आला कार्तिक महिना..

Submitted by किश्या on 21 September, 2010 - 02:04

http://maayboli.com/node/19878 हि पोस्ट पाहताच मन कुठेतरी आठवणीत गुंतलं मला तो काळ आठवला ज्या वेळी मी फार लहान होतो. माझ गाव मंजरथ हे दक्षीण प्रयाग म्हणुन प्रसीद्ध आहे. आणी कार्तिक महीण्याचं महत्व फार. काही दिवसातच कार्तिक महीना सुरु होईल.

आज मी पुण्यात आहे म्हणुन काही कळतचं नाही कुठला सण आला अन कुठला मराठी महिना आला. पण काही वर्षांपुर्वी अस नव्हतं मी गावाकडे होतो त्यावेळेस कार्तिक महीना जवळ आला की लगेच कळायचा.
त्यावेळेस मी माझ्या आजी सोबतं ४:३० ला उठायचो. पहाटेच मस्तं गुलाबी थंडी असायची. गोधडीतुन बाहेर आल्या आल्या चुली समोर शेकण्यात जी मजा असायची ती शब्दात वर्णन करता यायची नाही. एकी कडे आमचे हे शेकणे चालु असायचे तर एकीकडे आजीची बडबड.
अरे आवरं अरे आवरं असं म्हणता म्हणता आजी पार थकुन जायची.
पण माझे मात्र राख हातात घेऊन मजेत चुली समोर दात घासणे चालु असायचे. आणी उरलेली झोप सुध्धा. मग अचानक पठीवर धपाटा बसायचा मग डोळे खाडकन उघडायचे. घाई घाई दात घासुन चुलीवरील गरम पाणी घ्यायचे आणी तोंड धुवायचे. त्या थंडीत गरम पाणी आहाहाहा.....
चुलीवर तापल्यामुळे त्यालाही एक प्रकारचा वास असतो.( आत्ता लिहताना सुद्दा अंगवर शहारे आले आहेत.) गरम पाण्याचे अर्धे भांडे माझ्या तोंड धुन्यातच रीकामा व्हायचं. मग तोंड धुवुन होई पर्यंत आमचा गडी आलेला असायचा. तो आला की गाई वासरे हंबरडुन उठायचे, लगेच त्याची धार काढण्याची घाई सुरु व्हायची. धार काढुन झाली की लगेच आजी त्यातील एक ग्लास लगेच प्यायला द्यायची. धारोष्ण दुधं काय त्याची चव होती...
हे सगळं होई पर्यंत आजीची अंघोळ झाली असायची आणी तीने माझ्या अंघोळी साठी पाणी काढुन ठेवायची. आजीची अंघोळ झाल्यावर ती फारच सुंदर दिसायची. कुंकु कपाळावर लावताना ती एखाद्या देवी सारखी भासायची.
माझी अंघोळ होई पर्यंत तिचं आवरुन झालेलं असायचं पण फुलारी भरण्याची तिला घाई असायची. मग ती माझ्या मागे लागायची हे भर ,ते भर, सोवळ्याच पाणी घे, कारण मी अंघोळ केली म्हणजे मी सोवळ्यात झालो असं ती म्हणायची.

आमचं सगळ आवरुन झाल्यावर आम्ही काकड आरतीला गंगेला जायला निघायचो. घर सोडुन थोडस पुढे आलं की लगेच मारुती मंदीर आहे तेथे सकाळी ४ वाजल्या पासुन भजन सुरु असायचं. दिवस असुन झोपलेलाच असायच मी एक हातात कंदील आनी एक हात आजीच्या हातात देऊन चालु लागायचो. पायवाट अंधारात हरवलेली असायची काटे शोधुन जावे लागायचे पायाची बोटे पार गारठुन जायची मातीची खडे तर खिळे टोचल्या प्रमाणे वाटायचे पण चप्पल घालता येत नसायची कारण घातली तर परत अंघोळ करुन सोवळ्यत व्हाव लागायचं. वाटाने चालता चालता आजी मला सगळे स्तोत्र म्हणायला लावायची, पण माझे लक्ष चांदणे आणी चंद्र या कडे लागलेले असायचे.
रात्र भर जागुन चंद्र झोपण्यास निघालेला असायचा आनी एकीकडे सुर्य झोपेतुन ऊठण्याच्या तयारीला लागलेला असायचा.
चिमण्यांची चिव चिव सुरु व्हायची. कुठल्यातरी खोपटातुन धुराचे लोट बाहेर पडायचे आणि दुर जाउन ते अंधाराशी स्पर्धा करायचे. हे बघता बघता गंगेचा घाट कधी यायचा कळायच नाही. मग आजी गेल्या गेल्या गंगेच दर्शन घ्यायची व मला ही व घ्यायला लावायची. मग तिची आरती सुरु झालेली असायची मी आपलं गंगेच्या पाण्यात खेळन्यात मग्न असायचो.
बरेच मुले व्यायाम काढायला गंगेला आलेली असायची, गावातील मुली सुध्धा काकड आरतीला आलेल्या असायच्या. सकाळी ५ ते ५:३० च्या दरम्यान सुध्दा खुप गर्दी झालेली असायची.

हाच तो घाट जिथे माझं बालपन गेलं .

