ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग ४

Submitted by बेफ़िकीर on 23 September, 2010 - 23:11

आत्मानंद - काय झालं? मला तरी त्यांच्यात काही वावगे वाटले नाही...

वनदास - नाही वाटले ना? चांगलंय... चांगलंय...

अशोक - त्यांच्यात काहीच नाहीये वावगं .. वावगं आपल्यातच आहे...

आत्मानंद - मला वाटते शिक्षकांबाबत आपण नम्र दृष्टिकोन ठेवायला हवा...

अशोक - हो रे बाबा हो.. ठेवतो हां?? पण वन्या.... जालीम नजर आहे...

आत्मानंद - जालीम विष असते... नजर जालीम??

अशोक - तुम्ही काही काळ आम्हाला मोकळे सोडाल काय?

वनदास - फिगर कसलीय... बॉम्ब आहे बॉम्ब

आत्मानंद - बॉम्ब????

वनदास - तसला बॉम्ब नाही...

अशोक - फळ्याकडे वळताना केस कसले उडवते... झपाक..

वनदास - अन तू पाहिलं का? ... तिला कळतं बर का? कोण कसं बघतंय ते... रोखून बघते..

अशोक - तुझ्याकडे बघितलं असेल... माझ्याकडे कोण बघणार??

आत्मानंद - चांगल्या शिकवतात त्या...

अशोक - ए अरे खरच याच्यासाठी एक रूम बघा रे.. आपला अन्टू होईल वर्षात इथे राहून...

आत्मानंद - मी आता ठरवलंय...

वनदास - काय?

आत्मानंद - याच स्थळी वास्तव्य करून बाबांच्या विचारांचा प्रसार करायचा... मागे हटायचे नाही...

वनदास - बोंबला तिच्यायला...

आत्मानंद - आता हेच बघा, आत्ता जसे तुम्ही 'बोंबला' या शब्दानंतरचा शब्द उच्चारलात तो हळूहळू उच्चारणे बंद करावेत असे मी आवाहन करतो...

रात्रीची जेवणे झालेली होती. आज दारू प्यायचा कुणाचा मूड नव्हता. पहिला दिवस कसा होता यावरची चर्चा दर दोन मिनिटांनी सुवर्णा इनामदार या प्रोफेसरवर येऊन थांबत होती. नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांच्या दृष्टीने सुवर्णा इनामदार म्हणजे हिंदी पिक्चरची नटीच होती. कित्येक म्हातारे प्रोफेसर्सही तिच्याशी जरा आपुलकीनेच बोलायचे. ती सतत खळखळून हसत असायची. डोळ्यात डोळे घालून पाहायची. तिला सोडायला अन न्यायला तिचा नवरा यायचा. तो तिच्या मानाने अगदीच सामान्य होता रुपाने! त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटायचे.

अशोक आपल्या बेडवर अस्ताव्यस्त पहुडला होता. वनदास दोरीवरचे वाळलेले कपडे घड्या करून ठेवत होता. आत्मानंद उदबत्ती लावून हनुमानापुढे ओवाळत होता. त्यातला काही धूर शकिलाच्या फोटोवरही जाऊन येत होता.

दिल्या...... दिल्या मात्र रूमच्या बाहेर गेलेला होता. हे सगळे रूमवर आले तेव्हापासूनच तो नव्हता. तो कुठे गेलेला असेल याची कुणाला कल्पनाही नव्हती अन लगेच त्याचा शोध घेण्याची गरजही नव्हती.

वनदास - फिजिक्सच्या जोशीला बॉन्ड म्हणतात

अशोक - का?

वनदास - कारण त्याच्या डिपार्टमेंटमधे बाकी सगळ्या बायकाच आहेत....

अशोक - म्हातारा बॉन्ड...

आत्मानंद - जय देव जय देव जय जय हनुमंता....

अशोक - तुमचेनी प्रसादे लाभुदे शकीला हो... जय देव जय देव....

आत्मानंद - असलं घाणेरडं कडवं नाहीये आरतीत...

