ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग ३

Submitted by बेफ़िकीर on 23 September, 2010 - 09:34

"येथे शौचमुखमार्जनस्नानादी विधींसाठी काय सोय आहे??"

आत्मानंद जर कोंबडी असता तर दिल्याने त्याची मुंडी हातांनी पिरगाळली असती. आत्मानंद जर बकरी असता तर त्याला दिल्याने कापला असता. पण तो एक माणूस होता. त्याला काहीही करणे हे दिल्याच्या काळ्याकुट्ट कारकीर्दीत आणखीन एक तुरा खोवण्यासारखे झाले असते व त्यामुळे तो आमदारांच्या स्वतःच्याच शिफारसीवरून कॉलेजच्या बाहेर पडला असता.

पण हा सकाळचा प्रश्न अशक्य प्रश्न होता. तो ऐकून दिल्याचे ब्लड प्रेशर पराकोटीने वाढले होते. अशा वेळेस नेमके काय करतात याचा काहीही अंदाज नसल्याने, कारण असा माणूसच यापुर्वी न भेटल्याने, दिल्या अत्यंत थंड व जहरी नजरेने आत्मानंदकडे एकटक बघत होता.

अशोक शांत होता.

प्रॉब्लेम वनदासचा होता. काल चार घोट ड्राय लावल्यावर आत्मानंद 'बरी लागते तशी' असा उद्गार काढून तेच चार घोट चढल्यामुळे चार, पाच मिनिटांमधेच गाढ झोपला होता. तो घोरू लागल्या लागल्या खोलीत हास्यरसाचे धबदधबे वाहू लागले. तेही अश्क्या व वनदासच्या! दिल्या फक्त पीत होता व शिव्या घालत होता. त्याच्या नावीन्यपूर्ण शिव्या ऐकून वनदास आणखीनच हसत होता. विविध प्राणी, विविध रानटी जमातींचे लोक व राक्षसयोनीतील काही नावे दिल्याच्या शिव्यांमध्ये मुबलक प्रमाणात होती. वनदासचा प्रॉब्लेम असा झाला होता की एकतर आत्ताच जेवलेला, त्यात पुन्हा आग्रहाखातर एक लार्ज पेग लावून दुसरा भरलेला आणि आत्मानंदने रंगवलेला दिवस आणि त्यावर दिल्याच्या प्रामाणिक शिव्या! त्याला आता हसणे अशक्य झालेले होते. हसून पोट दुखणे ही अत्यंत प्राथमिक पातळी वाटू लागली होती त्याला! त्याचे आता सगळेच दुखत होते हसून! त्यातच तो झोपला! आणि कसलातरी आवाज झाला म्हणून उठला तर आत्मानंदचा हा प्रश्न!

"येथे शौचमुखमार्जनस्नानादी विधींसाठी काय सोय आहे??"

वनदास आता 'दमल्यासारखा' हसू लागला. म्हणजे त्याच्य चेहर्‍यावरून आता 'नका रे मला हसवू' असे भाव स्पष्ट दिसत होते. आता हसताना त्याचा चेहरा रडल्यासारखा होऊ लागला होता. एवढे होऊनही अशोक शांतच!

अशोक - शौच आपले आपले करावे लागते.

दिल्याचा आता एक वेगळाच प्रॉब्लेम झालेला होता. आजवर त्याला हसू आले तर हसायचे, फार हसू आले तर जोरात हसायचे, अतीच हसू आले तर भिंतीवर बुक्या मारायच्या आणि प्रमाणाबाहेर हसू आले तर भिंतीवर डोके आपटायचे एवढ्याच पातळ्या ठाऊक होत्या. पण सध्याच्या पातळीला हे कुठलेही उपाय लागू पडत नव्हते. डोक्याला टेंगळे यायची वेळ आलेली होती.

त्यामुळे दिल्याने नवीन उपाय शोधून काढला.

सिगारेटचे मनगटावर चटके लावून घेणे! कारण असे काहीतरी वेदनादायक केल्याशिवाय मनातील भावना उचित तीव्रतेने व्यक्त झाल्यासारखे वाटायचेच नाही त्याला!

