसे नव्हतेच कुणाचे! फक्त घरच्यांसाठी काहीतरी गोडधोड घेऊन जायचं म्हणून सगळे खरेदीला बाहेर पडले. दिल्या एकटाच रूमवर थांबला. बोलत कुणीच कुणाशी नव्हतं!

सहा महिन्यांचा चोवीस तास असलेला सहवास पंधरा दिवसांसाठी अप्राप्य होणार ही भावनाच सहन होत नव्हती कुणाला! घरच्यांना भेटायची ओढ तितकीच होती! कधी एकदा आई, वडील, बहीण वगैरेंना आणि गावातल्या मित्रांना भेटतोय असं झालं होतं! पण... आजचा दिवस मात्र जीवावर आला होता.

आज संध्याकाळी मात्र... कुणीही काहीही न ठरवताच ठरलं! बाटली आणायची!

वन्याची बस शिवाजीनगरहून रात्री अकराला होती. आत्मानंदचीच बस वन्याने सिलेक्ट केली होती. निदान अहमदनगरपर्यंत रूमवरचा एक तरी मित्र बरोबर असेल म्हणून!

त्यांची अकराची बस पकडायला त्यांना दहा वाजत निघावं लागणार होतं म्हणून अशोकनेही साडे दहाची स्वारगेटवरून सुटणारी पुणे कोल्हापूर रातराणी निवडली होती.

संध्याकाळी सहा वाजताच ओल्ड मंकचा खंबा ओपन झाला. चीअर्स झाल्यानंतर पुन्ह शांतता पसरली. दोन राउंड होईपर्यंत कुणीच बोलत नव्हतं!

मग आत्म्याला आवाज फुटला.

आत्मा - सगळे शांत बसलेत... .... न... नकोसं वाटतं नाही जायला???

'नकोस वाटतं नाही जायला' हा फार नकोसा विषय होता. पण तोच विषय सगळ्यांची मने व्यापून होता.

दिल्या - गप रे? पंधरा दिवस जायचं तर इतकं काय गंभीर व्हायचं???

दिल्याचे हे वाक्य कृत्रिम आहे हे दिल्यासकट सगळ्यांना माह्त होते.

वनदास - बहिणीला ड्रेस घेतला मी....
आत्मा - मीही...
अशोक - मी दादाला शर्ट.. वहिनींसाठी एक पुस्तक घेतलंय.. विनोदी... उगाच आपलं वाचायला...
वनदास - आत्म्या... जालन्यहून निघशील तेव्हा मला कसं कळवशील??
आत्मा - बसचं टायमिंग सांगेन... फोनवर...
वनदास - फोन नाहीये ना...
आत्मा - मग??
वनदास - मी करीन तुला फोन... बावीस तारखेला..
आत्मा - हं...
वनदास - जालन्याला जाऊन घेऊ नको हां एकदाही...
आत्मा - छे छे.. आमच्या परिवारात ते हीन समजलं जातं...
अशोक - दिल्या.. तू काय करणार?? पंधरा दिवस??
दिल्या - काय करणार..! बसणार इथेच... तेवढीच शांतता.. तुम्ही चाललायत हाच केवढा आनंदय..
आत्म - ... तुमच्या... घरी कोण कोण आहे????

दिल्याची अत्यंत कोरडी नजर आत्म्याकडे वळली.

दिल्या - आज... सहा महिन्यांनी विचारावसं वाटलं हे तुला??

अशोक - खरंच दिल्या... सॉरी...पण.. कोण कोण आहे...??

दिल्या - तुझे... तुझे पणजोबा जिथले दिवाण होते ना?? ते.. माझं घराणं आहे...

तिघांच्या मनात उमटलेल्या धक्याच्या लाटा रूम नंबर २१४ ला ढवळून गेल्या...

अशोक - ... दिल्या... काय.. सांग... ते... ते राऊत आहात तुम्ही??

दिल्या - हं... म्हणून तर आमदारांची बहीण केली माझ्या बापाने...

अशोक - .. बापाने काय म्हणतोस दिल्या??

दिल्या - मग काय म्हणायचं?? ... एक नंबरचा जुगारी, बेवडा साला... आईला छळलं माझ्या...

अशोक - छळलं???

दिल्या - चटके द्यायचा चटके XXXXX

आत्मा - भयंकर...

अशोक - का पण??

दिल्या - दुसरी बायको केली होती... तिला घरात आणायला निघालावता.. आई चिडायची..

अशोक - तू... तू केवढा होतास??

दिल्या - केवढा म्हणजे?? तीन वर्षांपुर्वीच्या गोष्टी आहेत या...

अशोक - .. तू ... इथे येण्याआधीच्या...

दिल्या - हं... म्हणून तर आलो मी इथे...

अशोक - म्हणजे??

