ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग १

Submitted by बेफ़िकीर on 20 September, 2010 - 04:06

उजव्या हातात भली मोठी होल्डॉलसारखी गच्च भरलेली कापडी पिशवी, डाव्या हातात अनेक पुस्तके, वह्या व काही साहित्य याने भरलेली रेक्झीनची बॅग आणि खांद्याला लटकवलेली काही खाद्यपदार्थांची पिशवी अशा सामानासकट गबाळ्या दिसणार्‍या व दमलेल्या वनदास लामखडेने दारात पाय टाकला आणि इथे येण्याचा त्याला घोर पश्चात्ताप व्हावा असं दृष्य दिसलं!

अंगावर फक्त व्ही कट अंडरवेअर घालून एका अत्यंत घाणेरड्या पलंगावर उताणा पडलेला अगडबंब दिल्या आढ्याकडे पाहात ज्या सिगारेटचे झुरके मारत होता तिच्या धुराने संपूर्ण खोली भरलेली होती.

'साला काय बकवास खोली अन बकवास माणूस आहे इथे'!

वनदासच्या मनात आलेला पहिला विचार जशाच्यातसा मांडायचा तर असाच होता!

पण हा विचार मनातच दडपावा लागणार होता. कारण बापाची परिस्थिती अशी नव्हती की केवळ रूममधला माणूस आवडला नाही म्हणून वनदासला एक नवीन, स्वतंत खोली घेऊन द्यायची! आणि परिस्थिती असती तरी इच्छा तर मुळीच नव्हती. त्यामुळे जे आहे ते स्वीकारणे आणि स्वीकारार्ह नसले तर त्याच्याशी स्वतःच निपटणे याची वनदासने अहमदनगरच्या कर्जत तालुक्याहून पुण्याला निघतानाच मानसिक तयारी केलेली होती. तेवढ्यात दिल्याची नजर वनदासवर पडली.

दिल्या - कोण पायजेल???
वनदास - या रूममधे जागा मिळालीय मला...

काळ्या कुत्र्याकडे पाहून मान फिरवावी तशी मान तिसरीकडे फिरवत दिल्या म्हणाला...

दिल्या - निघ....

वनदास दारातच उभा होता. 'निघ' हा एक शब्द ऐकू आल्यावर खरे तर त्याच्या डोक्यात सणक आली होती काहीतरी आडवे तिडवे बोलायची! पण आधी माणूस अन त्याची भूमिका समजून घेऊ अन मग प्रतिक्रिया देऊ असा एक परिपक्व विचार वनदासने वयाच्या केवळ अठराव्या वर्षी केला. त्यामागे 'हा माणूस प्रचंड आहे' हेही एक कारण होतेच! तरी विरोध तर करायलाच हवा होता.

वनदास - .... निघ म्हणजे????

दिल्याने पुन्हा तुच्छ नजरेने वनदासकडे पाहिले.

दिल्या - .... निघ म्हणजे शाणा बन... कण्णी काप... दुसरी रूम शोध... थोबाड दाखवू नको पुन्हा

याला काही अर्थच नव्हता. हा कोण आपल्याला जा म्हणणारा? पैसे आपण भरलेत हॉस्टेलचे! पावतीवर चक्क लिहीलंय रूम नंबर २१४!

वनदास शांतपणे व 'आता कितीही भांडण झाले तर ऐकायचेच नाही' असा डिसीजन घेऊन सरळ आत आला आणि विरुद्ध बाजूच्या एका तितक्याच कळकट्ट पलंगावर बसला अन सामान आजूबाजूला ठेवले.

आता दिल्याने अत्यंत शांत पण जहरी नजरेने वनदासकडे पाहिले.

दिल्या - ऐकू आलं नाय??
वनदास - माझ्याकडे पावतीय... या रूमची...
दिल्या - ऐकू.... आलं.... नाय... का?????

आता निकरावरच आलेले दिसत होते. आपण आत्ता घाबरलो तर चारच्या चार वर्षे कॉलेजमधे घाबरून राहावे लागेल अन हा पोरगा जिणे हैराण करेल हे वनदासला जाणवले. या मुलाला त्याच्याच भाषेत उत्तर देणे अत्यावश्यक होते. आणि तसली भाषा गावाकडे वनदासने असंख्य वेळा वापरलेली होती. अर्थात, वनदास आणि दिल्या यांच्या शरीरयष्टीत प्रचंड फरक होता. तरीही वनदासने पावित्रा घेतलाच!