आत्मानंद - शौच आपले आपले करावे लागते म्हणजे काय? सहाध्यायी असून सकाळपासून थट्टा कसली करता? कुठे आहे शौचालय??

अशोक - बाहेर आहे... दोन आहेत... कॉमन....

आत्मानंद - कॉमन???

अशोक - ... हो... का??

आत्मानंद - म्हणजे रांग असणार....

अशोक - असेल... असली तर काय??

आत्मानंद - शौच म्हणजे काय चित्रपटाचे तिकीट आहे का? आपला क्रमांक आला की काढायला??

अशोक - आपण जाऊन बघा.. तेवढी रांग नसेल....

आत्मानंद - आणि मुखमार्जन...

अशोक - मुखमार्जनासाठी आम्ही कालची राहिलेली असते त्याचा एकेक घोट घेतो.. मुखशुद्धीही होते आणि कालची उतरतेही....

आत्मानंद - मी अत्यंत अयोग्य जागी आलेलो आहे याची मला कालच जाणीव झालेली होती... मी आज माझ्यासाठी नवीन स्थळ शोधणार आहे.... काल जबरदस्तीने मलाही पाजलेली आहेत तुम्ही...

अशोक - पण... आपल्याला ती आवडली ना??

आत्मानंद - तुमच्या आक्रमक देहबोलीला घाबरून मी तसे म्हणालो... आमच्या घरी समजले की वारुणीचे काही थेंब माझ्या मुखात गेलेले आहेत तर सोलून काढतील मला...

वनदास - वारुणी??? ... म्हणजे???

अशोक - दारू... दारू

आत्मानंद - मी बदलणारच आहे माझा कक्ष!

अशोक - असे करू नका... येथे आपण सुरक्षित आहात... इतर मुलांचा भरवसा नाही...

आत्मानंद - आपल्या तिघांसाठी मी एक मनोरंजनाचे साधन बनलेलो आहे... आपल्या तिघांमधे माणूसकी, प्रेम, बंधुता, मैत्री या गुणांचा अभाव आहे...

अशोक - लागली असली तर आधी जाऊन या....

आत्मानंद - चाललोच आहे... स्नानाचे काय??

अशोक - स्नानाचे काय म्हणजे?? मी काय उटणे लावणारा वाटलो का???

आत्मानंद - स्नानगृह कुठे आहे??

अशोक - जिथे आहे तिथेच आहे...

आत्मानंद - मी माझा स्वतःचा पंचा व साबण घेऊन आलेलो आहे..

अशोक - फार उत्तम केलेत...

आत्मानंद - तसे नियमावलीत लिहीले आहे... आपले काय??

अशोक - मी आणलाय की नाही आठवत नाही... या शकिलेचा घेईन तात्पुरता...

आत्मानंद - श्शी! ... रामप्रहरी कसले बोलता....??

अशोक - अहो गंमत केली.... आपले स्नान झाल्यावर आपला पंचा द्या...

आत्मानंद - ते आरोग्यास हानिकारक असते....

अशोक - का??? आपल्याला काही... रोग वगैरे???

आत्मानंद - काय बोलताय??

अशोक - माझे प्रचंड शरीर धुवत बसायला फार वेळ लागतो. त्यामुळे मी तीन दिवसातून एकदा स्नान करतो...

आत्मानंद - राम कृष्ण हरी.... आणि तुम्ही????

वनदास - मी?? मी करतो की?? रोज करतो मी....

आत्मानंद - नशीब.... आणि हे???

दिल्या - अश्क्या... कोचा करीन मी कोचा आता... याला घालव....

अशोक - आपण जा... आवरून या....

आत्मानंद - कोचा म्हणजे?

अशोक - कोचा म्हणजे स्वरूप बदलणे....

आत्मानंद - हे चिडलेत की काय??

अशोक - होय... ते सकाळी चिडतात...

आत्मानंद - का?

अशोक - मर्जी त्यांची....