दिल्या - त्या दिवशी संध्याकाळी खूप प्यायलावता गुत्यावर... शिवीगाळ करत होता समोर येईल त्याला.. एवढा पैसा असून देशी प्यायचा साला... येताना घरी थेट यायचं तर.. त्या .. कोल्हाटणीला.. सुंद्राला घेऊन आला घरी... आईने दारात अडवलं... आईला खूप शिव्या दिल्या.. ती नालायक बाई नुसतीच हसत होती... मी वरच्या मजल्यावर होतो... मला पाहवलं नाही.. मला मोठा किंवा लहान काका असता तर त्याने तरी बापाला लायनीवर आणला असता... पण एकटाच तो.. मीही एकटाच.... ते भांडण पाहून खाली आलो... बापाला बोललो खूप मी...मी बोलतोय पाहून त्याने मुसळ उचललं ओसरीतलं.. सरळ माझ्या डोक्यात घालायला आला.. एरवी खूप प्रेम करायचा माझ्यावर... पण प्यायलेला असला अन सुंद्राबाईचा विषय निघाला की मात्र मारामारीवरच यायचा.. माझंही टाळकं फिरलं होतं... तो प्यायलेलाच होता.. मी त्याचा वार चुकवला आणि रागाच्या भरात तेच मुसळ घेऊन त्याच्याच डोक्यात मारलं... अश्क्या.. माझं आईवर फार प्रेम आहे... तिला शिव्या देणारा आणि छळणारा माणूस म्हणून माझा बापावर फार राग होता... त्या रागात मी ते केलं... झालं भलतंच... रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या.. बापाला दवाखान्यात नेला तर तो गेलेला होता... सुंद्राबाईने कंप्लेन्ट केली... फार मोठं प्रकरण झालं ते... सरळ सरळ मर्डर होता तो... आई मला थोबाडून काढत होती... रडत होती... पण हे तिच्यावरच्या प्रेमामुळे झालं हेही तिला समजत होतं... पण अश्क्या... बायक औरच असतात.. तिचं कुंकू गेलं यामुळे तिचा माझ्यावर राग निर्माण झाला.. तू माझा मुलगाच नाहीस म्हणाली.... पेपरातही आलं होतं बापाचं प्रकरण... सहा महिन्यांनी कसंतरी मामांनी बहिणीच्या प्रेमाखातर वाचवलं मला त्यातून.. मी नीट शिकतही नव्हतोच.. मग मामांनीच इथे घातलं मला... तेव्हापासून... आईने मला.. कधीही घरी यायचं नाही असं सांगीतलं आहे... मी... इथे आल्यापासून घरीच गेलेलो नाही अश्क्या... मला घर नाही.. मला कुणीही नाही.. खरे तर राजघराण्यातला मी... पण.... इथे बसलेला असतो... दारू पीत.. गावाकडे लोक अजूनही कुजबुजतात.. राउताला त्याच्याच पोराने खलास केला म्हणून... केवढं मोठं घर आमचं.... पण आई आता फक्त दोन भजनी मंडळातल्या तिच्या वयाच्या विधवांना घेऊन राहाते तिथे... तीन नोकर आहेत.. ते अजूनही आहेत... सुंद्राबाईला आईने वडिलांची इच्छा म्हणून चक्क थोडं सोनं दिलं... आहे की नाही अक्कल?? ... माझ्या खात्यात नियमीत अन भरपूर पैसे भरायला एका माणसाला सांगीतलेलं आहे.. आजवर तो नियम त्याने मोडलेला नाही... आई पैसे पाठवते हेच मी तिचे उपकार मानतो...शिक्षणाचा बोर्‍या वाजलेलाच आहे.. सगळ्या कॉलेजमधे मी टेरर म्हणून कुप्रसिद्ध आहे... एक सुरेखा मनापासून आवडली... तर त्या नीताने घाण केली... पण माझा तिच्यावरही राग नाही...

रूममधे सन्नाटा पसरलेला होता. हा माणूस प्रत्यक्षात कोण आहे हे कळल्यावर त्याच्याबद्दल आदरच निर्माण झालेला होता.

आत्मा - तुम्ही... माझ्याघरी येता का?? पंधरा दिवस...

वनदास - दिल्या.. माझ्याकडे चल...

अशोक - खरंय... नाहीतर सगळे माझ्याकडेच या...

किती रम्य कल्पना होती. ही सुट्टीही चौघांनी मिळून एकत्र घालवायची!

दिल्या - नाही... जाऊन या... मला सवय आहे...

दहा वाजता दिल्या सोडून सगळ्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. तिघेही निघाले. हॅपी दिवाली या विशेस प्रत्येकानेच प्रत्येकाला किमान चार चार वेळा दिलेल्या होत्या.

आणि सगळे आपापल्या गाडीत बसत असताना... म्हणजे रात्री अकराच्या सुमारास...

रूम नंबर २१४ चे दार ठोठावले जात होते...

अशोक, वनदास आणि आत्मा तिघेही आज गावाला जाणार आहेत हे माहीत असलेली धनराज गुणेची गॅन्ग दाराबाहेर उभी होती.

गुलमोहर: 

तू पूर्णपणे गेलास विसरुनी की मग
मिळते तेव्हा.... केव्हाचे आवडलेले

हा न्याय आहे जीवनाचा!...

क्या बात हे बेफिकीर.....

वा.. मजा आ गया

सही....

