अवघी विठाई माझी (२२) अस्पारागस

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

asp.jpg

हि भाजी अगदी डेलिकसी समजली जाते. अगदी कोवळे हिरवे कोंब
असे हिचे रुप असते (हेच कोंब अंधारात वाढवले तर पांढरे दिसतात. आणि
अस्पारगस चा एक प्रकार म्हणून ते ओळखले जातात.)
या भाजीचे वरचे शेंडे अगदी कोवळे असतात. आणि ते पट्कन शिजतात.
त्याखालचा भाग शिजायला जरा जास्त वेळ लागतो. त्यावर कधीकधी कडक
साल असते आणि ती पोटॅटो पीलरने काढावी लागते. आणि मूळाकडचा भाग
(हा पांढरट असतो) तो काढून टाकावा लागतो.

अशा तीन तर्‍हा असल्याने. अस्पारागस शिजवताना जरा काळजी घ्यावी लागते.
याची जूडी बांधून, उकळत्या पाण्यात उभी ठेवून, खालचा भाग आधी शिजवतात
आणि मग वरचे तूरे शिजवतात. (यासाठी एक खास भांडे पण मिळते.)

मी मात्र त्याचे तूरे कापून वेगळे ठेवले आणि ते वेगळे शिजवले.
हि भाजी साधारणपणे स्टीम करुन खाल्ली जाते. सोबत मीठ आणि बटर घेतात.
पारबॉईल्ड अंड्याबरोबर पण हि खाल्ली जाते.

पावाच्या स्लाईसला, एखादे फ्लेवर्ड बटर लावून त्यात अस्पारगस गुंडाळून
ते सोनेरी रंगावर बेक करुन खाता येते. असाच प्रकार पफ़ पेष्ट्री वापरून
करता येतो. नूसती अस्पारगस पण रोष्ट वा बेक करता येते.

aspdish.jpg

या वरच्या प्रकारासाठी, मी अस्पारगसचे दांडे ऑलिव्ह ऑईलमधे थोडे परतून घेतले.
त्यात मीठ आणि मिरपुड टाकली. त्याचबरोबर थोडे स्वीट कॉर्न परतले. मग वरचे
कोवळे शेंडे पण असेच परतून घेतले. सोबत घेण्यासाठी, क्रीम चीज आणि थोडे
सार क्रीम फेटून घेतले. त्यात थोडी मिरपूड आणि पुदीना घातला. खाताना प्रत्येक
तूकडा या मिश्रणात बुडवून खायचा.

मी कधी केली नाही, पण हि भाजी बारिक चिरुन आपण साधारणपणे गवार वा
चवळीच्या शेंगांची भाजी करतो, तशीही करता येईल. मसाले मात्र कमीत
कमी वापरावे. अर्थात यावेळीही तूरे आणि त्याखालचा भाग वेगवेगळा शिजवावा
लागेल.(यावेळच्या भारतभेटीत, ग्रांटरोडच्या शंकर शेठ लेन अर्थात भाजीगल्लीमधे
हि भाजी दिसली. चेंबूरला पण दिसली. ही भाजी टिनमधेही मिळते, पण मलातरी
तिची चव अजिबात आवडली नाहि.)

अस्पारागस खायचा सल्ला दिला जातो, तो त्यातील खनिजांमूळे. रोजच्या गरजेची
अनेक खनिजे त्यात असतात. जीवनस्त्व अ, क, इ, के, थायमीन, रिबोफ़्लेविन,
रुटिन, नायसीन, फॉलिक ऍसिड, लोह, फॉस्फोरस,पोटॅशियम, तांबे, मॅंगनीज, सेलेनियम,
कॅल्शियम सगळे त्यात असते.