वनदास - हित्तं र्‍हानारे मी.... काय??? फिरून जिभ चालवलीस तर हायेत ती कापडं उचकटून नागवा मारंल...

एवढा मोठा विनोद दिल्याने त्याच्या वीस वर्षाच्या रंजीत कारकीर्दीत एकदाही ऐकलेला नव्हता. तीन वर्षाच्या मुलाला घरी आलेल्या पाहुण्याने गुदगुल्या केल्यावर तो जसा हासेल तसा दिल्या चेकाळत हासत उठला आणि शेजारच्या भिंतीवर जोरजोरात बुक्या मारून हसायला लागला. वनदासला हा प्रकार झेपला नाही. सायकिक केस आहे की काय? थक्क होऊन वनदास दिल्याकडे बघत होता. प्रचंड हासता हासताच दिल्याने कसंबसं हसू दाबत वनदासकडे बघत विचारलं....

दिल्या - ... ना... ख्या ख्या ख्या ख्या... ना... नाव... हा हा हा... नाव काय नाव... ही ही.. तुझं??

वनदास - वनदास लामखडे...

ते नाव ऐकून दिल्या अणूस्फोट झाल्यासारखा उभा राहून हसायला लागला. भिंतीवर बुक्यांचे अनेक प्रहार करून हासता हासताच वनदास पर्यंत पोचला अन एकदम हसणे थांबवून त्याने वनदासची गचांडी पकडून त्याला उभा केला अन प्रचंड खुनशी नजरेने वनदासला जाळत म्हणाला...

दिल्या - दिलीप... जनार्दन... राऊत... काय??? ... दिल्या... दिल्या म्हणतात मला...

वनदास खरे तर गळाठला होता. पण आत्ता या क्षणी घाबरण्याचे नाटक करणे योग्य नव्हते.

वनदासची गचांडी पकडलेली तशीच ठेवत 'दिल्या'ने वनदासला मागच्या भिंतीवर जोरात आपटले अन पुन्हा पुढे ओढले...

दिल्या - खोली बापाची नाही तुझ्या.... आत येताना परवानगी मागायची... पुढच्या वेळेपासून लक्षात ठेव... नाहीतर सगळी हाडं एक करून पोचता करीन गावाकडे.... काय???

हे वाक्य नीटसं ऐकू आलं नसलं तरी मेसेज समजलाच होता वनदासला! आणि नीटसं ऐकू न येण्याचं कारणही तसंच होतं! मागच्या भिंतीवर टाळकं सण्णकन आपटल्यावर काय ऐकू येणार? तारे चमकले होते तारे डोळ्यापुढे!

तब्बल दहा मिनीटे आपटलेले डोके धरून वनदास तसाच बसून होता पलंगावर! दिल्या मगाचसारखाच उघडाबंब अवस्थेत सिगारेट फुंकत पडला होता.

या माणसाबरोबर राहणे अशक्य आहे! याची तक्रार वगैरे नकोच करायला! पण रूम मात्र ताबडतोब बदलून घ्यायला पाहिजे अर्ज करून!

वनदासला एक नीट समजले होते. या माणसाची तक्रार वगैरे केली तर त्याला काय व्हायची ती शिक्षा कदाचित होईलही! पण त्यानंतर आपले काही खरे नाही. त्याच्यापेक्षा आत्ता जरा सांभाळून वागावे आणि आपल्या गावाकडे गेलो की दोघा तिघांना कहाणी सांगून एकदा इकडे आणून याला तुडवून काढावा. तेच बरे होईल! शेवटी निर्णय घेऊन वनदासने नमते घेतले होते. अजून डोके दुखतच होते. या दिल्याशी गोडीत यावे म्हणून घोटभर पाणी पिऊन वनदासने पिशवीतून एक लाडू काढून त्याला विचारले...

वनदास - खाणार का??

दिल्या - बापाचं लग्न होतं का? लाडू आणायला?? इथे 'हे पाहिजे का' असं विचारायचं नसतं! जे दिसेल ते आपलं मानून घ्यायचं असतं! ती पिशवी इथे आणून ठेव! काही उरलं तर तुला मिळेलच! देसाई हॉस्टेल आहे हे!