आत्मानंद बाहेर गेल्यावर दिल्याने नुसतेच दोन चटके लावून घेतले स्वतःला आणि उठून अशोकच्या पाठीत एक सणसणीत लाथ घातली. अशोक केविलवाणा ओरडला. वनदास अजूनही हासतो आहे हे पाहून चिडलेल्या अशोकने 'दिल्याला काहीही करता येणे शक्य नसल्याने' वनदासच्या अंगावर मेणबत्ती फेकली अन म्हणाला "हा हसतो हा... नालायक". ती मेणबत्ती वनदासने चुकवली. त्यानंतर वनदास आणि अशोक वेड्यासारखे हसायला लागले. दिल्या अजून कालच्याच अंडरवेअरवर कृतांत काळासारखा उभा होता दोघांच्यासमोर! त्याला तसा पाहून वनदास आणखीन हसू लागला. ते पाहून दिल्याने वनदासलाही एक लाथ घातली. आता वनदास ओरडला. बराच वेळ दोघे हासल्यावर जरा शांत झाले तेव्हा दिल्या खरोखरच मानसोपचाराची गरज असल्याप्रमाणे नजर करून त्याच्या बेडवर बसला होता.

तासाभराने आत्मानंद फ्रेश होऊन आला. खरे तर आता उगाच त्याच्याशी बोलायची गरज नव्हती. पण अशोक एका दगडात दोन पक्षी मारायला पाहात होता. एक म्हणजे आत्म्याची थट्टा आणि दुसरे म्हणजे त्या थट्टेतून दिल्याला भडकवणे! कारण दिल्याला इतर काहीही करणे शक्य नाही आहे हे कालपासून त्याला समजलेले होते.

अशोक - झाली का??

आत्मानंद - ..... काय??

अशोक - .... आंघोळ???

आत्मानंद - होय... उद्यापासून महाविद्यालयीन कारकीर्दीस प्रारंभ होणार आहे... त्यामुळे महाविद्यालयात कोठे काय आहे याची माहिती मिळवण्यास मी आता जाणार आहे... आपले स्नान झाले असल्यास आपण येऊ शकता...

वनदास - नाश्ता नाय का करायचा??

आत्मानंद - न्याहारी?? जरूर?? कुठे असते न्याहारी??

वनदास - काय माहीत..??

आत्मानंद - तुम्हाला माहीतच नाही अन असे विचारताय जणू काही गेली दहा वर्षे तुम्ही फक्त न्याहारीच करता??

दिल्याने एक बुक्की आपटली.

आत्मानंदने हनुमानाचा एक फोटो सामानातून काढला अन भिंतीवर जागा तपासू लागला. मात्र शकिलाच्या फोटोशेजारी असलेली जागा सोडून एकही जागा नव्हती.

आत्मानंद - हा फोटो जरा काढा... बजरंगबलींचा फोटो लावायचा आहे..

अशोक - शेजारी लावा की?? आहे की खिळा??

आत्मानंद - या भ्रष्ट स्त्री शेजारी बजरंगबली?

वनदास - भ्रष्ट कशी काय? आंघोळ करून आलीय ती...??

आत्मानंद - हो पण ते दाखवायची गरज काय जगाला?? तेही हसत हसत...

अशोक - एकेकाचा स्वभाव असतो मोकळा... ठोका तुम्ही हनुमंताला तिथे....

आत्मानंद - उद्यापासून आपण खर्‍या अर्थाने सहाध्यायी होणार...

वनदास - हे आज सेलेब्रेट व्हायला पाहिजे राव....

आत्मानंद - म्हणजे??

वनदास - तुला नाय.. याला म्हणलो....

अशोक - काल माझे दोन खंबे संपले.. तिच्यायला बाप नवाब माझा???

वनदास - दिलीप....

दिल्या - माझं नाव घेतलं ना?? कुत्र्यागत मारंल...

वनदास - अरे पण लागणार नाही आपल्यालाच??

दिल्या - तू काल काय म्हणाला?? सहा महिन्यातून एखादेवेळी...