अस्पारागस म्हणजेच शतावरी का ? असा प्रश्न नेहमी विचारला जातो.
अस्पारगस चे शास्त्रीय नाव Asparagus officinalis आणि शतावरीचे Asparagus racemosus , म्हणजे अर्थातच कूळ एकच असले तरी या दोन्ही वेगळ्या वनस्पती आहेत. अस्पारगस चे केवळ
कोंबच खाण्यासाठी वापरले जातात, तर शतावरीची मूळे औषधात वापरतात.
शतावरीला बोटभर जाडीची आणि साधारण १ सेमी रूंदीची अनेक मूळे असतात.
ती सुकवून, त्यातला मधला चिवट धागा काढून, बाकीच्या भागाचे चूर्ण करुन
वापरतात. अस्पारगसच्या मूळांचा खाण्यासाठी उपयोग होतो का, याचा कुठे
उल्लेख मला आढळला नाही. पण शतावरीच्या पानांची भाजी करता येते,
असे मी वाचले होते. असो शतावरी हे एक उत्तम औषध आहे, पण त्यासाठी
वेगळा लेख लिहावा लागेल.

विषय: 
प्रकार: 

छान Happy

वॉव ! वरची प्लेट मी अख्खी खाऊ शकते. (म्हणजे प्लेटमधलं)
बादवे दिनेशदा..... एखादे वेळी मी पूर्वीही विचारलं असेल ....शतावरीचं बोटॅनिकल नाव आणि ती काय प्रकारची वनस्पती असते माहिती आहे?

मानुषी.
शतावरीचे शास्त्रीय नाव Asparagus racemosus
तिचा वेल असतो. बारिक सूयांसारखी पाने असतात. याला जमिनीखाली, जाड मूळांचा गठ्ठा लागतो. तीच मूळे सूकवून त्याचे चूर्ण करुन वापरतात.

दिनेशदा,
मस्त लेख आणि प्रचिसुद्धा!!! मला अस्परागसची ओळख जर्मनीत आल्यावरच झाली. त्याला जर्मन भाषेत श्पार्गल (spargel) म्हणतात. मी ते फक्त पांढर्‍या रंगातच पाहिले/ खाल्ले आहे. मूळ स्वरुपात ते असे हिरवे दिसते ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे आणि शतावरीसुद्धा ह्याच वंशातली ही पण माहिती आजच मिळाली.
मला श्पार्गलची चव आवडत नाही. पण आरोग्यासाठी इतकी उपयुक्त आहे म्हटल्यावर आता मी खाणार Happy

>>>रोजच्या गरजेची
अनेक खनिजे त्यात असतात. जीवनस्त्व अ, क, इ, के, थायमीन, रिबोफ़्लेविन,
रुटिन, नायसीन, फॉलिक ऍसिड, लोह, फॉस्फोरस,पोटॅशियम, तांबे, मॅंगनीज, सेलेनियम,
कॅल्शियम सगळे त्यात असते.>>> एवढं सगळं आहे म्हटल्यावर सॅलडमध्ये वगैरे घालून आवडून घ्यावीच लागेल.

दिनेशदा, तुम्ही मेलबर्नला कधी येताय? Happy
छान माहीती आणि रेसिपीज!

मला आवडते ही भाजी. नुसती मीठ घालुन वाफवुन्/मावे मध्ये शिजवुन पण मस्त लागते. वाफवलेल्या अस्पारागसचे रायते पण छान लागते. दही मीठ साखर घालुन त्यावर एक छोटी पळीफोडणी.

दिनेशदा छान माहीती आणि रेसिपीज !!!

मला ही भाजी आवडते. साईड डिश म्हणुन पण चांगली लागते.
मी जराश्या तेलात जिरं आणि आलं परतुन घेते मग अस्परागस टाकुन त्यावर मीठ टाकते. अशी पण छान लागते.

दिनेशदा,
आम्हाला खायला मिळणार (कि लागणार ? :डोमा:) नसली तरी ही भाजी खायची असल्याने अशी माहिती नेहमी आवडते !
Lol
पण शतावरीच्या पानांची भाजी करता येते,
असे मी वाचले होते. असो शतावरी हे एक उत्तम औषध आहे, पण त्यासाठी
वेगळा लेख लिहावा लागेल.

शतावरीवर तुमच्या लेखाची वाट पहात आहोत्,या बद्दल मी वाचलयं,ऐकलयं पण प्रत्यक्ष बघायचं आहे,घरी आणुन लावायचं आहे ..
Happy