काही खरं नाही. वनदासला आत्ताच डोके आपटलेले असल्याने ती पिशवी दिल्यापाशी नेऊन ठेवणे हे शहाणपणाचे वाटले होते. त्याने नेऊन ठेवली.

दिल्याने सिगारेट फेकून शांतपणे पाचपैकी चार लाडू, भडंगाच्या पुड्यातले पंचाहत्तर टक्के भडंग आणि नारळाच्या सर्व दहा वड्या संपवल्या अन पिशवी स्वतःच्या पलंगाच्या खाली ठेवून दिली.

गेलं! जे काय आणलं होतं ते संपलं! वनदासला आता आशा एकच होती. निदान हा पशू आपल्याशी काही काळ तरी प्रेमाने वागेल. हा कपडे कधी घालेल याचा मात्र अंदाज येत नव्हता. त्याने आपली पिशवी खोलून सामान बाहेर काढायला सुरुवात केली. एक डोळा कायम दिल्यावर रोखलेला होता. आणि तेवढ्यात दारात पुन्हा सावली आली.

"२१४ रूम?? हीच ना?? "

या वयात माणूस किती जाड नसावा याचे ते उत्तम उदाहरण होते. केवळ दूध, दही व चीझ याच गोष्टींवर पोसल्यासारखा तो देह दिसत होता. दारात मावत नव्हता. भरपूर सामान होते बरोबर! बहुधा सगळ्या खाण्याच्याच वस्तू असाव्यात! गबाळे कपडे, चष्मा आणि 'मी जन्माला आलो आहे म्हणून जगतो आहे, नाहीतर कुणाला यायचं होतं या पृथ्वीवर' असे अत्यंत कडवट भाव चेहर्‍यावर! अशोक पवार!

दिल्या - वाचता येत नाही का?
अश्क्या - नीट बोल... सातार्‍याचे दिवाणजी होते माझे पणजोबा....

दिल्या पुन्हा भिंतीवर बुक्के मारून हासला. त्याचे ते नग्नावस्थेतील बुक्या मारून हासणे फारच भीतीप्रद होते. पण अशोकला त्याची चिंताच नव्हती.

अशोक - मी अशोक पवार....

दिल्या अजून हासतच होता.. मधेच थांबून म्हणाला..

दिल्या - तुला कापला तर एक गाव जेवेल...

हे वाक्य वनदासला घाबरवून गेलं असलं तरीही अशोक शांत होता.

अशोक - तुला कापला तर कावळेही शिवणार नायत..

दिल्याने एका उडीत अशोक जवळ येऊन त्याची गचांडी पकडली अन म्हणाला...

दिल्या - दिलीप... जनार्दन ... राऊत... काय?? दिल्या म्हणतात मला दिल्या....

अशोकने जे केले ते पाहून वनदासने आ वासला. अशोकने सरळ दिल्याला ढकलून दिले अन दिल्या तोल जाऊन मगाशी वनदास आपटला होता तसा भिंतीवर आपटला.

अशोक - कपडे घालायला शिकवले नाय का आईबापांनी... पुन्हा अंगाशी येऊ नको... असशील दिल्या तुझ्या घरचा... मला नडलास तर ठेचला जाशील...

अशोक दिल्याकडे ढुंकूनही न पाहता स्वतःचे सामान लावत होता. वनदासला हा अशोक देवासारखाचे भेटला होता. दिल्या मात्र सुन्न होऊन त्या अवाढव्य शरीराच्या नव्या आगंतुकाकडे पाहात होता. आता नेमका काय स्टॅन्ड घ्यावा हे त्याला समजत नव्हते. तेवढ्यात वनदासने चहाडी केली...

वनदास - मी घरून आणलंवतं ना खाण्याच?? ते सगळं याने संपवलं....

अशोकने शांतपणे किड्याकडे पाहावे तसे वनदासकडे पाहिले.

अशोक - जा... आईला सांग त्याचं नाव...

हे वाक्य ऐकून मात्र दिल्या चिडायच्या ऐवजी हसायलाच लागला. अजूनही अशोक दिल्याकडे पाहात नव्हता. दिल्याने हळूच अशोकच्या जवळ येऊन त्याच्या नडगीवर खणखणीत लाथ घातली. इतका वेळ शानमधे बसलेला अशोक आता मात्र भेसूर ओरडला.