आजीची पुजा झाली की आम्ही घरी परत यायचो. तो पर्यंत गड्याने सगळं अगंण आवरुन झाडुन स्वछं केलेल असायचं आजी त्यावर सुंदर रांगोळी काढायची. त्यावेळेस आजोबांची पुजा सुरु असायची. मी तीथे जाउन त्यांच्या मधे मधे करायचो.
ह्या वेळेस आजीची घाई चालायची कारण आजोंबाना पुजा झाली की लगेच जेवायला पाहीजे असायचं त्यामुळे आजी स्वंयपाक घरात जाऊन चुलीवर बाजरीची भाकरी टाकायची .
त्या हिवाळ्यात गरम गरम बाजरीची भकरी खाण्यात जी मजा असायची ती आज "नाश्ता" करण्यात नाही.
अशी दिवसाची दररोज सुरुवात व्हायची आणी एके दिवशी दिवाळीची चाहुल लागायची.

पण आज, आठवणींन शिवाय काहीही उरलेलं नाही. सकाळी उठणे हॉटेल मधे जाऊन तेच रटाळ पोहे खाणे आणी भाकरीचा चंद्र शोधण्यात दिवस घालवीने.....................बसस्स्स्स्स्स्स्स्स्स्स....

गुलमोहर: 

खुप मस्त...अगदी खरय्....किश्या,
पण आज, आठवणींन शिवाय काहीही उरलेलं नाही. सकाळी उठणे हॉटेल मधे जाऊन तेच रटाळ पोहे खाणे आणी भाकरीचा चंद्र शोधण्यात दिवस घालवीने.....................बसस्स्स्स्स्स्स्स्स्स्स....

वाचुन डोळ्यात पाणी आले....

सावरी...

सावरी,
आभारी आहे... खरंच गं आता गावकडे गेले तरी तो निवांतपणा नाही सापडत...
जीव तुटतो कधी कधी.....

किश्या, छान लिहिलेय.
पण कार्तिक बद्दल आणखी लिहायला हवे होते.
याबाबतीत मी अतिश्रीमंत आहे. माझे आजोळ, अजून सर्व जून्या खुणा जपतेय.

माझे आजोळ, अजून सर्व जून्या खुणा जपतेय.>>>>>
दिनेशदा.
अरे माझे गाव सुध्दा हे सगळं जपत आहे......
पण हे सगळं मला उपभोगायला मिळत नाही ना...........
हे दुखः आहे

किश्या,
छान लिहिलंयस Happy
कार्तिकस्नान आणि काकडआरती, फुलांची परडी, सडा घातलेलं अंगण आणि चुलीवरची बाजरीची भाकरी
सगळं डोळ्यापुढे येतंय :))

.

किश्या.... निव्वळ अप्रतिम रे.... Happy
सगळ डोळ्यासमोर उभ राहत होत वाचताना. हे मी कधीच अनुभवल नाही रे... Sad
उभ आयुष्य शहरात गेल. आणी शेवटही याच कॉन्क्रीटच्या मातीत होणार..... Happy

किश्या, खुपच छान लिहिलं आहेस.

सगळ डोळ्यासमोर उभ राहत होत वाचताना.>>>>स्मितहास्यला अनुमोदन.

छान...

पहिल्या प्रेमाची सुरुवात सुध्दा इथेच झाली.>>> हे काय झेपले नाही आजुन डिटेल्स कुठे आहेत ..
गावाकडे एकतर्फी प्रकारच जास्त असतो Rofl

किश्या, मस्तच रे. अगदी गावची आठवण करुन दिलीस. कार्तिक एकादशीचा उत्सव म्हणजे काय वर्णावे... शंकराच्या देवळात अखंड २४ तास भजन, काकड आरती, त्या अनवट चाली सगळेच भारलेले.

चुलीजवळचे अजुन एक अ‍ॅड करायचे म्हणजे रात्री आपल्याच कुशीत झोपलेली मांजरे आपल्याच आधी उठुन चुलीजवळ शेक घेत बसलेली असतात आणि आपण येऊन बसले की पुन्हा शेपटी फुलारुन अंगचटीला येतात आपल्या...... गुदगुल्या....... असे वाटतेय आता उठावे आणि गावाला पळावे.

मस्त.

..

चांगले लिहिले आहेस. असे वातावरण फक्त गावातच मिळेल. गरमगरम बाजरीच्या भाकरीचा नाश्ता.... सुखच.

किश्या, छान जमलाय लेख. सगळं डोळ्यांसमोर उभं रहाता रहाता, धप्पाककन गेलंही.
अजून थोडा हवा होता हो. त्या फोटोच्या ठिकाणी जरा कुठे सुरू होतोय असंच वाटलं.... खरच....

खुप खुप छान लिहला आहे लेख ... मी तर दोनदा वाचला , खुपच आपला वाटला वाचताना Happy
अजून लिहायला पाहिजे होत...

चुलीवर तापल्यामुळे त्यालाही एक प्रकारचा वास असतो.>>>>>> आहाहा खरच तो वास अगदी मनाला स्पर्शून गेला Happy

<<पायाची बोटे पार गारठुन जायची मातीची खडे तर खिळे टोचल्या प्रमाणे वाटायचे >> हो पण फार मजा यायची , खुप वेगळ वाटायच
<<चिमण्यांची चिव चिव सुरु व्हायची. कुठल्यातरी खोपटातुन धुराचे लोट बाहेर पडायचे >> मस्त आल्हाददायक
<<पण आज, आठवणींन शिवाय काहीही उरलेलं नाही. >> खरय डोळ्यात पाणी आले Sad