कहाणी गणेशाची - वृक्षसंवर्धनाची! : अरुंधती कुलकर्णी

Submitted by संयोजक on 22 August, 2010 - 00:53

2010_MB_Ganesha3.jpg
ऐका देवा गणेशा, तुझी कहाणी. निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे.

एक आटपाट नगर होतं. हिरवीगार झाडी, निसर्गरम्य टेकड्या, नितळ जलाशय आणि स्वच्छ हवेचं त्याला वरदान होतं. आटपाट नगरातले लोक खूप हुशार, शिकलेले, व्यासंगी होते. पोटा-पाण्यासाठी हिंडताना ते बाहेरच्या देशांमध्ये गेले. काही जण तिथेच राहिले, काही परत आले. येताना त्यांनी आपल्याबरोबर छान छान बिया, रोपे आणली. रंगीबेरंगी फुलांची, नक्षीदार पानांची. मायदेशी परतल्यावर त्यांनी मोठ्या हौसेने ती रोपे रुजवली. प्रेमाने त्यांना जोपासले. न्हाऊ-माखू घातले. खतांचा चारा दिला. सूर्यप्रकाशाचा खाऊ दिला. बघता बघता त्या रोपांचे मोठे मोठे देखणे वृक्ष झाले. येणार्‍या जाणार्‍यांचे मन मोहवू लागले. प्रत्येकाला हवेहवेसे वाटू लागले. मग इतर लोकांनीही आधीचे जुने वृक्ष पाडले व ह्या नव्या वृक्षांच्या बिया आपल्या अंगणात, शेतांमध्ये, टेकाडांवर, जलाशयांकाठी आणि रस्त्यांच्या कडेला पेरल्या. त्यांचेही मोठे वृक्ष तयार झाले. वृक्षांना लगडलेल्या रंगीबेरंगी घोसांनी, नक्षीदार पानांनी आटपाट नगर आता अजूनच देखणे दिसू लागले.

पण मग हळूहळू लोकांना फरक जाणवू लागला. त्या देखण्या वृक्षांवर पक्षी फिरकत नव्हते. किडे-मुंग्या-फुलपाखरे-अळ्या, जणू सर्व प्राण्यांनी त्यांच्यावर बहिष्कार घातला होता. बघता बघता आटपाट नगरातली पशु-पक्ष्यांची संख्या रोडावली. नव्या परदेशी वृक्षांच्या आजूबाजूची जमीन वैराण होऊ लागली. त्यांच्या छायेत इतर झाडे-झुडूपे उगवेनात. जणू निसर्गदेवतेचा कोपच झाला. भूदेवी नाराज झाली, जलदेवता रुष्ट झाली, वायूदेवता अडून बसली, सूर्यदेवता आग ओकू लागली. आटपाट नगरातले नागरिक चिंतेत पडले. त्यांना काय करावे ते सुचेना. त्यांनी संकटनाशक गणराजांची करुणा भाकली. मनोमन त्यांचे ध्यान केले. ह्या संकटातून बाहेर पडल्यास नेटाने पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संकल्प घेतला. भक्तांची तळमळ पाहून गणराय प्रसन्न झाले. त्यांनी नागरिकांना दृष्टांत दिला. ''आजपासून सगळीकडे देशी झाडे लावा. आपल्या मातीतल्या झाडांचे संवर्धन करा. आपल्या देशातील रोपे, बीजांचे जतन करा. दिखाव्याला भुलू नका. आपल्या देशात प्रचंड वनसंपत्ती आहे, तिचे जतन करा. लाकूडफाट्यासाठी, बांधकामासाठी वृक्षतोड करणे, गायराने उध्वस्त करणे थांबवा. वृक्षांना आणि प्राणिमात्रांना आपल्या स्वार्थाचा बळी करू नका. झाडे लावायचा वसा घ्या. उतू नका, मातू नका, दिला वसा टाकू नका. असे सलग पाच वर्षे करा. तुमचा हेतू पूर्ण होईल, सुख पुन्हा दारी येईल.''

आटपाट नगरातील रहिवाशांनी गणपतीबाप्पाच्या सांगण्यानुसार काम करायला सुरुवात केली. तज्ञांचा सल्ला घेऊन सगळीकडे देशी झाडांची लागवड सुरू झाली. मनोभावे त्यांना पाणी घातले. जैविक खताचा खाऊ दिला. सूर्यप्रकाशाचा चारा दिला. थंडीवार्‍यापासून संरक्षण केले. चार-पाच वर्षांमध्ये झाडे छान फोफावली. त्यांना फुले-फळे बहरू लागली. हां हां म्हणता त्यांच्यावर पक्षी विसावू लागले, आपली घरटी बांधू लागले. त्यांच्या किलबिलाटाने सारा परिसर चैतन्यमय झाला. किडे, मुंग्या, फुलपाखरे, गुरे-ढोरे वृक्षांच्या छायेत रमू लागले. भूदेवी प्रसन्न झाली. जलदेवता खळाळून हसली. वायुदेवतेच्या फुंकरीसरशी वृक्ष तालात डोलू लागले. सूर्यदेवता स्नेह बरसू लागली. निसर्गदेवता पुन्हा एकदा आटपाटनगरावर प्रसन्न झाली होती. आटपाटनगरीचे नागरिक मनोमन आनंदले. त्यांनी एकमुखाने गणरायाचा जयजयकार केला व आपल्या संकल्प-सिद्धीसाठी नव्या जोमाने काम करू लागले.

आटपाट नगरीच्या लोकांच्या मनीचा हेतू जसा साध्य झाला, तसा तुमचा-आमचा होवो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफल संपूर्ण.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा.. सुंदर विषय. मागल्याच आठवड्यात एका माबोसदस्याशी बोलताना हायब्रिड बियाणे आल्यानंतर नष्ट झालेल्या अनेक धान्यांच्या वाणांबद्दल बोलणे झाले त्याची आठवण आली..

मस्त. साध सोपं.
हायब्रिड बियाणांवर मध्ये एक्स्प्रेस की टाईम्स मध्ये एक चांगला लेख वाचला होता, त्यामुळे नुकसान कसे होते आहे ह्यावर कल होता.

महागुरु, टण्या, केदार, सावली.... धन्स सगळ्यांचे! Happy

टण्या, केदार, मध्यंतरी मीदेखील माधव गाडगीळ व श्री. द. महाजनांचे विदेशी हायब्रीड वाणाच्या दुष्परिणामांवरचे लेख वाचले होते. त्यातूनच ही गणेशबाप्पाची कहाणी स्फुरली. Happy

लेख खुप आवडला.

मात्र

"तज्ञांचा सल्ला घेऊन सगळीकडे देशी झाडांची लागवड सुरू झाली."

तज्ज्ञ काय फक्त सल्ला द्यायसाठीच असतात? त्यांनी एखादे झाड स्वतः लावून संगोपण करायला काय हरकत आहे?
असा एक बालीश प्रश्न मनात डोकावून गेला. Happy

अकु
खूपच मनाला पटेल अशी गोष्ट.
खरच ग आजकाल जिकडे पाहावे तिकडे परदेशी झाड दिसतात.
छान विषय, उत्तम मांडणी.