दिल्या - चरबी जेवढी आहे ना... तेवढी सगळी उतरेल दोन दिवसात... तुझा पणजोबा असेल दिवाण... माझा मामा आमदार आहे... तीन वर्षं राहतोय या रूममधे... प्रोफेसर्स वचकून असतात... कॉलेजमधे कुणालाही विचार... दिल्याबरोबर राहू का... शेंबडं पोरगं सांगेल... नको बा... लय ब्येक्कार त्यो! काय??

अशोकला तसाच ओरडता ठेवून दिल्या मागे वळला तर....

"माफ करा... आपल्याला त्रास द्यायची खरच इच्छा नाही... पण... मला प्राचार्यांनी या खोलीत वास्तव्य करायची आज्ञा दिलेली आहे... आपली जर काही मूलभूत हरकत नसेल तर.... मी माझे पाऊल आत टाकू का????"

आता वनदाससुद्धा हासला वनदास! नडगी विसरून अशोक खदाखदा हासत सुटला. आणि दिल्याच्या शेजारच्या भिंतीचे आता काही खरे नव्हते. तिच्यावर अत्यंत ताकदी प्रहार करत दिल्या हासत सुटला होता.

चार बेड्स असलेली ही एकमेव रूम होती. बाकी सर्व रूम्समधे दोन दोन बेड्स होते. ही सगळ्यात कोपर्‍यात असलेली रूम होती. गेली तीन वर्षे दिल्या याच रूममधे राहून प्रॉडक्शन इंजीनीयरिंगचे पहिले वर्ष अजून सोडवतच होता. आमदार मामांच्या वशिल्यामुळे हॉस्टेलमधली रूम आणि कॉलेजमधली जागाही जात नव्हती आणि कॉलेजचा दादा व्हायची इच्छाही पूर्ण होत होती.

गेली तीनही वर्षे कॉलेज खासगी व ऑटोनॉमस या सदरात मोडत असल्यामुळे फारश्या अ‍ॅडमिशन्स व्हायच्या नाहीत. पण याच वर्षी विद्यापीठाने मान्यता दिली अन प्रवेशाची झुंबड उडाली. त्यामुळे गेली तीन वर्षे या चार बेड्सच्या प्रचंड रूममधे एकटाच राहात असलेल्या दिल्याला यावेळेस प्रथमच स्टुडंट सेक्शनमधून कुणीतरी सांगीतले होते. या वर्षी तुझ्या रूममधेपण काही जण येतील. त्याही वेळेस त्याने स्टुडंट सेक्शनच्या भिंतीवर प्रहार केले होते. पण आमदार मामाला विचारले तर त्यानेच झापले होते. 'तू भाचा आहेस माझा म्हणून टिकलास, बरंच काय काय कानावर आलं आहे, लवकर सुधार नाहीतर अ‍ॅक्शन घेतली तर मीही काय करू शकणार नाही... अन कोण यायचं खोलीत ते येऊदेत.."

रामाच्याच पायाखाली दाबला गेला तर बेडूक कुणाचा धावा करणार?? दिल्याने परिस्थिती मान्य केली अन कॉलेज चालू व्हायच्या बरोब्बर दोन दिवस आधी तिघेही हजर झालेले होते. पण आश्चर्य म्हणजे एकाच्याही बरोबर पालक आलेले नव्हते. आणि हे शेवटचे आलेले पात्र मात्र भयानक विनोदी होते. कपाळाला गंध, गळ्यात एक माळ, अत्यंत साधी राहणी अन बावळट भाव चेहर्‍यावर! मराठी मात्र एकदम शुद्ध!

'आत्मानंद ठोंबरे'! एका कीर्तनकाराचा मुलगा!

'ओल्ड मंक लार्ज.... ऑन द रॉक्स'.... या कथानकाचा नायक!