वनदास - अरे नवीन ओळख असताना म्हणावेच लागते तसे....

अशोक - दिल्या... आज तुझ्यातर्फे....

दिल्या - बापाची खोलीय का तुमच्या??? एक तर आधी माझ्या खोलीत आलेत...

आत्मानंद - ही जागा महाविद्यालयाची आहे ना??

दिल्याने आणखीन एक बारीक चटका लावून घेतला अन म्हणाला...

दिल्या - अश्क्या... माझ्या हातून हे मेलं ना?? आईशप्पथ तुम्ही सहआरोपी ठराल....

अशोक - पण काही म्हण... आज तुझ्यातर्फे.....

दिल्या - भ**व्यांनो... प्यायची ती प्यायची अन तुझ्यातर्फे माझ्यातर्फे काय करत बसताय?? आण रे जाऊन.. हे घे पैसे....

वनदास - आत्ता???? अकराला उघडत असतील वाईन शॉप..

दिल्या - समोरच्या आंगन व्हेज नॉन व्हेज वाल्याच्या **त लाथ घालून उठव त्याला ... म्हणाव मी मागीतलाय खंबा....

आत्मानंद - हे काय आणायला सांगतायत??

अशोक - तुम्ही गप्प बसा हो जरा...

वनदास पैसे घेऊन निघाला. वेळ सकाळी नऊची! अजून आत्मानंदशिवाय कुणाच्या आंघोळीही झालेल्या नाहीत.

वनदासने त्याच्या स्वतःच्या मताने एक व्होडकाचा खंबा आणला अन हळूच पलंगाखाली ठेवला.

आता चौघेही एकमताने नाश्त्याला गेले. कॅन्टीनमधला नाश्ता कधीच संपला होता. बाबू नावाचा कॅन्टीन अधिकारी निवांत बसला होता.

आत्मानंद - आम्हाला न्याहारी करायची आहे....
बाबू - वेळ समजते का?
आत्मानंद - अहो... उशीर झाला असल्यास माफ करा.. पहिलाच दिवस आहे...

तेवढ्यात बाबूने मागून आलेल्या दिल्याला पाहिले अन तो गंभीर झाला.

दिल्या - चार नाश्ते लाव रे.... अन आठ चहा... पाच मिनिटात आलं पाहिजे....

बाबू - ......... .... बसा....

आत्मानंद बघतच राहिला. सगळे एका टेबलवर येऊन बसले.

आत्मानंद - यांचं वजन दिसतंय...

दिल्याने बाजूची एक प्लॅस्टीकची खुर्ची उगाचच उचलून आपटली.

आत्मानंद - तुम्हाला कधीपासून असं होतं???

हा अत्यंत स्फोटक प्रश्न होता. या प्रश्नाच्या कॉन्सिक्वेन्सेसमधून अशोक आणि वनदासही आत्मानंदला वाचवू शकत नव्हते. दिल्या उठला आणि आत्मानंदची गचांडी पकडून त्याला उभा करत म्हणाला...

दिल्या - तुझी ******* .... जो पर्यंत माझ्या रूममधे आहेस... तो पर्यंत थोबाड बंद ठेवायचं... आणि रूममधून ज्या क्षणी बाहेर पडशील.. त्या क्षणी दिवस मोजायला लाग....

हबकलेल्या आत्मानंदला तिथे बसून उपम्याचा धड एक घासही गेला नाही. चहा मात्र दोन्ही ढोसले त्याने!

नाश्ता करून टोळकं रूमवर आलं आणि आत्मानंदने अशोकला सांगीतले...

आत्मानंद - मी.... जरा जाऊन येतो...

अशोक - कुठे???

आत्मानंद - चौकशी करून येतो...

काहीही स्पष्टीकरण न देता आत्मानंद तडक कॉलेजच्या ऑफीसमधे गेला. तेथील अधिकार्‍यांपैकी जो प्रमुख होता त्याचे आडनाव शिर्के!