येह पेग कुछ जम्या नही ...:(

बहुतेक मला चढलीये वाटंतं .....पुढचे सगळे पेग हार्ड भरा माझ्या साठी ...बर्फ पण नको ....

<<दिल्या - XXX ... असलं तृतीयपंथी उत्तर तुझ्या नानाने दिलंवतं का मैत्रिणीला?? आं?? या रूममधे ही असली कासवाच्या गतीची प्रेमं चालणार नाहीत मला... कोचा करीन कोचा.. म्हणे विद्यार्थी.. ती रंगपंचमी नाही झाली... एकदम हसणं शक्य नसल्यामुळे ती आतल्याआत गदगदली असेल अन त्यामुळे डोळ्यातून पाणी आलं असेल अन गाल लाल झाले असतील साल्या.. >>
जाम हसले...
पण दिल्याची कहणी वाचून हळहळले ही...
शेवटी अस्सल बेफिकीर टच....

मस्त रंग भरत आहेत ----अलकाच्या चेहर्‍यावरची रंगपंचमी - पुर्ण संवाद मजा आली.

बाप रे!!!! आता दिल्याचा ''गु णे'' गँगसोबत ''राडा ''.............. चलो ठीक है... मिलते है एक छोटेसे ब्रेक के बाद.

भूषणजी...... फार छान भाग वाटला हा..... धन्यवाद.

>>>अशोक, वनदास आणि आत्मा तिघेही आज गावाला जाणार आहेत हे माहीत असलेली धनराज गुणेची गॅन्ग दाराबाहेर उभी होती.>>>

अरेरे काहीतरी दिलिपच्या बाजुने नशीबात होउदे. Hope दिलीप पण घरी नसावा. तसा तो एकटा पण भारी आहे.

अशोक, वनदास आणि आत्मा तिघेही आज गावाला जाणार आहेत हे माहीत असलेली धनराज गुणेची गॅन्ग दाराबाहेर उभी होती.>>>
मी ही कादंबरी वाचली नाही कारण वनदास, आत्मा, धनराज वै नावे वाचून पुढे वाचायची इच्छाच होत नाही. कृपया पुढच्या वेळी जरा वाचणेबल नावे द्यावीत पात्रांना. (आता कोणाला शंका आली की वाचले नाही तर हे वाक्य कसे कॉपी केले तर उत्तर - मी प्रतिसाद वाचतेच वाचते कारण आज कोणाचा पहीला नंबर याची मला फार उत्सुकता असते, तर तेव्हा हे शेवटचे वाक्य दिसले.)
(वि.सू. कृपया कोणीही यावरुन माझ्याशी भांडायला येऊ नये. माझा 'भांक्यू' फार कमी आहे. )

छान लिखाण Happy
तिने तिची ती नाजूक करंगळी.. सरकवलीच नाही रे...
आत्मा - बधीर आहेत का त्या? >>> Lol
अलकाच्या चेहर्‍यावरची रंगपंचमी, चितळेंच्या दुधाची क्रीम .... Lol
दिल्याचा भूतकाळ मनाला चटका लावून गेला Sad

सर्वांचे मनःपुर्वक आभार!

या कथेवर अनेक प्रकारची टीका होत आहे. अनेक जण मला प्रतिसादांमधून आधारही देत आहेत.

एकंदर चर्चेत माझ्याकडून कोणी दुखावले गेले असल्यास मी जाहीर दिलगीरी व्यक्त करतो.

पुन्हा सर्वांचे आभार!

मवा,

सप्रेम नमस्कार!

आपले सजेशन वाचले. त्यावरही विचार करतो. कृपया लक्ष ठेवावेत.

धन्यवाद!

हा हा हा,
बापरे, ह्या वन्या ला आवरारे कोणितरि, काय त्या कविता, काय ति प्रेमाला ऊपमा, कात्रजचा घाट, दुधाचे टॅन्कर, चितळ्यांच क्रिम, बोरगेच घर, अहो बेफिकिर, ऑफिस मध्ये वाचतो मि हे.

बाकि तुमच्याबद्दल काय बोलाव, माझि ईच्छा पुर्ण केलित त्याबद्दल कोटि कोटि धन्यवाद(दिम्या च मन उलगडलत हे, मागे मि म्हणालो होतो, सगळ्याच्या मनातल सांगितलत पण दिल्याच्या नाहि)

शेवट बाकि बेफिकिर स्टाईल. Happy

तुम्ही कुठे राहता माहीत नाही नाहीतर घरी येउन पुढचे सगळे भाग (कागदावर उतरवले असल्यास किंवा पी.सी. वर असल्यास) वाचून काढले असते आधीच Happy

जवळ जवळ २२-२३ व्र्षानंतर अस्ल काहीत्री वाचाय्ला िम्ळाले. सुहास िशर्व्ळकरांची 'दुिनयादारी' आठवली.
खूप छान जमले आहे.

छान आहे हा भाग. सगळ्यांच्या प्रेमाच्या गाड्या रुळाला लागल्या तर.
बाकी आत्म्याचं पिणं फार वाढलयं, असो तोही कथेचा भागच असेल.
पु.ले.शु.

Pages