"मी आत्मानंद ठोंबरे असून मी जालन्यातील एका गरीब कीर्तनकारांचा सुपुत्र आहे. आमच्या घराण्यातील मूळ व्यवसाय कीर्तन! पण वडील म्हणाले की शिक्षणही तितकेच आवश्यक असून त्यातच सांस्कृतीक व लौकीक प्रगतीची मुळे असतात. वडिलांच्या मुखातून बाहेर पडलेल्या या उक्तीला प्रमाण मानून मी या क्षेत्राकडे वळलेलो आहे. आपण तिघे वास्तव्यास असलेल्या या प्रशस्त खोलीतील एक बिछाना व काही जागा मी वडिलोपार्जित पैशातून भाड्याने घेतलेली असून शिक्षण पूर्ण होईपर्यंत येथेच राहण्याचा मानस आहे. या चार वर्षात माझ्याकडून काही आगळीक झाली तर आपण तिघेही मोठ्या मनाने माफ कराल व आजपासून मला आपल्यात सामावून घ्याल अशी नम्र अपेक्षा व्यक्त करून मी या खोलीत माझे पहिले पाऊल ठेवत आहे."

हसणे या क्रियेचे जर पैसे मिळत असते तर दिल्या आत्ता नवकोट नारायण झाला असता. अशोक अत्यंत खुनशी नजरेने आत्मानंदकडे पाहात असतानाच दिल्याच्या अकरा मजली हासण्यामुळे त्यालाही हसू आले व स्वतःचा प्रचंड देह गदागदा हालवून तो डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसू लागला. ते पाहून वनदासची भीड चेपली होती. या दोन राक्षसांमधे आपण एकटेच नसून एक आपल्याही पेक्षा अशक्त मनाचा व शरीराचा प्राणी आता आलेला आहे व त्यामुळे आपल्याला हसण्याचा संपूर्ण अधिकार आहे याची जाणीव होताच वनदास प्रचंड हसू लागला.

"आगमनावर हासणे हे मी शुभ मानतो. यातच खर्‍या मैत्रीची बीजे दडलेली असतात. ती काळानुरूप फोफावून दृष्य स्वरुपात येतात तेव्हा एक मनोहर असे नाते निर्माण झालेले पाहून मने उमलतात."

"तुझ्यायला ****"

दिल्याची ही घनघोर शिवी ऐकून आत्मानंद हबकला व रिकाम्या राहिलेल्या पलंगावर बसला. दिल्या भयानक क्रोधीत चेहर्‍याने त्याच्याकडे बघत होता. तेवढ्यात अशोक म्हणाला...

"या चार वर्षात... तू जर तुझं थोबाड पुन्हा उघडलंस... तर बापाला कीर्तन करायची लाज वाटेल असा करून पाठवीन जालन्याला...."

ही भयानक धमकी ऐकून आत्मानंदच्या पोटात गोळा आला. स्वतःच्या वडिलांचा असा उल्लेख त्याने कधीही ऐकलेला नव्हता.

"माझे वडील जालन्यात एक सज्जन व धार्मिक गृहस्थ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या प्रतिमेवर असे शिंतोडे उडवताना थोडे वयाचे व तौलनिक प्रतिष्ठेचे भान राखायला हवे अशी नम्र अपेक्षा मी व्यक्त करतो आहे... "

आत्मानंदच्या प्रवेशामुळे दोन विचित्र फरक घडून आले होते. एक म्हणजे अशोक व दिल्या यांच्यातले वितुष्ट 'दोघेही एकाच कारणामुळे हसल्यामुळे' संपूष्टात आले होते. आणि दुसरे म्हणजे वनदास हा आत्मानंदला हासण्यातील भागीदार बनल्यामुळे तिघेही एक झाले होते.

आत्मानंद - आपण... पुरेशी वस्त्रे परिधान का करत नाही आहात??

आत्मानंदच्या या विधानावर आणखीन एक गडगडाट झाला हास्याचा!

अशोक - दिल्या... रात्री तुझ्या अन याच्या पलंगाच्या मधे माझा पलंग आहे हे लक्षात ठेव हां???

या मांसाहारी विनोदावर खोली हास्यरसाने ओथंबून वाहात असतानाच आत्मानंदांनी विधान केले..

आत्मानंद - हे... हे... रात्री चालतात वगैरे का निद्रेत??

अशोक - चालतो तर?... चालतो.. बाहेर जातो.. येतो... इकडे तिकडे बघतो....

आत्मानंद - मी नवागत आहे म्हणून तुम्ही हास्योत्पादक विधाने करत आहात हे जाणवण्याइतका मी निश्चीतच चाणाक्ष आहे...

दिल्या - कसली पादक??

वनदास - आत्म्या... तू इकडे झोपत जा...