शिर्के - काय पायजे?
आत्मानंद - मी आत्मानंद ठोंबरे... राहणार जालना.. वडील.. कीर्त..
शिर्के - इथे काय पायजेल??
आत्मानंद - मला २१४ रूम मिळालीय....
शिर्के - ... मग???
आत्मानंद - ती... बदलून हवीय...
शिर्के - कशाला??
आत्मानंद - तिथे.. फार भयंकर प्रकार चालतात...
शिर्के - कसले भयंकर प्रकार??
आत्मानंद - तिथे अपेयपान चालतं..सिगारेटी ओढतात... उघडे बसतात.. भिंतीवर डोके आपटतात स्वतःचे... काहीही करतात...
शिर्के - दिल्याची रूम आहे ना ती??
आत्मानंद - होय... तेच हे सगळं करतात... मला मारलं मगाशी... कॅन्टीनमधे..
शिर्के - मारलं???

शिर्केची अन दिल्याची जुनी खुन्नस होती.

ही एक चांगली संधी आलेली होती. प्राचार्य डॉ. बोरास्तेंकडे तडक घेऊन गेला शिर्के आत्म्याला!

शिर्के - सर... हा एक आत्मानंद ठोंबरे नावाचा नवीन विद्यार्थी आहे.. सिन्सियर आहे सर...
बोरास्ते - .. मग??
शिर्के - त्याला राऊतने मारले मगाशी... कॅन्टीनमधे...
बोरास्ते - राऊ... का?? का मारले रे??
शिर्के - तो तसाच आहे सर..
बोरास्ते - ए.. तुला विचारतोय... का मारले??
आत्मानंद - त्यांच्यावर मानसोपचार चालू आहेत सर.. ते भिंतीवर बुक्या मारतात.. खोलीत मद्यप्राशन करतात... डोकेही आपटतात भिंतीवर... एका अर्धनग्नावस्थेतील स्त्रीचा फोटो लावला आहे भिंतीवर..
बोरास्ते - शिर्के... हे काय आहे सगळे?? एकदा चौकशी करा... जा बरं याच्या रूमवर.. आणि रिपोर्ट द्या
शिर्के - हो सर... चल रे...

वरात रूमवर आली तेव्हा आत्म्या कुठे गेला असेल यावर काही अंदाज व्यक्त करून ब्लू रिबॅन्ड व्होडकाचे पहिले पेग्ज सकाळी दहालाच भरले गेलेले होते. दार उघडून एकदम शिर्के आत आला तसा वनदास आणि अश्क्या दचकून एकदम उभे राहिले. आपापले ग्लास मागे लपवत गुड मॉर्निंग सर म्हणाले. दिल्या बघण्याचेही कष्ट न घेता अंडरवेअरवरच तंगड्या पसरून आडवा झालेला होता.

शिर्के - काय रे राऊत?? दारू पितोस रूममधे??

आता दिल्याने शिर्केकडे पाहिले.

शिर्के - काय विचारतोय मी?? बोरास्ते सरांनी बोलवलंय तुला...

दिल्या अजूनही हातातल्या ग्लासचे घुटके घेत शिर्केकडे शांतपणे बघत होता.

शिर्के - आत्ताही हातात दारू आहे तुझ्या.. नागडा उघडा पडलायस.. चल.. ताबडतोब कपडे घाल अन चल...

दिग्या शांतपणे उठून बसला. एका दमात ग्लासातला उरलेला सगळा पेग संपवत म्हणाला...

"माझ्या अ‍ॅडमिशनच्या वेळेस प्रत्येक वर्षी वीस वीस हजार पोचलेत भ** तुझ्याघरी.. त्याच्यातूनच पोरींची लग्नं लावलीस... अन आता इथे येऊन ढोस देतोस होय??? पहिला तुझा कोचा करीन मी बोरास्तेमास्तर समोर... आणि त्यातूनही वाचलास तर हातपाय सांभाळ... अन अक्कल असेल तर जा परत त्यांच्याकडे... सांग म्हणाव हे बेणं खोटं बोलत होतं... काय?? नाहीतर आज संध्याकाळी तू आहेस अन मी आहे...पोरीबाळींसमोर उलटा करून फोडून काढीन..."

ही परिस्थिती अशी होती की या परिस्थितीचीही तक्रार करणे शक्य झाले असते. पण नंतरचे परिणाम एकट्या शिर्केलाच भोगायला लागले असते. आणि त्या प्रकरणातून वाचवायला बोरास्ते सरांच्या अधिकारांचा काहीही उपयोग झाला नसता.

शिर्केने सुज्ञपणे निवृत्ती स्वीकारली सिच्युएशनमधून! गेला निघून तो! आता खोलीत चौघेच राहिले. अशोक आणि वनदास आता अपेक्षा करत होते की दिल्या आत्मानंदला बडवून काढणार....

पण दिल्या मनाने चांगला होता. हॉस्टेलच्या खोलीत आपण गुन्हे करतो याचे त्याला भान होते. शिर्के केवळ मिळणार्‍या नोटांमुळे गप्प बसला अन मामा आमदार असल्यामुळे गप्प बसला हा दिल्याला मनातून खरे तर एक अपमानच वाटत होता. दिल्या म्हणाला...

"आत्मानंद... चौघातला एक होऊन राहायचे असेल तर कॉलेजमधे जागा मिळेल... **मस्ती केलीस तर आयुष्यभर कीर्तन करशील... काय???? "

===========================================

कॉलेज चालू झाले दुसर्‍या दिवशी! सकाळी उठून आत्मानंद सातलाच तयार झाला. कालच्या दिवसभरात तो एक शब्दही तिघांशी बोललेला नव्हता. आपापली कामे करत होता. पण मनातून घाबरलेला होता. आज मात्र त्याने ठरवले. जे काय असेल ते असो! आपल्या सभोवतालची परिस्थिती, माणसे कितीही नालायक असोत, आपण चांगले वागले की झाले! सकाळीच उठून त्यने पुस्तके अन वह्या भरल्या त्याच्या बॅगमधे!

मग वनदास उठला. त्याचे आवरून होईस्तोवर अशोक उठला. दिल्या केव्हाच उठून पलंगावरच लोळत पडला होता. बरोब्बर साडे नऊला सगळे नाश्ता वगैरे करून आले आणि आत्मानंद कॉलेजला जायला निघाला तसे अशोक आणि वनदासही निघाले.

आजपासून चार वर्षांच्या एका धमाल परंतु तितक्याच 'अनुभवाने ओथंबलेल्या' नशील्या कथेला सुरुवात होणार होती.

सगळे दारातून बाहेर पडताना आत्मानंद आपुलकीने म्हणाला....

आत्मानंद - तुम्ही...... नाही येणार का?? पिरियडला???

दिल्या - मी फक्त सुवर्णा मॅडमच्या पिरियडला येतो.....

आत्मानंद - का? त्या कोणता विषय शिकवतात??

दिल्या - त्या शिकवतात फॅक्टरी मेन्टेनन्स अ‍ॅन्ड ले आऊट.... पण.. मी शिकतो हीट ट्रीटमेंट...

आत्मानंद - हे... काही समजले नाही...

दिल्या - समजेल... साडे तीन वाजता मी वर्गात येईन... त्यानंतर समजेल तुलाही...

आत्मानंद - म्हणजे.. तुम्ही एकदम साडे तीनला येणार आहात??

दिल्या - होय...

आत्मानंद - तोवर... इथे काय करणार???

दिल्या - या नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी एकदाच ही खिडकी उघडणार आहे....

गुलमोहर: 

आजपासून चार वर्षांच्या एका धमाल परंतु तितक्याच 'अनुभवाने ओथंबलेल्या' नशील्या कथेला सुरुवात होणार होती. >>>> उत्सुकता लागून राहिलीये आता पुढे काय होणार याची...ही कादंबरी सुद्धा गाजणार हे नक्की.. सुंदरच होता आजचाही भाग... बेफिकीर, धन्स Happy

वाह वाह....