अशोक - टाकायचं आपण... दिल्या येणारे का नाही??

संध्याकाळपासून दिल्या गायब होता. सगळेच कंटाळलेले, सुस्तावलेले होते. अशोक पडल्या पडल्या घरचा विचार करत होता. घरी खूप भांडणे झाली होती. मोठा भाऊ आणि वहिनी तावातावाने वडिलांशी भांडले होते. अशोकच्या एकट्याच्या शिक्षणासाठी एवढा खर्च केला म्हणून! पण वडिलांनी स्पष्ट सांगीतले होते.

"तुझी शिकायची इच्छा नव्हती, तुझ्यासाठीही केला असता, माझा एक मुलगा इंजिनीयर होतोय, मला नाही का वाटणार वडील म्हणून, की जमेल ते करावे त्याच्यासाठी, आणि मी माझ्या पुंजीतून पैसे घालतोय, तुझ्याकडे मागतोय का एक पैसा तरी??'

प्रॉब्लेम हाच होता मोठ्या भावाचा! वडिलांच्या पुंजीतला एक मोठा भाग अशोकच्या शिक्षणास जाणार होता हे त्याला पाहवत नव्हते.

अशोकला आईची आठवण आली. दोन वर्षांपुर्वीच ती गेली. ती असताना वहिनी नाही म्हंटले तरी जरा वचकून असायची. कारण अशोकची आई तोंडाळही होती आणि झापायचीही! वडील शांत होते स्वभावाने! आज आपली आई असती तर दादा आणि वहिनी असे बोललेच नसते बाबांना हे अशोकला आत्ताही जाणवले. म्हातार्‍या बाबांनी त्यांचे पैसे देऊन आपली फी अन डोनेशन भरले आहे, होस्टेलचे पैसे भरले आहेत. अशोकला हे आठवून वाइट वाटले. किती स्वप्ने आहेत त्यांची! आपण इंजिनीयर व्हावे, मस्त नोकरी करावी! बिचार्‍यांना उगीचच दादा बोलला. आता घरी आपण निघून गेल्यावरही वाद होत असतील का? कसे राहात असतील ते??

गंमत असते. माणसे समोर असताना 'टेकन फॉर ग्रॅन्टेड' स्वरुपाचे वागणे असते आपले. लांब गेल्यावर जाणवते. किती महत्वाची होती ती माणसे ते! अशोकच्या आजोबांनी व्यसने करून पणजोबांनी कमवलेली सर्व दौलत उधळून लावलेली होती. आता फक्त एक जुनाट गंजलेली बंदुक आणि एक पेंढा भरलेला काळवीट इतक्याच खुणा राहिल्या होत्या घरात! वडिलांनी मात्र सदाचरणाने नोकरी करून संसार उभा केला. आजोबांचेही प्रेमाने केले. पण आता आई गेली आणि अशोक इकडे आला अन वडील एकटे पडल्यासारखे झाले. आई गेल्यानंतर अशोकला दारूचे व्यसन लागले होते. आजवर कसेबसे ते लपले होते. ज्या दिवशी प्यायची असायची त्या दिवशी तो मित्राकडेच राहायचा. त्यामुळे लपले होते. आता तर काय होस्टेलवरच आला होता. दिल्याचे सुरक्षाकवचही होते. पण आत्ताच त्याच्या लक्षात आले. मित्रांनी निघताना दिलेले दोन्ही खंबे आपण पहिल्या दोन दिवसातच या लोकांमधे संपवले. आता? आपण पैसे कुठून आणणार?? प्यायची तर आहे.... काहीतरी शक्कल लढवलीच पाहिजे...

इकडे वनदास कपडे वाळत टाकून मगाशी अर्धे विझवलेले एक थोटूक पुन्हा पेटवून तंद्री लागल्यासारखा आढ्याकडे पाहात आडवा झाला होता.