वनदासचा प्रॉब्लेम वेगळा होता. एका भिंतीशी असलेल्या पलंगावर बसलेला असताना त्याला मगाशी भिंतीवर एक पाल दिसली होती अन रात्री ती अंगावर वगैरे पडली तर काय अशी त्याला भीती वाटत होती. त्यामुळे तो स्वतःचा पलंग आत्म्याला द्यायला उदार झाला होता.

आत्मानंद - मला कोणत्याच स्थानाचे वावगे नाही.. शेवटी त्यागावरच मैत्रीची बुलंद इमारत उभी राहाते.. अनंते ठेविले तैसेची राहावे...

दिल्या आता बुक्यांऐवजी डोके आपटत होता भिंतीवर! ते दृष्य पाहून आत्ताही वनदासची बोबडी वळली होती.

आत्मानंद - हे असं का करतायत???

अशोक - त्यांच्यावर मानसोपचार चालू आहेत. हळूहळू ते असं करणं बंद करतील.. आपण निश्चींत व्हा

आत्मानंद - काय झालंय काय पण??

अशोक - त्यांना भिंत दिसली की ते असं करतात...

आत्मानंद - पण.. भिंत तर कुठेही असणारच....????

अशोक - तेच... तेच अजून त्यांना क्लीअर होत नाहीये....

आत्मानंद - हे फार भयंकर आहे...

अशोक - फार म्हणजे अतिशय भयंकर आहे हे...

आत्मानंद - यावर वैद्यकीय उपाय पुरेसे आहेत??

अशोक - नाही... म्हणूनच बहुधा आपली नियुक्ती झाली असावी....

आत्मानंद - ही पण माझी थट्टाच होती काय??

अशोक - नाही... आपल्या ओघवत्या वाणीतून त्यांना काही उपदेशामृत मिळेल असा विश्वास आहे...

आत्मानंद - मग मी या बिछान्यावर झोपायचे ठरत आहे का??

वनदास - होय...

आत्मानंद - ठीक आहे... प्रवासाचा शीण घालवण्यासाठी मी तासभर पडतो... तुम्ही ....

अशोक - आम्ही पण पडतोय...

आत्मानंद - हे काय????? हे काय पाहतोय मी????

अशोकने स्वतःच्या बॅगेतून शकिला या दाक्षिणात्य 'क' दर्जाच्या चित्रपट अभिनेत्रीचा फक्त टॉवेल गुंडाळलेला फोटो काढून भिंतीला टांगला होता.

अशोक - आम्ही या देवीची पूजा करतो...

आत्मानंद - ही देवी नसून एक कामपिपासू स्त्री वाटते...

दिल्याचे डोके फुटायची वेळ आली होती. वनदास धरण फुटावं तसा हसत सुटला होता. एकटा अशोक गंभीर होता.

अशोक - असेलही... पण तिच्या आराधनेत आमचे आयुष्य आनंदात चाललेले आहे..

आत्मानंद - हा वातावरण अपवित्र करणारा फोटो आहे....

अशोक - तुम्ही पाठ करा इकडे....

आत्मानंद भयंकर दु:ख झाल्यामुळे क्रोधमग्न अवस्थेत पाठ करून झोपला अन दहाव्या मिनिटाला घोरायला लागला.

या सर्व प्रकारात वनदास, अश्क्या आणि दिल्या एकमेकांचे घट्ट यारदोस्त झाले होते.

दिल्या - अश्क्या.... हरामी... तू याला पिळू नको... माझा जीव जाईल...

वनदास - नका रे नका... मला हासून मारू नका....

अशोक - हे पहा... या सर्वावरचे एकमेव औषध.... कुणाला इंटरेस्ट वगैरे????

भरदुपारी जेवणाच्या आधी खंबा काढलेला बघून वनदास हतबुद्ध झालेला होता तर दिल्याच्या तोंडाला पाणी सुटले होते...

वनदास - ... मी.... मी... कधीतरीच.... म्हणजे.. सहा महिन्यातून... एखादवेळा...

अशोक - मी मात्र सहा प्रहरातून एका वेळा....

दिल्या - आणि मी सहा तासातून एखादवेळा....

वनदासने त्वरा करत ग्लास धुतले रूममधले.

दिल्या - याला उठवायचा का??

वनदास - नको नको... तो म्हणेल.. काय म्हणेल रे??

अशोक - तो म्हणेल.. हे पेय पिऊन माणसाचे मर्कट होते असे माझे वडील सांगतात....