२/३ दिवसांचा इंतजार भरुन पावला.....
अप्रतिम रंगत येत चाललीय.. अन त्यासोबत पुढील ४ वर्षांची उत्सुकताही.....

धन्यवाद बेफिकिरजी....

बेफिकीर.
झकास.

दिग्या शांतपणे उठून बसला. एका दमात ग्लासातला उरलेला सगळा पेग संपवत म्हणाला... >> ईथे दिल्या पाहिजे ना!

बेफिकीरजी, फारच सुरेख चाललीये ही कथा.
आधीच एक प्रेमळ धमकी. अजिबात कोणाच्याही सांगण्यावरून कथा आटोपती घेऊ नका. कितीही भाग झाले तरी चालतील. आधीचे सगळे रेकॉर्ड तुटले पाहिजेत.

रेकॉर्ड्स तोडायचा प्रयत्न करेन. जमेल की नाही ते नशीबाला ठाऊक!

आपल्या सर्वांच्या सपोर्टवर रेटायचे ठरवले आहे.

सर्व प्रेमळ प्रतिसादकांचे मनःपुर्वक आभार!

-'बेफिकीर'!

ओल्ड मंक ह्या शीर्षकामुळे पहिले तीन भाग वाचले. अतिशय फालतू वाटली. वसतिगृहातून ही असली पात्रं दिसत नाहीत. इतकी एकसुरी/विशिष्ट छापाची लोकं नसतात.

"आपल्या सर्वांच्या सपोर्टवर रेटायचे ठरवले आहे" -

पहिले दोन भाग फार झकास आहेत. हा भाग पण चांगला वाटला, पण एक गोष्ट खटकली. पहिले ४-५ परिछ्चेद कोण कसं हसतंय यावर आहेत. पण त्याआधी काहीच घडत नाही (या भागात). त्यामुळे ते जरा 'अति' करताहेत, उगाच हसताहेत असं वाटत राहातं (मला तरी). पात्रे गडबडा हसून लोळतायंत, चटके बिटके लावून घेताएत, वाचकाना पण हसू यायला हवं ना, तसं येत नाही. हा भाग मागच्या भागाच्या continuation मधे वाचला तर कदाचित तसे वाटणार नाही.

बाकी खुपच छान जमलाय. तुम्ही hostel मधे कधी राहिला नाहीत यावर विश्वास ठेवणे कठिण आहे, इतके छान आहे.

"वसतिगृहातून ही असली पात्रं दिसत नाहीत. इतकी एकसुरी/विशिष्ट छापाची लोकं नसतात." - उलट hostel मधेच अशी 'extreme' पात्रं भेटतात. स्वानुभवावरुन सांगतोय. This is how new people come across when you first meet them, especially in a place like hostel, where diverstiy is abundant. सुरुवातील नविन ओळख होते तेंव्हा ही 'extreme पात्रं' एकसुरीच वाटतात. मग हळूह्ळू ओळख वाढत जाते तसे स्वभावाचे बाकीचे कंगोरे दिसू लागतात. ह्या कथेतल्या पात्रांचीही अजुन ओळख होइल आणि मग ते एकसुरी वाटणार नाहीत, ही आशा आणि सदिछा.

सर्वांचे मन;पुर्वक आभार! रसभंग होत असल्यास दिलगीर आहे.

कथेला प्रस्तावना नव्हती. आता लिहीणे आवश्यक वाटत आहे की खालील गोष्टी या कथेतून सांगायचा प्रयत्न आहे.

१. व्यक्तींचा एकमेकांवर पडणारा प्रभाव व त्यातून होणारे आमुलाग्र बदल

२. होस्टेल लाईफ व त्या लाईफमधे घरची पार्श्वभूमी अजिबात मिळत नसल्यामुळे येणारा एक कोरडेपणा

३. त्या कोरडेपणामधेही एकमेकांमुळे निर्माण झालेला ओलावा

आणि.... सर्वात महत्वाचे.....

४. दारू..... दारूमुळे होत जाणारे परिणाम! (यामुळेच शीर्षक असे आहे.)

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

तसेच, रेकॉर्ड्स तुटणार आहेत हा प्रतिसाद मी गर्वाने दिलेला नव्हता तर त्यातून मी स्वतःचेच बळ वाढवले होते. आता तो प्रतिसाद रद्द करत आहे. बळ वाढवण्याचा हा उपाय योजण्याचे कारण इतकेच की मला होस्टेल लाईफचा खरोखरच काहीही अनुभव नाही. काही चुकले तर सांभाळून घ्यावेत.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

तुमची पहिली कादंबरी वाचुन अपेक्षा वाढल्या होत्या...साफ निराशा....बारावीतल्या मुलाचं लिखाण वाटतंय....

>>अशोक - स्नानाचे काय म्हणजे?? मी काय उटणे लावणारा वाटलो का??? << Lol जबरदस्तच. मजा आली.

बेफिकीर,

मस्तच्...कुणी कसे घ्यायचे हे जो तो ठरवेल....
तुम्ही मात्र तुमचे लिखाण तितक्याच ताकदीने मान्डण्याचा प्रामणिक नी प्रान्ज्ळ प्रयत्न करताय यात
शन्का नाही...........म्हणुन लगे रहो..........

आणि आपला माबो परीवार आहेच की आपल्याबरोबर सांभाळून घ्यायला.....

सावरी

बेफिकिर,
एखाद्या गोष्टिकडे पहाण्याचा प्रत्येकाचा आपला आपला चष्मा अस्तो, त्यामुळे प्रत्येकाचि मते भिन्न असतात.
बाकि माझ्या द्रुष्टि ने कादंबरि १ नंबर.

बेफिकीरजी,
लोकांची निगेटिव्ह मते आली की धास्ती वाटायला लागते तुम्ही निराश व्हाल याची...पण ह्या कादंबरीपासून असे होऊ देऊ नका...ही आशुचॅम्पप्रमाणेच माझी प्रेमळ पण धमकी नाही विनंती Happy
तुम्ही स्वतः न अनुभवलेल्या गोष्टी, लाईफसुद्धा किती समर्थपणे उभे करता यासाठी तेजस यांनी दिलेला प्रतिसाद हा प्रूफ म्हणून फार महत्वाचा आहे.
सावरी, दिप्ती आणि परेश.... अगदी माझ्या मनातले शब्द तुम्ही टाईपलेत इथे...तुम्हाला माझे अनुमोदन...
लगे रहो बेफिकीरजी हम सब तुम्हारे साथ हैं Happy

एवढे प्रेमळ आधार मिळणार असतील तर लिहायचा मन लावून प्रयत्न करेन! चुकले बिकले तर उदार मनाने चुका दाखवाव्यात अशी सर्वांना विनंती!

-'बेफिकीर'!

तुमची पहिली कादंबरी वाचुन अपेक्षा वाढल्या होत्या...साफ निराशा....बारावीतल्या मुलाचं लिखाण वाटतंय....

विनायक तुमच्या प्रतिसादाशी असहमत आहे बेफिकिररावांनी सलग चार कादंबर्‍या लिहिल्यात माबोवर
भले काही भागात लिखाण कमजोर झाल असेलही पण त्यांच लिखाण एव्हडही फालतु नाही राव कि तुम्ही त्याला अगदीच बारावीतल्या विद्यार्थाच म्हणाल आणि एक शंका बारावीतील विद्यार्थी एव्हडी कंटिन्युटी देउ शकतील लिखाणात वाटत नाही राव

तुमची पहिली कादंबरी वाचुन अपेक्षा वाढल्या होत्या...साफ निराशा....बारावीतल्या मुलाचं लिखाण वाटतंय....>> मला वाटतं तुम्ही बेफिकीरांच्या लिखाणाने जळताय.

बेफिकीर आमच्यासाठी लिहा.

शैलेशराव, कैलास राव व मधुकरराव,

आपल्या तिघांच्या उदार प्रोत्साहनाने आधार मिळाला.

मनःपुर्वक आभार!

-'बेफिकीर'!

Pages