त्याचा प्रॉब्लेमच वेगळा होता. त्याच्या वडिलांचा स्वतःचाच शिक्षणाला विरोध होता. आहे त्या जमीनीवर थोडी शेती आणि एक चहाचे दुकान चालवणे ही त्यांच्यामते वनदासची कर्तव्ये होती. ती डावलून तो इकडे शिकायला तर आलाच होता, पण त्यासाठी प्रचंड खर्च झाला होता. हा खर्च न पेलणारा असल्यामुळे वनदासच्या आईने थोडे सोने विकले होते. आणि ते परस्पर विकले होते. ते समजल्यावर वडिलांनी वनदास आणि त्याची लहान बहीण वनिता यांच्यासमोर आईला फोकाने बडवून काढले होते. आई किंचाळत असताना वनदास मधे पडला तेव्हा त्याला लाथ मारली होती. आणि एवढे सर्व रामायण सोसून तो शेवटी इकडे शिक्षणाला आला होता. त्याच्याही वस्तीत काही टारगट पोरे होती अन त्यांच्या नादाने त्याला त्याच्या सात पिढ्यात नसलेली सवय लागलेली होती... दारुची! आणि हे जेव्हा बापाला समजले तेव्हा वनदासने अभुतपुर्व मार खाल्ला होता. पण त्यानंतर त्याने वडिलांना दारू सोडल्याचे शपथ घेऊन सांगीतले होते आणि दारू चालूच ठेवली होती. फक्त चोरून! रुपाने सामान्य असलेल्या बहिणिच्या, वनिताच्या लग्नासाठी आईच्या सोन्याचा उपयोग होणार होता. पण आईने ते वनदाससाठी वापरले यावरून खूप मार खाल्ला होता. आत्ताही वनदास तोच विचार करत होता. आबा अजूनही आईला मारत असतील का भांडणे काढून?? वनिता सांभाळू शकत असेल का परिस्थिती?? आपण इथे येऊन आईला अधिक संकटातच लोटले आहे. आता त्या बिचारीला इंजिनीयर होऊन दाखवायचे अन नोकरीतून सगळे सोने परत घ्यायचे.

दिल्या रूमवर नसल्याने कुणाचेच कुणाकडे लक्षच नव्हते. याचाच फायदा घेऊन हनुमानाच्या फोटोपुढे हात जोडून प्रार्थनेला उभा असलेल्या आत्मानंदची नजर हळूच शेजारच्या शकिलावर स्थिरावत होती. अर्धी अधिक छाती उघडी टाकणार्‍या त्या टॉवेलमधून दिसणार्‍या तिच्या क्लिव्हेजमधून आत्मानंदची पवित्र नजर आणखीन खाली उतरण्याचा प्रयत्न करत होती. दोन क्षण तेथे पाहून तो पटकन या दोघांकडे पाहात होता आणि चोरी पकडली न गेल्याच्या आनंदात पुन्हा शकिलाकडे!

दिल्या सगळ्यांत मोठा होता. बावीस वर्षाचा! अशोक एकोणीस आणि वनदास आणि आत्मानंद अठरा कंप्लीट!

आत्मानंदचे वडील कीर्तनकार होते गाजलेले. त्यांचे दोन कार्यक्रम टी.व्ही.वरही झालेले होते. घरात सर्वत्र सोवळ्याचे वातावरण होते कारण आजी आजोबा दोघेही हयात होते अन वडीलही धार्मिक! आई मात्र भांडकुदळ होती. आत्मानंदलाही एक बहीण होती लहान! तिचे नाव त्रिवेणी! ती अजून शाळेतच होती. आत्मानंदवर अत्यंत धार्मिक संस्कार होते. परवा घशात गेलेल्या दारुच्या घोटांचा त्याला घनघोर पश्चात्ताप होत होता. पण इलाज नव्हता. खरोखरच होस्टेल भरलेले होते, कोणतीच रूम रिकामी नव्हती आणि दिल्याने त्याला इतर रूमवर गेल्यावरही त्रास दिलाच असता. त्याला बाबांचे शब्द आठवले. 'माणसे कशीही असोत, आपण चांगले वागून त्यांचे मन बदलायचे असते'!

पण आत्मानंदला काही सुप्त आनंदही होऊ लागले होते. येथे प्रचंड स्वातंत्र्य असल्यामुळे मुलींबाबत होणारी बाकीच्या तिघांची बिनधास्त चर्चा निदान ऐकता तरी येत होती. नवीन शब्द समजत होते. तो मनातल्या मनात ते शब्द उच्चारूनही पाहात होता. त्यातच सारखी शकिला समोर दिसू शकत होती. हे स्वातंत्र्य घरी कधीच मिळाले नसते. आणि मुख्य म्हणजे आज एफ. एम. च्या पिरियडला सुवर्णा मॅडमना बघून त्यालाही जरा 'तसं'च वाटलं होतं. पण बोलता येत नव्हतं!

मात्र त्याला इथे अनेक प्रॉब्लेम्सही वाटत होते. दिलीप या माणसावर परिणाम झालेला आहे याची त्याला खात्री वाटत होती. त्यातच अशोक अन दिलीप केव्हाही एकमेकांना सरळ फटके मारतात याचेही त्याला आश्चर्य वाटत होते. श्वास घेताना त्रास होत होता कारण सतत खोली धुराने भरलेली असायची अन दिल्याच्या बाजुची खिडकी बंद असायची. त्या खिडकीचे नाव एकदाच काढले तेव्हा दिल्या पिसाळला होता. आणि आत्मानंदने डोळ्यादेखत इतकी दारू आपल्यासमोर प्यायली जाते हा प्रकार प्रथमच बघितला होता.

संपलेलं थोटुक तसंच जळत्या अवस्थेतच कुठेतरी फेकून वनदासने शांततेचा भंग केला...

वनदास - दिल्या कुठंय रे??
आत्मानंद - मीही तेच विचारणार होतो....
अशोक - बसला असेल आंगनला.. नाहीतर कुठेतरी...
वनदास - ए आत्म्या... अरे बास की आता आरती....
अशोक - आज प्यावीशी का वाटत नाहीये रे??
वनदास - मला वाटतीय...
अशोक - प्यायची का?
वनदास - आहे का?
अशोक - छे! संपले की दोन खंबे दोन दिवसात... काल नवीन आणलेल्या व्होडकात एखादा पेग राहिला असेल.

वनदास - तोच मारू तीस तीस...
अशोक - मी कधीही तीस घेत नाही... एक तर घेणार नाही.. घेतला तर लार्जच..
वनदास - का रे असं??
अशोक - वो एक लंबी कहानी है..
वनदास - हाड साल्या.. फेकतंय काहीही...
अशोक - एक पन्नास रुपये काढ की..
वनदास - .... पन्न..... हे घे.. चाळीस आहेत...
अशोक - .. हे माझे... वीस..
वनदास - काय करायचं?
अशोक - ओ.टी.ची निप आणकी..
वनदास - तंगडतोड मीच करायची का?

हा प्रश्न दिल्या असता तर वनदासने विचारला नसता.

अशोक - चल... दोघंही जाऊ.. तिकडेच लावू अन येऊ..

आत्मानंदला आनंद वाटला. हे दोघेही तासभर बाहेर गेले तर शकीलाकडे डोळे भरून पाहता येईल हे त्याला माहीत होते.

आत्मानंद - तुम्ही या जाऊन... मी आहे काळजी घ्यायला रूमची...
अशोक - कसली काळजी घेतो?? आहे काय रूमवर?? चल.. तू पण यायचंयस...
आत्मानंद - मला जरा डोळे जड वाटतायत... निजतो जरा...
अशोक - उचलरे वन्या त्याला..
वनदास - याला कशाला न्यायचंय??
अशोक - रूमवर नको हा एकटा...
आत्मानंद - का????
अशोक - दिल्या आला अन काय झालं तर याला बडवेल....

ही मात्रा मात्र लागू पडली. दोरीवरचे कपडे ओढून वन्या अन अशोक तयार झाले. त्या आधीच आत्मानंद तयार झाला.

लोटलेल्या दारातून वनदास बाहेर पडणार तोच....

धाडकन दार उघडून दिल्या आत येऊन कोसळला आणि 'आईगं...साल्यांना बघतोच.." असा ओरडला.

हे दृष्य भयंकर होतं! दिल्याला उठताही येत नव्हतं! सगळेच त्याच्याकडे धावले. त्याच्या शरीरावर एकही जखम नव्हती.. 'काय झालं, काय झालं' म्हणत सगळेच त्याला उठवू लागले. तो ओरडत होता. वनदासने पटकन रूमचे दार आतून बंद करून घेतले. बाहेरच्यांसमोर तमाशा नको म्हणून..

दिल्याला पलंगावर आडवा केला अन पाणी दिले...

अशोक - काय रे दिल्या??? .. अरे.. काय झालं काय???

वेदनांनी तळमळत असलेला दिल्या म्हणाला...

दिल्या - डॉलीला छेडल्याची कंप्लेन्ट केली साल्याने...

वनदास - कोण डॉली????

दिल्या - शिर्क्याची मुलगी... एस वाय ला आहे...

अशोक - शिर.... शिर्केने कंप्लेंट केली...

दिल्या - हा...

आत्मानंद - का???

दिल्या - कालच्या इन्सल्टचा बदला घ्यायला...

अशोक - दिल्या... अरे... तू मामांना फोन नाही करायचास...

दिल्या - करू देत नव्हते.. शेवटी करू दिला.. म्हणूनच सुटलो... लय बेकार धुतलाय मला चौघांनी... एकेकाला साल्याला बघून घेणारे मी.... बरा होऊदेत मला....

आत्मानंद - यांना... माझ्याकडे तेल आहे... मी यांना तेल लावून देऊ का??

दिल्या - अश्क्या... या मच्छरला माझ्या डोळ्यापुढे ठेवू नकोस... वन्या.... हे घे दोनशे रुपये... ओल्ड मंक आण फुल्ल...

आत्मानंद - तुम्ही आत्ता... पिऊ नका.. अशोक .. यांना सांगा ना...

दिल्या - आईशप्पथ अश्क्या याला बोलू देऊ नकोस.. सांगतोय तुला....

वनदास केव्हाच बाटली आणायला बाहेर धावलेला होता. अशोकने आत्मानंदला गप्प केले. पंधरा मिनिटे दिल्या तळमळत होता. शिव्या देत होता. अशोकच्या मनात आता प्रचंड राग आला होता शिर्केबद्दल! वनदास घाईघाईत आत आला आणि काही इतर करायच्या आत दिल्याच्या तोंडात तीन ड्राय घोट सोडले...

पाच दहा मिनिटांनी तरल भावना निर्माण झाल्यावर दिल्या जरा उठून बसला...

दिल्या - पेग भर... फटाफटा पेग भर....

वनदासने तीन लार्ज पेग भरले. पाण्यातच! दारू मिळाली तर होती... पण या असल्या कारणाने दारू कुणालाच मिळावीशी वाटत नव्हती. पण दिल्यासमोर 'न पिणे' हाही एक अपराधच होता....

'चीअर्स'ही म्हणाले नाही कुणी... फक्त दिल्या म्हणाला... 'हा पेग अन याच्यानंतरचे आजचे सगळे पेग.. शिर्केला अद्दल घडवण्यासाठी'

कसं झालं काय झालं याची कहाणी दिल्याकडून ऐकता ऐकता दिड वाजला. दिल्याची काहीच चूक नव्हती. फ्रॉम नो व्हेअर डॉली येऊन धडकली होती. शिर्के इतका नालायक असेल असे दिल्याला वाटलेच नव्हते. तिने सरळ चौकीवरच तक्रार केली. कॉलेजमधेही नाही. शिर्केने काल बसलेल्या शिव्यांचा आणि अपमानाचा सूड घेतला होता. पुन्हा एकदा मामामुळे दिल्या वाचला होता. मामांनी अभुतपुर्व झापलं होतं त्याला फोनवर! काही ऐकूनच घेत नव्हते ते! या पुढे कसलीही मदत करणार नाही असे त्यांनी सांगीतले होते दिल्याला!