वनदास - ए.. अरे मला एवढा नको भरूस.... बास बास... पाणी...

अशोक - मीही पाण्यातच घेतो... पण लार्ज घेतो... हे कसलं तीस तीसचं बुटुकलं पीत बसायचं???

वनदास - दिल्या.... तुला?????

मला लार्ज... ऑन द रॉक्स

गुलमोहर: 

बेफ़िकिर्जि त्यदिवशि बाप हि काद्म्ब्रि वाचल्यावर ईतके रडलि होते कि माझ्या मॆत्रिनि माला खुप हसत होत्या आनि आज मि ईतकि हसतेय हे बघुन सगळे एक मेकाना डोळे मिचकवत होते हि बहुतेक वेडि झालि आहे मस्तच खरच डोळ्यातले पानि सूकले सुद्धा नव्ह्ते कि अशि सुन्द्र्र सुरवात केलि आहेत खरच फार ह्सले मी

आर्या, मला अजून ती "बाप" च्या अंतीम भागाची सकाळ आठवतेय...मी वाचत होते. सुरुवातीला नुसतेच डोळ्यातून पाणी, मग हळूच हुंदके आणि मग जोरजोरात रडूच एकदम!
तेंव्हा रडून रडून डोळे सुजले होते. अजून डोळ्यांची सुज उतरली नाही तर आता हसून हसून गाल सुजलेत... Proud
हैराण करतात हे बेफिकीर, नाही?

सानी ला अनुमोदन.
माझी पण दिवसाची सुरवात बेफिकीर यांच्या कादंबरी पासुनच होते. सकाळी ९ला पिल्लुला शाळेत सोडल की चहा घेत कांदबरी वाचणे. Happy आणी बेफिकीरजींनी ज्या दिवशी लिहीली नसेल त्या दिवशी मग काही सुचतच नाही .सानी म्हणते त्या प्रमाणे ती "बाप" च्या अंतीम भागाची सकाळ फारच रडण्यात गेली.
पण ह्या कादंबरीची मस्तच सुरवात झाली .
धन्यवाद नविन कादंबरी चालु केल्या बद्दल.

बेफिकिरजी, तुमच्या सर्व कादंबर्‍या वेळोवेळी वाचल्या आहेत. खूपच आवडल्या. तुमचा लेखनाचा स्पीड अशक्य आहे.
आजच्या कादंबरीची सुरवात झोकात झाली आहे. 'आत्मानंद' वाचुन पु. लं. च्या सखाराम गटणेची आठवण झाली.
तुमच्यामुळे 'आज काय वाचु ?' हा प्रश्नच गेले काही महिने पडला नाही. केवढं हे समाजकार्य ! धन्यवाद !
पु. ले. शु.

तुमच्या सगळयाच कादंबर्‍या छान आहेत. तुम्ही कादंबर्‍या प्रकाशित केल्या आहेत का?म्हणजे संग्रही ठेवुन सलग वाचायला आवडतील Happy
ह्या कादंबरीची सुरवात देखिल मस्तच झालीय Happy
"श्रीनिवास पेंढारकर - एक बाप " अजुन वाचली नाही, आता सलग वाचून काढायचीय Happy

:०

अरे वा! हि एक नविन सापडलि

चार कॅरेक्टर वेगवेगळे

पहिल्याच भागात खुप हासवलत Lol

बेफिकीर।
तुमच्या बऱ्याच कादंबऱ्या वाचल्यात गेल्या एक महिन्यात (जवळ जवळ ६ ते ७), खूप दिवसापासून मनात होते लिहायचे पण आत्ता लिहीत आहे.
खरंच खूप छान लिखाण करता तुम्ही, अगदी प्रत्येक विषयावर तुमच्या लेखणीचे प्रभुत्व जाणवते.
तुमच्या इतर कादंबऱ्यापैकी 'श्रीनिवास पेंढारकर.. एक बाप' खूप आवडली व भावली..चार दिवसात वाचून काढली....रात्री २-३ वाजेपर्यंत वाचत होतो ,कधी एकटाच रडत होतो तर कधी इतके हसत होतो की एक दोनदा तर रात्री शेजारी झोपलेली माझी मुलगी २वाजता उठूनच बसली.
वेड लावलंय तुमच्या लिखाणाने......अगदी मनापासून आभार...

Pages