शेतकरी गीत: आज सण हाय बैलपोळा

Submitted by पाषाणभेद on 8 September, 2010 - 22:08

शेतकरी गीत: आज सण हाय बैलपोळा

शिंगे घासली
बाशींगे लावली
माढूळी बांधली
म्होरकी आवळली
तोडे चढविले
कासरा ओढला
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||१||

गोंडे बांधले
वेसनी घातल्या
छमच्या गाठल्या
चवर ढाळली
शिक्के उठविले
गेरू फासला
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||२||

नाव लिहीले
झेंडूहार घातला
झुली चढविल्या
पैंजण घातले
पट्टा आवळला
फुगे बांधले
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||३||

घुंगरू वाजविले
बेगड चिकटवली
माठोठ्या बांधल्या
गाववेस फिरवीले
गोडधोड केले
सासुसुनाने ओवाळले
नैवेद्य दावला
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०९/२०१०

गुलमोहर: