शब्दांकुर : पर्ण १

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 23:26

2010_MB_Kavyasprurti-1.jpgस्पर्धेचे नियम :
१. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.
२. ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
३. ह्या स्पर्धेसाठी एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त प्रवेशिका (चारोळी/कविता) पाठवण्याची मुभा आहे.
४. आपली कविता ३ दिवसांच्या आत इथेच लिहा.
५. तीन दिवसानंतर नवीन विषय देण्यात येईल.
६. स्पर्धेचा निकाल परीक्षकांमार्फत लावण्यात येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संध्याकाळ रेंगाळतेय
ढगांच्या किनारींवर
वार्‍याच्या लकेरताना
स्तब्ध अशा पाण्यावर.

उबदार तरुछाया
मिटतात घरट्यांत
काजळी प्रकाश मिळे
जरतारी अंधारात.

भरत छान Happy

कविता हा काही माझा प्रांत नाही. पण एवढा छान विषय म्हणुन छोटासा प्रयत्न !

सूर्याला क्षितीजाचे वेध लागले,
आणि पृथ्विला सोन्याचा साज चढला.
आकाशाला रंगांचे वेध लागले,
आणि पाण्याला नवे रंग मिळाले.
पाखरांना घराचे वेध लागले,
आणि झाडांना चिवचिवणारे आवाज मिळाले.
रातराणीला गंधाचे वेध लागले,
आणि वार्‍यांना सुगंधाचे लेणे लाभले.
देवघराला दिव्यांचे वेध लागले,
आणि चिमणे आवाज घरभर घुमले.

Happy

सांजसंध्येचा गारवा
मनात गे झिरपला
रुणझुण पावलांनी
कृष्ण सखा दारी आला.....

देव्हार्‍यात स्निग्ध ज्योती
तेजाळती पंचारती
गोपाळाच्या स्वागताला
माझी यमुनेची भक्ती

कोसळणारा पाऊस, अंधारलेलं आकाश,
धडडक धडडक लयीत हिंदकळणारी आंबलेली शरीरं,
त्यातून वाट काढणारी भाजीची टोपली,
फरसाणाची थैली, टिकल्या-पिना-डूलांची पेटी..

जागा पटकावली, ती बसली,
तिने नजर फिरवली,
सगळं ओळखीचं दिसलं,
आश्वस्त कंटाळ्याने तिला डुलकी लागली.

- नी

तू पुरवलेले तेजाचे पुंजके, सूर्याची लाज राखायला
मान उंचावून पहात होतीस अस्त रोखणारे हजारो हात
सोबतीला...श्वासांची टप्पा चुकलेली लय
अचानक मागून चाहूल..अन् तिरंगी लडिवाळ वेढा
परत आली होती तुझी तेजाची रिक्त कुपी
सोबतीला...आता फक्त सांजवात

मी लिहिलेल्या सहा ओळी ह्या २६/११ नंतर माझ्या मनात कोरल्या गेलेल्या, मेजर उन्नीकृष्णनच्या आईंनी फोडलेल्या हंबरड्याची आठवण आहे.

दिस सरला ,कळले नाही ,गर्दीत उमगले नाही
सुर्याची किरणे हलली पण गीत हरवले नाही

जाशील आड क्षितिजाच्या ,हे कधी वाटले नव्हते
त्या प्रकाशात असताना म्हणुनच डगमगले नाही

आश्वस्त चंद्र असताना येतील चांदण्या भवती
झगमगेल रात्र तरीही मी तुला विसरले नाही

त्या प्रकाशात असताना सावली व्हायचे कळले
मी ज्योती ,संध्याछाया येता थरथरले नाही

------संध्याकाळ आयुष्याची-------

सूर्यबिंब थकलेले जरा रेलते क्षितिजावर
तृप्त स्निग्ध दृष्टी फ़िरवीत सार्‍या पसार्‍यावर

आठवणींच्या सावल्या दूरदूर लांबलेल्या
अस्फ़ुट अनाम हाका मनानेच ऐकलेल्या

सोडून जायचे सारे म्हणून किंचित हुरहूर
रात्रीशी मीलनाचे एक काळोखे काहूर

---- Happy एका इनिंगची संध्याकाळ Happy ----

घरकामातली तु, बँकेमधला मी!
होतो सारखाच कामात, विचार येई मनी...

मुलांना केलंस मोठं, शिकुन झाले ग्रेट!
कामंधामं करायला गेले 'बाहेर' थेट...

पण घाबरु नकोस काही, एकटी नाहीयेस तु!
आणि चांगलीच आहेत पोरं आपली, 'कारण' त्याचं 'तुच'...

होईन रिटायर यंदा, बंद काम धंदा!
इथुन पुढे नेहेमी, 'जिथं तु तिथं मी' Happy

---- Happy पुढच्या इनिंगची सकाळ Happy ----

वात आसूसली तेलास,
समईच्या पोटी
चाहूल तुझी लागेना,
जीव आला कंठी

ढळली सांझ सख्या,
नीज दाटली नयनी
परतू दे साजण सुखरूप,
प्रार्थना श्रीगणेशाच्या चरणी

अरे वा छान कविता आल्यात इथे.
नीधप, अश्विनी,छाया, भरत, ऋयाम, स्वप्नाली छान आहेत कविता Happy

या पर्णासाठी प्रवेशिका पाठविण्याची मुदत संपली का? "आपली कविता ३ दिवसांच्या आत इथेच लिहा" असं लिहिलंय हेडपोस्टीत पण लोकांनी नंतरही पोस्टी टाकलेल्या दिसताहेत, म्हणून विचारतेय.

निंबुडा, ही स्पर्धा १२ तारखेला जाहीर झाली आहे, त्यामुळे उद्या हा पहिला विषय बंद होऊन दुसरा विषय देण्यात येईल. तुम्ही आजच्या दिवसात इथे प्रवेशिका लिहू शकता.

ही स्पर्धा १२ तारखेला जाहीर झाली आहे >>> ओह्ह Uhoh
वर तारीख २ सप्टेंबर दिसतेय. म्हणून प्रश्न पडला होता मला. Happy

असो, ही माझी प्रवेशिका.

संध्याकाळ झाली म्हणून
तुळशीपुढे दिवा लावला
बाहेरचा अंधार निमाला
मनातला मात्र तसाच राहिला

सगळ्याच प्रवेशिका मस्त Happy

कोवळ्या उन्हाची गोडी चाखत, सकाळ कशी झरकन सरली
रणरणत्या उन्हात सावलीच्या शोधात, दुपार मात्र करपली
आता उन्हं उतरल्येत, संधीप्रकाश मनभर पसरलाय
अस्वस्थ मनाला शांत करत, तो देखील रेंगाळलाय
पण आता तर ओढ लागलेय, निशेत विरघळून जायची
वाट बघतेय ज्योत, समईतलं तेल संपायची

केसांवरती रुपेरी झाक
हातात काठी-पाठीला बाक
चष्म्याविना दिसायची खोट
नातवंडाच्या हातात बोट

सुखदु:खांनी भरली झोळी
गोडकडूश्या आठवांची मोळी
तनामनावर रेघांची जाळी
कवितेला इतक्याच ओळी... आयुष्याच्या संध्याकाळी.

निळ्या पिशवीतून सांडले
थोडे 'बुढ्ढीचे बाल'
आणि एक लपलेली काजूकोर
थोडी बालूशाही

रस्ते कापता कापता
त्यावर उठले ओरखडे
विमानांचे , काळ्या ढगांचे
चल, ती काजूकोर माग दावे