दिड वाजला तसा खंबा संपला आणि सगळ्यांच्याच डोळ्यांवर झोप येऊ लागली. होता तिथेच आडवा झाला अश्क्या! वनदास लडखडत्या पायांनी स्वतःच्या बेडवर कसाबसा पोचला...

दिल्या अजूनही तळमळत होता... त्याचेही डोळे मिटले...

एकटा आत्मानंद टक लावून जागा राहिलेला होता....

पहाटे चार साडे चारला ओल्ड मंक जरा उतरली तेव्हा दिल्याला पुन्हा वेदनांनी जाग आली...

आणि दिल्याला दिसले.... ते वेगळेच दृष्य.....

आत्मानंद स्वतःच्या हातांनी दिल्याच्या पोटरीवर तेल लावत होता... त्याही वेळेला.....

गुलमोहर: 

वाह............. सुसाट.. Happy
कहाणीला वळणं येउ लागलीयत.. अन रंगत सुद्धा.

मस्त..

प्रतिक्रिया राखून ठेवतोय........

कारण अजून कादंबरीचा अंदाज आलेला नाहीये.......
लिखाण खूप एकसुरी वाटतंय......
आणि विषय पण खूप कॉमन आहे....

पण साधारण विषयाला सुद्धा अप्रतिम कलाकृतीत बदलण्याचं
सामर्थ्य " बेफिकीर" यांच्या लेखणीत आहे.....
सो ............पु.ले.शु.......

mast

ह्म्म्म्म्म्म्म्म.........

पण साधारण विषयाला सुद्धा अप्रतिम कलाकृतीत बदलण्याचं
सामर्थ्य " बेफिकीर" यांच्या लेखणीत आहे.....

आणि हे खरय.........
'माणसे कशीही असोत, आपण चांगले वागून त्यांचे मन बदलायचे असते'!

आणि दिल्याला दिसले.... ते वेगळेच दृष्य.....

आत्मानंद स्वतःच्या हातांनी दिल्याच्या पोटरीवर तेल लावत होता... त्याही वेळेला.....

पु.भा.प्र.........

बेफिकिर, ग्रेट, सगळ्याच्या मनातले लिहिलत पण दिल्या च्या नाहि, आम्हालाहि कळूदेत ना आतला दिल्या कसा आहे ते, कि तुम्हि हे नंतर सांगणार आहात.

हाहि भाग छानच जमलाय Happy

डॉ. कैलास, मधुकर, रंगासेठ,

आपल्या उदार प्रतिसादांनी आधार मिळतोच!

श्वेता, रोहित - आपल्याला हा भाग आवडला याचा आनंद झाला. धन्यवाद!

प्रसन्न अ - खूप मोठी दाद दिलीत. तिला जागायचा प्रयत्न करेन.

आर आर एस व सनि - मनःपुर्वक आभार!

प्रिय सावरी व परेश - आपल्या आवर्जुन दिलेल्या प्रोत्साहनाचे मनःपुर्वक आभार!

-'बेफिकीर'!

वा!!!

आत्मानंदच्या वडीलांचे म्हणणे - 'माणसे कशीही असोत, आपण चांगले वागून त्यांचे मन बदलायचे असते'! - खरे आहे..
================
आणि दिल्याला दिसले.... ते वेगळेच दृष्य.....

आत्मानंद स्वतःच्या हातांनी दिल्याच्या पोटरीवर तेल लावत होता... त्याही वेळेला.....
================
छान.. मस्तच..

बेफिकीर,
मस्त मस्त मस्त!!!! दिवसभर एका वेगळ्याच मनस्थितीत होते.. त्यामुळे वाचणे झालेच नाही.
किती तरलपणे तुम्ही दिल्या-आत्मानंदमधल्या मैत्रीची कथा रंगवताय...छोटासा पण फार सुंदर, नाजुक भाग होता हा. जाम आवडला. Happy